तर्क जाणत्यांचा

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
19 Jul 2010 - 10:12 am

ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्‍या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले. त्यातून तिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. दुर्गम भागात तिने शिक्षिका म्हणून नोकरीला सुरवात केली. लहान वयात लग्न झालेले, तशाच लहान वयात तिला मातृत्व लाभले. तिच्या लहानग्या मुलाला दुर्गम भागात औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू आला. विशीतल्या जोडप्याला अशा प्रसंगाने खचवून टाकले असते, पण अत्यंत सकारात्मक भूमिकेमुळे ती आणि तिचा नवरा या घटनेनंतर चोवीस तासांत आपापल्या कामावर रुजू झाले. नंतर तिच्या नवर्‍यावर अत्यंत अवघड अशी दुखणी आली. या सगळ्यांतून ती जिद्द आणि श्रद्धा यांच्या बळावर तरून गेली. ईश्वरावर तिची अढळ श्रद्धा होती. कर्मकांडेही ती करायची, पण तिच्या नवर्‍याच्या निधनानंतर पुढच्या पिढीने दिवस वगैरे काही विधी करायचे नाहीत असे ठरवल्यानंतर तिने त्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही. उलट त्या पैशांतून काही गरीब विद्यार्थ्यांना जेवण, शाळांना पुस्तकांची भेट असे बरेच काही तिने केले. नंतर नंतर कर्मकांडांमधील फोलपणा तिच्या ध्यानात आला आणि तसे मोकळेपणाने मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही तिने दाखवली.
एक उत्तम शिक्षिका म्हणून तिने अनेक सन्मान आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. संस्कृतवर तिचे प्रभुत्व होते आणि तो विषय शिकवण्याची तिच्याजवळ हातोटी होती. दहावीला तिच्याकडून संस्कृत शिकलेल्या आणि संस्कृतमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही शेकड्यांत मोजावी लागेल. शिक्षणक्षेत्रात काम करत असतानाच तिने सहकारी बँकेचे संचालकपद स्वीकारले आणि त्या क्षेत्रात एक निस्पृह आणि प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती म्हणून नाव कमावले. शिक्षण आणि सहकार या दोन्ही तशा बदनाम क्षेत्रांत काम करुनही तिचे मन कधी कडवटले नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता तिने अनेक मुलांना अन्नाला लावले, अनेकांवर चांगले संस्कार केले, अनेकांना मदत केली.

