निदान नमस्कार तर कराल?

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
23 Sep 2011 - 4:44 am

काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो. त्याही माझी खूप काळजी घेतात, मला प्रेमाने 'अरे-तुरे' करतात, कधी रागावल्या तर मात्र 'अहो' वर उतरतात!

मी घाईत बूट घालून किल्ल्या हातात घेतल्या आणि गाडीकडे जायला निघालो. आतल्या खोलीतून बाहेर येत आईंनी भिंतीवर असलेल्या फोटोकडे हनुवटी दर्शवली आणि विचारलं, "नमस्कार केलास?" मी म्हणालो, "Sorry! राहिलं..." मी बूट-मोजे काढले आणि आत वळलो. "अहो काय हे? साधा नमस्कार लक्षात रहात नाही? वडील माणसं तुमच्या कडे काही मागायला येत नाहीत, उलट देण्यासारखं आहे ते आयुष्यभर त्यांनीच तुम्हाला दिलंय, तुमच्या कडे देण्यासारखं आहेच काय? निदान नमस्कार तर कराल?" सकाळी सकाळी कानाखाली शाब्दिक जाळ निघाला!

माझी आई १९९७ मध्ये गेली. COPD (chronic obstructive pulmonary disease) ची पेशंट असलेली आई त्या आधी दोनच दिवस आजारी होती, पण अखेरीला अंत ओढवला तो तिला ज्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं तिथे वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर मिळालं नाही म्हणून. मी परदेशी होतो, वेळेवर पोहोचायची खूप धडपड करूनही नाही पोहोचू शकलो, खूप तडफड झाली जीवाची. आई एका मोठ्या हॉस्पिटल मधून मेट्रन म्हणून निवृत्त झालेली, अनेक नामवंत शल्यचिकित्सक, तिने आपल्या सर्जरी मध्ये असिस्ट करावं म्हणून आग्रह धरून बोलवायचे, तिने जन्मभर इतरांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केलेली. तिचा असा केवळ गलथानपणामुळे झालेला मृत्यू पाहून स्वत: डॉक्टर असलेल्या माझ्या वडिलांनी केलेला आक्रोश मला हजारो मैलांवरून ऐकवत नव्हता. नंतर अंत्यसंस्कारांच्या वेळी गेल्यावर आईला पाहिलं ते फोटोतच, तशीच होती जशी मला आठवत होती, हसरी, असं वाटलं म्हणेल, "आलास दादा? ये, कसा आहेस रे बाळा?"

परतल्यानंतर खूप महिने मी स्वत:ला कामात झोकून दिलं होतं, पत्नी सतत आईविषयी बोलायची, माझी आई तिचा आदर्श होती, म्हणायची "बोल रे, मन मोकळं होईल," पण मी फारसा भाग घेत नसे. आई आता अस्तित्वात नाही हेच मला उमजत नव्हतं, मन जणू बधीर झालं होतं.

आई गेल्यानंतर पुढे कधीतरी २००० च्या सुमारास एकदा बस मधून प्रवास करतांना एका नियतकालिकाच्या फाटक्या पानावर छापलेली एक कविता सापडली, कवीचं नाव होतं पीटर डेव्हिडसन, पण इतर काही माहिती नव्हती. मला आठवतंय त्या कवितेने मला हलवून टाकलं होतं. मी ती कविता जपून ठेवली, आणि आयुष्य चालू राहिलं.

