अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
16 May 2010 - 12:41 am

जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

आणि यातुनच बंगालमध्ये बॉम्बचे आगमन झाले. पहिला दणका नारायणपूर येथे गव्हर्नरच्या आगगाडीला उडविण्यासाठी तर दुसरा दणका अत्याचारी न्यायाधीश किंग्जफोर्ड च्या बग्गीवर (दुर्दैवाने केनेडी कुटुंबातील स्त्रीया असलेली बग्गी अनवधानाने टिपली गेली). डिसेंबर १९०७ चा नारायणपूरचा बॉम्बस्फोट व पाठोपाठ एप्रिल १९०८ मधील मुझप्फरपूरचा दुसरा स्फोट यामुळे सरकार खवळले आणि खरेतर खडबडुन जागेही झाले. हुतात्मा खुदिराम बोस फासावर गेला, हुतात्मा प्रफुल्ल चाकी पोलिसांच्या हाती सापडण्या आधीच हुतात्मा झाला. ते दोघे प्रत्यक्ष कर्ते तर गेले, पण हे कृत्य एकट्या दुकट्या पोरांचे नाही, त्यामागे मोठी संघटना असलीच पाहिजे या निष्कर्षाने सरकार हादरले. इतके संहारक, शक्तिशाली बॉम्ब आले कुठुन? नक्कीच कलकत्त्यात प्रशिक्षित व तरबेज मंडळींनी बॉम्बचा कारखाना काढला असला पाहिजे असा तर्क सरकारने केला व या प्रकाराची पाळेमुळे खणुन काढायचा चंग बांधला. आणि सरकारचा अंदाज चुकीचा नव्हता! माणिकतल्ला, ३२ मुरारीपुकुर मार्गे येथे खरोखरच बॉम्ब चे जन्मस्थान होते.

पिसाळलेल्या पोलिसांनी आकाश पिंजले, पाणी ढवळले व जमीन खणुन काढली व अखेर सरकारच्या पायाखालची जमीन सरकेल अशी माहिती सरकारच्या हाती आली. अटकसत्र सुरू झाले आणि बारिंद्र कुमार घोष, अरविंद घोष, उल्लासकर दत्त, बाळकृष्ण हरी काणे, हेमचंद्र दास, हृषिकेश कांजिलाल, उपेंद्र नाथ बॅनर्जी, बिभुति भूषण रॉय , बिरेंन्द्र चन्द्र सेन, सुधीर कुमार सरकार, इन्दुभूषण रॉय, इन्द्र नाथ नन्दी, अबिनाशचन्द्र भट्टाचारजी, शैलेन्द्र नाथ बोस, परेश चन्द्र मलिक, शिशिर कुमार घोष, निरपद रॉय, अशोक चन्द्र नन्दी, कन्हाइलाल दत्त, सत्येन्द्रनाथ बोस आदि एकूण ३७ जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला व मे १९०८ मध्ये अलिपूर अभियोग उर्फ माणिकतोळा अभियोग उभा राहिला ज्याने सर्व हिंदुस्थानात व बंगालच्या घराघरात क्रांतीची ज्योत पेटली.