एप्रिल महिन्यात तिला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. तिची भूक कमी झाली आणि तिला थकवा जाणवू लागला. तिची पाठदुखी दिवसेंदिवस वाढतच गेली. सर्व प्राथमिक तपासण्यांत काही निष्पन्न झाले नाही. पुण्यात कबीरबाग येथे सांधेदुखीवर आसने आणि व्यायाम असे उपचार दिले जातात. ते उपचार तिने एकदोन दिवस घेतले असतील, नसतील तोच तिच्या पायांमधील शक्ती कमीकमी होत गेली. शेवटी शेवटी तर तिला पायाची बोटेही हलवता येईनाशी झाली. पायांत संवेदना होत्या, पण पाय लुळे पडले. हे सांध्यांशी, हाडांशी संबंधीत दुखणे असावे, असे वाटल्याने तिला संचेती हॉस्पेटलमध्ये दाखल केले. तेथे तिच्या असंख्य तपासण्या झाल्या. एमाराय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी.... शेवटी तिच्या पाठीचे मणके वयोमानाप्रमाणे झिजले आहेत, त्यांतील काही मणक्यांवर कसलीशी वाढ झाली आहे आणि शस्त्रक्रिया केल्याशिवाय काही नक्की काय झाले आहे ते कळणार नाही असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत पडले. तिच्या पायाच्या नसांवर दाब पडल्याने तिच्या पायांमधील शक्ती गेली आहे असे डॉक्टरांना वाटत होते. त्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेत तिच्या मणक्यांचे 'डीकॉंप्रेशन' केले आणि मणक्यांना आधार म्हणून धातूची एक पट्टी काही खिळ्यांच्या सहाय्याने तिच्या पाठीत बसवली. ती पाठीच्या मणक्यावर जी काही गाठ होती ती 'नॉन हॉजकिन्स लिंफोमा' ची होती असे बायॉप्सीमध्ये कळाले. दरम्यान तिच्या पायांच्या हालचालींत काहीच फरक पडला नव्हता. तिचे पंगूपण तसेच होते. एरवी अत्यंत उत्साही आणि सतत कामात असणार्‍या या स्त्रीला असे पडून राहाणे किती त्रासदायक झाले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. तिच्या जखमेचे टाके सुकले असतील, नसतील इतक्यात तिच्यावर उपचार करण्यासाठी काही कर्करोगावरील उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हे कॅन्सर स्पेशालिस्ट रुबी हॉल क्लिनिकमधील होते. बरेच नावाजलेले, पेशंटसचा अखंड ओघ असणारे हे तज्ज्ञ. त्यांनीही बर्‍याच तपासण्या केल्या आणि या लिंफोमावर अत्यंत तातडीने रेडिएशन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ती जखम अर्धवट सुकलेली असतानाच तिला पाच सत्रांत रेडिएशनचे उपचार देण्यात आले. त्यामुळे ती जखम थोडीशी चिघळली पण ते नॉर्मल आहे, आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सगळे ठीक होईल असे या कॅन्सर स्पेशालिस्टनी सांगितले.
काही दिवसांसाठी या स्त्रीला घरी सोडण्यात आले. पण तसे करतानाच आता या कॅन्सरवर केमोथेरपी घेणे आवश्यक आहे असे सांगून एका आठवड्यानंतर पुन्हा इस्पितळात दाखल होण्यास सांगण्यात आले. या एका आठवड्यात ही स्त्री घरी आपल्यावर योग्य उपचार होत आहेत, आणि आपण लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या पायावर उभे राहू या समजात अत्यंत आनंदात होती. दरम्यान तिला देण्यात येणारी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तिने अतिशय मनापासून स्वीकारली. विविध प्रकारचे व्यायाम ती अगदी मन लावून करत राहिली. त्याबरोबर तिचा जप, स्तोत्रे आणि एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा यामुळे तिचे मनोबल उत्तम प्रकारे टिकून राहिले होते. येणार्‍याजाणार्‍याला ती 'आता लवकरच मी माझ्या पायावर उभी राहणार' असे हसून सांगत असे. आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची आपल्याला अजिबात भीती वाटली नाही कारण भुलीच्या औषधांचा परिणाम होईपर्यंत सतत माझ्या तोंडात 'माझ्या' देवाचे नाव होते असे ती सांगत असे.
एका आठवड्यानंतर तिला परत संचेती हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीसाठी दाखल केले. सतत चोवीस तास काही ना काही औषधे तिच्या शरीरात शिरेवाटे देण्यात आली. नंतरचेही तीनचार दिवस बरे गेले. मग अचानक तिची प्रकृती खूपच खालावली. खाणेपिणे बंद झाले. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला, धाप लागली, रक्तदाब खूपच खाली आला आणि रक्तातल्या पेशींचे प्रमाण धोकादायक रीत्या ढासळले. त्या दरम्यान घेतलेल्या रक्याच्या नमुन्यात प्लेटलेटसची संख्या ३००० पर्यंत कमी होती. अर्थात हे रक्तविश्लेषणाचे रिपोर्टस रुग्णाच्या नातेवाईकांपर्यंत कधी पोचलेच नाहीत हा भाग वेगळा. मग धावाधाव झाली. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिच्यावर औषधांचा भडिमार झाला. बारा -चौदा तासांत सुमारे लाखभर रुपयांची औषधे तिच्या शरीरात सोडली गेली. श्वास घेताना ती तडफडू लागली. तोंडावरचा ऑक्सिजन मास्क हाताने बाजूला करून 'मी दमून गेले आहे' असे तिने मला खोल आवाजात सांगितले. ' शी इज क्रिटिकल बट नॉट (यट) ऑन हर डेथ बेड' असे डॉक्टरांनी सांगितले. 'वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट' हे अजरामर वाक्य तर होतेच.तर पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कार्डियाक अरेस्टने तिचे हृदय बंद पडले. ते पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नानंतर ते अडखळत, अनियमितपणे सुरू झाले. त्यातच तिला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. हे तिचे अगदी अख्रेरचे क्षण आहेत हे ध्यानात आल्यावर 'डॉक्टर, प्लीज डोंट डू एनीथिंग. लेट हर गो' असे म्हणून मी आयसीयूच्या बाहेर पडलो. पाचेक मिनिटांत डेथ सर्टिफिकेटमधला तपशील विचरण्यासाठी आयसीयूमधल्या नर्सने माझ्या खांद्यावर टकटक केली.
औषधांनी , इंजेक्शनसनी सुजलेला तिचा देह, ऑक्सिजन मास्कने व्रण पडलेला तिचा निस्तेज चेहरा... हे सगळे सुन्न मनाने विद्युतदाहिनीत सरकवताना माझ्या मनात दुःख अधिक होते की राग हे आज सांगणे कठीण आहे. दु:खाचे विश्लेषण होऊच शकत नाही. रागाचे तसे नाही. हा राग फक्त डॉक्टरांच्यावर नव्हता. कसाईपणा हा त्यांचा धर्म आहे, आणि त्यांनी त्या धर्माचे पालन केले इतकेच. यातला थोडा राग त्या निधन पावलेल्या स्त्रीवरही होता. इतका संपूर्ण विश्वास कुणावरही असणे बरे नव्हे, हे तिला कळायला पाहिजे होते. डॉक्टरच्या दृष्टीने पेशंटचे शरीर ही एक प्रयोगशाळा असते आणि विविध प्रयोग 'करून बघण्या'पलीकडे त्यांनाही फार करता येत नाही, हे तिला कळायला हवे होते. त्यांचा तर्कही सामान्यांपेक्षा थोडा जाणता असला तरी तो निव्वळ तर्कच आहे, हे तिने ओळखायला पाहिजे होते. पेशंटवर उपचार, त्यांना बरे करणे ही डॉक्टरांची प्राथमिकता असते असा तिचा समज होता. ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते.
थोडा राग तिचा ज्याच्यावर संपूर्ण आणि अचल विश्वास होता त्या परमेश्वरावरही होता. 'तो' आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपले सगळे बरे होणार हा विश्वास 'त्याने' तिला दिला होता. या भाबड्या विश्वासाने कदाचित तिचे शेवटचे काही दिवस सुखाचे गेलेही असतील, पण अगदी अखेरच्या क्षणी मृत्यूच्या कराल जबड्यात जाताना हा परमेश्वरही आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!
इस्पितळातून परत आणलेल्या सामानातील तिची जपाची माळ, देवतांच्या छोट्या तसबीरी, आरत्यांची, स्तोत्रांची लहानशी पुस्तके या सगळ्या गोष्टी एकेक करून बाजूला ठेवत असताना माझे मन पूर्ण निर्विकार झाले होते. 'अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले' या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jul 2010 - 10:27 am | प्रकाश घाटपांडे

