गुलमोहोर

गिरिजा's picture
गिरिजा in जनातलं, मनातलं
3 May 2010 - 3:31 pm

काल मस्तपैकी सुट्टीच्या मूडमध्ये एक मस्त मराठी सिनेमा टाकून द्यावा असं मनात आलं, आणि शोधाशोध सुरु झाली. LAN वरचे जवळजवळ सगळे मराठी सिनेमे / नाटकं पाहून झाल्यामुळे, आज काय? हा प्रश्न होताच! शोधताना अचानक "गुलमोहोर" दिसला. नाव एकंदरीत अनोळखी वाटलं, म्हटलं चला! एक तरी न पाहिलेला सिनेमा मिळाला एकदाचा! लगेच download केला. पार्सल आणलेली झकास चायनीज भेळ आणि पाणी अशी जय्यत तयारी करून मी सिनेमा download होण्याची वाट बघत बसले. तो होईस्तोवर small wonder चा एक एपिसोड पाहिला ;)

असो! तर एकदाचा झाला तो download! सुरु केला. सोनाली कुलकर्णी ला पाहून आठवलं की अरे, मला हा सिनेमा माहित आहे! "गुलमोहोर" - २००८ मध्ये आलेला एक मराठी चित्रपट. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट टी. व्ही. (दूरदर्शन) वर दाखवण्यात आला होता म्हणे, आणि तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने तिला तो न आवडल्याचं सांगितलं होतं. बऱ्याचदा मराठी चित्रपटांबाबतच्या तिच्या आणि माझ्या आवडी-निवडी एकदम उलट असतात त्यामुळे मला आशा होती कि मला हा सिनेमा नक्की आवडणार :P झालं देखील तसंच! (नाहीतर मी हे पोस्ट कशाला लिहित बसले असते? :-/ :P) असो!
सोनाली कुलकर्णी खरतर मला खूप आवडते. तिचा अभिनय मला प्रचंड भावतो (आत्तापर्यंत पाहिलेल्या तिच्या सगळ्या मराठी चित्रपटांपैकी "देवराई" मधला तिचा अभिनय मला उत्कृष्ठ वाटला, आणि नवीन कलाकारांना (सो.कु., सयाजी शिंदे, चिन्मयी सुमीत)घेवून केलेल्या "सखाराम बाईंडर" मधला अगदीच अजिबात नाही आवडला, असो!) तर ती, मोहन आगाशे, रजित कपूर (ब्योमकेश :D), गिरिजा ओक - म्हटलं, वाह! चित्रपट कसाही असला तरी अभिनयाची मेजवानी असणार! एक तो जितेंद्र जोशी सोडून! हो, म्हणजे आत्तापर्यंत मी त्याला नेहमीच विनोदी किंवा तशाच भूमिकांमध्ये पाहिलंय ("गोलमाल" त्यातल्या त्यात बरा!) आणि मला तो एकंदरीतच आवडत वगैरे नाही. म्हटलं, ठीके, चालवून घेवू :P.. तर अशा context मध्ये मी सिनेमा बघू लागले. खरतर पूर्ण चित्रपट flashback mode मध्ये आहे. विद्या (सोनाली कुलकर्णी) एका आदिवासी भागात अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करतेय. ती एक पत्र लिहितेय. सुरुवातीला कळत नाही, कोणाला लिहितेय? त्या पत्रातून ती काही लोकांचा उल्लेख करते. ती म्हणते - इथलं आयुष्य, इथली लोक खूप साधी सरळ आहेत. कित्येक हालअपेष्टा असूनदेखील ते आयुष्याच्या आनंदासोबत compromise करत नाहीत. ती इथे खुश आहे, पण तरीदेखील तिला अचानक आठवणी येतात - तिला आठवतो - देवेन, मीरा, राजन, रेवा आणि भगवान. हा चित्रपट, कदाचित सोनाली कुलकर्णी असल्यामुळे असेल, पण मी इतका समरसून पहात होते कि अचानक माझ्या डोळ्यासमोर एकदम mapping आलं - नावाचं आणि कलाकारांचं.. मीरा, गिरीजा ओक तर नसेल? भगवान? कदाचित रजित कपूर? देवेन - (नाव अमराठी वाटतंय?) जितेंद्र जोशी कि काय? अशी बरीच permutations डोळ्यासमोर तरळून गेली. अर्थात काही मिनिटातच याचा उलगडा होणार होता!

