रूप परमेशाचे - मी आणि 'अस्तित्व' (भाग ३)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
19 Oct 2010 - 3:47 am

(या भागात मी - एक प्रातिनिधीक सर्वसामान्य माणूस आणि अस्तित्व असे एक स्वगत लिहीतो आहे.)

माझा जन्म झाला. एका आत्म्याने देह धारण केला. 'जन्म घ्यावा लागे वासनांचे संगे' असा एका सर्वसामान्य माणसाचा जन्म झाला. कर्माच्या सिद्धांतानुसार प्राग्जन्मीचे 'संचित' फळाला आले, 'प्रारब्ध' भोगणे सुरू झाले. आता 'कर्ता' भावाने हा देह जे जे कर्म करेल, ते 'क्रियमाण' पुढील जन्मीचे संचित ठरेल. भावार्थ गीतेत याचे थोडक्यात समर्पक वर्णन आहे:

ह्या देहाचा घडला साचा, पंच-महाभूतांचा| म्हणुनी फेरा न चुके ह्याचा, जन्म आणि मृत्यूचा||
पहा गुंतला हा त्रिगुणात्मक, कर्माचे धाग्यात| अशाश्वत असा म्हणुनी सहसा, लोपतो क्षणार्धात||

माझ्या विशुद्ध आत्मस्वरूपाला 'मी' जन्मलो, 'मी' बाह्य जगतापेक्षा पृथक आहे ही जाणिव देखिल नसते. तिथे कुठलीच येरझार नसते. जन्म मृत्यूचा संभव नसतो. हे आत्मस्वरूप अजन्मा असते, आणि त्यामुळेच अमरही असते. बाह्यमनाला स्पष्टपणे तशी जाणिव नसली, तरी माझा हा अनादी अनंत अंश निरंतर तसाच राहणारा असतो. याला कुठलीच उपाधी लावता येत नसली तरी हा मृतवत, शून्यवत मात्र नसतो. त्याची अनुभूती जेव्हा येते, तेव्हा ती विलक्षण चैतन्यमय, सच्चिदानंदस्वरूप अशीच येते. क्षणमात्र का होईना ही अनुभूती येते त्या क्षणी अनुभव, अनुभाव्य आणि अनुभोक्ता अशी त्रिपुटी नसतेच, पण ती शब्दात व्यक्त करताना मर्यादा येतात.

नित्य दिसणारे मृत्युचे थैमान, त्रिविध ताप, व्याधी, अत्याचार, पराकोटीची भ्रष्टता हे सगळे सतत मनावर आघात करतात. अशीच भ्रष्टता काही प्रमाणात आपल्यातही आहे ही आंतरिक जाणीव अस्वस्थ करणारी असते. भयावह 'भवसागर' वगैरे म्हणतात तो हाच. असे असूनही मी नैराश्याने खचून जात नाही. ही काळोखी रात्र संपेल, उष:काल होईल अशी मला खात्री वाटते. काळोख भयचकित करून टाकेल इतका गहिरा, निबीड झाला म्हणून का कुणी आत्मघात करतो? थोडासा धीर धराल, तर संधिप्रकाशाची चाहूल लागेल. पुन्हा पक्ष्यांचे कूजन सुरू होईल, पावित्र्याची आणि मांगल्याची पहाट उजाडेल हा माझा आशावाद निव्वळ बौद्धिक स्वरूपाचा नसतो. याचे एक कारण असे की कुठेतरी खोलवर माझी नाळ या शाश्वताशी जोडलेलीच राहाते.

