.....आता कार्यक्रम संपलेला असल्याने ती पुन्हा आपल्या मैत्रिणींच्या गराड्यात होती पण तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळेतला त्याचा चेहराच तिला सारखा आठवत होता. त्याची मदत, त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं आणि जाता जाता त्याचं निरोपाचं हात दाखवणं, सारं सारं पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यापुढे येत होतं. हातातलं कार्ड तिने आपल्या पर्स मध्ये ठेवलं आणि तिने निर्णय घेतला, आता त्याचे आभार मानायला त्याच्या ऑफिसातच जाऊन यायला हवं. असा निर्णय होताच ती नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सामील होऊन गेली कारण आता तिच्या कृतीचा आराखडा तिच्या डोक्यात तयार होता.
..................................
तो
-----
आज ऑफिसमध्ये तो एकटाच बसलेला. त्याच्या समोर टेबलावर एक पुस्तक होतं पण त्यात त्याचं लक्ष नव्हतं. त्याला राहून राहून विभागातल्या नॅशनल सेमिनारच्या दिवसाची आठवण येत होती. खाजगी व्यवसायाला सुरूवात केल्यापासून त्याने कुठल्याही सेमिनारला हजेरी लावली नव्हती. व्यापात शक्यच झालं नव्हतं त्याला! शिकत असताना 'तो' वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो सेमिनार्स अटेण्ड करायचा, अगदी बाहेरगावचेही आणि इतक्या वर्षांनंतर त्याला विभागाचा नॅशनल सेमिनार अटेण्ड करायला मिळत होता. रविवारचा दिवस असल्याने त्यालाही सुट्टीच होती. सकाळी सकाळी बाईकला किक मारून तो निघाला. एरवीचा गजबजलेला विद्यापीठाचा परिसर अगदी निर्मनुष्य होता. सकाळचं कोवळं उन्हं, आजूबाजूची झाडी, पक्षांची किलबिल यांचा आनंद घेत तो विद्यापीठ परिसरातल्या रस्त्यावरून वेगाने बाईक न्यायला सुरूवात करणार तोच त्याला विद्यापीठातल्या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या रंगाची साडी नेसून वेगाने चालण्याचा प्रयत्न करणारी 'ती' दिसली. तिला उशीर झालेला ते कळतंच होतं.
तिच्याशी त्याची अगदी तोंडओळखच होती. त्यापूर्वी त्यांचं कधी बोलणंही झालेलं नव्हतं पण विभागातील सर्व शिक्षकांना, अगदी विभाग-प्रमुखांनाही तिच्या हुशारीबद्दल, तिच्या अभ्यासाबद्दल, तिच्या कलेबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल, भरभरून आणि चांगलंच बोलताना त्याने ऐकलेलं. त्यांचा कधी संपर्क आलेला नव्हता पण एकूणच तो अशा बुद्धीमान आणि सौदर्यवतींशी त्याचं एक अंतर राखून असायचा. सुंदर मुलींशी बोलताना तो घाबरणारा नक्कीच नव्हता पण कुणाशीही बोलताना आपला आब राखणं तो आवश्यक समजायचा. लाळघोटेपणाचा तर त्याला तिटकाराच होता. कारण त्यापेक्षा, मी आहे हा असा आहे, असा अॅटिट्यूड त्याला सोयिस्कर वाटायचा.
त्याला आठवलं, त्याने अगदी सहजच तिला लिफ्ट ऑफर केली होती आणि तिनेही थोडा विचार करून ती स्विकारली होती. सभागृहाच्या दरवाज्याशी तिला उतरवल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच पण अगदी निर्हेतुकपणे त्याने तिला म्हण्टलं, "छान दिसतेयस तू आज साडीत!" अगदी हेच वाक्य, पण त्याच्या तोंडून निसटून गेलं. त्याच्या अशा बोलण्याने तिच्याही चेहर्यावर काहीसे ऑ-स्ट्रक भाव आले. त्यालाही ते जाणवलं होतं. आपण योग्य बोललो की नाही त्यालाच समजेना. जास्त बोलणंही तेव्हा शक्य नव्हतं. तिला आलेलं बघून तिच्या मैत्रिणीही तिथे यायला लागल्या. मैत्रिणी वाट बघत असतील, मी बाईक पार्क करतो, नंतर ऑडीमध्ये भेटूच असं काहीसं बोलून त्याने वेळ मारून नेली होती पण तिचा तो ऑ-स्ट्रक चेहरा आणि त्यानंतरचं ते हलकसं लाजरं स्मित, त्याला पुन्हा पुन्हा आठवंत होतं. पण त्याने ज्या निर्हेतुकपणे ते म्हण्टलेलं त्याच स्पिरिटने तिने ते घेतलं का असा प्रश्न त्याला पडलेला होता. मग त्याच विचारात मागच्या रांगेतली कोपर्यातली खुर्ची त्याने बसण्यासाठी निवडली, झालाच असेल तर गैरसमज आणखी वाढू नये म्हणून त्याने केलेली ती उपाययोजना होती. मग एकापाठून एक प्रेझेण्टेशन्स आणि भाषणं. अनेक वर्षांनंतरची पर्वणी. तिचं भाषण आहे हे त्याला कळलेलंच मग मधून मधून त्याने तिच्याकडेही दृष्टीक्षेप टाकायला सुरूवात केली. जस्ट बघायला की ती डिस्टर्ब तर झालेली नाही ना, म्हणून. पण ती तिच्या नोट्स वगैरे काढतानाच दिसत होती. आजुबाजूला उगाच बघत नव्हती. एकदम फोकस्ड वाटली तेव्हा तो ही जरा रिलॅक्स झाला आणि प्रेझेण्टेशन्स बघू लागला. मधल्या ब्रेक मध्येही त्याने मुद्दामहून कुणाच्या भेटी वगैरे घेतल्या नाहीत, अगदी आपली जागाही सोडली नाही, नंतरच्या सत्रात तिचं भाषण आहे तर अडचण नको म्हणून तो तिच्यासमोरही गेला नाही.
