हवाई..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
4 Nov 2010 - 9:37 am

माझ्या ब्लॉगवरुन इथे मिपाकरांसाठी पुन्हा पब्लिश करतोय. आपल्या परिवारात मला स्वीकाराल अशी खात्री आहे.

..................................................................................................................

मी फ्लाईंग करत होतो तेव्हा डिजिटल कॅमेरे आले नव्हते. त्यामुळे जे काही फोटो मी काढले ते सर्व ३५ mm रोलवर. आज मला वाटलं की आपल्यापैकी बरेचजण कार चालवतात, त्याच शैलीत विमान कसं चालवलं जातं हे सांगावं.

मग मी उडवलेल्या सेस्ना १५२ विमानाच्या कॉकपिटचा फोटो स्कॅन केला. पण अगदी खराब दिसत होता. शेवटी मी एक सेस्ना १५२ च्या कॉकपिटचाच पण जरा बरा असा फोटो नेटवरून मिळवला. त्यात पार्टसना छोट्या नावाने प्लॉट केलं आणि आता ते काय आहे ते सांगणार आहे.

सॉरी. याहून कन्व्हीनियन्ट तंत्र मला येत नाहीये अजून.
दमलात तर सोडून द्या.

पहिली गोष्ट म्हणजे तुमची सीट डावीकडची. . पायलट तिथेच बसतो. को पायलट किंवा पॅसेंजर उजवीकडे.

सेस्ना असो किंवा बोईंग सर्व कंट्रोल तसेच, पार्टस तसेच आणि लॉजिकही तसंच. फक्त सोफीस्टीकेशनचा आणि आकाराचा फरक..

समोरच छाती पोटाशी ते जे CC लिहिलेलं दोन शिंगांसारखं प्रकरण आहे तो कंट्रोल कॉलम आहे. त्याला ब-याच दिशांनी हलवता येतं.

कंट्रोल कॉलम पुढे ढकलणं-मागे ओढणं या मूव्हमेंटनं विमानाच्या मागच्या शेपटीच्या भागात असलेले एलेव्हेटर्स वरखाली होतात. एलेव्हेटर्स खालच्या फोटोत दाखवलेत.

कंट्रोल कॉलम मागे ओढला की एलेव्हेटर्स वर जातात. यामुळे प्रचंड वेगाने समोरून येणारी हवा त्यांना खाली दाबते. शेपटीचा भाग खाली दाबला गेला की अर्थात विमानाचं नाक वर जातं.

कंट्रोल कॉलम पुढे ढकलला की एलेव्हेटर्स खाली जातात. यामुळे समोरून येणारी हवा त्यांना वरच्या दिशेने दाबते. शेपटीचा भाग वर दाबला गेला की अर्थात विमानाचं नाक खाली जातं. या मूव्हमेंटला "पिच" म्हणतात.

समजा कंट्रोल कॉलम ओढून किंवा दाबून तुम्ही विमान हवेत वर चढवता आहात किंवा खाली उतरवता आहात, तर तितका वेळ एकाच पोझिशनमध्ये कंट्रोल कॉलम धरून ठेवणं अवघड आहे. म्हणजे हाताला रगही लागेल आणि थोड्याशा थरथरीमुळेही कॉलम हलत राहील. म्हणून "TW" अर्थात ट्रिमिंग व्हील दिलंय. एका पोझिशन मध्ये कंट्रोल कॉलम ओढून धरा आणि ट्रिम व्हील फिरवत फिरवत ती पोझिशन लॉक करून टाका. ट्रिम व्हील मुळे आपल्या हातावरचं लोड कमी होतं आणि कॉलम ठरवून दिलेल्या पोझिशनला लॉक होतो. (फक्त "पिच" मूव्हमेंटसाठी. बाकीच्या मूव्हमेंट्स आपण करू शकतो. ).

कंट्रोल कॉलम डावीकडे झुकवला (स्टीअरिंग सारखा) की डाव्या पंखावरचा एलीरॉन हा पार्ट वर जातो. एलीरॉन्स खाली दाखवले आहेत.

