वाराणसीला जायच बरेच दिवसा पासुन मनात होते. एकदा गंगास्नान करुन सर्व पापांपासुन मुक्ती मिळाली की झाल. असो गंगास्नान तर झालच पण काशीला फिरण, जुनी जुनी मंदिर पाहण, जुनी पुस्तक पाहण, तत्वज्ञान-धर्म ह्यातील कुणा ताकदीच्या इसमाला भेटण असे बरेच उद्देश होते. पण काही कारणान पुढ पुढ जात राहिल. आणि गेलो तर किमान आठ दिवस तरी राहायच ठरवल होत. ट्रॅव्हल कंपन्यांसारख २ दिवसात स्पॉट उरकण्याच्या वृत्तीचा मला प्रचंड तिटकारा आहे. तुम्हाला त्या शहराच फिल ह्यायला हवा. जो बर्यापैकी दिवस तेथे राहिलात तरच येतो. भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते. नातेवाईकांना व मित्रांना इम्प्रेस करण्याकरिताच जणू ते प्रवास करत असतात. त्यांना आपण विदेशात जाउन आलो ह्याची प्रौढी मिरवायची असते. ह्याउलट परदेशी प्रवासी जे एकेकटे फिरतात, जिथे आवडेल तिथे मनसोक्त राहतात. ह्यासाठी पुरेसा वेळ काढणे व मूळ भटकण्याची , वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्याची आवड जोपासणे गरजेचे आहे.सगळ्यात चिड येते ते कळपाने फिरणार्या कुटुंबियांची (ग्रुप ट्रॅव्हेलिंग) असो. तर ठरवल साधारण दोन महिने अगोदर की आता जायच वाराणसीच्या यात्रेला.तिकीटांची , राहायची सोय इ. ची पूर्वतयारी झाली . मुक्तपणे फिरायला दोन दोन व आता तीन तीन ही महिने आधी काढावी लागणारी रेल्वे तिकीटे हा एक मोठा अडथळा आहे. उगाचच अतिरिक्त प्लॅनिंग कराव लागत. तात्काळ तिकीटे वगैरे सगळी बोगसगिरी आहे. तर बरेच प्लॅनिंग करुन जून मधल्या एका ढगाळ सकाळी मी वाराणसी रेल्वे स्थानकावर उतरलो. उष्ण वार्याचा झोत उतरल्या उतरल्या जाणवला. ह्यासाठीच मी मुद्दामुन लेट जूनमध्ये जायच ठरवल होत. उत्तर भारतातला उन्हाळा चांगलीच परीक्षा बघतो. तिथे असच आपल्या सारख ऊन अंगावर खात फिरता येत नाही. कमी आर्द्रतेमुळे , पडणार ऊन जास्त तीव्र असत त्यामुळे सन स्ट्रोकची शिकार बरेच जण होतात. दिल्लीतील प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने वाराणसीला उन्हात शिजायचे नव्हते , त्यामुळे लेट जून बरा काळ होता. पहिला पाऊस येऊन गेल्याने गारवा निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तेवढा गारवा नव्हता पणा ऊनही नव्हत. उतरल्या उतरल्या जेथे राहायची सोय केली होती त्यांना फोन लावला . काशी महाराष्ट्र भवनचे देव गुरुजी. त्यांनी कस व कुठे ह्यायच सांगितल . स्टेशन वर नेहमीच्या युपी भैय्यांचा ससेमिरा चुकवत बाहेर आलो. इथे सायकल रिक्षा मोठ्याप्रमाणात आहेत. मला पूर्वी त्यांच्यात बसणे मानवते विरुद्द वगैरे वाटायचे. पण मी तिच करायची ठरवल. त्यातुन शहराच दर्शन चांगल होत व फसवले जाण्याची ही शक्यता कमी. त्याप्रमाणेच घडल. विशेष ताप न देता, त्याने मला भैरोबा मंदिरा पाशी आणून सोडल. ह्या भागात आल्या आल्या लक्षात येत होत की हा काशीचा जुना भाग आहे.
