भाषाविज्ञान परिचय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
29 Oct 2010 - 10:49 am

महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमधे बी.ए.च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'आधुनिक भाषा विज्ञानाचा' अंतर्भाव केलेला दिसतो. भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरुप, कार्य वगैरे यावर प्राथमिक स्वरुपात जसा अभ्यास असतो त्या प्रमाणे भाषाविज्ञानाचाही अभ्यासही असतो. पारंपरिक भाषाभ्यासाबरोबर आज आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आता महत्त्वाचा मानला जात आहे. भाषाविज्ञान म्हणजे केवळ व्याकरण नसते तर, मुखावाटे कोणते अवयव ध्वनी निर्माण करतात कोणते ध्वनी भाषेमधे वापरले जातात. ध्वनीच्या रचना कशा होतात त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात. भाषेच्या उपयोगाबरोबर सर्व भाषांना लावता येतील असे काही भाषाविषयक नियम असतील का, तसेच भाषेच्या विविध रुपाबरोबर, भाषेचा इतिहास, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचाही विचार भाषाविज्ञानात होत असतो.

भाषाभ्यासकांना अधिक अभ्यास करता येईल यासाठी 'भाषाविज्ञान परिचय’ या पुस्तकाची मदत होईल असे वाटते. 'मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ.अंजली सोमण,डॉ.द.दि.पुंडे आणि डॉ.स.ग. मालशे यांच्या संपादीत लेखन संग्रहाचे पुस्तक म्हणजे 'भाषाविज्नान परिचय’ होय. प्रत्येक लेखकाचे तीन असे एकूण नऊ लेखांचा हा संग्रह. भाषेचे स्वरुप, स्वनविज्ञान,स्वनिम विचार, हे डॉ.अंजली सोमण यांचे लेख. रुपिम आणि पदविचार, वाक्यविचार, भाषेचे उच्चारण हे डॉ.द.दि.पुंडे यांचे लेख तर डॉ.स.ग.मालशे यांचे प्रमाणभाषा आणि बोली, मराठीच्या प्रमुख बोली आणि मराठीचा शब्द संग्रह असे लेख आहेत.

भाषाविज्ञान या पुस्तकात स्वनविज्ञानाचा विचार मांडलेला आहे. जसे, मानवी मुखाद्वारे अनेक ध्वनी निर्माण होतात पण सर्वच ध्वनी भाषेमधे वापरले जात नाहीत. मुखावाटे निर्माण झालेले आणि भाषेत वापरल्या जाणा-या ध्वनींना 'स्वन’ असे म्हणतात. जसे, जांभई दिल्यानंतर निर्माण होणारा आवाज हा ध्वनी आहे पण तो स्वन नाही. स्वननिर्मिती करणारे वागेंद्रिये, त्याची रचना, त्याचे स्वरुप आणि त्याचे कार्य यांचा अभ्यास या पुस्तकात आहे.

रुपिम आणि पदविचाराच्या बाबतीत शब्द आणि रुपिका यात ब-याचदा घोटाळा होत असतो. रुपिका म्हणजे शब्दांचा अंतिम घटक. सर्वच शब्दांचे असे नसते. काही शब्दांचे विभाजन होत असते. उदा. विद्यार्थी. विद्या=अर्थ=ई हे असे तीन अर्थघटक दिसतात. हुशार या शब्दाचे असे अर्थदृष्ट्या आणखी विभाजन होणे शक्य होत नाही. याचा अर्थ हुशार हा शब्दही आणि रुपिकाही आहे. पण प्रत्येक शब्द हा रुपिका असेलच असे नाही. पदविचार, वाक्यविचार, वाक्याचे स्वरुप या आणि अशा विविध घटकांचे विश्लेषण इथे अभ्यासता येते.

भाषा उच्चारण आणि लेखन या लेखात लेखक स्पष्ट करतात की, भाषा प्रथम बोलल्या जाते आणि मग तिचे लेखन होते, होऊ शकते. लेखन हे बोलल्या जाणाया भाषेच्या मानाने दुय्यम आहे. जितके बोलतो त्यामानाने आपण कमी लिहित असतो. त्यामुळे लिहिली जाते तीच भाषा असे काही म्हणता येणार नाही. जी बोलली जाते तीच भाषा आणि भाषेमधे बोलणे किंवा उच्चारण महत्त्वाचे आहे. उच्चारणात भाषेचे अस्तित्त्व क्षणकाल असते तर लेखनात चिरकाल असते. भाषेतील ध्वनींचे प्रत्यक्ष उच्चारण व त्याचे लेखन यात भाषेचे उच्चारण आणि आणि लेखनातील अंतर अटळ आहे असे लेखक म्हणतात. उदा. मुलगा [मुल्गा] माश्या [माशा] ऋषी [रुशी] त्याबद्दलही विवेचन या पुस्तकात वाचता येईल.

