अंगणातले आभाळ

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
25 Jul 2010 - 2:36 pm

डॉ.यशवन्त पाठक हे अनेकदा वृत्तपत्रांतून, मासिकांतून भेटले होते. पुढे त्यांचे "नाचू किर्तनाचे रंगी" हातात पडलं. ते पुस्तकही खुप आवडलं होतं. अश्यावेळी वाचनालयात "अंगणातले आभाळ" हे त्यांचे आत्मचरित्र दिसले आणि लगेच उचलले.

पाठकांचे वडील श्री. त्र्यंबकबुवा हे किर्तनकार ब्राह्मण. पाठकांना एक बहिण व एक भाऊ.. दोघेही धाकटे. वडीलांच्या किर्तनावर चालणारं घर. त्यात वडील सर्व भावंडांत मोठे असल्याने त्यांच्या भावंडांची जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या घराकडे काहिप्रमाणत झालेले दुर्लक्ष.. आणि या सगळ्या प्रकारात नावाने यशवंत असलेल्या एका छोट्या मुलाचा कर्माने यशवंत होण्यापर्तंतचा प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र अंगणातले आभाळ.

युद्धस्य कथा रम्या: म्हटले जाते. युद्ध माणसाचे जितके हाल करते तितकेच नाट्यमय प्रसंगही घडवते. आणि गरीबीतले जिणे म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या लढ्याला तोंड देणेच.. अश्यावेळी सतत परिस्थितीशी लढणार्‍या पाठक कुटुंबाने व पर्यायाने लेखकाने अनुभवलेले प्रसंग वाचताना वाचक गुंग होतो. जसजशी परिस्थिती बदलली तसतसे ब्राह्मण समाजाचे समाजातील स्थान बदलले. अश्यावेळी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लेखकाला एकीकडे बदलता समाज सामोरा येत होता तर दुसरीकडे वडिलांनी दिलेली किर्तनाची म्हणा किंवा ब्राह्मणी म्हणा परंपरा खेचत होती.

एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे आठ आण्यासाठी अथर्वशिर्षाची पारायणे करणारा लेखक, शाळेच्या अभ्यासाबरोबरच बराच अनुभवही गाठीशी बांधतो. याचबरोबर गरीबीतही कोणाकडे गरज असल्याशिवाय काहि न मागण्याची, शक्य तितके वाटून खाण्याची शिकवण आई स्वतःच्या उदाहरणातून देत असते. वडील जमेल तशी आर्थिकजमाखर्च जुळवत असतात पण तो पुरेसा नसतो. अश्यावेळी अनेक कुटुंबांप्रमाणे लेखकाची आई व्यवहार व मुलांचे संस्कार सांभाळून मुलांना मोठे करते.

पुढे पाठकांचे बीए होणे, वडिलांचा आजार, तर्‍हेवाईक नातेवाईक, समाजातील भलेबुरे अनुभव, वडिलांचा मृत्यू, एमए होणे आणि पुढे डॉक्टरेट मिळवण्यापर्यंतचा प्रवास छान चितारला आहे. याच बरोबर आपल्याला अजून एक दुनिया दिसते ती म्हणजे किर्तनकाराची. एका किर्तनकाराच्या घरातील वास्तव. एका बाजूला आर्थिक विवंचना व त्यामुळे अपरिहार्य नोकरी तर दुसरीकडे किर्तनाची परंपरा सोडावी लागण्याचं दु:ख (किंबहूना मुलानेही बीए होऊनही किर्तनकार व्हावे अशी इच्छा) यातील द्वंद्व प्रकर्षाने समोर येतं. पुढे जेव्हा डॉक्टरेटसाठी श्री पाठक "कीर्तनपरंपरा आणि मराठी वाङ्मय" हा विषय निवडतात व त्यासाठी माहीती जमवतात तेव्हा दिसणारं कीर्तन विश्वातलं अंतरंग व त्या विश्वातील भलेबुरे अनुभव विचार करायला लावतात. बदलत्या जगाचं वारं सगळ्या क्षेत्रांप्रमाणे कीर्तनक्षेत्रालाही लागलं आहे.पुर्वापार चालत आलेल्या मानापमानाच्या नाटकात आता आर्थिक भपक्याचा नवा अंक सुरू झालेला जाणवतो.

अर्थात या पुस्तकात सगळंच उत्तम आहे असे नाहि. गरीबी खूप होती हे खरे असले तरी काहि प्रसंग तोच तोचपणा येऊ नये म्हणून टाळता आले असते. अश्या तोच भावार्थ संगणार्‍या वेगवेगळ्या प्रसंगामुळे पुस्तक मधेच किंचित पकड सैलावतं पण एकुण आयुष्य नाट्यमय असल्याने त्यात आपण वाचत राहिलो की पुन्हा गुंगून जातो.