डावा एलीरॉन वर गेला की डाव्या बाजूच्या पंखावर ड्रॅग वाढतो आणि तो पंख खाली दाबला जातो. त्यामुळे उजवा पंख वर येतो. यामुळे विमान डावीकडे कलतं. तसंच उजव्या बाजूचंही..या मूव्हमेंटला "रोल" म्हणतात.

पायाशी ती "RP" लिहिलेली पेडल्स दिसताहेत. ती रडर पेडल्स आहेत (रडार नव्हे..). ती विमानाला डावी - उजवीकडे वळवायला वापरतात.

डावं रडर पेडल दाबलं की "रडर" म्हणजेच विमानाच्या शेपटावर असलेला उभा पंख डावीकडे झुकतो. मग विमानाचं शेपूट समोरून येणा-या हवेच्या दाबानं उजवीकडे दाबलं जातं आणि त्यामुळे नाक डावीकडे. म्हणजे एकून तुम्ही ज्या बाजूचं रडर पेडल दाबाल त्या बाजूलाच विमान वळेल. कारसारखं..पण हवेत. या मूव्हमेंटला "यॉ" म्हणतात.

रडर पेडलचाच वरचा भाग "B " म्हणजे व्हील ब्रेक्स. पायाच्या बोटांच्या बाजूने वर दाब दिला की ब्रेक लागतात. पण अर्थात ते विमान जमिनीवर असतानाच.

आता गंमत सुरु. म्हणजे असं आहे की "रोल" केलं की आपोआप विमानाचं नाक रोल च्या दिशेने थोडं "यॉ" होतंच. तो रोलचा "साईड इफेक्ट" आहे. आणि "यॉ" केलं की पुन्हा "साईड इफेक्ट" म्हणून थोडा "रोल" होतोच. त्या एरोडायनॅमिक्समध्ये आत्ता जात नाही.

पण म्हणून मग हवेत "टर्न" करताना "यॉ" आणि "रोल" एकत्र आणि कोओर्डीनेशन ठेवून करावे लागतात. नाहीतर विमान हवेत स्किड होतं किंवा अनकंट्रोल्ड स्पिन मध्ये जाउन खाली कोसळू शकतं. आता हे कोओर्डीनेशन कसं जमवायचं?

पोटात येणा-या विचित्र फिलिंगमुळे हे समजतंच की टर्न कोओर्डीनेटेड नाहीये. पण तरीही त्यासाठी डॅशबोर्डवर डावीकडे एक "TB" लिहिलेली डायल आहे बघा. तो आहे "टर्न अँड बँक कोओर्डीनेटर". साधी एका काचेच्या नळीत लिक्विड भरून त्यात एक गोटी घातलेली आहे. ती गोटी न हिंदकळता नळीच्या मधोमध राहिली पाहिजे तर मग टर्न बरोबर बॅलन्स्ड आहे.

"TB" च्या वरतीच "AHI" आहे. ही डायल आहे आर्टीफिशियल होरायझन इंडिकेटरची. म्हणजे होतं काय की आकाशात असताना पायलटला ब-याच वेळेला (जवळ जवळ नेहमीच) क्षितीज रेषा दिसत नाही. त्यामुळे आपलं विमान जमिनीला समांतर उडतंय की खाली नाक करून डाईव्ह करतंय की वर चढतंय हे पायलटला कळत नाही. हे आपल्याला इथे बसून पटणार नाही. पण क्षितीजाचा संदर्भ फार गरजेचा असतो. म्हणून हे कृत्रिम क्षितीज जायरोस्कोपच्या मदतीनं तयार केलंय. त्यात निळं आहे ते आकाश, ब्राऊन आहे ती जमीन आणि छोटे विमान म्हणजे आपण..मग कळतं आपण तिरपे तारपे असलो की..खाली बघा:

"AHI" च्या खाली आहे "DG" म्हणजे डायरेक्शनल जायरो. हा जायरोस्कोप दिशा दाखवतो. अर्थात दिशेसाठी पायलटचा खरा भरवसा असतो साध्या सुध्या मॅग्नेटिक कंपासवर जो इथे फोटोत दिसत नाहीये. तो डोक्यावर समोर असतो. तो खाली दाखवलाय.