या अद्वितिय अभियोगाला अनेक पैलु आहेत. सर्वात पहिला पैलु म्हणजे या क्रांतीकार्यातील बंगाल व महाराष्ट्राचं 'अतूट नातं'! पूर्वेत फुटलेल्या दारुगोळ्याची वात पश्चिमेत होती! पश्चिम म्हणजे दोन्ही अर्थांनी. ते असे की या क्रांतीकारकांपैकी हेमचंद्र दास हे १९०६ साली आपले घरदार विकुन पैसे जमा करून विलायतेस 'यांत्रिकी शास्त्राचे' अध्ययन करण्यासाठी म्हणून गेले. प्रत्यक्षात मात्र ते बहुधा स्फोटके व शस्त्रांचा अभ्यास करण्यासाठीच गेले असावेत. अर्थातच इग्लंडला पोहोचताच हेमचंद्र दास यांनी स्वा. सावरकरांची भेट घेतली व आपला हेतू प्रकट केला. स्वा. सावरकरांनी हेमचंद्र दास, मिर्झा अब्बास व सेनापती बापट यांना पॅरिसला धाडुन दिले व तिथे त्यांची गाठ त्यांनी पॅरिस येथे वास्तव्य करून असणाऱ्या 'सफ्रान्स्की' या रशियन क्रांतीकारकाशी घालुन दिली. तेथे सफ्रान्स्की कडुन त्यांना उपयुक्त माहिती, बॉम्ब बनविण्याची कृती व संबंधीत कागदपत्रे मिळाली. एक अडचण अशी होती की सफ्रान्स्कीने दिलेली काही पुस्तके रशियन भाषेत होती. सेनापती बापटांनी त्यांच्या अ‍ॅना वा बर्लिनस्थ मैत्रिणीकडुन या पुस्तकांचे ईंग्रजी भाषांतर करवुन घेतले व त्याच्या अनेक प्रती केल्या ज्यापैकी एक स्वा. सावरकर यांना देण्यात आली. १९०७ च्या डिसेंबर मध्ये नारणपूर स्फोटानंतर हिंदुस्थानातील अधिकाऱ्यांनी ईंग्रज पोलिसांना पॅरिसच्या पोलिसांकडुन तेथे वास्तव्य करून असलेल्या रशियन क्रांतीकारकांकडे कोण हिंदुस्थानी तरूण येतात यावर पाळत ठेवण्यास सांगितली. मात्र तोपर्यंत हेमचंद्र व सेनापती बापट आदी सर्वजण तिथुन निघुन गेले होते. अश्या पद्धतिने बॉम्ब विद्या कलकत्त्यात आली! प्रत्यक्ष सेनापती बापट हे स्वत: माणिकतल्ल्याला जाऊन तेथील बॉम्ब निर्मिती पाहुन आले होते. किंग्जफोर्ड वधाच्या प्रयत्नानंतर हुतात्मा खुदिराम बोस वायनी स्थानकावर पोलिसांच्या हाती सापडले तर त्याचे सहकारी हुतात्मा प्रफ़ुला चाकी यांना मोकामाघाट स्थानकावर पोलिसांनी घेरले असता त्यांनी आपल्या खिशातील ब्राउनिंग पिस्तुल चपळाईने काढुन स्वत:वर गोळी झाडुन घेते बलिदान दिले. हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी 'ब्राउनिंग' बनावटीचे पिस्तुल वापरले होते. सेनापती बापट यांचा कलकत्त्यातील वावर व फेब्रुवारी १९०९ मध्ये स्वा. सावरकर यांनी हिंदुस्थानात धाडलेली पिस्तुलेही त्याच बनावटीची होती हे लक्षात घेता कदाचित हुतात्मा प्रफुला चाकीकडचे पिस्तुल स्वा. सावरकरांच्या हस्ते पाठविले गेले असावे अशा तर्कास वाव आहे. महाराष्ट्राचे नाते सांगणारा आणखी एक धागा म्हणजे ३७ अभियुक्तांपैकी एक - 'बाळकृष्ण हरी काणे' हे नाव. ही मराठमोळी व्यक्ति कोलकत्त्यास कशी व कधी पोहोचली, क्रांतीकार्यात कशी सामिल झाली या विषयी काही माहिती उपलब्ध नाही, मात्र या सरकारला हादरविणऱ्या क्रांतिकार्यात एक मराठी तरुणही होता याचा अभिमान वाटतो.

