वास्तवदर्शी चित्रपट - मनोगत

ग्रंथपाल's picture
ग्रंथपाल in पुस्तक पान
1 Jan 2012 - 4:28 pm

एकेकाळी अतिशय लोकप्रिय असणार्या 'सँटोजन कि महफिल' या विविध भारतीवरील कार्यक्रमातील एका विनोदी चुटक्यात 'जिस फिल्म में परदे पर सिर्फ अंधेरा हि अंधेरा दिखायी देता है, उसे आर्ट फिल्म कहते है' अशी विनोदी व्याख्या ऐकुन मीही मनमुराद हसलो होतो. तेव्हा मी फार तर मॅट्रिकला असेन. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी जिल्ह्याच्या गावी(यवतमाळला) शिक्षण घ्यायला गेलो तेव्हा 'कलयुग' पाहिला आणी तो विशेष कळला नाही तरी 'हे पाणी काहितरी वेगळं आहे' याची जाणीव तेव्हा झाली. त्यानंतर चित्रपटाची व विशेषतः कृष्णधवल चित्रपटांची आवड वाढीला लागली व गुरूदत्त, राज कपूर यांची गाठ पडली. गुरूदत्तचे चित्रपट ह तेव्हा एक इतिहास बनला होता, पंरतू 'रसरंग' सारख्या साप्ताहिकांमधून 'गुजरा हुआ जमाना'सारख्या सदरांमधून तो काळ आणी त्यातील व्यक्तीरेखा जिवंत होऊन भेटत असत. वडिलांना सिनेमाची आणी सिनेमावर चर्चा करण्याची आवड होती त्यातुनही सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण होत होती. त्याचवेळी 'मनोहर' या साप्ताहिकातून आल्फ्रेड हिचकॉक यांच्या चित्रपटांच्या कथा मराठीत अनुवाद होऊन प्रसिध्द होऊ लागल्या व इंग्रजी चित्रपटांविषयीचं कुतूहूल जागं झालं. इंग्रजी चित्रपट पाहायला मिळणं हे त्याकाळी माझ्यासाठी अशक्यप्राय होतं.

मुंबईत आल्यावर अधाशासारखे वाट्टेल तसे इंग्रजी चित्रपट पाहुन मी ती कसर भरून काढली. हे चित्रपट पाहिल्यावर त्यातील तंत्र, छायाचित्र यापुढे समकालीन हिंदी चित्रपट कसासाच वाटू लागला आणि गुरूदत्तची महती अधिक कळू लागली. श्याम बेनेगल यांच्या 'कलयुग'चं वेगळेपण अधिक लक्षात येऊ लागलं. पत्रकार झाल्यावर एक दिवस प्रभात चित्र मंडळाने आयोजित केलेल्या एका महोत्सवात तेंडुलकरांच्या पटकथा असलेले चित्रपट सलग पाहायला मिळाले आणी तिथं 'मंथन' भेटला. त्यामुळं आत्मविश्वास वाढला. अरे, आपल्या भारतीय चित्रपटातही असं काहितरी वेगळं बरंच आहे, याची खात्री पटली. मग बेनेगलांचे व समकालीन समांतर चळवळीतील मिळतील ते चित्रपट पाहत सुटलो. त्यानंतर 'प्रभात'च्याच एका महोत्सवात सत्यजित राय यांचे बहुतांश चित्रपट पाहायला मिळाले आणी माझ्या चित्रपटविषयक जाणीवा श्रीमंत झाल्या. सत्यजित राय हा 'बाप' माणूस असल्याची खात्री पटली.

चित्रपटविषयक मिळेल ते वाचयचं, मिळेल ते पाहायचं हा जुनाच परिपाठ होता आणी 'सकाळ' मध्ये चित्रपट समीक्षणाची जबाबदारी पडल्यावर त्याला अधिकृत स्वरूप आलं. 'प्रभात चित्र मंडळ'चा सदस्य झाल्यावर जागतिक चित्रपटांच्या जगात डोकावण्यासाठी खिडकी उघडली गेली आणी 'लोकसत्ता'त आल्यावर संपादक डॉक्टर अरूण टिकेकर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कलकत्त्याला पाठवलं तेव्हा थेट त्या जगातच उडी पडल्यासारखं वाटलं. या महोत्सवातील 'रेट्रास्पेक्टिव्ह' विभागातून ऑर्सन वेल्स, फेलिनी, कीस्लोवस्की असे दिग्दर्शक भेटले व कुरोसावासारख्या 'मास्टर'शी गाठ पडली.