"AHI" च्या डावीकडे आहे "ASI" म्हणजे एअर स्पीड इंडिकेटर. एअर स्पीड म्हणजे विमानाचा स्पीड. आकाशात असताना विमानाचा हवेशी रिलेटिव्ह स्पीड म्हणजे एअर स्पीड. पण हवेतला. विमानाचा ग्राउंड स्पीड वेगळा असतो.

जर विमानाचा एअर स्पीड ५०० किलोमीटर पर अवर असेल आणि समोरून १०० किलोमीटर पर अवर वारा असेल तर जमिनीशी रिलेटिव्ह त्याचा स्पीड ४०० किलोमीटर पर अवरच होईल. आणि शेवटी त्याला जमिनीवरून जमिनीवरच जायचं असल्यामुळे त्याला दोन विमान तळांमधलं अंतर काटायला जास्त वेळ लागेल.

"ALT" हा आल्टीमीटर आहे. तो आपण आकाशात किती फूट उंच आहोत ते (हजारांत) दाखवतो. विमान खाली कोसळताना (स्टॉल,स्पिन वगैरेची प्रॅक्टिस करताना) या आल्टीमीटरचे काटे गारगारगार उलटे फिरतात तेव्हा धडकी भरते. ही मृत्यूघंटा आहे.

"RPM" हा इंजिनची रीव्होल्युशन्स पर मिनिट दाखवणारा इंडिकेटर आहे. बेसिकली आत्ता किती इंजिन पॉवर लागू झालेली आहे ते कळून ती कमीजास्त करायला मदत म्हणून.

"RAD" हे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन रेडिओ आहेत. एअरपोर्टच्या कंट्रोल टॉवरशी सतत संपर्क ठेवायचा असतो तो यातूनच. बाकीही सर्व रेडिओ स्टेशन्स लागतात त्यावर. बाय द वे. एक इन्टरेस्टिंग गोष्ट सांगतो. सर्व नेव्हीगेशनल एड्स बंद झाली तर ऑल इंडिया रेडिओचं स्टेशन ट्यून करून तुम्ही त्या स्टेशनच्या दिशेने नेव्हिगेट करू शकता. एकदा त्या आधारावर त्या शहराच्या वर पोचलात की एअरपोर्ट शोधून काढता येतो.

"F" म्हणजे फ्लॅप्स खाली करण्याची लिव्हर. हे फ्लॅप्स पंखांच्या मागच्या बाजूला एलीरोनच्या शेजारी असतात. आणि ते फक्त खालच्या दिशेत वळवता येतात. यामुळे पंखांची वक्रता (कॅम्बर) वाढून लिफ्ट वाढते (आणि अवरोधही वाढतो). लँडिंग आणि टेक ऑफच्या वेळी हे वापरतात. लँडिंगमध्ये अचानक उतरवण्याचा (खाली येण्याचा) वेग वाढवायचा असेल. (झरझर खाली) किंवा टेक ऑफला एखाद्या टेकडीला टाळण्यासाठी स्टीप टेक ऑफ घ्यायचा असेल,किंवा छोटा रनवे असल्यामुळे लवकर एअरबोर्न व्हायचं असेल तर फ्लॅप्स वापरतात.

मेंगलोर क्रॅशमध्ये विमान रनवेवर लँड होताना ओव्हरशूट झालं त्यामागेही फ्लॅप्स योग्य तेवढे खाली न केल्यामुळे विमान हवं तेवढं झरझर खाली (स्टीप ग्लाईडस्लोप) न उतरता शॅलो ग्लाईडस्लोपनं उतरलं आणि म्हणून उतरे उतरे पर्यंत खूप रनवे संपून गेला असं एक लॉजिक आहे.

"CBS" हे सर्किट ब्रेकर्स आहेत. म्हणजे फ्युजेस.

आता रनवेवर जाण्यासाठी थ्रोटल म्हणजे "T" (काळा नॉब) थोडासाच आत दाबा. म्हणजे प्रोपेलरच्या वेगाने ढकल मिळून विमान हळू हळू पुढे सरकेल. फास्ट चालणा-या माणसाच्या वेगाने विमान रनवेवर आणा. त्याहून फास्ट नको.

