अगम्य

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
9 Apr 2011 - 11:39 am

काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो.

ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो. तब्बल १६ वर्षांनंतर गोखले रोडही एकाएकी नविन वाटत होता. अगदी शाळेजवळ पोचलो तरीही जुन्या ओळखीच्या खुणा सापडेनात. चकाचक रस्ते (हा आनंद बेडेकर कॉलेजकडे जाताना गळुन पडला ही गोष्ट वेगळी), जरा वाइच सरकुन घ्या पावणं असे म्हणुन दाटीवाटीने एकमेकांत घुसलेली दुकाने, बैठ्या इमारतींच्या जागी उभ्या राहिलेल्या उंच इमारती. काहीच तसे नव्हते जसे मला आठवत होते. माझ्या आठवणीत मल्हार टॉकीजचा चौक मोठा होता पण एवढी रहदारी नव्हती तेव्हा. पॉटहोल्स चुकवत चुकवत रस्ता शोधायला लागायचा, तो आता चकाचक झाला होता. चौकाच्या कडेला एके ठिकाणी ४-५ झाडे होती ती आता बहुधा कुठल्यातरी होळीच्या कामी आली होती. त्यांच्या आडोश्याने असलेल्या सावलीच्या जागी उन्हाच्या काहिलीत आता ४-२ वहाने उभी दिसत होती. इमारती उंच झालेल्या होत्या आणि आठवणीतल्या खुणा खुज्या भासत होत्या. सगळं सगळं बदललं होतं. हे माझ्या आठवणीतले ठाणे नव्हतेच. रखरखीत, शुष्क, अनोळखी शहरात आल्यासारखे वाटले पटकन.

शाळेची बिल्डींग दिसली मात्र कसं बरं वाटलं. १५-१६ वर्षानंतर सुद्धा शाळेची इमारत ती तशीच होती. ३ मजली. समोर छानसं पटांगण. कसं एकदम थंड हवेची झुळुक अंगावरुन फिरल्यासारखे झाले. असेही मीटिंगच्या वेळेच्या आधीच पोचलो होतो. त्यामुळे सहकार्‍यांना आलोच २ मिनिटात म्हणुन सटकलो. थेट शाळेत गेलो. छोटे मोठे बदल लगेच डोळ्यात भरले. सायकल स्टँड आता मोठे भासत होते आणि मैदान छोटे. ते वर्गांकडे जाण्याचे रस्ते मात्र तसेच होते. कोणाचे लक्ष नाही बघुन पटकन वरती शिरलो. ८ वीच्या माझ्या वर्गात शिरलो. तो वर्ग डोळे भरुन बघुन घेतला. तसाच उठुन ९-१० च्या वर्गात गेलो. एकेकाळी मोठा भासणारा वर्ग का कोणास ठावूक छोटा वाचत होता. याच वर्गात ७० मुले बसायची हे खरे वाटेना. हळुच माझ्या बाकापाशी जाउन आलो. बाकावरच्या खुणा आता पुसल्या गेल्या होत्या. बाकांवर ---- बदाम ---- नव्हते असे नाही पण नावे वेगळी होती. मॉम्या (हे वर्गातल्या एका फेमस जोडीच्या आद्याक्षरांचा संक्षिप्त रुप होते) लिहिलेली बाके पण सापडली नाहीत. भिंता आता खरवडलेल्या होत्या. वर्गातल्या जोड्या तिथे कधीकाळी कोरलेल्या होत्या ते आता फक्त आठवणीतच होते. बाकावर बसण्याचा मोह मला अनावर झाला. पटकन बंद केलेल्या खिडक्या उघडुन मी बाकावर बसलो. तोच बाक. तिच जागा. खिडकीतुन बाहेर दिसणारे दृष्य मात्र आता बदलले होते. शाळेच्या मागच्या विस्तीर्ण पटांगणावर आता क्रीडासंकुल बांधले होते. आमच्या वेळेस असल्या चैनी नव्हत्या. २ मिनिटे बसलो आणि मग मात्र उठलो. तो बाक आता नक्कीच १० वी अ च्या मुलींनी पटकवलेला असणार. आमच्या बॅचमध्ये फक्त ती बाजू आणि ती खिडकी मुलांच्या वाट्याला कशी आली होती देव जाणे. एरवी खिडकी पटकवण्यात मुलीच जास्त हुषार असायच्या. त्यामुळे मुलींच्या बाकावर भलताच अनोळखी माणूस बघुन गैरसमज नको व्हायला ;)