मी गुरुजीनी पाठवलेल्या माणसाची वाट पाहात मंदिरापुढील चौकात उभा राहिलो इकडे तिकडे पाहात. अनेक पानांचे ठेले दिसत होते, चहाची ही अनेक दुकाने चालू होती. इथे गॅस वर कोणी चहा करत नाही. तर चूली वर करतात. दाट दुधाचा चूलीवर केलेला वाफाळता व कुल्हड मधून दिलेला चहा हे इथले चहाचे वैशिष्ट्य ! मला पुण्यातल्या अमृततुल्य चहाची आठवण झाली. व गुळम्ट पाणी ओतुन केलेल्या चहाला अमृततुल्य म्हणणार्या पुणेकरांची कीव आली. चहाचा एक सीप घेऊन मी पुढे एका ठिकाणी बरीच गर्दी दिसत होती तिचे निरीक्षण करु लागलो. जो माणूस मला घेउन जायला येणार होता तो तरी अजून आला नव्हता. म्हंटल बघाव जाऊन काय ते. म्हणून पुढे जाऊन पाहिल आणि अक्षरशः चाट पडलो. सरकारमान्य भांगेचे दुकान असा बोर्ड असलेली एक टपरी होती. एका छोट्या बोर्ड वर गोळी, पाने, पुडी असे वेगवेगळे दर ही लिहीलेले होते. बरेच उत्साही लोक तिथे खरेदी करीत होते. गांजा भारतात सरकारमान्य केव्हा पासुन झाला ह्याचा विचार करीत होतो तेवढ्यात गुरुजीनी पाठवल्या माणसाने मला हाक मारली. म्हंटल आधी रुम वर जाऊ. काशीतल्या पहिल्याच दिवशी गांजा घेऊन आउट होणे शहाणपणाचे होणार नाही हास्य जरी सरकारमान्य असला तरी!
त्या माणसा पाठोपाठ मी काशीच्या गल्ल्यातुन चालू लागलो. ह्याच त्या जगप्रसिध्द अरुंद गल्ल्या . गल्ल्या एवढ्या अरुंद व असंख्य फाटे फुटलेल्या आहेत, की पुढील आठ दिवसात मी कधी येथे वाट चुकलो नाही असे झाले नाही. अरुंद गल्ल्यातुनच समोरुन गाई येत जात असतात. त्यांना वाट देत आपल्याला जावे लागते. गाई बरोबर आता बाईक वाले ही त्याच अरुंद जागेतुन आता येतात. एकदम चिकटुन असलेले वाडे व असे अरुंद गल्ली बोळ हे अशा प्राचीन शहरांचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः मुघल आक्रमणा नंतर ही जी शहरे टिकुन राहिली अशा शहरांचे प्राचीन भाग सारखेच आहेत. लखनौ बघा. जुनी दिल्ली बघा. अगदी जुन्या पुण्याचे वर्णन ही असेच आहे. सततच्या आक्रमणाच्या भीतीने व लपायला सोईस्कर व्हावे म्हणून अशी शहरे वसवली जात असावीत. कारण भारतीय शिल्पशास्त्रानुसार वाडे , रस्ते प्रशस्त असले पाहिजेत. असली बोळकांडे एक भयगंड दाखवतात आक्रमकांबद्द्लचा. असो
तर अनेक बोळातुन व चौकातुन फिरत आम्ही गुरुजींच्या वाड्यापाशी पोचलो. वाड्या बाहेर लिहीले होते काशी महाराष्ट्र भवन. गुरुजींनी अस्खलित मराठीत माझे स्वागत केले.
काशीच्या ह्या भागाला प्राचीन खंड म्हणतात. इथे चारशे मराठी लोकांची घरे आहेत. जे पेशव्यांबरोबर व नंतर इथे आले. काशीची मोगलांनी इतक्यांदा नासधूस केली की आता अस्तित्वात असलेली काशी फक्त पेशवे व अहिल्याबाई होळकर ह्यांनी पुन्हा उभारलेली आहे. पेशव्यांनी अनेक वाडे बांधले. जुन्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला. गंगेवरील सर्व ८० घाट हे अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा उभारलेले आहेत. काशी विश्वेश्वराचे देवालय ही त्यांनीच संपूर्ण नव्याने उभारले. त्यामुळे ह्या प्राचीन खंड भागात घरघुती मराठी वाटत होते. जवळच एका वाड्यात एक गणेश मंडळ होते. ' टिळकांनी इथे १८९४ मध्ये पुण्याबरोबरच गणेशोत्सव सुरु केला जो आजतागायत सुरु आहे'. गुरुजी माहिती सांगत होते. ह्याला म्हणतात जुन्या शहराचा फील. जो एका मॉडर्न लॉज वर राहुन व टूर कंपनी बरोबर फिरुन कधीच मिळाला नसता.
