फरिश्ते

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
29 Nov 2011 - 7:39 pm

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.

मग दोन रोलर स्केट आकाशातून खाली पडतात. नंतर हवेतून तरंगत विनोद खन्ना व धर्मेन्द्र येतात. न्यूटनचे नियम या चित्रपटाला मान्य नाहीत याची पहिली चुणूक येथे मिळते. वास्तविक त्यांची वये बघून त्यापेक्षा वृद्धाश्रमातून निघालेले पण आता कोठून आलो ते आठवत नसलेले अशी एन्ट्री दाखवली असती तर जास्त योग्य वाटली असती. येथे "थोडेसे फरिश्ते, थोडेसे शैतान, होते है सब इन्सान, हम भी है" हे टायटल सॉंग येते. त्याचा अर्थ असा की आम्ही इतरांसारखेच आहोत. पण जर हे इतरांसारखेच आहेत (किमान कपड्यांचे रंग सोडून) तर त्यात शेकडो लोकांनी हात हलवण्याएवढे, जीपमधून रंगीबेरंगी फुगे घेऊन नाचण्याएवढे व टू-व्हीलर्स झिग-झॅग चालवण्याएवढे काय आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.

आता दणादण अन्यायनिवारण चालू होते. काही वाईट लोक मुलींना कमी कपड्यात अश्लील नाच करायला लावत असतात. त्यांना मारून मग धर्मेन्द्र त्याहीपेक्षा कमी कपड्यात त्याच मुलींबरोबर नाचतो. त्यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात. मग एका हॉटेलात जाउन दारू वगैरे पीत बसतात. तेथे विनोद खन्ना एका मुलीबरोबर टेबलामागे गाय, दूध वगैरे वर अत्यंत आचरट आणि तेवढेच न-विनोदी डॉयलॉग मारतो. ते डॉयलॉग्स इतके भंगार आहेत की त्याबद्दल येथे त्याच्या आणखी तीन-चार पिक्चर्स चे रिव्यू करावे लागतील :)

तेथून ते रोलर स्केटिंग करत रस्त्यावरून जात असताना एका मोठ्या लोहचुंबकाने त्यांना ओढून रजनीकांत (पोलिस इन्स्पेक्टर) त्यांना पकडतो. रजनीकांत कडे Selective Magnetism ही सुविधा असलेले एक लोहचुंबक असते. त्याचा वापर करून आजूबाजूला असलेल्या असंख्य धातूच्या गोष्टींमधून समोर स्क्रीन वर आपल्याला दिसणारी व त्यातही फक्त त्याच्या मनात असणारी गोष्ट त्याला ओढता येउ शकते. तसेच या चुंबकाने लांबची सायकल आपोआप हवेत वरखाली करता येते. (पण लोहचुंबकाने फक्त धातूच्या गोष्टी ओढता येतात हा नियम रजनीकांतने पाळला हेच खूप झाले नाही का? )

मग त्यांना कोणीतरी येउन सांगते की घरी तुमची बहना तुमची वाट बघत आहे. ती बहुधा स्वप्ना नावाची हीरॉइन. ती यांची मुलगी सुद्धा शोभणार नाही असे लक्षात आल्याने सावत्र का मानलेली बहीण दाखवली आहे. त्याच दिवशी रक्षाबंधन असते त्यामुळे लगेच गाणे बिणे होते. विनोद खन्ना त्यात गिटार वाजवतो. आता
"सबसे सुंदर सबसे प्यारा भाई बहन का प्यार है"
या गाण्याला कोणती अशी चाल लावणे शक्य आहे की ज्यात गिटार वाजवता येइल असा आपल्याला प्रश्न पडतो. हे म्हणजे लेक चालली सासरला मधे बॅगपाईप वाजवता येइल असे गाणे ठेवा सांगण्यासारखे झाले. पण पुढच्याच कडव्यांत ते दोघे एकदा लग्नातील बँडवाल्यांच्या आणि एकदा कथक सारखे काहीतरी नृत्य वाल्या पोशाखात दाखवले, त्यामुळे त्याचा एकूण गाण्याशी काही संबंध नाही हे लक्षात आले.

ईलेक्ट्रॉनिक्स मधे विरूद्ध चार्ज असलेल्या आयन्स प्रमाणे चित्रपटात एकमेकांशी संबंध नसलेले मुख्य कलाकार फार काळ तसे राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वप्ना आणि रजनीकांत चे लग्न होते. मग रजनीकांत तिकडे त्या संस्थानात जातो (अरे हो! ते सुरूवातीला संस्थान, सदाशिव अमरापूरकर वगैरे होते नाही का? आता आपल्याला आठवते). हा बरोबर एकही पोलिस न घेता तेथे झेंडा लावायला एकटाच जातो. मग संचलनात एखाद्या राज्याचा असतो तसा आणि हंसासारख्या गोंडस पक्ष्याचे डिझाईन केलेल्या एका अवाढव्य रथात बसून सदाशिव अमरापूरकर तेथे येतो. असा रथ कोठेही पटकन जायला सोयीचा असावा बहुधा, विशेषतः तेथील अरूंद गल्लीबोळातून.