खाली उतरुन थेट मागच्या पटांगणात गेलो. प्रचंड विस्तीर्ण पटांगणाचा अर्धा भाग आता क्रीडासंकुलाने व्यापलेला होता. मला उगाच गलबलुन आले त्या मोठ्या पटांगणाच्या आणि त्याच्या एका बाजुने असलेल्या चिंचेच्या झाडाच्या आणि विहीरीच्या आठवणीने. एकदा एका शिपायाने त्या चिंचेच्या झाडावर दगड मारुन चिंचा पाडताना बघितले होते आणि खवचटपणे "काय रे कितवा महिना चालु आहे?" असे चारचौघात विचारुन इज्जत घालवली होती. ते आठवुन हसु सुद्धा आले (त्यावेळेस मात्र मी त्याच्याकडे फुरफुरणार्‍या बैलासारखे बघितले असणार). परत फिरलो. आजुबाजुला कोणीच दिसेना. परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शुकशुकाट होता. जुन्या आठवणी जागवणारे कोणीच उरले नव्हते. उगाच ५ मिनिटे थांबुन शाळेतला एखादा जुना मित्र एखादी वर्गभगिनी दिसतेय का ते बघत राहिलो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोण शाळेत येणार होते म्हणा? मला उगाच घुटमळताना पाहुन वॉचमनने शेवटी काय पाहिजे म्हणुन विचारले. मी उगाच मागच्या क्रीडासंकुलाची चौकशी केली. मी शाळेत असताना ते नव्हते म्हणुन पुस्तीही जोडली. बोलता बोलता त्यानेच सांगितले की सुट्ट्या लागल्या आहेत म्हणुन. निघता निघता तो म्हणाला मुख्याध्यापिका बाई आहेत पाहिजे असेल तर भेटुन घ्या, आत्ता निवांत असतील. जाउ की नाही हा विचार करत करतच त्यांच्या केबिनपाशी पोचलो. आतमध्ये बर्वे बाई होत्या. आम्हाला संस्कृत शिकवायच्या. मला कधीच नाही आवडल्या. उगाच एकदा त्यांनी मला मारले होते. मित्राची चुगली केली नाही म्हणुन. मी शेंगा खाल्या नाही , टरफले उचलणार नाही आणि कोणी खाल्या ते सांगणार पण नाही हे तोंड वर करुन सांगणार्‍या टिळकांचे यांना कौतुक. आम्ही मात्र आगाऊ (टिळकांचा तो बाणेदारपणा आमची ती अतिहुषारी). पण हे त्यावेळेस बोलण्याची हिंमत नव्हती.

