आजकाल माझी 'कारवाँ' मधल्या हेलनसारखी अवस्था झाली आहे. ती कशी अंगाला शक्य त्या सगळ्या कोनांमधून घुसळून आणि डोळ्यांना, पापण्यांना, बुबुळांना शक्य त्या सगळ्या दिशांना फिरवून "वो आ गया...वो आ गया..." असं बेभानपणे जाहीर करत सळसळत नाचते; तसच काहीसं झालयं माझं...
'तो' येणार असे वाटले की मी बाह्या सरसावून बसतो. कधी-कधी अगदी आतूरतेने त्याची वाट देखील बघतो. मग मनातल्या मनात मी देखील "वो आ गया...वो आ गया..." असं पुटपुटतो. कधी-कधी (नव्हे बर्याचदा) 'त्या'च्या येण्याची धास्ती मला अस्वस्थ करून जाते. 'तो' आला की 'मी माझा' राहत नाही. 'तो' आला की मी माझाच काय, माझ्या बायकोचा देखील राहत नाही. 'त्या'ने मला आपल्या कवेत घेतले की मग मला कसलेच भान राहत नाही. एखाद्या झंझावातासारखा 'तो' येऊन मला सैरभैर करून जातो...
नाही, ही तुम्ही 'सम'जताय तशी थ्रि'लिंग' आणि रं'गे'ल भानगड अजिबात नाही. मी हे सगळं बोलतोय ते आपल्या कॉमन मित्राविषयी...ज्याचं नाव आहे, कंटाळा!!!
कंटाळा हा आजकाल माझा परममित्र बनलेला आहे. बहुधा सगळ्यांना त्याच्या गहिर्या दोस्तीचा कधीतरी अनुभव येतोच. कारण कुठलेही असो, कंटाळा त्याच्या मैत्रीचा हक्क न चुकता बजावतो. याची मैत्री तशी धोकादायकच. चांगल्या क्षणांचं वाटोळं करावं तर कंटाळ्यानेच. आपल्या (म्हणजे आपापल्या) बायकोच्या उत्साहावर व्यवस्थित पाणी आणि विरजण घालून नामानिराळा राहणारा हा मित्र म्हणजे "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" या म्हणीचे मूर्त स्वरूप आहे. बायको एखाद्या शनिवारी संध्याकाळी बाहेर फिरायला जायचा आणि मग बाहेरूनच जेवून घरी यायचा बेत आखते. आपण अगदी बुधवारपर्यंत तिच्या या बेताला खतपाणी घालतो. "नंतर आईस-क्रीमही खाऊ आणि मस्त मसाला पान खात-खात घरी येऊ." असे अॅड-ऑन्स टाकून आपण तिच्या अपेक्षा आणखी वाढवून ठेवतो. अतिउत्साहाच्या भरात आपण "त्यापेक्षा आपण आधी फिरायला जाऊ; भटकत-भटकत सिटी प्राईडला जाऊ; एखादा मस्त पिक्चर टाकू; बाहेर जेवण करू, आईस-क्रीम खाऊ, पान खाऊ आणि निवांत घरी जाऊ..." असं म्हणून उत्साहाच्या सगळ्या सुरक्षित सीमा पार करतो. गुरुवारपर्यंत (हो, गुरुवारीच!) बायको कुठले कपडे घालायचे, कानातले कुठले घालायचे, चप्पल कुठली घालायची असा विचार सुरु करते आणि त्यानुसार तयारी सुरु करते. शुक्रवारी आपण विकेंडच्या आनंदात तिला एखादा ड्रेस ही प्रॉमिस करून टाकतो. मग काय, बायकोच्या आनंदाला पारावार राहत नाही. दिवसभर ती एखाद्या परीसारखी तरंगत असते. वेळेवर चहा, जेवण, नाष्ता अशी सगळी 'हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री' घरी अवतरते. मग "तुझे बूट खूप खराब झालेयत रे...उद्या दुसरे घालून जा. मी यांना पॉलिश करून आणेल." असंही पुसटसं ऐकायला मिळतं.