वाचुन सुन्न वाटले.

एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.

तर्कासोबत भावनेचा ही आधार अशा वेळी दिलास देणारा वाटतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2010 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते

वाईट प्रसंग. पण तुम्ही ज्याला कामी न आलेला विश्वास म्हणता, कदाचित त्याच विश्वासापोटी श्रद्धेपोटी शेवटचा क्षण त्यांच्याकरता सुसह्य झाला असावा, कोणी सांगावे. त्या शेवटच्या क्षणी काय होते हे भोगल्या शिवाय कळत नाही, आणि भोगणारा सांगायला राहत नाही.

बिपिन कार्यकर्ते

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jul 2010 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे

कोणी सांगावे. त्या शेवटच्या क्षणी काय होते हे भोगल्या शिवाय कळत नाही, आणि भोगणारा सांगायला राहत नाही.

अगदी सहमत आहे. हे त्यावेळच्या मेंदुतील केमिकल लोच्यांवर अवलंबुन आहे.श्रद्धा अश्रद्धा या संकल्पनांचा गोंधळ मनात असतो. माझ्या मनात श्रद्धा ( किंवा अश्रद्धा) ही कधीच निर्माण होणार नाही असे ठामपणे कोणी म्हणु शकणार नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

हेच कळत नाही.
वेताळ

प्रतिक्रियेत या अधीक लिहीण्याचे बळ नाही.

छोटा डॉन's picture

19 Jul 2010 - 12:09 pm | छोटा डॉन

+१

------
छोटा डॉन

नंदन's picture

19 Jul 2010 - 2:29 pm | नंदन

>>> प्रतिक्रियेत या अधीक लिहीण्याचे बळ नाही.
--- असेच म्हणतो...

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2010 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे अनुभव मन सुन्न करून जातात.

