हस्ताक्षर.........

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
24 Oct 2010 - 7:49 am

परवा आई बारशाला चाललेली कोणाच्यातरी..........
पैशाचं पाकीट भरून झाल्यावर तिने मला हक मारून सांगितलं, "प्रसन्न अरे जरा नाव टाक रे पाकिटावर " (मी मिपा वर पडीक असल्याने समाधी भंग झाल्यागत चरफडत उठलो :( )
"दे पेन ...... काय तू पण ..... साधं नाव नाही टाकता येत?" ------------------ इति मी .
नाही अरे , इतकं सुंदर अक्षर आहे तुझं. तूच टाक ना...(आई पण ना "मस्का " मारण्यात expert आहे )
मी वैतागून पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ,आणि बापरे ...."tube " पेटली , आपण किती दिवसानंतर मराठी लिहितोय ...
कारण हल्ली पेन सह्या करण्यापुरत लागतं... दिवसभर कॉम्पुटर वर काम असल्याने.. लिहिण्याचा प्रश्नच येत नाही.. या विचारात कसंतरी लिहून दिलं....
(अपेक्षेपेक्षाही घाण अक्षर आलं)
आई वैतागली , " काय हे प्रसन्न, किती वाट लागली आहे अक्षराची ? मागे चित्रकला सोडून दिलीस आणि आता हे.... दिवसभर त्या डब्यात डोकं खुपसून बसलेला असतोस.
किती अभिमानाने सांगायचो तू लहान असताना सगळ्यांना तुझ्या हस्ताक्षराबद्दल.......... किती बक्षिसं मिळालेली तुला.. आणि आज????
आईने खस्स्कन पेन ओढून घेतलं.. नवीन पाकीट घेतलं, आणि त्यावर छानसं नाव टाकून निघून गेली .
घरी एकटाच होतो , सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून जायला लागला ...बाबांनी अक्षर चांगलं यावं यासाठी दिलेला चोप....
सुंदर अक्षर यावं यासाठी केलेली मेहनत ...... वर्गातल्या एका गोड गुलाबी चेहऱ्याची पूर्ण केलेली " प्रयोगवही"...शिक्षकांनी केलेलं कौतुक ....
नेहमी फळ्यावर "सुविचार" लिहिण्यासाठी केलेले आग्रह .. आणि त्यावर खाल्लेला " भाव" .......
सगळं सगळं एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेलं..
आणि आज????? "२४*७ computer च्या तडाख्यात सापडलेली आजची आपली पिढी ......?
आपण दिवसातून किती वेळेला लिहितो .....?(ते सुद्धा मराठीत)
मला नाही वाटत . हल्ली कोणी हि गोष्ट साधी विचारात सुद्धा घेत असेल ...... "मराठी बोलली गेलीच पाहिजे , मराठी वाचवायलाच हवी... सर्व मान्य ...१००%"
पण मग लिखाणाचे काय ....?
समर्थांनी दासबोधात " हस्ताक्षराचे" किती यथार्थ सुंदर वर्णन केलं आहे.... (परवाच दासबोध वाचून झाला ..... खूप शिकायला मिळालं....)
आपलीच हि अवस्था... तर पुढच्या पिढीचं काय....? आपणच आपल्या मुलांना "a for apple आणि b for ball शिकवतो लहानपणापासून ....
मग "अ आईचा" हे कधी त्या पिल्लांना कळणार? जगाबरोबर चालायला हवं , इग्लिश यायला हवं सर्व ,मान्य.... पण मराठीच काय? ती आपली मातृभाषा आहे......आणि आपल्या आणि त्याही मागच्या पिढीतले ८५% लोक हे मराठीच शिकले , वाढले आणि आज किती मोठ्या पदावर, मोठ्या देशामध्ये कार्यरत आहेत...................?
आज आपण मराठी लिहितो, पण keybord वापरून, त्याची प्रिंट सुद्धा मारता येईल........
पण हस्ताक्षरातील हळुवारपणा , त्याचा गोडवा , त्यातला रुबाब, त्यातल्या भावना, त्याचं स्वत: जपलेलं एक वळण, त्याचा सुद्धा एक स्पर्श ...........................
हे तर सगळं हरवूनच जात आहे दूर दूर...................... पत्र लिहिणं हि तर outdated गोष्ट झाली आहे .. परवाच "मिपा" कोणीतरी म्हटल्याप्रमाणे "मामाचं पत्र हरवल .......... आता ते कधी सापडणारच नाही......... "