हे नाते तसे दिर्घकालीन ठरले. ते अशा अर्थाने की अखेर निकाल व त्याला आव्हान दिल्यावर आलेल्या निकालांती बारिंद्रकुमार घोष, उल्लासकर दत्त, इन्दुभुषण रॉय इत्यादी अनेक अभियुक्त हे अंदमानात काळ्यापाण्यावर जन्मठेपेला गेले व त्याच कालखंडात स्वा. सावरकर हेसुद्धा अंदमानात जन्मठेप भोगत होते. इंदुभूषण रॉय व उल्लासकर दत्त हे जेव्हा अमानुष छळामुळे पिचुन गेले व नैराश्यापोटी आत्महत्येला प्रवृत्त झाले तेव्हा. स्वा. सावरकरांनी इंदुभूषण यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण अखेर इंदुभूषण यांनी गळफास लावुन आत्महत्त्या केली. भयानक छळ,१०७ ताप असताना ग्लानीतही काम करायला उल्लासकर दत्त यांना भाग पाडले गेले व ते उन्मादावस्थेत जाताच त्यांना वीजेचे झटके देण्यात आले अखेर त्यांना दोन वर्षे मानसिक रुग्ण म्हणुन इस्पितळात ठेवले गेले. या कालावधीत उल्लासकर दत्त यांना अनेकदा वेडाच्या भरात आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले व बहुधा त्याचा ठपका स्वा. सावरकरांवर ठेवुन त्यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही वाचनात आले आहे. अर्थात उल्लासकर दत्त पुढे सावरले व १९२० साली त्यांची सुटका झाली. मात्र त्या भयाण यातना देणारा तुरुंगवास उल्लासकर दत्त यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करु शकला नाही, त्यांना १९३१ साली पुन्हा अटक झाली व १८ महिन्यांचा कारावास घडला.

या अभियोगाचा दुसरा पैलु म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर राजद्रोहाचा व सरकार विरुद्ध सशस्त्र संग्रामासाठी दाखल गेलेला हा पहिला अभियोग. याची व्याप्ति खरेच फार मोठी होती. सर्व सदतीस अभियुक्तंवर खालील कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले गेले

कलम १२१ - सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे, पुकारण्याचा प्रयत्न करणे वा तसे करण्यास प्रवृत्त करणे

कलम १२१ अ - वरील कृत्यास्तव कट व गुन्हेगारी स्वरुपाचा प्रस्ताव रचणे

कलम १२२ - सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी शस्त्रे/ दारुगोळा तयार / जमा करणे

कलम १२३ - सरकारविरोधी कटाची माहिती महत्वाची असून व तिचे परिणाम सरकारला घातक आहे हे ज्ञात असूनही अशी माहिती गुप्त ठेवणे

कलम १२४ - राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल वा राज्यप्रमुख यांच्यावर गुन्हेगारी मार्गाचा अवलंब वापरुन त्यांना त्यांच्या कार्याधिकारापासून वंचीत करणॆ वा त्यांच्यावर दहशत बसविणे.

कलम १४३ - बेकायदेशीर रित्या गुप्त कार्य करणाऱ्या संघटनेचे सदस्य असणे

कलम १४५ - बंदी घातलेली संघटना सरकर उलथुन टाकणंयासाठीच स्थापलेली आहे/ कार्यरत आहे हे माहित असतानाही अशा संघटनेचे सद्स्यत्व स्विकारणे वा अबाधित राखणे.

कलम १५० - बंदी घातलेल्या संघटनेसाठी सदस्य भरती करणे , भरती होण्यास प्रोत्साहन देणे

कलम - १५७ बंदी घतलेल्या संघटनेच्या सदस्यास आश्रय देणे

एकुण सर्व कलमांचा मतितार्थ - ’सरकार उलथुन टाकण्यासाठी सशस्त्र क्रांती’ चा अंगिकार करून देश दास्यमुक्त करणे. आणि जुलुमी सत्तेविरुद्ध युद्धास सज्ज झालेल्या क्रांतीकारकांवर असा अभियोग अशा कलमांखाली दाखल करणे हे जणु त्या जीवावर उदार झालेल्या ज्वलज्जहाल क्रांतीकारकांच्या देशभक्तिला जणु सरकारने दादच दिली. परिणाम सर्वांनाच माहित होता. यशस्वी झालो तर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा उभारण्यास अधिकाधिक सैनिकांचा सहभाग आणि अपयशी ठरलो तर वीरमरण वा नरकयातना, आणि या दोन्हीसाठी बंगालचे युवक हसतमुखाने तयार होते.

