ललीमावशी...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 May 2010 - 1:11 pm

काल माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची, काल गेली!

ललीमावशी!

ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!

ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..

शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे..

सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..

मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.

बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्‍या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!

श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्‍यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..

कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची! :)

उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..

आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!

ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण! :)

असो..

'कशी झोक्कात चालली कोळ्याची पोर..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..

चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...

पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

26 May 2010 - 1:17 pm | विनायक पाचलग

दुर्दैव असे आहे की
असे काही अभिजात क्षण ,गोष्टी ,घटना आमची नवी पिढी हरवत आहे..
पण एकदम लाईव्हली व्यक्तीचित्रण....
बातमी खुप जणांनी दिली ,पण नक्की हे व्यक्तीमत्व काय होते हे तुम्ही सांगितलेत
खुप खुप आभार

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

मृगनयनी's picture

26 May 2010 - 2:09 pm | मृगनयनी

समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!

हे वाक्य काळजाला जास्त भिडलं! :|
___________________

तात्या.... ललिता'जींबद्दल आमच्यासारखे काही लोक पूर्णपणे अज्ञानी होतो... किमान त्यांच्या मृत्यू'मुळे का होईना... पण ललिता'जींबद्दल आम्हाला माहिती मिळाली... तीही आपल्यासारख्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून..... त्याबद्दल आभार!..
____________________

सर्व दु:खांवरती " काळ " हे मोठे औषध आहे.....
____________________

- मृगनयनी

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आनंदयात्री's picture

26 May 2010 - 1:46 pm | आनंदयात्री

तात्या बर्‍याच दिवसांनी व्यक्तिचित्र लिहले खरे पण दुर्दैवी योगावर.
लेख छान झालाच आहे हे वेगळे सांगणे न लगे, आठवणी फारच रम्य आहेत.

स्वाती दिनेश's picture

26 May 2010 - 2:24 pm | स्वाती दिनेश

तात्या बर्‍याच दिवसांनी व्यक्तिचित्र लिहले खरे पण दुर्दैवी योगावर..
असेच म्हणते,
ललिताबाईंच्या आत्म्याला सद्गती मिळो ही प्रार्थना.
स्वाती

निखिल देशपांडे's picture

26 May 2010 - 2:38 pm | निखिल देशपांडे

तात्या बर्‍याच दिवसांनी व्यक्तिचित्र लिहले खरे पण दुर्दैवी योगावर..

असेच म्हणतो...

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

नंदन's picture

26 May 2010 - 2:49 pm | नंदन

स्वातीताईशी सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धमाल मुलगा's picture

26 May 2010 - 9:13 pm | धमाल मुलगा

योगच असा, की तुम्ही बर्‍याच दिवसांनी हातखंडा असलेल्या व्यक्तिचित्राला रेखाटलं, तरी त्याला 'छान लिहिलंय' असं तरी कसं म्हणु? :(

ललीताबाईंना श्रध्दांजली.

प्राजु's picture

27 May 2010 - 1:34 am | प्राजु

हेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

धनंजय's picture

27 May 2010 - 11:20 pm | धनंजय

श्रद्धांजली

ऋषिकेश's picture

26 May 2010 - 2:00 pm | ऋषिकेश

ह्या अश्या वर्णनाने ललिताबाईंना गेल्यानंतरही जिवंत केलेत इतकेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सुमीत भातखंडे's picture

26 May 2010 - 2:17 pm | सुमीत भातखंडे

छानच झालाय.

ललिताबाईंना मनःपुर्वक आदरांजली!!!

मेघवेडा's picture

26 May 2010 - 2:20 pm | मेघवेडा

छान लिहिलंय!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रसिद्ध असोत वा अप्रसिद्ध, जवळची माणसं गेली की त्रास होतोच! तात्या, तुमच्या लिखाणामुळे ललिताबाई नव्हे, तात्यांची मावशी गेल्याचं दु:खही दिसलं.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2010 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी... तात्या, काल ललिताबाई गेल्याचं कळलं आणि पहिली तुझीच आठवण आली. त्यांच्याबद्दल खुलासेवार प्रथम तुझ्याच कडून कळलं होतं. तुझ्या व्यक्तिगत दु:खाबद्दलही हळहळ वाटली.