प्रमाणभाषा आणि बोली याबाबतीत 'चांद्यापासून बांद्यापर्यंत' उभ्या महाराष्ट्रासाठी मराठी भाषेचे एक सर्वमान्य रुप आपण गृहीत धरले पाहिजे असे लेखक म्हणतात. व्याकरण, परंपराप्राप्त देवनागरी लिपी, लेखनाचे नियम यांनी युक्त अशी प्रमाणभाषेला आपण शिष्टमान्यता दिलेली आहे. प्रमाणभाषेतून आपले आकलन, दळवळण चाललेले असते त्याचबरोबर प्रमाणभाषाही सुद्धा एक बोलीच असते. प्रमाणभाषेत जसे व्याकरण शब्दकोश रचले जातात; तद्वतच स्थानिक बोलींचीही व्याकरण शब्दकोश रचणे शक्य असते. विविधता, वैचित्र्य, ही बोलींची प्रकृती असते. प्रमाणभाषा, बोलीभाषेचे स्वरुप, निर्मितीची कारणे, परस्पर संबंध, भाषिक स्तरभेद याचे विवेचनही इथे अभ्यासता येईल.

मराठीच्या प्रमुख बोली या प्रकरणात वहाडी, नागपूरी, हळबी, अहिराणी, डांगी आणि कोकणी या प्रमुख बोलींचा परिचयाबरोबर बोलीची उच्चारणप्रक्रिया, व्याकरणिक प्रक्रिया, नामविभक्ती, याचेही विवेचन यात वाचता येईल.

मराठी भाषेतील शब्दसंग्रहाच्या निमित्ताने अन्य भाषांच्या प्रवाहांची चर्चा या शेवटच्या प्रकरणात आहे. लेखक म्हणतो की ” आज अवकाशयानांच्या युगातून आपण जात आहोत. ज्ञाविज्ञानाच्या विकासाचा वेग वाढतो आहे तेव्हा नवसंकल्पनांचे शब्दांकन दृतगतीने करावे लागणार आहे. तेव्हा शद्बाकंनाचे कार्य विद्यापीठीय पातळीवर झाले पाहिजे अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतात. परिशिष्टात ’मराठी साहित्य महामंडळाचे लेखनविषयक नियम दिले आहेत.

सारांश, भाषेच्या अभ्यासकांना, हौशी वाचकांना 'भाषाविज्ञानाचा' परिचय होण्यासाठी सदरील पूस्तक मार्गदर्शक ठरेल असे म्हटले तर वावगे ठरु नये.

भाषाविज्नान.

भाषाविज्ञान परिचय
लेखक : डॉ.स.ग.मालशे
डॉ.द.दि.पुंडे , डॉ.अंजली सोमण.

प्रकाशक :
पद्मगंधा प्रकाशन
३६/११ धन्वंतरी सह.गृहसंस्था
पांडुरंग कॉलनी, एरंडवण
पुणे- ४११०३८
मूल्य-१०० रु.

भाषावाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Oct 2010 - 11:18 am | अवलिया

उत्तम परिचय !

>>>आज अवकाशयानांच्या युगातून आपण जात आहोत. ज्ञाविज्ञानाच्या विकासाचा वेग वाढतो आहे तेव्हा नवसंकल्पनांचे शब्दांकन दृतगतीने करावे लागणार आहे. तेव्हा शद्बाकंनाचे कार्य विद्यापीठीय पातळीवर झाले पाहिजे अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतात.

म्हणजे नक्की काय? नवीन शब्द बनवणे का? दुसर्‍या भाषेतील शब्दांचे मराठीकरण का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन शब्द बनवणे या अर्थाने असावे. इतर भाषेतील शब्दांचेही मराठीकरण [पर्यायी शब्द ] याही अर्थाने मराठी शब्दांचा संग्रह वाढावा अशा अर्थाने त्यांनी तसे म्हटले असावे असे वाटते.

प्रतिक्रियेबद्दल धन्यु.....!