मग अचानक चित्रपट भूतकाळात गेला. विद्या एका कॉलेजमध्ये तात्पुरती शिक्षिका असते. ती, तिचा नवरा देवेन (ब्योमकेश!) आणि तिची बहिण मीरा (गिरिजा) विद्याच्या (भाड्याच्या) घरात राहात असतात. देवेन - एक नाटक कलावंत असतो, पण सध्याच्या काळात त्याला मनासारखं काम न मिळाल्याने काहीच उद्योग करत नसतो. विद्या जमेल तशी कामं (शिकवणं, भाषांतर करणं, लिखाण वगैरे) करत एक-एक पैसा जोडत असते. अशा संसारामध्ये पारंपारिकरित्या ज्या काही समस्या उद्भवू शकतात, त्या सर्वच थोड्याफार प्रमाणात असतात - उदाहरणार्थ, देवेन चिडचिडा बनणं, खूप मनस्वी (आधीच कलाकार! :)) असणं, पैशाच्या दृष्टीने सगळं स्थिरस्थावर नसल्यामुळे मूल होऊ न देण्यासाठी प्रयत्न, विद्याची स्वप्न, धडाडीने, अजिबात न थकता कामं करण्याची इच्छा, सोबत राहत असलेली मीरा - तिला देवेनचं खटकणार वागणं - त्याचं काहीच कामं न करणं, त्यामुळे विद्याला होणारा त्रास पाहून तिला दोन समजुतीचे शब्द सांगणं इत्यादी. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे देवेन घरातली सर्वच कामं स्वत करत असतो, विद्याला आयतं जेवण देण्यापर्यंत. हे बघताना मला खूप जाणवलं की, पुढे चित्रपटात काय होणारे माहित नाही, पण असं खरच एखाद्या कुटुंबात घडत असेल, तर आत्तापर्यंत आजूबाजूच्या लोकांनी का होई ना, पण देवेन ला भंडावून सोडलं असतं - असं म्हणून की तू बायकोच्या पैशावर जगतोस / तिची सेवा करतोस इत्यादी इत्यादी! असो!

(थोडं विषयांतर: विद्या भाषेची शिक्षिका वाटते - general context वरून - पण एकदा कॉलेजच्या वाचनालयात तिच्या हातात linear algebra चं पुस्तक दाखवलं आहे! छान वाटलं, कारण तो माझा अत्यंत आवडता विषय आहे :D पण गजेंद्र अहिरेच्या सिनेमात असं काही अपेक्षित नव्हतं!)

विद्या ज्या कॉलेजमध्ये शिक्षिका आहे, तिथेच आरक्षणाविरुद्ध असलेल्यांच्या विरोधात भगवान (जितेंद्र जोशी) नावाचा विद्यार्थी हिंसक आंदोलन करत असतो. सुरुवातीला हिंसेचा मार्ग कसा वाईट आहे, आंदोलन करायचं तर ते दुसऱ्या पद्धतीने करा- इतपतच सहभाग असणारी विद्या, भगवानकडे राजकारण्यांच्या स्वार्थामध्ये बळी गेलेला एक मोहरा - एव्हढ्याच दृष्टीने पहात असते. एका वळणावर विद्याला त्याची नव्यानीच ओळख होते. लग्नसंस्थेवर विश्वास नसणारी, UPSC करून करिअर करायचं असं ठरवलेली मीरा आणि विद्याच्याच कॉलेजमध्ये शिक्षक असणारा राजन यांचं एकमेकांवर प्रेम असतं. राजन एकदम सरळमार्गी, आशावादी, लग्नसंस्थेवर पूर्णपणे विश्वास असणारा, विद्याचा एक चांगला मित्रदेखील. देवेनसोबत एकदा त्याच त्याच गोष्टींवरून वाजल्यावर मीरा सरळ राजनकडे जाऊन राहू लागते. विद्याची तेव्हा देवेन आणि मीरा मध्ये कोंडी होते आणि ती देवेनवरच्या प्रेमापायी मीराची समजूतदेखील घालायला अयशस्वी होते. तेव्हा मीरा आणि विद्या दोघींनाही समजून घेण्याचे कामं राजन चोख बजावतो. या सगळ्यात स्वतःवर विश्वास ठेवणारी, देवेनवर जीवापाड प्रेम करणारी, त्याच्या प्रयत्नांना यश मिळून त्याला मनासारखं कामं करायला मिळावं यासाठी प्रार्थना करणारी, सतत हसतमुख असणारी विद्या मला फार आवडली. म्हणजे, कित्येक मुलींना असा मनस्वी, बाणेदार, कलाकार मुलगा आवडून जातो, पण जेव्हा प्रत्यक्षात त्याला साथ देवून, त्याच्यासोबत संसार करण्याची वेळ येते, तेव्हा त्यातल्या किती मुली इतक्या flexible बनू शकत असतील? आणि या सगळ्यात विद्या जेव्हा तिच्या permanant होण्याबद्दल किंवा तिच्यातल्या लेखिकेला ओळख मिळाल्याबद्दल भरभरून बोलते, तेव्हा एका क्षणी वाटून जातं की अरे, हिला कदाचित आपण देवेनपेक्षा जास्त मिळवलं, काही करून दाखवलं असं तर वाटत नाहीये? पण तसं नसतं, ती राजनसोबत जेव्हा बोलते, तेव्हा लक्षात येत की तिने फक्त देवेनखातर या सगळ्यात उडी घेतलीये, ती तिची महत्वाकांक्षा आहे म्हणून नव्हे! म्हणजे त्यात ती असदेखील म्हणते - जर देवेन कोणी बनू शकला असता, तर माझं एव्हढं सगळं झालंच नसतं.. आणि तरीही मला खंत वाटली नसती.