आता सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे गंगादर्शन व स्नान !. मी आवश्यक कपडे ,पळी भांडे इत्यादी घेऊन गंगेवर निघालो. तिथुन दुर्गा घाट जवळच आहे अस मला गुरुजीनी सांगितल. तरी वाटेत एकाला विचाराव लागलच . इथे कोणी गंगेला नदी असा उल्लेख करीत नाही. गंगाजी असा आदरानेच उल्लेख केला जातो. अखेर मी दुर्गा घाटावर पोचलो. पाऊस पडल्याने व वरुन पाणी सोडल्याने , गंगा बरीच वर आली होती. अथांग पात्र समोर दिसत होत. मला माहिती आहे, आजचा ९० समाज वर्ग गंगेतल्या किंवा अशा कुठल्या ही तीर्थक्षेत्रातल्या स्नानाची टिंगलटवाळी करणे पसंद करतो. मग काशी असो वा नाशिक. ह्यांचा एकच प्रश्न प्रदुषित पाण्याने , अस्वच्छ पाण्यात आंघोळ केल्याने शुध्दता कशी होणार ?? आता ह्या बैलांना हे कसे समजणार शुध्दी स्थूल देहाची करायची नसुन ज्या सूक्ष्म देहाला अनंत जन्मांची कर्मे व पापे चिकटली आहेत त्यांची करायची आहे. स्थूल शरीर स्वच्छ करायला उत्तम बॉडी वॉश लावुन शॉवर खाली उभारले की पुरे. गंगेवर कशाला जायच ? . जे शरीरापलीकडे पाहु शकत नाहीत त्यांना घाण शरीर व घाण पाणी हेच दिसणार. ज्यांचा पवित्र प्रवाहावर विश्वास आहे तेच अशा ठिकाणांच्या स्नानाने पवित्र होण्याची थोडी आशा राहते. मी ह्यावर विश्वास ठेवतो व हा विश्वास असाच कायम राहावा अशी अपेक्षा करतो. परलोकात तारणारी श्रध्दाच असते, तर्क करणारी बुध्दी नव्हे. ह्या श्रध्देनेच मी गंगेच्या पवित्र पाण्यात तिसरी बुडी मारली. व त्या रोखलेल्या क्षणभरच्या श्वासाने मला अनंत जन्माचे पुण्य परत मिळवुन दिले.
क्रमशः
दुर्गा घाट
पवित्र नदी व पवित्र ब्राह्म मुहुर्त
नानांचा वाडा
ह्याच त्या प्रसिध्द अरुंद गल्ल्या
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 8:24 pm | सूर्यपुत्र
जर शुद्धी सूक्ष्म देहाची करायची असेल, तर स्थूल शरीराने डुबी का घ्यावी?
जर श्रद्धा तारक असेल, तर बाह्य उपचारांची आवश्यकता का असते? जसे एखाद्या ठिकाणी स्नान करणे, किंवा अमुक ठिकाणचे तीर्थप्राशन करणे......
-सूर्यपुत्र.
30 Jul 2011 - 12:51 pm | रणजित चितळे
आपले म्हणणे बरोबर आहे सूर्यपुत्र साहेब आणि ईशने लिहिलेले पण पटण्यासारखे आहे. काही विचार देत आहे.
श्रद्धा हा इंग्लिश belief, conviction ह्या पेक्षा वरची दर्जा असलेला शब्द आहे. जेव्हा लहान मुलांना इंग्लिश ABCD शिकवायला सुरवात होते किंवा 2+2 म्हणजे 4 असे पहिल्यांदा सांगितले जाते तेव्हा तर्क नसतो त्याच्या कडे गुरु वर त्याची श्रद्धा असते म्हणून ते मुल मानते व गिरवायला लागते. काही वर्षांनी त्याची विचारकरण्याची शक्ति वाढली की त्याचा अर्थ समजतो मग आता त्याला पटते म्हणून तो गिरवायला लागतो. पहिल्यांदा श्रद्धा येते (लहान वयात) मग तर्क. आता मोठे झाल्यावर तर्क पहिल्यांदा येतो. पण तर्क करण्याची क्षमता माणसाच्या consciousness level वर अवलंबून असते. प्रत्येक मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. जेव्हा एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करून तो दुसऱ्या अजून उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो, तेव्हाच तो आधीची कक्षा ओलांडू शकतो. प्रत्येक चढत्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला बऱ्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या.