आज १५ वर्षांनंतर मात्र मला बघुन त्यांच्या चेहेर्‍यावर कुठलेही आखडु भाव दिसले नाही. त्यांनी मला ओळखले नाही हे तसे स्वाभाविकच होते म्हणा. मी कधीही हुषार विद्यार्थी नव्हतो. मवालीही नव्हतो. क्रीडा, वक्तृत्व, कला, संगीत, विज्ञान यांपैकी कशातही कधी चमकलो नव्हतो. माझ्या शालेय आयुष्यातला सर्वोच्च फेम मोमेंट म्हणजे सलग दोन परीक्षांत (म्हणजे चाचणी आणि सहामाही) ९ वी अ मध्ये गणितात नापास झालेला पहिला विद्यार्थी म्हणुन स्टाफ रुम मध्ये शिक्षकांमध्ये झालेली चर्चा . त्यामुळे बाईंनी मला ओळखले नाही यात काहीही आश्चर्य वाटले नाही. उगाच जोशी, बापट, भावे असली काहीतरी आडनावे फेकुन त्यांनी मला ओळखण्याचा केलेला क्षीण प्रयत्न थांबवण्यासाठी मीच त्यांना माझे नाव आणि बॅच सांगितली. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. तुम्ही मुले खुप चांगली होता रे. ही आत्ताची बॅच म्हणजे ना.... असे म्हणुन बाईंनी नवीन पिढीच्या मुजोरपणाची चार पाच प्रातिनिधीक उदाहरणे पण दिली. ८ वी पर्यंत सरसकट सगळ्यांना पुढे ढकलण्याच्या निर्णयावर आम्ही दोघांनीही निषेध नोंदवुन झाला. गाडी हळुहळु सगळ्या जुन्या शिक्षकांकडे वळली. अगोटी रिटायर झाले. राजे मॅडम पण गेल्या. ऑफ पिरीयडला सुरेख गोष्टी सांगणार्‍या आंबेकर बाईसुद्धा महिन्यापुर्वीच निवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तुझ्या पिढीचा मी एकमेव पुरावा उरले आहे बघ म्हणाल्या. का कोणास ठावूक जाताजाता मला बाईंना नमस्कार करावासा वाटला. पुढच्यावेळेस येशील तेव्हा जोडीने ये म्हणाल्या.

फाटकाबाहेर पडल्यावर आता किती वर्षांनी शाळा दिसणार हा प्रश्न मनात भरुन राहिला होता. खरे म्हणजे मी काही कुठल्या गोष्टींमुळे नॉस्टेल्जिक होणारा नाही. गेले ते दिन गेले म्हणुन फारशी कधी खळखळही करत नाही. पण त्या ३० मिनिटाच्या शाळाभेटीने उण्यापुर्‍या ३० वर्षांच्या आयुष्यात मला खुप प्रौढ झाल्यासारखे वाटले. काहीतरी खुप महत्वाचे खुप आनंदी दिवस, क्षण हातातुन निसटुन गेल्याची भावना झाली.

आईशप्पथ सांगतो, बर्वे बाईंना बघुन कधी आनंद होइल असे वाटले नव्हते. पण काल त्यांना भेटुन खुप आनंद झाला. माझ्या आणि शाळेतल्या आठवणींमधला शाळेत असणारा तो एकमेव जिवंत दुवा होता. पुढच्या वेळेस शाळेत जाइन तेव्हा कदाचित निवृत्त मुख्याध्यापकांच्या यादीत अजुन एक नाव जोडले गेलेले असेल. आणि खरे सांगतो त्यावेळेस मला खरेच खुप वाईट वाटेल. न आवडणार्‍या बाईंपासुन निवृत्तच होउ नयेत असे वाटणार्‍या मुख्याध्यापिका हे असे स्थित्यंतर का झाले हे काही मला उगमलेले नाही बघा. तुमच्या आयुष्यात कधी असे झालय का हो?

मौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

हरिप्रिया_'s picture

9 Apr 2011 - 11:51 am | हरिप्रिया_

खुप खुप मस्त लिहिलय...
मी माझ्या शाळेतच जाऊन आले तुमच्यामुळे,मनाने...
:)

विनायक बेलापुरे's picture

9 Apr 2011 - 11:55 am | विनायक बेलापुरे

आईशप्पथ सांगतो, बर्वे बाईंना बघुन कधी आनंद होइल असे वाटले नव्हते. पण काल त्यांना भेटुन खुप आनंद झाला. माझ्या आणि शाळेतल्या आठवणींमधला शाळेत असणारा तो एकमेव जिवंत दुवा होता.

:) नॉस्टाल्जियाच ......

