"काय करायचं, बोला लवकर." (फलित गिळोत चिंतातूर दिसत होते.)
"कशाबद्दल?" (कृष्णेश आजताडी शिल्पा आणि करीनाचे फोटो न्याहाळत उद्गारले. त्यांच्या चेहर्यावर अगदी करूण भाव आले होते. या मुलींना आपल्या महान देशात अंगभर कपडे देखील घालायला मिळत नाहीत याची खंत त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. आणि असले फाटके कपडे घालून यांना जनतेला सामोरे जावे लागते याचेही त्यांना अतीव दु:ख होत असल्याचे दिसत होते.)
फलित गिळोत (फगि): अहो, इतकं सगळं सांगीतलं नं मी...त्याच्याबद्दल...
कृष्णेश आजताडी (कृआ): अरे हो...त्याच्याबद्दल ना...काही काळजी करू नका. उद्घाटनाचा आणि समारोपाचा बार असा झकास उडवून देऊ की मधल्या दिवसांमध्ये काय झालं हे कुणाला लक्षात पण राहणार नाही. पहिल्या दिवशी मलाईकाला "झंडू बाम" लावायला सांगू...आय मिन त्या गाण्यावर तिला नाचायला लावू. नंतर एखादा भारतीय संस्कृतीचा उदोउदो करणारा कार्यक्रम ठेवू....कुणीतरी शास्त्रीय गायक, नर्तक वगैरे पकडून आणू. नंतर लगेच पायल रोहतगी, अमृता अरोरा, मेघना नायडू, राखी सावंत यांची दिलखेचक गाणी ठेवूयात....
फगि: (जीभ ओठांवरून फिरवत) अहो पण जरा चांगले कलाकार आणले तर....
कृआ: ऐ गपे.. हेच कलाकार आणायचे. आणि समारोपाच्या रात्री "आता वाजले की बारा.." आणि "अप्सरा आली..." ही गाणी झालीच पाहिजे...आणि रात्री मला शेफाली जरीवाला आणि नेत्रा रघुरामन पाहिजे...
फगि: काय??? अहो दाढी पिकली तुमची... नुसतं उसनं अवसान आणून भागत नाही आता. एक कॅप घातली, एक निळा टी-शर्ट घातला म्हणून लगेच मॅरॅथॉन धावता येत नसतं. संयोजनाचं उसनं अवसान आणून काय वाट लागलीय बघताय नं तुम्ही?...
कृआ: ऐ गपे....मी समारोपाच्या रात्रीला गाण्यांवर नृत्य करण्यासाठी म्हटलं...ऐकून घेत जा ना जरा नीट. एक-दोन मराठी नट्यापण आणा....
फगि: पण नेत्रा रघुरामन आणि शेफाली जरीवाला जुन्या झाल्यात आता साहेब!
कृआ: असू द्या...जुनं ते सोनं आणि नवं ते हवं असा खाक्या ठेवला पाहिजे माणसाने...म्हणजे आपल्या राष्ट्राची प्रगती होईल, आपल्या देशात खेळसंस्कृती रुजण्यासाठी अशी नवनवीन तत्वे स्वीकारणं, अंगिकारणं खूप आवश्यक आहे. म्हणून...
फगि: ओ बस्स करा भाषण साहेब. मला काय देताय? मी सगळ्या टीव्ही चॅनल्सना दगडी चेहरा करून मोडक्यातोडक्या इंग्रजीत "काहीच विशेष घडलेलं नाही" असं सांगत सुटलोय तुमच्या सांगण्यावरून.... माझी पण काहीतरी सोय करा...
कृआ: या सगळ्या मदनिकांच्या मेकपचं कंत्राट तुला देतो...शिवाय त्यांचं खाणं-पिणं, कपडे, राहणं...सगळं तू मॅनेज कर...
फगि: पण मला यातलं काहीच येत नाही....
कृआ: अरे येडक्षक्ष, एक फर्म बनव...'एफजी मेकओवर प्रा लि'. आताच जातांना एक फॉर्म घेऊन जा....कोटेशन टाक...आणि भाडोत्री मेकपमन आणून काम करून टाक. उद्या २००० चा चेक घेऊन जा...बाकी १ कोटी कॅश देतो... नंतर सेटल करू हिशेब, काय?
फगि: वा, बॉस्...मान गये, तुम्हारी पारखी नजर और तुम्हारा जवां जिगर, दोनो को! चला, या निमित्ताने या रेशमी नट्यांचा रेशमी, तलम सहवासही मिळेल आणि पैसे पण मिळतील. (बायकोला ८-१५ दिवस माहेरी पाठवून द्यावे म्हणतोय. बर्याच दिवसापासून म्हणत होती. तिलाही थोडा चेंज मिळेल.) ओके. बरं तो पूल कोसळलाय...त्याचं काय करायचं? आणि वेटलिफ्टिंगच्या स्टेडियमचं छत कोसळलय...
कृआ: असं, कधी?...शिल्पा बारीक झाली काय रे खूप...मागच्या मॅरेथॉनला जरा भरलेली होती...
फगि: ओ साहेब..अहो सोडा ते मासिक...स्पर्धा १० दिवसांवर आलीय...