नंतर मात्र चित्रपट खूप गुंतागुंतीचा होत जातो. देवेनचं चिडचिड करणं मर्यादेपलीकडे जातं; त्याच्या मनासारखं काहीच होत नसतं, पण नेमकं त्याच वेळेस सगळं सुरळीत होतंय आणि हळूहळू सगळं मार्गावर येणार या आशेत आणि खुशीत असताना विद्या मुलाचा निर्णय घेते आणि त्या एका गोष्टीवरून देवेन तिच्यावर हात उचलतो. त्या वेळी तिला योगायोगाने भगवान भेटतो. रात्री घरातून मार खावून बाहेर पडलेली आणि रस्त्यावर भटकणारी विद्या भगवानकडे आसऱ्याला जाते. त्या वेळी एक नवीनच भगवान तिला सापडतो. आपल्या आईबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर असणारा, आपल्यासारख्या वर्षानुवर्ष पिचल्या गेलेल्या गरीब, अडाणी लोकांसाठी हिंसक मार्गाने का होई ना पण आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलेला, आणि तरीही अशा खडतर वेळेत साधी माणुसकी दाखवून तिला आधार देणारा. अशा वेळी सिनेमा खरतर एका पारंपारिक वळणावर जातोय की काय, अशी शंका मला आलेली. म्हणजे, देवेन कडून अशी वागणूक मिळालेली विद्या आता भगवान मध्ये तर गुंतणार नाही? पण तिथेच हा चित्रपट मला आवडून गेला कदाचित! तो अजिबात पारंपारिक वळणाने जात नाही. त्यांचं विद्यार्थी-शिक्षिकेचा नातं जपून, अधिक फुलवून आणण्याचच कामं विद्या करते. या सगळ्यात देवेन आणि ती कायमचे दुरावतात आणि कालांतराने ती आदिवासींच्या पाड्यावर जायचा निर्णय घेते. या सगळ्या गोष्टी पडद्यावर बघायला खरच छान वाटतात कारण त्यात सोनालीने अभिनयाची कमाल केली आहे! आणि जितेंद्र जोशीदेखील मला प्रचंड आवडून गेलाय या सिनेमात :)

सुरुवातीला आदिवासी पाडा, समाजकार्य असं बघून मला वाटलेलं की हा सिनेमा "हजारों ख्वाहिशे ऐसी" या हिंदी सिनेमाच्या अंगाने जाणारा तर नाही? तोदेखील एक खिळवून ठेवणारा सिनेमा वाटतो मला, पण हा वेगळा आहे, खूपच वेगळा. मोहन आगशेंच्या रूपाने विद्याला एक वडीलधारा आधार कॉलेज मध्ये मिळतो तर राजन च्या रूपाने एक चांगला मित्र! भगवान आणि तिच्या नात्याचे पापुद्रे तर खूपच सुंदर आहेत. सगळ्यात छान म्हणजे, या सगळ्यातून तरून जाताना विद्या भगवानला म्हणते - "सगळीच स्वप्नं काही तुटत नाहीत. एक फांदी तुटली म्हणून नवीन कोंब उगवायचा रहात नाही" - निव्वळ अप्रतिम! आणि मग शेवटी पुन्हा एकदा तशीच हसतमुखाने आदिवासी मुलांना पसायदान म्हणायला शिकवणारी विद्या पाहिली की हे वाक्य पुन्हा आठवल्याशिवाय रहात नाही!

