***** कल्याणम् (भाग ३ .. अखेरचा)

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
23 Oct 2010 - 8:07 pm

***** कल्याणम् (भाग १)

***** कल्याणम् (भाग २)

"अहो, अहो, अहो, हे काय भयंकर बोलताय्? अशानं आम्हाला बाहेर कुणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आमची एवढी बदनामी करून तुम्हाला काय मिळणार आहे? मी तुम्हाला सोडणार नाही. कोर्टात खेचेन..........." संतापाने बेभान झालेले वरुण बेंबीच्या देठापासून किंचाळत होते. त्यांच्याकडे लक्ष न देतात देशमाने आणि त्यांचे सहकारी चालले गेले.
काही क्षणानंतर शिंत्रे म्हणाले, "शांत व्हा. ते लोक इथून गेलेले आहेत. सनसनाटी बातम्या देणं हाच त्यांचा व्यवसाय आहे. कसलीही घटना घडल्याचा त्यांना सुगावा लागला की ते तिथे जाऊन पोचतात आणि तिखटमीठ लावून त्या घटनेचा वृत्तांत देत असतात. हे त्यांचे रोजच चालले असते. पहाणारे पहातील आणि विसरून जातील. तुम्ही अब्रूनुकसानीचा दावा लावलात तर मात्र तो रोज लोकांसमोर येत राहील आणि मुख्य म्हणजे तुम्ही तो खटला हराल. कारण इथे जे घडले तेच त्यांनी नाटकी पध्दतीने सांगितले आहे आणि ते तसे सिध्द करू शकतील. तुम्हाला वाटलंच तर पुढच्या बुलेटिनला तुम्हीच त्यांना मुलाखत द्या आणि तुम्ही किती कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ आहात, चिन्मयीवर किती माया करता, तिच्यासाठी तुम्ही काय काय केलं आहे ते सगळं सविस्तर सांगा."
"नको."
"वाटलंच तर या स्वाती आणि प्रेमाताईंची मुलाखत घेऊ देत. छळणूक करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची प्रात्यक्षिके त्या दाखवतील. खोटा पुरावा रचणे, खोटा आळ घालणे, सर्वांपासून तोडणे, घालून पाडून बोलणे, केस कापायला लावणे, गॅलरीत झोपायला लावणे वगैरे गोष्टी समोर आल्या आहेत. आणखी काय काय केलं असेल ते त्यांनाच ठाऊक." शिंत्रे
"म्हणजे हे सगळं यांच्यामुळे झालंय्?" मनूकाकू
"नाही, नाही, नाही. ते चिन्नूनं स्वतःहून केलं आहे. तिनंच तसं सांगितलं आहे ना?" स्वाती
"आधी तिला हुकूम करायचा, वाटेल ते करायला भाग पाडायचं आणि वर मी काही सांगितलं नाही, तू स्वतःच सगळं करते आहेस असंच सगळ्यांना सांग अशी ताकीद द्यायची. नाही तर मोबाईल आहे आणि मी आहे अशी तंबी द्यायची. छान तंत्र आहे हो तुमचं. कपाळाला पिस्तुल टेकवून ब्लॅकमेल करण्यासारखंच आहे हे."
"हे सगळं खोटं आहे. मी असलं काही केलेलं नाही."
"तुम्ही असंच म्हणणार, तुम्ही कबूल करणार नाही आणि ती मूर्ख मुलगी तक्रार करणार नाही. त्यामुळे ज्यानं त्यानं काय ते समजून घ्यावं. अहो, हा मोबाईल म्हणजे पुरावा नाही, हे एक भयानक शस्त्र आहे. आधी त्याच्या जोरावर चिन्मयीला ब्लॅकमेल करायचं आणि तिचं बरंवाईट झालं की लगेच फोन करून अप्पासाहेबांना तिकडच्या तिकडे उडवायचं, म्हणजे दोन्ही अडथळे दूर होणार असा प्लॅन होता ना? शिवाय हे अगदी सुरक्षित शस्त्र आहे. त्यानं शरीराला कसली जखम होत नाही की मागे त्याची खूण रहात नाही, कुणाला याचा थांगपत्ताही लागायचा नाही. करून सवरून नामानिराळं रहायचं आणि वर गळा फाडून रडायला या मोकळ्या. झकास योजना होती हं."

