फजिती !

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Dec 2011 - 11:16 pm

फजिती !

३१ डिसेंबरला कुठल्यातरी एका मित्राच्या घरी जमून नव्या वर्षाचे स्वागत करायचे हे आमच्या मित्रमंडळाचे ठरलेलेच. आम्ही नऊ मित्र म्हणजे अगदी जवळचे आणि एकामेकांची टिंगल टवाळी हीही नित्याचीच. हसायला कोणाला आवडत नाही ? त्यात एखाद्याची फजिती झाली तर मग काही विचारू नका आणि ती जर ठरवून केली असेल मग तर काही विचारलायलाच नको. आम्ही सगळे यात माहीर होतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ना ती. अगदी केळ्याच्या सालीवरून एखादा माणूस घसरून पडला आणि जखमी झाला तरी बघणार्‍याची पहिली प्रतिक्रिया ही फिदीफिदी हसण्याचीच असते. मी व माझे मित्रही याला अपवाद कसे असतील ?

मागच्याच थंडीत ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत आमच्या मित्राच्या नवीन बंगल्यात करायचे ठरले. तेव्हाची ही गोष्ट. नुकताच त्याने कोकणात नांदोसला हा बंगला बांधला होता. सगळे ३० तारखेलाच नांदोसला पोहोचले होते व मी गोव्याहून ३१ला दुपारी पोहोचणार होतो. दुपारी नांदोसला पोहोचल्यावर माझे राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले. मला एखादा नवीन लेफ्टनंट त्याच्या रेजिमेंटला रुजू होतो त्याचीच आठवण झाली. मला घ्यायला कट्ट्यावर गाडी देखील घेऊन आले होते ते. माझे असे स्वागत झालेले बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “आज माझा बकरा करायचा विचार दिसतोय यांचा” मी मनाशी म्हटले. बंगल्यावर पोहोचल्यावर तर कमालच झाली. तेथे फटाके उडत होते. आता माझी खात्रीच झाली. “काळजी घेतलेली बरी” मी मनाशी हसून स्वत:ला बजावले. त्या संध्याकाळी सर्वजण माझ्या नवीन पुस्तकाचे अगदी तोंड फाटेतोपर्यंत कौतूक करत होते. आश्चर्यच आहे माझा साधा लेख न वाचणारे आज माझ्या पुस्तकाबद्दल बोलत होते. मला जागेवर दारूचा ग्लास भरून मिळत होता आणि सगळे नियम धडाधड वाकवले जात होते. माझ्या अत्यंत फालतू विनोदाला सगळे मनापासून दाद देत होते. आता मात्र एखाद्या शिकारी कुत्र्याला त्याच्या सावजाचा वास यावा तसा मला माझ्याच फजितीचा वास येऊ लागला. “सावधान!” मी स्वत:ला सावध केले. यांनी काय बरं गंमत करायची ठरवली असेल माझी? मी सगळीकडे जरा सावध नजरेने बघू लागलो आणि खोटं कशाला बोलू ? थोडासा अस्वस्थही झालो. माझ्या नजरेतून आता काहीही सुटत नव्हते. त्या आठजणांपैकी कोणी वेगळे वागतोय का ? बोलतोय का ? हे तपासून पाहू लागलो. त्याची मनात उजळणी करू लागलो. आता मला सगळ्यांचाच संशय येऊ लागला. त्यातून त्यांचा बिचारा म्हातारा नोकरही सुटला नाही. काहीच झाले नाही व होत नाही हे बघून माझी बेचैनी अजूनच वाढली व मी ती लपवण्याचा अटोकाट प्रयत्न करू लागलो. एका मित्राकडून मी माहिती काढायचाही प्रयत्न केला पण छे ! कोणी ताकास तूर लागू देईना.

शेवटी डोळे जड झाल्यावर झोपायची वेळ झाली आणि सगळे झोपायला निघाले. आमच्या एका मित्राला झोपण्यासाठी स्वत:साठी वेगळी खोली लागायची. त्या एका वेगळ्या खोलीसाठी तो काहीही करायला तयार असायचा. पण आज ऐकावे ते नवलच. “ मला झोपायला जरा वेळ आहे. मी अजून एखादा पेग घेऊन मग झोपेन. नाहीतर तू असं करना तू झोप त्या खोलीत. मी झोपेन येथेच बाहेर” मी नको म्हटल्यावर सगळ्यांनी मला जवळजवळ ओढतच प्रेमाने त्या खोलीकडे नेले. "झोप रे ! दमला असशील तू आज प्रवासने ! का ? का बरं आज असं ?

