निरुपयुक्त

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
18 Dec 2010 - 2:59 pm

सुटकेस घेऊन पुरू पुढच्या दाराशी आला आणि क्षणभर थबकला. मंद आवाज करीत एका लयीत सरकते दार उघडत असताना त्याने वळून घराकडे एक नजर टाकली. घर अगदी शांत आणि स्तब्ध होतं. अंजली आणि प्रांजल दोघेही घरी नव्हते. इतरवेळी किणकिणणारा होममॅनेजरचा आवाजही बंद होता. जणू त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याची गरज त्या यंत्रालाही वाटत नव्हती. तो घरातून बाहेर पडतोय हे आधीच अपेक्षित असल्याप्रमाणे होममॅनेजरने सगळे दिवे, एसी वगैरे बंद केलं होतं. स्वीपर रोबोज, शेफ रोबोज वगैरे काम संपवून क्लॉजेटमध्ये विसावले होते. घरात एक थंड आणि निर्विकार शांतता भरून राहिली होती. पुरुची नजर एकेका वस्तूवरून फिरू लागली. प्रांजलचे स्केटस, गिटार, व्हिडीओ गेम्स, स्कूल कनेक्टरचा मॉनिटर आणि त्याने जमा केलेल्या सुपरहिरोजच्या प्रतिमा, अंजलीचे ट्रेडमिल, भिंतीवर लावलेली तिने काढलेली डिजीटल चित्रे, तिने आणलेला मसाजिंग रिक्लायनर हे सगळं पाहात पाहात त्याची नजर येऊन त्याच्या सुटकेसवर स्थिरावली. स्वतःचे काही कपडे, दाढीचं यंत्र आणि काही जपलेली ओल्ड फॅशन कागदी पुस्तके. बस्स. एवढीच आपली या घरातली सत्ता. एवढीच आयुष्याची मिळकत. थोडंसं विषादपूर्ण स्मितहास्य त्याच्या चेहर्‍यावर पसरलं आणि तो तसाच सुटकेसकडे पाहत राहिला. नक्की कुठं जायचं ते अजूनही त्याच्या डोक्यात नीट ठरत नव्हतं. क्षण दोन क्षणांतच दरवाजाचा बीपर वाजू लागल्यावर तो भानावर आला आणि दरवाजातून त्याने ट्यूबलिफ्टमध्ये पाय टाकला. पाठीमागे दार लागताना गडद अंधार दाटत गेला आणि त्याने आपले डोळे मिटून घेतले. ट्यूबलिफ्ट झपाट्याने सत्तर मजले उतरू लागली आणि पुरू आपल्या मनाची जुळवाजुळव करू लागला. इतके दिवस विचार करून ठेवलेले पर्याय तो मनातल्या मनात पडताळून पाहू लागला. कोणत्याही पर्यायात त्याला मनापासून करावंसं वाटेल असं काहीच सापडलं नाही. पण तळमजल्यावर रॅपिड ट्रांझिटच्या प्लॅटफॉर्मवर लिफ्टचं दार उघडलं तेव्हा त्याचा चेहरा निर्णय झाल्यासारखा शांत दिसत होता.