मनुष्याच्या प्रकृतिच्या मानाने पटेल, झेपेल व कुवती प्रमाणे आत्म्याची शुद्धी, चित्त शुद्धी व चेतनेच्या प्रगल्भतेच्या श्रेणी वाढवता येतात. गीतेत भक्तीयोग (श्रद्धा मार्ग), सांख्ययोग (बुद्धी मार्ग) व कर्मयोग (लोकार्थ सेवा करुन) चेतनेची प्रगल्भता वाढवता येते असे म्हणूनच प्रतिपादीले आहे.
28 Jul 2011 - 8:52 pm | अन्या दातार
अध्यात्मात शिरत नाही. ती कुवत नाहीये माझी.
बाकी लेख छान जमलाय. अगदी सुरेख वर्णन. अनेक वर्षांपासून जायची इच्छा आज पुन्हा प्रकर्षाने उफाळून आली.
28 Jul 2011 - 8:57 pm | शुचि
लेख मस्त आहे. पहील्या भागातच जाणवले की आपली मते ठाम आहेत. You are opinionated. त्याचे कौतुक करणार तोच पुणेकरांची कीव वगैरे वाचले आणि कपाळावर आठी चढली.
असो.
पुणेकर म्हटलं की अनेकांना कीव, जळजळ, राग, द्वेष सर्व काही एकदमच होऊ लागतं. सिर्फ नामही काफी है! त्यातून तुम्ही तरी का सुटावं? तशी अपेक्षा ही नाही.
परत एकदा लेख मस्त झाला आहे.
28 Jul 2011 - 9:01 pm | योगप्रभू
ईश आपटे,
शीर्षक वाचून उत्सुकतेने वाचायला सुरवात केली. एक लय साधत असतानाच तुम्ही कारण नसताना ब्रेक दाबायला सुरवात केलीय. म्हणजे भात चांगला आहे, अशी प्रशंसा करतानाच नेमके दाताखाली खडे आले.
किती ह्र्दयस्पर्शी लिहिता हो तुम्ही. विषयाशी अगदी सुसंगत.
<<मला पुण्यातल्या अमृततुल्य चहाची आठवण झाली. व गुळम्ट पाणी ओतुन केलेल्या चहाला अमृततुल्य म्हणणार्या पुणेकरांची कीव आली.>>
खरंय तुमचं. पण अशी कीव करुनही जग आपल्यासारख्या लोकांच्या भावनांना 'योग्य ठिकाणी' मारते, याचेच जास्त दु:ख होते हो. आता हेच बघा ना, आपल्या मराठी माणसाच्या खेकडा वृत्तीची मलाही फार कीव येते. पण विचारतंय का कुणी मला? किती तरी वेळा मन चडफडते, की महाराष्ट्राची ही भूमी एकच असताना शहरांचे कप्पे पाडून आम्ही कशासाठी दुसर्यांवर थुंकतो? याचे उत्तर मिळत नाही. असो. आषाढस्य अंतिम दिवसे कदाचित मन शांत होईल, असे वाटते.
<<मला माहिती आहे, आजचा ९० समाज वर्ग गंगेतल्या किंवा अशा कुठल्या ही तीर्थक्षेत्रातल्या स्नानाची टिंगलटवाळी करणे पसंद करतो. मग काशी असो वा नाशिक. ह्यांचा एकच प्रश्न प्रदुषित पाण्याने , अस्वच्छ पाण्यात आंघोळ केल्याने शुध्दता कशी होणार ?? आता ह्या बैलांना हे कसे समजणार शुध्दी स्थूल देहाची करायची नसुन ज्या सूक्ष्म देहाला अनंत जन्मांची कर्मे व पापे चिकटली आहेत त्यांची करायची आहे. स्थूल शरीर स्वच्छ करायला उत्तम बॉडी वॉश लावुन शॉवर खाली उभारले की पुरे. गंगेवर कशाला जायच ? . जे शरीरापलीकडे पाहु शकत नाहीत त्यांना घाण शरीर व घाण पाणी हेच दिसणार. ज्यांचा पवित्र प्रवाहावर विश्वास आहे तेच अशा ठिकाणांच्या स्नानाने पवित्र होण्याची थोडी आशा राहते. मी ह्यावर विश्वास ठेवतो व हा विश्वास असाच कायम राहावा अशी अपेक्षा >>
..गुरुजी तुम्ही चुकून प्रातःसंध्या करण्याऐवजी सायंसंध्या तर नाहीत ना केली? गंगेच्या पवित्र पाण्यात उतरताना तुम्हाला गोमाता न आठवता बैल कसे आठवले? अरे हो. बरं आठवलं. मणिकर्णिका घाटाला भेट दिलीत का? अजुनही तिथे अर्धवट जळालेले मुडदे गंगेत टाकतात का हो? ३५ वर्षांपूर्वी असाच गंगेत नदीत फेकलेला, वांग्यासारखा अर्धवट भाजलेला कुणा अभाग्याचा मुडदा आमच्या होडीला येऊन धडकला. पाण्यात हात फिरवत बसलेल्या मला ते बघून खळाळून उलटी झाली.