परवा महिन्यापूर्वी, आईनंतर १४ वर्षांनी, वडील गेले. हसते-खेळते, हिंडते-फिरते वडील हृदयविकाराच्या झटक्याने गेले. १३ वर्षांपूर्वी angioplasty होऊन गेल्यावरही रोज ३-४ मैल चालणारे, आठवड्यातून दोनदा तास-तास भर badminton खेळणारे, charity हॉस्पिटलमध्ये नियमाने अजूनही पेशंट्स तपासणारे ७६ वर्षांचे वडील असे अचानक जातील याची कुणाला शंकादेखील आली नव्हती. माझी परिस्थिती जशी आईच्या वेळी होती तशीच. पुन्हा मी दहा हजार मैल लांब. कळल्यावर दोनच तासांत तिकीट काढून निघालो, २५ तासांच्या विमानप्रवासात उण्या-पुऱ्या ५० वर्षांचं आयुष्य डोळ्यांपुढून सरकत होतं. आई गेल्यावरही स्वत:चा एकटेपणा खूप खोलवर खोचून ठेवून, मुला- नातवंडामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामात स्वत:ला पूर्णपणे गुंतवून घेणारे, आमच्या सर्वांच्या गरजा अजूनही भागवण्याची हिंमत ठेवणारे वडील चटकन, आळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे निघून गेले. आपल्यावरची जी काही थोडी फार उरली-सुरली छपरं आहेत त्यातलं एक फार मोठं छप्पर निघून गेलं आहे ही जाणीव भयानक होती. ग्रेसच्या कवितेमधल्या "अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे" या ओळी सरसरून अंगावर आल्या! वडिलांचाही फोटोच वाट पहात होता.

मी आणखी एक अंत्यविधी पार पाडून परत आलो, आणि आयुष्याला लागलो. काल आईच्या फोटोला नमस्कार करून निघाल्यावर जुनी खपली निघाली, ती कविता शोधून काढली, आणि मग शब्द सापडल्यावर आंतर्जालावर शोध घेतला, The Atlantic मधील मूळ कविता या दुव्यावर सापडली. त्या कवितेचं हे मुक्त रुपांतर:

आठवणींच्या किनार्‍यापलीकडून
तू जणू मला नजरेने गुंडाळलं, उचललंस
मला हृदयाशी धरलं, पाजलं, शुद्ध केलंस
अस्थिर पायांवर मी हेलकावत उभा राहिलो
तुझ्या हास्याने मला चालायला लावलं
तुझ्या शब्दांनी मला शब्द दिले
तुझ्या धाकाने मला घाबरवलं, माझं रक्षणही केलं
तू शिकवलंस, शिक्षा दिलीस, नजरेत ठेवलंस

आणि आता, तू नाहिशी झालीस

कुठल्या अंधार्‍या समुद्रांचं मी मंथन करू
तुला शोधण्यासाठी?
किती दूरवर गेलीयेस तू, एकटीच?

मी वेध घेतो अथांग सागराचा
तुझ्या आठवणीतल्या गंधाच्या आशेने
मंद झुळुकेतून तुझी उबदार मिठी यावी
तुझ्या बोलण्याची गुणगुण
तुझं हलक्या आवाजातलं अंगाईगीत
आणि तू घेतलेले असंख्य मुके
मी वाट पहात राहतो

कुणाला वाटलं होतं
की तू अशी नि:संगपणे निघून जाशील?
कल्पना तरी होती का
की मी कितीही ओढीने खेचला
तुझ्या-माझ्यातल्या बंधनाचा तो चिवट धागा, तरी
तू कधीच परतणार नाहीस,
कधी बोलणार नाहीस,
कधी प्रतिसाद देणार नाहीस,
जशी मला जाणतच नाहीस?

अशी कशी तू नाहिशी झालीस?

*****************
वडील गेल्यावर आईच्या वियोगाचं दु:ख आज बाहेर पडतंय, वडील असतांना त्यांच्यावर लिहिलेली कविता त्यांना दाखवायची राहूनच गेली.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 4:59 am | शिल्पा ब

खुप जवळची व्यक्ती अशी निघुन गेल्यावर खपली धरायला वेळ लागतोच...जमेल तितकं धीरानं घ्यायचं.
कविता छान आहे.

राजेश घासकडवी's picture

23 Sep 2011 - 6:17 am | राजेश घासकडवी

असंच म्हणतो.