शुक्रवारी संध्याकाळपासूनच आपला 'मित्र' भेटी द्यायला लागतो. मग आपण हळूच तिच्या बेताला बेता-बेतानेच प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. "अगं उद्या संध्याकाळी एका मित्राला भेटायला जायचयं; त्याचे वडील खूप आजारी आहेत." आपण पहिला निरुपद्रवी पेच टाकतो. "पण मी लगेच परत येतो; आपण लगेच निघुयात". बायको थोडीशी निर्धास्त होते. मग शनिवारी सकाळी कंटाळ्याने आपला ताबा घेतलेला असतो. सकाळी ११ वाजता आपण (की कंटाळा?) आळसावलेल्या अवस्थेत पेपर चाळत असतांना पुढच्या गेमप्लॅनची तयारी करतो. मग दुपारी जेवण होते...आळस आणि कंटाळा वाढत जातो. पाच वाजता "खूप डोकं दुखतयं...संध्याकाळी जायचा कंटाळा आला आहे" असं म्हणून आपण वातावरणनिर्मिती करतो आणि शेवटी थोडी चिडचिड करून तिचा बेत हाणून पाडतो. असं किती जणांच्या बाबतीत घडतं माहित नाही पण असं माझ्या बाबतीत एक-दोनदा घडलेलं आहे. खरच खूप कंटाळा आलेला असतो...एक आनंदी संध्याकाळ कंटाळ्यामुळे उमलण्याआधीच कोमेजते आणि टीव्हीवरच्या निरर्थक, रटाळ पडद्यावर हरवून जाते.
आजकाल ऑफिसमध्ये पण खूप कंटाळा येतो. नवीन काही वेगळे काम आले की कंटाळा हमखास मानगुटीवर बसून छळतो.
"समीर, वुई नीड टू एनहान्स द एक्जिस्टिंग अॅप्लिकेशन"
"ओह..व्हाय?"
"वुई हॅव गॉट फीडबॅक फ्रॉम अ लॉट ऑफ युजर्स दॅट धिस अॅप्लिकेशन इज नॉट युजेबल. अँड इट डज नॉट हॅव ऑल दॅट वुई नीड इन अॅन अप्लिकेशन लाईक धिस..वुई विल हॅव टू डू ह्युरिस्टीक इवॅल्युअशन, कंडक्ट सर्वेज, टेक फीडबॅक, गॅदर रिक्वायरमेंटस अँड री-डिजाईन द अॅप्लिकेशन..."
"बट आय मे नॉट स्पेंड टू मच टाईम ऑन धिस सिन्स आय हॅव ऑलरेडी बीन असाईनड टू अ फुल-टाईम प्रोजेक्ट."
"बट धिस इज आवर युनिट वर्क. यु विल हॅव टू स्पेअर सम टाईम वीकली"
"इट्स जस्ट अ स्मॉल अॅप्लिकेशन. व्हाय डू वुई नीड टू बॉदर अबॉउट इट सो मच?"
झालं, कंटाळ्यापायी मी हे काम कसं निरर्थक आहे हे पटवून द्यायला लागलो. त्यात 'रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट' किती क्षुल्लक आहे; लोकं सर्वे किती फालतू समजतात; त्यांचा फीडबॅक कसा बर्याचदा फसवा आणि घाई-घाईत दिलेला असतो...अशी बरीच कारणे द्यायला सुरुवात केली. ही सगळी कारणे तकलादू होती असे अजिबात नाही. यातली सगळी कारणे अगदी खरी होती. पण त्या कामाचा सांगोपांग विचार करून मी ही कारणे देत नव्हतो; मला कंटाळा आल्याने देत होतो हे सत्य मी माझ्या विवेकबुद्धीपासून लपवू शकत नव्हतो. कंटाळा तुमच्या ऑफिसमधल्या कामात किती घातक ठरू शकतो त्याचे हे एक छोटे उदाहरण. मग अगदी नेमलेल्या कामात टाळाटाळ करणे, मग कामे पुढे किंवा कुणाकडे तरी ढकलणे या पातळीपर्यंत कंटाळ्याचा आलेख वाढत जातो.
