अभंगवाणीची बिदागी - मुगाची उसळ अन् चपाती..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 7:15 pm

राम राम मडळी,

'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे ही आमची पंढरी आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, अर्थात आमचे अण्णा हे त्या पंढरीतले विठोबा... आजवर अनेक वर्ष, अनेकदा त्या वास्तूत गेलो. अण्णांशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांचा सहवास लाभला. अगदी त्यांच्या घरी बसून त्यांचं गाणं ऐकता आलं, चार गोष्टी शिकायला मिळाल्या. वत्सलाकाकूही तेव्हा हयात होत्या. त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा... :)

अण्णांची लेक शुभदा, मुलगा श्रीनिवास हेही आपुलकीने स्वागत करायचे. मी एकदोनदा खुलासा करण्याचा प्रयत्न केला परंतु 'ठाण्याचे अभ्यंकर' हे मुंबैच्या हायकोडतात वकील आहेत ही अण्णांची समजूत आजही कायम आहे! :)

गेल्या बरेच दिवसात अण्णांकडे फारसे जाणे झाले नाही. काही वेळा सवड होती परंतु मुद्दामच गेलो नाही.. कारण म्हणजे अण्णा अलिकडे वरचेवर आजारी असतात. प्रकृती बर्‍याचदा खालावलेली असते. गात्र थकली आहेत. वयोमानही आहे त्यामु़ळे खरे तर एक सारखे कुणी ना कुणी भेटायला येणार्‍यांचा त्यांना आताशा उगाचंच त्रास होतो. हेच जाणून पुण्याच्या फेरीत मीही त्यांच्याकडे जाण्याचं टाळतो. त्यांना त्रास होऊ नये, आराम करू द्यावा इतकाच हेतू..

परंतु साधारण महिन्याभरापूर्वी एकदा अगदीच राहावले नाही म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी गेलो होतो. अगदी दोनच मिनिटं त्यांच्यापाशी बसायचं आणि पाया पडून निघायचं इतकंच ठरवलं होतं..काका हलवायाकडची त्यांची आवडती साजूक तुपातली जिलेबी सोबत घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या नातीनं मला आतल्या खोलीत नेलं. अण्णा खाटेवर पडूनच होते. निजलेल्या माणसाला नमस्कार करू नये म्हणतात. मी नुसताच त्यांच्या उशापाशी बसलो. त्यांना आताशा फारसं बोलवतही नाही..मी त्यांचा हात हातात घेतला, हलकेच दाबला.

"अण्णा, थोडी जिलेबी आणल्ये आपल्याकरता. कशी आहे तब्येत? काळजी घ्या.."

अण्णांनी डोळ्यातूनच ओळख दिली.. माझ्या डोळ्यासमोर सवाईगंधर्वात शेवटच्या दिवशी सकाळी ५-१० हजार श्रोत्यांसमोर, मागे विलक्षण सुरेल झंकारणारे चार तानपुरे घेऊन मंत्रमुग्ध करणारा तोडी गाणारे भीमसेन दिसू लागले आणि अगदी भरून आलं..! तिथे अधिक काळ बसवेना. शिवाय तिथे बसून अण्णांनाही उगाच त्रास देणं उचित नव्हतं..पुन्हा एकदा त्यांचा हात हातात घेतला, थोडे खांद्याचे बावळे दाबून दिले, पाउलं चेपून दिली. खूप कृतकृत्य वाटलं, समाधानी वाटलं आणि मी त्यांचा निरोप घेतला.

त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत होतो तोच दुसरे एक सत्तरीच्याही पुढे वटणारे गृहस्थ आत येत होते.. त्यांचा चेहेरा चांगला ओळखीचा वाटत होता..त्यांनी मला हसून ओळख दिली व ते आतमध्ये गेले.

'कोण हे गृहस्थ?!'