कोणाच्या तरी धाग्यावर सांगीतलेले परत सांगते - ही ऋणानुबंधांची नाती असतात. परत परत जन्म घेत रहातात. ही अशी एका जन्मात तुटत नाहीत. तुमचे आई-वडील तुमच्या सतत सन्नीध आहेत. त्यांचे आशीर्वाद, प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेतच पण तेदेखील तुमच्या निकट आहेत.
प्रत्येक वेळी मी शिवकवच म्हणते त्यात माझ्या मुलीचे नाव गुंफते. आणि माझा हा विश्वास आहे की हे कवच तिचे जगाच्या अंतापर्यंत रक्षण करेल अँड अ डे मोअर. मला जाणवते की तिचे माझे नाते हे फक्त आताचे नाही. कसे सांगू - पण ही नाती खरच वरवरची नसतात.असो खूप बोलले.
आपले मुक्तक अतिशय सुंदर आहे. व्याकुळ करणारे आहे.

नगरीनिरंजन's picture

23 Sep 2011 - 6:06 am | नगरीनिरंजन

दोन्ही कविता आणि लेख मनाला स्पर्श करून गेले. आणखी काय बोलणार?

प्रियाली's picture

23 Sep 2011 - 6:33 am | प्रियाली

लेखन छान आहे आवडले असे त्याच्या विषयामुळे म्हणवत नाही पण अभिनिवेशविरहीत लेखन मनाला स्पर्शून गेले.

माझ्या टीममध्ये एक नायजेरीयन मुलगा आहे. गेल्या आठवड्यात मिटींग सुरू होती आणि अचानक फोन वाजला आणि तो कोणाचीही परवानगी न मागता तडक उठून बाहेर गेला. नंतर एकजण म्हणाला 'अरे त्याची आई बरी नाही. अ‍ॅडमिट केलं आहे तिला.'

काही वेळाने परत आला आणि सुन्न खुर्चीवर बसला. सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणाला 'आई गेली माझी.' अदमासे ८-९ जण होते मिटींगमध्ये. सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले. ज्यांची आई गेली आहे तो प्रत्येकजण आपल्या आईबद्दल दोन शब्द बोलला. त्या मुलाला २० तासाच्या प्रवासाचे खूप वाईट वाटत होतं.

भारत असो, अमेरिका असो की अफ्रिका आई ही आईच असते याची अनुभूती त्या मिटींगमध्ये आली.

रेवती's picture

23 Sep 2011 - 6:54 am | रेवती

लेखन खूपच हृदयस्पर्शी आहे.
वाचताना रडू आलं हे सांगायला नकोच!.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!
कवितेचं रुपांतर चांगलं आहे.

चतुरंग's picture

23 Sep 2011 - 7:27 am | चतुरंग

आयुष्यात बराच काळ आईवडील मिळणं हे भाग्याचंच समजायला हवं. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपल्या डोक्यावर आई-वडिलांचे छत्र आहे ही भावना एक वेगळंच बळ देते. तुमचं हे छत्र हरपणं तुम्ही अतिशय संयत शब्दात मांडलं आहेत त्यानं आतून हाललो!
आयुष्यात इतरांना वाचवणार्‍या आईचा मृत्यू हॉस्पिटलाच्या हलगर्जीपणाने व्हावा यात कोणता न्याय आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. तुमच्या वडिलांच्या धीरोदात्तपणाचे कौतुक वाटते.
दोन्ही कविता अतिशय सुंदर आहेत.

तुम्हाला हा वियोग सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना.

(साश्रू)रंगा

प्राजु's picture

24 Sep 2011 - 9:43 pm | प्राजु

हेच आलं मनात!!
लेखन आवडलं. कवितेचं मुक्त भाषांतरही आवडलं.
सांभाळा!

राघव's picture

23 Sep 2011 - 7:32 am | राघव

हृदयस्पर्शी लेख. धन्यवाद.