मीटींग्जचा कंटाळा, ब्रेनस्टॉर्मिंगचा कंटाळा, डॉक्युमेंट्स वाचण्याचा कंटाळा....कामाचा कंटाळा, ऑफिसला जाण्याचा कंटाळा....कितीही टाळायचा म्हटला तरी कसा टाळावा हा कंटाळा?
मागच्या बुधवारी आमच्या ऑफिसात जपानी क्लायंटकडचे २० लोकांचे एक मंडळ आले होते. आदल्या दिवशी तशी कल्पना दिली होती. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. जपान्यांची टाप-टीप बघून मला माझीच शरम वाटायला लागली. स्वच्छ इस्त्री केलेले कपडे, चमचमणारे कोट, लख्ख बूट... मी हळूच माझ्याकडे पाहिलं. सोमवारी घातलेले कपडे मी शिरस्त्याप्रमाणे बुधवारी घातले होते. (मंगळवारचे गुरुवारी घालत असतो.) पावसात भिजलेले बूट पॉलिशविना मेलेल्या कुत्र्यासारखे दिसत होते. पाण्याचे पांढरे डाग बुटांवर उठून दिसत होते. एका बुटाची लेस वाट चुकलेल्या वासरासारखी इकडे-तिकडे नाचत होती. कॉलरजवळ काळपट झालेला शर्ट पँटमधून बंडखोरी करून बाहेरचे जग पाहण्याची धडपड करत होता. केस विस्कटलेले होते आणि दाढीचे खुंट इतके वाढले होते की कुणी खुशाल खुंटीसारखा वापर करून शर्ट अडकवावा. चेहरा तेलकट झाला होता. आधीच मी देखणा आणि त्यात असा अवतार झाल्याने मी अतिरेकी दिसत होतो.
दाढी करण्याचा कंटाळा, बूट पॉलिश करण्याचा कंटाळा...संध्याकाळी घरी आल्यावर तर कंटाळा आपल्या परमोच्च पातळीवर जाऊन पोहोचतो. कसेबसे कपडे बदलवून टीव्ही नामक डोकेदुखीसमोर एखाद्या ओंडक्यासारखे बसून बेचव कार्यक्रम बघण्यात काहीच आनंद नसतो; पण आजकाल कंटाळ्याने मला त्यातही आनंद शोधण्यास भाग पाडले आहे. 'बिग बॉस', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'बंदिनी', 'राखी का फैसला', 'इस देस न आना लाडो', 'मान रहे तेरा पिता' सारखे रटाळ, निष्क्रीय बनवणारे कार्यक्रम असोत किंवा 'आगे से राईट', 'मेला', 'जंग', 'रामजाने' सारखे भिकार चित्रपट असोत; मी ठामपणे बसून राहतो. माझ्यातली निष्क्रीयता मला कळते पण कंटाळ्यापुढे नाईलाज असतो. एक-दोन महिन्यांपूर्वी मी ए. आर. रहमान चे एक सुंदर चरित्र वाचले; त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतींवर आणि त्यांच्या कोड्यांवर बेतलेले डोक्याला चालना देणारे एक पुस्तक वाचले; जपानी कायझेन व्यवस्थापन पद्धतीवर एक पुस्तक वाचले; थोडेफार लिखाण केले, माझ्या काही नातेवाईकांना बर्याच वर्षांनी भेटलो; ऑफिसात देखील बरे काम केले......आता आठवले की थोडे वाईट वाटते. असा अचानक वाल्मिकीचा वाल्या कसा झाला? आनंदाने आणि उत्साहाने नवनवीन अनुभव घेणारा मी आज असा कंटाळेश्वर कसा झालो? बाय द वे, 'कंटाळेश्वर' ही माझ्या बायकोने मला अलिकडच्या काळात प्रदान केलेली मानद पदवी आहे.