मस्तच

हम्म...मी सुद्धा भारत सोडताना गिरगावातल्या शाळेला भेट देऊन आले...फारसं काही बदललं नव्हतं तरी सगळंच बदलल्यासारख वाटलं.
बाकी लेख छान.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2011 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार

आ हा हा..

खल्लास रे मृत्युंजया.

आठवणींच्या सरी मस्त भिजवुन गेल्या :)

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2011 - 2:57 am | राजेश घासकडवी

असंच म्हणतो.

मस्त लिहिलय.
मलाही पुण्यात गेल्यावर असंच वाटतं.
सगळं बदलल्यासारखं........तरीही शाळेत जायचा योग एकदाच आला होता.
तेही शाळेच्या हापिसात. जुन्या बाई तर कोणत्याही दिसल्या नाहीत पण एक दोन नवीन शिक्षिका दिसल्या.
अंगभर दागिने, चमकार साड्या, हातभर बांगड्या अश्या वेषभुषेत.
असलं काही शाळेत गॅदरींगशिवाय घालून आलं म्हणजे बाई रागवायच्या.......अभ्यासातलं लक्ष उडेल म्हणून.
नववीत असताना मी दोन दिवस बांगड्या घालून गेले आणि मुख्य म्हणजे तासाला लक्ष नव्हतं म्हणून बाईंनी स्प्ष्टपणे तसं सांगितलं होतं. तेवढच काय ते मी माझ्या शालेय जीवनात रागावून घेतल्याने फार अपमान वाटला होता.;)
आता या नव्या शिक्षिका पाहून फारसा आनंद झाला नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2011 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

आता या नव्या शिक्षिका पाहून फारसा आनंद झाला नाही.

सध्याच्या पिढीचे मत अगदी विरुद्ध असु शकेल ;)

छान लिहिलं आहे, मी मध्यंतरी सासरी गेल्यावर बायको मला व पोराला तिच्या शाळेत घेउन गेली होती आणि त्यांनी इ. ८वीत नाच केला होता तसा करुन दाखवला. एका गोष्टीचा उलगडा झाला

तिथल्या स्टेजवरच्या फरश्या का तुट्ल्या आहेत.

बाकी, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

प्रास's picture

9 Apr 2011 - 6:29 pm | प्रास

आठवणींच्या हिंदोळ्यांवर एक तास.......

छान, मजा आली वाचताना.....

शाळेसमोरच्याच घरात राहणारा (त्यामुळे झालेले बदल तात्काळ टिपल्याने अशा अनुभवांपासून वंचित) -

फारएन्ड's picture

9 Apr 2011 - 11:51 pm | फारएन्ड

आवडले एकदम. बर्‍याच वर्षांत शाळेत, कॉलेजात गेलो नाही. जायला पाहिजे एकदा.

मस्त रे मृत्युंजया. शाळेचा विषय निघाला की नॉस्टॅल्जिक व्हायलाच होतं. :)

मस्त लिहिलंय... शिवाय आपली शाळा एकच त्यामुळे जास्त आवडलं!

केवळ आणि केवळ अप्रतिम....

प्रमोद्_पुणे's picture

10 Apr 2011 - 12:07 pm | प्रमोद्_पुणे

छान लिहिलय..

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Apr 2011 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच लिहिलं आहे रे! नॉस्टल्जिया म्हणजे सुखावणारी हुरहुर. जखमेवरची खपली पडताना कसे तिथे दाबले खाजवले की थोडेसे दुखते पण छान वाटते, तसेच अगदी. अभावितपणे माझ्या अनुभवांशी तुलना करायला लागलो. आता माझी शाळाच काय, माझे गावही इतके बदलले आहे की मला ते आता कोणत्याही अँगलने आपले वाटत नाही. शाळेचा चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे. काही शिक्षक / शिक्षिका आहेत. पण काहीच. बहुतेक नाहीतच. दहावी नंतर पंचवीस वर्षांनी भेटलो ( http://www.misalpav.com/node/5800 ), ते पण शाळेत नाहीच. दुसरीकडेच. असो.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2011 - 9:52 am | मृत्युन्जय

हा धागा १५ प्रतिसाद पाहिल असे वाटले नव्हते. मनातल्या भावना जश्या होत्या तश्या उतरवल्या होत्या. शाळा म्हटले की सगळेचजण नॉस्टेल्जिक होतात बहुधा.