येथे मात्र ही फिल्म जरा हटके आहे. कारण एवढ्या कारकीर्दीत चित्रपटात मरायची नामुष्की रजनीवर क्वचित आली असावी (गिरफ्तार हा अजून एक. पण तेथे मरताना एक सिगरेट ओढून तो आपले रजनीकांतपण सिद्ध करतो). येथे असंख्य मशीनगन्स ("एक एक मे सौ सौ गोलिया" वाली) आणि इतर अनेक शस्त्रास्त्रे, बॉम्ब वगैरे खाउन सुद्धा तो जिवंतच असतो. मला वाटले शेवटी सदाशिव अमरापूरकर ला एखाद्या ऋषीकडून साता समुद्रापलीकडे असलेल्या एखाद्या पोपटात त्याचा जीव आहे वगैरे माहिती काढण्यासाठी तप बिप करावे लागते की काय, पण तो मरतो ते फक्त एक सळईसारखे काहीतरी खुपसल्याने. ही जर क्रिकेट मॅच असती तर कॉमेंटेटर म्हंटला असता "It's a soft dismissal"!

मध्यंतरी जयाप्रदा-१ लाही बॉब क्रेश्टो व इतरांनी मारलेले असते. धरमचे तिच्यावर प्रेम असते. त्यामुळे तो रागाने मोटरसायकल घेऊन बॉब क्रेश्टो जेथे पोहत असतो (रंगीत पेये पिणारे व्हिलन्स, बिकिनी-कन्या ई) तेथे मोटरसायकलसकट उडी मारून जातो. तेव्हा त्याच्या समोरचे लोक दचकतात. नंतर हेल्मेटमधून सावकाश उजवीकडे बघतो. मग तिकडचे दचकतात. तोपर्यंत नाही. आता धरम स्लो मोशनमधे बॉब क्रेश्टो च्या मागे लागतो. म्हणजे हा सीन स्लो मोशनमधे नाही, धरम प्रत्यक्षात तेवढाच स्लो पळतो. मग पळणारी व तिचा पाठलाग करणारी व्यक्ती कोठेही जाऊ शकतात हा नियम कथेला मान्य नसल्याने दहा पंधरा मिनीटे बीचवरून पळाल्यावर ते जेथे पोहोचतात तेथे पोलिस व विनोद खन्नाही लगेच बरोबर येतात.

बॅक फ्रॉम फ्लॅशबॅक...

इकडे स्वप्नाच्या लग्नानंतर तिच्या विरहाने दु:खी झालेला धर्मेन्द्र इकडे तिकडे बघत असताना त्याला एक बिगुल दिसते. समोर बिगुल दिसले की ते वाजवायलाच पाहिजे म्हणून तो छतावर जाऊन ते वाजवत बसतो. बहिणीच्या विरहातून बाहेर येण्यासाठी विनोद व धरम दोघांनी कोठेतरी काम करावे असे ठरते. आता कोठेतरी काम करण्याचे ठरवल्यावर दोन वयोवृद्ध लोकांना काम शोधायला योग्य जागा म्हणून ते एका डान्स बार मधे जातात. तेथून त्यांना जयाप्रदा-२ कडे नेण्यात येते. तिची हेअरस्टाईल वेगळी असल्याने पहिल्या जयाप्रदाशी तिचा संबंध नाही हे सिद्ध होते. ७-८ वेगवेगळ्या रंगांचे पडदे बाजूला होऊन तिची एन्ट्री होते. तिच्या कडे एक लेझर किरण सारखे काहीतरी सोडून समोरच्या व्यक्तीला तिच्या निगेटिव्ह मधे बदलू शकणारे काहीतरी अस्त्र असते.

या दोघांना रजनीकांत च्या खुनाचा बदला घ्यायचा असतो व जयाप्रदा-२ ला मूळ पोलिसांच्या जागी त्या संस्थानात कोणीतरी तोतये न्यायचे असतात. म्हणून मग या दोघांना त्या संस्थानात नेण्यात येते.
हा राजा फावल्या वेळात स्मगलिंगही करत असतो. जगातील "ब्लॅक टॉवर ग्रूप" नावाच्या एका मोठ्या गँगची मीटिंग त्याच्या अड्ड्यावर असते. जयाप्रदा-२ ही त्याच्याच गँग मधली असते.

पण हे तेथे पोहोचायच्या आधी तोंडात चिरूट धरलेला व ओव्हरकोट, बूट्स वगैरे घातलेला एक गूढ मिस्टरी मॅन त्यांच्याशी बोलतो. त्या खेड्यात आपण उठून दिसू नये म्हणून कुलभूषण खरबंदाने हा ड्रेस घातला असावा. तो बहुधा पोलिस असतो व तो ही यांना सदाशिव अमरापूरकर ला पकडण्याची कामगिरी सोपवतो. म्हणजे डबल एजण्ट सारखे काहीतरी. यांचे चेहरे बघितले तर एक काम सुद्धा झेपेल का अशी शंका येते.
त्यांना तेथे पोहोचवण्यात गॉव की गोरी श्रीदेवी मदत करते. तिला रस्त्यांची एवढी माहिती असते की ती विनोद खन्नाचा पाठलाग करताना एकाच सीनमधे टेकडीवरून उतरताना लाँग शॉट मधे विनोद च्या उजवीकडून व क्लोजअपमधे आल्यावर त्याच्या डावीकडून येउ शकते.