मला गुडनाईट म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला आणि ते त्यांच्या दारुकामात परत मग्न झाले. मी त्या खोलीत पाऊल टाकले आणि दरवाजा लोटून स्तब्ध उभा राहिलो. मला खात्री होती ते बाहेर माझी फजिती बघायला टपून बसलेले असणार. बाहेर मला कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. साले ! माझी फजिती करताय काय...... तेवढ्यात बाहेर पावलांचाही अवाज झाला. मी त्या खोलीवर माझी शोधक नजर टाकली. भिंती, फर्निचर, छत, एक झुंबर, टाईल्स, भिंतींवरच्या फ्रेम्स.. पडदे...पण प्रथमदर्शनी मला काहीच संशयास्पद दिसले नाही. चायला ते दाराच्या फटीतून बघत असणार...मी स्वत:ला बजावले.

आता बहुतेक ते लाईट घालवतील, त्याच्या आधीच मेणबत्तीची सोय करून ठेवलेली बरी म्हणून मी नोकराकडून त्या मागावून घेतल्या. त्याने दोन आणल्या तर मी अजून तीन मागवल्या. मी एक पाऊल हळूच पुढे टाकले. हो ! कुठे दगाफटका होईल सांगता येत नाही. मी परत त्या खोलीवर चौफेर नजर टाकली. काहीच नाही ! मग मात्र मला चेव चढला. मी आता त्या खोलीतील प्रत्येक वस्तू तपासायची ठरवले. एका मागून एक वस्तू मी खालून वरून तपासून बघितल्या. एका घड्याळातील सेलही मी काढून टाकले व फोनही काढून ठेवला. मग मी खिडकीकडे गेलो. त्याची मोठी तावदाने उघडी होती. तेथून बाहेर बघून मी त्या दोन खिडक्या काळजीपुर्वक बंद केल्या आणि त्यावर पडदेही ओढून घेतले. येणारा आडखळावा म्हणून त्यांच्या समोर दोन खुर्च्याही ठेवल्या. चला आता बाहेरून तरी काही धोका नाही.
समोरच एक आरामखुर्ची होती, ती मी गदागदा हलवली आणि मग त्या जड आरामखुर्चीवर मी अत्यंत काळजीपूर्वक सावकाश बसलो. त्या भल्यामोठ्या पलंगावर झोपायचा मला काही धीर होईना. पण आता मध्यरात्र उलटून गेली होती आणि माझ्या मनात एक विचार आला “ काय बावळटपणा चालवला आहेस तू ? त्यांना जर खरोखरच माझी फजिती करायची असती तर त्यांनी ती न झालेली पाहून केव्हाच हात पाय पसरले असतील. मी कशाला जागत बसलोय ? कदाचित माझी ही अस्वस्थता बघुनच त्यांची करमणूक होत नसेल कशावरून ? हा विचार मनात येताच माझ्या मनात झोपेची तीव्र इच्छा झाली आणि मी पलंगाकडे गेलो खरा पण परत थबकलो. कशावरून या पलंगाची फळी खाली पडणार नाही आणि मी गादीसकट जमिनीवर आदळणार नाही ? आणि त्याचा आवाजही चांगला मोठा येईल.... म्हणजे सगळ्यांना समजेल...कदाचित मी आडवा झाल्यावर वरून एखादा पाण्याचा शॉवर चालू होऊन मला रात्र कुडकुडत काढावी लागेल ! काय सांगता येतय काय यांचे......आता मला या कटाला बळी पडायची अजिबात इच्छा नव्हती. मी गादी एका टोकाकडून पकडली आणि हळू हळू माझ्या बाजूला ओढली. काही झाले नाही. मी शेवटी त्यावर झोपायचे ठरवले. पण शेवटची काळजी म्हणून मी हलू शकणार्‍या सर्व वस्तू त्या खोलीच्या दरवाज्याच्या समोर आणून ठेवल्या. गादीवरची चादर एकदा झटकून परत घालणार होतो.....पण नकोच...साला त्यात खाजखुजली टाकली असेल तर ? ती चादर बाजूला टाकून, मी सर्व दिवे बंद केले आणि त्या पलंगावर पडलो. एक तासभर तसा मी जागाच होतो....शेवटी कधी झोप लागली ते कळालेच नाही.........मी बराच वेळ झोपलो असणार पण तेवढ्यात एका जाडजूड माणसाने माझा गळा धरला. मला श्वासही घेता येईना.... आणि मी किंचाळत उठलो....

