हर्षा!!!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
27 Apr 2011 - 10:14 am

बरी-वाईट कशीही का असेना माझी ही पहिली कथा तात्यांना अर्पण...:)

"हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं.

"सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जातो.

हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. गोरा वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी. घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला जाणारया वाटेवरच तिचं घर. जाता-येता नेहमीच घराबाहेर बसलेली माझ्या दृष्टीस दिसते. माझ्याकडे पाहून ओळखीचं हसते. त्यातूनच मग तिची नं माझी ओळख वाढते.
"घरी आई आणि एक मोठा भाऊ आहे. वडील आमच्या लहानपणीच वारलेत. लोकांच्या घरी धुणी-भांडी करून आईनेच आम्हाला लहानाचं मोठ केलयं." काहीही आडपडदा न ठेवता हर्षा सुरवातीलाच मला सगळं सांगते. आई एकटीच काम करून घर चालवते आणि मोठा भाऊ फ़क़्त उनाडक्या करत हिंडतो. आणि त्याचबरोबर त्याला कसलेसे व्यसनही आहे. तीच्या बोलण्यातून मला हे सगळं कळतं.

पण का कळेना? सुरुवातीला माझ्याशी मनमोकळेपणाने वागणारी हर्षा हल्ली खूप अबोल आणि निराश दिसते. घरातली तणावग्रस्त परिस्थिती कदाचित हे कारण त्यामागे असावं.

"जॉब पहा ना ताई माझ्यासाठी एखादा, नुकतीच बारावीची परीक्षा दिलीयं मी." असेच काही दिवस गेल्यावर हर्षा अनपेक्षितपणे मला बोलते. 'घरातल्या कटकटीपासून थोडा वेळ बाजूला राहता यावं' हा हेतू तीच्या बोलण्यातून मला जाणवतो.

"प्रयत्न करून पाहते मी." असं सांगून मी तिला तेवढ्यापुरता दिलासा देते.

आमच्याच ऑफिसमध्ये मॅनेजरला सांगून माझी मदतनीस म्हणून हर्षाची वर्णी लागते. आयुष्याच्या वाटेला एक वेगळेच वळण मिळाल्याने ती अतिशय हरखून जाते आणि तिच्यात पूर्वीसारखा दिसणारा मोकळेपणा मला पुन्हा दिसू लागतो.
'सोळावं वरीस धोक्याचं गं' म्हणतात ना त्याप्रमाणे ऑफिसातल्याच आनंद या माझ्या सहकारयाबरोबर तिचं सुत जुळतं. सुरुवातीच्या हाय, हॅल्लोच्या मैत्रीनंतर एकमेकांत कधी गुंतत गेले ते त्यांनासुद्धा कळत नाही. दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आनंद हा नावाप्रमाणेच हर्षाच्या जीवनात खूप सारा आनंद घेऊन आलेला असतो.ऑफिस सुटल्यानंतर बाईकवरून फिरायला जाणे हा तर त्यांचा नित्यक्रमच झालेला असतो.

"ताई, आनंदने काल मला बाईक चालवायला शिकवली, खूप मजा आली." हर्षा आनंदित होऊन मला सांगते. मी तिच्याकडे पाहून फ़क़्त हसते. एक वेगळच समाधान मला तीच्या चेहऱ्यावर दिसतं. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी तिने घरातल्यांपासून लपवून ठेवलेल्या असतात.

रिझल्ट असल्या कारणाने आज हर्षा माझ्याबरोबर ऑफिसला येणार नसते. "रिझल्ट लागल्यावर फोन कर गं मला." जाता जाता दरवाज्यातूनच हर्षाला मी सांगितलं.

"हो" गंभीर आवाजात हर्षाकडून प्रतिसाद येतो. तिचा तो नालायक भाऊ तिच्यासमोरच बसलेला असतो. एक प्रकारचा खुनशीपणा मला त्याच्या डोळ्यात दिसतो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"काय?" अक्षरश बसल्या जागेवरच मी मोठ्याने किंचाळतेच. ऑफिस मध्ये जाऊन तास/दीड तास होत नाही तोच हर्षाचा फोन आलेला असतो.

"ता आ आ इ ई, मी वि..ष प्या यलयं" हर्षाचा अडखळता आवाज.... कोणीतरी तप्त लोखंडाचा रस माझ्या कानात ओतावा तसे ते तीन शब्द माझ्या कानात घुसतात. बिचारा आनंद! त्याच्या मनातला गुलमोहर बहरण्याआधीच कोसळू पाहत आहे.... नव्हे कोसळून पडला होता. तडक त्याला घेऊन हॉस्पिटलकडे निघाले. ऑफिस ते हॉस्पिटल प्रवासादरम्यान असंख्य विचारांनी मनात गर्दी केली. 'का केल असेल तिने असं?' हा एकाच प्रश्न मनाला खूप सतावत होता.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच तिचे सगळे शेजारी-पाजारी गोळा झाले होते.