-दिलीप बिरुटे

अच्छा !

मग असे शब्द बनवतांना प्रक्रिया काय वापरली जाणार?

आणि जर एखादी ठराविक प्रक्रिया वापरुन जर शब्द बनवणार असु तर त्यासाठी विद्यापीठीय कुबड्यांची गरजच काय? प्रक्रिया जाहीर करा ! प्रत्येक जण बनवेल शब्द !!

आणि जर प्रक्रिया नसेल तर शब्द असे कोणत्याही प्रक्रियेविना बनवता येतात का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषेच्या विकासासाठी प्रत्येकाने शब्दसंग्रह वाढविला पाहिजे. शब्द रुढ झाले म्हणजे ते भाषेच्या व्यवहारात येतील. ’आंबा’ यास ’आंबा’ का म्हणायचे हे काही विद्यापीठाने ठरविले नाही तर आंबा या शब्दाला समाज मान्यता दिली आहे म्हणून त्याला आंबा म्हणायचे. साधारणत: शब्दांची प्रक्रिया अशी सुरु होते. विद्यापीठांमधे भाषेचे अभ्यासक असतात तेव्हा त्यांनी नव-नवीन शब्दांचे संग्रह करणे. शब्द रुढ करणे, अशी अपेक्षा लेखक व्यक्त करत असावे.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

29 Oct 2010 - 11:44 am | अवलिया

>>>विद्यापीठांमधे भाषेचे अभ्यासक असतात तेव्हा त्यांनी नव-नवीन शब्दांचे संग्रह करणे.

समजले. म्हणजे अभ्यासकांनी फक्त अमुक अमुक शब्द या भागात/प्रदेशात/भाषेत बोलले जात आहेत असा संग्रह करावा. ते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत अशी टिपण्णी करणे अपेक्षित नाही हेच यातुन सुचित होत आहे.

आणि शब्द रुढ होणे न होणे हे केवळ आणि केवळ समाजाच्या इच्छेवर आहे. कुणा एकाच्या पसंती नापसंतीचा प्रश्न उद्भवतच नाही.

धमाल मुलगा's picture

29 Oct 2010 - 9:20 pm | धमाल मुलगा

ह्म्म...

म्हणजे आम्ही लोक इंग्रजी विकेंड मराठीत ओढून ताणून गंमत म्हणोन बसवताना त्याचा 'विकांत' करुन म्हणायला लागलो आणि त्याची आता सवयच लागली... कदाचित असंच गमतीगमतीमध्ये किंवा आवडलं म्हणून आणखी चार जणांनी हे विकांत उचललं, त्यांचं ऐकून आणखी सोळा जणांनी असं करत करत हा शब्द रुढ झाला तर तो नवा शब्द मराठीमध्ये आला असं म्हणलं जाऊ शकेल तसंच का हे?

धनंजय's picture

29 Oct 2010 - 10:39 pm | धनंजय

असेच.

पण अनेक शब्द रूढ होतील अशा तर्‍हेने बनवणे, यासाठी प्रतिभा फार मोठी लागते.

(एखाद्या गाण्याची धुन जोवर खूप लोक गुणगुणू लागत नाहीत, तोवर ती धुन "यशस्वी" नसते. म्हणजे "यशा"साठी एक संगीतकाराची वैयक्तिक आवड पुरत नाही, लोकांचा सहभाग लागतो. मात्र तशी धुन बसवू शकणारे संगीतकार थोडेच असतात. तसेच काही.)

बेसनलाडू's picture

30 Oct 2010 - 1:40 am | बेसनलाडू

वीकान्त न म्हणता, सप्ताहान्त नक्कीच म्हणता येते; सोपेही आहे. मराठी शब्दांच्या वापराचा किंवा नवनिर्मितीचा इतकाच धोषा असेल, तर भेसळयुक्त मराठी शब्द नकोत (वीकान्त, धन्स, धन्यू इ.) इतकेच माझे म्हणणे. पर्यायी शब्दनिर्मिती आणि उपयोजनास ना नाही, पण शक्य तेथे आणि शक्य तेव्हढी भेसळ टाळली जावी, असे प्रामाणिकपणे वाटते.
सप्ताहान्त म्हणण्यापेक्षा वीकान्त म्हणणे जास्त 'कूल' आहे, असा प्रतिवाद असेल, तर मग बोलणेच खुंटले.
(असहमत)बेसनलाडू