पण कधी कधी हा कंटाळा प्रगतीसाठी आवश्यक असतो. एकाच पद्धतीच्या कामाचा पुरेपूर, अगदी मेंदूला झिणझिण्या येईपर्यंत कंटाळा आल्याशिवाय आपण पुढचे पाऊल उचलत नाही असे मला वाटते. नाविन्याचा शोध, मेंदूला आव्हान देणार्या क्षणांचा शोध ही सारी धडपड कंटाळ्यातून जन्माला येते. कंटाळा ही नाविन्याची जननी आहे. समाधानी राहिलो तर पुढे जाणार कसे? रुटिन इज नॉर्मल असे कुणीतरी म्हणाले आहेच. कंटाळ्याच्या पुढची पायरी विचार आणि त्यापुढची पायरी पूर्ण ताकदीनिशी कृती आहे. पुढच्या दोन पायर्या जीवनाला नवीन अर्थ देतात. आणि त्या पायर्यांवर पाऊल ठेवण्याचा कंटाळा केलात तर मग माझ्यासारखी गत होते.
आता अचानक मला पुढे काही टंकण्याचा कंटाळा आला आहे.... तुमच्या कंटाळ्याच्या कथा अशाच आहेत का?
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 2:44 pm | नगरीनिरंजन
मध्येच तो आल्यामुळे अर्धंच वाचलंय. पूर्ण वाचलं की उरलेली
20 Oct 2010 - 3:16 pm | चिरोटा
काम करायचा कंटाळा आला होता म्हणूनच हे वाचायला घेतले .आवडला कंटाळा.
20 Oct 2010 - 3:18 pm | यशोधरा
छान लिहिलंय. कंटाळेकी हमसेभी पुरानी दोस्ती हय!
20 Oct 2010 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे
सगळे नवरे सारखेच..
माझा नवरा दाढी न करता येत असेल तर मी बाहेर जाणेच कॅन्सल करते..गपगुमान करतो मग.
तसेच बाहेर जाताना बुट घालायचा कंटाळा करतो... चपल्स घालतो...म्हणतो ओफिसात दिवसभर घालतो..परत मी कॅन्सल करते कि मग घालतो. मला नाही बै आवडत मी बरोबर असताना चप्पल्स घातलेला नव्रा.
20 Oct 2010 - 3:38 pm | गणपा
बिचारं ते ध्यान.
पाशवी चुचु चा निषेध..
20 Oct 2010 - 3:39 pm | गांधीवादी
>>माझा नवरा दाढी न करता येत असेल तर मी बाहेर जाणेच कॅन्सल करते..
कित्ती सोप्पा उपाय आहे बाहेर जाणे कॅन्सल करण्याचा.
20 Oct 2010 - 4:02 pm | समीरसूर
मी ऑफिस सोडून कुठेच बूट घालत नाही. :-)
मी, इन फॅक्ट, ऑफिसातही बूट काढून खूर्चीवर मांडी मारून बसतो. मला बूट हा प्रकारच अजिबात आवडत नाही. सारखं आपलं बांधून ठेवल्यासारखं वाटतं. बर्याच लोकांचं जे लुंगीविषयी मत आहे ते माझं चपलांविषयी आहे. सुटसुटीत चपला पायात सरकवून बाहेर हिंडण्याची मजाच निराळी. कुठेही काढा, पाण्यात भिजवा, चिखलात बुडवा...काहीच प्रॉब्लेम नाही. :-)
मी २९ ऑगस्टला शेवटची दाढी केली होती. ते ही माझ्या बायकोच्या भावाचा साखरपुडा होता म्हणून आणि चारचौघात दाढी चांगली दिसणार नाही असे बायकोने ठणकावून सांगीतले होते म्हणून मी दाढी केली...त्यानंतर केलेली नाही. आता मस्त वाढलीय. बरेच लोकं मी 'कास्ट अवे' मधल्या हीरोसारखा दिसतोय असं म्हटलेत...असेनही कदाचित. शेवटी जातीच्या हँडसमाला काहीही चांगले दिसते. ;-)
--समीर
20 Oct 2010 - 3:51 pm | कानडाऊ योगेशु
मला तर कोणी हाका मारुन बोलवत असेल तर मागे वळून पाहायचाही कंटाळा येतो.