"दोन विषय गेले ना तिचे म्हणून केलं असेल."
"नाही, नाही सकाळी भावाबरोबर झालेलं भांडण याला कारणीभूत असेल."
"विष घेतल्यावर तिने ऑफिसात फोन केला होता म्हणे."
त्या लोकांच्या चर्चेतून हे सगळं ऐकायला मिळत होत. तिचा भाऊ! सकाळच्या खुनशीपणाच्या जागेवर आता अपराधीपणाचे भाव त्याच्या डोळ्यात दाटलेले. भराभर आनंदबरोबर पहिल्या मजल्यावर पोहचले जिथे हर्षाला ठेवलं होतं. बाजूलाच तिच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडलेला...उर फोडून ती माउली रडतं होती. नर्सला आम्ही तिच्यावरचा कपडा थोडा बाजूला सारायला सांगितला.

आणि....

एक कोवळा निष्पाप जीव अगदी काळ्या-निळ्या अवस्थेत तिथे निपचित पडला होता.
ती गेली होती.....आयुष्याच्या प्रवासात आनंदला एकट्याला सोडून.....खूप सारे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन......पुन्हा परत कधीही न येण्यासाठी.

सूचना: एका सत्य घटनेवर आधारित हि कथा आहे आणि अजूनही आम्हाला तिने असं का केलं असाव? हा प्रश्न पडतो.

कथारेखाटनअनुभव

प्रतिक्रिया

'' अजूनही आम्हाला तिने असं का केलं असाव? हा प्रश्न पडतो.'' मला तर प्रश्न पडतो, तो जीव जर निष्पाप, कोवळा होता का ?

जो जीव विष पिण्याचा निर्णय घेउ शकतो तो निष्पाप, कोवळा असुच शकत नाही, १-२ वर्षाचं मुल पितं का कधी ठरवुन विष, नाही ना मग ? ४ दिवसाचं रोपटं आपली दोन कोवळी कोवळी पानं झाडुन टाकत नाही, तर मोठं २-३ वर्षाचं झाडच दरवर्षी पानं झाडुन टाकतं ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Apr 2011 - 11:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त सुरवात!!
पु. ले. शु.

इंटरनेटस्नेही's picture

27 Apr 2011 - 12:08 pm | इंटरनेटस्नेही

फालतु कथा..

विकाल's picture

27 Apr 2011 - 1:27 pm | विकाल

तुमचं मत असं असू शकतं हे मान्य...!

पण असं का वाटलं ते जरा विस्कटून सांगाल का... म्ह्णजे फालतू का आहे ते तरी कळेल...!!

इंटरनेटस्नेही's picture

27 Apr 2011 - 6:34 pm | इंटरनेटस्नेही

ही कथा नसुन भंपक लेखन आहे. उगाच वाचकांची सहानुभुती मिळवण्यासाठी आत्महत्या वगैरे दाखवणे हे अत्यंत बालिश वाटते. मात्र माझ्या शब्दांत 'फालतु कथा' ऐवजी 'दर्जाहीन कथा' असा मी बदल करत आहे.

जम्या नय

सुधारणेस वाव आहे

येथे मांडलेली कथा ही जर का सत्य कथा आहे (लेखकाने तसं नमुद केलय) तर त्यात सुधारणा कसली करायची? का मिडियासारखं तिखट मीठ लावुन खपवायची?
मला तरी त्या मुलीने जीव का दिला कळलं नाही. नाही म्हणायला ४ पैसे मिळवुन देणारी नोकरी होती, आनंद सारखा एक जवळचा मित्र पण मिळाला होता.

ओक्के गणपा..
तुम्ही म्हणता तसं :)

प्रदीप's picture

27 Apr 2011 - 8:21 pm | प्रदीप

चार घटना कथन केल्या की कथा होत नसते. त्यात पात्रांचे स्वभाव, त्यांचे एकमेकांमधील ताणतणाव, आपापसातील संबंध हे पाहिजे. तसेच वरवरच्या घटनांतून काही अजून खोल जाऊन सापडते का, हेही पाहिले पाहिजे. इथे सगळे काळे-पांढरे आहे. अगदी निरागस, कोवळी वगैरे नायिका, आणि तिचा उगाचच खुनशी रंगवलेला भाऊ. तो खुनशी का होता? त्याचीही काही ओढाताण झाली असेल कुठेतरी ? त्याचे व ह्या त्याच्या बहिणीचे नेमके काय संबंध होते? (दचकलात?) असे दोघात नेमके काय झाले असावे की त्यामुळे ह्या मुलीने आत्महत्येचे निर्वाणीचे पाऊल उचलावे? किंवा अजूनही काही कारण असावे? तिच्या ह्या कृत्याचा तिच्या भावाशी संबंध नसण्याचीही शक्यता आहे. ह्या सगळ्या गुंत्यास उलगडावे तर त्यासाठी तिच्या आयुष्यात अजून डोकावले पाहिजे. वरवर काहीतरी पाहिले, काहीतरी घडले, आणि त्याची 'कथा' झाली !