मला चटकन ओळख लागेना, नाव आठवेना. एक नक्की आठवत होतं, हे गृहस्थ अण्णांच्या अगदी घरोब्यातले आणि त्यांच्या गाण्याचे प्रेमी..त्यांच्याच गावाकडचे. अण्णांच्या बैठकीत अनेकदा भेटलेले.. मुंबैत अण्णांचं कुठेही गाणं असलं की गाण्याआधी ग्रीनरूममध्ये आम्ही ठराविक डोकी नेहमी भेटत असू..अगदी न चुकता. इतकी की अण्णांच्या एका मैफलीकरता मी थोडा उशिराने ग्रीनरूममध्ये पोहोचलो तेव्हा मला पाहून पेटीवाले तुळशीदास बोरकर थट्टेनं म्हणाले होते, "चला, तुम्ही आलेत. आता कोरम पुरा झाला!" :)

मग ग्रीनरूममधलं गाण्यापूर्वीचे ते धीरगंभीर अण्णा. "नानजीभाई, पान जमवा पाहू.." असं नाना मुळेंना म्हणणार. तानपुरे लागत असणार. "हम्म.. पटकन जुळवा तानपुरे. छान जुळवा.." असं अण्णा म्हणणार. मग कधीमधी मीही घाबरत घाबरत त्या तानपुर्‍यांचे कान पिळायचा.. मग मी लावलेल्या तानपुर्‍याकडे नीट कान देउन अण्णा त्यात सुधारणा सुचवणार.. "हम्म.. खर्ज बघा जरा.. त्याची जवार का बोलत नाही नीट?!"

खूप आठवणी आहेत त्या मैफलींच्या..! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..

तर 'आता भेटलेले हे गृहस्थ कोण?' असा विचार करताच थोड्याच वेळात आमची बत्ती पेटली. अरे हे तर कानडी मुलुखातलेच कुणीसे आप्पा..रामण्णाच्या परिवारातले..!

रामण्णा..! कोण बरं हे रामण्णा?

आणि क्षणात माझं मन १९८० च्या दशकात घडलेल्या एका प्रसंगाशी येऊन थांबलं..हा प्रसंग मला थोर व्याख्याते व माझे ज्येष्ठ स्नेही स्व. वसंत पोद्दारांनी सांगितला होता..

अण्णा तेव्हा सार्‍या भारतभर दौरे करत होते, गाणी करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. वेळ असेल रात्री दोनची वगैरे. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लौकरच ते एका गावात शिरले. साथिदारांना कळेचना..!

"आमचे एक गुरुजी येथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटूया..!"

साथिदारांना पुन्हा काही पत्ता लागेना. गावात सामसूम. थोड्या वेळाने एक अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपट ठोठावलं..कुणा एका वयस्क बाईनं दार उघडलं.. चिमणी मोठी केली. त्या खोपटात एका खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. तोच रामण्णा..! अण्णा त्याच्यापाशी गेले.. त्याला हात देऊन बसता केला.. 'काय, कसं काय? ओळखलं का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलिकडे वेळच मिळत नाही..' असा त्याला कानडीतनं खुलासा केला.. मग रामण्णाही ओळखीचं हसला..जरा वेळाने अण्णांनी अक्षरश: त्याच्या पायावर डोकं ठेऊन त्याला नमस्कार केला अन् खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्याच्या हातात दिलं.. आणि त्याचा निरोप घेतला..

साथिदार मंडळींना हा प्रकार काय, हेच कळेना तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -

"येथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपासचं) मी तेव्हा बेवार्शी राहायचा. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपत असे. तेथेच रेल्वेच्या थंड पाण्याने अंघोळ आदी आन्हिकं उरकायचो. खिशात दमडा नव्हता. घरातनं पळालो होतो. कानडीशिवाय अन्य कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पात्तळ उसळ अन् चपात्या असं विकत असे. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख दिली त्याला. तसा अशिक्षितच होता तो.."

"उसळ-चपाती पाहिजे काय?" असं मला तो विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

"तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"

"घरी माझी आई जी काही कानडी भजनं अभंग गायची तेवढीच मला येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"

"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तो पर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. जेवायला पाहिजे ना? मग गाऊन दाखव बघू काही! तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?!"

गाडी पुन्हा भरधाव परतीच्या वाटेवर लागली होती.. साथिदार मंडळी गप्प होती.. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

रेवती's picture

5 Oct 2010 - 7:23 pm | रेवती

जुनी आठवण!
लेखन आवडले.

तात्या,
आठवणींच्या पोतड्या उघडताहात .. एकेक रत्न येताहेत बाहेर..
येऊद्या.. ! सुरेख पैलू पाडलेली रत्न आहेत ही. सुंदर!!