तेव्हा मंडळीनो जास्त लिहित नाही (टंकन वेग खूप कमी आहे ). तुम्ही जाणकार आहातच....... बघा जमलं तर विचार करून......
मी रोज डायरी लिहायला सुरुवात केली आहे......." मराठी जगवायची असेल तर लिहायला सुद्धा हवी"

कारण

"सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना".......................

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न, जसे मनात विचार आले तसेच उतरवले आहेत......
काही चुकलं माकलं तर सांभाळून घेणे......:)

लेख आवडला. मनापासून आलेला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2010 - 5:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 8:07 am | डावखुरा

खरंच छान झालाय लेख..
मनाचे प्रतिबिंब संगण्काच्या पडद्यावर उमट्ल्याचे भासले...
आणि मांड्लेली समस्याही थेट आतवर भिडली..,

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 8:07 am | डावखुरा

प्रकाटाआ

आनंद घारे's picture

24 Oct 2010 - 8:40 am | आनंद घारे

'प्रकाटाआ' म्हणजे प्रतिसाद काढून टाकला आहे असेच ना? मग त्याची नोंद तरी कशाला हवी?

सदाची पहुणी's picture

24 Oct 2010 - 8:28 am | सदाची पहुणी

टपोर गोलाकार सुन्दर लिखाण पहायला पण मीळत नाही.--सदाची पाहुणी

आनंद घारे's picture

24 Oct 2010 - 8:35 am | आनंद घारे

लेख सुरेख आहे. कधी कधी माझ्या मनात आलेले विचार त्यात डोकावतात. पण मी काढलेला निष्कर्ष मात्र वेगळा आहे.
लहानपणी माझे अक्षर सुरेख नसले तरी सुवाच्य होते. मोठे झाल्यावर अधून मधून पत्रलेखन होत असल्याने थोडासा सराव होता, त्यामुळे ते सुमारपर्यंतच घसरले. इंटरनेट येण्यापूर्वीच घरोघरी टेलीफोन आले तेंव्हा पत्रव्यवहार थांबला. गेल्या पाच वर्षात माझ्या पत्रपेटीत पाचसुद्धा हस्त्लिखित पत्रे आलेली नाहीत. ज्या वेळी आपण मराठीत काहीतरी लिहावे असे वाटायचे तेंव्हा खराब हस्ताक्षरामुळे ते कोणालाही वाचायला द्यावेसे वाटत नव्हते. संगणकावर टंकलेखनाची सोय झाल्यानंतर हा प्रश्न सुटला आणि मी लिहायला सुरुवात केली. आता निव्वळ हस्ताक्षर सुधारावे एवढ्यासाठी कित्ते गिरवण्याची इच्छा काही होत नाही.

आता निव्वळ हस्ताक्षर सुधारावे एवढ्यासाठी कित्ते गिरवण्याची इच्छा काही होत नाही.

केवळ याचसाठी कित्ते गिरवायची गरज आहे असे मला सुद्धा वाटत नाही ........................... ..
(पण किते गिरवायला कोण सांगतंय........ साध्या लिखाणाचा सराव ठेवा बस...)

माझ्या शेजारी एक शेट्टी आडनावाचा 'तुळू" जातीचा मुलगा राहतो..

ते "तुळू " बोलतात.. पण तो लहानपणापासून मुंबईत राहिल्यामुळे त्याला तुळू लिहिता आणि वाचता येत नाही.....