तेवढ्यात श्रध्दा, पुनीत आणि त्याची आई प्रवेश करतात. पुनीतच्या आईंना उद्देशून इन्स्पेक्टर शिंत्रे बोलतात, "या, या. तुमचीच आठवण आली होती. निष्पाप माणसांचा छळवाद करण्यातल्या तुम्ही तज्ज्ञ. टॉर्चर चेंबरमध्ये तुमचं लेक्चर ठेवलं पाहिजे. बाकी चिन्मयीला धमकी देऊन आपल्या कह्यात ठेवायचं तुमचं टेक्निक स्वातीताईंनी छान आत्मसात केलं आहे आणि त्याचा झकास उपयोग केला आहे. तुम्हाला ते माहीत असेलच म्हणा."
"हे काय बोलताहेत?" आई म्हणाल्या, "विशाखाताई काय झालं हो हे?"
विशाखानं काही म्हणायच्या आधीच शिंत्रे उद्गारतात, "थांबा, इतक्यात गळा काढू नका. अजून काहीही झालेलं नाही. तुम्हाला हवी असलेली बातमी यायची आहे. तुमच्या मनातून तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना? उगाच हे रडायचं सोंग कशाला आणताय्?"
"बोला, सगळेजण मला हवं तेवढं बोलून घ्या. मी इतकी वाईटच वागत आले आहे. पण अगदी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी मनानं दुष्ट नाही हो. या जगात मला वाईट अनुभव आल्यामुळं तसं वागावं लागलं होतं."
"अनेक वेळा परिस्थिती माणसाला खोटं बोलायला किंवा मूग गिळून बसायला भाग पाडते, पण दुस-याचा छळ कर असं ती कधी म्हणत नाही. आणि चिन्मयीचा इतका छळ करून तुम्हाला काय मिळालं हो? तिला त्रास द्यायची कुणी तुम्हाला सुपारी दिली होती का?"
"नाही. ते चुकलंच माझं. अगदी अक्षम्य अपराध घडला हे मला मान्य आहे. पण जरा माझं ऐकून घ्या. पुनीतचं लग्न झाल्यावर ही श्रध्दा आमच्या घरी आली. माझ्याशी ती अतीशय चांगली वागत होती, मलाही तिच्याबद्द्ल माया वाटायला लागली होती. पण तुमची स्वाती सतत माझे कान भरत होती. श्रध्दाचं सध्याचं वागणं नाटकी आहे. ती मला पुनीतपासून वेगळं पाडणार आहे, घरातून बाहेर काढणार आहे. त्यासाठी चिन्मयी एक मोठा प्लॅन बनवते आहे वगैरे विष तिनं माझ्या मनात भरलं आणि चिन्मयीनं काही करायच्या आधीच आपण तिच्यावर हल्ला केला पाहिजे असं माझ्या मनावर बिंबवलं म्हणून घाबरून मी त्या वेळी तसं वागले. नंतर मलाच हे खात राहिलं म्हणून मी मनःशांतीसाठी तीर्थयात्राही केली होती. परत आल्यावर पुन्हा चिन्मयीच्या खोटेपणाबद्दल ऐकलं आणि मी तिला नाही नाही ते बोलले. तिनं बिचारीनं मला एका शब्दानं उलट उत्तर दिलं नाही की कोणाकडे माझ्याविरुध्द तक्रार केली नाही. ती फक्त खाली मान घालून डोळे पुसत राहिली. आज सत्य बाहेर आल्यावर मला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं आहे हो. मला चिन्मयीची मनापासून क्षमा मागायची आहे. तशी संधी एक मिळेल का हो?"