ललिताबाईंना श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

26 May 2010 - 4:52 pm | गणपा

अदितिशी सहमत.
_/\_
भावपुर्ण श्रद्धांजली.

स्वाती२'s picture

26 May 2010 - 7:31 pm | स्वाती२

+२
सहमत!

संदीप चित्रे's picture

26 May 2010 - 10:54 pm | संदीप चित्रे

आणि धम्या म्हणाला त्याप्रमाणे 'छान लिहिलंय' असंही म्हणता येत नाही :(
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मिसळभोक्ता's picture

27 May 2010 - 12:17 am | मिसळभोक्ता

तात्या, तुमच्या लिखाणामुळे ललिताबाई नव्हे, तात्यांची मावशी गेल्याचं दु:खही दिसलं.

अगदी बरोबर.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

भोचक's picture

26 May 2010 - 2:44 pm | भोचक

तात्या, बाबूजींच्या मागे काहीशा झाकोळून गेलेल्या ललिताबाईंची जणू तुम्ही थेट आम्हाला घरात नेऊन भेट घडविल्याचा फील आला.

तीट लावतो- 'कशी झोक्कात चालली कोळ्याची पोर' हे गाणं आशाबाईंचं की ललिताबाईंचं?

(भोचक)
जाणे अज मी अजर

विसोबा खेचर's picture

26 May 2010 - 6:50 pm | विसोबा खेचर

'कशी झोक्कात चालली कोळ्याची पोर' हे गाणं आशाबाईंचं की ललिताबाईंचं?

माझ्या माहितीप्रमाणे ध्वनिमुद्रण आशाताईंचंच आहे, परंतु ललीमावशीही हे गाणं खूप छान म्हणायची, आवडीने म्हणायची. माझी अशीही माहिती आहे की देसाईंसाहेबांनी प्रथम हे गाणं ललीमावशीकरताच बांधलं होतं परंतु काही कारणांमुळे हे गाणं ऐनवेळेस आशाताईंनी गायलं. अर्थातच फार सुंदर..

माझ्या कानी मात्र ललीमावशीचेही सूर आहेत..

तात्या.

पक्या's picture

26 May 2010 - 8:51 pm | पक्या

लेख छान लिहीलाय. ललिताबाईंना विनम्र श्रध्दांजली.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2010 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, छान लेख. ललिताबाईंना विनम्र श्रद्धांजली....!

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

26 May 2010 - 10:50 pm | शिल्पा ब

+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रभो's picture

26 May 2010 - 9:12 pm | प्रभो

भावपुर्ण श्रद्धांजली.

भानस's picture

26 May 2010 - 11:16 pm | भानस

तात्या बर्‍याच दिवसांनी व्यक्तिचित्र लिहले खरे पण दुर्दैवी योगावर..
असेच म्हणते,
ललिताबाईंच्या आत्म्याला सद्गती मिळो ही प्रार्थना व भावपुर्ण श्रध्दांजली.

हुप्प्या's picture

27 May 2010 - 12:22 am | हुप्प्या

तात्या लेको तुम्ही म्हणजे भलतेच भाग्यवान आहात. तुम्हाला मराठीतील दिग्गज मंडळींचा इतका निकटचा सहवास लाभला.
काळाच्या ओघात अशी अनेक थोर माणसे आपल्यातून जाताना दिसतात तेव्हा तुमच्यासारख्या लोकांनी लिहिलेल्या आठवणीच आम्हाला आधार वाटतात.

तुमचा आभारी आहे. आणि माझीही कै. ललिताबाई फडके यांना श्रद्धांजली.

स्पंदना's picture

27 May 2010 - 9:02 am | स्पंदना

असेच म्हणते...खुप छान लिहिलय तुम्ही...

कै. ललिताबाई फडके यांना श्रद्धांजली.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

कै. ललिताबाई फडके यांना श्रद्धांजली.
वेताळ

विसोबा खेचर's picture

28 May 2010 - 10:52 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणा-या सर्वांचे आभार..

तात्या.