शनिवारी रविवारी तर "तुम्ही साधे बोट सुध्दा हलवत नाहीत" हा बायकोचा टोमणा खातोच खातो.
20 Oct 2010 - 4:05 pm | समीरसूर
आवडला हा कंटाळा.
मला सकाळी सकाळी दात घासायचा खूप कंटाळा येतो. शौचालयात जाण्यास उद्युक्त करणारी 'दुसरी' गोष्ट म्हणजे सकाळचा ताजा पेपर. आंघोळ हा एक तसाच रटाळ प्रकार!! पटकन कशीबशी उरकून बाहेर येण्यात शहाणपण आहे. बाकी होस्टेलवर असतांना मला कपडे धुवायचा खूप कंटाळा यायचा. तितकाच कंटाळा वर्गात बसायचा यायचा. :-)
--समीर
20 Oct 2010 - 4:02 pm | Dhananjay Borgaonkar
मस्त झालाय लेख. मला पण असाच शनिवारी रविवारी सोमवारी मंगळ्वारी बुधवारी आणि गुरुवारी भयानक कंटाळा येतो.
शुक्रवारी मात्र भलताच खुशीत असतो मी :P
आधी मी सुद्धा दाढी करायचा कंटाळा करयचो पण आता हनुवटीवर १,२ पांढरे खुंट आल्याने दिवसाआड दाढी करावी लागते. :(
संदीप खरेची कंटाळ्यावरची कविता आठवली :)
20 Oct 2010 - 4:09 pm | समीरसूर
सध्या माझ्या दाढीत बरेच केस पांढरे आहेत...पण नो टेंशन! आहेत तर आहेत...लपवायचे कशासाठी? असा निर्लज्जपणा करून मी मस्त दाढी वाढवून ऑफिसला येतो... :-)
--समीर
20 Oct 2010 - 4:10 pm | समीरसूर
सध्या माझ्या दाढीत बरेच केस पांढरे आहेत...पण नो टेंशन! आहेत तर आहेत...लपवायचे कशासाठी? असा निर्लज्जपणा करून मी मस्त दाढी वाढवून ऑफिसला येतो... :-)
--समीर
20 Oct 2010 - 4:16 pm | कानडाऊ योगेशु
मला तर आरशांत चेहरा पाहण्याचाही कंटाळा येतो.बर्याचे वेळेला ऑफिसला जाताना बायको जेव्हा बजावते कि "अहो जरा केस विंचरुन तरी जावा" तेव्हा हातानेच ते थोडेफार सेट करुन जातो.(हेल्मेट घातल्यावर केस विस्कटणारच आहेत ना ? मग भांग पाडण्याचा काय उपयोग असे उत्तर पत्नीला देवुन मी बर्याच वेळेला निरूत्तर केले आहे.)
20 Oct 2010 - 4:43 pm | Dhananjay Borgaonkar
आहो तसा मी निर्लज्जच आहे. पण दोन महिन्यात लग्न आहे ना माझ. म्हणुन आपली नाटकं.
मग जानेवारी पासुन आहेच दाढी :P
20 Oct 2010 - 5:40 pm | धमाल मुलगा
मग अजुन सहा महिनेतरी तुळतुळीत दाढीशिवाय फिरणार नाहीस तू मित्रा!
हवं तर पैज लाव.
(पैज लावण्यापुर्वी सुहास..ला कन्सल्ट करुन येणे. )
20 Oct 2010 - 6:11 pm | Dhananjay Borgaonkar
अजुन ६ महिने??आरे काय त्रास आहे हा :(
20 Oct 2010 - 6:16 pm | धमाल मुलगा
न करण्याचा त्रास जास्त होईल. :D
20 Oct 2010 - 8:10 pm | शेखर
अनुभवाने शहाणपण येते म्हणतात ;)
21 Oct 2010 - 12:46 am | विश्वनाथ मेहेंदळे
बाजीगर मध्ये वाक्य आहे ना, "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" वगैरे वगैरे... त्यातला प्रकार आहे हा.