बाहेर मस्त प्रकाश पसरला होता, मंद वारा सुटला होता, गरमागरम कॉफीचा सुवास सगळीकडे दरवळत होता आणि सगळे जण माझ्या भोवती उभे राहून हसत मला विचारत होते “ काय रे स्वप्नबिप्न पडले की काय........?

मी मात्र खजील होऊन हासत हासत त्या कॉफीच्या वासामागे गेलो...................

जयंत कुलकर्णी.
गी द मुपासाँच्या “The Uncomfortable Bed” या गोष्टीचा स्वैर अनुवाद.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

ही पण आवडली.
बाकी ते मराठीत मोंपासा की मॉम्पासां की मुपासाँ?

जयंत कुलकर्णी's picture

23 Dec 2011 - 9:51 am | जयंत कुलकर्णी

फ्रेंच भाषेत मी लिहीले आहे तसा उच्चार होतो. मी ते ऐकून मग लिहिले आहे त्यामुळे खात्री बाळगावी. :-)

मी माझा उच्चार करेक्ट करत हो.. :)
चला, मी आता छाती ठोकून हे सांगू शकतो की तो मोंपासा किंवा मोम्पासाँ नव्हेच!! ;-)

जयंत कुलकर्णी's picture

24 Dec 2011 - 12:55 pm | जयंत कुलकर्णी

अरेच्च्या यशवंतसो, राग आला की काय तुम्हाला... पण खरी गोष्ट अशी आहे की मला ही हा प्रश्न पडला होता, म्हणून मी जरा नेटवर शोधून त्याचा खरा उच्चार लिहिला....

यकु's picture

25 Dec 2011 - 10:35 pm | यकु

नाय... नाय..
राग कस्चा?
:)

रणजित चितळे's picture

23 Dec 2011 - 8:16 am | रणजित चितळे

जयंतराव मस्त खूश झोली तब्येत वाचून

प्रचेतस's picture

23 Dec 2011 - 8:46 am | प्रचेतस

मस्तच.

मन१'s picture

23 Dec 2011 - 9:57 am | मन१

अगदि ओघवते आणि नेटके कथन.

जयंत कुलकर्णी's picture

23 Dec 2011 - 3:10 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

जयंतजी,

तुमची परदेशी भाषेतील कथांना भारतीय चेहरेपट्टी देण्याची हातोटी विलक्षण आहे.

कथा माहिती होती आणि आवडलीही होती पण तुमचं रुपांतरण अधिक भावलं आहे हे इथे नमूद करतो.

सोत्रि's picture

24 Dec 2011 - 1:50 pm | सोत्रि

अगदी हेच म्हणतो.
शेवटची ओळ वाचेपर्यंत मी जयंतजीं त्यांचाच एक किस्सा सांगताहेत असेच वाटत होते.
फारच छान!

- (अशी फजिती बर्‍याचवेळा झालेला) सोकाजी

वाहीदा's picture

24 Dec 2011 - 1:43 pm | वाहीदा

नुकताच त्याने कोकणात नांदोसला हा बंगला बांधला होता. सगळे ३० तारखेलाच नांदोसला पोहोचले होते व मी गोव्याहून ३१ला दुपारी पोहोचणार होतो.

माझा साधा लेख न वाचणारे आज माझ्या पुस्तकाबद्दल बोलत होते

हे सर्व वाचून कुलकर्णीसर तुम्ही तुमची आपबिती सांगत आहेत असेच वाटले जो पर्यंत मी

गी द मुपासाँच्या “The Uncomfortable Bed” या गोष्टीचा स्वैर अनुवाद.

या वाक्यापर्यंत आले नाही
मानंल बुवा तुम्हाला .. तुम्ही ही ताकाला तूर लागू दिला नाही
एवढी नेटकी सुंदर कथा, अन एवढा छान अनुवाद ___/|\___ !!
Hats Off Sir !!

जयंत कुलकर्णी's picture

24 Dec 2011 - 7:09 pm | जयंत कुलकर्णी

परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद !

तिमा's picture

25 Dec 2011 - 5:45 pm | तिमा

जयंतराव,
तुमची फजिती कशी होतीये याची शेवटपर्यंत उत्सुकता होती. शेवटी तुम्ही आमचीच फजिती केलीत की हो!

खुपच छान मजेदार लेख आहे!