या अभियोगाला न्य. बर्लि यांच्या न्यायासनासमोर दाखल करण्याची कारवाई ७६ दिवस चालली.

हा अभियोग सत्र न्यायालयात १३१ दिवस चालला

निर्णयाच्या आव्हान अर्जाची सुनावणी ४७ दिवस चालली. यात दोन न्यायाधीशांचे दुमत झाल्यने तिसऱ्या न्यायाधीशापुढे २० दिवस सुनावणी झाली

या अभियोगात ’प्राथमिक माहिती अहवाल १९ मे १९०८ रोजी सादर करण्यात आला तर निकालपत्र ६ मे १९०९ रोजी वाचले गेले.

या अभियोगाचे कामकाज सामावलेल्या एकुण दस्त ऐवजांची संख्या ४००० हुन अधिक होती आणि पुराव्यादाखल सादर करण्यात आलेल्य वस्तू म्हणजे शस्त्रे, हत्यारे, उपकरणे व बॉम्ब ईत्यादींची संख्या चारशेच्या आसपास होती तर दोनशे हून आधिक साक्षी नोंदविल्या गेल्या.

या खटल्याच्या मूळ निकालपत्रात बारिंद्रकुमार व उल्लासकर यांना देहांताची शिक्षा फर्मावण्यात आली. हेमचंद्र दास, उपेन्द्र नाथ बॅनर्जी, बिभुति भुषण सरकार, हृषिकेश कान्जिलाल, बिरेंद्र चंद्र सेन, सुधिर कुमार घोष, इंद्रनाथ नंदी, अबिनाश चंद्र भट्टाचारजी, शैलेंद्र नाथ बोस व ईंदुभूषण रॉय यांना काळ्यापाण्यावर जन्मठेप; परेशचंद्र मौलिक, शिशीरकुमार घोष व निरपद रॉय यांना दहा वर्षे काळेपाणी; अशोकचंद्र नंदी, बाळकृष्ण हरी काणे, सुशिलकुमार सेन यांना सात वर्षे काळे पाणी फर्मावले गेले.

या निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली गेली. आणि आरोपीतर्फे सातव्या दिवशी निकालाविरुद्धचा अर्ज वकिलांनी दाखल केला. हे वकिल म्हणजे देशबंधु चित्तरंजन दास! सरन्यायाधिश जेंकिन्स व न्यायाधिश कार्नडफ यांच्या न्यायासनापुढे नऊ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर पर्यंत ही सुनावणी चालली. देशभक्तिने प्रेरित झालेल्या व आपल्या क्रांतिबांधवांना फासावरून खेचुन परत आणायचेच या निश्चयाने उतरलेल्या चित्तरंजन दासबाबुंनी आपल्या आठ दिवस चाललेल्या बचावाच्या भाषणात आपले कौशल्य व कायद्याचे सखोल ज्ञान पणाला लावले. या अभियोगाच्या तपासकामाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि अखेर त्यांनी सरकारला कायद्याच्या पेचांत अचूक पकडले. या अभियुक्तांवर ज्या कलमांन्वये अभियोग चालविण्यात आला ती वर दिली आहेतच. यापैकी १२१, १२१-अ, १२२ व १२३ या राजद्रोहाच्या कलमान्वये जर अभियोग चालवायचा असेल तर गुन्हे प्रक्रिया संविधान च्या कलम १९६ अनुसार सरकारची पूर्वपरवनगी घेणे बंधनकारक असते. मात्र या अभियोगात अलिपूर अभियोगात पोलिसांनी सरकारची परवनगी घेतली होती ती १२१-अ, १२२ आणि १२३ कलमांसाठी! ही गोष्ट न्यायासनासमोर मांडत चित्तरंजनबाबुंनी न्यायालयाच्या निदर्शनास असे आणुन दिले की १२१,१२१-अ,१२२ व १२३ पैकी केवळ कलम १२१ अंतर्गतच सर्वाधिक शिक्षा म्हणुन फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम १२१-अ, १२२ व १२३ या सर्व कलमांन्वये सर्वाधिक सजा ही जन्मठेप असू शकते. मग बारिंद्रकुमार व उल्लस्कर दत्त यांची फाशी वैध कशी ठरते? अर्थातच या दोघांची कलम १२१ मधून निर्दोष मुक्तता व्हावी असा ठाम युक्तिवाद चित्तरंजनबाबुंनी न्यायासना समोर केला व अखेर न्यायालयाला त्यांचा मुद्दा मान्य करावाच लागला आणि बारिंद्र कुमार व उल्लासकर यांची फाशी आजन्म काळ्या पाण्यात परावर्तित झाली. अरविंद घोष, बाळकृष्ण हरी काणे यांची निर्दोष सुटका करण्यांत आली तर अन्य सर्व अभियुक्तांच्या शिक्षा कमी करण्यांत आल्या. बारिंद्रकुमार यांचा जन्म इग्लंड मध्ये झाला असल्याने एक ब्रिटिश नागरिक या नात्याने त्यांना त्यांचा अभियोग ईंग्लंडच्या न्यायालयात चालविण्याची मुभा देउ केली गेली पण आपण हिंदुस्थानी असल्याचे सांगुन त्यांनी नकार दिला. अरविंद घोष हे मात्र मुक्ततेनंतर क्रांतीकार्य वा राजकारण सोडुन पूर्णत: आध्यत्मिक मार्गाने गेले.

या अभियोगातील आणखी एक महत्त्वाचा पैलु म्हणजे फितुरांना झालेले शासन ज्यातुन जनजागृती प्रतित झाली. मोकामाघाट येथे प्रफुल्ला चाकीला बोलण्यात गुंतवुन पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या फौजदार नंदलाल बॅनर्जी यांना सरकारने पारितोषीक दिले तेव्हा त्यांच्या घरी तरुणांनी गुप्तपणे चिठ्ठी पाठविली की ’लवकरच तुम्हाला याहून मोठे ईनाम मिळणार आहे’. आणि खरोखरीच पुढे सुरू झालेल्या या अभियोगाचे काम संपण्याआधीच म्हणजे १९०८ च्या डिसेंबर मध्ये क्रांतीकारकांनी बॅनर्जी यांची कलकत्त्याच्या सर्पंट स्ट्रीट येथे हत्या केली.