"तिला बरं वाटावं अशी आता सगळेचजण देवाकडे प्रार्थना करा. प्रेमाताईंना आता फक्त चिन्मयीच सोडवू शकेल. ती वाचली आणि तिनं प्रेमाच्या बाजूनं साक्ष दिली तरच ती सुटू शकेल. तेंव्हा मनात इच्छा नसली तरी आज तरी तिनंही चिन्मयीसाठी प्रार्थना करावी." शिंत्रे

तेवढ्याक राकेश आणि प्रशांत हे दोघे भाऊ येतात.
"राकेश तू ..?"
"हॉस्पिटलमध्ये गेल्यागेल्या मी दादाला फोन करून बोलावून घेतलं." प्रशांतनं सांगितलं
"अरे चिन्नू कशी आहे?"
"ती ठीक आहे."
"मी सांगितलं होतं ना की हे सगळं एक मोठं नाटक आहे." स्वाती पचकली. मात्र या वेळी प्रेमाचा प्रतिध्वनी आला नाही.
राकेश तिच्या अंगावर धावून जातांना ओरडतो, "मागच्या वेळी तू हे बोललीस तेंव्हा मी फक्त एकच थप्पड मारली होती ते चुकलंच माझं. तेंव्हाच तुझं तोंड कायमचं बंद करायला हवं होतें. या घरातच काय, या जगातसुध्दा रहायची लायकी नाही तुझी......"
बाकीच्या लोकांनी राकेशला पकडून मागे खेचले. वरुण म्हणाले, "अरे शांत हो, सोड तिला. आधी चिन्नूबद्दल सांगा."
"अरे, कधीचा आमचा जीव इथे टांगणीला लागलाय् " मनूकाकू
प्रशांतने सांगायला सुरुवात केली, "आम्ही हॉस्पिटलात पोचल्याबरोबर लगेच तिला ऑक्सीजन आणि सलाईन लावलं, रक्त दिलं. माझे कार्ड या वेळी कामाला आलं. तिची नाडी आणि रक्तदाब दोन्ही अगदी कमी झाले होते. त्यात हळू हळू सुधारणा होत गेली. शुध्दीवर यायच्या आधी ती ओठातल्या ओठात काही तरी पुटपुटत होती. अप्पा, स्वाती, मोबाइल, वाचवा असे तुटक तुटक शब्द निघत होते. आम्हाला त्याचा अर्थ कळत नव्हता. कौमुदीला थोडी कल्पना होती. ती आणि हे इन्स्पेक्टर या दोघांनी मिळून त्याचा अर्थ लावला. चिन्नू काही शुध्दीवर येत नव्हती हे पाहून इन्स्पेक्टरसाहेब बाहेर गेले. त्यांनी इथे येऊन काय केलं .."
"ते जाऊ दे रे. चिन्नूबद्दल सांग."
"तिचं बीपी आणि पल्सरेट वरखाली होत होतं. डॉक्टर म्हणाले की आत्ता फिफ्टी फिफ्टी चान्स आहे. अजून थोडा उशीर झाला असता तर सगळं हाताबाहेर गेलं असतं. आम्ही वाट पहात बसण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. हळू हळू सुधारणा होत गेली. चिन्नूनं किंचित हालचाल केली, डोळे अर्धवट उघडून पुन्हा मिटले, त्यात पुसटशी ओळख दिसली. डॉक्टरांनी तिला सेडेटिव्ह देऊन झोपवून ठेवलं आहे. ते म्हणाले आता धोका टळला आहे. रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वासोछ्वास या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत. तुम्ही घरी जाऊन सर्वांना सांगा. अजून दोन तीन तासांनी ती जागी होईल. उद्यापर्यंत बहुधा ठीक व्हायला पाहिजे."
"आणि तिचा कँसर?"
"दुर्दैवानं तो खरा आहे. या स्वाती आणि प्रेमानं तिला ढोंगी, खोटारडी ठरवलं आणि आपण सगळे त्याला बळी पडलो." राकेश उद्वेगाने बोलला.