-दिलीप बिरुटे

संदीप चित्रे's picture

20 Jul 2010 - 12:01 am | संदीप चित्रे

सुन्न

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2010 - 12:14 pm | स्वाती दिनेश

असे अनुभव मन सुन्न करुन जातात.
रामदास यांच्यासारखेच वाटते.
स्वाती

सहज's picture

19 Jul 2010 - 1:00 pm | सहज

खूपच भावनेच्या भरात लिहला आहे हे जाणवते आहे. जाणार्‍याला त्यांच्या दृढ विश्वासाने जो काही फायदा झाला तेवढाच लक्षात घेतला तर त्याहुन आधीक विचार करण्यात काही हशील नाही.

काळ हेच मलम. बाकी औषध काही नाही, जखम भरणे नाही. आपलाच आपल्याशी समझोता.

विकास's picture

19 Jul 2010 - 7:30 pm | विकास

काळ हेच मलम. बाकी औषध काही नाही, जखम भरणे नाही. आपलाच आपल्याशी समझोता.

असेच म्हणतो.

आपण स्वतःला कितीही प्रौढ (mature) समजत असलो तरी आईच्या जाण्यानंतरच आपण वयाने मोठे झालो असलो तरीदेखील किती लहान होतो हे समजते...

--------------------------------

यशोधरा's picture

19 Jul 2010 - 1:02 pm | यशोधरा

काय सांगावे... :(

ऋषिकेश's picture

19 Jul 2010 - 2:14 pm | ऋषिकेश

.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jul 2010 - 2:22 pm | llपुण्याचे पेशवेll

त्यांचा देवावर इतका गाढ विश्वास होता म्हणूनच देवाने यातनांमधून सोडवले असेल.
:(
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

ते तसे का? असा प्रश्न विचारुन आपण त्याचे उत्तर जाणून घेऊ शकूच असे नाही. त्या लोकांना तसे वागण्यात त्रास होत नाही का? असे आपण व्यवहाराच्या चौकटीत राहून विचारले तर विचित्र उत्तरे मिळतात.
ते तसं सोसायचं बळ त्यांना त्यांच्या श्रद्धेतून मिळत असतं हे मात्र नक्की.
आपण फक्त साक्षीदार असतो आणि भावनिक गुंतवणुकीमुळं ते वेदनादायी ठरतं.
डॉक्टरी उपचारांच्या प्रयोगांमधे त्यांच्यातला मानवी चेहरा लपून गेला तर त्याचे हाल रुग्णाला आणि त्याच्या अप्तांना भोगायला लागतात. मृत्यूशी स्पर्धा करत त्यावर वरताण करण्यापेक्षा नैसर्गिक सत्याला सामोरे जात रुग्णाचे कष्ट कमी करणं हा ही वैद्यकीय उपचारांचा एक भाग आहे हे जेव्हा डॉक्टरांना सर्वतोपरी समजेल त्यावेळी असे पीळ पाडणारे प्रसंग कमी होतील अशी आशा करुयात.

चतुरंग

रेवती's picture

19 Jul 2010 - 6:09 pm | रेवती

असं काही वाचून फार वाईट वाटतं!
हृदय जड झाल्यासारखं वाटतं.

रेवती

श्रावण मोडक's picture

19 Jul 2010 - 6:20 pm | श्रावण मोडक

सुन्न. मी कधी असा होत नाही; पण येथील परिस्थिती आणि हे लेखन याने आज झालो!

भाऊ पाटील's picture

19 Jul 2010 - 6:29 pm | भाऊ पाटील

अगदी मझ्या मनातली प्रतिक्रिया.

प्रियाली's picture

19 Jul 2010 - 6:35 pm | प्रियाली

वाईट प्रसंग. होणारे टळत नसते. कॅन्सर पेशंटचे हाल होतात आणि जवळच्या नातेवाईकांचेही.

चित्रा's picture

19 Jul 2010 - 7:07 pm | चित्रा

वाचून वाईट वाटले.
ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते... आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!

म्हटले तर मदतीला खरे तर कोणीच येत नसते, आणि म्हटले तर सगळेच येत असतात.

माझी आजी गेली तो प्रसंग आठवला. मी दहावीत होते. आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर ती तापाने आजारी होऊन झोपून होती. ती टॉयलेटमध्ये गेली आणि तशीच कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊन गेली. विम्बल्डनची संपत आलेली मॅच, बाहेर पावसाचा आवाज यात ती वर काय करते आहे ते कळले नाही.. थोड्याच वेळात जेवायला हाका मारल्या तरी उत्तर मिळेना. नंतर लक्षात आल्यावर तिला त्या लहानशा जागेतून बाहेर काढले, आणि रिव्हाईव्ह करण्याचा प्रयत्न सुरू झाला. घरात त्यादिवशी दोन घरातलेच म्हणता येतील असे डॉक्टर हजर होते. मी देवभक्त अशी नव्हते, पण देवाला एक सकाळचा नमस्कार करीत असे. शिवाय आजी भजन/कीर्तनाची आवड असलेली अशी होती. तिला रिव्हाईव्ह करताना पाहून मनात आले की ही वाचू शकेल कदाचित. तसेच देवघरात जाऊन म्हटले की माझ्या आजीला बरे कर, तिने तुझे कायम सगळे केले आहे. पण ती गेलीच.