बाकी श्रीमहाराजांच्या आईंचे प्राणोत्क्रमण झाल्यावर त्यांना स्फुरलेल्या काही ओळी आठवल्यात -

दया करी राम-सीता | सांभाळावी माझी माता ||
दया करी शरयूबाई | मुक्त करी माझी आई ||
हनुमंता कृपा व्हावी | माझी आई पदीं न्यावी ||
शिवरूपी ब्रह्मगामी | आईवर कृपा करा तुम्ही ||
लोळे देवाचे मी पायी | मुक्त करा माझी आई ||
आईचे दोष माझे माथीं | एवढी ऐकावी विनंती ||
दास म्हणे रघुवीरा | माझी आई मुक्त करा ||

आतां कोठे राहूं कोठे जाऊ | आई तुला कोठे पाहूं ||
तुम्ही जन्म मज दिला | आज कंटाळा हो केला ||
सर्व सुख तुझे पायीं | कोठे सोडून गेली आई ||
हरिणी पाडस चुकली | मज वेळ तैसी आली ||
माझे दैव कमी झालें | तुज देवे बोलाविलें ||
दास म्हणे माझा प्राण | तुजवीण झाला दीन ||

पण शेवटी म्हणतात -

साधुसंत वाखाणिति | धन्य धन्य माता म्हणती ||
तुळशी-पुष्पांचेही हार | नाम गर्जती अपार ||
तेज आलें बहु फार | मुख पाहती नारीनर ||
वाद्ये वाजती टणत्कार | होतो नामाचा गजर ||

दास दु:खी देहधारी | अंतरी आनंदाच्या लहरी ||

राघव

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2011 - 9:59 pm | अत्रुप्त आत्मा

भावस्पर्शी लेख...

दया करी राम-सीता | सांभाळावी माझी माता ||
दया करी शरयूबाई | मुक्त करी माझी आई ||........... व तितकीच भावोत्कट रचना.....

५० फक्त's picture

23 Sep 2011 - 7:45 am | ५० फक्त

+१ टु रेवतीतै, परवाच त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालेलं आहे,

सूड's picture

23 Sep 2011 - 8:32 am | सूड

खरंच आहे, नेहमीच्या गडबडीत जमतंच असं नाही. देवाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांत अजून तरी अविधवानवमीदिवशी मला काही अडथळा आला नाही. त्यादिवशीचं सगळं नीट, मनासारखं करता आलं. फार काही लिहावंसं वाटतंय, पण आवरतो.

विकास's picture

23 Sep 2011 - 8:34 am | विकास

लेख आणि त्यातील भावना भावल्या.

चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी

या अत्र्यांच्या ओळी कायम डोक्यात बसलेल्या आहेत.

अजून तुर्तास काही लिहवत नाही...

शैलेन्द्र's picture

24 Sep 2011 - 8:33 am | शैलेन्द्र

अत्रे? की कवी यशवंत? मलाही नीट आठवत नाहीये..

चित्रा's picture

23 Sep 2011 - 8:50 am | चित्रा

कळवळल्यासारखे झाले.

ऋषिकेश's picture

23 Sep 2011 - 8:50 am | ऋषिकेश

....

सविता००१'s picture

23 Sep 2011 - 9:51 am | सविता००१

माझीच अवस्था मी वाचली............

श्रावण मोडक's picture

23 Sep 2011 - 10:02 am | श्रावण मोडक

.
लेखन उत्तम.

मैत्र's picture

23 Sep 2011 - 10:44 am | मैत्र

...

चिप्लुन्कर's picture

23 Sep 2011 - 10:53 am | चिप्लुन्कर

मनाला भिडले तुमचे लिखाण .छान लिहिता तुम्ही.

सविता's picture

23 Sep 2011 - 10:53 am | सविता

..............

प्यारे१'s picture

23 Sep 2011 - 10:55 am | प्यारे१

रामकृष्णहरि.
कुणाला आई गेल्यानं पोरकेपणा येतो तर कुणाला मुलगी गेल्यानं....
प्रारब्ध बस्स....

ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्ण मुदच्यते......

