दहर में नक़्शे-वफ़ा -ग़ालीब, गायली आहे स्वरसम्रा्ज्ञी लताबाईंनी

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Oct 2010 - 7:38 pm

मित्रहो,

आज आपण ग़ालीबच्या आणखी एका ग़ज़लेचा आनंद घेणार आहोत. मला तरी ही समजायला जरा अवघडच गेली. बघा आपल्याला काही वेगळा / बरोबर / आणखी चांगला अर्थ काढता येतो आहे का ?

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ

है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ

या हल्लीच्या काळात प्रेमातील विश्वासाचा जो अर्थ काढला जातो त्याने व तो का काढला जातो, याने काही मनाचे समाधान होत नाही.

हाच तो शब्द आहे ज्याचा खरा अर्थ काढता काढता अनेकांची दमछाक झाली आणि त्यांनी शरमेने मान खाली घातली.

या काळात प्रामाणिकपणाचा नकाशा काढायचा/चित्र/अर्थ सांगायचा बराच प्रयत्न झाला पण त्याने काही आमचे समाधान झाले नाही.

हाच तो शब्द आहे ज्याचे चित्र काढता काढता त्या थोर चित्रकाराचीही मान खाली गेली.

दहर : काळ, नक्शे-वफा : विश्वासाचे चित्र, तसल्ली : आराम वाटणे, समाधान वाटणे, मानी : थोर चित्रकार.

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा

ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.

पाचूच्या तेजापुढे नागाची दृष्टी जाते असे म्हणतात. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण इथे उलटेच आहे. तुझ्या गालावर रुळणार्‍या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ते (बंडखोर) आपले सारखे गालावर रुळतच आहेत आणि (आम्हाला वेड लावत आहेत).

स्बज़ा – हा शब्द हिरवा रंग दाखवतो.

काकुले – कुरळ्या केसांची बट

सरकश – बंडखोर

हरिफ़ – प्रतिस्पर्धी

अफ़ई – नाग/साप

मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू

वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.

माझी खूप इच्छा होती त्या क्लेशकारक प्रेमातून सुटण्याची, त्यासाठी माझी मरणसुध्दा पत्करायची तयारी होती.

पण हाय ! ती मला मरूही देत नाही (आणि जगूही देत नाही.)

दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही

गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.

या आयुष्याच्या विशाल वाटेवर माझे मन हे या दुनियेतील मोहांनी भरलेले असेलही...

पण आता या क्षणी या पायवाटेवर मला माझ्या इच्छा आकांक्षांचाही आधार नाही. मला हे सगळे फोल वाटते आहे.

गुज़रगाह : रस्ता

मय-ओ-सागर : मोहमयी दुनिया

नफ़स : क्षण

ज़ादाह : पायवाट

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी, कि कभी

गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.

तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ?

गोश : कान

मिन्नतकश : उपकारित

गुलबांग : फुलासारख्या ओठातून हाक मारणे.

तसल्ली : समाधान

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे

हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.

आमच्या नशिबाने आमची जी आयुष्यभर निराशा केली त्याची तक्रार कुठे करायची ?

आम्ही तर त्याला कंटाळून मरायची तयारी केली होती, पण हाय तिथेही नशिबाने आमची निराशाच केली.

महरूमि : निराशा.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब

नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.

त्या मोहक ओठांच्या हालचालींनी आम्हाला अशी एक ठेच पोहोचली की जणूकाही आमचा मृत्यूच ओढवला.

ज्या येशूने अनेक मरणोन्मुख माणसांना पुनरुज्जीवन दिले त्याचाही आमच्या केसमधे पराभव झाला.

किंवा

मेलेल्या माणसांना येशू एका फुंकरीने जिवंत करतात असे म्हणतात,

पण आमच्या या प्रेमरोगात ज्यात आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे मागे पडलो, त्यात येशूचेही काही चालले नाही.

सदमा : ठेच

नातवानी : अशक्त, मरणोन्मूख

इसा : येशू

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक

आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.

वरती “त्यानी” आमचे भविष्य लिहायचे आणि आमचे सगळे त्याप्रमाणे व्हायचे.... असे नसते तर आमच्याही शब्दांना काही धार होती......

तहरीर : अक्षर, शब्द, लिखाण...

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता

डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.

पण त्याने हे लक्षात ठेवावे....

काही नव्हते तेव्हा “तो” होता,

काहीच नसले तरीही “तो” असतोच असे म्हणतात.

मी इथे अडकलो आहे म्हणून या सगळ्या गमजा आहेत, मी नसतोच तर काय “तो” असता ? आणि काय काय असतं ? उत्तर आहे “काहीच नाही.”

पूर्ण ग़ज़ल आपल्यासाठी -

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ

है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा

ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.

मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू

वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.

दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही

गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी, कि कभी

गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे

हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब

नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक

आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता

डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.

ऐका येथे –

       

जयंत कुलकर्णी.

गझललेखआस्वाद

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

2 Oct 2010 - 7:49 pm | चिंतामणी

जयंत कुलकर्णी- ठार मारले हो तुमच्या खुलासेवार लिखाणानी आणि लताबाईंच्या आवाजात गजल ऐकुन.

पुर्वी अनेकदा ऐकली होती. या रेकॉर्डवर अजून काही गजला होत्या. तिची C.D. आवृत्ती नाही मिळाली.

डाउनलोडसाठी लिंक देता का?

जयंत कुलकर्णी's picture

2 Oct 2010 - 8:09 pm | जयंत कुलकर्णी

मिळेल की त्यात काय एवढे ? कुठलेही १९३८ ते १९६० सालातील गाणे (हिंदी) आपल्याला सापडले नाही तर कळवा. बहुतेक माझ्याकडे मिळेल.
इ-मेल द्या. पाठवतो.

