रविवारची सकाळ - अपडेटेड

रम्या's picture
रम्या in जनातलं, मनातलं
1 Jun 2010 - 2:02 pm

रविवारच्या सकाळी जांभई देत उठलो. कामाची सुट्टी, पेपर वाचन, रविवारची पुरवणी, फक्त खाणं आणि तंगड्या पसरून टि. व्ही. पहाणं. काय साला दिवस आहे! नाद करायचा नाय!
आंघोळ उरकून पेपर उघडला आणि आत आवाज दिला,
"चहा आंण गं आणि बरोबर कांदपोहे सुद्धा"
बाहेर फक्त चहाच आला.
"कांदेपोहे कुठे आहेत?"
"मिळणार नाहीत"
मिळणार नाहीत? म्हणजे काय? रविवारच्या सकाळी सकाळी तिरसट उत्तर?
धोका आहे राव. विचार करून पाहीला. काल भांडण वगैरे तर काही झालं नव्हतं. टि. व्ही. वरच्या बर्‍याच कार्यक्रमात दाखवतात, बायकोचा वाढदिवस पती विसरला कि मग बायको रागावते.
च्यामारी कसा काय विसरलो मी? जाऊ दे सरळ सरळ शुभेच्छा देऊन टाकू आणि दुपारी जेवायला बाहेर नेऊ. हाय काय नाय काय.
मी "हॅप्पी बर्थडे, डार्लिंग" असा फिल्मी डायलॉग ठोकून दिला.
"गप्प बसा, तो झाला कधीच" बायको आणखीणच डाफरून म्हणाली.
"अरे हो, आपण मागच्याच महिन्यात साजरा केला तुझा वाढदिवस नाही का? विसरलोच." मी सुद्धा माझी चूक मान्य केली.
"तो माझा नाही आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. माझा वाढदिवस दोन महिन्यांपुर्वीच झाला आणि तुम्ही तो विसरला होतात. मीच आठवण करून दिली होती"
मी विचार करत राहिलो.
पण मग त्याचा आजच्या कांदेपोह्यांशी काय संबंध? काही नीट आठवत नाही पण कदाचित त्यादिवशी हिने माझ्याशी कचकचीत भांडण केलं असेल. म्हणजे नुकसान भरपाई झालेली आहे.
पण मग आज कांदेपोहे मिळणार नाहीत याला काय अर्थ आहे? विचारून खुलासा केला पाहिजे. पण आपला बाणा कायम ठेऊन. दोन महिन्यांपुर्वी मी तिचा वाढदिवस विसरलो होतो मान्य आहे. पण त्यासाठी आज चिडायचं काय कारण?
"ते जाऊ दे. कांदेपोहे का मिळणार नाहीत ते सांग" मी ही तेवढ्याच तिरसटपणे विचारलं.
"कांदे नाहीत", खुलासा झाला.
हात्तिच्या, एवढंच ना, मग त्यात एवढं फुगण्यासारखं काय आहे. पण मी चिडलो होतो.
"कांदे नाहीत? रविवार म्हणून फिरायला गेलेत का?" मी तिरसटपणा कायम ठेवला.
"गेले चार दिवस ओरडून ओरडून सांगतेय कांदे आणा म्हणून. पार्ट्या करायला वेळ आहे पण घरचं काम करायला नाही."
या बायका म्हणजे म्हणजे फार राजकारणी. जाता जाता टोमणा मारलाच. माझा मित्र कांडेकराची बायको माहेराला गेलीय त्यामुळे वेळ आणि मोकळे घर कालच सत्कारणी लावले.
"मग जा आणि घेऊन ये कांदे त्यात काय विशेष?" मी जरा प्रेमळ आवाजात सुचवलं.
"मी काय काय म्हणून करायचं? नाहीतर रोज ऑफिस मध्ये तंगड्या पसरून झोपाच काढता आणि सुट्टीच्या दिवशी पार्ट्या करता. ऑफिसमधून येता येता काही सामान आणलंत तर काही बिघडतं का?"
मला ऑफिसमध्ये काम कमी असतं हे मान्य आहे पण प्रवासाचा त्रास कमी असतो का? स्वत:ची गाडी असली म्हणून काय झालं?
"मग सांगायचं कांदे आणा म्हणून, आयत्या वेळी तक्रार करायची नाही"
"रोजच तर सांगतेय. तुमच्या मोबाईल वर रिमायंडर सुद्धा लावला होता. पाहीलात का?"