मुळात एखादा घटनाक्रम 'जसाच्या तसा" (म्हणजे सांगणार्‍या व्यक्तिस जसा वरवर पाहाता दिसला तसा) सांगणे म्हणजे कथा नव्हे. ती आहे एक गोष्ट.

आजकाल हिंदाळलेल्या मराठीविषयी फार काही लिहीणे सोडले आहे. तरीही 'हर्षाच्या जीवनात खूप सारा आनंद घेऊन आलेला असत'' ह्या वाक्यरचनेने दचकायला झाले. (अगदी परवाच एका मराठी दैनिकात 'त्या दोघांना एकमेकांविषयी प्रेम झाले' असे वाचून मी उडालो होतोच. आता संवय केली पाहिजे!)

रामपुरी's picture

28 Apr 2011 - 2:03 am | रामपुरी

आजकाल हिंदाळलेल्या मराठीविषयी फार काही लिहीणे सोडले आहे. तरीही 'हर्षाच्या जीवनात खूप सारा आनंद घेऊन आलेला असत'' ह्या वाक्यरचनेने दचकायला झाले. (अगदी परवाच एका मराठी दैनिकात 'त्या दोघांना एकमेकांविषयी प्रेम झाले' असे वाचून मी उडालो होतोच. आता संवय केली पाहिजे!)

+१

अगदी मनातलं बोललात.

लिखान आवडले ...
गती थोडीशी फास्ट होती पण छान लिहिले आहे..

हर्षा बद्दल वाईट वाटले ...

तिने असं का केलं असाव?

"आयुष्य म्हणजे आपण पहात असलेलो आपल्याभोवतालचे एक डबके येव्हडीच मनाची संकल्पना झाली की इतर जगाला-त्यातील आनंदाला अनभिज्ञ असलेला माणुस त्या डबक्याला ही सोडुन जातो... "

५० फक्त's picture

27 Apr 2011 - 2:53 pm | ५० फक्त

''"आयुष्य म्हणजे आपण पहात असलेलो आपल्याभोवतालचे एक डबके येव्हडीच मनाची संकल्पना झाली की इतर जगाला-त्यातील आनंदाला अनभिज्ञ असलेला माणुस त्या डबक्याला ही सोडुन जातो... "

या वाक्यासाठी श्री, गणेशा यांनाआधुनिकोद्त्तर सखाराम गटणे हा पुर्स्कार द्यावा अशी शिफारस करणारे पत्र कोणित्री लिहावे ही सदिच्छा.

आत्मशून्य's picture

20 Jul 2011 - 1:31 pm | आत्मशून्य

जो जीव विष पिण्याचा निर्णय घेउ शकतो तो निष्पाप, कोवळा असुच शकत नाही

अत्यंत खर आहे, निष्पाप व कोवळेपणा केव्हांच हरपलेला/करपलेला असतो... उरलेली असते ती फक्त अयशस्वी तडफड, गमावलेली निरागसता परत मिळवण्याची व जे नकोय ते उरलं आहे त्यातून निसटून जाण्याची आणी छोटासा आघात मग तो कीतीही क्षूल्लक का असेना सर्व काही पूसून टाकायला पूरेसा असतो. खरोखर सून्न बनवणारी घटना.

अवांतर :-

"आयुष्य म्हणजे आपण पहात असलेलो आपल्याभोवतालचे एक डबके येव्हडीच मनाची संकल्पना झाली की इतर जगाला-त्यातील आनंदाला अनभिज्ञ असलेला माणुस त्या डबक्याला ही सोडुन जातो... "

सूरेख ओळ आहे, पण म्हणतात द्रूश्टी आड सृश्टी.... ही गोश्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडतच असते. आत्महत्ये सारखी कृती करणार्‍या लोकांना डबक्यापलीकडील आयूष्याचीही जाणीव असावीच पण ते पार करण्याचा आत्मविश्वास, ताकत, आणी प्राप्त परीस्थीतीच्या प्रतीकूलतेचा परीणाम होऊनच आत्महत्या लवकर घडते असं मला वाटतं.

कोणताही मृत्यू निगेटीव वा पॉजीटीव कृतीमधे तोलला जाउ नये. कोणालाही स्वेछ्चेने जगायचा अधिकार आहे आहे तर तसच केव्हांही कधीही स्व्छ्चेने मरायचाही त्याला अधिकार असलाच पाहीजे. After all, to the well-organized mind, death is but the next great adventure.

वाइट परिस्थीतीमूळे नाइलाजने करावी लागलेली कृती म्हणून स्वतःवर ओढवून घेतलेल्या मृत्यूला दूषण देणे योग्य न्हवे. इथे भलेही ती कृती दूसर्‍याने केली असेल कोठेतरी आपण स्वतःला लागलेली टोचणीच दूषण देताना लपवत असतो.