आली माहेरपणाला
व्यथा कोणाला चुकल्या आहेत ? लहान बालक, तरुण प्रियकर-प्रेयसी, वृद्ध आईवदील, शंबुक-एकलव्यासारखे खालील स्तरातील माणसे व त्यांना शिक्षा देणारे राम-द्रोणाचार्य यांसारखी उच्च स्तरातील राजे-राजगुरू, "जाणता राजा" शिवशंभू व क्रूरकर्मा बादशहा औरंगजेब, दोन वेळा जेवण मिळावयाची भ्रांती असणारे श्रमिक व कोट्यावधींचा घोटाळे करणारे राजकारणी, मनस्वी कलाकार, सर्वांना काही ना काही व्यथा आहेतच. वैयक्तिक माणसे सोडाच पण समाजाचा एखादा संपूर्ण घटकच व्यथित असू शकतो. या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यात उठणारच आणि शृंगार रसांचा राजा म्हणून गौरवला गेला असला तरी तुमच्या लक्षात दीर्घ काळ राहिलेली कविता-कथा ही करुणेतच चिंब भिजलेली असते. अशा काही कवितांची ओळख आपण करून घेणार आहोत. आता मी लिहणार म्हटले म्हणजे या कविता किमान पन्नासएक वर्षे जुन्या असणार हे आलेच. पण तरीही त्यातील भळभळणारी वेदना आजही, बदलत्या काळातही, तुमच्या हृदयाला चटका लावून जाईल.
कै. इंदिरा संत यांच्या काव्याला त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आघातामुळे दु:खाची किनार लाभली. त्यांच्या बहुतेक सगळ्याच कवितांवर जोगियाच्या आर्त स्वरांची सावट पडलेली तुम्हाला दिसेल. पण अतिशय संयत शब्दांत व्यक्त केलेली अभिव्यक्ती हुरहुर लावून जाते. त्यांच्या "शेला" (१९५१) या संग्रहातील "आली माहेरपणाला" ही कविता बघा :
आली माहेरपणाला ;
आणा शेवंतीची वेणी,
पाचूमरव्याचे तुरें,
जरीकुसर देखणी !
आली माहेरपणाला ;
आणा रवा-तूप-लोणी ;
केशरवेलचीचा
वास भरे कोनोकोनी !
आली माहेरपणाला ;
चाले कौतुक सोपयांत,
माजघरीं, चुलीपाशीं,
झेंडूच्याही फुलोर्यांत !
कौतकाची गोड लाट
अशी येतां अंगावर
थरथर पापणींत
आणि डोळे कुठे दूर !
नव्या जाणिवेची कळ
कशी कुणा सांगायाची ;
नव्या संसाराची राणी---
राणी नाही हृदयाची !
एके काळीं माहेरवाशीण पहिल्यांदी माहेरी आली कीं तो एक सणच असे, विशेषत : लहान गावांत, खेडेगावात. दसर्या-दिवाळीपेक्षा जास्त आनंदाचा. कौतकाचा भाग जास्त. लहानथोरांना काय करूं, काय नाही असे होऊन जाई. लहानसहान गोष्टीना मह्त्व प्राप्त होई. परसातील शेवंती; जी फक्त देवपूजेसाठी परडीत गोळा व्हावयाची, तिची आता वेणी केली जाऊ लागली. पाचू-मरवा या तश्या दुर्लक्षित रहाणार्या सुगंधी रोपट्यांकडे आता लक्ष जावू लागले. लाडू जरी अधूनमधून होत असले तरी आतांच्या लाडवांकरतां केशर-वेलची हवी अशा मागण्या चुलीपासून बाहेरच्या ओसरीपर्यंत पोचू लागल्या. स्वयंपाकघरात, माजघरांत,सोप्यात, घरात सर्वत्र पसरलेली ही कौतुकची लाट पार परसातील बागेतही पोचली तर नवल नव्हे.
ही लाट, उर्दू शायरीत म्हटले आहे त्या प्रमाणे " मह्सूस कर सकता हुं, छू नही सकता" अशी जाणवणारी. इथ पर्यंत सगळे कसे सुखावून सोडणारे, आपल्यालाही त्या लाटेत सामिल करून घेणारे. पण पुढील कडव्यात एकदम पाल चुकचुकते. जिच्या करता हे सर्व चाललेले तिचे काय ? तिची पापणी थरथरणारी व डोळे मात्र यात कुठेच नाहीत; ते दूर काहीतरी शोध घेण्यात गुंतलेले !
कसे सांगावयाचे ? कुणाला सांगावयाचे ? काय सांगावयाचे ? सर्वजण आनंदात असतांना त्यांच्या सुखाला विरजण कसे काय लावणार ? कसे सांगावयाचे की तुम्हाला दिसणारी ही नव्या संसाराची राणी, तिला जे काय हवे आहे ते मिळवण्यात अपयशी ठरली आहे !
या climax ला कविता संपते. कविता संपते म्हणजे कवियत्री स्वत : काही सांगावयाचे थांबविते. आता तिला काही सांगावयाचे उरलेले नाही. पुढे जे काही काव्य आहे, खरे म्हणजे अधुरी कहाणीच, ती आता रसिक वाचकाने स्वत:च लिहायाची आहे. सहृदयतेने स्वत:च्या मनात. फार थोड्या कविता वाचकाला असे आपल्यात सामील करून घेतात. व सामील करून घेतल्यावर आपल्या खोल मनात दुसरी कविता लिहण्यास प्रवृत्त करतात.
शरद
प्रतिक्रिया
26 Jun 2011 - 2:41 pm | तर्री
इंदिरा बाईंच्या कविता नेहमीच अशा कातर . तो भाव लेखनातही आला आहे.
आज काल "संपर्क क्रांती " मुळे , माहेर खूप जवळ आले आहे असे वाटते.
(आणि त्यामुळेच कि काय सासरी "विरघळून " एकरूप होणे कठीण झाले आहे )
26 Jun 2011 - 4:53 pm | स्वाती दिनेश
रसग्रहण आवडले,
स्वाती
26 Jun 2011 - 6:21 pm | रेवती
रसग्रहण आवडले.
कवीता संपता संपता कसंसच झालं.
26 Jun 2011 - 10:26 pm | माझीही शॅम्पेन
रसग्रहण आवडले. +१
कवीता संपता संपता कसंसच झालं. +२
26 Jun 2011 - 8:09 pm | पल्लवी
कविता फार पुर्वी वाचनात आली, तेव्हाच खूप आवडून गेली.
आता पुन्हा वाचुन बरं वाट्लं..
कवितेचा गाभा विस्कटु न देता केलेलं रसग्रहण देखिल छानच.
26 Jun 2011 - 10:08 pm | शिल्पा ब
मला कविता वगैरे फारसं समजत नाही, पण हि सोप्या भाषेत लिहिलेली कविता समजली. रसग्रहण आवडले.
26 Jun 2011 - 10:48 pm | पैसा
रसग्रहण आवडलं. अगदी थोडक्या शब्दात खूप काही सांगणारी कविता छान उलगडून दाखवलीत.
29 Jun 2011 - 11:03 pm | अनामिक
हेच म्हणतो.
29 Jun 2011 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शरदसाहेब, रसग्रहण आवडले.
अजून येऊ द्या........!
-दिलीप बिरुटे