तर त्या ब्लॅक टॉवर ग्रूप च्या मीटिंग च्या वेळेस सगळ्यांना पकडावे अशी योजना असते. क्लायमॅक्स मधे बराच गोंधळ होतो आणि शेवटी सदाशिव अमरापूरकर मरतो. अंगावर पेट्रोल ओतलेले असताना आपल्या अंगावर फेकलेली मशाल उलटा डाईव्ह मारून पायांनी पुन्हा हवेत उंच उडवून दुसरीकडेच ती जाऊन पडेल अशी फेकण्याचे कौशल्य असल्याने धरम व विनोद बाजी जिंकतात. मात्र एक गोळी घातली, हीरो/व्हिलन मेला असे यात होतच नाही. उदा: सदाशिव अमरापूरकर ने धरम वर सोडलेले चार दैत्य असे मरतातः
१. पाठीत रॉकेट खुपसल्याने
२. धरम ने फायर हायड्रंट उघडून तोंडावर तो स्प्रे मारल्याने.
३. अंगावर एक प्रचंड रॉकेटसारखे काहीतरी पडल्याने, व त्यावर नंतर धर्मेन्द्र बसल्याने.
४. विनोद ने डोक्यात टीव्ही घातल्याने. व तो नंतर स्विच ऑन केल्याने.

या चित्रपटात धर्मेन्द्र व जयाप्रदाचे एकमेकांवर किती प्रेम असते हे दर्शवणारे हे गाणे. या गाण्याची मूळ लिन्क यूट्यूब वर आता उपलब्ध नाही पण त्याची चुणूक तुम्हाला येथे मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=JujOCJvmGrQ

"मै जट यमला पगला दीवाना...." हीमॅनजींनी पहिल्यांदा गायले होते प्राचीन काळी आणि नाचले तेव्हा ठीक होते. पण येथे त्यांना पुन्हा तेच गाणे नव्या रूपात व कमी कपड्यात करायला लावले आहे. सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा दिसते. तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की माँग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला असावा. भडक गुलाबी स्कर्ट किंवा त्याला जे काही म्हणतात ते घालून ती नाचते आहे. धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. शर्ट फुल व पॅण्ट हाफ म्हणजे त्याच्या ड्रेस डिझायनरच्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी हे नक्की. मग पाजी एकदा एक बाजूचे व नंतर दुसर्‍या बाजूचे हात पाय हवेत उडवून नृत्य करतात. मग दोघे एकत्र लोळण घेतात. येथे जयाप्रदाला धरणी पोटात घेइल असे वाटते. लाजून, किंवा मग धरम च्या वजनाने नक्कीच.
नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदाही शाळेच्या गॅदरिंग मधला डान्स करते.

बाकी गाण्यांबद्दल आपल्याला आता निर्माण झालेली जबरदस्त उत्सुकता ताणण्यासाठी त्यांच्या ओळी पाहा: "अपना है राज फिर काहे का राजा/राजा का हमने बजा दिया बाजा" (उर्फ "संगीत संस्थान खालसा"), "तेरे बिना जग लगता है सूना/शादी से पहले मुझे नही छूना". वगैरे वगैरे. त्यांचे वर्णन माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. ती गाणी आपणच आपल्या जबाबदारीवर बघावीत.

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

29 Nov 2011 - 7:58 pm | दादा कोंडके

तुमच्या सहनशक्तीला सलाम!

सिलेक्टीव मॅग्नेटिझम वगैरे जबराच.

आता कोठेतरी काम करण्याचे ठरवल्यावर दोन वयोवृद्ध लोकांना काम शोधायला योग्य जागा म्हणून ते एका डान्स बार मधे जातात.

या वाक्यानंतर १०-१५ मिनिटं हसत होतो! :D

विजुभाऊ's picture

29 Nov 2011 - 8:38 pm | विजुभाऊ

दुर्दैवानी हा चित्रपट मी बंगळुरात थेट्रात जाउन पाहिला
त्यातल्या अमरापुरकरांच्या पृथ्वीच्या गोळ्याला पहात " ये यहां कम्पुटरसे बम गिराये जायेंगे" वगैरे ड्वायलॉक वर डोक्यात शिट्ट्या वाजल्या होत्या.
एकूणातच हा एक "टुकारश्री" कॅटेगरीतला पिक्चर होता. पण बंगळूरातील प्रेक्षक धन्य मानावेत. ते विनोद खन्ना आणि धर्मेंद्रचे ड्वाइलॉक समजुन हसत होते.

बरं झालं असलं काही बघायची वेळ आली नाही.;)
तुमचे लेखन मात्र झकास.

पैसा's picture

29 Nov 2011 - 8:56 pm | पैसा

हसून हसून डोळ्यात पाणी आल्याने पूर्ण वाचू शकले नाही. एक अटॅक गेल्यानंतर परत प्रयत्न करीन!! =)) =))

+१०००

ही अतिशयोक्ती नाही... केवळ पोच म्हणून लिहीत नाही.. एकशे एक टक्के हेच झालेलं आहे. हपीसात आहे..वाचायला घेतलं..

आता दणादण अन्यायनिवारण चालू होते. काही वाईट लोक मुलींना कमी कपड्यात अश्लील नाच करायला लावत असतात.

इथून या "तोंड दाबून हास्यबुक्क्यां"च्या शिक्षेला सुरुवात झाली.

पुढे वाक्यावाक्याला हसून श्वास अडकला.. तरी नेटाने वाचत राहिलो.. निम्ननिर्दिष्टः

तेथून त्यांना जयाप्रदा-२ कडे नेण्यात येते. तिची हेअरस्टाईल वेगळी असल्याने पहिल्या जयाप्रदाशी तिचा संबंध नाही हे सिद्ध होते.