मी आठवून पाहीलं. काल संध्याकाळी साडेसातला "कांदे" असा काहीतरी रिमायन्डर वाजला असल्याचं आठवलं. पण इंग्लीशमध्ये असल्यामुळे मी "कांडे" असा वाचला होता. म्हणून तर मला कांडेकराच्या घरी पार्टीला जायचं लक्षात आलं.
इतर मित्र आपण कसे बायकोला फसवून, ऑफिसातली कामाची कारणं सांगून पार्टीला आलो असल्याचं सांगत होती. मी मात्र माझ्या बायकोने स्वतःच पार्टीला जाण्यासाठी रिमायंडर मोबाईल मध्ये कसा टाकला हे सांगून सगळ्यांना गार करून टाकले होते. किती हेवा वाटला होता त्यांना माझा! घरी आल्यावर बायकोचा एक खोल मुका घेऊन त्याची परतफेड करायचा मी विचार करत होतो आणि ही बया आता म्हणते तो रिमायंडर 'कांडे' असा नसून 'कांदे' असा होता. रिमायंडर सुध्दा काय लिहीला, नुसता 'कांदे'. त्यातून काय अंदाज लावणार? "कांदे आणा" म्हाणून तरी लिहायचा होता. तो काय मी "कांडे आणा" असा वाचून कांडेकराला चहापाण्याला घरी आणणार होतो? कि त्याला 'कांडेपोहे' खायला घालणार होतो? मीच मनातल्या मनात केलेल्या विनोदावर मला बायको समोर फिदी फिदी हसायला आलं आणि बायको आणखीनच चिडली.
दोन किलो कांद्यांसाठी तीन मजले खाली उतरून दुकानापर्यंत चालत जाणे आणि परत ते ओझं घेऊन तीन मजले चढणं! छ्या, जमणार नाही! शिवाय काल पार्टी करून घरी येताना मी एका पायात माझं लाल चप्पल आणी दुसर्‍या पायात कांडेकराचं काळं चप्पल घालून आलो होतो. त्यामुळे सदरा लेंगा आणि त्या खाली ऑफिसध्ये घालायचं बूट घालून किंवा ऑफिसमध्येच घालायचे कपडे घालून जावं लागलं असतं. ते सुद्धा उपाशी पोटी.
वास्तविक मी झोपेतून उठण्या आगोदर ती कांदे घेऊन येऊ शकली असती. तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे आमचं. आणि फक्त दोन किलो कांदे. पाच दहा मिनिटांचं काम. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला. काय बोलणार आपण?
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि कांडेकरच घरात आला.
"माझं चप्पल दे रे. काय लेका स्वतःचं चप्पल ओळखंना व्हय तुला?", कांडेकर, "येताना मंडईतूनच आलो कांदे बटाटे स्वस्त मिळतात म्हणून चार किलो कांदे आणलेत, उगाच एवढ्या तेवढ्या कामासाठी बायकोची फरपट कशाला?"
च्यायला या कांडेकराच्या मी! गप्प चप्पल घेऊन जायचं तर नको ते बोलून बसला.
आता ही संधी सोडली तर बायको कसली?
"भाऊजी, यांनी सुद्धा काल पोतं भरून कांदे आणलेत मंडईतून माझ्यासाठी. आता महिनाभर तरी काळजी नाही. कांदेपोहे आणू का? थोडे खाऊनच जा." आतून आवाज आला.
नको नको म्हणत तो हुशार कांडेकर सटकला.
त्या टोमण्याची भरपाई मी वरचढ, आणखी तिखट टोमणा मारून केली. पण त्यासाठी दोन दिवस गेले. आणि तोपर्यंत बायको सगळं विसरून गेली आणि मी टोमणा मारल्यानंतर बावळटासारखी काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेली. असली ही विसरभोळी आणि ही म्हणे माझ्या विसरभोळेपणावर बोलणार.
पण आता हिचं तोंड बंद करायलाच पाहिजे होतं. नाहीतर दिवसभर टोमणे ऐकायला लागले असते.