जागतिक चित्रपटांच्या या तुलनेत आपण आणि विशेषत: हिंदी चित्रपट कुठे आहे असा प्रश्न नेहमी पडत असे. समांतर चित्रपटांची चळवळ , तिचा इतिहास माहित होता. दुरदर्शनमुळे त्यातले बरेचशे चित्रपट पाहायलाही मिळत होते. परंतू कालक्रमानुसार त्यांचा विचार करून या चळवळीच्या आगे-मागे डोकावण्याची संधी मिळत नव्हती. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पाठ्यवृत्ती योजनेत 'वास्तवदर्शी चित्रपटांची सुची' हा विषय पाहिला तेव्हा त्या निमित्तानं हा अभ्यास करायला मिळाला तर बरं होईल असं वाटलं आणि या विषयासाठी प्रत्यक्ष निवड झाली तेव्हा स्वता:च्याच ज्ञानाच्या व माहितीच्या कक्षा रुंदावून घेण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाला.

या निमित्तानं वास्तवदर्शी चित्रपटांचा इतिहास, त्याची जागतिक पार्श्वभूमी तर अभ्यासाला आलीच. शिवाय पन्नास वर्षातील अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांच्या कथावस्तू शोधताना त्यातील विविधतेमूळे अनेकदा चकित व्हायचीही वेळ आली. या यादीतले सर्व चित्रपट मी स्वत:ही पाहिलेले नाहीत, मात्र संधी मिळेल तेव्हा ते पाहण्याची इच्छा आहे. आज अशा चित्रपटांची तुरळक प्रमाणात निर्मिती होत असली तरी त्यांचा भर ओसरला आहे. अशा वेळी ही सुची अभ्यासकांना संदर्भासाठी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. ज्या चित्रपटांचे कथानक हाती लागले व ज्यांचे वेगळेपण स्पष्ट झाले असे सर्व चित्रपट या सुचीत समाविष्ट केलेले आहेत. तरीही चार-दोन चित्रपट राहिले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे चित्रपट राहिले असतीलच तर त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढीच असेल हे नक्की.

या सुचीचे स्वरूप आणी वास्तवदर्शी चित्रपटाची व्याख्या स्पष्ट होण्यासाठी माझे मार्गदर्शक व चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांची जी मदत झाली ती निर्णायक व मोलाची होती. प्रभात चित्र मंडळाच्या ग्रंथालयातील पॅनोरमाची पुस्तकेही त्यांनीच उपलब्ध करून दिली. चित्रपटविषयक संशोधन करणार्या 'व्ही.शांताराम प्रतिष्ठान'च्या सहकार्याशिवाय अनेक चित्रपटांची कथावस्तू प्राप्त होणे अशक्य होते. आणि हे पुस्तक अशा स्वरूपात प्रसिध्द होणेही त्यांच्यामुळेच शक्य झाले.

चित्रपटविषयक विविध घडामोडी घडत असताना आठवड्याला तीन-चार चित्रपटांच्या 'प्रेस शो'ला उपस्थित राहायचे, शिवाय चित्रपटविषयक पुरवणीची जबाबदारी सांभाळायची. एवढे करून संधी मिळेल तेव्हा तेव्हा कार्यालय लवकर सोडण्याची मुभा माझे संपादक डॉ. अरूण टिकेकर यांनी दिल्यामुळेच मी ही सूची पुर्ण करू शकलो. ही सूची व तिच्या आगेमागे केलेले विवेचन यातून हिंदी चित्रपटांतील वास्तवतेचा इतिहास त्रोटक स्वरुपात का होईना स्पष्ट होईल अशी अपेक्षा. या विषयाचा आवका मोठा आहे, तेव्हा त्याचे विवेचन कितीही केले तरी अपुरेच वाटणार. मुळात सुचींची व्याप्ती फक्त हिंदी चित्रपटांपुरती मर्यादित होती, परंतू संशोधनाच्या ओघात मराठी चित्रपटांची सूचीही तयार करता आली तीही पुस्तकात समाविष्ट केली आहे. पत्रकार व अभ्यासकांना या दोन्ही सुची संदर्भ म्हणून उपयोगी पडाव्यात अशी अपेक्षा. या संदर्भात अधिक संशोधन करण्यास ही सूची वाचून चालना मिळेल अशीही अपेक्षा आहे.