गणपा's picture

5 Oct 2010 - 7:37 pm | गणपा

प्राजुताईशी सहमत

मेघवेडा's picture

5 Oct 2010 - 7:51 pm | मेघवेडा

असेच म्हणतो.

मस्त! अजून येऊ द्या!

प्रभो's picture

5 Oct 2010 - 8:11 pm | प्रभो

वरील सर्वांशी सहमत.

पंडीत भीमसेन जोशी महान तर आहेतच.
पण रामण्णा देखील तितकेच महान. पूर्वजन्मीची देणीघेणी ही.
सुरेख आठवण तात्या.

यशोधरा's picture

5 Oct 2010 - 7:27 pm | यशोधरा

आवडलं...
सचमुच के वड्डे लोगोंकी सचमुचकी वड्डी बातें! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2010 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

थोर माणसं!!!

निखिल देशपांडे's picture

5 Oct 2010 - 9:10 pm | निखिल देशपांडे

+१ असेच म्हणतो

सहज's picture

6 Oct 2010 - 2:41 pm | सहज

असेच म्हणतो

धबधब्या सारख्या आवाजाच्या माणसाच प्रेम सुद्धा तसच धबाधबा असणार नाही का?
देताना सुद्धा सारी बिदागी जेव्हढ होत नव्हत तेव्हढ सार अन विचार न करता..
धन्य !

संजय अभ्यंकर's picture

5 Oct 2010 - 7:54 pm | संजय अभ्यंकर

अण्णांना स्वरभास्कर बनवण्यात त्या रामण्णाचाही खारीचा का होईना वाटा आहे.

ऋणानुबंध न विसरणारे अण्णा, स्वरभास्कर अण्णांपेक्षा महान आहेत.

कुसुमिता१२३'s picture

5 Oct 2010 - 9:19 pm | कुसुमिता१२३

लेख आवडला..भाग्यवान आहात तुम्ही! अजुन ही आठवणी असतील तर त्या वाचायला आवडतील नक्कीच!

अर्धवटराव's picture

5 Oct 2010 - 9:19 pm | अर्धवटराव

आता पर्यंत आयुष्यात जे काहि मनोगते वाचली त्यात हे सर्वात जास्त काळजाला भिडले. शब्द सामर्थ्य दुबळे आहे माझे... त्यामुळे नक्की काय म्हणायचय सांगता येत नाहि.
मिपा वर आल्याचं सार्थक झालं.

>>खूप आठवणी आहेत त्या मैफलींच्या..! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..
असं म्हणु नका तात्या... काहिही ठरवुन न लिहीता मनाचे दरवाजे सताड उघडे करुन आतुन जे जे येईल ते ते कागदावर उतरलं कि वाचकाला समृद्ध करणारी मेजवानी अवतरते. लिहीते रहा...

(तृप्त तरी अतृप्त) अर्धवटराव

शुचि's picture

5 Oct 2010 - 9:46 pm | शुचि

>> मिपा वर आल्याचं सार्थक झालं. >>
मिपा ने खूप समृद्ध केलं आहे हे खरं आहे. त्यात तात्यांसारख्या लेखक-लेखिकांचा सिंहाचा वाटा आहे. नावं लिहीत होते पण थांबले कारण एकाचं नाव घेतलं अन दुसर्‍याचं विसरले तर तो अन्याय ठरेल.
मनात कटुता न धरता मुक्तहस्ते चांगलेपणाची , सुंदर आठवणींची उधळण करण्याची वृत्ती. हिला तोड नाही.

बेसनलाडू's picture

5 Oct 2010 - 10:01 pm | बेसनलाडू

वाचताना मजा आली.
(स्मृतीरंजक)बेसनलाडू

वाटाड्या...'s picture

5 Oct 2010 - 10:07 pm | वाटाड्या...

नमस्कार तात्या...

ही आठवण नेहेमीप्रमाणेच छानच...अण्णांसारख्या गगनभेदी व्यक्तिमत्वाला सादर प्रणाम व त्यांच्यातल्या माणसाला तर....शब्दच नाहीत.