जमिनीवर असताना वळवण्यासाठी रडर पेडल्स आणि थांबण्यासाठी ब्रेक्स. कंट्रोल कॉलम ( स्टीअरिन्ग व्हील!!) चा आत्ता काही उपयोग नाही. ते सगळं हवेत गेल्यावर.

रनवेच्या सेंटर लाईनशी विमानाचं नाक जुळवा. क्लीअरंस मिळाला की बस. थ्रोटल पूर्ण आत दाबा. विमान जबरदस्त पॉवरने पाळायला लागेल. ते पेडल्सनीच कंट्रोल करून रनवेच्या सेंटर लाईनवर ठेवा. पन्नास नॉटसच्या स्पीडला हळू हळू विमानाचं नाक वर उठायला लागेलच. पंचावन साठचा स्टेडी स्पीड आला की हलकेच कंट्रोल कॉलम मागे खेचा. तुम्ही हवेत असाल..

(फोटो जालावरून साभार. हा शेवटचा फोटो मात्र माझा स्वत:चा.. )

तंत्रआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

4 Nov 2010 - 9:59 am | शुचि

वेगळाच लेख. मजा आली वाचायला.

एवढं सगळं वैमानिक लक्षात ठेवतात हे ऐकूनच पोटात गोळा आला. काही विसरलं तर काय होत असेल?

मठ्ठ प्रश्न आहे पण विचारते - आकाशामधून बरोब्बर त्याच मार्गाने विमान रोज कसं उडतं? म्हणजे हरवत कसं नाही? आकाश तर पोकळी आहे. चुकून भरकटत कसं नाही? दुसर्‍या शब्दात - >> एकदा त्या आधारावर त्या शहराच्या वर पोचलात की एअरपोर्ट शोधून काढता येतो. >> ते कसं??

गवि's picture

4 Nov 2010 - 2:59 pm | गवि

"आकाशामधून बरोब्बर त्याच मार्गाने विमान रोज कसं उडतं? म्हणजे हरवत कसं नाही? आकाश तर पोकळी आहे. चुकून भरकटत कसं नाही?"

नॅव्हिगेशनसाठी उपकरणं असतात त्यांचीच तर माहिती दिली आहे.

भरकटू शकतं. अगदी नाहीच असं नाही.

शहराच्या वर पोचलो आणि सर्व नॅव्हिगेशन इक्विपमेंट बंद असतील तर बघून (डोळ्यांनी) एअरपोर्ट शोधावा लागेल.

जर ढग नसतील तर ते सोपं आहे कारण वरुन सगळं शहरच एका दृष्टिक्षेपात दिसत असतं. त्यात रनवेची लांब रेषा कळतेच. इतकी लांब सरळ रेष इतर कुठे क्वचितच..

मॅप वगैरे असतात सोबत रूटचे.

नॅव्हिगेशनवर वेगळं लिहावं लागेल.

दोन ठिकाणांच्यामधे मात्र बोईंग वगैरे विमानं ऑटो पायलट वरच चालतात. पायलट फक्त लक्ष ठेवतो आणि लँडिंगपूर्वी कंट्रोल हाती घेतो.

शुचि's picture

4 Nov 2010 - 6:56 pm | शुचि

बापरे डोळ्यांनी बघून एअरपोर्ट शोधावं लागतं =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2010 - 10:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फुरसतीत समजून घेऊन वाचते. (आणि आणखी प्रश्नही विचारेन.) पण त्याआधी एवढे कष्ट घेऊन माहितीपूर्ण लेख टाकल्याबद्दल अनेक आभार.

गवि's picture

4 Nov 2010 - 10:17 am | गवि

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद..

कचेरीतून फुरसत मिळाली की नीट उत्तर द्यायला आवडेल. देईनच..

५० फक्त's picture

4 Nov 2010 - 11:18 am | ५० फक्त

एका वेगळ्याच विषयावरचा लेख त्यामुळं खुप छान वाटला.
टिम बिएचपि वर पण एकजण मालवाहु जहाजांबद्दल लिहितात तसंच काहि वाटतंय.