मी जन्मलो, माझे असे पृथक अस्तित्व आहे ही 'बातमी' जड देहालाही मिळालेली नसते. ही 'खबर' ज्याला मिळते तो प्रान्त मन आणि बुद्धीचा. आता माझी उपजत प्रवृत्ती (नेचर) आणि बाह्य संस्कार (नर्चर) यांचा एकत्रित परिणाम होऊन माझा 'पिंड' घडेल. हा मन बुद्धीचा प्रांतच हळूहळू अत्यंत प्रभावशाली ठरतो असे अनुभवास येते. मी निव्वळ देह असतो तर पशुवत, निसर्ग प्रेरणेने आहार, निद्रा, भय आणि मैथुनासक्त होऊन जगलो असतो. निव्वळ शुद्ध बुद्ध आत्मा असतो तरी कुठलाही धर्मतत्वाचा, नीतीचा, सद्गुरूंचा, साधना, उपासनेचा आणि अध्यात्मिक प्रगतीचा प्रश्नच उद्भवला नसता. आज मी जसा आहे तिथे मला माझ्या आत्मस्वरूपाची अस्पष्ट का होईना जाणिव आहे. देह आहे, पंचेंद्रिये आहेत. अत्यंत गुंतागुंतीचा, कित्येक अंतर्विरोध असणारा आणि कधी प्रवृत्तीकडे वळणारा, तर कधी निवृत्तीची हुक्की येणारा, कधी वैराग्याची गोडी वाटणारा तर कधी भोगलालसेला बळी पडणारा अत्यंत जटिल असा मनबुद्धीचा प्रान्त आहे.

आता अमूर्त अध्यात्मिक संकल्पना कितीही आकर्षक वाटत असल्या, तरी त्यांचा आधार घेत बाष्कळ कल्पनाविलास करत मी व्यावहारिक पातळीवरचे द्वैत नाकारू शकणार नाही. 'ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या', 'सर्वं खलु इदं ब्रह्म' असे आचार्य सांगतात. तो त्यांचा स्वानुभवसिद्ध अधिकार असतो, ते प्रचीतीचे बोल असतात. 'अहं ब्रह्मास्मी', 'तत्वमसी' अशी महावाक्ये वाचनात येतात. असे बोल कानी पडताक्षणी 'पाहावे आपणासी आपण' असा आत्मसाक्षात्कार घडून त्याच क्षणी 'सद्योमुक्ती' मिळावी असेही याच भूतलावर घडले आहे. पण तिथे अष्टावक्र - जनक अशी उभयपक्षी तसा अधिकार असणारी जोडी हवी. गुळवणी महाराजांना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली, तो याच पठडीतला प्रसंग. आपला तसा अधिकार नाही. त्यामुळे आपल्याला 'क्रममुक्ती'च्याच मार्गाने जावे लागणार आणि त्या जोडीनेच येणारा आंतरिक आणि बाह्य संघर्ष टाळता येणार नाही हे स्पष्ट होते.

या शिवाय माझा पिंड निवृत्तीकडे झुकणारा नाही, तो प्रवृत्तीपर आहे हे लक्षात येते. इथे मी एकटाच नाही. माझे कुटुंब, जिथे मी वावरतो तो समाज, माझे राष्ट्र या सगळ्यांचे अर्थपूर्ण अस्तित्व मी नाकारू शकत नाही. नाकारू ईच्छित नाही. त्यामुळे मला पडणार्या प्रश्नात, गुंतागुंतीत भर पडण्याची शक्यता आहेच. त्या जोडीनेच या समस्या सोडवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी एकट्याने एकांड्या शिलेदारासारखे करावे, 'मी आणि माझा सत्याचा शोध' अशा थाटात वावरावे हे समीकरणही आपोआप मोडीत निघते. साधे माझ्या शर्टचे बटन तुटले आणि ते मी बदलले तरी मी एकट्याने समोर असलेला प्रश्न सोडवला असे म्हणता येत नाही. शर्टाचे कापड मी बनवलेले नाही, तो मी शिवलेला नाही. दोरा, बटन, शर्ट हे सारे माझ्यापर्यंत पोचले त्या मागे नियोजनबद्ध अशी एक सुव्यवस्थित प्रणाली कार्यरत आहे. हे सारे 'टीमवर्क' आहे. मला मिळणार्या प्रत्येक सुखामागे, सुविधेमागे कित्येक ज्ञात, अज्ञात सामान्य माणसांचे प्रामाणिकपणे केलेले काबाडकष्ट आहेत. माझ्या जीवनात व्यष्टी आणि समष्टी यांचा हरघडी अनिवार्य असा संबंध येतो त्यामुळे समाजाची घडी सुव्यवस्थित राहावी या दृष्टीने माझे जे उत्तरदायित्व आहे ते मला नाकारता येणारच नाही. नुसतेच स्वरूप सांभाळत बसण्याची चैन मला परवडणारी नाही. मी तसा दावा करणे हा स्वार्थ, दंभ ठरेल. व्यक्तिगत पातळीवर मला पडलेला कर्मबंध (नियती, प्रारब्ध) आणि स्थळ, काळ आणि परिस्थितीमुळे येणारी काही बंधने पाळतच मला आपल्या 'स्वरूपाकडे' जावे लागेल. या पुढे मला जो काही अध्यात्मविचार मांडायचा आहे त्याची ही पार्श्वभूमी आहे.