"दादा. तुझ्यासारखीच स्वातीच्या कांगाव्यानं मी सुध्दा फसले रे. त्यात माझी काही चूक नाही." प्रेमा
"तिच्यावर तू जळत नव्हतीस? तिचा सारखा राग राग करत नव्हतीस? ती खोटारडी आहे असं सगळ्यात मोठ्यानं तूच ओरडत होतीस ना? आणि ते जगभर सांगत फिरलीस. आज सकाळी तिला ज्या अवस्थेत तू पाहिलंस त्यानं तुला काही वाटलं नाही? अगं काकांना, बाबांना, मला, कोणाला तरी सांगायचं होतंस. तेंव्हा तुझी अक्कल कुठं गेली होती? तुला बहीण म्हणायची लाज वाटते मला." राकेश
"तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होतो की स्वातीच्या नादाला लागू नकोस, माझं नाही ऐकलंस. स्वातीची पपेट व्हायलाच तुला आवडायचं. त्याला कोण काय करणार?" प्रशांत
"मंडळी, आजचा धोका टळला असला तरी अप्पासाहेब आणि चिन्मयी दोघेही तुमचे काही दिवसांचे सोबती आहेत हे लक्षात घेऊन वागा."
"आम्ही नेमके तसंच वागत होतो हो. मन घट्ट करून त्यांच्यासाठी आम्ही गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला होता. त्याची सुखद आठवण चिन्नूच्या स्मरणात रहावी असा आमचा प्रयत्न होता." वरुण
"पण स्वातीला ते पहावलं नाही. त्या चांगल्या आठवणींवर साफ बोळा फिरेल इतकं दुःख तिनं चिन्नीला दिलं" प्रशांत
"आणि आजच तिला संपवून टाकायची प्रेमाताईंना घाई झाली." शिंत्रे
"नाही हो. माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. चिन्नूला पाहून मीसुध्दा जाम घाबरले होते. माडीवरून धडधड करत मी खाली आले आणि स्वातीला सांगितलं. ती म्हणाली हे नवं नाटक असेल, आपण तिला भाव द्यायचा नाही. मला ते बरोबर वाटलं. उगाच मी तिचं ऐकलं" प्रेमा
"आणि आता अडचणीत आला आहात. असंगाशी साथ आणि प्राणाशी गाठ अशी म्हणच आहे."

"अरे राकेश आणि प्रशांत, इथे आणखी एक घोटाळा होऊन बसला आहे. या इन्स्पेक्टरांच्या बरोबर एक गृहस्थ कॅमेरा घेऊन आले होते. तो त्यांचाच माणूस असेल असं मला वाटलं होतं. पण तो एक रिपोर्टर निघाला. त्यानं ही बातमी त्याच्या चॅनलवरून जगजाहीर केली आहे." वरुण खिन्नपणे म्हणाले
"आम्हा दोघांची तुलना त्यानं राघोबा पेशव्यांशी केली. आमच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले आहेत रे." किशोरने भर घातली.
"काही काळजी करू नका, तसं काही झालेलं नाही." शिंत्र्यांनी खुलासा केला.
"मग ते बातमीपत्र?"
"त्याचं प्रसारण झालेलं नाही. देशमाने माझ्यामागे यायला निघाला तेंव्हाच मी त्याला बजावलं होतं की यातलं काहीही टीव्ही चॅनलवर दाखवण्यापूर्वी माझी परवानगी घे, नाहीतर गुन्ह्याच्या तपासात अडथळा आणण्याचा आरोप तुझ्यावर लावीन."
"तुमचे खरंच खूप उपकार आहेत."