तशीच काहीशी गत पुढच्या पिढीची व्हायची.. त्यासाठी हा लेखन प्रपंच....... ;)

गांधीवादी's picture

24 Oct 2010 - 9:15 am | गांधीवादी

स्पा साहेब, कालाये तस्मै नम:
आजची पिढी निदान typing चे कष्ट तरी घेत आहे. (~~इंद्रा~~ ह्यांचे प्रतिसाद बघून खरंच गहिवरून येते). पुढे तर हस्ताक्षर वगेरे विसरावे लागणार आहे.
पुढची पिढी typing चे कष्ट सुद्धा घेणार नाहीये.
Dictation इस इन प्रोग्रेस.
तुम्ही फक्त बोला, संगणक आपोआप तुमच्यासाठी typing करेल
(त्यावेळेसचे ~~इंद्रा~~ यांचे प्रतिसाद किती मोठे असतील, ह्याचा विचार करून आत्ताच गहिवरून आले आहे.)
पण काळजी नाही, त्यावेळचे संगणक ते प्रतिसाद तुमच्यासाठी वाचून सुद्धा दाखवतील. अगदी त्याच्याच आवाजात.

इंद्रा साहेब हलके घेणे :smile:

Speech recognition enables the operating system to convert spoken words to written text.

इन्द्र्राज पवार's picture

24 Oct 2010 - 5:38 pm | इन्द्र्राज पवार

"....इंद्रा साहेब हलके घेणे....!"

~ अहो गांधीवादी.... तुमच्या वरील प्रतिसादाकडे पाहिल्यास एका दृष्टीने उलटपक्षी तुम्ही माझ्या टायपिंग स्टॅमिन्याचे कौतुकच केल्याचे दिसत आहे....त्यामुळे हलके वा जड घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

बोलल्याक्षणी संगणक टायपिंग करेल असे तुम्ही म्हणता....होईलही...विज्ञानाला अशक्य हा शब्द मंजूर नाहीच; पण बोटाने भावना कळफलकाद्वारे पडद्यावर आणण्यात जे थ्रील आहे, ते स्वराने येईल असे आतातरी वाटत नाही.

काळच उत्तर देईल.

इन्द्रा

रणजित चितळे's picture

24 Oct 2010 - 10:00 am | रणजित चितळे

स्वतः च्या हस्ताक्षरात लिहीलेले पत्र आपल्या आप्तेष्टांना आपलेसे वाटते. ते जिवंत माणुस जवळ असल्या सारखे वाटते. त्यातल्या भावना ख-या वाटतात. मसुदा तोच पण जर टंक लिखीत असेल (व कट कॉपी पेस्ट असेल तर अजुनच ताप) तर कृत्रिम वाटते. शो ऑफ केल्या सारखे वाटते. प्रेम पत्र कसे पाठवाल - टंक लिखीत पाठवाल का स्वतःच्या हस्ताक्षरात. आईला पत्र टंक लिखीत पाठवाल का आपल्या हाताने लिहुन. मला लेख आवडला. खुप आवडला.

आनंद घारे's picture

24 Oct 2010 - 12:53 pm | आनंद घारे

पण तरीही पत्र लिहिणे का बंद झाले आहे?
कारण दूरध्वनीवर प्रत्यक्ष बोलणे सोपे आणि स्वस्त झाले आहे. टेप किंवा सीडीवर बोलणे रेकॉर्ड करून ते पुन्हापुन्हा ऐकणे शक्य झाले आहे. आई किंवा प्रेयसीला प्रेम हवे असते, त्याचा पुरावा नको असतो. आठवण म्हणून एकादे चिटोरे पुरेसे असते. पत्रांच्या गट्ठ्याची गरज नसते. ज्या काळात आवाज फक्त मर्यादित अंतरापर्यंतच पोचत होता आणि तो साठवून ठेवण्याची सोय नव्हती त्या काळात तो शब्दबद्ध करून ठेवण्यासाठी लिपीचा जन्म झाला होता. आता तिचा र्‍हास होण्याची लक्षणे दिसत आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