अण्णांच ईकारान्त गाणं जेवढं मोठं तेवढंच त्यांच आयूष्यही. इथे सादर केल्याबद्दल धन्यवाद...काळाच्या ओघात असेच दिपस्तंभ आम्हाला मार्गदर्शक राहोत हेच त्या पांडूरंगापाशी मागणं...

(अण्णांसारखा षडज तरी कसा लावता येईल असा विचार करणारा) - वाटाड्या...

विसोबा खेचर's picture

5 Oct 2010 - 10:07 pm | विसोबा खेचर

त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा...

हे शहापूर कर्नाटकातलं बर्र का.. ठाणे जिल्ह्यातलं नव्हे..

कर्नाटकी शापुरातला कुंदा फेमस आहे. "शापुरात जाऊन येतो रे जरा.." असं रावसाहेब म्हणायचे तेच हे शहापूर! :)

तात्या.

--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

बेसनलाडू's picture

5 Oct 2010 - 10:14 pm | बेसनलाडू

बेळगावला जाणे झाले की सराफगल्ली, अनगोळचा कलावतीदेवींचा आश्रम, क्याम्पातील मिलिटरी महादेवाचे मंदिर यांसह शहापूर, खानापूर, लोंढा, मलप्रभा-घटप्रभा वगैरेला जाणे व्हायचेच. आणि मग कुंद्याचे बॉक्सेस, चटपटीत, आले-मिरची घालून केलेले दडपे पोहे, थालिपिठे, उसाचा रस आणि क्वचितप्रसंगी टपोर्‍या गारा - कसला कसला फज्जा उडायचा, हे आठवताना डोळे पाणावतात. उसाचा रसही बैलांनी ओढलेल्या चरकातून निघालेला, जर्मन सिल्वर किंवा अ‍ॅल्युमिनिअमच्या मोठ्या तांब्यातून सर्व केलेला :)
गेले ते दिन गेले :(
(स्मरणशील)बेसनलाडू

चतुरंग's picture

5 Oct 2010 - 10:25 pm | चतुरंग

मोठी माणसं ही मोठी का हे दाखवून देणारा लेख आवडला तात्या!
भीमसेन हे एकूणच वाघासारखं व्यक्तिमत्त्व वाटतं मला, जन्मजात स्वाभिमान आणि पीळ जन्माला घेऊनच येतात अशी माणसं. लोक काय म्हणतील वगैरे गोष्टींना स्थान नाही, स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक!

(नतमस्तक)रंगा

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 10:50 pm | शिल्पा ब

असेच म्हणते.

स्वाती२'s picture

5 Oct 2010 - 11:43 pm | स्वाती२

सहमत!

कौशी's picture

5 Oct 2010 - 11:32 pm | कौशी

हा लेख पण मस्त!! खुप खुप आवडते आपले लिखाण तात्या....
येऊ द्या आणि .............वाट बघतेय.....

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2010 - 12:21 pm | प्रमोद्_पुणे

छान आठवण..

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

छान आठवण आणि तेवढेच छान लेखन.

सविता००१'s picture

6 Oct 2010 - 1:49 pm | सविता००१

खूप खूप छान.
मस्त लेखन

निल्या१'s picture

6 Oct 2010 - 7:52 pm | निल्या१

तात्या,
भीमसेनांबद्दल ऐकायला हे कान नेहमीच आतुर असतात. त्यातच तुम्ही ह्या नवीन गोष्टीची भर घातलीत. आभारी आहे. खूपच सुरेख मांडाणी. लक्षात राहण्यासारखा लेख.

~
निल्या

विलासराव's picture

6 Oct 2010 - 11:21 pm | विलासराव

आठ्वण सांगितली तात्या तुम्ही.
आणखीही लिहा ही विनंती.

शाहरुख's picture

6 Oct 2010 - 11:40 pm | शाहरुख

व्वा !

विसोबा खेचर's picture

7 Oct 2010 - 11:16 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व संगीतप्रेमींचा मी ऋणी आहे..

वाचनमात्रांचेही औपचारिक आभार मानतो..

(भीमसेनभक्त) तात्या.

जागु's picture

7 Oct 2010 - 12:02 pm | जागु

मस्त.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

8 Oct 2010 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

झकास तात्या अजुन काही किस्से येउ द्या तुमच्या पोतडीतले मालक