या चित्रपटाची आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे, विद्याचा आदिवासींसाठी जगण्याचा, त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय - जेव्हा देवेन तिला स्वत:पासून पूर्णपणे तोडून टाकतो तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात, संसार अशा गोष्टींमध्ये न गुंतता, ती स्वत:मधल्या शिक्षिकेच्या / लेखिकेच्या कलाने जाते - मला एकदम उंबरठा मधली स्मिता पाटील किंवा अर्थ मधली शबाना आठवून गेली! ते दोन्ही चित्रपट मला आवडलेले त्याचं एक कारण हा निर्णय हे होतं. तसंच कुठल्याही random सिनेमाप्रमाणे - and they lived happily - असं असलं तरी काही अनुत्तरीत प्रश्नदेखील हा सिनेमा ठेवून जातो. म्हणजे, अशा कुठल्याही संसारात जिथे नवरा एक कलाकार आहे आणि मनासारखं कामं न मिळाल्याने त्याची बायकोच सर्वेसर्वा बनून संसाराचा कणा बनतेय, अशा वेळेस शेवट नेहमी असाच व्हावा का? एका सीनमध्ये देवेन कामं न मिळाल्याने खूप frustrate होवून गेलेला दाखवलेला आहे; मी विचार केला - कित्येक मुलींच्याही मनात काही न काही करून दाखवायचं, आवडेल त्या क्षेत्रात उडी घ्यायची असं असेल, पण त्यातल्या किती अशा नवऱ्याच्या जीवावर आपण जगतोय असं वाटून frustrate होतात? कारण त्याला महत्वच दिलं जात नाही. मुलीनी कर्तृत्व दाखवणं redundant च नव्हे तर कित्येकदा unnecessary देखील समजलं जातं आणि त्यांच्याही ते अंगवळणी पडलं आहे. थोडाफार फरक अलीकडे बघायला मिळतोय खरा! तसं मुलांच्या बाबतीत घडलं की मात्र लोकांच्या टोचून बोलण्याने का होईना,अशा प्रकारचे सगळे संसार याच मार्गाने जात असावेत! आणि कदाचित म्हणूनच पिढ्यानपिढ्या पारंपारिक संसार सुखाचे चालू असावेत! असो! चित्रपटातल्या technicalities मला काही फारशा कळत नाहीत, पण एक छान अनुभव अभिनयसंपन्न असा हा चित्रपट मला देवून गेला, हे नक्की!

(हे मझ्या ब्लॉग वर आहे.)

चित्रपटमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

3 May 2010 - 4:04 pm | इन्द्र्राज पवार

ही कलाकृती मी पाहिलेली नाही, पण आपला हा लेख वाचल्यानंतर आता त्याची गरजही भासत नाही, इतक्या सुंदरतेने तुम्ही या चित्रपटाचे विविध पदर उलगडून दाखविले आहेत. दुस-यांदा लेख वाचताना मला का कोण जाणे पण श्री. ह. मो. मराठे यांची "पक्षिणी" ही कथा ~ विद्याच्या नजरेतून......आणि त्यांचीच अत्यंत गाजलेली छोटेखानी कादंबरी "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी"...... देवेनच्या नजरेतून...... आठवली. ही कथा आणि कादम्बरी अतिशय दाहक आहेत.... नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांच्याबाबतीत. (गुलमोहोर विषयाच्या अगदी जवळ..) लिखाण पद्धतीवरून तुमचे वाचन खूपच दिसत्ये....सबब श्री मराठे यांच्या या दोन्ही कलाकृती तुम्ही जरूर वाचल्या असणार (नसल्यास जरूर वाचा...."गुलमोहर" परत एकदा भावेल !). लेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु's picture

3 May 2010 - 10:43 pm | प्राजु

सुंदर परिक्षण लिहिलं आहेस.
चित्रपट पहायला नक्कीच आवडेल.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/