चरितार्थासाठी प्राध्यापकी स्विकारलेल्या अन नियतीने डॉक्टरेटच्या रूपाने पुन्हा किर्तनातच गुंतवणार्‍या ह्या किर्तनकाराच्या मुलाची ही जीवनकहाणी कसेही करून आवर्जून वाचा असे जरी सांगणार नाहि तरी समोर मिळाल्यास अजिबात सोडू नका अशी आहे असे मात्र नक्कीच म्हणेन.

पुस्तकः अंगणातले आभाळ
लेखकः यशवन्त पाठक
प्रकाशनः ग्रंथाली
पृष्ठसंख्या: ३२७

वाङ्मयआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

25 Jul 2010 - 2:43 pm | दत्ता काळे

पुस्तक ओळख छान करुन दिलीत. लायब्ररीत गेल्यावर बहुतांशी वेळेला कुठले पुस्तक निवडावे हा प्रश्न पडतो.

हे पुस्तक वाचायला नक्की आवडेल.

मराठमोळा's picture

25 Jul 2010 - 3:05 pm | मराठमोळा

छान ओळख!!

माझ्या एका मित्राची अगदी अशीच कहाणी आहे, वडील किर्तनकार, गरीबी वगैरे. मिळाल्यास नक्की वाचेन हे आत्मचरित्र.

सर्व चांगले साहित्य या जन्मी वाचुन होईल की नाही याबद्दल शंका वाटते. ईंजीनीयरींग मधे हजारो पानांची रटाळ पुस्तके वाचल्यानंतर बरेच दिवस पुस्तकसदृश गोष्ट पाहिली तरी जीव घाबरायचा. हळु हळु पुन्हा वाचनाची गोडी निर्माण झाली. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2010 - 11:41 am | स्वाती दिनेश

पुस्तकाची ओळख आवडली,
ह्या पुस्तकाचे प्रकाशन आमच्या शाळेच्या अमृतमहोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी झाले,त्यावेळच्या सोहळ्याची आठवण ताजी झाली.
स्वाती

प्रभो's picture

26 Jul 2010 - 5:57 pm | प्रभो

पुस्तकाची ओळख आवडली,

विजुभाऊ's picture

26 Jul 2010 - 12:01 pm | विजुभाऊ

छान पुस्तक आहे.
बरीच वर्षे झाली पण पुस्तक अजून स्मरणात आहे.
ग्रंथाली प्रकाशनाने बहुधा दलीत लेखकांची आत्मचरित्र प्रकाशीत केलीत त्यांच्या अडचणी जगासमोर आणल्या.
ग्रंथाली वाचक चळवळीचे अंगणातले आभाळ हे एक वेगळेच आत्मचरीत्र वाचायला मिळते.
पुस्तक त्याच्यातील प्रांजळ निवेदनशैलीमुळे आणि मोकळ्या कथनामुळे आवडले.
पी एच डी करताना आलेले अनेक लोकानुभव त्यानी साम्गितले आहेत.
दुर्मीळ पोथ्या निव्वळ देव्हार्‍यात जतन करून ठेवायच्या काहीवेळा त्या पोथ्यांवरच पुरणाचे नैवेद्य ठेवायचे पण अभ्यासकांना मात्र त्या उपलब्ध करून द्यायच्या नाही.
कीर्तनाचे अनेक प्रकार त्यानी सांगितले आहेत.
इतकी मेहनत घेऊन केलेला पी एच डी प्रबन्ध युनिव्हर्सिटीतल्या एका ढिगार्‍यात जाणार ही लेखकाबरोबर वाचकालाही धक्कादयक वाटते.
बाकी
"ज्याने त्याने गोपाळकाला ज्याला त्याला जमेल तसा त्याचा आनन्द घेतला. ज्याना फुगड्या खेळता येत होत्या त्यानी गोपिकांना कृष्णासमवेत मिळणारा आनन्द घेतला. ज्याना ते शक्य नव्हते त्यानी तो सोहळा मनोमन उपभोगला.... "
हे प्रकरण पुस्तकाचा हायलाईट ठरावे इतके सुंदर वर्णीले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jul 2010 - 5:43 pm | प्रकाश घाटपांडे

घरी दरवर्षी रामनवमीला येणारे किर्तनकार आठवले.त्यांना कपबशी चालत नसे. धातुच्या भांड्यातुन दुध मी नेउन द्यायचो.त्यांची बडदास्त चांगली ठेवली जायची. राममंदीर आमचे असल्याने रामाचा पाळणा हलवण्याचा मान मला मिळत असे.
आत्ताच मानसी व श्रेयस बडवे( उपाध्ये) या पतिपत्निंचे किर्तन जुगलबंदीचा कार्यक्रम पाहिला. हे नुकतेच लग्न झालेले दांपत्य लग्ना अगोदर पासुन जुगलबंदीचे कार्यक्रम करतात. श्रेयस हा किर्तनकार मिलिंदबुवा बडव्यांचा मुलगा. लहानपणापसुन किर्तनाची दिक्षा वडिलांकडुन घेतली.