पुढच्या सत्रात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भाषणासाठी तिचं नाव पुकारलं गेलं आणि कधी नव्हे ते त्यालाच धडधडलं. सकाळच्या घटनेने तिच्यावर काही वाईट परिणाम केला नसावा हीच त्याची इच्छा होती. त्याने पाहिलं, ती अगदी आत्मविश्वासाने पायर्या चढून पोडियम जवळ उभी राहिली. तिने प्रेक्षकांवरून एक नजर फिरवली. त्याला वाटलं, कुणाला तरी शोधतेय जणु, आणि अचानक तिची नजर त्याच्यावर स्थिर झाल्याचं त्याला जाणवलं.
मग तिने बोलायला सुरूवात केली. काहीशा संथ सुरूवातीनंतर तिने आत्तापर्यंतच्या प्रेझेण्टेशन्सचा आढावा घेण्यास सुरूवात केली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे, त्यातल्या विशेष बाबी, उल्लेखनीय गोष्टी. दोन्ही दिवसांत प्रेझेण्ट झालेल्या पेपर्सची तिने डिटेल चर्चा केली. त्यातल्या इनोव्हेशन्स आणि त्यांच्या अॅप्लिकेबलिटीज यांची सविस्तर मांडणी केली. ज्या काही बाबी स्पष्ट झाल्या नाहीत वा पटल्या नाहीत त्या योग्य शंकांसकट दाखवल्या. हे सगळं ती करत असताना, त्याला जाणवत होतं की जणु ती फक्त त्यालाच ऐकवतेय, समजावतेय. त्याला ते समजतही होतं. बरोब्बर पंचेचाळीस मिनिटांनी तिने विभागाचे, वेगवेगळ्या प्रेझेण्टर्सचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आणि टाळ्यांचा कडकडात झाला. तिने त्यांचा हलकीशी मान झुकवून स्विकार केला आणि त्याला पुन्हा जाणवलं की पोडियम सोडताना परत एकदा तिने त्याच्याकडे बघून एक छानसं स्माईल दिलं आणि ती खाली उतरली होती.
तिचं भाषण छान झाल्यामुळे तो एका दडपणातून मुक्त झाल्यासारखा ऑडीतून बाहेर पडला. त्याने कँटीनमधून चटकन् एक गरम गरम कॉफी घेतली आणि तो ऑडीत परतला. दरवाज्यातून आत शिरून बघतोय तर ती जवळच एकटी बसलेली दिसली. तो हलकेच तिच्या जवळ गेला आणि तिच्या शेजारच्या खुर्चीत बसला. त्याला पहाताच ती थोडी चपापली आणि सावरून बसली. ती काही बोलायच्या आतच त्याने तिला आपल्या जवळील गरम कॉफी ऑफर केली आणि चांगल्या भाषणाबद्दल तिला काँग्रॅट्स केलं. फार काहीही न बोलता सकाळच्या कॉम्प्लिमेण्टमुळे ती त्याच्यावर नाराज नाही आहे हे कळल्यावर त्याने नेहमीच्या आत्मविश्वासाने तिला आपलं व्हिजिटिंग कार्ड काढून दिलं आणि केव्हाही ऑफिसात यायचं आमंत्रण दिलं होतं. तेवढ्यात विभाग-प्रमुख समोर दिसल्यामुळे त्यांच्याशी बोलण्याच्या बहाण्याने तो तिच्या शेजारून उठून गेला होता. त्याच्या आठवणी इथेच थांबत नव्हत्या कारण या नंतर दोन दिवसांतच दुपारी त्याच्या केबिनचं दार वाजलं.