या ठिकाणी ठ्ठो आवाजात अनावर हास्यफवारा तोंडातून येऊन तो दाबण्याच्या नादात जबरी ठसका लागला.. हपीसातले सर्वजण उठून बघायला लागतील अशी वेळ आल्याने आता ब्रेक घेत आहे. नाईलाज आहे... :(

या खुणेच्या वाक्यापासून पुढचं एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाऊन फोनवर वाचेन..

अन्या दातार's picture

29 Nov 2011 - 9:32 pm | अन्या दातार

किती भयानक सिनेमे काढतात हो. इथले लोक उगाच गविंवर टीका करतात.की ते विमान अपघाताचे भाग लिहून लोकांना घाबरवतात म्हणून.त्या सगळ्यांना म्हणाव बघा लेको असले पिच्चर आणि तुमची जिवंत रहायची इच्छातरी जगते का हे सांगा ;)

यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात.

=)) =)) =))

बेक्कार हसत सुटलोय.

क्रान्ति's picture

29 Nov 2011 - 10:47 pm | क्रान्ति

हसून हसून वेड लागायची वेळ आलीय. =)) =))

मन१'s picture

29 Nov 2011 - 11:20 pm | मन१

मीही फार पूर्वी व्हीसीआर च्या काळात चक्क मोगली कार्टून चा एक एपिसोड सोडून हा पिक्चर पाहण्याचा पराक्रमा केला होता. त्या प्राक्रमावर आज फुंकर घातलिस.

काही वाईट लोक मुलींना कमी कपड्यात अश्लील नाच करायला लावत असतात. त्यांना मारून मग धर्मेन्द्र त्याहीपेक्षा कमी कपड्यात त्याच मुलींबरोबर नाचतो. त्यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात
हा हा हा हो हो हो हो हे हे हे ह्या हया ह्या
आवरा...........

ती यांची मुलगी सुद्धा शोभणार नाही असे लक्षात आल्याने सावत्र का मानलेली बहीण दाखवली आहे.

ईलेक्ट्रॉनिक्स मधे विरूद्ध चार्ज असलेल्या आयन्स प्रमाणे चित्रपटात एकमेकांशी संबंध नसलेले मुख्य कलाकार फार काळ तसे राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वप्ना आणि रजनीकांत चे लग्न होते.
आग्गागा.......फुटलो.

(गिरफ्तार हा अजून एक. पण तेथे मरताना एक सिगरेट ओढून तो आपले रजनीकांतपण सिद्ध करतो).
डोळे पुसतोय. उरलेले नंतर वाचतोय.

मुक्तसुनीत's picture

29 Nov 2011 - 11:22 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
फार एंड डज इट अगेन ! हास्यकल्लोळात बुडून गेलो आहे.

अर्धवटराव's picture

29 Nov 2011 - 11:24 pm | अर्धवटराव

मित्रा फारएन्ड... तो बिबट्यांनी धरम-विनोदचा पाठलाग सीन सांगायचा राहिला रे... शिवाय झुरळं खाणारा राजाचा पुतण्या आणि धर्मेंद्र सोबत गावात आलेली नकली कमांडो टीम(राजेंद्रनाथ वगैरे), ज्यांची वये आणि पोटं अशोक कुमार, ओमप्रकाश तुल्य असतात... ह.ह.पु.वा आहे नुसती.

अर्धवटराव

मेघवेडा's picture

30 Nov 2011 - 12:39 am | मेघवेडा

दंडवत द्येवा, दंडवत! कं लिवलंय कं लिवलंय! बा जा र!

डोळे पुसत पुसतच लिहितोय. लै खास! टिपिकल फारेण्ड!

पिवळा डांबिस's picture

30 Nov 2011 - 2:20 am | पिवळा डांबिस

असा पिच्चर काढणारे धन्य!
त्या पिच्चरमध्ये काम करणारे धर्मेंन्द्र आणि विनोद हे "पाजीद्वय" धन्य!!
आणि हे सगळं बघून टाळ्या वाजिवनारे बंगलोरचे प्रेक्षक तर त्याहून धन्य!!!
:)
दादासाहेब फाळके पारितोषिक दिलं पाहिजे याला!!!
:)
फारएन्ड, जबरदस्त बॅटिंग केलीये!!!
तुमची लेखनशैली मस्त आहे असं म्हणणार होतो, पण इथे मुळात कोंबडीच इतकी शॉल्लिड आहे की फारश्या लेखकीय मसाल्याची गरजच नाही....
;)
आता हा पिक्चर मुद्दाम मिळवून पाहीन!!!!
:)

हुप्प्या's picture

30 Nov 2011 - 2:33 am | हुप्प्या

यूट्यूब मंथन केल्यावर त्यात हे रत्न सापडले!
http://www.youtube.com/watch?v=CsskkN7qtPA

काही वर्षापूर्वी काही सिनेमे असे आले की ज्याचे फायनान्सच नव्हे तर डायरेक्षन, ड्वायलाक, मुजिक सगळे भाईलोकांच्या मेंदूतून निघाल्यासारखे वाटायचे. हा त्याच नगांपैकी एक.
सिनेमा किती हास्यास्पद असू शकतो याचे उत्तम उदाहरण.
स्पंजबॉब नामक कार्टून क्याराक्टर आहे त्यात मर्मेड म्यान नामक एक म्हातारा सुपरहिरो आहे आणि बार्न्याकल बॉय हा त्याचा जोडीदार. इथे पहा
http://www.youtube.com/watch?v=wvWOe5e3Pd0
ह्या शिणेमातील धर्मिंदर आणि इनोद खन्ना हे दोन पाजी बघून ह्या लोकांची आठवण झाली. जनाची, मनाची, वयाची कसली लाज न बाळगता इतके बालिश रोल घेतात हे मोठे गंमतीचे आहे.