असो. मी आवरते घेतो. पण हात जोडून विनंती करतो. लेखन उत्सुकता वाढवतंय, पण आपणहून त्याचे सौन्दर्य कमी करु नका. मतांच्या अस्थानी पिंका टाकू नका.
पुढील वर्णनाच्या प्रतिक्षेत.
फोटो चांगले आहेत. गंगेचा लाँग शॉट टाका.
28 Jul 2011 - 10:01 pm | अन्या दातार
>>मतांच्या अस्थानी पिंका टाकू नका.
भारीच हो योगप्रभू!
28 Jul 2011 - 10:18 pm | श्रावण मोडक
;)
29 Jul 2011 - 11:03 am | रणजित चितळे
गंगेचे पाणी इतके दुषित झाले आहे आता की म्हणतात ना मरताना गंगेचे पाणी द्यावे - मरतानाच दिले पाहिजे नाहीतर पहिल्यांदा प्याले तर त्या मुळे मरण यायचे.
29 Jul 2011 - 12:47 am | बिपिन कार्यकर्ते
पुढील लेख वाचायची आणि फोटो पहायची इच्छा आहे, त्यामुळे ते नक्की करावे ही नम्र विनंती.
बाकी, तुमचे इह आणि पर दोन्ही गंडले आहे असे वाटते. असो. तुमचे तुम्हास आमचे आम्हास. काय? :)
योगप्रभू आणि सूर्यपुत्र यांनी लिहिले आहेच सविस्तर.
पुलेशु.
29 Jul 2011 - 12:53 am | इंटरनेटस्नेही
.
29 Jul 2011 - 12:57 am | चतुरंग
आवडली! :)
-रंगा काशीकर
29 Jul 2011 - 1:02 am | बिपिन कार्यकर्ते
=))
घातलीच काशी तुम्ही!
29 Jul 2011 - 11:09 am | श्रावण मोडक
हल्ली विडंबनं झालेली नाहीत. त्याचा हा परिणाम आहे, संपादक. समजून घ्या. ;)
29 Jul 2011 - 11:23 am | विनायक प्रभू
मा.रा.श्री. श्री रंगा काशीकर आणि रा.रा.श्री. बिपिन रावांना त्यांच्या काशी झालेल्या आट्वनी वर लिखाण करावे अशी विनंती.
29 Jul 2011 - 11:57 am | श्रावण मोडक
+१
29 Jul 2011 - 2:39 pm | नावातकायआहे
आणि कढवली पण.
29 Jul 2011 - 1:30 am | शिल्पा ब
वर्णन छान आहे. पुढील भाग वाचायची इच्छा आहे. फोटोही छान आहेत, पुढील भागातही फोटो असतील तर छानच.
बाकी योगप्रभु अन सुर्यपुत्र यांनी लिहीलेलंच आहे.
29 Jul 2011 - 2:16 am | प्राजु
लेखन आणि वर्णन चांगले आहे.
फोटो असतील अजूनी तर नक्की पहायला आवडतील.
29 Jul 2011 - 8:50 am | रणजित चितळे
आपले विचार, आपले विचार मांडण्याची धाटणी मला नेहमीच आवडते. आपल्या लेखणीतून आपण आपल्या मताशी सिंसीअर आहात असे वाटत राहते. मला आवडतात आपले लेख.
हा लेख आवडला.