असेच लिहित रहा, पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

हर्षद

चाणाक्ष वाचकांनी पोस्टवरून ओळखले असेलच की हे आपले आवडते ब्लॉगर नचीकेत आहेत.
नचीकेतजींचे हार्दिक स्वागत!

शांतपणे वाचेन. माहितीपूर्ण आणि वेगळ्या विषयावरचा लेख टाकल्याबद्दल धन्यवाद.

सहज's picture

4 Nov 2010 - 3:04 pm | सहज

हा लेख वाचताना आताच अहमदाबाद मधे उडत होते. :-) सेसनाच आहे का हो?

सेस्ना 172 हॉक विमान आहे ते. अहमदाबाद एव्हिएशन अकेडमीचं.चार सीटर.bigger engine. बाकी सर्व 152 सारखं.रजिस्ट्रेशन मार्क पहा VT ABK

धमाल मुलगा's picture

4 Nov 2010 - 4:09 pm | धमाल मुलगा

मस्त सोप्या पध्दतीनं सांगितलं आहे.
छान लिहिलंय.

मिपावर मनःपुर्वक स्वागत. :)

विजुभाऊ's picture

25 Oct 2013 - 2:52 am | विजुभाऊ

बघ लेका धम्या.
इतक्या सोप्प्या मेथडने बिझनेस ऑब्जेक्ट तरी लिहिता येतात का?

योगेश सुदाम शिन्दे's picture

4 Nov 2010 - 5:22 pm | योगेश सुदाम शिन्दे

फारच माहितीपुर्न् लेख !!!

खुप वेगळा विषय निवडल्या बद्दल आभिनन्दन. वाचल्यावर समजले की आपल्याला यातले काहिच माहित न्हवते. या विषयीची अजुन माहिती चि आपेक्शा करतो.

अनिरुद्ध प's picture

25 Oct 2013 - 12:25 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

स्वाती२'s picture

4 Nov 2010 - 6:06 pm | स्वाती२

माहितीपूर्ण लेख आवडला!

लेख आवडला.
मला कोणीतरी विमान उडवायला शिकवतय असं वाटलं.
अर्थातच भीती वाटली.
टर्ब्युलंट फ्लाईट्समध्ये माझा रामनामाचा भरपूर जप झाला आहे.;)

सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! मिपावर आपले स्वागत.
(आज पहाटे अभ्यंग स्नान करून सर्वप्रथम तुमच्या लेखाला प्रतिक्रिया द्यायला बसलो आहे.)

तसा विमाने, रॉकेट, होड्या यांच्या आमचा संबंध खूप जुना, म्हणजे अगदी लहानपणा पासूनचा.
लहानपणी रद्दीतील कागदाचे विमान उडविताना, आणि वर आकाशात विमान जाताना दिसले कि हाताची नखे एकमेकांवर घासत 'विमान विमान कौडी दे' अश्या आरोळ्या देत इकडून तिकडे पळत असू.
लहानपणी कागदाचे विमान, नंतर शाळा कॉलेजात रॉकेट करून उडवीत असताना ते दिवस किती भुर्रकन उडून गेले याची जाणीव झाली.

विमानाला पंख असतात, आणि रोकेटला पंख नसतात, इतकाच काय तो फरक आम्हाला माहित. यापलीकडे या यंत्रान विषयी जास्त जाणून घेता आले नाही. हवाई सफर काय अजून झाला नाही. पण आपल्या लेखातील सोप्या भाषेमुळे मी (आणि माझा एक १४ वर्षाचा लहान मावसभाऊ देखील) हा लेख समजून घेऊ शकतो.

असो,
ह्या क्षेत्राविषयी तुमचे अनुभव आणि पुढे अंतराळ क्षेत्र ह्या विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
बाकी, तुमच्या ब्लॉगवरील लेखन आवडले.

गवि's picture

4 Nov 2010 - 7:58 pm | गवि

इतका प्रतिसाद मिळाल्यामुळे खूप खूप बरं वाटलं.

हपीसात अजून बसलोय आणि कामाने मेलोय.

सर्वांना नक्की सविस्तर उत्तर लिहीन.

सध्या सस्नेह धन्यवाद..