चिंतामणी's picture

2 Oct 2010 - 8:15 pm | चिंतामणी

व्यनीने इ-मेल आय डि. कळवला आहे.

त्या रेकॉर्डवर असलेली एक अजून गजल आठवली.

रोने से और इश्क़ में बेबाक हो गये
धोये गये हम ऐसे कि बस पाक हो गये

तिमा's picture

2 Oct 2010 - 8:16 pm | तिमा

साष्टांग दंडवत. इतके कठीण शेर आहेत की तुम्ही समजावले नसते तर डोक्यावरुनच गेलं असतं सगळं!
ऐकून पण धन्य झालो. अजून येऊ द्यात!

इन्द्र्राज पवार's picture

2 Oct 2010 - 9:33 pm | इन्द्र्राज पवार

श्री.जयंत कुलकर्णी यांना सलाम....

तुमचे असे कण न् कण सुंदररितीने वेगळे काढून "डाळिंब" पेशंटला खायाला देणे फार आवडले. मी एरवी ही गझल ऐकली तेव्हा ती समजणे शक्यच नव्हते, पण त्यावेळी आपण 'लता' ऐकतोय हेच फीलिंग मनी असल्याने त्यातील अर्थाला दुय्यम स्थान प्राप्त झाले. पण आता नव्याने ऐकताना त्याची खुमारी लज्जत खुलणार हे नक्की. आज रात्री जाणीवपूर्वक तुम्ही दिलेल्या अर्थासह याचा लुफ्त घेणार....त्याबद्दल अगोदरच आभार मानतो, जयंत जी.

जाता जाता > तुम्ही भावार्थ दिला तो पोचला....तसेच कठीण उर्दु शब्दांचे जे अर्थ दिले तेदेखील नोट केले आहेत. तरीही काही शब्द अजूनही डोक्यावरून गेले आहेत, त्याचा अर्थ [मराठी] द्याल का?

१. दहर : याचा अर्थ तुम्ही दिला आहे 'काळ' (पण एके ठिकाणी त्याचा अर्थ "आजकाल" असाही वाचला होता....हा अर्थ इथे घेता येईल?)

२. तुझ्या गालावर रुळणार्‍या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ~~ हे वाचताना जी.ए.कुलकर्णी यांची एक नायिका 'अल्थीया' नजरेसमोर आली....तिचेच हे वर्णन आहे असे वाटले. ('काळ्या बियांतून हिरवी पाने कशी निर्माण होतात? तुझ्या निळ्या डोळ्यांतून सगळ्यांनी प्रिय वाटणारे काळे जहर कसे येते?")

३. वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ. [ 'सितमगर' म्हणजे ? ~~ छऴ करणारा या अर्थाने?]

तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ?

~~ हे जणू काही 'क्लिओपात्रा' ला उद्देश्यून म्हटले गेले की काय असे वाटते? [एक ठिकाणी या राणीबद्दल वाचले होते ~ "तुझ्या ओठातून येणार्‍या विषावर एकच उपाय आहे.....परत तुझे ओठच !"]

लिहिल तेवढे कमीच आहे.....फार आनंद झाला, हे हृदयातून आलेले लिखाण वाचून.

इन्द्रा

जयंत कुलकर्णी's picture

3 Oct 2010 - 8:07 am | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

उर्दू शब्दांचे अर्थ हे मुळ अर्थ आहेत. शायरी मधे हिच गंमत आहे त्याचे manifestation ओळखायला लागते आणि त्यात फार वेळ जातो. शायरने हा शब्द का वापरला असेल, विविध लोकांनी त्याचा लावलेला अर्थ, आपल्या मनात त्या शब्दांच्या अर्थाला अनुसुरून काय विचार येतात, ते आपल्याला पटतात का ? सगळे एकत्र केल्यावर त्यातून काही अर्थबोध होतोय का ? त्यात काही संकेत आहे का ? मागच्या, पुढच्या ओळीत काही संधर्भ्/निर्देश आहेत का ? आणि कितितरी गोष्टी..... परत त्या वेळेची तुमची मनस्थिती.....

पण तो एक मस्त अनुभव असतो हे खरं !

लहान असताना काळोख्या रात्री घराच्या अंगणात बसून आकाशवाणीवर ऐकलेल्या मदनमोहनच्या गझलांची आठवण जागी झाली.
याचा संगीतकार कोण आहे हो?

मीनल's picture

3 Oct 2010 - 5:56 am | मीनल

जुनी गाणी त्यातून गझल कमीच ऐकली आहेत. त्यातून असले गहन अर्थ न समजण्याजोगे होते.
आता त्या शब्दातील अर्थ समजून ऐकलेली चाल छान वाटली.

अन्या दातार's picture

3 Oct 2010 - 4:50 pm | अन्या दातार

कुलकर्णी साहेब! चांगला अनुभव दिलात. आत्तापर्यंत गझल म्हणजे झोप येण्यासाठी उत्तम साधन असे माझे मत होते. पण आज त्याचे रसग्रहण केल्यावर त्याची मजा काही औरच असते याची जाणीव झाली.

पुनश्च धन्यवाद........

अनिरुद्ध

विश्नापा's picture

3 Oct 2010 - 8:07 pm | विश्नापा

माझ्या मते "दहर" या शब्दाचा अर्थ "संसार" हे जग असा आहे.
ज्ञानवंतांकडून अधिक खुलाश्याची अपेक्षा!!!

विसोबा खेचर's picture

3 Oct 2010 - 8:13 pm | विसोबा खेचर

विवेचन आणि गाणं, दोन्हीही सुरेख..!

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

जयंत कुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 5:42 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांचे आभार !

विजुभाऊ's picture

4 Oct 2010 - 5:48 pm | विजुभाऊ

झकास