पंधरावर्षांपुर्वी यापेक्षा कितीतरी छोट्या घरात राहायचा पुरु. पण आनंदी होता, तरूण होता, स्वच्छंदी होता. त्याला त्याचा फोटोत पाहिलेला जुना पंधरा वर्षांपुर्वीचा चेहरा आठवला. डोक्यावर भरपूर केस, तोंडावर मनमोकळं हसू. नकळत त्याच्या चेहर्‍यावर स्मितरेषा पसरली. पंधरा वर्षांपुर्वीच तो अंजलीला भेटला होता. पहिल्याच नोकरीत फ्रेशर्सचा बॅचमध्ये होती दोघं. तसं पाहिलं तर तिच्यात दिसायला वेगळं काहीच नव्हतं. तसेच ते लेटेस्ट फॅशनचे छोटे केस, अद्ययावत फॅशनचे कपडे, वागण्याबोलण्यात व्यावसायिकता, करारीपणा आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरुकता. पण त्याला आवडली तिची विनोदबुद्धी आणि खळाळून हसण्याची अदा. खरंच किती बावळट होतो आपण, त्याच्या मनात विचार आला, स्वतःची आवड, आपल्याला नक्की काय हवंय, काय करायचंय हे काहीच माहिती नव्हतं तेव्हा. आवडली मुलगी, विचारा लग्नाचं. वर्षभर झुलवल्यावर तिने शेवटी होकार दिला, पण तेही प्रिन्यूप काँट्रॅक्टची अट घालूनच. त्याला त्याचा कधी आक्षेप नव्हताच म्हणा. त्याचं सगळं तर तिचंच होतं ना. दुसरं होतं तरी कोण आपल्याला? शिवाय मुलांच्या जन्माबाबतचे निर्णय स्त्रियांनीच घ्यावे हे त्यालाच मनापासून वाटायचं. स्त्रियांनाच त्रास सहन करावा लागतो ना मग त्यांना त्याबाबतीत सर्वाधिकार पाहिजेत याच मताचा होता तो म्हणूनच काँट्रॅक्टमध्ये तिला ते सर्वाधिकार देताना त्याने क्षणाचाही विचार केला नाही. २०४६ साली तो ब्रेकथ्रू झाला नाही का? म्हणजे लग्नानंतर एखाद्या वर्षानेच. त्या आठवणीने त्याचं तोंड कडूजार झालं.
"जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणे.. हूं", तो पुटपुटला, " आधी अमाप लोकसंख्या वाढवायची, कोणालाही जगवायचं आणि नॅचरल सिलेक्शनची वाट लागली की मग असले धंदे करायचे". त्याचा जुनाच राग अजूनही धुमसत होता.
त्यानंतर सहा महिन्यांनीच अंजलीने मूल जन्माला घालायचा निर्णय घेतला. किती खूश झाला होता तो. लहानपणीच आईबाबा गेले तेव्हापासून लग्न होईपर्यंत अगदी अनाथच होता तो आणि आता त्याच्या स्वतःच्या रक्ताचं कोणी तरी येणार होतं या जगात!
त्यासाठी तो काहीही करायला तयार झाला असता आणि झालाही, जेनेटिक इंजिनिअरिंग वापरायला. अंजलीने त्याला व्यवस्थित पटवलं. या पद्धतीच्या वापराने बीजामध्ये हवी ती गुणसूत्रं निवडून ठराविक गुणधर्माची मुलं जन्माला घालणं शक्य होतं. हवी असलेली गुणसूत्रं हवी त्या दर्जाची नसतील तर त्यांच्या जागी दुसर्‍या व्यक्तीची गुणसूत्रं टाकता येणार होती. त्याला आधी थोडं विचित्र वाटलं पण आपण नाही वापरली तरी इतर लोक वापरून जास्त क्षमतेची मुलं जन्माला घालतील आणि आपलं मूल मागं पडेल असा अंजलीने युक्तिवाद केल्यावर त्याला पटलं. अर्थात सर्वाधिकार तिच्याकडे असल्याने केवळ प्रेमापोटीच तिने त्याला समजावून सांगितलं हे त्याला कळत होतं. मग आपलं मूल कसं असावं याचं स्वप्नरंजनात्मक डिझाईन करण्यात त्यांचा बराच काळ उत्तमरीत्या व्यतित झाला. अंजलीला मुलगाच हवा होता. अंजलीला गाता येत नव्हतं पण गाण्याची फार आवड, तो तिला उत्तम गायक व्हायला हवा होता. त्याला तो फुटबॉलपटूंसारखा तगडा आणि हेल्दी व्हायला हवा होता. तिच्या आवडीप्रमाणे त्याला गणिताची आवड असणार होती आणि तो सायन्समध्येच करीअर करणार होता. असं बरच काही त्यांनी ठरवलं होतं.यथावकाश तिला दवाखान्यात दाखल करायची वेळ आली. तो प्रसंग त्याला अजूनही जशाचा तसा आठवला. प्रसूतिगृहात दोन डॉक्टर्स आणि दोन नर्सेसबरोबर तोही गेला होता. अद्ययावत हॉस्पिटल असूनही नैसर्गिक कळा अंजलीला चुकल्या नाहीत आणि हृदयातली धडधड त्याला चुकली नाही. गोर्‍यापान चिमुकल्या प्रांजलचा जन्म झाल्यावर डोळ्यातल्या पाण्याने त्याला काही दिसेनासं झालं होतं. तो दिवस त्या दोघांसाठी अत्युच्च सुखाचा होता. त्या आठवणीने आताही त्याचे डोळे पाणावले आणि कोणी पाहात नाही हे पाहून त्याने हलकेच शर्टाच्या बाहीने ते पुसले आणि उगाचच ट्रेन येण्याच्या दिशेने पाहू लागला.