सोप्या शब्दातला माहितीपुर्ण लेख आवडला. लक्षात राहण्यासाठी परत एकदा वाचेन.

चिगो's picture

4 Nov 2010 - 8:38 pm | चिगो

मस्तच... अगदी सोप्या भाषेत सांगितलं.. धन्यु..
अवांतर : Air Force वर ऐकलेली एक कमेंट आठवली.. Less Force n More Airs..

प्राजु's picture

4 Nov 2010 - 9:16 pm | प्राजु

एकदम अपरिचीत काहीतरी वाचल्याचं समाधान झालं. धन्यवाद.
मस्तच. तुमचे 'हवे'तले अनुभव वाचायला खूप आवडेल.
नक्की लिहा. :)
तुम्हाला आणी तुमच्या कुटुबियांना शुभ दिपावली!

थँक्स प्राजक्ता.लिहिलंय यापूर्वीच थोडं हवेतलं माझ्य ब्लॉगवर.नंतर इथे पोस्ट करीन

छान सोप्या शब्दात लिहिलंय. एका नव्या प्रांताची ओळख करून दिल्याबद्धल आभार.
यॉ, रोल व पिच हे शब्द मी मोबाइल (आय्फोन किंवा तत्सम) फोन च्या ओरिएंटेशन च्या संदर्भात वाचले आहेत. पण त्याचा उगम इथे आहे हे समजलं.
(माझ्याकडे (आय्फोन किंवा तत्सम) फोन आहे हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न :) ) *

गवि's picture

4 Nov 2010 - 9:40 pm | गवि

:-)

टिउ's picture

5 Nov 2010 - 12:58 am | टिउ

खुपच सोप्या शब्दात समजावलं आहे. अर्थात वाचुन जितकं सोप्पं वाटतं त्याहुन प्रत्यक्षात खुपच अवघड असेल हे पण माहिती आहेच.

शहराजाद's picture

5 Nov 2010 - 8:12 am | शहराजाद

लेख आवडला. सोप्या भाषेत खूप चांगली माहिती दिलीत. जुन्या आठवणी जाग्या केल्यात.

आंसमा शख्स's picture

5 Nov 2010 - 8:47 am | आंसमा शख्स

आपल्या लेखनाचा जवाब नही! अजून लिहा.

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Nov 2010 - 1:46 am | लॉरी टांगटूंगकर

टेस्ट द्राईव मीळेल का बॉस???

शेखर's picture

16 Nov 2010 - 1:56 am | शेखर

लायसेंन्स आहे का? ;)

आमच्या फिल्डबद्दल लेख लिहल्याबद्दल विहारींचे अभिनंदन! ;-)

बाकी रोल-पिच-यॉ करता हे चित्र उपयोगी पडेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Nov 2010 - 6:43 pm | लॉरी टांगटूंगकर

गाय्रोस्कॉप मध्ये spin axis ठरवली त्या नंतर त्याला perpendicular axis मंजे precession axis आणि दोघांना perpendicular gyroscopic couple vector तर मला हे समजले नाही कि precession axis कशाच्या आधारावर ठरवायची ?कारण spin axis la perpendicular म्हणले तर ते plane असते .तर थोडे स्पष्ट करा

गवि's picture

17 Nov 2010 - 2:10 pm | गवि

प्रश्नाची बॅकग्राउंड कळत नाही.

मला वाटते आपण लॅब मधला जायरो पाहून हे विचारत असावेत.

हा कॉकपिटमधला जायरो (डायरेक्शनल जायरो किंवा डी.जी.) टू डिग्री ऑफ फ्रीडम जायरो असतो. त्यात स्पिन अक्सिस क्षितिज समांतर ठेवण्यासाठी अरेंजमेंट असते. (स्लेव्हड जायरो)

पण तरीही हा जायरो हळूहळू प्रेसेस (भरकटणे) होतच राहतो. त्यामुळे तिथे दिलेला नॉब वापरुन (मूळ कॉकपिटचे दिलेले चित्र पहा) मॅग्नेटिक कंपास सोबत ताडून मधून मधून तो रिसेट करावा लागतो. (वीस तीस मिनिटांतून एकदा किंवा लक्ष जाईल तेव्हा..:-) )

मी आपला प्रश्न वेगळ्याच दिशेत घेऊन गेलो असलो तर सॉरी. परत स्पष्ट करुन विचारा.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Nov 2010 - 3:09 pm | लॉरी टांगटूंगकर

गायरो बरोबर कि जायरो ???