आता काय पाने के लिये हे विचारू नये. ;-)
20 Oct 2010 - 6:00 pm | भाऊ पाटील
लै वेळा सहमत.
दाढी करणे हे जगातले सगळ्यात कंटाळवाणे काम आहे. :)
20 Oct 2010 - 6:08 pm | गांधीवादी
man face waxing करून मिळते,
एकदा का केले कि दीड दोन महिने चेहरा एकदम गुळगुळीत.
20 Oct 2010 - 4:07 pm | गांधीवादी
लग्न होण्या अगोदर मी माझी एक जीनपॅन्ट सलग अडीच महिने घातली होती.
20 Oct 2010 - 4:20 pm | धमाल मुलगा
मी सव्वादोन महिन्यातच कंटाळलो तीच ती प्यांट घालायला :D
20 Oct 2010 - 4:27 pm | गांधीवादी
अडीच महिन्यांनी तिला धुतल्यावर अर्धा किलोनी हलकी झाली होती.
20 Oct 2010 - 4:08 pm | सुहास..
हा हा हा !!
छान लेख ....मला कटाळ्ळा (अस्स्सल मराठवाड्याच पाणी लागलेला शब्द,) सहसा येत नाही पण एखाद्या वेळी आला की मग माझच काही खर नसत .
20 Oct 2010 - 4:11 pm | छोटा डॉन
मस्त लेख आहे.
आवडला.
वास्तविक पाहता ह्यावर एक मोठ्ठी प्रतिक्रिया द्यायला हवी पण आजकाल आम्हाला एकंदर आंतरजालाचा व खासकरुन त्यावर लिहण्याचा कंटाळा येत असल्याने इथेच थांबतो.
बाकी मज्जा मज्जा वाचत आहे. :)
- छोटा डॉन
20 Oct 2010 - 4:15 pm | ऋषिकेश
कंटाळा व टंकाळा हे माझे जिवलग मित्र आहेत.. पैकी सध्या टंकाळा आल्याने अधिक टंकु शकत नाही
20 Oct 2010 - 4:20 pm | धमाल मुलगा
मला नक्की कळेना, की हे आत्मकथन मी लिहिलं तरी कधी!
नंतर लक्षात आलं, असे बहाद्दर आपण एकटेच नव्हे, आहेत..सोबतीला आणखीही बरेच आहेत.
मला आळसावर कोणि बोलाय्ला लागलं की त्याला २च वाक्यं ऐकवतो.
१.महात्मा गांधी म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे.
२.महात्मा गांधी म्हणतात, शत्रूवर प्रेम करा.
:D
मस्त लिहिलंय समीरसूर. एकदम आवडलं. (आवडेल नाहीतर काय? तंतोतंत जुळताहेत लक्षणं...)
20 Oct 2010 - 4:46 pm | पैसा
लिहायचा कंटाळा आल्यामुळे धमु शी सहमत.
20 Oct 2010 - 4:50 pm | गणपा
ए धम्या ते आराम हराम है नेरुचाचांनी म्हणलय ना.
मायला US (उल्हासनगर) च्या नावावर चायनाचा माल खपवतय हे.
20 Oct 2010 - 5:33 pm | गांधीवादी
'आळस माणसाचा शत्रू आहे' हे एका सुविचार पुस्तकात वाचले होते,
पण त्याच सुविचाराच्या पुस्तकात अजून एक सुविचार होता.
'शत्रूशी नेहमी प्रेमाने वागावे.'