हा अभियोग सुरू होताच नरेन गोसांई फितूर झाला व त्याने माफीचा साक्षीदार होण्यास कबुली दिली. आपल्यातल्याच एकाने छळाला भीऊन वा अमिषाला बळी पडुन आपल्याच माणसांविरुद्ध साक्ष देणे व आपल्या देशाचा घात करणे क्रांतीकारकांना सहन झाले नाही. हा माफीचा साक्षीदार न्यायालयात कबुलीजबाब द्यायला पोचुनच द्यायचा नाही असा चंग कन्हाईलाल दत्त ब सत्येन बोस यांनी बांधला व त्या फितुराला देहांताचे शासन देण्याचे ठरविले. आता तुरूंगात असताना त्याची गाठ पडणार कशी? तुरुंगाच्या एका विभागातुन दुसऱ्या विभागात जाणे म्हणजे कगदपत्रांशिवाय एका देशातुन दुसऱ्या देशात जाण्याहून अधिक बिकट होते. मग या दोन तरुणांनी एक मार्ग शोधला. एकाने सतत खोकल्याची ढास सुरू केली तर दुसरा पोटदुखीने लोळु लागला. दोघांनाही तुरुंगतील इस्पितळात हलविण्यांत आले. कडक पहऱ्यात उपचार असता हळुच दोघांनी पोलिसांना सांगितले की आता हे हाल सहन होत नाहीत, असे मरण्यापेक्षा आम्ही माफीचे साक्षीदार होण्यास तयार आहोत. मात्र सरकारी साक्षीदार कसे व्हायचे हे आम्हास समजत नाही तेव्हा आमची गाठ नरेन गोसांई याच्याशी घालुन द्यावी म्हणजे त्याचे सल्ल्याने आम्हाला साक्षीदार होता येईल असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या कथेवर विश्वास बसल्यावर एक दिवस पोलिस नरेनला घेऊन इस्पितळांत आले. तो समोर येताच कन्हाईलाल बेभान होत बिछान्यातुन उठला आणि "विश्वासघातक्या, हे घे फितुरीचे शासन" असे म्हणत त्याने नरेन गोसांईवर आपले पिस्तुल झाडले. त्या गोळीबारातुन नरेन जीव वाचुन निसटला व दरावज्याबाहेर पळाला. ते बघताच सत्येन बोस आपले पिस्तुल काढुन त्याच्या मागे धावला. बाहेर पळताना नरेनने दरवाजा ढकलला होता. मात्र हातात पिस्तुल घेऊन धावणाऱ्या सत्येनला पाहताच घाबरलेल्या पाहरेकऱ्याने दरवाजा तर उघडलाच पण नरेन कुठल्या बाजुने पळाला तेही खुणेने दाखविले. ताबडतोब त्या दिशेने जात सत्येनने नरेनला आवाराबाहेर पडण्याआधीच गाठले व आपल्या पिस्तुलातुन गोळ्या झाडत त्या फितुराला कंठस्नान घातले व अखेर हा महत्त्वाचा सरकारी साक्षीदार कबुलीजबाब नोंदवण्यपूर्वीच खलास झाला. कन्हाई व सत्येन या दोघांनाही अटक व फाशी झाली. हा खून करण्यासाठी या दोघांकडे पिस्तुल कुठुन आले याचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनीही पोलिसांना असे सांगितले की या कारागृहात हुतात्मा खुदिरामचा आत्मा वास करून आहे आणि या आत्म्यानेच आम्हाला शस्त्रे दिली!

या पाठोपाठ क्रम होता सरकारी वकिलांचा. या अभियोगात सरकारच्य वतीने देशभक्त क्रांतीकारकांना शासन होण्यासाठी काम करणारे सरकारी वकील श्री. आशुतोष बिस्वास यांना चारु बसू या युवकाने न्यायालयीन कामकाजचे दरम्यान न्यायालयाचे आवारातच गोळ्या घालुन कंठस्नान घातले. हिंदुस्थानी युवक परकिय सत्ता उलथुन टाकण्यासाठी जीवावर उदार होऊन लढत असताना एका हिंदुस्थान्याने (व तोही बंगाली) आपले ज्ञान त्यांना वाचवण्या ऐवजी त्यांच्या गळ्यातला दोर आवळण्यासाठी वापरत आहे याचा हा संताप असाव. या कृत्यासाठी चारू बसू यास फाशीची सजा मिळाली.

याच भावनेने या अभियोगाचे तपासकार्य पाहणारे पोलिस अधिक्षक श्री. शमसूल आलम यांना बिरेन दत्त गुप्त याने न्यायालयाच्या जिन्यातच गोळ्या घालुन यमसदनास धाडले व त्यासाठी तो फासावर गेला. अनेक जण फासावर गेले, अनेकांवर अभियोग चालु आहे हे माहित असूनही पुन:पुन्हा प्रकटणाऱ्या क्रांतीकारकांची सरकारने इतकी धास्ती घेतली की मुख्य सरकारी वकिल श्री. नॉर्टन यांना सुनावणी दरम्यान न्यायालयात असताना खिशात भरलेले पिस्तुल ठेवण्याची खास सवलत देण्यात आली.