24 Oct 2010 - 10:51 am | कानडाऊ योगेशु

प्राथमिक शाळेत असताना काही दिवस शाळेत बोरु घेऊन यायला सांगितले होते.शाईत बोरु बुडवुन वहीवर अक्षरे लिहीली तर अक्षर सुंदर होण्यास मदत होते असा त्यामागे विचार होता.पण काही दिवसांनी बोरु ऐवजी स्केच्पेन आणायला सांगितले आणि बोरुच्या शिक्षेपासुन आमची सुटका झाली.हाताने कागदावर लिहिण्याचा प्रकार नव्या पिढीसाठी कदाचित ह्या बोरु प्रकरणासारखा ठरु शकेल.
एकुणच कागदाचा आणि पेनाचा एकत्रित वापर करण्याची वेळच आता खूप कमीदा येते.(मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लिहिण्याबाबतीत.)
माझा लिहिण्याचा वेग फारच कमी होता. हातही प्रचंड दुखत असत.त्यामुळे लिहिण्याचा नेहेमी कंटाळा येत असे.पण आता टायपिंगचा स्पीड चांगला असल्याने काहीही टंकण्यात आता हाताने लिहिण्यापेक्षा नक्कीच जास्त आनंद होतो.
एरवी जे काही मी पेनाने लिहु शकलो नसतो ते सारे कॉम्युटरमुळे शक्य होते.
कॉम्युटरवर टंकण्याच्या सुविधेमुळे मी मराठीच्या अजुन जवळ आलो.

क्लिंटन's picture

24 Oct 2010 - 11:49 am | क्लिंटन

कॉम्युटरवर टंकण्याच्या सुविधेमुळे मी मराठीच्या अजुन जवळ आलो.

हे अगदी १००% मान्य. नाहीतर दहावीनंतर मराठी लिहिण्याशी संबंध पूर्णपणे तुटला होता.तो निदान कॉम्प्युटरच्या माध्यमातून का होईना परत आला.

सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे यात शंकाच नाही.पण यापुढील काळात हस्ताक्षरापेक्षा कॉप्युटरवर काम नक्कीच जास्त असणार आहे.आणि अजूनही हस्ताक्षरात आलेल्या पत्राबद्दल आपल्या पिढीला आपुलकी वाटते कारण आपण इंटरनेट यायच्या आधीचा काळ बघितला आहे आणि आपल्या घरी हस्ताक्षरात आलेली पत्रेही बघितली आहेत.पण यापुढच्या पिढीला हस्ताक्षराबद्दल तशीच आपुलकी वाटेल असे नाही.पूर्वीच्या काळी घरकाम करणाऱ्या स्त्रिया जात्यावर दळतादळता ओव्या म्हणत.पण चक्क्या आल्या आणि त्या ओव्यापण मागे पडल्या.कदाचित आपल्या आजीच्या पिढीतील स्त्रियांना ओव्या मागे पडल्या याची खंत वाटत असेलही पण आज अशा ओव्या असतात हेच मुळात अनेकांना माहित नसेल. हा काळानुरूप होणारा बदल आहे.आणि आपण काहीही केले तरी तो आपल्याला थांबवता येणार नाही.तेव्हा "कालाय तस्मै नम:"

इन्द्र्राज पवार's picture

24 Oct 2010 - 11:58 am | इन्द्र्राज पवार

"....हे तर सगळं हरवूनच जात आहे दूर दूर...!"

"स्पा"....यांनी फार भावुक होऊन लिहिलेले हे लिखाण आहे याचा प्रत्यय शब्दाशब्दातून ठळकपणे प्रतीत तर येतोच पण विषयाची मांडणी आणि महत्वही किती मोलाचे आहे हेही त्यानी जाणवून दिले आहे. 'सुंदर हस्ताक्षर' ही नैसर्गिक म्हणा वा ईश्वरी म्हणा....निश्चितच एक देणगी आहे, जी पाहताच उत्स्फुर्तपणे तोंडून शब्द उमटतो..."व्वा...प्रसन्न वाटले, अक्षर पाहूनच...!"