कृआ: काय बोलतो...अच्छा आपली कॉमनवेल्थ होय...एक काम कर...पूल पुन्हा बांधणं शक्य नाही...स्पर्धा संपल्यावर बांधू नवीन कोटेशन मागवून...आपली ती ही असते ना?
फगि: हो, असते ना इथेच..बोलवू का?
कृआ: ऐ गपे...मी म्हणतोय ती सुशोभिकरणाची वेल असते ती वेल त्या पडक्या पुलावरून पांघरा. अशी बेमालूम पांघरा की १८५७ च्या बंडात कोसळेला पूल स्मारक म्हणून जीवापाड जपलाय असं सगळ्यांना वाटलं पाहिजे...वाटल्यास एक संगमरवराचा बोर्ड चहात बुडवून लावा तिथे...असं करा तो मल्होत्रा नावाचा एक उद्योगपती आहे; त्याला फोन करा..'ग्रीन स्केप्स प्रा लि' म्हणून कंपनी काढ म्हणावं ताबडतोब...बाकी त्याला माहिती आहेच...त्याच्या 'क्विक ट्रॅक मार्केटिंग'चा हिशेब आला नाही अजून. त्याची पण आठवण दे त्याला. त्याच्या साल्याची लंडनला 'गेम्स इंफ्रा प्रा लि' म्हणून कंपनी आहे; तिला आपण डस्टबिन पुरवण्याचं कंत्राट दिलेलं आहे. मल्होत्राला सांग त्याचं राहिलेल्या १०००० डस्टबिन्सचं भाडं घेऊन जा म्हणावं...५ कोटीचा चेक दे त्याला....बाकी त्याला सगळं माहिती आहे.
फगि: बरं त्या वेटलिफ्टिंगच्या स्टेडियमच्या छताचं काय करायचं?
कृआ: हम्म्म्म...एक काम कर....पटकन कौलांनी ते झाकण्याची व्यवस्था करा. कुणी विचारलं तर सांगा की भारतात अजूनही कौलारू घरे असतात. आमच्या संस्कृतीचा एक भाग म्हणून आम्ही इथे कौलारू छत बांधलं आहे म्हणा...
फगि: डन! आपण जे टॉवर्स बांधलेयत खेळाडूंना राहण्यासाठी, त्यांची वाट लागलीय. बेसिन्स, संडास, पलंग सगळं घाण आहे. शिवाय पावसाच्या पाण्याने अजून राडा करून ठेवलाय. परदेशी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक ठणाणा बोंबलतायत...कुणी येईल की नाही शंकाच आहे.
कृआ: अरे मग बरच आहे की...त्यांच्या सरबराईसाठी लागणारा पैसा वाचेल आणि तो आपल्याला आपल्या देशात खेळसंस्कृती रुजवण्याच्या कामात वापरता येईल. बालेवाडीच्या स्टेडियमला अजून बराच निधी लागणार आहे. चांगलं आहे... नका येऊ म्हणावं....आणि देशात इतक्या समस्या असतांना खेळावर इतका पैसा खर्च करणं परवडतं का आपल्याला? गरीबी आहे, शिक्षणाची बोंब आहे, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा नाहीत; प्यायला पाणी नाही कित्येक गावांमध्ये; रस्ते नाहीत; रोजगार नाही; महागाई आहे...इतके प्रश्न असल्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा खेळासारख्या कमी प्रायोरीटी असलेल्या गोष्टीवर करणं शोभतं का आपल्याला? मग?
फगि: अहो पण मग स्पर्धा पार पाडायची कशी?
कृआ: त्यात काय अवघड आहे? आपल्याकडे कितीतरी उत्साही नागरिक आहेत. त्यांना उभं करायचं ऐन वेळेला. स्वयंसेवक म्हणून आर्त हाक द्यायची. "देशाच्या शिरपेचात तुरा खोवणार्या या ऐतिहासिक क्रीडासोहळ्याला यशस्वी करण्यासाठी सगळ्या सच्च्या भारतीयांनी एकत्र आले पाहिजे आणि खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. आपल्या देशाची शान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे" अशी हाक दिल्यावर भरपूर उत्साही क्रीडाप्रेमी येतील. प्रत्येकाला एक प्रमाणपत्र आणि १०० रुपये द्यायचे. शिवाय एक वेळचा चहा, नाष्ता आणि जेवण पण द्यायचं. ते पण खूष आणि आपलं पण काम होतयं. काय?
फगि: अहो साहेब, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू आले नाहीत तर स्पर्धा बघणार कोण? उसेन बोल्ट येणार नाही; मायकेल फेल्प्स येणार नाही...
कृआ: अरे असे आंडू-पांडू खेळाडू यायलाच नकोयत. कधी नावे पण नाही ऐकलीयत यांची....स्टेफी ग्राफ, मारिया शारापोव्हा, अॅना कुर्निकोव्हा यांना बोलवा; हे आलेच पाहिजेत...आणि हो...जमलं तर आंद्रे अगासी, बोरीस बेकर, पीट संप्रास यांना ही बोलवा...हवं तर...पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू त्यांचं....
