जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
29 May 2008 - 10:09 pm

आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्‍या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्‍या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली.

२९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे. काहींना निसर्गापुढे नमते घेऊन हातातोंडाशी आलेली मोहीम अर्धवट सोडून परतीच रस्ता पकडावा लागला आहे. पण एवरेस्टने घातलेली भुरळ काही कमी होत नाही. दरवर्षी नव्या जोमाने गिर्यारोहकांचे तांडे चढाई करुन जातात आणि हे आव्हान आपल्या छातीवर घेतात.

गिर्यारोहण तंत्रात जसजशी प्रगती होत गेली, नवनवीन साधनांनी चढाई सुकर होत गेली तसतशी यशस्वी गिर्यारोहकांची संख्या वाढू लागली. आव्हान सोपे वाटू लागले त्यामुळेच की काय अजूनही त्या पहिल्या चढाईचे महत्त्व कायम आहे. नेपाळने हिलरीला एवढे वेड लावले की त्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा भाग हा त्या भागाची प्रगती करण्यात सर्वस्वी खर्ची घातला. 'हिमालयन ट्रस्ट' स्थापून हॉस्पिटल्स, शाळा ह्यांची उभारणी करणे असे उपक्रम त्याने आयुष्यभर राबवले. ११ जानेवारी २००८ रोजी अखेरचा श्वास घेईपर्यंत एवरेस्ट हे त्याचे वेड कायम होते!

शेर्पा तेनझिंग हा तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद आहेत (सर्व थोरांना कोणत्या ना कोणत्या वादात अडकवणे हे कार्य उरलेले सगळे निर्विवादपणे पार पाडतात हेच खरे! ;) ). पण हा भला माणूस होता ह्यात वाद नसावा! तो आणि हिलरी ह्यात 'आधी' शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत. शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!"
एवरेस्टवर उभा असलेल्या तेनझिंगचा फोटो सगळ्यांनी पाहिला पण हिलरीचा फोटो नव्हता त्याबद्दल त्याला छेडले असता तो मिश्किलपणे म्हणाला "त्याला कॅमेरा कसा चालवायचा ह्याची माहीती नव्हती आणि एवरेस्टवरच्या मरणाच्या गारठ्यातल्या ठिकाणापेक्षा कितीतरी चांगली ठिकाणे आहेत जिथे मी त्याला हे शिक्षण देऊ शकेन!" :)
तेनझिंग हा दार्जीलिंगमधल्या 'हिमालयन माऊंटेनिअरिंग इंस्टिट्यूट्चा' डायरेक्टर होता. १९७८ मधे 'तेनझिंग नोर्गे ऍडवेंचर्स' ही गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी कंपनीही त्याने स्थापन केली. १९५९ रोजी पद्मभूषण देऊन आणि १९७८ साली 'तेनझिंग नोर्गे सन्मान पदक' निर्मून भारताने त्याचा गौरव केला.
तो एकदा म्हणाला होता की "कारकीर्दीला ओझीवाहू हमालापासून सुरुवात करुन ते अनेक पदके लटकवलेला कोट घालून विमानातून ठिकठिकाणचा प्रवास करणारा आणि शेवटी उत्पनावर प्राप्तीकर भरण्याची चिंता करणारा मी पहिलाच शेर्पा असेन! :)

तर अशा एवरेस्टवर ऑक्सिजनची नळकांडी न घेता प्रथम चढाईचा मान मिळवला तो इटालियन गिर्यारोहक रेनहोल्ड मेसनर आणि ऑस्ट्रियन पीटर हेबलर यांनी १९७८ मधे. त्यानंतर पुन्हा १९८० मधे मेसनरने एकट्याने कोणाच्याही मदतीशिवाय एवरेस्ट सर केले! शेवटचे तीन दिवस त्याने एकट्याने बेसकँपपासूनची २००० मीटरची चढाई केली!