समंजस's picture

29 Oct 2010 - 11:42 am | समंजस

चांगला दिसतोय. पुस्तकाचा उपयोग भाषा विज्ञानाचा अभ्यास करणार्‍यांना होईल असे दिसतेय.
परंतू भाषा विज्ञानाचा अभ्यास करून भाषेचा विकास कितपत होतो? किंवा भाषेचा प्रसार-प्रचार कितपत होतो? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>भाषा विज्ञानाचा अभ्यास करून भाषेचा विकास कितपत होतो? किंवा भाषेचा प्रसार-प्रचार कितपत होतो? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

भाषाविज्ञानाच्या अभ्यासात भाषेचा वापर समाजात कसा होतो, भाषा कशी बोलल्या जाते, भाषेवर परिणाम करणारे घटक कोणते, भाषेतील भेद, लिपी व्यवस्था, भाषानियम, शब्दकोश, भाषेंची तुलना, व्याकरण या सर्व घटकांचा विचार भाषाविज्ञानात असतो. त्याचा भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी उपयोग कसा होतो त्यावर पुन्हा कधीतरी असेच काहीतरी खरडेन.

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 1:14 pm | विसोबा खेचर

सर, छान परिक्षण..

तात्या.

पाषाणभेद's picture

29 Oct 2010 - 1:47 pm | पाषाणभेद

डॉक्टर साहेब छान परीचय करून दिलेला आहे.

चित्रा's picture

29 Oct 2010 - 5:47 pm | चित्रा

उत्तम लेखन.
बरीच माहिती मिळाली. जसे "स्वन"
याची उदाहरणे काय देता येतील?
'हम्म' हा ध्वनी स्वन म्हणता येईल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वनाची व्याक्या करतांनाच असे म्हटले गेले आहे की, '' भाषिक व्यवहारामधे ज्या मानवनिर्मित ध्वनींचा उपयोग केला जातो त्याला 'स्वन' असे म्हणतात' तेव्हा भाषिक व्यवहारात 'हम्म' चा उपयोग होतो म्हणून त्याला स्वन म्हटले पाहिजे.

चिमण्यांची चिव चिव, विमानाची घरघर, रेल्वेचा खडखडाट, हे ध्वनी आहेत पण ते स्वन नाही कारण स्वनांची पहिली अट ही आहे की, मानवी मुखाद्वारे निर्माण झालेले ध्वनी आणि दुसरी अट की त्यांचा भाषिक व्यवहारात उपयोग.

-दिलीप बिरुटे

क्रेमर's picture

29 Oct 2010 - 6:52 pm | क्रेमर

पुस्तक परिचय आवडला.

भाषेतील ध्वनींचे प्रत्यक्ष उच्चारण व त्याचे लेखन यात भाषेचे उच्चारण आणि आणि लेखनातील अंतर अटळ आहे असे लेखक म्हणतात.

प्रत्यक्ष उच्चारण आणि लेखन यात फरक असणे अपरिहार्य आहे. ही अपरिहार्यता जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे तशी कमी होत असावी असे वाटते. भाषातज्ज्ञ लेखनाची व्याख्या कशी करतात हेही यासंदर्भात महत्त्वाचे आहे. उदा. ध्वनीमुद्रणामुळे उच्चारण जसेच्या तसे जपता येणे शक्य आहे. (पण ध्वनीमुद्रणास लेखन म्हणता येईल किंवा नाही हे लेखनाच्या व्याख्येवर अवलंबून असावे.)

इन्द्र्राज पवार's picture

29 Oct 2010 - 6:58 pm | इन्द्र्राज पवार

"....जी बोलली जाते तीच भाषा आणि भाषेमधे बोलणे किंवा उच्चारण महत्त्वाचे आहे. ..."

~ भाषाविकासाच्या सर्वंकष दृष्टिकानातून पुस्तकातील हा विचार फार महत्वाचा आहे आणि जर तो अभ्यासक्रमात रितसर मांडला (इथे 'रितसर' वर मी जाणीवपूर्वक जोर देत आहे. विद्यापीठीय क्रमिक पुस्तकातून जे काही असते ते जशेच्या तसेच विद्यार्थ्यांपुढे येतेच या भ्रमात कुणी राहू नये. शेवटी 'CHB' वर असलेल्या प्राध्यापकाच्या कुवतीचा हा प्रश्न आहे की तो हा विचार मुलांच्या ~ इथे 'मुले' म्हणजे पूर्ण वाढ झालेला विद्यार्थी....केजी वा प्राथमिक यत्तातील नव्हे.. ~ मनी कसा रुजेल हे पाहील किंवा त्याला टाळून पुढे जाईल).