जयंत कुलकर्णी's picture

24 Sep 2011 - 9:23 pm | जयंत कुलकर्णी

हे वाक्य ह्रदय चिरत चिरत कोठे पोहचेल सांगता येत नाही. कदाचित काळीज भेदून देवाच्या दरबारात न्याय मागायला गेले असेल........

शुचि's picture

23 Sep 2011 - 7:10 pm | शुचि

सुन्न झाले हे वाक्य वाचून.

जयंत कुलकर्णी's picture

23 Sep 2011 - 12:03 pm | जयंत कुलकर्णी

ज्यांची ज्यांची आई गेलेली आहे त्या सर्वांच्या दु:खात सहभागी आहे. आणि ज्यांना आई आहे त्यांच्या आनंदातही सहभागी आहे !

डूडूक हे माझे अत्यंत आवडते वाद्य आहे. हे अर्मेनियन असून साधारणतः आपल्या सनई सारखे दिसते पण याच्यातून येणार आवाज हा अत्यंत करूणेने भारलेला व भरलेला असतो.
खाली त्याचे चित्र दिलेले आहे.

हे वाद्य वाजवणार एक बुजूर्ग कलाकार आहे - जिवान गॅस्पारियान. त्याचेही चित्र खाली दिलेले आहे.

यावर ( दू:ख आणि संगीत या नावाचा) एक दीर्घ लेख मी लिहिलेला होता तो मला आता सापडत नाही पण मी तो परत केव्हा तरी लिहेन.

माझी आई जायच्या अगोदर १ महिना व्हेज स्टेटमधे होती. ती जेव्हा गेली तेव्हा मला माझ्या वयामुळे वडिलांसमोर आणि इतरांसमोर रडताही येईना. भावनांना ह्रदयात कोंडतांना जीव मेटाकुटीस आला होता. एका संध्याकाळी मात्र हे वाद्य ऐकताना माझ्या मनाचा बांध फुटला. घरी कोणीही नव्हते, पोटभर रडुन घेतले. त्यानंतर हे वाद्य आणि हे गाणे परत कधिही ऐकले नाही, आज ऐकतोय कारण अपलोड करायचे होते. अश्रूंची तिव्रता तीच आहे.... आवरते घेतो ......कारण तेच ....वय....
पहिले ऐका "ममा" आईला घातलेली आर्त साद...

आणि ही एक आर्त धून ऐका डूडूकची..

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते

ऐकले! _/\_

पितॄछत्र हरपल्याचे दु:ख सहन करण्याचे बळ आपणास मिळो,ही प्ररमेश्वरा चरणी प्रार्थना करतो.

नंदन's picture

23 Sep 2011 - 12:08 pm | नंदन

वरील प्रतिक्रियांत व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे. चटका लावणारं लिखाण.

दिपक's picture

23 Sep 2011 - 1:39 pm | दिपक

आतुन हलवणारा लेख.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2011 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर

आई-वडिलांबद्दल सर्वांच्याच मनात असीम प्रेमभावना असतात. पण आपल्या भावना शब्दांत व्यक्त करणं सर्वांनाच जमतं असं नाही. त्यातूनही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे उत्कृष्ट कविता. दोन्ही कविता छान आहेत. पण तुम्ही वडीलांवर केलेली कविता अप्रतिम आहे. भावनांनी ओथंबलेली आहे.

माझे वडील ९६ साली गेले. ३ आठवडे इस्पितळात अतिदक्षता कक्षात होते. मी त्यांना दूरून पाहू शकत होतो पण भेटू शकत नव्हतो. बोलू शकत नव्हतो. मी आलो आहे हेही त्यांना जाणवलं नसावं. एकमेकांकडे काचेच्या अलिकडून आणि पलीकडून पाहात चालणारा आमचा मूक संवाद ३ आठवड्यांनी पहाटे साडेतीन वाजता संपला. तो क्षण आजही मनात धगधगता आहे. असो. परदेशात, स्वजनांसून कोसो दूर असलेले आपले वास्तव्य कधी कधी 'विस्तव' बनून समोर येतं, चटका देऊन जातं. ती खूण, तो व्रण उर्वरित आयुष्यभर सांभाळावा लागतो.