एवरेस्टवर पाऊल ठेवण्याची स्पर्धा ही गळेकापू ठरेल की काय अशी शक्यता गेल्या काही वर्षात सर्वांनाच भेडसावू लागली. ह्याला कारण झाले ते ब्रिटिश गिर्यारोहक डेविड शार्प ह्याचा २००६ मधे झालेला मृत्यू. एवरेस्ट्माथ्यापासून अवघ्या ४५० मीटर (अर्थात हे 'अवघे' ४५०मी. सरळ रस्त्यावर असतात तिथे ८००० मी. वर 'अवघे ब्रम्हांड' आठवत असणार. मी स्वतः १९४५० फुटाचा हनुमान तिब्बाचा ट्रेक केलाय त्यामुळे 'वाट लागणे' म्हणजे काय असते ह्याचा साक्षात अनुभव आहे!) अंतरावर एका कपारीखाली अडकून त्याचा मृत्यू झाला. त्यातली सर्वात विदारक गोष्ट अशी होती की त्याला तिथे पाहून जाणारे ४० गिर्यारोहक होते पण त्याला एकदोघांशिवाय मदत करण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही! :( एवढ्या उंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमधे स्वतःचेच शरीर स्वतःला ओझे वाटत असताना दुसर्‍याकोणाला तेही अशा अडचणीतल्या जागी सापडलेल्या अर्धवट शुद्धीतल्या गिर्यारोहकाला कोण मदत करणार असे प्रश्नांचे वाद्ळ उठले. एडमंड हिलरी स्वतः ह्या प्रकारावर फार नाराज आणि दु:खी झाले. ते म्हणाले "आजकाल माणुसकीपेक्षा एवरेस्टवर पाय रोवण्याची वेडी खुमखुमी लोकांना जास्त महत्त्वाची वाटते". त्यांचे म्हणणे काही अंशी खरे आहेही. माणुसकीला लाजवणारे असे 'पराक्रम' पाहून साक्षात एवरेस्टचीही मान खाली झाली!

असा हा चित्तथरारक पर्वत येणार्‍या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेत राहील, तिथे माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना घडणार नाहीत ही आपणामधल्या गिर्यारोहकांची जबाबदारी आहे असे मला वाटते. तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

चतुरंग

प्रवासभूगोलमाहिती

प्रतिक्रिया

वरदा's picture

29 May 2008 - 10:17 pm | वरदा

मस्त माहिती..
माझ्याकडूनही तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2008 - 11:39 pm | प्रभाकर पेठकर

माहितीपूर्ण आहे लेख. अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 12:10 am | विसोबा खेचर

सुंदर लेख रे रंगा!

तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

हेच म्हणतो...!

आपला,
(गिर्यारोहक) तात्या.

मन's picture

30 May 2008 - 12:28 am | मन

असेच म्हणतो.

आपलाच,
मनोबा

मदनबाण's picture

30 May 2008 - 10:06 am | मदनबाण

हेच म्हणतो.....

(हिमालय जवळुन पाहण्याची ईच्छा)ठेवुन असलेला.....
मदनबाण.....

भाग्यश्री's picture

30 May 2008 - 1:49 am | भाग्यश्री

छान लिहीलेय.. मधे एकदा हिलरीचे आत्मचरीत्र वाचले होते तेव्हा त्या चढाईबद्दल, नंतरच्या वादाबद्दल खूप छान लिहीले आहे हिलरीने.. माणूस म्हणून पण चांगला होता.. हिमालयात शेर्पांच्या मुलांसाठी त्याने शाळा देखील काढली नंतर.. पुस्तकात अजुन बरेच होते, पण एव्हरेस्टची चढाई हा कळस आहे त्या पुस्तकातला.. मी मराठी अनुवाद वाचला होता, नाव अजिबातच आठवत नाहीय आता.. पण मिळालं तर जरूर वाचावे असे पुस्तक आहे..

http://bhagyashreee.blogspot.com/

सुमीत's picture

30 May 2008 - 10:44 am | सुमीत

माहिती आवडली,
शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!"
मोठ्या माणसांची हिच ओळख असते.
डेविड शार्प ची नेमकी माहिती नव्हती पण वाचून दु:ख झाले.
सामान्य आयुष्यातली लोकल ट्रेन पकडताना एखादा माणूस फलाटा वर पडतो आणि लोक त्याला चिरडून लोकल मध्ये चढतात, तसेच त्या दिवशी इतर गिर्यारोहक वागले आणि लेखक लिहितो त्या प्रमाणेच त्या एव्हरेस्ट ची मान लाजेने खाली गेली असेल.

ध्रुव's picture

30 May 2008 - 10:52 am | ध्रुव

माहितीपूर्ण व छान लेख.
एवरेस्ट म्हणले की छातीत गोळा येतो. त्या दोन लोकांना व त्यांच्या त्या अविस्मरणीय चढाईला माझा प्रणाम.
--
ध्रुव

आनंदयात्री's picture

30 May 2008 - 4:45 pm | आनंदयात्री

लेख चतुरंग .. तुमचे लेख नेहमीच माहितीपुर्ण असतात. धन्यवाद.

शितल's picture

30 May 2008 - 6:39 pm | शितल

तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!
मस्त माहितीवर्धक लेख.