"मी हे तुमच्यासाठी केलं असं समजू नका. टीव्हीवर आलेली बातमी अप्पासाहेबांनी पाहिली किंवा कुणीतरी पाहून त्यांना सांगितली तर ज्यासाठी चिन्मयीनं आपला प्राण धोक्यात घातला ती तिची धडपड व्यर्थ ठरेल. त्यामुळे अप्पासाहेब सुखरूपपणे इथे येऊन पोचेपर्यंत मी त्याला परवानगी देणार नाही. चिन्मयी बरी होऊन गेली तर तिलाही हे आवडणार नाही. शिवाय या बातमीमधली हवा निघून जाईल आणि तोपर्यंत देशमानेंना दुसरी एकादी सनसनाटी बातमी मिळेल. या दोन चांगल्या माणसामुळे आज तुमची अब्रू वाचणार आहे. माझं आताचं काम झालं आहे. मी निघतो."
असे म्हणून हवालदाराला मागे ठेऊन इन्स्पेक्टर शिंत्रे निघून जातात.

श्रीयुत व श्रीमती दाभोळकर आणि त्यांचा मुलगा ऋषभ या तीन दिशांना तोंडे असलेल्या तीघांना एकत्र आलेले पाहून सारेच आश्चर्यचकित होतात. किशोर उद्वेगाने म्हणतात, "ब्रह्मराक्षस आणि आग्या वेताळ एकत्र आला आहात? चला, आम्हाला खाऊन टाका, नाहीतर हा वाडा पाडून टाका, आम्हाला गाडून टाका. आधीच आम्ही गळ्यापर्यंत चिखलात रुतलो आहोत. आता आणखी काय फरक पडणार आहे?"
"अहो, मी आज वाईट हेतूने इथे आलेलो नाही." दाभोळकर सांगायला लागतात. "रग्गड पैसा कमावूनसुध्दा अतीलोभाने मी आंधळा झालो होतो आणि मला संपत्तीचा माज चढला होता. त्यामुळे आतापर्यंत मी खूप वाईट वागलो. वाईट वागून आणखी जितके काही मिळवण्यासारखे होते ते मिळवत राहिलो. काही गोष्टी मिळवता येत नाहीत हे ही समजलं, तसंच काही गोष्टी गमवाव्या लागल्या. आता थोडं चांगलं वागून त्या परत मिळवायचा प्रयत्न करायचं ठरवलं आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी फक्त दिलगिरीच व्यक्त करू शकतो, माफी मागतो, पण तुमचं जितकं नुकसान झालं ते आधी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात आधी त्या खंडागळ्याकडून वरुणरावांच्या प्रेसचा संपूर्ण ताबा त्यांना परत मिळवून देईन. त्याचा विस्तार वाढवायला मदत करेन. तुमची जुनी गाडी कदाचित आता परत मिळणार नाही, पण तुमच्या दारापाशी एक नवी कोरी मोठी गाडी उभी करेन. त्या विकासनं जे पैसे तुम्हाला दिले आहेत त्याची दुप्पट परतफेड त्याला करेन."
"तो मानेल का?"
"चिन्मयीला कँसर झाल्याचं कळल्यापासून तिच्याबद्दल त्याला वाटणारी ओढ डळमळली आहे असं दिसतंय्. आजच्या दिवसात तो काही हॉस्पिटलकडे फिरकला नाही असं समजलं. आपण उगीच तिच्यावर इतका वेळ खर्च केला असं बहुधा आता त्याला वाटायला लागलंय्. चिन्मयीला त्याच्यात इंटरेस्ट नाही हे तर त्याला पूर्वीपासून माहीत आहेच. त्यामुळे बाबांची ही ऑफर तो सोडेल असं मला वाटत नाही." ऋषभने तर्क केला.
"ऋषीला सोडून ती विकासकडे कधीच गेली नसती. मला हे माहीत आहे." ऋषीच्या आई, सविताताई उद्गारल्या. " खरं तर गणेशोत्सवाच्या वेळी मनात एक बेत रचून मी तुमच्याकडे आले होते."