मदनबाण's picture

11 Apr 2011 - 10:10 am | मदनबाण

अगदी माझ्या मनातल्याच भावना... काही दिवसांपूर्वीच मी माझ्या शाळेत एक चक्कर टाकुन आलो होतो.ज्या वर्गात मी बसायचो तो पाहुन जो आनंद झाली की तो शब्दात मांडताच येणार नाही.

(मो.ह.विद्यालय ठाणे)

उगा काहितरीच's picture

12 Jul 2015 - 9:52 pm | उगा काहितरीच

अशा लेखांमुळेच मिपा मनापासून आवडते .

पद्मावति's picture

12 Jul 2015 - 10:05 pm | पद्मावति

हेच म्हणायचे आहे.

प्यारे१'s picture

13 Jul 2015 - 12:48 am | प्यारे१

खूप मनापासून लिहीलं आहे हे. मखमली, मोरपिशी, तरल.

बहुगुणी's picture

13 Jul 2015 - 7:30 am | बहुगुणी

२०११ मधला हा धागा तेंव्हा सुटला होता नजरेतून, चांगला लेख वरती आणल्याबद्दल 'उगा काहीतरीच' यांचे आभार!

Rahul D's picture

2 May 2016 - 1:18 am | Rahul D

छान लेख आहे.

मृत्युन्जय's picture

2 May 2016 - 1:16 pm | मृत्युन्जय

धन्यवाद. लेख वरती काढल्याबद्दलही आणि प्रतिसादाबद्द्दलही. या निमित्ताने सर्वच वाचक प्रतिसादकांचे आभार. या शेवटच्या भेटीनंतर परत शाळेत जाण्याचा योग आलेला नाही. एकदा ठाण्याला भेट दिली पाहिजे :)

हा धागा निसटला होता वाचण्यातून. मोरपिशी लिहिलेय.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 3:31 pm | मराठी कथालेखक

वर्गभगिनी काय ? असू दे असू दे :)

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 3:35 pm | विजय पुरोहित

सुंदर लेख... अगदी नॉस्टॅल्जिक केलं.

सस्नेह's picture

2 May 2016 - 3:44 pm | सस्नेह

हळवे क्षण टिपणारा भावुक लेख !

वाचक's picture

2 May 2016 - 4:12 pm | वाचक

सरस्वती सेकंडरी स्कूल - कधीची बॅच म्हणे तुमची?

अभिजीत अवलिया's picture

6 May 2016 - 7:15 am | अभिजीत अवलिया

भारी लिहिलेत हो मृत्युंजय साहेब. मला देखील स्वताच्या शाळेची आठवण आली.

यशोधरा's picture

6 May 2016 - 7:57 am | यशोधरा

मस्तच लिहिले आहेस मृ.

नाखु's picture

6 May 2016 - 8:59 am | नाखु

वर्षापुर्वीच शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या रौप्यमहोत्वसानिमित्त टिळक स्मारक मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली.
बर्याच वर्गमित्रांना (मोजक्याच मैत्रींणींना-उगा खोटं खोटं लोकाग्रहास्तव वर्गभगिनी असं आता तरी म्हणू नये)भेट झाली.

वर्गशिक्षीका/मास्तर यांना जरा जुन्या आठवणींचा/ठेवलेल्या नावांचा संदर्भ दिल्यावर काहीशी ओळख पटली (आणि मधली ३३ वर्षे गळून पडली)

गोपाळ हाय्स्कूल माजी विद्यार्थी नाखु