थोडी सुखी, थोडी कष्टी

शरद's picture
शरद in जे न देखे रवी...
31 May 2012 - 2:02 pm

"आली माहेरपणाला ('http://www.misalpav.com/node/18384) या इंदिरा संत यांच्या कवितेत आपण एका माहेरवाशीणीची व्यथा पाहिली होती.पण ही अशी एखादीच व्यथा असू शकते असे नाही. या माहेरच्या भेटीत अनेक पैलू पहाता येतात.स्वत:च्या पहिल्या मंगळागौरीकरिता वा बाळंतपणा करिता येणारी,घरातील दुसर्‍या एखाद्या मंगलकार्याकरिता येणारी, ... अशा आनंददायक घटनांबरोबरच घरातील एखादी वृद्ध व्यक्ती गमावणे अशा दुख:द प्रसंगाकरिताही ती माहेरी येणे अपरिहार्य असते. अनेक कवितांचे बीज ह्या भेटीत कवीला खुणावत असते. विंदा करंदीकरांनी अशीच एक हळुवार कहाणी पुढील कवितेत गायिली आहे.

थोडी सुखी, थोडी कष्ठी ....

फार दिवसांनी आली
मागारीण माहेराला ;
स्टेशनात भेटला नि
ओळखीचा टांगेवाला

ओळखीचा वाटला तो
कोण कोठचा, ही भ्रांत !
हसला तो ओळखीने
आणि चढली ती आत.

नाही वळविली त्याने
पुन्हा दृष्टि तिच्याकडे;
भरदार सुटे घोडा,
आणि चाबूक कडाडे.

ऒळखीचे आले वाडे ;
आली, आली, गेली शाळा
"अगबाई ! तोच हा का ?"
तिला चंदू आठवला !

आठवले सारे सारे,
आठवले त्याचे डोळे
आणि तिच्या काळजात
काही थरारून गेले.

फारा दिवसांनी आली
मागारीण माहेरला ;
गल्लीतल्या घरापुढे
त्याने टांगा थांबविला.

नाही वळवली त्याने
पुन्हा तिच्याकडे दृष्टि :
माहेराला भेटली ती
थोडी सुखी, थोडी कष्टी.

विंदा करंदीकर

इथे कहाणी हे मुद्दाम म्हटले आहे. विंदांनी ज्या अनेक नवीन वाटा कवितेत चोखाळल्या त्यातील एक म्हणजे कथानकप्रधान काव्य. सोपे नव्हे. एक गोष्ट घ्या, वाक्यांचे तुकडे पाडून एकाखाली एक लिहा... झाली कविता. नवशिके कवी बर्‍याच वेळी अशीच सुरवात करतात. यात अनेक धोके उद्भवतात. त्याची चर्चा आज करत नाही. वरील कविता ५०-६० वर्षांपूर्वीची. गावांत टांगेच होते, रिक्षा नव्हेत. बरेच दिवसांनी माहेराला आलेली मागारीण (माघारीण-नववधू) स्टेशनवरून बाहेर स्टॅंडवर आली व तिला ओळखीचा वाटणारा टांगेवाला भेटला. तो तिच्याकडे पाहून ओळखीने हसला. ती टांग्यात चढली पण तिने त्याला ओळखले नाही. ओळखीचा तर वाटतो...पण नक्की कोण ? हा तिचा संभ्रम त्याला जाणवला, त्याची निराशा, त्याचे दु:ख, त्याला स्वत:चा झाला वाटणारा अपमान... त्याने मग मागे वळूनही पाहिले नाही. भ्ररदाव सुटलेल्या घोड्यावर कडाडणारा चाबूक... खरे म्हणजे तो स्वतावरचाच राग होता. ओळखीचे वाडे भेटले, शाळा आली व गेलीही. आणि शाळा दिसल्यावर तिच्या मनात लक्ख प्रकाश पडला.. हा चंदू तर नव्हे ? त्या अल्लड वयातील आकर्षण, त्याला प्रेम म्हणणे तेव्हडे बरोबर नव्हे, त्याचे डोळे आठवले व तिच्या काळजात एक लहर थरारून गेली. पत्ता सांगावयाची गरज नव्हतीच. त्याने गल्लीत घरासमोर टांगा उभा केला. त्याने तिच्याकडे दृष्टीही फिरवली नाही. तीही मुकाटपणाने घरात शिरली. थोडी सुखी, थोशी कष्टी !