आणि फस्स्क्लास परीक्षण. आपले रत्नपारखी गुण पाहून असे वाटते की तुम्ही म्याड सारखे बॉलिवूडी मासिक काढावे. जोरात चालेल.

चतुरंग's picture

30 Nov 2011 - 4:19 am | चतुरंग

बाजार उठवला फारएन्ड यांनी!

त्यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात.

अशा अनमोल वाक्यांची उधळण जागोजागी झालेली आहे ती वाचून हसू आवरणे मुश्किल झाले आहे! =)) =))

(नन्हा फरिश्ता) रंगा

सुहास झेले's picture

30 Nov 2011 - 4:41 am | सुहास झेले

दंडवत... हसून हसून वेडा झालो :) :)

शिल्पा ब's picture

30 Nov 2011 - 6:01 am | शिल्पा ब

कपडे गोविंदाकडुन उसने आणले होते असं दिसलं. बाकी लेख नेहमीप्रमाणेच मस्त.

स्पंदना's picture

30 Nov 2011 - 7:31 am | स्पंदना

ह ह पु वा. अक्षरशः डोळ्यांना धारा लागल्या.

वास्तविक त्यांची वये बघून त्यापेक्षा वृद्धाश्रमातून निघालेले पण आता कोठून आलो ते आठवत नसलेले अशी एन्ट्री दाखवली असती तर जास्त योग्य वाटली असती.

हे सलामीच वाक्यच एव्ह्ढ हसवुन गेल की बास.

त्या खेड्यात आपण उठून दिसू नये म्हणून कुलभूषण खरबंदाने हा ड्रेस घातला असावा.>> हे ही भारीच !!

धन्स फारएन्ड !!

मागे एकदा दुसर्‍या परीक्षणात किंवा अजून कोणीतरि लिहिलेल्या परीक्षणात एक उल्लेख होता तेव्हापासून या महान कलाकृतीचं झकास रसग्रहण येईल अशी अपेक्षा होती...

हसून वाट लागली आहे... पिडाकाका म्हणतात तसं आधीच कोंबडी भारी पण सागुतीचा मसाला असा काही जमलाय की तोड नाही...

पूर्ण लेखात प्रत्येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या वाक्याला हसण्यासाठी ब्रेक घ्यावा नाही लागला तर तो वाचणार्‍याच्या फाऊल धरावा !!

आजवरचं सगळ्यात कडक परीक्षण !!

५० फक्त's picture

30 Nov 2011 - 10:22 am | ५० फक्त

'४. विनोद ने डोक्यात टीव्ही घातल्याने. व तो नंतर स्विच ऑन केल्याने.'' आणि सिलेक्टिव्ह मॅगनेटिझम यावरुन प्र चं ड हसतोय, आणि वर अन्या म्हणातोय त्याच्याशी १००% सहमत.

असले सिनेमे जर बघायची तयारी अन ताकत असेल तर, लोकं पोटाला बॉम्ब लावले तरी घाबरणार नाहीत.

जाई.'s picture

30 Nov 2011 - 10:26 am | जाई.

टुकार पिक्चरचे अत्यंत धमाल परीक्षण

मस्त

मागे एकदा दुसर्‍या परीक्षणात किंवा अजून कोणीतरि लिहिलेल्या परीक्षणात एक उल्लेख होता तेव्हापासून या महान कलाकृतीचं झकास रसग्रहण येईल अशी अपेक्षा होती...

हसून वाट लागली आहे... पिडाकाका म्हणतात तसं आधीच कोंबडी भारी पण सागुतीचा मसाला असा काही जमलाय की तोड नाही...

पूर्ण लेखात प्रत्येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या वाक्याला हसण्यासाठी ब्रेक घ्यावा नाही लागला तर तो वाचणार्‍याच्या फाऊल धरावा !!

आजवरचं सगळ्यात कडक परीक्षण !!

किती वाक्यांचा उल्लेख करावा... सगळा लेखच परत मांडावा लागेल.. पण फारच ग्राऊंडबाहेर गेलेल्या सिक्सर्स म्हणजे

  • त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील
  • त्यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात.
  • हे म्हणजे लेक चालली सासरला मधे बॅगपाईप वाजवता येइल असे गाणे ठेवा सांगण्यासारखे झाले
  • असा रथ कोठेही पटकन जायला सोयीचा असावा बहुधा, विशेषतः तेथील अरूंद गल्लीबोळातून.
  • ही जर क्रिकेट मॅच असती तर कॉमेंटेटर म्हंटला असता "It's a soft dismissal"!
  • मग तिकडचे दचकतात. तोपर्यंत नाही
  • -- हा तर केवळ कहर आहे !!

  • आता कोठेतरी काम करण्याचे ठरवल्यावर दोन वयोवृद्ध लोकांना काम शोधायला योग्य जागा म्हणून ते एका डान्स बार मधे जातात.
  • तिची हेअरस्टाईल वेगळी असल्याने पहिल्या जयाप्रदाशी तिचा संबंध नाही हे सिद्ध होते.
  • त्या खेड्यात आपण उठून दिसू नये म्हणून कुलभूषण खरबंदाने हा ड्रेस घातला असावा.
  • अंगावर एक प्रचंड रॉकेटसारखे काहीतरी पडल्याने, व त्यावर नंतर धर्मेन्द्र बसल्याने.
    • तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की माँग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला असावा
  • नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात
  • -- हे म्हणजे एका बॉलवर तीन सिक्स !!

  • पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदाही शाळेच्या गॅदरिंग मधला डान्स करते.
  • इथवर प्रयत्नपूर्वक वाचत आल्यावर जाऊन जागेवरून एक ब्रेक घेऊन पोटभर हसून, मग जरा परिस्थिती सावरेपर्यंत जागेवर बसता आलं नाहि कारण हा काय भुतासारखा हसतोय असे नुसतते चेहरे करण्यापलिकडे जाऊन लोकांनी खोदून खोदून विचारायला सुरुवात केली... आता इथे कन्नडिगांना ही फटकेबाजी कशी भाषांतर करुन सांगणार ...

    अशक्य! लै भारी...

    स्वैर परी's picture

    30 Nov 2011 - 7:49 pm | स्वैर परी

    अक्षरशः असच झालय माझं. हसुन हसुन जीव जायची वेळ आलीये. शेवटुन दुसरा परिच्छेद तर अप्रतिम!

    मै जट यमला पगला दीवाना...." हीमॅनजींनी पहिल्यांदा गायले होते प्राचीन काळी आणि नाचले तेव्हा ठीक होते. पण येथे त्यांना पुन्हा तेच गाणे नव्या रूपात व कमी कपड्यात करायला लावले आहे. सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा दिसते. तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की माँग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला असावा. भडक गुलाबी स्कर्ट किंवा त्याला जे काही म्हणतात ते घालून ती नाचते आहे. धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. शर्ट फुल व पॅण्ट हाफ म्हणजे त्याच्या ड्रेस डिझायनरच्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी हे नक्की. मग पाजी एकदा एक बाजूचे व नंतर दुसर्‍या बाजूचे हात पाय हवेत उडवून नृत्य करतात. मग दोघे एकत्र लोळण घेतात. येथे जयाप्रदाला धरणी पोटात घेइल असे वाटते. लाजून, किंवा मग धरम च्या वजनाने नक्कीच.
    नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदाही शाळेच्या गॅदरिंग मधला डान्स करते.

    वारले!!!

    परिकथेतील राजकुमार's picture

    30 Nov 2011 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार

    बाजार उठवलाय पार __/\__

    फरिश्ते आणि ऐलान-ए-जंग हे शिणेमे आम्हाला फार्फार आवडतात.

    बहूदा ह्या फरिश्ते मध्येच सदाशिव अमरापूरकरने एक चित्ता पाळलेला असतो. एकदा त्याला भेटायला काही परदेशी तस्कर लोक्स येतात, जे त्या चित्त्याला पाहून भयानक वैग्रे दचकतात. मग एक गौरांगना म्हणजे "आपने शेर क्यू पाला है?" (अर्थात शब्दांचे उच्चार अगदी आंग्लाळलेले) त्यावर सदाशिव अमरापूरक म्हणतो "अरे शेर शेर पालते है और कुत्ते कुत्ता पालते है."

    खल्लास !
    आमच्या एका कुत्रे पाळणार्‍या मित्राला आम्ही तो ड्वायलाग ऐकवून ऐकवून अजुनही प्रचंड पिडतो.

    मन१'s picture

    3 Dec 2011 - 12:11 am | मन१

    (पुन्हा एकदा)फुटलो.......

    नगरीनिरंजन's picture

    30 Nov 2011 - 12:41 pm | नगरीनिरंजन

    नुस्ता बाजारच नाही तर पार मंडई, मॉल, सुपरमार्केट, वॉलमार्ट उठवलं आहे!
    हसून हसून गाल दुखायला लागले आहेत. कमाल मजा आली वाचताना.

    स्मिता.'s picture

    30 Nov 2011 - 8:29 pm | स्मिता.

    हा हा हा... त्या एका टुकार चित्रपटाची कसली चिरफाड केलीये. वाचताना हास्याचे फव्वारे सुटत होते. नशीब हा चित्रपट अजून बघितला नाहिये. (तरी हुप्प्यानी दिलेल्या दुव्यावर २-४ शॉट्स पाहिलेत आणि धन्य झाले.)

    धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते
    :D हे आणि लेखातले अनेक पंचेस मस्तच!
    धर्मेंद्रची ती हाफ (की क्वार्टर? अश्या पँटला आम्ही पाव पँट म्हणतो) पँट बघून हसावं की कीव करावी कळत नाही.
    अशीच पाव पँट (फुल शर्टासोबत) ज्युलीमध्ये विक्रमने घातली आहे

    पुन्हा लेख वाचून गेले त्याची पोच.
    ड्वल्यांना धारा लागल्या कि वो.

    मृत्युन्जय's picture

    1 Dec 2011 - 12:03 pm | मृत्युन्जय

    च्यायच्चा चिंध्या उडवल्या आहेत चित्रपटाच्या. आणि हे काम समीरसूर किंवा फारएण्ड (किंवा आदीजोशी) सारखे खंदे परीक्षकच करु शकतात. तसा चित्रपटात टर उडवण्याचा बराच माल मसाला आहे पण हे परीक्षण त्याऊप्परही छप्परफाड आहे. लए म्हणजे लैच भारी.