एक असं उत्तर द्यावं कि बस्स रे बस्स!
"हे बघ मला अशा फुटकळ कामासाठी पाठवणं म्हणजे शिवरायांच्या भवानी तलवारीने कांदे सोलण्यासारखं आहे. शेळीसारख्या क्षुद्र प्राण्याची शिकार करायला सिंह जात नाही. ते काम सिंहीणींनी करावं. सिंह आपला पडून असतो. म्हैस, रेडा, रानगव्यासारख्या भारीभक्कम सावजाची शिकार करायची असेल तरच सिंह शिकारीत सहभाग घेतो".
एक ऐतिहासिक आणी एक जीवशास्त्रीय उदाहरण देऊन मी बायकोचा सपशेल पराभव केला होता. तिला तोंडघशी पाडलं होतं. आता मुकाट्याने कांदे आणायाला जाईल.

पण एका क्षणाचाही विलंब न लावता बायकोही तडक म्हणाली,
"पण जंगलातील सिंह आणि सर्कशीतला सिंह यामध्ये फरक असतो. जंगलातील सिंह जिंवत रेड्यासरख्या मोठ्या जनावराला सहज मारतो. पण सर्कशीतल्या मरतुकड्या सिंहाला मारून टाकलेली कोंबडीसुद्धा स्वतःहून खाता येत नाही. त्याला ती कापून, सोलून, तु़कडे करून दिली तरच तो बिचारा खाऊ शकतो. आणि शिवरायांचं म्हणाल तर त्यांनी सईबाईला 'जा गं दुकानातून दोन किलो गनिमांना घेउन ये मला त्यांना भवानी तलवारीने हरवून स्वराज्य स्थापन करायचं आहे' असं नाही म्हटलं"

मला ती काय बोलली काही कळलं नाही. सगळंच असंबध्द वाटलं. पण 'सर्कशीतला सिंह','मरतुकडा', 'बिचारा' असे दोनचारचं शब्द समजले. पण वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आता या क्षणीच, तडकाफडकी खमंग उत्तर तिला द्यायला हवं. नाही तर ती उद्यापर्यंत सगळं विसरून जाईल आणि माझ्या विचार करून दिलेल्या टोमण्याकडे ती दुर्लक्ष करण्याची शक्यता होती.

मी मोठ्या आवाजात म्हणालो,
"पण.......शिवाजीमहाराज......आणि....म्हणजे....कांदे........मरतुकडी कोंबडी.........शिवाय तु म्हणालीस ते गनिम........"
माझे शब्द अडखळत होते. काही म्हणा बायकोने तडक दिलेल्या उत्तरामुळे थोडासा गोंधळलो होतो हे मी मोठ्या मनाने मान्य करतो. पण थोडासाच बरं का. म्हणजे दोन किलो कांद्यांना जर कुणी 'पुर्ण गोंधळलेला' म्हणत असेल तर साधारण दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढाच. म्हणजे शंभर ग्रॅम.
पण बायकोला विचार करायला वेळच न देता मी खेकसलो,
"ते काही असू दे,मला पुर्ण मरतुकडी कोंबडी पाहिजे म्हणजे पाहीजे". दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढ्या गोंधळामुळे माझ्या तोंडून कांडेकराने आणलेल्या चार किलो कांद्यांएवढे चुकीचे शब्द निघाले होते. पण पुढ्यचाच क्षणी मला माझी चु़क लक्षात आली. पण पुढे काय बोलावं हे न कळल्यामुळे मी बायकोच्या तोंडाकडे टकामका पाहत राहिलो. बहूधा बायकोसुद्धा गोंधळली असावी. तिच्या तोंडून एक मोठ्ठा "काय???" निघाला आणि मग "कठीण आहे" असा काहीसा भाव तोंडावर आणून ती किचनमधे आपल्या कामाला निघून गेली. मी मग किचनच्या दारातूनच पाठमोर्‍या उभ्या असलेल्या बायकोवर ओरडलो,
"कांदेपोहे पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणायचं होतं मला"
"कांदे आणा मग बनवून देईन"