त्यानंतर "एक शक्ती आहे" अशा प्रकारचा देवावरचा विश्वास उडाला. अचानक विश्वास असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात जशी त्या विश्वासाला तडा गेल्यावर पोकळी तयार होते तशी पोकळी तयार झाली. हा शब्द अगदी पुचाट, आणि दहावेळा वापरून अर्थहीन झाला आहे, पण त्याला इतर काही म्हणता येत नाही. त्यानंतरच जेव्हा कठीण प्रसंग आले, तेव्हा असे वाटले की "त्या" दिवशी मी देवाच्या नावे धावा केला नसता तर बरे झाले असते, काहीतरी आधार राहिला असता. त्यानंतर एक ठरवले -बाकी सगळे ठीक आहे, मनाचा रिकामेपणा सगळ्यात वाईट आहे. असो.
तुमच्या दु:खात सहभागी आहे.

यशोधरा's picture

19 Jul 2010 - 7:34 pm | यशोधरा

माझ्या आजीला बरे कर, तिने तुझे कायम सगळे केले आहे. पण ती गेलीच.

:(

शुचि's picture

19 Jul 2010 - 7:33 pm | शुचि

ना तरी अर्जुना मी काळु|
आणि ग्रासीजे तो माझा खेळु||

यापलीकडे काय बोलणार?
आपल्या दु:खात सहभागी आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

तिमा's picture

19 Jul 2010 - 7:35 pm | तिमा

त्या बिचार्‍या बाईंना काय काय भोगावे लागले ते वाचून वाईट वाटले.
हे वाचताना माझ्या वडिलांची आठवण झाली. ते नुकतेच ९१ वर्षांचे होऊन गेले. त्यांची गोष्टही वरील गोष्टीशी साम्य असणारी आहे. बारीक तापाचे कोणतेही निदान न झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधे ठेवले. कुठल्याही प्रतिजैविकांचा एक महिना उपयोग न झाल्याचे माहित असतानासुध्दा, एम. डी. डॉक्टरांनी त्यांच्यावर ५ दिवस इंट्राव्हेनसचा मारा केला व शेवटी सीटी स्कॅनमधे प्रोस्टेट कँसर सापडल्यावर पेन कमी करण्याच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला त्यामुळे स्वतःच्या पायानी चालत गेलेले माझे वडिल मरेपर्यंत कोमात राहिले.
कसाई बरा तो पटकन मारतो तरी! असे हाल हाल नाही करत!!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

गणपा's picture

19 Jul 2010 - 7:52 pm | गणपा

:(
खरच सुन्नं करणारा प्रसंग आहे.

आनंदयात्री's picture

19 Jul 2010 - 7:55 pm | आनंदयात्री

सुन्न व्हायला झाले. अशा प्रसंगी किंवा अश्या प्रसंगातुन जातांना तुमच्या वर्तुळची आठवण येणे अपरिहार्य !

दिवसवारासाठी पुण्यात गेलो होतो.खरे म्हणजे दिवसवार आधीच होऊन गेलो होतो .काल गेलो होतो ते सगळी आवरासावर आणि निरवानिरव करण्यासाठी .(किंवा त्यात मदत करायला.)
या आज्जी ऐंशी वर्षाच्या होत्य्य. गेल्या वर्षी आजोबा गेल्यावर फार एकट्या होत्या. पण मन खंबीर करून परत कामाला लागल्या. वेळ जावा म्हणून वर्षभरात घराचे काम दोन मजले वाढवले. बॅकेकडे जाऊन ते भाड्यानी देण्याची व्यवस्था केली.
हे काम संपते न संपते तोच अचानक एक दिवस लक्षात आले की मानेजवळ काहीतरी गाठ आहे. इथून पुढे तुम्ही लिहील्यासारख्या पायर्‍या चढत गेल्या.
मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा म्हणाल्या "अरे सहाच तर केमो घ्यायच्या आहेत .चार झाल्याच आहेत आण्खी दोन झाल्या की कामाला मोकळी झाले. "
पण तसे व्हायचे नव्हते. अचानक एक दिवस तब्येत खालावली आणि पुढच्या सात दिवसात सगळं काही संपलं .