हम्म एकंदरीत gyroscopic effect बद्दलच विचारतोय .इथे विमानामुळे(वळताना) precession axis बदलेल आणि त्या मुळे reactive couple तयार होऊन आपल्याला सुई चे डिफ्लेक्क्ष्न मीळेल .असेच ना???

तर माझा प्रश्न असा आहे कि precession axis कशी ठरवायची?कारण जर का नुसतेच perpendicular म्हणले तर ते प्रतल असेल..................

जायरो हा उच्चार माझ्या फ्लाईंग शिकत असतानाच्या काळात आणि मग एअरलाईनमधे ग्राऊंड जॉब करतानाही सगळीकडे स्टँडर्ड असल्याचं दिसलं.

मुद्दा दोनः precession axis असा जो शब्द तुम्ही वापरला आहे तो गोंधळपूर्ण आहे. precession ही एक दोषयुक्त क्रिया आहे की जी विमानाच्या आत अपरिहार्य असणा-या घर्षणाने होते. (डेव्हिएशन प्रमाणे) त्याचा axis म्हणजे काय? तो कशाला ठरवायचा?

ओके..भरकटलेला अक्ष (याला जर तुम्ही precession axis म्हणत असाल तर) त्याला दर थोड्या वेळाने सध्या आहे त्या परिस्थितीत पुन्हा व्हर्टिकल पोझिशन मधे आणण्यासाठी तिथे नॉब दिलेला असतो. मॅग्नेटिक कंपास बघून त्यातली दिशा (हेडिंग) जे असेल तेच जायरोमधे नॉब वापरून सेट केलं की अक्ष पुन्हा बरोबर होतो. आतले मेकॅनिझम माहीत नाही.

एअरनॅव्हिगेशनची परीक्षा देऊन आता १५ वर्षं झाली. तरीही मला जे माहीत आहे त्यावरून त्यातल्या जिंबल रिंग्जची (गिंबल म्हणा हवं तर) अरेंजमेंट अशी केलेली असते की क्षितिजरेषा-समांतर प्रतल हेच त्या तबकडीच्या रूपात पायलटला दिसते. त्यावर असलेला तो विमानाचा आयकॉन हेच जणू विमान आणि horizontal जायरो प्लेन म्हणजेच ती आकडे वाली तबकडी ऊर्फ आपले क्षितिज असे समजून नॅव्हिगेट केले जाते.

वास्तविक याला "जायरो होरायझन" म्हणायला हवे. तत्व तेच असले तरी अगदी टेक्निकली बोलायचे तर "डायरेक्शनल जायरो" हा नुसते आकडे दाखवणार्‍या कंपाससारखा दिसतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Nov 2010 - 6:29 pm | लॉरी टांगटूंगकर

ओ के
अजुन वाचायला हवे !

माहिती बद्दल धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2010 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी!!!!!!!

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2010 - 3:14 pm | स्वाती दिनेश

हा लेख वाचताना गगनविहारी आयडी घेण्याचे कारण समजले...
वेगळ्या विषयावरचा माहितीपूर्ण लेख आवडला.
स्वाती