(क्रमश:)

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Oct 2010 - 6:14 am | शुचि

>> शर्टाचे कापड ............, हरघडी अनिवार्य असा संबंध येतो त्यामुळे समाजाची घडी सुव्यवस्थित राहावी या दृष्टीने माझे जे उत्तरदायित्व आहे ते मला नाकारता येणारच नाही.>>
मूकवाचक आपण जे परस्परांवर अवलंबून असण्याचे विचार मांडले आहेत,तेच विचार काही वर्षांपूर्वी "द हार्ट ऑफ अंडरस्टँडींग" या "थिच न्हाट हान" यांच्या पुस्तकात वाचायला मिळाले होते.त्यांनी लिहीलं होतं - तुम्ही जर कवी असाल तर कधी ना कधी तुम्ही तुमच्या कागदावर ढग तरंगताना पाहीला असेल. कारण ढगाशिवाय पाऊस नाही, पावसाशिवाय झाडे उगवू शकत नाही आणि झाडांशिवाय कागद बनू शकत नाही. ढग हाच कगदाचा पिता आहे. ढग नसता तर कागद नसता. म्हणजे ढग आणि कागद परस्परावलंबी आहेत. असच नीट निरखून पाहीलत तर याच कागदात तुम्हाला सूर्यप्रकाश दिसेल. अजून लक्षपूर्वक पहाल तर लाकूडतोड्या दिसेल, लाकूडतोड्यावर जीवापाड प्रेम करणारे त्याचे वृद्ध आई-बाप दिसतील. कारण या लोकांशिवाय हा कागदच अस्तित्वात नसता. एवढच काय तुमचं चित्त या कागदात एकवटलेलं आढळून येईल. तुमचं आणि माझं सुद्धा. अशा रीतीने अनेकानेक गोष्टी तुम्हाला आढळतील ज्या परस्परावलंबी आहेत आणि या कागदाशी निगडीत आहेत. जर या कागदाव्यतिरीक्त गोष्टी मूळ स्थानी परत पाठविल्या तर कागदच अस्तित्व हरवून बसेल. "To be" is to inter-be. You cannot just be by yourself alone. You have to inter-be with every other thing. This sheet of paper is, because everything else is.
(साभार - http://www.parallax.org/cgi-bin/shopper.cgi?preadd=action&key=BOOKHOU)

फार छान चाललय निरुपण.

(तल्लीन) अर्धवटराव

सर्वप्रथम आपण लिहित असलेल्या उत्तम लेखमाले बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद...
इतके दिवस माझा आत्मा मिसळपाव वरती फक्त आपली वाचनासाठी येत असायचा.. लिहायचे मनात होते, परंतु काहीनाकाही कारणाने चालढकल होत राहिली. पण हे लेख वाचून काही विचार लिहावेसे वाटले, म्हणून हि प्रतिक्रिया.