आपल्या आई-वडिलांचा आदर्श, शिकवण, संस्कार सतत आचरणात ठेवून पुढील पिढीसाठी नवे आदर्श निर्माण करणे ही आपल्या मागच्या पिढीला उत्तम श्रद्धांजली ठरेल असे वाटते.

>>पण आपल्या भावना शब्दांत व्यक्त करणं सर्वांनाच जमतं असं नाही.

खरंय पेठकर काका....
सहा महिन्यापुर्वी बाबा वारल्यावर माझ्या भावना मला व्यक्तच करता आल्या नाहीत. :(
बहुगुणी काकांचा हा लेख वाचून बाबांची आठवण झाली.

आईवडील जाणं म्हणजे भूतकाळाशी बांधून ठेवणारा दुवाच निखळणं. इतके दिवस आपलं भरण पोषण करीत आलेली नाळच तुटणं. बरेच दिवस आयुष्य संदर्भहीन झाल्यासारखं वाटत होतं. आम्हां भावंडांच्या छोट्याश्या कामगिरीमुळेही आईवडीलांना खूप आनंद होई. आमचा हुरूप वाढे. आता ज्यांच्या साठी हुरूपाने करावं असं कोणी उरलं नाही या भावनेने काही काळ आयुष्याचं प्रयोजनच निघून गेल्यासारखं झालं होतं. मनात खोल रुतलेल्या त्यांच्या आठवणी अजूनही कधीकधी उसळी मारून वर येतात आणि क्षणभर काळ थांबतो. कित्येक गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या होत्या,करायला हव्या होत्या त्या राहून गेल्या याबद्दल खंत वाटते, अपराधीपणाही वाटतो. आमच्या आनंदामुळे त्यांना होणारा आनंद आणि आमच्यामुळे आमच्या मुलांना मिळणारा आनंद यांची जातकुळी एक नव्हे. एकामुळे दुसर्‍याची भरपाई होऊच शकत नाही.प्रत्येक नात्याची आणि दु:खाची धार वेगवेगळीच.
लेख हृदयस्पर्शी आहे.

दीप्स's picture

23 Sep 2011 - 3:13 pm | दीप्स

आई !! दोन अक्षरी शब्द !! पण व्याख्या शब्दात न मांडता येणारी म्हणून तर एका कवीने म्हटले आहे

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कुठे
आई वरती लिहिण्याइतपत
नाही माझ्हे कर्तव्य मोठे

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबद्ध टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी ...

खरच हृदयाला स्पर्शून जाणारा लेख आहे हा. छान लिहितात तुम्ही असेच लिहित राहा.

जागु's picture

23 Sep 2011 - 3:16 pm | जागु

शब्द नाहीत बोलायला. मृतात्म्यास शांती मिळो.

स्मिता.'s picture

23 Sep 2011 - 3:31 pm | स्मिता.

लेखन इतके हृदयस्पर्शी झालेय की पुढे काही लिहायलाही सुचत नाही.
या कठीण प्रसंगी ईश्वर तुम्हाला धैर्य देवो ही प्रार्थना.

तुमच्या लेखाने माझ्याही दिवंगत आईच्या आठवणी जाग्या झाल्या अन जुन्या जखमा भळभळून वहायला लागल्या

माझ्या एका मित्राने पाठविलेल्या पत्राचीही आठवण झाली, ते जुन्या ईमेल्स मधून शोधून,शोधून जसे च्या तसे चोपा पेस्त केले आहे.

खालील सर्व परिच्छेद पूर्ण वाचावे हि विनंती - read till end u will love it - gud old one

After 21 years of marriage, my wife wanted me to take another woman out to dinner and a movie. She said I love you but I know this other woman loves you and would love to spend some time with you.

The other woman that my wife wanted me to visit was my MOTHER, who has been a widow for 19 years, but the demands of my work and my three children had made it possible to visit her only occasionally.