"पण त्या दिवशी काय झालं? देवाचा प्रसादसुध्दा न घेता तुम्ही तडकाफडकी चालला गेलात." मनूकाकू
"आधी चिन्मयीला ऋषीबद्दल विचारायचं, ती हो म्हणणारच अशी माझी खात्री होती, तिचा होकार घेतला की घरातल्या मोठ्या माणसांशी चर्चा करायची असं मी मनात योजलं होतं, पण चिन्मयीनं होकार दिला नाही आणि त्याचं कारणही सांगितलं नाही. त्यामुळे मी थोडी खट्टू झालेले होते. त्यातून जेंव्हा ती प्रसाद आणायला आत गेली तेवढ्यात स्वाती बाहेर आली आणि तिनं चिन्मयीबद्दल मला भलतं सलतं सांगितलं हो."
"काय सांगितलं?"
"की तिच्या मनात ऋषीबद्दल काही नाजुक भावना नाहीत. अशा अनेक मुलांना ती निर्दयपणे खेळवते आहे. तिच्या दृष्टीनं ही सगळी फक्त चार घटकांची मौजमजाच आहे. वगैरे वगैरे. त्यामुळे मला इथे क्षणभरसुध्दा थांबावं असं वाटलं नाही."
"खरं तर आपण जास्त काळ जगणार नाही असं चिन्मयीला वाटायला लागलं होतं, पण वेडीनं हे मला सांगितलं नाही. तिनं माझ्याशी जवळीक वाढवली तर नंतर मला त्याचा खूप त्रास होईल, कदाचित मी तो सहन करू शकणार नाही असं गृहीत धरून ती अलीकडे माझ्यापासून दूर दूर रहायला लागली होती. त्यामुळेच तिनं आईला होकार दिला नाही. पण आमचा गैरसमज झाला." ऋषभनं भर घातली. "शिवाय तिनं ती पैजेची थाप तिच्या मैत्रिणीकडून मला ऐकवली. तिच्या अपेक्षेप्रमाणे मी चिडलो, संतापलो, पण तिचा द्वेष करू शकलो नाही."
"का?"
"मी लहानपणापासून माझ्या आईपासून दुरावलो होतो. तिचं तोंडदेखील पहायला तयार नव्हतो. चिन्मयीनं प्रचंड खटपट करून आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. यातही बिब्बा घालायचा प्रयत्न प्रेमानं केला होता, मी स्वतः साथ देत नव्हतो. त्यामुळे चिन्मयीला खूप त्रास झाला होता. माझ्यासाठी तिनं तो सगळा सहन केला. फक्त एक पैज जिंकण्यासाठी कोणीही हे करणार नाही. आधी मी ऐदी होतो. व्यवसाय करायला निघालो तो सुध्दा आयत्या मिळालेल्या आजोबांच्या पैशावर. ते जमलं नाही तेंव्हा मी जाम वैतागलो होतो. चिन्मयीनं मला धीर दिला, माझी साथ केली आणि मला आपल्या पायावर उभं केलं. हे सारं मी विसरू शकत नव्हतो, पण चिन्मयीनं असं अचानक घूम जाव का केलं तेही समजत नसल्यामुळे गोंधळलो होतो. त्यात हा विकास सारखा आमच्यातले गैरसमज वाढवायचे प्रयत्न करत होता आणि स्वाती, प्रेमा आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. या सगळ्यामुळे मी अस्वस्थ होतो. भविष्यकाळात मला कमी दुःख व्हावं म्हणून ती करत असलेल्या प्रयत्नांमुळे मी आज किती भरकटत चाललो आहे हे समजल्यावर चिन्मयीला आपली चूक कळली होती, पण माझ्याकडे परत येण्याचा तिचा मार्ग बंद झाल्यामुळे तिचीही घुसमट होत होती."
"हे सगळं तुला कसं कळलं?"