सुबोध खरे's picture

25 Oct 2013 - 10:06 am | सुबोध खरे

ग वि साहेब, अत्यंत साध्या आणी सोप्या भाषेत इतके उत्तम वर्णन केल्या बद्दल आपले शतशः आभार.
काही अवांतर माहिती -
मिग २१ चा उड्डाण करतानाचा वेग हा ३४० ते ३७० किमी/ तास असतो आणी उतरतानाचा कमीत कमी वेग २७० किमी/ तास इतका प्रचंड असतो. मी आजतागायत मोटार सुद्धा १५० कि मी पेक्षा जास्त वेगात चालविलेली नाही .http://www.dcs-mig21.com/specification.htm सेसना चा हा वेग ९० किमी/ तास (५० नॉट)हे केवळ तुलनेसाठी दिले आहे. सेसना चालविणे सुद्धा अजिबात सोपे नाही
यामुळेच मिग २१ उडवताना किंवा उतरताना जराशी चूक सुद्धा जीवावर बेतते. इतकी वर्षे सरकारच्या दिरंगाई मुळे जेट शिकाऊ विमान न आणल्यामुळे अनेक तरुण वैमानिकांना नाहक जीव गमवावे लागले.( कारण साध्या विमानात प्रशिक्षण घेऊन एकदम मिग २१ वर गेल्यावर थोड्याशा चुकीला क्षमा नाही त्यातून शेवटची मिग २१ हि १९७२ सालच्या तंत्रज्ञानाची आहेत( त्या सालची मोटार सुद्धा वापरायला मी तयार होणार नाही)

इतकी वर्षे सरकारच्या दिरंगाई मुळे जेट शिकाऊ विमान न आणल्यामुळे अनेक तरुण वैमानिकांना नाहक जीव गमवावे लागले.( कारण साध्या विमानात प्रशिक्षण घेऊन एकदम मिग २१ वर गेल्यावर थोड्याशा चुकीला क्षमा नाही त्यातून शेवटची मिग २१ हि १९७२ सालच्या तंत्रज्ञानाची आहेत( त्या सालची मोटार सुद्धा वापरायला मी तयार होणार नाही)
यावरुन एक लक्षात येत की आपल्या सरकारला एअर फोर्स पायलटची आणि त्यांच्या आयुष्याची किंमत नाही !
२०१२ पर्यंत 482 मिग अपघातात १७१ पायलट स्वतःचा प्राण गमावुन बसले आहेत त्यात अजुन किती भर पडली असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी !

भटक्य आणि उनाड's picture

25 Oct 2013 - 12:12 pm | भटक्य आणि उनाड

तरुण पायलट लोक सुर्यकिरण वर शिकतात.. त्याचा उतरतानाचा कमीत कमी वेग २ फीट्/से. असतो..आणि जेव्हा ते मिग २१ उडवतात.. त्याचा उतरतानाचा कमीत कमी वेग १० फीट्/से. असतो.. जवळपास पाच पटीने जास्त.. तरीसुधा आपले बहाद्दर पायलट लोक काहिच पर्याय नसल्याने जोखिम स्विकारतात.. त्याना मानले पाहिजे.. तरी आजकाल नवी विमाने घेतली आहेत असे ऐकुन आहे..

भटक्य आणि उनाड's picture

25 Oct 2013 - 12:16 pm | भटक्य आणि उनाड

धावपट्टी वर असे आकडे असतात.. ३५,२२,१३ त्याचा काय अर्थ होतो गवि???

गवि's picture

25 Oct 2013 - 12:23 pm | गवि

अन्यत्र लिहीलं होतं त्यातून सध्या काही अंश चोप्य पस्ते:

इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा.

या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात.

इ.इ.इ.

A

मूळ धागा:

http://www.misalpav.com/node/19258

अग्निकोल्हा's picture

25 Oct 2013 - 1:16 pm | अग्निकोल्हा

हे एडवांस रोल पिच यो करताना गिम्बल लोक सिचुएशन कशी हाताळतात ?

पाणिनी सव्यसाची's picture

26 Oct 2013 - 10:33 am | पाणिनी सव्यसाची

आपल्या यापूर्वी केलेल्या लेखनाचे दुवे मिळाल्यास आभारी राहीन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Oct 2013 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मजा आली वाचताना. मला वाटतं आता तुमचे सगळे जुने धागे उकरून काढायला लागणार :)

सौरभ कुलकर्णी's picture

23 Sep 2017 - 1:06 pm | सौरभ कुलकर्णी

परवा मुंबई विमानतळावर स्पाईसजेट विमान चिखलात रुतल्याची बातमी वाचली आणि गवि यांच्या टेनेरीफ हवाई दुर्घटनेवरील लेखाची आठवण झाली.

पण त्या लेखाची आणि गवि यांच्या इतर हवाई लेखमालिकेची लिंक सापडेना.

कुणाला माहीत असल्यास इथे डकवावी.