That night I called to invite her to go out for dinner and a movie.

"What's wrong, are you well," she asked? My mother is the type of woman who suspects that a late night call or a surprise invitation is a sign of bad news.

"I thought that it would be pleasant to spend some time with you," I responded. "Just the two of us."

She thought ! about it f or a moment, and then said, "I would like that very much."

That Friday after work, as I drove over to pick her up I was a bit nervous. When I arrived at her house, I noticed that she, too, seemed to be nervous about our date. She waited in the door with her coat on. She had curled her hair and was wearing the dress that she had worn to celebrate her last wedding anniversary. She smiled from a face that was as radiant as an angel's.

"I told my friends that I was going to go out with my son, and they were impressed, "she said, as she got into the car. "They can't wait to hear about our meeting".

We went to a restaurant that, although not elegant, was very nice and cozy. My mother took my arm as if she were the First Lady. After we sat down, I had to read the menu. Her eyes could only read large print. Half way through the entries , I lifted my eyes and saw Mom sitting there staring at me. A nostalgic smile was on her lips.

"It was I who used to have to read the menu when you were small," she said.

"Then it's time that you relax and let me return the favor," I responded.

During the dinner, we had an agreeable conversation - nothing extraordinary, but catching up on recent events of each other's life. We talked so much that we missed the movie.

As we arrived at her house later, she said, "I'll go out with you again, but only if you let me invite you." I agreed.

"How was your dinner date?" asked my wife when I got home.

"Very nice. Much more so than I could have imagined," I answered.

A few days later, my mother died of a massive heart attack. It happened so suddenly that I didn't have a chance to do anything for her.

Some time later, I received an envelope with a copy of a restaurant receipt from the same place mother and I had dined.

An attached note said: "I paid this bill in advance. I wasn't sure that I could be there; but nevertheless, I paid for two plates - one for you and the other for your wife. You will never know what that night meant for me. I love you, son."

At that moment, I understood the importance of saying in time: "I LOVE YOU!" and to give our loved ones the time that they deserve. Nothing in life is more important than God and your family. Give them the time they deserve, because these things cannot be put off till "some other time."

--- L. Mignet

अनामिक's picture

23 Sep 2011 - 5:46 pm | अनामिक

मनाला भिडणारे लेखन! अगदी कळवळायला झालं; जन्मदात्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ राहता येऊ नये ही कल्पनाही करवत नाही.

संदीप चित्रे's picture

23 Sep 2011 - 8:37 pm | संदीप चित्रे

>>
>>
(ह्या धाग्यावरच्या प्रतिक्रियेत खूप शब्द न वापरणं बोलकं असेल असं वाटतंय त्या मुळे वरच्या काही ओळींत फक्त स्पेस बार टाईप केला आहे. भावना नक्की पोचतील ह्याची खात्री आहे.)

सर्वसाक्षी's picture

23 Sep 2011 - 8:54 pm | सर्वसाक्षी

करणारे लेखन. जन्मात आई वडील एकदाच मिळतात हे वास्तव आहे.

नन्दादीप's picture

23 Sep 2011 - 9:30 pm | नन्दादीप

एक सुंदर आणी हृदयस्पर्शी कविता. खरच वाचताना डोळ्यातून पाणी आले. जरी सर्व आप्तजन जवळ असले तरी भविष्यात येणार्‍या भयाणतेने काळीज हेलावले. आपली माणसे दूर जावूच नये असे वाटतात.

जाई.'s picture

23 Sep 2011 - 10:03 pm | जाई.

निशब्द

पैसा's picture

23 Sep 2011 - 10:14 pm | पैसा

अत्यंत हृदयस्पर्शी आणि उत्कट लेख. वाचताना डोळ्यात पाणी कधी जमा झालं कळलंच नाही. कविताही फारच सुंदर आहे.

