मुलगी स्कूलमध्ये जाणार म्हणून आम्ही शालापूर्व शॉपींग करायला गेलो होतो. युनिफॉर्म, सैक वगैरे खरेदी केल्यावर वॉटर बॉटलचं नाव निघालं.
आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.'
त्यानं हसून एकदम ठेवणीतली वॉटरबॉटल काढली. म्हणाला- 'बेस्ट अॅटम आहे हा. अशी बॉटल हिच्या वर्गातल्या कुणाकडेच नसेल बघा. चांगली दोन तीन वर्ष जाईल. अहो स्टेफी ग्राफ वापरायची असल्या बॉटल्स. त्याच कंपनीची आहे ही, आणि विशेष म्हणजे गरम पाणी आठ तासापर्यँत गरमच राहतं, थंडपाणी थंडच राहतं. एकदम भारी काम आहे.'
'बघू बघू' सौ.ला चैन पडलीच नाही. मलाही उत्सुकता लागली.
आम्ही खालीवर करुन त्या बॉटलचं परिक्षण केलं. लालभडक मेटैलिक कलरचा तो छोटासा थर्मास फ्लास्कच होता! फक्त त्यात थोडं मॉडीफिकेशन करुन वरच्या टोपणाला सिपरचा आकार दिलेला होता. आम्हां सर्वांना ती बॉटल खूप आवडली. सर्वानुमते घ्यायचीच असे ठरले.
'किती किंमत हीची?'
'अं अं पाचशे रुपये फक्त.' बॉटलच्या तळाला लावलेलं किंमतीचं स्टिकर वाचून त्यानं अगदी सहज उत्तर दिलं तसे आम्ही उडालोच! इतकी महागडी वस्तू तेही फक्त पाणी पिण्यासाठी? असा व्यवहारिक विचार करीत तिची किंमत ऐकून हबकलेला मी शांत बसणेच पसंत करीत बाजूला झालो.
'अहो एक नाही दोन घ्यायच्यात, आमच्या मुलालापण एक घ्यायचीय. किंमत जरा कमी करा.' सौ. ने घासाघिशीचे तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न केला. पण तो दुकानदार चतुर होता. ह्यांना वस्तू आवडलीय हे त्यानं बरोब्बर हेरलं होतं.
'एक घ्या नाही तर दहा घ्या, फिक्सड् रेट. अशी बॉटल कोणत्याच दुकानात ठेवत नाहीत. आम्ही ठेवतो, तुमच्यासारखे फ्री माइंडेड कस्टमर खरेदी करायला आमच्याकडेच येत असतात.' त्याची मुक्ताफळं ऐकून सौ.नी पटकन बॉटल घेऊन टाकली. पाचशेची नोट देतांना मला कसंसच होत होतं. शे दोनशेचा थर्मासफ्लास्क दुकानदारानं आमच्या गळ्यात मारला होता.
घरी आल्यावर कितीतरी पाहुण्यांना सौ. पाचशेची वॉटर बॉटल कौतुकाने दाखवायची.
मला माझी शाळा आठवली. पिण्याचं पाणी एका काळ्याभोर माठात भरुन ठेवलेलं असायचं. ते काम आम्हांपैकी मोठी दिसणारी, धष्टपुष्ट मुलेच करीत. तेव्हा शाळेला शिपाई असावा लागतो हे माहीतही नव्हते. त्या माठावरील जर्मन धातूच्या ओगराळ्याने प्लॅस्टीकच्या ग्लासात पाणी ओतून प्यायचे अशी पद्धत. कितीतरी मुले सर्रास तोंड लावून पीत. आम्हीही त्याच ग्लासाने प्यायचो. पण त्यामुळे कधी इन्फेक्शन झाल्याचे किंवा आजारी पडल्याचे आठवत नाही.