प्रांजल तीन-चार वर्षांचा होईपर्यंत कसं सगळं मस्त चाललं होतं. पण हळूहळू पुरूला एकेक गोष्ट खटकायला लागली. प्रांजलची चेहरेपट्टी अगदी अंजली सारखी. अंजली सावळी नव्हती पण अगदी गोरीपानही नव्हती. पुरू सावळा होता. प्रांजल मात्र अगदी गोरापान होता. त्यात त्याचे डोळे घारे आणि केस कुरळे. अंजली आणि पुरूचे दोघांचेही डोळे पिंगट आणि केस सरळ. इतक्या बारीक बारीक गोष्टींबद्दल चर्चा न झाल्याचं पुरुला वाईट वाटत होतं आणि तरीही एवढ्या बारीक गोष्टींचं आपण वाईट वाटून घेऊ नये असं तो स्वतःला समजावत राहायचा. पण जसजसा प्रांजल मोठा मोठा होत गेला तसतसा त्याला खूपच फरक जाणवू लागला. आपल्यात आणि प्रांजलमध्ये काहीतरी साम्य असेल या आशेने तो आणखी आणखी बारकाईने त्याचं निरीक्षण करायचा आणि त्यामुळे त्याला आणखीनच जास्त फरक दिसू लागायचे. मजबूत हाडापेराचा प्रांजल सातवीत असतानाच त्याच्याएवढा उंच झाला. सतत काहीतरी विनोदी बोलणे, हसणे असा पुरुचा स्वभाव पण प्रांजल मात्र नेहमी गंभीर. उलट पुरुने काही विनोद करायचा प्रयत्न केल्यास तो तीव्र नापसंतीने पाही. अंजलीशीही तो कधी हास्यविनोद करत नसे. पुरुने अंजलीसमोर याबद्दल विषय काढला तर तिला काहीच वावगं वाटलं नाही. उलट तो आपल्या दोघांपेक्षाही जास्त बुद्धीमान आणि मॅच्युअर आहे असं म्हणून ती अभिमानाने फुलून आली. स्वतःच्या वागण्यात या गोष्टीमुळे फरक पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करूनही हळूहळू पुरुच्या मनातला मायेचा उमाळा कमीकमी होत गेला. दुसर्‍याच कोणाचंतरी मूल आपण सांभाळतोय असं त्याला वाटू लागलं.
आपोआपच त्याचा आणि प्रांजलचा संवाद कमीकमी होत गेला. शिवाय प्रांजलच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि मित्रमैत्रिणींमुळे एकत्र वेळ घालवणेही अवघडच होते. पुरुची घुसमट होऊ लागली होती. गच्च भरलेल्या गाडीवर कालची शेवटची काडी पडली. प्रांजलने त्याच्यासाठी निवडून आणलेलं जॅकेट अंजली पुरुला दाखवत होती. प्रांजल समोरच वाचत बसलेला होता. "वॉव. सुंदर. मस्त जॅकेट आहे, " पुरू म्हणाला आणि त्याने ते स्वतःच्या अंगात घातले, "हे मी मलाच ठेवून घेतो", ढगळपणे बसणारे जॅकेट दोन्ही हातांनी समोर थाटात पकडून तो गमतीने म्हणाला. प्रांजलने त्याक्षणी त्याच्याकडे तीक्ष्णपणे पाहिले आणि अंजलीसह तो मोठमोठ्याने हसू लागला. स्वतः विनोद करायला जावं आणि स्वतःचाच विनोद व्हावा असं पुरुचं झालं. त्यांच्या हसण्याच्या प्रत्येक लयीबरोबर पुरुच्या मनात संताप वरखाली होऊ लागला आणि तत्क्षणीच त्याने निर्णय घेतला.