नुकतीच कामं त्याने हातावेगळी केलेली आणि थोडा रिलॅक्स बसलेला तर दारात चक्क तिला बघितलं. थोडा गडबडलाच होता तो! काहीसं अनपेक्षितंच होतं तिचं येणं त्याच्यासाठी. तरी सावरून उभं राहत त्याने तिचं स्वागत केलं. तिने येताना पिवळ्या जर्बेराच्या फुलांचा गुच्छा आणलेला. त्याने प्रश्नार्थक नजरेने, तिने आणलेल्या फुलांच्या बुकेकडे नि तिच्याकडे पाहिलं. त्यावर तिने हसून म्हण्टलं, "सेमिनारच्या दिवशी तुमचं कार्ड देऊन ऑफिसात यायचं आमंत्रण दिलेलं तुम्ही, ते विसरलात तर नाही ना? त्या दिवशी तुम्ही सकाळपासून इतकी मदत केलीत मला, पण एका शब्दाने साधं थँक्यूही म्हणू शकले नाही मी, त्याच्या थोड्याफार भरपाईचा प्रयत्न आहे हा." असं म्हणत तिने तो फुलांचा बुके त्याच्या हातात दिला. त्याने हसून ती फुलं फुलदाणीत नीट लावली आणि तिला म्हणाला, "अगं, फार कुठे काय मदत वगैरे केली? तुझं आपलं उगाच काहीतरी."
त्यानंतर चांगले तास-दिड तास ते दोघेही गप्पा मारत बसलेले. विषय तसे साधेच होते. त्याने स्वतःची पार्श्वभूमी सांगितली आणि तिने तिची. थोडीफार करीअरची चर्चा, थोडीफार त्यांचे अभ्यासाचे आणि इतर आवडीचे विषय आणि अर्थातच विद्यापीठाचा विभाग नि विभागातील शिक्षक. वेळ कसा गेला दोघांनाही कळलं नाही. अगदी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी भावना दोघांच्याही मनात आली. त्यामुळे तिची ही ऑफिस भेट पहिली आणि अखेरची ठरली नाही. जेव्हा जेव्हा ती त्या परिसरात यायची तेव्हा तेव्हा आधी फोन करून तो कामात नसेल तर ऑफिसात यायची. थोडा वेळ थांबायची. तो कामात असेल तर बरेचदा तो कामातून मोकळा होईपर्यंत काही पुस्तक वगैरे वाचत बसायची. मग त्याची भेट घेऊन निघायची. हळू हळू त्यांच्या ऑफिसबाहेरही भेटी होऊ लागलेल्या. कधी दुपारच्या जेवणासाठी तर कधी संध्याकाळच्या फुटकळ खाबुगिरीसाठीही त्यांचं भेटणं होऊ लागलं. आवडती नाटकं, आवडते चित्रपटही ते एकत्र बघायला जाऊ लागलेले. त्यांच्या मैत्रीची वीण जशी घट्ट होऊ लागल्याची जाणीव त्याला येऊ लागली कारण ती अहो-जाहो वरून अरे-तुरे वर उतरली होती आणि त्याच्याशी अनेकदा हक्काने काही गोष्टी बोलायची, सांगायची. आता त्याला जाणवू लागलेलं की त्याच्यात आणि तिच्यात केवळ मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक घट्ट नातं निर्माण झालंय. पण त्याचवेळी त्याला भीतीही वाटायची. त्याला जे तिच्याबद्दल वाटतंय ते तिला वाटत नसेल तर त्याच्या कोणत्याही आतेतायी कृतीमुळे, या क्षणाला जे एक सुंदर नातं तयार झालंय त्याचाच विध्वंस होईल.
गेले काही दिवस तो याच विचारात होता. एका कार्यक्रमामुळे आदला आठवडा ती खूपच व्यस्त होती आणि त्याआधी कार्यक्रमाची तयारी म्हणूनही ती व्यग्र होती. जवळपास पंधरा दिवसांनी ते भेटणार होते. त्याचं एक मन त्याला कृती करायला सांगत होतं तर एक मन संयमाने वागायला सांगत होतं. या द्वंद्वात जणु तोच धारातीर्थी पडत होता. त्याचा असा विचार चालू असतानाच ती आली. नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसातल्या सोफ्यावर पर्स टाकून पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. त्याने तिच्या कार्यक्रमाबद्दल विचारलं आणि मग बराच वेळ ती त्याबद्दल सांगत राहिली. अगदी डिटेलमध्ये, प्रत्येक बाबींचा व्यवस्थित विचार करून, अगदी अमूक एक निर्णय का घेतला त्याच्या पार्श्वभूमी आणि कारणमीमांसेसकट. त्या दिवशी तिने घरून दोघांनाही पुरेल असा डबा आणला होता. मग त्यांनी दुपारचं जेवण ऑफिसातच घ्यायचा निर्णय घेतला.