माझा एक मावसभाऊ मराठी भाषेचाच प्राध्यापक आहे. विद्यापीठ वार्षिक परीक्षेचे पेपर्स तपासताना त्याला अक्षराचे असे शेकडो नमुने पाहायला मिळतात. त्याच्या विचाराने (मला वाटते सर्वच परीक्षकांच्या मते...) पेपरमधील 'अक्षर' पाहुनच त्यातील आशयाविषयी एक प्राथमिक मत आपसुकच तयार होते. म्हणजे विद्यार्थ्याचे अक्षर देखणे असले की त्या पेपर तपासणार्‍याची मानसिक धारणा अशीच बनते की, या मुलाने/मुलीने सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली असणार.....हाही एक फायदाच.

स्पा म्हणतात त्याप्रमाणे संगणकाने साफ मारून टाकली आहे ती अक्षरकला...! चेक लिहिण्यापुरती आणि सही करण्यापुरतेच आता हाती पेन धरावे लागते यासारखे दुर्दैव नाही. माझे अ़क्षर म्हणजे कागदावर उधळलेला अबीरबुक्काच असतो, पण ज्यावेळी 'जवाहर नवोदय विद्यालया'त इ. ८ वीत असलेल्या भाचीचे मोत्यासारखे अक्षर असलेले पत्र आले की मनाला चटकन आंब्याचा मोहोर फुटतो आणि त्यातील मजकुर वाचण्यापूर्वीच डोळे पाण्याचे भरून येतात....ते अशासाठी की ती लिहिते, "मामा, तुझ्या कॉम्प्युटर प्रिंटसची पत्रे छानच असतात रे, पण कधी कधी हातानेदेखील लिही ना...!"

आनंद होतो की, आजच्या पिढीला अजून हस्ताक्षरातील लिखाणाची ओढ आहे....आणि नवोदय विद्यालयातील मॅनेजमेंटचेही आभार मानले पाहिजेत की, ते विद्यार्थ्यांना ई-मेलने पत्र पाठविण्याऐवजी हाताने लिहिण्यास उद्युक्त करतात.

ती कधीतरी पत्राचा शेवट करते : "मामा, या रविवारी इकडे शाळेत येणार ना? नक्की ये, नाहीतर...?" हा 'नाहीतर' ती जाणीवपूर्वक वेडावाकडा, भयानकरितीने काढते...... आणि सगळ्या मजकुरात मला तोच शब्द सगळात सुंदर आणि आपला वाटतो.

अक्षर खरोखरी बोलतात.

इन्द्रा

चिगो's picture

26 Oct 2010 - 11:38 pm | चिगो

सुंदर हस्ताक्षर हे त्या व्यक्तीबद्दल चांगले मत निर्माण करते हे खरे... परीक्षेत त्याचा फायदा नक्कीच होतो, कारण माझ्या मते "You should never irritate the examiner". मुद्दा / उत्तर चांगलं असेल तरी वाईट हस्ताक्षरामुळे वाचायचा मुड तर जाणारच. बाकी तुमची भाची "जनवि"त आहे हे वाचून आनंद झाला. ती आमची "शाळाभगिनी"च की (अगदी शिक्षणाच्या काळातील गॅप धरुनही) !! कारण आम्ही पण "जनवि"वालेच.. तसाही मी नवोदयच्या शिक्षणाचा, तिथल्या वातावरणाचा आणि तिथल्या आठवणींचा ऋणी आहे..
लेख अगदी मनातून आलाय. आवडला आणि पटला सुद्धा..

मितान's picture

24 Oct 2010 - 12:18 pm | मितान

खूप छान लेख लिहिलाय स्पा :)

माझाही कागदपेनाशी संपर्क खूप कमी झाला होता. पण माझे या दोन्हींवर खूप प्रेम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कागद, पेन, डायर्‍या मी अजूनही जमवते. त्या लिहून भरत नाहीत याची खंत आहेच. पण हस्ताक्षराची सवय मात्र मोडू दिली नाही. मी कागदावर पत्र लिहिते, लेख टंकायच्या आधी कागदावर उतरवते. अक्षरही सवयीने चांगले राहिले आहे.