20 Oct 2010 - 5:38 pm | धमाल मुलगा
इतकी पिवळी पुस्तकं (जुनं पुस्तक हे पिवळं पडतं.) आम्ही नाय बा वाचत,
20 Oct 2010 - 5:27 pm | पर्नल नेने मराठे
समिरसुर मग तुम्हाला आवड तरी कसली आहे....:-/
21 Oct 2010 - 9:35 am | समीरसूर
पर्नल नेने मराठे,
चांगला प्रश्न! विचार करायला लावणारा प्रश्न! उत्तर सापडले की लगेच सांगतो. ;-)
ढोबळ मानाने म्हणाल तर मला बर्याच गोष्टी आवडतात. चांगली पुस्तके वाचणे, चांगले चित्रपट बघणे, थोडं लिखाण करणे, गप्पा मारणे, गाणी ऐकणे/म्हणणे (मी गायक नाही तरी गाणी म्हणायला आवडतात, कुणी कानात बोळे घालून बसले तरीही)...इत्यादी....
गप्पा मारण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. मित्रांचं टोळकं घेऊन संध्याकाळी निवांत बसावं, दुसरा दिवस मोकळा असावा (तिसरा, चौथा, पाचवा....मोकळे असतील तर उत्तमच), सगळ्या विषयांवर झाडून गप्पा हाणाव्यात, मध्येच एखाद्या हळुवार आठवणीने आवाजातला कंप हूरहूर लावून जावा, रम्य आठवणींचे दिवस कधी चमक तर कधी अश्रू बनून डोळ्यात दिसावेत, वादातला त्वेष डोळ्यात अंगार होऊन चमकावा, सगळ्यांची खबर, ख्याली-खुशाली घ्यावी, कुणी अडचणीत असेल तर त्याला जोश द्यावा....असे सगळे रंग घेऊन गप्पा रात्री उशीरापर्यंत चालाव्यात. पुढचे कैक आठवडे ही शिदोरी पुरते. अशीच पण वेगळी गंमत बायकोसोबत किंवा आई-बाबा-भाऊ-वहिनी-बहीण-पुतण्या-आजी-आजोबा-काका-मावशी-सासू-सासरे यांच्या सोबत गप्पा मारतांना येते. यांत्रिकपणे जीवन जगतांना गप्प-गप्प राहून आपापले जीवन 'कंठण्यापेक्षा' सगळ्यांशी सणसणीत गप्पा हाणत जीवन 'जगण्यात' खूप मजा आहे.
एकदा आमच्या ऑफिसातला आमचा सहकार्यांचा गट एका पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेला. मी पण होतोच. सगळे तिथे पोहोचण्याआधी अगदी निवांत हसत होते, एकमेकांची खिल्ली उडवत होते. मी माझ्या एका तथाकथित उच्चभ्रू सहकार्याला हळूच सांगीतले "यार, मेरे पँट की झिप खराब हो गयी हैं." खरचं माझ्या पँटची झिप ११ वाजताच्या सुमारास अचानक अडून बसली. मी खूपदा टॉयलेटमध्ये जाऊन तिची समजूत काढायचा प्रयत्न केला पण सारे प्रयत्न व्यर्थ! मी सरळ शर्ट आऊट करून हिंडत होतो. माझा सहकारी हसायला लागला. मग मी सगळ्यांना आधीच कल्पना देऊन ठेवली. मुली खूप हसायला लागल्या. हॉटेलात गेल्यावर सगळे चिडीचूप झाले. तिथला तो रुबाब, तिथल्या लोकांची शान बघून सगळ्यांच्या वागण्यात अवघडलेपणा आला. मी बिनधास्त शर्ट-इन विना फिरत होतो. जेवतांना सगळे अगदी कसोशीने काटे-चमचे घेऊन जेवायचा प्रयत्न करू लागले. मी सरळ हाताने जेवायला सुरुवात केली. सगळ्यांचे चेहरे खुलले आणि मग सगळ्यांनीच हाताने जेवायला सुरुवात केली. वातावरणात एकदम हलकेपणा आला. म्हणजे सगळेच सारखे असतात फक्त इतरांना दाखवण्यासाठी कृत्रिम औपचारिकतेची किंवा एटीकेट्सची काटेरी शाल पांघरून सगळं अवघड करून टाकतात. कितीतरी लोकं कबुली देतात की अमुक एक दिवशी त्यांनी फाटलेले मोजे घातले होते किंवा चुरगळलेला शर्ट घातला होता किंवा जेवतांना अन्न त्यांच्या अंगावर सांडले होते आणि मग बेसिनवर जाऊन त्यांनी कपड्यांवरचे डाग धुतले होते.....टाप-टीप नक्कीच राहिलं पाहिजे पण त्याचा इतका बाऊ करणे की ज्याच्यामुळे तुमच्या वागण्या-बोलण्यातली सहजता नाहीशी होईल, ही गोष्ट मला पटत नाही.