मिसळभोक्ता's picture

19 Jul 2010 - 10:14 pm | मिसळभोक्ता

त्या वेळी, वारा सावध, पाचोळा उडवित होता......

-- मिसळभोक्ता

धनंजय's picture

19 Jul 2010 - 10:43 pm | धनंजय

सुन्न करणारे अनुभवकथन

Pain's picture

19 Jul 2010 - 10:57 pm | Pain

एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा
किती भयाण विरोधाभास. देव अस्तित्वात नाही आणि असलाच तर सज्जन लोकांचे त्याला काहीही घेणेदेणे नाही हे सिद्ध होते.

प्रचंड मोठ्या लोकसमूहाने काही एका प्रकारच्या नियंत्रणात रहावे, एकसारखा विचार करावा, आणि त्यास गरज पडेल तसे मॅनिप्युलेट* करता यावे यासाठी देव, धर्म यांची निर्मीती झाली असावी असे वाटते. तसेच बहुसंख्य लोकांना एकटेच, त्यांचे ते असे जगण्यापेक्षा कुठेतरी श्रद्धा ठेवणे आवश्यक वाटते.

डॉक्टरची फारशी चूक वाटत नाही. त्यांना माहीत असलेले सगळे उपचार केले, औषधे दिली.. रुग्णाने प्रतिसादच दिला नाही तर ते काय करणार ? आपले शरीरच आपल्याला बरे करते, रोगांशी लढते... डॉक्टर आणि औषधे मदत करतात एवढच. सदर स्त्रीने आयुष्यात अनेक खस्ता खाल्या, त्यात त्यांच्या खाणापिण्याची आबाळ --> कुपोषण झाले असण्याचे शक्यता आहे :(
परदु:ख शीतल म्हणून इतका विचार करू शकलो. माफ करा. तुमच्या जागी मी असतो तर कदाचित असेच केले असते.

भडकमकर मास्तर's picture

20 Jul 2010 - 12:12 am | भडकमकर मास्तर

'अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले' या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.

साडेपाच वर्षांपूर्वीच्या दिवाळीचा पहिला दिवस.. या सार्‍या भावनेतून गेलो आहे..
शेवटचे ते काही दिवस भयानक अवघड अनुभव देतात...

स्वाती२'s picture

20 Jul 2010 - 2:08 am | स्वाती२

:(

मुक्तसुनीत's picture

20 Jul 2010 - 3:45 am | मुक्तसुनीत

वर सर्वांनी उल्लेखलेल्या सर्व सहानुभूतीपर प्रतिसादांशी सहमत आहे.

जन्मलेला प्रत्येक जीव संपायचा हे तर्काला धरूनच आहे. समस्या मृत्यूची नाही, वेदनांबद्दलची आहे. एखाद्या व्यक्तीने वेदना सहन करणे ही तिची शिक्षा आणि त्या वेदना सहन करताना आप्तजनांनी पाहाणे ही त्यांची शिक्षा. या इतक्या वेदना सहन करणे म्हणजे कुणाचे देणे लागतो ? हा खरा प्रश्न आहे. मरण यायच्या आधी जर्जरावस्था येणे , या जगातून सन्मानपूर्वक निघून जाण्याचा हक्क हिरावला जाणे ही खरी शोकांतिका आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2010 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक वेळेस दुसर्‍याची आई जाण्याच्या दु:खाकडे पाहून माझ्या घरातला सावध वारा आठवतो. आता फक्त सन्मानपूर्वक मरणाच्या आठवणीत आनंद मानयचा!

अदिती

राजेश घासकडवी's picture

21 Jul 2010 - 10:37 am | राजेश घासकडवी

आलेला जीव जाणारच हे माहीत असलं तरी यातना व्हायच्या त्या थांबत नाहीत. आपण काय, डॉक्टर काय, एका विशिष्ट मर्यादेपलिकडे कोणाला काही करता येत नाही. तुमचं दुःख हलकं करण्यासाठी माझ्याकडे काहीही शब्द नाहीत. हेही माहीत असूनही लिहितोय... हे अपरिहार्य भोग सहन करून, स्वीकारून, लवकरच तुम्हाला जीवन जगण्याची शक्ती लाभो ही आशा...