29 Jul 2011 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. ईश तुम्ही तुमच्या लेखात नेहमीच वेगवेगळ्या पिंका टाकत असता. त्या तुमच्या विचारांशी सुसंसग असतात. परत तुम्ही स्वतः लेख लिहून पिंका टाकत असल्याने तुमचे लेख वाचण्या न वाचण्याचा हक्क आमच्याकडे अबाधित असतो. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते.
अवांतर तुमचा लेख आणि विचार दोन्ही काही प्रमाणात पटणारे आहेत हे मान्य करीत आहोत.
29 Jul 2011 - 10:26 am | मृत्युन्जय
राम तेरी गंगा मैली हो गयी...............
जाउ देत. बाकी काय बोलणार? शरीराच्या आतले मन शरीर धुतल्याने पवित्र कसे होणार ते अजुन न कळल्यामुळे बाकी काही बोलत नाही?
आणि अमृततुल्यचा उल्लेख आल्यामुळे धागा जोरदार होणार या संशय नाही. शुभेच्छा.
बाकी योघप्रभूंशी सहमत.
29 Jul 2011 - 12:17 pm | ५० फक्त
''शरीराच्या आतले मन शरीर धुतल्याने पवित्र कसे होणार ते अजुन न कळल्यामुळे बाकी काही बोलत नाह''''
मन शरीराच्या आत असते हे कसे काय बुवा ? किंवा कुठे असते हे कसं काय ठरवणार ? वेगळा धागा काढायचा का उगाच काशीचं काश्मीर नको, आधीच चिंचोळ्या गल्ल्या, त्यात गाई म्हशी, आडव्या तिडव्या अंगावर येणा-या बाईका त्यात कुठं चर्चा करणार.
29 Jul 2011 - 3:39 pm | मृत्युन्जय
ते जर शरीराच्या बाहेर नाही तर ते आतच असणार ना. हा अर्थात ते नाहीच असे जर तुमचे म्हणणे असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. इन द्याट केस रीड इट अॅज "हृदय"
29 Jul 2011 - 10:49 am | मुलूखावेगळी
छान लेख
वाराणसी बद्दल खुप उत्सुकता आहे. तुमच्या लेखामुळे तिथे जान्याची इच्छा अजुन तीव्र होतेय.
पुण्यातल्या अहिल्यादेवी शाळेजवळचा अमृततुल्य चहा पिला दिसत नसल्याने तुम्ही बोल्लात असे समजते
29 Jul 2011 - 11:15 am | निनाद
काशीची स्मरणयात्रा आवडली आहे! फोटो देण्यात कंजूसी का?
त्यातूनच काशीविश्वेश्वराच्या दर्शनाचा लाभ होईल अशी आशा
काशीचा इतिहासही आला तर वाचायला फार आवडेल.
29 Jul 2011 - 3:05 pm | कवितानागेश
फोटो टाकण्यात कंजूसी नको.
अजून चिक्कार फोटो टाका.
छान वाटते जुनी शहरे, जुन्या वास्तू पहायला......
29 Jul 2011 - 4:53 pm | पल्लवी
ब्राह्ममुहुर्तवाला फोटो आवडला.
"भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते"" वगैरे जनरलाईस्ड ( मराठी शब्द ? ) वाक्ये खटकली.
बाकी, एखाद्या गोष्टीला चांगले म्हणताना दुसर्या गोष्टींना वाईट म्हटलेच पाहीजे हा अट्टाहास का ते कळाले नाही.
काशीचे (तुलना-विरहीत) वर्णन वाचण्यास उत्सुक. :)
29 Jul 2011 - 5:14 pm | स्वानन्द
दुसरा फोटो मस्तच!!
29 Jul 2011 - 7:11 pm | प्रियाली
काशीपुराण त्यातले वादग्रस्त परिच्छेद सोडल्यास चांगले आहे.
तेव्हा मिपाची "काशी" न करता चालू द्या!
29 Jul 2011 - 7:29 pm | स्वाती दिनेश
काशीपुराण त्यातले वादग्रस्त परिच्छेद सोडल्यास चांगले आहे.
प्रियालीसारखेच म्हणायचे आहे,
स्वाती
29 Jul 2011 - 9:00 pm | रेवती
आत्ता कुठं पापं धुतली गेली होती तर पुन्हा जमवाजमवीला सुरुवात केलीत बघा!;)
लेख आवडला म्हण्णार होते तेवढ्यात पिंक रंग दिसला आणि गप्प बसले.