भाषा विज्ञानाच्या संदर्भात डॉ.बिरुटे यांनी त्या पुस्तकाच्या आधारे इथे जे विवेचन केले आहे त्यावरून एक बाब तरी नक्की आहे की निदान आता तरी "भाषाशास्त्र (Linguistics)" विषयाला मराठीत महत्वाचे स्थान मिळेल. वाच्य-भाषा रोगनिदानशास्त्र (Speech-Language Pathology); विकासविषयक भाषाशास्त्र (Developmental linguistics), उत्क्रांतीकारक भाषाशास्त्र (Evolutionary linguistics) या व याच धर्तीच्या पुढील टप्प्यांचा आढावा येथून पुढे विद्यापीठात B.O.S. वर असलेली मंडळी घेतील अशी आशा आहे.

आतापर्यंत 'मराठी भाषे' चा विद्यापीठीय अभ्यासक्रम म्हणजे ठोकळमानाने एकदोन कादंबर्‍या, कथासंग्रह, कवितेची दोनचार चोपडी, एखादा दलित लेखक, दोन टीकाकार-समीक्षा आणि तोंडी लावण्यापुरते व्याकरण इतपतच असे. पण जसजसे युपीएससीचे महत्व वाढू लागले आणि "मराठी भाषा म्हणजे केवळ मुळामुठाकाठी बोलली जाणारीच नव्हे तर तिचे अनेकविध कंगोरे तपासणे, मरू घातलेल्या बोलीना परत संजीवनी देवून एकूणच भाषेला एक शास्त्र द्यावे व त्यासाठी विज्ञानाची कास धरावी' असे विचार प्रबल होत गेले, जात आहेत, आणी त्याचाच परिपाक म्हणजे विविध विद्यापिठात नव्याने दाखल झालेली ही 'भाषाविज्ञाना'ची शाखा.

मी समजतो की; डॉ.बिरुटेसर हे मराठीचेच प्राध्यापक आहेत, तर समजू शकतात की ते स्वतः ज्यावेळी 'अनिल' वर्गात विद्यार्थ्यांना शिकवितात त्यावेळी ती कविता मुलांनी निव्वळ वाचावी असा त्यांचा उद्देश्य मुळीच नसतो. तर तिच्या वाचनाने अंतिम दृष्ट्या त्यांची भाषेचीही समज अधिकाधिक अचूक बनत जावी हे ते पाहतात. भाषाविज्ञानात कवितेच्या भाषेची फोड एका मर्यादेपलीकडे प्राध्यापकाने करू नसे असे सांगितले आहे.

"मर्ढेकरांचा उंदीर ओल्या पिंपात का मेला...?" हे पाहणे भाषाविज्ञानाचे काम नसून तो तसा का मेला याची कारणमीमांसा मोठ्याने अत्यंत अर्थपूर्ण वाचनात करणे, हे करीत असतानाच कविच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणार्‍या चरणांवर रेंगाळणे, त्याकडे चर्चामाध्यमाद्वारे सूचकपणे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे या गोष्टींना फार महत्व आहे; असे भाषाविज्ञान सांगते. शब्द उच्चारणाचे सामुदायिक महत्व Linguistics मध्ये असून त्याचे तिथे मोठ्या प्रमाणात विश्लेषण केले गेले आहे. मराठीत ही बाब नवी आहे असे मुळीच नाही. पण ती विद्यापीठीय अभ्यासक्रमात का कोण जाणे, महत्वाची मानली गेलेली नाही...

ती आता होईल अशी आशा डॉ.बिरुटे सरांच्या या लेखामुळे झाली आहे, असे मी म्हणतो. (या विषयावर इथे फार व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आणि होईल अशी आशा आहे...)

इन्द्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2010 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आतापर्यंत 'मराठी भाषे' चा विद्यापीठीय अभ्यासक्रम म्हणजे ठोकळमानाने एकदोन कादंबर्‍या, कथासंग्रह, कवितेची दोनचार चोपडी, एखादा दलित लेखक, दोन टीकाकार-समीक्षा आणि तोंडी लावण्यापुरते व्याकरण इतपतच असे.