धुसफुसत ट्रेन आली आणि समोर येऊन थांबली. दार उघडताच तो आत गेला आणि पुन्हा दाराकडे तोंड करून उभा राहिला. थोडं वाकून शेवटचं एकदा घराकडे पाहण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्याला काही दिसले नाही. आपण करतोय ते चूक की बरोबर ते त्याला कळत नव्हतं. आपल्या सुदृढ मुलाचे कपडे आपल्याला ढगळ होतात हे कोणत्याही बापासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट पण त्याला तो अपमान का वाटावा? आपल्या आयुष्याला काहीच हेतू नाही, काहीच उद्देश नाही असं त्याला का वाटावं? या समाजाच्या अजस्त्र यंत्रात फालतू काम करणारं आपण एक मशीन असून एक माणूस म्हणून, एक पुरुष म्हणून साधे शुक्रजंतू देण्याइतकाही आपला उपयोग नाही असं त्याला तीव्रतेने का वाटावं?

आपल्या मनाची समजूत घालायचा निष्फळ प्रयत्न करत ट्रेनच्या दारातून दिसणाऱ्या चौकोनी इमारती आणि मूकपणे प्लॅटफॉर्मवर उभी असणारी माणसं तो निर्विकार नजरेने पाहत राहिला.

कथाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 3:10 pm | रन्गराव

भविष्याच चित्र छान उभ केलत. :)
क्रमशः लिहायच राहिल का? कुठ तरी मध्येच थांबल्या सारखा वाटल.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 4:13 pm | नगरीनिरंजन

तसंच काहीसं झालंय कथानायकाचं. जगताना मध्येच कशासाठी जगतोय असा प्रश्न पडतोच ना असा.

रन्गराव's picture

18 Dec 2010 - 4:22 pm | रन्गराव

हमम. बरोबर आहे :)

http://www.imdb.com/title/tt0119177/

हा अशाच विषया वरील एक चित्रपट आहे. आधी पाहिला नसल्यास पहा :)

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 7:59 pm | नगरीनिरंजन

रोचक आहे. इंजिनिअर्ड पिढीवरचा दिसतोय. पाहिला पाहिजे.

सूर्यपुत्र's picture

18 Dec 2010 - 5:09 pm | सूर्यपुत्र

अतिशय निराशाजनक आणि परावलंबित्व अधोरेखीत करणारं चित्र... :(

पोरं जन्माला घालतायेत, की जास्त फीचरवाला मोबाइल घेतायेत....

अरुण मनोहर's picture

18 Dec 2010 - 6:07 pm | अरुण मनोहर

क्षमस्व. पण एक सशक्त बीज वाया घालवले असे वाटले.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 7:34 pm | नगरीनिरंजन

सशक्त बीज वाया गेले असे म्हणायचे आहे का तुम्हाला? 'घालवले' याला मी मुद्दाम (दुसरा कोणी तरी न्याय देऊ शकत असताना) ते वाया घालवले असा वास येतो. :-)

इंटरनेटस्नेही's picture

18 Dec 2010 - 6:25 pm | इंटरनेटस्नेही

छान! आवडले! :)