    हा चित्रपट वयाच्या ९व्या दहाव्या वर्षी बघितला होता त्यात ते रजनीकांतला उद्देशुन "क्या बंदर जैसे उछलता है" हे सदाशिव अमरापूरकरचे वाक्य अजुनही आठवते आणि रजनी आण्णाला ज्या चार लोकांनी मारलेले असते ते लोक दाखवल्यावर धर्मेंद्र काहितरी " *** आज तुने मुझे इन चारो से मिलाकर मुझपोए बहुत बडा एहसान किया है" असले काहितरी वाक्य बोलले होते ते ही आठवते.

    मी या लेखावर फुल्ला फिदा आहे. अफलातून लेख

    डोळ्यात पांणी येईपर्यंत हसले.हसून हसून पोटही दुखायला लागल!
    वाचुन झाल्यानंतर १० मिनिटांनी प्रतिक्रिया देतीये. :bigsmile:
    जबर परीक्षण!
    असला टुकार चित्रपट तुम्ही पूर्ण बघितला? कसली शिक्षा भोगत होतात? ;)
    (पराकाका टाकतात न तसला हसून हसून लोटपोट झालीये असा स्मायली अस्यूम करा.तो कसा टाकतात हे मला माहित नाहीये.पण या लेखाला तोच सूट करतो!:bigsmile:

    सुहास..'s picture

    1 Dec 2011 - 2:32 pm | सुहास..

    =)) =)) =))

    राघव's picture

    1 Dec 2011 - 11:40 pm | राघव

    अर्रे बाप रे... हम्फ.. हम्फ.. गाल अन् पोट दोन्ही दुखतंय केव्हाचं..
    काय एकेक वाक्य टाकलंय शेठ.. मैत्रशी पूर्ण सहमत!!
    अन् हे एक राह्यलेलं -
    शर्ट फुल व पॅण्ट हाफ म्हणजे त्याच्या ड्रेस डिझायनरच्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी हे नक्की. :)
    सगळं परिक्षणच कहर आहे.. स ला म!!

    (खपलेला) राघव

    अन्या दातार's picture

    3 Dec 2011 - 12:02 am | अन्या दातार

    फार ताणवून एंड केला असलेला हा पिच्चर डाऊनलोडवून बघितल्या गेला. त्यानंतर तर परीक्षण अधिकच आवडले.
    शेवटी राजाचा फुटबॉल करुन ते दोघे वॉर्म अप करतात आणि त्यांच्या प्यारी बेहेनाची याददाश कशी परत येते हे सांगायला हवे होतेत. :)

    ता.क.: मी अजुनही जिवंत आहे.

    मन१'s picture

    3 Dec 2011 - 12:14 am | मन१

    मेलो ग.........
    ह्याही वेळेस लेख पूर्ण वाअचता आलेला नाही.

    अन्या दातार's picture

    3 Dec 2011 - 12:22 am | अन्या दातार

    मन्या, ते शेवटचं 'ग' कुणासाठी रे?? ;)

    मन१'s picture

    3 Dec 2011 - 11:26 am | मन१

    "ग" गीतेतला
    किंवा "ग" गायत्री मधला
    किंवा "ग" गुड्डी मधला.
    ;)

    अप्पा जोगळेकर's picture

    3 Dec 2011 - 11:00 am | अप्पा जोगळेकर

    जब्राट लिहिण्यात आलेले आहे. हसून हसून गडाबडा लोळत आहे..

    =))

    अवांतर:
    जयाप्रदाचा डबलरोल नाहि ना. रामलखन मधे रझा मुरादची सेक्रेटरी इकडे अम्रापुरकर साहेबांची मदतनीस बनली आहे.

    अद्द्या's picture

    24 Nov 2015 - 11:23 am | अद्द्या

    =]]

    पोट दुखतंय च्यायला हसून हसून

    पद्माक्षी's picture

    24 Nov 2015 - 12:00 pm | पद्माक्षी

    =)) =)) =)) =)) जबरदस्त

    वेल्लाभट's picture

    24 Nov 2015 - 12:01 pm | वेल्लाभट

    पुढील पिक्चरचा खून कधी करताय?

    महेश हतोळकर's picture

    24 Nov 2015 - 1:22 pm | महेश हतोळकर

    सुपारी देताय का आमंत्रण???
    तसेही हे झालेच पाहिजे. फारएण्डराव बरेच दिवस झाले परतून आले नाहीत.

    वेल्लाभट's picture

    24 Nov 2015 - 10:58 pm | वेल्लाभट

    कायपण समजूद्यात. पण खून पडला पायजेल. लई दिस झाले.

    पद्मावति's picture

    24 Nov 2015 - 12:16 pm | पद्मावति

    ही ही ही....मस्तं, मस्तं लिहिलंय.
    वाक्यावाक्याला फिस्स्कन हसू येतंय.

    बॅटमॅन's picture

    24 Nov 2015 - 1:08 pm | बॅटमॅन

    हा लेख कसाकाय सुटला =)) =)) =))

    पिशी अबोली's picture

    24 Nov 2015 - 1:24 pm | पिशी अबोली

    अगं आई गं.. मेले हसून हसून.. =))
    मधे धुमाकूळ घालणार्‍या प्रिटेन्शस मूव्ही रिव्यूंच्यासुद्धा काहीच्याकाही वरचढ लिहिता फारेंड तुम्ही. पब्लिक असेल अशा जागी बसून कधीही वाचणार नाही तुमचा धागा.. लोक इस्पितळात नेऊन डांबतील.. =)) =)) =))

    अभिजीत अवलिया's picture

    24 Nov 2015 - 6:59 pm | अभिजीत अवलिया

    बघितलाच पाहिजे म्हणजे हा चित्रपट. हसून हसून मेलोय.