अजूनही अभ्यासक्रम तसाच आहे. आमच्या विद्यापीठातील मराठी एम.ए.प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पाहा. बी.ए.च्या अभ्यासक्रमात आणि एम.ए.च्या अभ्यासक्रमात आता बरीच अभ्यासमंडळे आता भाषाविज्ञानाचा पेपर टाकतांना दिसतात. नवीन मंडळी अभ्यासमंडळावर आली पाहिजेत. ती मंडळी अभ्यासक्रमात काही बदल करु शकतील. आमच्याकडील काही प्राध्यापक मंडळी उत्साही असल्यामुळे त्यांच्या मागे लागून आंतरजाल, संस्थळे, यावर काहीतरी टाका राव असा आग्रह धरल्यामुळे 'माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व' असा एक भाग अभ्यासक्रमात टाकला आहे. पण मराठी संस्थळे च्या ऐवजी इतर संस्थळांची नावे टाकण्यात आली. पण जाऊ द्या. सुरुवात तर झाली ना ! ही गोष्ट महत्त्वाची वाटली. बघुया यावेळेस अभ्यासमंडळात यायला जमले तर काही बदल करण्यासाठी हट्ट नक्की धरु....! :)

बाकी, भाषाविज्ञानाच्या बाबतीत फार रुची विद्यार्थी दाखवत नाही असा माझा अनुभव आहे. मात्र भाषाभ्यासाची गोडी लागावी यासाठी भाषेसंबंधातील विषय सहज-सोपे करता आले पाहिजेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

29 Oct 2010 - 9:18 pm | धमाल मुलगा

हे छानच!

नक्की प्रयत्न करा. :)

इन्द्र्राज पवार's picture

30 Oct 2010 - 10:10 am | इन्द्र्राज पवार

"....बाकी, भाषाविज्ञानाच्या बाबतीत फार रुची विद्यार्थी दाखवत नाही असा माझा अनुभव आहे. ..."

~ हे मान्य व्हावे. आणि मला वाटते हे औदासिन्य खास करून मराठीत पदव्युत्तर करू इच्छिणार्‍यांच्यात प्राधान्याने आढळते. शिवाजी विद्यापीठात एम.ए. मराठीची स्वीकृत क्षमता आहे ७० विद्यार्थ्यांची पण इतपत ही संख्या कधीच पटावर आलेली नाही. त्यामुळे जितकी आहे तितक्यांना जरी भाषाविज्ञानाचे महत्व पटले तर (आणि ते विद्यार्थी पुढे शिक्षणक्षेत्रातच करीअर करू लागले....) किमानपक्षी ते त्या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात अधोरेखीत करू लागतील. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जून २०११ च्या एम.ए.२ च्या अभ्यासक्रमात 'भाषाविज्ञान' हा पेपर 'आवश्यक' मानला गेला आहे; जो गेली दोन वर्षे ऐच्छिकच राहिला होता...त्यामुळे साहजिकच दुर्लक्षितही.

नव्याने स्थापित झालेल्या अभ्यासमंडळतील सदस्यांनी जाणीवपूर्वक या प्रश्नपत्रिकेची मांडणी केल्याचे दिसून येते जेणेकरून तुमच्या नजरेसमोर असलेल्या या विषयातील विविध कंगोर्‍यांना स्पर्शीले गेले आहे. भाषिक व्यवहाराचे स्वरूप समजावून घेऊन भाषाविज्ञानाशी त्याचा संबंध तपासून पाहणे, स्वन, रुप, वाक्य, अर्थ या संकल्पना मराठी भाषेसंदभात तपासून पाहणे....आणि सर्वात चांगले उद्दिष्ट कुठले असेल तर मराठीतील विविध बोली व त्यातील शब्दरचना, शब्दसंग्रह तपासून देणे..... भाषाविज्ञानात हे फार महत्वाचे मानले जाते. वाचिक वर्तन, उच्चार आणि लेखन, तसेच क्षमता आणि प्रयोग ह्या बाबी या अभ्यासक्रमात प्राधान्याने मांडल्या जातील....

मराठी भाषेच्या वृद्धीसाठी हे चित्र आशादायकच म्हटले पाहिजे. फक्त पदव्युत्तर विद्यार्थांची संख्याच जर एक दोन डझनाच्या आसपास राहिली तर हेच चित्र व्यापकतेच्या दृष्टीने धूसर होत जाईल.