"चिन्मयीची आजची अवस्था पाहून कौमुदीला रहावलं गेलं नाही. हॉस्पिटलमधून ती थेट आमच्याकडे आली आणि चिन्मयीनं जे जे माझ्यापासून लपवून ठेवलं होतं ते सगळं तिनं आम्हाला खुलासेवार सांगितलं. आता आमच्या कुणाच्याही मनात चिन्मयीच्याबद्दल कसलीही आढी उरलेली नाही. उद्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवण्यात शहाणपणा नाही ही गोष्ट आता चिन्मयीलाही पटेल अशी माझी खात्री आहे. तिच्या गंभीर स्वरूपाच्या दुखण्यासकट मी तिचा स्वीकार करणार आहे आणि आता तिला माझ्यापासून दूर रहावेसे नक्कीच वाटणार नाही." ऋषी
"आम्ही तिला पहायला हॉस्पिटलात गेलो होतो, पण ती गाढ झोपलेली असल्यामुळे तिला उठवलं नाही आणि तडक इकडे आलो." सविताताई म्हणाल्या, "आम्ही असा विचार केला आहे की अप्पासाहेब आले की त्यांची संमती घेऊन आम्ही लगेच या मुलांचे चार हात करून टाकू आणि चिन्मयीला आमच्याकडे घेऊन जाऊ. यापुढे तिला तळहातावरच्या फोडासारखे जपू आणि या दुखण्यातून बाहेर काढायच्या प्रयत्नांची शर्थ करू."
"आम्ही डॉक्टर आयुष्मान यांच्याशी बोललो. ते म्हणाले की परदेशात अलीकडे अशा प्रकारच्या दोन तीन केसेस ब-या झाल्या आहेत. वाटल्यास चिन्मयीला तपासण्यासाठी तिकडच्या डॉक्टरांना इकडे आणू किंवा तिच्या उपचारासाठी या दोघांना तिकडे पाठवू. आमच्याकडून जे जे काही शक्य असेल ते ते करायला आता आम्ही मागे पुढे पाहणार नाही." दाभोळकरांनी आश्वासन दिलं
"आता आम्ही निघतो. बरीच कामं करायची आहेत. अप्पासाहेब आले की लगेच कळवा हं." सविताताई निरोप घेतात.

अप्पासाहेब सुभेदार, उल्का, संपत आणि सुभेदारांच्या घरातला नोकर साहेब एकत्र प्रवेश करतात. घरातले लोक चकित होऊन पहात आहेत. संपतराव सांगतात, "यात्रा संपवून आमची बस परतीच्या वाटेला लागलेली होती. इन्स्पेक्टर शिंत्र्यांचा फोन आला. आजच्या घडामोडींबद्दल त्यांनी सांगितलं आणि अप्पांना सोबत घेऊन येण्याची सूचना केली. त्यासाठी आम्ही आमच्या बसचा मार्ग थोडासा बदलला आणि त्यांना घेऊनच इकडे आलो. वाटेतच या साहेबचं गावही लागलं. आपला नवस फेडून झाल्यावर परत येण्यासाठी तो बसच्या स्टँडवर उभा होता. त्यालाही बरोबर घेतलं."
अप्पासाहेब सांगू लागले, "या संपतरावांनी चाचपडत मला थोडीशी कल्पना दिली आहे. पण मला कसला धक्का सहनच होणार नाही असं तुम्ही का समजता आहात? अरे तुम्हाला लहानाचे मोठे करतांना या आयुष्यात कितीतरी धक्के मी खाल्ले आहेत आणि पचवले आहेत. ही चिन्मयी तर इतकी वेडी आहे की मला त्रास होऊ नये म्हणून स्वतः वाट्टेल ते सहन करायची तिची तयारी असते. अरे, त्रासाला, दुःखांना असं घाबरायचं नसतं. आल्या परिस्थितीला धीरानं तोंड द्यायचं. आपल्या परीनं चांगलं वागायचं. मानवतेची ज्योत आपल्या ह़दयात तेवत ठेवायची आणि तोंडानं म्हणायचं...."
"शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुध्दी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते।। " एका सुरात सारे जण म्हणतात.

......................... (समाप्त)

कथाविरंगुळा