"एक काम कर. ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याची यादी कर आणि दे माझ्याकडे नतंर एकेक गोष्टी सांगायच्या नाहीत आधीच सांगून ठेवतो."
"मी वस्तू सांगते तुम्ही बनवा यादी."
अरे म्हणजे हा तर आळशीपणाचा कळस झाला! मी तीन मजले उतरून काही अंतर चालत जाऊन एवढं सगळं सामान आणायला चाललोय आणि हिला फक्त यादी बनवायचा कंटाळा? जाऊ दे कुणी वाद घालावा?
"बोलत रहा"
दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, पोहे अर्धा किलो, एक तेलाचा डबा .....
दरवाज्यात उभं राहून मी ओरडलो.
"पिशवी आण गं इकडे"
बायकोने पिशवी अक्षरशः कोंबली माझ्या हातात.
कोण बरं म्हणालं होतं तुला बायको फार गुणी लाभली आहे म्हणून? हां, माझी आत्या म्हणाली होती तसं. ती असायला हवी होती आता इथं मग कळलं असतं. नाहीतर एकदा मोबाईलवर हे सगळं रेकॉर्ड करून दाखवतो आत्याला. मग बघू काय म्हणते?
बरं जाऊ दे माझा मोबाईल कुठे आहे? विसरला वाटतं घरात. बरं झालं आताच आठवलं नाहीतर बायकोला अजून एक संधी मिळाली असती काहीतरी बोलायला.
परत मागे येऊन बेल वाजवली.
तिला कसं कळंलं कोण जाणे पण बायको दारातच माझा मोबाईल घेऊन उभी होती. पुन्हा तिने तो माझ्या हातात कोंबला.
"तुला काय वाटलं मी मोबाईल घ्यायचा विसरणार? " मी पुन्हा दरडावलो.
"बरोबर आहे", बायको हळू आवाजात म्हणाली. बहूधा तिने मघार घेतली असावी.
मी पुन्हा तोर्‍यात पाठ वळवून निघालो.
"अहो" म्हणून पुन्हा हाक ऐकू आली.
"जाताना हे तुमचं पैशाचं पाकीट तेवढं घेऊन जा. दुकानदार सामान देताना पैसे सुद्धा घेतो म्हणे".
"बरं बरं" असं पुन्हा ठसक्यात म्हणून मी पुन्हा पाठ फिरवली.
"अहो" म्हणून पुन्हा हाक आली.
"जाताना ती सामानाची यादी बनवलीत ती सुद्धा घेऊन जा."
मी परत फिरलो.
"अहो" पुन्हा हाक आली.
मी मागे न पाहताच तोर्‍यात पुढेच निघालो.
"जाताना शर्टाची बटणं वरखाली झालीत ती ठीक करा"
मी मागे न पाहताच शर्टाची बटणं व्यवस्थित केली.
"आणि शेवटी एका पायात तुमचं आणि दुसर्‍या पायात माझं चप्पल घातलंत ते ठिक करा"
दोन क्षण शांततेत गेले आणि नंतर ती फिदी फिदी हसायला लागली. मी सुद्धा मग तिच्या हसण्यात सामिल झालो. रविवारची सकाळ भांडण्यातून सुरू झाली आणि हसण्यात संपली.

विनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

1 Jun 2010 - 2:40 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2010 - 2:45 pm | llपुण्याचे पेशवेll

कूल. मस्तं कथा. पण येवढे करून कांदे आणलेत का ते सांगा. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

मेघवेडा's picture

1 Jun 2010 - 5:18 pm | मेघवेडा

छान लिहिलंय.. असंच आणखी येत राहू द्या!! आणि कांडे.. आपलं कांदे आणलेत का शेवटी?

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2010 - 5:20 pm | निखिल देशपांडे

मस्त खुसखुशीत लेखन..
पोहे खाल्ले का त्यादिवशी

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अनिल हटेला's picture

1 Jun 2010 - 5:29 pm | अनिल हटेला

हलका फुलका लेख !!

अजुन लिहा....:)

कांदोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

स्वाती२'s picture

1 Jun 2010 - 5:35 pm | स्वाती२

मस्त लिहिलयं.

नील_गंधार's picture

1 Jun 2010 - 5:39 pm | नील_गंधार

धमाल लेखन.

:)

(कांदेपोहेप्रेमी) नील.

अमोल केळकर's picture

1 Jun 2010 - 6:18 pm | अमोल केळकर

मजा आली वाचून

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छोटा डॉन's picture

2 Jun 2010 - 8:31 am | छोटा डॉन

धमाल लेखन, मजा आली वाचुन असेच म्हणतो.
खुसखुषीत झाले आहेत कांदेपोहे :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रदीप's picture

1 Jun 2010 - 6:31 pm | प्रदीप

खुसखुशीत; आवडले.

भारद्वाज's picture

1 Jun 2010 - 6:31 pm | भारद्वाज

मस्त मस्त मस्त मस्त
त्या कांडेकराने घेतलेल्या ४ किलोतले १ किलो उधार घ्यायचे होते की राव....
जय महाराष्ट्र

प्रभो's picture

1 Jun 2010 - 6:58 pm | प्रभो

लै भारी!

रामदास's picture

1 Jun 2010 - 7:20 pm | रामदास

झाली की दुपारपण चांगली जाते.
गुजराथीत त्याला बपोरीया म्हणतात.
छोटासा पण मजेदार लेख.

मेघवेडा's picture

1 Jun 2010 - 7:42 pm | मेघवेडा

बपोरीया

=)) =))

प्राजु's picture

1 Jun 2010 - 7:33 pm | प्राजु

हलका फुलका.. मस्त लेख!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2010 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते

खुसखुशीत आणि सराईत लेखन. मस्त.

बिपिन कार्यकर्ते

पांथस्थ's picture

1 Jun 2010 - 8:04 pm | पांथस्थ

खोल मुका

हा लय भारी शब्द!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

चतुरंग's picture

1 Jun 2010 - 8:08 pm | चतुरंग

खमंग लेखन! ;)

(मुकेश बपोरिया)चतुरंग

रामदास's picture

1 Jun 2010 - 11:58 pm | रामदास

नाही हो मुकेस बपोरीया.

दत्ता काळे's picture

1 Jun 2010 - 8:33 pm | दत्ता काळे

"जाताना हे तुमचं पैशाचं पाकीट तेवढं घेऊन जा. दुकानदार सामान देताना पैसे सुद्धा घेतो म्हणे". =))

नावातकायआहे's picture

1 Jun 2010 - 9:03 pm | नावातकायआहे

>>"कांदे नाहीत? रविवार म्हणून फिरायला गेलेत का?"

=))

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 9:13 pm | नितिन थत्ते

मस्त लेख. खुसखुशीत.

स्वगतः त्या सावरकर गांधी प्रकर्णात वाचायचाच राहिला.