फगि: साहेब धन्य आहात तुम्ही. अहो, वर्षानुवर्षे तुम्ही चिकटून बसलाय ऑलिंपिक असोसिएशनच्या खूर्चीवर...पण तुम्ही ज्या खेळाडूंची नावे घेताय ती मंडळी कधीच निवृत्त झालीय. आणि उसेन बोल्ट आणि मायकेल फेल्प्स हे जगप्रसिद्ध खेळाडू आहेत. त्यांच्या खेळप्रकारात त्यांना ऑलिंपिकमध्ये ढीगाने सुवर्णपदके मिळाली आहेत.
कृआ: (जीभ चावत) असं आहे होय? च्यायला, काळ किती वेगाने बदलतो. आता आठवतयं मला स्टेफी ग्राफला खेळतांना बघतांना...ती अॅना कुर्निकोव्हा...मारिया...वा वा...टेनिस हा खरच खूप रोमांचकारी खेळ आहे, नाही?
फगि: हम्म्म...बाहेर या साहेब. आणि पुरुषांच्या टेनिसविषयी काय म्हणणं आहे तुमचं?
कृआ: (डोळे वटारून) पुरे झाला फाजीलपणा...जेव्हा बघावं तेव्हा चावटपणा करत असता. सांगू का भाभीजींना?... हम्म्म, चला सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व झालेत ना आता?
फगि: नाही हो. खेळाडूंचं काय?
कृआ: जाऊ द्या हो, येतील ते येतील. तसंही या भिकार स्पर्धा कोण बघणार आहे? परदेशी खेळाडू आले होते हे दाखवण्यासाठी मुंबई, पुणे, दिल्ली अशा विद्यापीठांमधून शिकणारे काळे-गोरे पकडून आणा रोजंदारीवर... फोटो छापा त्यांचे पेपरात...झालं, काय लागतयं त्याला?
फगि: बरं, संडास...
कृआ: ऐ, इथं नको करू! तिकडं जा. पाणी नसेल तर, कागद, झाडाची पानं, दगड-धोंडे काय वाट्टेल ते वापर पण इथे नको करुस...
फगि: अहो, मी म्हणतोय की संडास, बेसिन्स, पलंग सगळं घाण आहे. तुमच्या पुण्याचा बीआरटीसारखी अवस्था झालीय त्यांची. कुत्रे-बित्रे झोपतायत पलंगांवर...
कॄआ: मग काय याना गुप्ता झोपेल की काय?
फगि: अहो तसं नाही, परदेशी लोकं तिथे राहणार; भारताची इज्जत जाईल. जनता आधीच आपल्याला शिव्या देतेय. कुठे बीजिंग ऑलिंपिक आणि कुठे भिकार भारतीय कॉमनवेल्थ असं कंपॅरीजन करतायत लोकं. कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला; हे पैसे भारताच्या विकासासाठी वापरता आले असते; आरोग्य, शिक्षण, गरीबी इत्यादी कारणांसाठी वापरता आले असते असा आरडा-ओरडा करतायत काही टाळकी...
कृआ: आपल्या लोकांना सवयच असते आरडा-ओरडा करण्याची, तुम्ही लक्ष नका देऊ. शेवटी खेळ ही कुठल्याही राष्ट्राची शान असते आणि त्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावीच लागते....खेळ राष्ट्राला सशक्त आणि बलवान बनवतात. त्यातूनच बलशाली भारत उभा राहू शकतो. ते "बलसागर भारत होवो..." असं म्हटलं आहेच ना त्या ह्यांनी, कुणी रे? ते हे रे.... आपले ते पु. ल. देशपांडे..त्यांनीच ना? मग? असं आहे ते फलित... नुसताच गलितगात्र होतो राव तू प्रत्येक वेळेला...जरा 'बलशाली' हो...
फगि: खरं आहे राजे, तुम्ही आहात म्हणून सगळं व्यवस्थित चाललं आहे. तुम्ही नसतात तर कॉमनवेल्थचं काय झालं असतं मला कल्पना देखील करवत नाही.
कृआ: (स्मित करत) बरोबरच आहे. यालाच देशनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा पण म्हणतात...अजून कुठल्या निष्ठा राहिल्यात का?
फगि: सत्तानिष्ठा, मालमत्तानिष्ठा...
कृआ: बरोबर! जय हो!!!!
फगि: जय भारत! जय महाभारत!!
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 4:27 pm | गणेशा
बाकी ह्यांच्या निष्टेपायी सारी जनता नतम्स्तकच असेन ह्यांच्या
24 Sep 2010 - 5:27 pm | अब् क
जबराट!!!!!!!!!!!
24 Sep 2010 - 5:32 pm | अब् क
जबराट!!!!!!!!!!!
24 Sep 2010 - 7:29 pm | डावखुरा
फलित गिळोत..............
भारीच...
पण आमच्याकडेही ख़ळबळजनक वृत्त आहे...
आताच कलमाडींनी कॉमन वेल्थ गेम्स स्टेडीयम च्या छ्ताला लट्कुन आत्महत्येचा प्रयत्न केला...
पण छतच कोसळले....