    पिलीयन रायडर's picture

    24 Nov 2015 - 7:20 pm | पिलीयन रायडर

    Lek chalali sasarala LA bagpipe वाजवा!!????

    Mele me hasu hasun =))

    चांदणे संदीप's picture

    24 Nov 2015 - 10:24 pm | चांदणे संदीप

    फुटून अगदी चुरा-भुगा झालो हसून!
    असंच्च पाहिजे असल्या टुकार चित्रपटांना! ;-)

    यानिमित्ताने अजून काही टुकार चित्रपटांची चिरफाडीसाठी नावे सुचवतो!

    ऐलान-ए-जंग
    कुदरत का करिश्मा (का करिश्मा कुदरत का?)
    नागमणी
    परवाना (अजय देवगणचा - हा चित्रपट जर इथल्या कुणी संपूर्ण पाहिला असेल तर मी त्याचा कासारवाडीच्या पुलावर जाहीर मुका घ्यायला तयार आहे आणि पाहणारी व्यक्ती स्त्री असल्यास..... काही नाही... तेच आपल खणानारळाने ओटीभरणे वगैरे!)

    यांपैकी कोणत्याही सु(कु)प्रसिद्ध चित्रपटावर आधीच लिहिले गेले असल्यास कृपया लिंक देण्याचे पुण्य काम करून दुवा(हिंदीतला) मिळवावा!

    धन्यवाद,
    Sandy

    सागरकदम's picture

    24 Nov 2015 - 10:40 pm | सागरकदम

    परवाना (अजय देवगणचा)
    कुदरत का करिश्मा :- यति वाला
    नाग्मानीच काय पारसमणी पण पाहिलंय

    द्रोणा ,मौसम ,दीवानापन ,पागलपन ,ब्लुए,रस्कॅल्स,जंजीर ,shortcut रोमेओ ,3G

    आणि ताइगर श्रोफ्फ च्या बापाला ( मावशीचा घो ) वाला शिर्डी साई बाबा म्हणून पण बघायचे राहिले होते ते पण झाले

    चांदणे संदीप's picture

    25 Nov 2015 - 12:07 pm | चांदणे संदीप

    परवाना (अजय देवगणचा - हा चित्रपट जर इथल्या कुणी संपूर्ण पाहिला असेल तर मी त्याचा कासारवाडीच्या पुलावर जाहीर मुका घ्यायला तयार आहे

    या सांच्याला पूलाव!
    Sandy

    स्वाती दिनेश's picture

    24 Nov 2015 - 10:34 pm | स्वाती दिनेश

    हे कसं मिसलं मी? फूल टू धम्माल लिहिलंय.. बाजार उठवलाय..:)
    स्वाती

    जव्हेरगंज's picture

    24 Nov 2015 - 11:13 pm | जव्हेरगंज

    कहर!!!
    डोळ्यात पाणी आलं हसुन हसुन!!!!!

    :-D:-D:-D:-D:-D:-D:-D

    (@_@)

    ⊙_⊙

    (';')

    रुपी's picture

    26 Nov 2015 - 4:50 am | रुपी

    धागा वर आणणार्‍यांना धन्यवाद!

    रातराणी's picture

    26 Nov 2015 - 8:52 pm | रातराणी

    कहर!! =))
    _/\_

    "द बर्निंग ट्रेन" कसाबसा पचवला होता.

    पण "फरिश्ते" हा पचवायला बराच अवघड वाटल्याने, ह्या सिनेमाच्या नादी लागलो नाही.

    असो,

    सिनेमा तसाही पहाणार न्हवतोच, पण परीक्षण मात्र "एक नंबर"...

    बाळकृष्ण's picture

    13 Aug 2016 - 11:14 am | बाळकृष्ण

    आता हे परीक्षण वाचत असताना टिव्हीवर फरिश्ते चालू आहे. त्या पाठोपाठ धरमवीर ही आहे. दोन्ही परीक्षणं लागोपाठ वाचली. प्रत्येक पंच वर खो खो हसतोय.....जबरदस्त पंचनामा

    राघव's picture

    10 Mar 2021 - 9:31 pm | राघव

    राजकीय धाग्यांच्या धुरळामुळे फारच डिप्रेस झाल्यासारखं वाटायला लागलं..
    म्हणून मग वाचनखुणा उघडून जरा जुने धागे वाचत बसलेलो.. तिरंगा वाचला.. आणि आता हा.. एकदम मूड फ्रेश झाला बघा..!
    धन्यवाद फारएण्ड.. :-)

    आंबट गोड's picture

    12 Mar 2021 - 12:51 pm | आंबट गोड

    वर म्हटलय तसं... बाजार उठवलाय पार..........!!!

    diggi12's picture

    14 Dec 2021 - 2:02 am | diggi12

    जबरा

    रंगीला रतन's picture

    14 Dec 2021 - 5:01 pm | रंगीला रतन

    अंगावर एक प्रचंड रॉकेटसारखे काहीतरी पडल्याने, व त्यावर नंतर धर्मेन्द्र बसल्याने.
    अरारारारा
    आता पुन्हा हा पिक्चर बघावा लागणार :=)
    जबरा चिरफाड.