अवांतर : इंदिरा संतांची एक अप्रतिम कविता आहे हस्ताक्षरातल्या पत्राबद्दल. 'पत्र लिही पण नको पाठवू..' अशी काहीशी सुरुवात आहे. सापडली तर टाकते इथे.

मितान माझीदेखील आवडती कविता आहे ती -

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१||
चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२||
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३||
नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४||
पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५||
-कवयित्री - इंदिरा संत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2010 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंदिरा संताची कविता डकवल्याबद्दल धन्यु......!

-दिलीप बिरुटे

अनुमोदन !

धन्यवाद शुची :)

नेटवर खूप शोधत होते ही कविता..

अगं तुला कसं शोधायचं माहीत आहे ना? मराठी शब्दांचा सर्च द्यायचा गूगलमधे. :) मीदेखील आधी इंग्रजी शब्द दिले मग काहीच सापडलं नाही. मग मराठी दिले.

पैसा's picture

24 Oct 2010 - 1:10 pm | पैसा

जेव्हा असं अगदी आतून भरून येतं तेव्हा कीबोर्ड ऐवजी हात आपसूकच कागदाकडे वळतो. कीबोर्ड आणि कागद पेन यात तेवढाच फरक आहे, जेवढा नैसर्गिक फुलं आणि कधी खराब न होणारी प्लॅस्टिकची फुलं यात असतो.

माझ्या पणजोबानी मोडीत लिहिलेले हिशेब, वडिलानी लिहिलेली खुषालीची कार्डं म्हणूनच तर जिवापाड सांभाळून ठेवली जातात. आता युनिकोड आणि आणि इतर सॉफ्टवेअर्स यांच्यामुळे निदान लोक परत मराठीकडे वळताना दिसतायत. वाचून खरंच खूप बरं वाटतं.

लहान असल्यापासून माझं हस्ताक्षर मी कधी बिघडू दिलं नाही, एवढंच नाही तर मुलाना पण लिहायची सवय लावली. म्हणूनच आज माझी मुलगी जेव्हा माझ्यासारखीच वळणदार हस्ताक्षरात लिहिते, तेव्हा खूप आवडतं ते. अभिमानही वाटतो.

"दिसामाजि काहीतरी ते लिहावे,
प्रसंगी अखंडित वाचीत जावे'

स्पा's picture

24 Oct 2010 - 1:28 pm | स्पा

दोन्ही बाजूंची मत पटली...........................

खरच " कालाय तस्मै नम:"

अनिवासि's picture

25 Oct 2010 - 4:16 am | अनिवासि

विषय हस्ताक्षराचा आहे आणि त्यातुन पत्रलेखनाचाही विषय निघाला आहे म्हणून!
चान्गले हस्ताक्षर असणे छानच पण पत्रलेखन होत नाही ह्याचे फार वाईट वाटते.माझ्या आईचे अक्षर खुपच वाईट होते. प्रत्येक पत्राच्या शेवटी ती लिहीत असे- अक्षर वाईट आहे-कुत्र्याचे पाय मान्जरीला लावले आहेत. ते समजुन घे.
आज ५० वर्ष झाली-अजुन ती पत्रे वाचताना मन भरुन येते आणि आई दिसते.
गेल्या अनेक वर्षाच्या पत्रान्च्या files माझ्याकडे आहेत. दर वर्षी त्यान्चा आकार लहान होत आहे. गेल्या वर्षाची file मला आता बरेच वर्षे पुरेल असे वाटते.
पत्रलेखन -मग ते english मध्ये असो अथवा मराठीत - कमीच होत चालले आहे.
पुढील काळातील सामाजीक इतिहासकाराना हा ठेवा मीळणार नाही.
आज माझ्याकडे ३२ साली London Maharashtra mandal स्थापनेच्यावेळी लिहलेली पत्रे आहेत. आता सर्व एमेल वर!
वाइट वाट्ते!