स्वच्छता पाळावीच, ती चांगली सवय आहे. तिचा असा अतिरेक होता कामा नये. इरीशिरीला पेटून पाचशे रुपये पिण्याच्या बाटलीसाठी देणे मला पटलेच नव्हते. फार फार तर दोनशे ठीक होते. मुळात एक छान दिसणारी शंभराची वॉटरबैग देखील चालली असती.
मग मला प्रश्न पडतो की सगळेच इतक्या महागड्या वस्तूंची खरेदी करीत असतील का? गरजेपुरती माफक दरातील वस्तू चार दुकाने हिंडून घेत असतील का? की अशा हायफाय वस्तू वापरणे हा स्टेटस सिंबॉल झालाय? की हजार रुपयांची स्कूल बैग घ्यायलाच पाहिजे का? इतर पालक हा शालेय खर्च कसा कमी करत असतील? की सर्वच लोक मॉलमधील चकचकाटाला भुलून वाट्टेल त्या किंमतीत हायफाय वाटणारी वस्तू घेत असतील?
प्रतिक्रिया
6 Jun 2011 - 12:51 pm | योगी९००
तुमच्या सर्व प्रश्नांना एकच उत्तर ..
सोशल प्रेशर.. (सोसलं तेवढे प्रेशर नव्हे..)
शेजारचे चार लोक मुलांना क्लास लावतात म्हणून आपण पण लावतो. शेजारची टीना तिच्या बेबीला अवेन्ट कंपनीच्या बाटलीतूनच मिल्क (दुदु नव्हे ..मिल्क म्हणा ) पाजते म्हणून आपणही तेच करतो..
आपण आपल्या मुलांना वाईट वाटू नये किंवा त्यांना त्याच्या मित्रमंडळीत कमीपणा वाटू नये म्हणून अश्या बर्याच काही महाग गोष्टी विकत घेत असतो..म्हणजे आपलीच चुक..
6 Jun 2011 - 2:11 pm | प्यारे१
>>>>आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.'
>>>>बघू बघू' सौ.ला चैन पडलीच नाही. मलाही उत्सुकता लागली.
>>>>त्याची मुक्ताफळं ऐकून सौ.नी पटकन बॉटल घेऊन टाकली. पाचशेची नोट देतांना मला कसंसच होत होतं. शे दोनशेचा थर्मासफ्लास्क दुकानदारानं आमच्या गळ्यात मारला होता.
घरी आल्यावर कितीतरी पाहुण्यांना सौ. पाचशेची वॉटर बॉटल कौतुकाने दाखवायची.
Seems your failure AGAIN Dr Diwate. U need to do something Man....!!!
(This time off BED ;) )
6 Jun 2011 - 3:13 pm | नितिन थत्ते
चारच माणसांना घेऊन जाणारी मोटारगाडी जशी दीड लाखा पासून २ कोटी किंवा कितीही किंमतीची असू शकते;
अंगात घालायचा शर्ट जर ६० रु पासून २५०० रु किंवा कितीही किंमतीचा असू शकतो;
तर पाण्याची बाटली का नाही ?
आणि स्टेफी ग्राफ वापरते तसली गाडी आपण घेऊ का विकत? मग बाटली तरी कशाला घ्यायची ?
पर्सीव्हड व्हॅल्यू बप्पू !!!
7 Jun 2011 - 6:46 am | ५० फक्त
@प्यारे१ - ४ वर्षे थांबा मग बोला.
पोरगं शा़ळेला जायला लागल्यापासुन त्याच्या शाळेसाठीची खरेदी हा एक नवा वादाचा मुद्दा होतो आहे घरात हे अगदी मान्य. पण नको होती ओ डॉ. ही खरेदी करायला.
7 Jun 2011 - 6:46 am | ५० फक्त
@प्यारे१ - ४ वर्षे थांबा मग बोला.
पोरगं शा़ळेला जायला लागल्यापासुन त्याच्या शाळेसाठीची खरेदी हा एक नवा वादाचा मुद्दा होतो आहे घरात हे अगदी मान्य. पण नको होती ओ डॉ. ही खरेदी करायला.