आणखी काय सांगू? आईबाबांच्या आठवणी इतक्या उत्कटतेने तुमच्या मनात घर करून आहेत, तर फोटोला नमस्कार करणे हा केवळ बाह्य उपचार झाला. तो फक्त इतरांसाठी पाळायचा.

अशा जखमा कधी बर्‍या होतात का मला जरा शंकाच आहे. वरून खपल्या धरतात इतकंच.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2011 - 7:56 am | बिपिन कार्यकर्ते

उत्कट!

सौप्र's picture

24 Sep 2011 - 12:00 pm | सौप्र

उत्कट लेख आणि कविता...
वर चतुरंग यांनी म्हणल्याप्रमाणे आयुष्यात बराच काळ आईवडील मिळणं हे भाग्याचंच समजायला हवं.
माझी आई गेली तेव्हा मी आठवीत होतो. जाण्यापूर्वी दोनेक वर्षे आजारी होती. धड ना कळतं ना नकळतं असं वय. आपण काय गमावलय हे तेव्हा समजलंच नाही. पण जसा काळ गेला तसा तिच्या वियोगाची तीव्रता जास्त जाणवायला लागली. नंतर वडीलांनी एकट्याने घर सांभाळलं. अगदी स्वयंपाकासहीत. आज नोकरी व इतर जवाबदार्‍या आल्यावर वडीलांवर काय बेतलं असेल याची कल्पना येतेय. त्याच्या नखाचीही सर नाही आमच्यात. भावना शब्दात व्यक्त करतान मी कमी पडतो हे प्रकर्षाने जाणवतंय. थांबतो.

स्वाती२'s picture

24 Sep 2011 - 5:46 pm | स्वाती२

नि:शब्द!

अर्धवट's picture

24 Sep 2011 - 9:07 pm | अर्धवट

.....................

मराठमोळा's picture

24 Sep 2011 - 9:24 pm | मराठमोळा

.

AniruddhaJoshi's picture

25 Sep 2011 - 9:47 am | AniruddhaJoshi

आठ्वणी उत्कट झाल्या की त्याना शब्द फुटतात आणि ते हलवणारेच असतात. साम्भाळा.

'बहुगुणी' यांच्या परिवाराला मी ओळखतो, आपणा सर्वांच्या संवेदनेबद्दल आभार. या कुटुंबात वडिलांना 'अण्णा' म्हणत, 'बहुगुणी' यांच्या धाकट्या भावाने व्यक्त केलेल्या त्याच्या भावना इथे पोहोचवतोय:

*******************

'तुमच्या सर्व गोळ्या घेतल्यात का, अण्णा?'
हे विचारलं मी अण्णा

'इतक्या गोळ्या उष्ण पडतात का?'
हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा

'इतक्या गोळ्या घेताहात, काही खाल्लंत का?'
हे विचारलं मी अण्णा

'घेतला तो नाश्ता पुरेसा होता का?'
हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा

'तुमच्या नियमाप्रमाणे चालून आलात का?'
हे विचारलं मी अण्णा

'चालून पाय दुखले असतील, दाबून देऊ का?'
हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा

'सारखी सारखी स्कुटी का चालवता?'
हे विचारलं मी अण्णा

स्कुटीमुळेच माझं औषध वेळेवर मिळालं
हे सांगायचं विसरूनच गेलो, अण्णा

'सारखे सारखे फोटो काय काढता अण्णा?'
हे विचारलं मी अण्णा

आनंदी जगण्यासाठी हे गरजेचं असतं का?
हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा

'एवढी काळजी करतोस, सारखा मागे-मागे असतोस,
तुला हुलकावणी देऊन, गुपचूप निघून जाईन' म्हणायचात

'तुझी फार तडफड होईल का रे पोरा?'
हे विचारायचं विसरूनच गेले, अण्णा

शहराजाद's picture

25 Sep 2011 - 10:17 pm | शहराजाद

नि:शब्द करणारे लेखन

श्यामल's picture

26 Sep 2011 - 11:02 am | श्यामल

हृदयस्पर्शी लेख !