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

29 Oct 2010 - 8:37 pm | राजेश घासकडवी

एकंदरीत समाजात भाषेचा वापर कसा असतो, व असावा या संबंधातलं लेखन संकलित केलेलं असावं असं वाटतं. भाषाविज्ञान म्हटल्यावर मला कुठेतरी चॉम्स्कीचा उल्लेख येईल असं वाटलं होतं.

लेखन हे बोलल्या जाणाया भाषेच्या मानाने दुय्यम आहे. जितके बोलतो त्यामानाने आपण कमी लिहित असतो

हे तितकंसं पटलं नाही. बोलण्यातून होणारा संवाद हा दोन व्यक्तींमधला असतो, तर लेखनातून होणारा संवाद एकाचा अनेकांशी असतो. बोलताना देहबोली, आवाजाचा चढउतार यांमुळे खूपच अधिक माहिती देता येते. लेखनात ते स्वातंत्र्य नसतं. बोली भाषा ही काहीशी अॅनालॉग व लिखित भाषा ही अधिक डिजिटल स्वरूपाची आहे. गरजा, शक्ती, मर्यादा इतक्या भिन्न असताना या दोन वेगवेगळ्या संवादमाध्यमांमध्ये उच्च नीच अशी तुलना करणं योग्य नाही.

जितकं बोलतो त्यापेक्षा लिहीत कमी असलो, तरी जितकं ऐकतो त्यापेक्षा फार कमी वाचत नाही. एक लिखित शब्द सरासरी दहा ते पन्नास (नक्की गुणक माहीत नाही) लोक वाचत असावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2010 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>भाषाविज्ञान म्हटल्यावर मला कुठेतरी चॉम्स्कीचा उल्लेख येईल असं वाटलं होतं.
आधुनिक भाषाविज्ञानाचा ज्याने पाया घातला त्या फेर्दिना स्योसूर आनि नोम चॉम्सकीचा उल्लेख प्रास्ताविकात करायला हवा होता असे आता वाटते. 'भाषा ही एक चिन्हव्यवस्था आहे' असे म्हणनारा स्योसूर आणि 'भाषिक क्षमतेचा' विचार मांडणारा नोम चॉमस्की यांच्या शिवाय आधुनिक भाषाविज्ञाना बद्दलचे लेखन पूर्ण होत नाही. लेखनात उल्लेख यायला हवा होता याच्याशी सहमत.

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

29 Oct 2010 - 8:59 pm | धनंजय

पुस्तक मिळवायचा प्रयत्न करेन म्हणतो.

@राजेश : भाषाविज्ञानासाठी बोलल्या जाणार्‍या भाषेच्या पेक्षा लेखन दुय्यम आहे. त्याच प्रमाणे अन्य काही अत्यंत नेमके पण मर्यादित भाषाव्यवहार दुय्यम आहेत. उदाहरणार्थ कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगच्या भाषा वगैरेंचा अभ्यासही होतो, पण प्राथमिक म्हणून नव्हे, तर दुय्यम म्हणून. "प्राथमिक-दुय्यम" शब्दांत त्या विज्ञानातील अभ्यासविषय सांगत आहे, उच्चनीचतेचे मूल्यमापन नाही. म्हणजे सेंद्रीय रसायनशास्त्राचा अभ्यास करताना त्याच्या अंतर्गत पोषणशास्त्राचा दुय्यम अभ्यास होऊ शकतो. त्याचा अर्थ असा नाही की पोषण हा नीच अभ्यासविषय आहे.

जाताजाता - देहबोली, मोर्स कोड,मधमाशांचा नाच, वगैरे सर्व प्रकारांनी मिळून जे संदेशन होते, त्या अभ्यासाला चिह्नशास्त्र म्हणतात (सेमिऑटिक्स). बोललेल्या भाषेचा अभ्यास करणारे भाषाविज्ञान त्याहून "मर्यादित" आहे. पुन्हा "मर्यादित" म्हणजे "नीच" नव्हे.

सुनील's picture

29 Oct 2010 - 11:43 pm | सुनील

चांगला पुस्तक परिचय.

अजून एक वाचनीय लेख.

इंटरनेटस्नेही's picture

30 Oct 2010 - 4:00 am | इंटरनेटस्नेही

बराचसा लेख डोक्यावरुन गेला; पण अर्थातच अतिशय सुंदर लेखन. बिरुटे सर रॉक्स!

नितिन थत्ते's picture

30 Oct 2010 - 7:49 pm | नितिन थत्ते

सुंदर परिचय आणि लेख