लेख अगदी मनापासून लिहिला आहेस स्पा. आवडला.

माझं अक्षर सुधारायला आईने आणि माझ्या शाळेतल्या बाईंनी खूप कष्ट घेतले. पण जेव्हा अक्षर खरंच चांगलं येऊ लागलं तेव्हा माझी हस्तलिखिते शाळेच्या नोटीस बोर्डच्या बाजूला दिसू लागली तेव्हा झालेला आनंद .. अवर्णनीय होता.

लेकाला मूळाक्षरे शिकवताना त्याने काढलेले 'अ'.. ते शिकवताना मला म्हणाला, "ओह.. यू मीन आय हॅव टू राईट थ्री अ‍ॅण्ड देन मेक अ स्लिपिंग लाईन अ‍ॅण्ड देन अ स्टँडिंग लाईन.. !" हे ऐकून 'अ' अननसाचा, 'आ' आईचा.. हे शिकताना त्या भाषेशी नकळत निर्माण झालेली गोडी लेकाला कशी समजेल.. या विचारांनी कसंतरीच झालं.

असो.. कालाय तस्मै नमः! दुसरं काय!

सहज's picture

25 Oct 2010 - 6:22 am | सहज

"ओह.. यू मीन आय हॅव टू राईट थ्री अ‍ॅण्ड देन मेक अ स्लिपिंग लाईन अ‍ॅण्ड देन अ स्टँडिंग लाईन.. !" हे ऐकून....कसंतरीच झालं.

???????????

काहीही! लिहायचे कसे हे तंत्र आपल्या परीने शिकला तर कौतुक वाटायला हवे. लेकरु हुशार आहे, अंमळ हळवे व्हा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Oct 2010 - 11:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख चांगला लिहिला आहे, पण विचारांशी असहमती.
दासबोधातल्या काही गोष्टी आज कालबाह्य होत आहेत तर! कोणतीच गोष्ट कालातीत नसते, आज जात्यावरच्या ओव्या कालबाह्य आहेत, उद्या हाताने लिहीणं कालबाह्य होईल, तर आणखी काही वर्षांनी क्वर्टी कीबोर्ड!

"R U thr" असलं इंग्लिशमात्र मला त्रास देतं आणि रोमन लिपीमधे लिहीलेलं मराठीसुद्धा!

अवांतर: "तू गळ्यात, हातात काहीच का घालत नाहीस" या काही लोकांच्या भोचक प्रश्नांवर "सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना" हे पुस्तकी वाक्य तोंडावर फेकून मी फार्फार मज्जा केली आहे.

राजेश घासकडवी's picture

27 Oct 2010 - 5:57 am | राजेश घासकडवी

हाताने लिहिण्यात एक समाधान असतं. अक्षरांच्या आकारांना एक व्यक्तिमत्व असतं. मी एकेकाळी तासलेल्या निबांनी मी तासनतास कॅलिग्राफी करत बसत असे, पण आता चार ओळी लिहिल्या की हात दुखायला लागतो.

मलादेखील हाताने लिहिण्याची सवय गेली आहे. आणि संस्थळांवरच्या टायपिंगमुळे कधी कधी घोळ होतात. बर्फ असा शब्द लिहायचा असेल तर मी 'बर' अशी अक्षरं लिहून र चा पाय मोडायला जातो. :) मग नंतर मला घोटाळा लक्षात येतो.

काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, त्याप्रमाणे मुबलक, वेगाने लिहिता येण्यासाठी स्टाईलला आपण फाटा दिलेला आहे. हाताने लिहिणं टाळता येणं हे बहुतेकांना वरदानच वाटतं. पण मराठी टाईप करताना फॉंट सिलेक्ट करता आला, तसंच लेखनात प्रत्येक वेळा तेच अक्षर त्याच पद्धतीने न येता थोड्या वेगवेगळ्या शैलीत आलं तर लेखन अधिक देखणं, वैयक्तिक दिसेल असं वाटतं.