जेवता जेवता त्यांचं बोलणं अनाहूतपणे दोघांच्या आवडत्या विषयाकडे गेलं. संगीत. बोलता बोलता संदर्भ जॅझ आणि तत्कालीन स्विंग संगीताकडे आला आणि त्यातल्या कृष्णवर्णीयांच्या योगदानाकडे गेला. ती हिरहिरीने ते संगीत कृष्णवर्णीयांचच आहे आणि त्यात गौरवर्णीयांचं योगदान गेल्या ५० वर्षांपूर्वीपर्यंत अगदी कमी आहे, असं प्रतिपादन करू लागली. तिच्या सवयीने ती वेगवेगळ्या संगीतकारांचे संदर्भ देत होती, त्यांची गाणी सांगत होती, त्यांच्या कारकिर्दीची वर्ष सांगत होती. नेहमीप्रमाणेच तो तिचा अगदी शांतपणे प्रतिवाद करू लागला. जॅझ संगीत कृष्णवर्णीयांच्या अभिव्यक्तिचा स्रोत असलेलं हे संगीत असलं तरी त्यात कृष्णेतरांनीही योगदान दिलेलं आहे हे तो अनेक प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचं जेवण संपलं तरी चर्चा सुरूच राहिली.
या विषयावरच्या सगळ्या मुद्द्यांवर उहापोह झाल्यावर त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि एक एक कृष्णेतर संगीतकाराचं नाव घेऊन त्यांच्या जॅझ रचना तिला ऐकवू लागला. त्यातल्या काही तिला माहित होत्या तर काही नव्यानेच समजत होत्या. तरी तिचा मुद्दा ती मागे घेत नव्हती कारण तिच्यामते सिनात्रा जॅझपेक्षा पॉप संगीत जास्त गायला होता. मग त्याने त्याचा हुकुमाचा पत्ता टाकला. त्याने तिला फ्रँक सिनात्राची गाणी ऐकवायला सुरूवात केली. त्याबरोबर पूर्ण चर्चेचा नूरच पालटायला लागला आणि दोघेही जॅझ संगीताचा आनंद घेऊ लागले. पुढे जॅझच्या रसग्रहणाकडेच ते वळले. तासभर यातच गेला तेव्हा त्याने तिला म्हण्टलं, "बघ, हे सिनात्राचं गाणं काही जॅझ नाही पॉपच आहे पण गेले काही दिवस तुला ऐकवायचा विचार करत होतो. हे ऐकून तुला काय वाटतं ते मला अगदी स्पष्ट सांगायचं बरं का, सांगशील?" त्यावर ती म्हणाली, "अरे, आधी ऐकवशील तर खरं मग सांगते, ठीक?" "ठीक," असं म्हणून त्याने ते गाणं सुरू केलं आणि तो तिच्या प्रतिक्रिया बघू लागला.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 7:39 pm | रेवती
कथा योग्य वेगाने पुढे चाललिये.
वाचतिये.
27 Oct 2011 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 8:14 pm | भास्कर केन्डे
पहिल्या दोन भागानंतर वाटलं होतं की कथा चारएक भागांची असेल. पण तुमचा खजिना मोठा आहे असं या भागा नंतर दिसतय. "ऑडीतून" सारख्या शब्दांमुळे अधुनिक लेखनाची झालर टाकत आहात ते सुरेख. अगोदरच्या भागात रेखाटलेला प्रसंग पुन्हा या भागात त्याच्या नजरेतून मांडलात - ते धनुष्य अफलातून पेललेत. अभिनंदन!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. लवकर येऊ द्या.
27 Oct 2011 - 9:50 pm | पिंगू
प्रास तुमची लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
- पिंगू
27 Oct 2011 - 10:11 pm | सिद्धार्थ ४
मस्त मजा येत आहे वाचताना. पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!
28 Oct 2011 - 12:35 am | शिल्पा ब
पुढचा भागसुद्धा लवकर टाका. छान मालिका आहे.
28 Oct 2011 - 12:59 am | निमिष ध.
चांगला वेग पकडला आहे .. असाच राहू द्या !! पुलेशु
-नि ध
28 Oct 2011 - 9:35 am | नगरीनिरंजन
कथा रंगतीये. वाचून जुने "फुर्सत के रातदिन" आठवले.
अर्थात सिनात्रा वगैरे कधी फार ऐकलेलं नसल्याने थोडं वातावरणात घुसायला त्रास पडला. पण तो आमचाच दोष. :)