प्रियाली's picture

18 Dec 2010 - 7:37 pm | प्रियाली

अशाप्रकारे जेनेटिक इंजिनिअरींग केले नाही तरी या काळातही काही पुरुषांना असे किंवा तत्सम प्रश्न भेडसावत असतात. विशेषतः आपण म्हातारे झालो आहोत आणि आपल्याला कुणी गंभीरपणे घेत नाही हा प्रश्न तर भेडसावतोच भेडसावतो. :(

आणि इतरांना यांचे मिडलाईफ अद्याप कितपर्यंत चालणार हा प्रश्न भेडसावतो. ;)

कथाबीज आवडले.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 7:46 pm | नगरीनिरंजन

होय. थोडासा मिडलाईफ क्रायसिस सारखाच पण हा व्होललाईफ क्रायसिस म्हणता येईल. असल्या नवीन शोधांमुळे माणसाचे एक प्राणी म्हणून पुनरुत्पादनाचे नैसर्गिक प्रयोजनच नष्ट झाल्यासारखे वाटेल की काय असे वाटले म्हणून लिहीले. अर्थात त्या परिस्थितीत सापडलेला माणूस कसा वागेल, काय करेल याची कल्पना मला करता आली नाही.

गुंडोपंत's picture

20 Dec 2010 - 11:24 am | गुंडोपंत

जबरी प्रतिसाद!

स्वाती२'s picture

19 Dec 2010 - 5:47 pm | स्वाती२

कथा तितकीशी नाही पटली. पुरु मुळातच स्वतः विचार करुन निर्णय घेत नाही. तो फक्त अंजलीच्या निर्णयाला 'मम' म्हणतो. अशा व्यक्तीच्या बाबतीत नंतरचे वैफल्य हे कुठल्याही गोष्टीमुळे वाटू शकते. त्या साठी जेनेटिकली इंजिनिअर्ड केलेले मूलच हवे अशातला भाग नाही. शिवाय असे मूल जन्माला घालणे उद्या शक्य झाले तरी जोडप्याचे सखोल काउंसेलिंग झाल्याशिवाय मला नाही वाटत पुढिल प्रक्रिया घडेल. आजही स्पर्म डोनर चा निर्णय घेताना केवढे व्याप असतात.

राजेश घासकडवी's picture

19 Dec 2010 - 10:50 pm | राजेश घासकडवी

मुळातच शोकांताच्या लक्ष्याकडे रोखलेला व ताणून मारलेला बाण वाटला. या प्रेडिक्टिबिलिटीमुळे कथेपेक्षा 'जेनेटिक इंजिनिअरिंग झाल्यावर पुरषाची भूमिका शून्य होऊन जाईल' या वाक्याचा सरळसोट कल्पनाविस्तार वाटला. असा कल्पनाविस्तार अनेक उत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये देखील दिसतो, पण त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये, घटनांमध्ये गुंतून जाऊन जे मनोहारी चित्रण दिसतं त्याने तो संदेश झाकला जातो, आणि अंतर्मनात कुठेतरी कोरला जातो.

तुम्ही अशा काही बारीक खाचाखोचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रांजल हे नाव पुरू आणि अंजली यांच्या मिश्रणाचं आहे. हे जाणूनबुजून निवडलं असावं असं वाटतं. हा बुडत्या पुरूसाठी काडीचा आधार म्हणून आहे का? या उत्तम निवडीनंतरही तो संदर्भ कुठे वापरला गेला नाही त्यामुळे काहीतरी हुकल्यासारखं वाटलं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Dec 2010 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...

आपल्या कडे सध्याच्या काळात अनेक राजकारणी व फिल्मी सितारे व समाजातील अन्य मान्यवरांची मुलांमध्ये आपल्या तिर्थरुपानचे कर्तुत्व/रूप/ रंग कशाचाही लवलेश नसतो . त्या बापांची त्यांची मानसिक अवस्था पण अशीच असावी .