या अभियोगातून निर्दोष मुक्त झालेले श्री. अरविंद घोष यांनी त्या नंतर राजकारणाला रामराम ठोकत आपले आयुष्य अध्यात्मिक कार्याला वहीले. योगायोग असा की हा अभियोग ज्यांच्यपुढे चालला ते बिचक्राफ्ट हे अरविंद यांचे ईंग्लंड येथील शैक्षणीक जीवनातले समकालीन होते.

या अभियोगच्या निमित्ताने 'युगांतर'ची स्थापना, सशस्त्र क्रांतीचे नवे पर्व साऱ्या हिंदुस्थानला पाहावयास मिळाले आणि असंख्य देशप्रेमी युवकांना क्रांतीची प्रेरणा मिळाली.

या अभियोगाच्या प्रारंभास या मे महिन्यात १०२ वर्षे तर या अभियोगाच्या निकालास १०१ वर्षे झाली. त्या निमित्ताने अलिपूर/ माणिकतोळा अभियोगातील सर्व क्रांतीकारकांना सादर अभिवादन!

इतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

राघव's picture

16 May 2010 - 9:39 am | राघव

खूप सुंदर माहिती दिलीत.
शाळेतील पुस्तकात त्रोटक माहिती असते. तुम्ही मात्र अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. खरेच बर्‍याच जणांची तर नावेही माहित नव्हतीत.
ऊर अभिमानानं भरून यावा अशा आठवणी सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

योगी अरविंदांबद्दल मला असे ऐकिवात आहे की त्यांनी अध्यात्मिक मार्गाला लागण्याचा निश्चय केला तो स्वतंत्रतेच्या लढ्याला अध्यात्मिक शक्ती प्राप्त करून मदत करण्यासाठी. पण नंतर मात्र अशा कोणत्या शक्तीची गरज त्यांना दिसून आली नाही. तो विचार सोडून त्यांनी अध्यात्मिक मार्गाच्या आराधनेसाठी पुढे साधना केली.

http://en.wikipedia.org/wiki/Sri_Aurobindo#Conversion_from_politics_to_s...

तसेच http://www.sriaurobindoashram.org/research/show.php?set=doclife&id=12 यातील “Aurobindo’s Spiritual Initiation” खाली हे सापडले (Barin Ghose यांनी लिहिलेल्या पुस्तकातून) -
"..Deeply imbued with the cult of violence, learnt from the Irish Seinfeinners and Russian secret societies, and equally ignorant of what spiritual power actually meant, we in our blindness wanted to harness Divine power to our dark mission.… "

पण हे संदर्भ फार त्रोटकपणे उपलब्ध दिसलेत. तसेच स्वतः अरविंदांनी याबाबत काही म्हटलेले कुठे आढळले नाही.

राघव

विकास's picture

16 May 2010 - 9:48 am | विकास

नेहमीप्रमाणे चांगला लेख (बर्‍याच दिवसांनी)

याच संदर्भात आठवण झाली... स्वा. सावरकरांच्या बोटीवरून उडी मारण्याच्या आणि मार्सेलीस बंदराच्या घटनेस ८ जुलै २०१० ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वाती२'s picture

16 May 2010 - 5:33 pm | स्वाती२

खूप सुरेख लेख!

स्वाती दिनेश's picture

19 May 2010 - 12:08 pm | स्वाती दिनेश

वाचून खूप नवी माहिती मिळाली..
पण खूप दिवसांनी लिहिलेत , बिझी दिसता आहात,:)
स्वाती