यापूर्वी मी श्री. प. वि. वर्तक यांचे उपनिषद-वरचे निरुपण वाचले होते. आपले लेख वाचत असताना त्यांच्या पुस्तकांची आठवण होत होती. मला या संदर्भात पडलेले प्रश्न असे -
१. जर प्राग्जन्म / पुनर्जन्म ह्या गोष्टी खऱ्या मानायच्या तर, पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या ही सारखी वाढत कशी आहे? ह्याचे स्पष्टीकरण कसे देता येईल? पृथ्वी हा एकाच लोक नाही असे ह्याचे उत्तर आहे का?
२. ज्यावेळी भारतात वेद, उपनिषद, भगवदगीता ह्यांची रचना झाली, रामायण आणि महाभारत घडले त्या वेळी इतर पूर्व-पश्चिम देशांमध्ये काय चालू होते? 'तेथिल' लोक ह्या सर्व गोष्टींबद्दल अनभिज्ञ असतील, त्यांना ह्याविषयी काहीच माहिती नसेल, तर मग त्यांचे पुढे काय होते? ह्या गोष्टी आचरणात आणणे वेगळा भाग झाला. पण केवळ भारतात जन्म झाल्यामुळे आपल्याला निदान ह्या गोष्टींची तोंडओळख आहे किंवा माहिती होण्याची थोडी तरी शक्यता आहे. मग भारतात जन्म होणे हे सुधा आपले पूर्वकर्माचे फळ आहे का?

~
बंडूशेठ

च्यामारी इथे टाईप करणे लई अवघड जात हाये.. जीमेल मध्ये टाईप करून इथे कॉपी-पेस्ट करणे सोपे जात हाये..

शुचि's picture

19 Oct 2010 - 4:22 pm | शुचि

मूकवाचक, आपण लिहीत असलेल्या लेखामधील तांत्रीक बाबी उदाहरणार्थ अधिदैविक म्हणजे काय आदि मुद्दयांवर आपण जरूर उत्तरे द्यावीत परंतु आपणांस कळकळीची विनंती या व्यतिरीक्त खोल मुद्द्यांवर, रेडीमेड उत्तरं ज्यांना हवी आहेत त्यांना स्वतःच चिंतन करू द्यावं. कारण - (१) आपली उत्तरं कितीही सत्य असोत ती काही विचारवंतांना पटणार नाहीत (२) एकाला खर्‍याखुर्‍या जिज्ञासूला उत्तर दिलत तरी ४ नतद्रष्ट प्रश्न विचारायचा आव आणून उभे राहतील आणि धाग्याची वाट लावतील आणि इतक्या सुंदर मालीकेला दृष्ट लागेल.

अर्धवटराव's picture

20 Oct 2010 - 12:38 am | अर्धवटराव

अजून टोळधाड पडली कशी नाहि याचच आश्चर्य वाटतं

(भयचकीत)अर्धवटराव

मूकवाचक's picture

24 Oct 2010 - 5:49 pm | मूकवाचक

ही लेखमाला माझ्या अनुदिनीवर स्थलान्तरित करत आहे:
"http://apterahulya.blogspot.com"

स्थलांतरित करताय म्हणजे येथे लिहिणार नाही काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Oct 2010 - 5:02 pm | llपुण्याचे पेशवेll

वा. छान लेख. लेख १ वाचाला आता ३. वेळ मिळाला की २ वाचेन. छान लिखाण चाल्ले आहे.

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 12:31 am | मिसळभोक्ता

गुळवणी महाराजांना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली, तो याच पठडीतला प्रसंग.

ह्म्म... प्रसंग अंमळ डोळ्यासमोर आला. (पण डोळे पाणावले नाहीत.)

आम्हाला कुणी ही दीक्षा दिली नाही. आम्ही आपले आपणच शिकलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2010 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा.........!

-दिलीप बिरुट