व्हिडिओच्या आगमनाचा चित्रपट उद्योगाला प्रारंभिक फटका बसला. मात्र ज्यांना आपल्या सवडीप्रमाणे चित्रपट पाहायचे असतील, अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी 'व्हिडिओ' ही चांगली सोय १९७५ नंतर उपलब्ध झाली. व्हिडिओ कॅसेट लायब्रर्यांचे पेवच या काळात फुटले आणि अनेक व्यावसायिक चित्रपटांबरोबरच 'मार्केट'ची गरज म्हणून समांतर, कलात्मक चित्रपटांच्या चित्रफितीही उपलब्ध झाल्या. प्रस्तुत पुस्तकातील यादीत समाविष्ट असलेल्या गेल्या पन्नास वर्षांतील सुमारे दिडशे चित्रपटांपैकी ८० चित्रपट व्हिडिओवर उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटांचे हक्क कोणत्या कॅसेट कंपनीकडे आहेत त्यांची माहिती चित्रपटांसोबत दिली आहे. काही चित्रपटांच्या व्हिडिओ कॅसेट्स एकापेक्षा अधिक कंपन्यानी काढल्या आहेत, त्या सर्व कंपन्यांची नावेही दिली आहेत. समांतर चित्रपटनिर्मितीत एनएफडीसीचा मोठा वाटा होता त्यामुळे अनेक चित्रपटांचे हक्क या संस्थेकडे आहेत. १९९० सालानंतर केबल टि.व्ही आला आणी व्हिडिओ लायब्रर्यांचा धंदाही हळूहळू संपुष्टात आला. त्यामुळे व्हिडिओ कॅसेट्सची व्यावसायिक निर्मिती ठप्प झाली. मात्र आधीच्या पंधरा वर्षाच्या कालावधीत ज्या कॅसेट्स वितरीत झाल्या त्या बाजारात कुठेतरी असतीलच. त्यांचा शोध घेऊन या यादीतील चित्रपटांच्या सर्व कॅसेट्स उपलब्ध करून देण्याचे काम कोणी केले तर अभ्यासकांची मोठीच सोय होईल!

श्रीकांत बोजेवार

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

1 Jan 2012 - 4:35 pm | अन्या दातार

पुढचे भाग लवकर येवोत. शक्य तितके चित्रपट जमवण्याचा माझा मानस आहे, त्या चित्रपटांबरोबरच या पुस्तकातील माहितीची जोड मिळाल्यास सोनेपे सुहागा! :)

स्वगतः शिजेपर्यंत वेळ आहे, निवेपर्यंत नाही म्हणतात ते असे!

पैसा's picture

1 Jan 2012 - 4:53 pm | पैसा

ग्रंथपाल टीमला धन्यवाद! चांगल्या उपक्रमाची छान सुरुवात!

चित्रा's picture

1 Jan 2012 - 8:03 pm | चित्रा

असेच म्हणते. उत्तम उपक्रम. शुभेच्छा!

धन्यवाद.

नंदन's picture

2 Jan 2012 - 1:58 am | नंदन

असेच म्हणतो. उत्तम सुरुवात, पुढील भागांची वाट पाहतो आहे.

सुहास झेले's picture

1 Jan 2012 - 6:42 pm | सुहास झेले

सही.. मस्त सुरुवात. पुढे वाचण्यास उत्सुक :) :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2012 - 10:10 pm | बिपिन कार्यकर्ते

पर्वणी!

अभिजीत राजवाडे's picture

1 Jan 2012 - 11:58 pm | अभिजीत राजवाडे

अतिशय चांगला उपक्रम. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

रामदास's picture

3 Jan 2012 - 10:26 am | रामदास

या शिर्षकामुळे वाचकांनी हा धागा टाळल्यासारखा दिसतो आहे

किसन शिंदे's picture

3 Jan 2012 - 10:45 am | किसन शिंदे

असेच असावे बहुतेक. :(

शिर्षक बदली करायला हवं.