या कवितेतला संयम व नेमकेपणा वाखाणण्याजोगा आहे. वाव असूनही भडकपणा कटाक्षतेने टाळला आहे.
पन्नास-साठ बर्षांपूर्वीची एका प्रतिष्ठित घराण्यातील नववधू मुलगी व एक सामान्य परिस्थितीतील टांगेवाला यांची ही कहाणी. शेवट अटळ होता. त्याने मागे दृष्टीही न टाकणे हा मध्यबिंदु. त्याच्या मनावरील ताण दाखवावयाला भरदाव घोडा व कडाडणारा चाबूक तर तिच्या बाजूने माहेरी येऊनही थोडे कष्टी मन बस. कवी एवढेच सांगतो. कवितेचा घाट व तिची लय आकर्षक आहे. दोन गोष्टींकडे लक्ष द्या." आली, आली, गेली शाळा"
भरधाव धावणार्‍या टांग्यामुळे शाळा क्षणभरच दिसली पण विस्मृतीत गेलेल्या चंदूला समोर आणावयास तेव्हढे पुरे होते. तसेच "आठवले त्याचे डोळे". डोळे "बदामी". "शराबी" म्हणून नव्हेत. शाळेत दोघांचे बोलणेचालणे झाले असणे अवघडच. तेव्हा त्याच्या भावना तिने त्याच्या डोळ्यातच वाचल्या असणार. खोल मनात त्या डोळ्यांचीच प्रतिमा रुजलेली !

शरद

कविता

प्रतिक्रिया

उदय के'सागर's picture

31 May 2012 - 2:18 pm | उदय के'सागर

... विंदा केवळ अप्रतिम :)

खुप खुप दिवसांनी एक नविन आणि अशी गोड कविता वाचायला मिळाली.... धन्यवाद हि कविता इथे शेअर केल्याबद्दल आणि तुम्ही मांडलेला कवितेची सविस्तर अर्थ कवितेची गोडी अजुनच वाढ्वुन गेला :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 May 2012 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रसग्रहणासाठी निवडलेली कविता आवडली.

-दिलीप बिरुटे

सुखद आणि दुखद ..छान मेळ

सुखद आणि दुखद ..छान मेळ घातलाय
आवडलं :)

अमितसांगली's picture

1 Jun 2012 - 9:57 am | अमितसांगली

उत्तम कविता व तितकेच चांगले रसग्रहण....

शब्दाशी सहमत. कविता अवडली, एखदी छोटी डॉक्युमेंटरी वाटली.

स्मिता.'s picture

1 Jun 2012 - 5:48 pm | स्मिता.

सुंदर कविता आणि तिचे तितकेच छान रसग्रहण. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

स्पंदना's picture

2 Jun 2012 - 4:24 am | स्पंदना

थोडक्या शब्दात महाभारत सांगितल्यासारख काव्य आहे हे. काही म्हणा हे असे आयुष्यात चुकलेले ठोके कायम पुन्हा पुन्हा तितक्याच तिव्रतेने अनुभवाला येतात, विस्मृतीची धुळ वा काळाचा पडदा यांना कधिच धुसर नाही करु शकत.

सुधीर's picture

2 Jun 2012 - 12:41 pm | सुधीर

छान! तुमच्या सुंदर रसग्रहणामुळे कविता अधिक चांगली समजली.

चाणक्य's picture

3 Jun 2012 - 7:39 am | चाणक्य

अजुन येउद्यात

पैसा's picture

3 Jun 2012 - 5:49 pm | पैसा

पुढची कविता आणि रसग्रहण थोडं लवकर लिहा अशी आग्रहाची विनंती करते!

रमताराम's picture

3 Jun 2012 - 8:42 pm | रमताराम

शरदराव, कविता-रसग्रहणाचा हा उपक्रम एकदम आवडला, थोडक्यात कविता उलगडून सांगण्याची शैलीही. पुढील लेखाची वाट पाहतो आहे.

रघु सावंत's picture

3 Jun 2012 - 11:47 pm | रघु सावंत

विंदा ना सलाम
भरधाव धावणार्‍या टांग्यामुळे शाळा क्षणभरच दिसली पण विस्मृतीत गेलेल्या चंदूला समोर आणावयास तेव्हढे पुरे होते.
आयुश्यात एका वळणावर प्रत्येकाला प्रेम होतच. तस तिलाही झाले असणार,तो गरिब असल्याने त्यांचे लग्न झाले नाही हेच दु:ख आहे.
रघू