--समीर
20 Oct 2010 - 6:38 pm | गणेशा
"कंटाळा ही नाविन्याची जननी आहे"
अरे वा .. काय वाक्य लिहिले आहे ..
20 Oct 2010 - 6:54 pm | मितान
माझे आवडते वाक्य -
आळस ही शोधाची जननी आहे :)
आवडला लेख..
21 Oct 2010 - 3:05 am | मराठमोळा
>>आळस ही शोधाची जननी आहे
सहमत आहे
तसेच कंटाळा हे शोधाचे तात, टंकाळा भाऊ, जांभई बहीण, आणी दुपारची झोप ही बायको आहे.
:)
21 Oct 2010 - 10:57 am | नगरीनिरंजन
वरकरणी हा लेख कंटाळ्यावर असला तरी मानवी जीवन आणि त्यातल्या निरर्थक कर्मांवर नकळत केलेली उच्च दर्जाची एक अध्यात्मिक टिप्पणी यात दडलेली आहे. बुद्धीची एक विशिष्ट परिसीमा ओलांडलेल्या लोकांना जास्त कंटाळा येतो असे एक निरीक्षण आहे. बुद्धीमत्ता आणि आळस यांच्या परस्पर संबंधांवर लवकरच एक लेख लिहीण्याचा विचार करत आहे.
(आधारित).
21 Oct 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला देवनागरीत लिहीलेलं इंग्लिश आणि रोमनमधे लिहीलेलं मराठी वाचायचा भयंकर कंटाळा येतो. wat, u, r, thr असलं इंग्लिश वाचून मला झोपच लागते.
सगळ्यात कंटाळा येतो तो कपड्यांच्या घड्या घालायचा आणि इस्त्री करण्याचा! एक दिवस स्वतःलाच बजावलं, इस्त्री करायला तुला वेळ नसतो, फाल्तू कारणांसाठी वीज आणि वेळ खर्च करायचा नाही. तेव्हापासून मी फार सुखात जगायला लागले. चपलेच्या बाबतीत मी पण लेखकाशी सहमत आहे. चपलांना हात लावायला मला अजिबात आवडत नाही. ऑफिसात मी पण (माझे मिपाप्रसिद्ध) फ्लोटर्स काढून मांडी घालून बसते.
अर्थात माझी नोकरी नफ्यासाठी चालवलेल्या कंपनीत नसल्यामुळे हे असे प्रकार सामान्य म्हणून खपून जातात. जिथे बॉसच उन्हाळ्यात मलमलचा सदरा, शॉर्ट्स आणि फ्लोटर्स या वेषात येतो तिथे आम्हाला कोण काय बोलणार?
21 Oct 2010 - 1:53 pm | समीरसूर
मराठीत लिहिलेले इंग्रजी आणि इंग्रजी मध्ये लिहिलेले मराठी वाचायला अवघड जातात हे खरे आहे. (तरी मी लिहिलेलं आहे. का? त्यावेळेस लक्षात नाही आलं. आणि मध्ये कुणीतरी कुणाच्या तरी मराठीतल्या इंग्रजी लिपीवर प्रतिक्रिया दिली होती. मराठी लिखाणातील लेखन मराठीतच हवे अशा अर्थाची ती प्रतिक्रिया होती. म्हणूनही असेल कदाचित...)
--समीर