नितिन थत्ते

मदनबाण's picture

1 Jun 2010 - 9:25 pm | मदनबाण

मस्त लेख... :)

मदनबाण.....

Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower

शिल्पा ब's picture

1 Jun 2010 - 10:21 pm | शिल्पा ब

मस्त खुसखुशित लेख...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

1 Jun 2010 - 11:59 pm | Pain

हेहेहे :)) :)) :))

मस्त आहे

लवंगी's picture

2 Jun 2010 - 7:29 am | लवंगी

वाचताना खुदुखुदु हसू येत होत... परत्-परत वाचला
अनुदिनी पण वाचली.. छान लिहिता..

दिपक's picture

2 Jun 2010 - 4:47 pm | दिपक

जाम मजा आली वाचताना.. 'कांडे' 'कांदे' मस्तच.. :-)

अजुन येउद्यात...

समंजस's picture

2 Jun 2010 - 5:03 pm | समंजस

झक्कास झालायं लेख!!! :)

वास्तविक मी झोपेतून उठण्या आगोदर ती कांदे घेऊन येऊ शकली असती. तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे आमचं. आणि फक्त दोन किलो कांदे. पाच दहा मिनिटांचं काम. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला. काय बोलणार आपण?
-------------------------------------------------------
एकदम पटलं (किती हा बायकांचा आळस) :D

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Jun 2010 - 5:15 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त लिहीले आहे.वाचताना मजा आली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2010 - 5:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास!

(आळशी) अदिती

मी-सौरभ's picture

2 Jun 2010 - 7:46 pm | मी-सौरभ

बायकोची चप्पल तुमच्या पायात बसली कशीच????

:?

-----
सौरभ :)

अरुंधती's picture

2 Jun 2010 - 10:08 pm | अरुंधती

कांदेपोहे आवडले! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आवशीचो घोव्'s picture

3 Jun 2010 - 12:02 am | आवशीचो घोव्

मजा आली वाचून

राजेश घासकडवी's picture

3 Jun 2010 - 1:13 am | राजेश घासकडवी

पण इंग्लीशमध्ये असल्यामुळे मी "कांडे" असा वाचला होता. म्हणून तर मला कांडेकराच्या घरी पार्टीला जायचं लक्षात आलं.

शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला.

वा, झकास लेख. आळशीपणा व विसराळूपणा याला डिनायल सारखा सुंदर साथीदार नाही.

भानस's picture

3 Jun 2010 - 8:36 am | भानस

लेख. मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2010 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास लेखन. :)

-दिलीप बिरुटे

रम्या's picture

3 Jun 2010 - 2:12 pm | रम्या

या काल्पनिक किस्स्यात थोडा बदल केला आहे.

आम्ही येथे पडीक असतो!

तुमची रविवारची सकाळ मस्त खुसखुशीत आहे . पण वरती सौरभ ने विचारले ली शंका माझ्याही मनात आली . तुमच्या सौं ची चप्पल तुमच्या पायात बसलीच कशी ?? :?
~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फ्लोटर्स असतील तर शक्य आहे! चुकून मी पण हेच केलं होतं, पण दोन पावलं चालल्यावर पायालाच जाणवलं! अर्थात, नवरा माझ्यापेक्षा जास्त अ‍ॅबसेंट माईंडेड असल्यामुळे दोघंही एकत्र बसून हसलो.

अदिती

विजय_आंग्रे's picture

10 Oct 2023 - 5:20 pm | विजय_आंग्रे

मस्त खुसखुशीत लेख!

निमी's picture

11 Oct 2023 - 7:32 am | निमी

भारीच लेख..फारच आवडली लेखनशैली.. छोटेसे कथाबीजही कसे खुलवावे फुलवावे याचे छान सादरीकरण.

पाटीलभाऊ's picture

11 Oct 2023 - 11:27 am | पाटीलभाऊ

खुसखुशीत लेख.