माणुसकी

मानस्'s picture
मानस् in जनातलं, मनातलं
12 Apr 2010 - 1:57 pm

आज सकाळी ऑफिसला येतानाच प्रसंग, साधारण ११-११:३० ची वेळ होती. ट्राफिकचा त्रास नको म्हणून मी मुद्दाम थोडया बाहेरच्या रस्त्याने बाईकवरून निघालो होतो.उन प्रचंड होतं. थोडं पुढे आल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्याच्या कडेने एक वृद्ध जोडपं चालताना दिसलं.दोघेही खूप थकलेले होते.अंगावर जुने मळके कपडे,आज्जीबाईच्या हातात कसलस एक गाठोडं.आजोबांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हाताने आज्जीबाईना आधार दिलेला.मी क्षणभर मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं,घामाने थबथबलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजून मला स्पष्ट आठवतायत, मनात विचारांचं काहूर उठलं.कोण असतील हे ? का झाली असेल यांची अशी अवस्था?अश्या रणरणत्या उन्हात कुठे बरं निघाले असतील? त्यांनाही मुलं,नातवंड असतील? असतील तर यांना असं वाऱ्यावर का बरं सोडलं असेल? म्हातारपणाच असं विदारक चित्र पाहून मन अगदी सुन्न झालं .विचार करताकरता मी त्यांना मागे टाकून १-२ किलोमीटर पुढे आलो होतो. अचानक मनात आलं अरे आपण थांबून त्यांना १०-२० रु. ची मदत तरी करायला हवी होती.क्षणभर वाटलं अशीच गाडी मागे वळवावी आणि शोधावं त्यांना,पण इकडे ऑफिसला जायला उशीर झालेला, नाहीच गेलो परत.
ऑफिसला पोहोचलो,तिथल्या चकाचक वातावरणात मिसळून गेलो,पण मनाला लागलेली रुखरुख कमी झाली नाही.वाटलं किती स्वार्थी झालो आहोत आपण,बंगला,गाडी,अशा अनेक भौतिक गोष्टींसाठी आपणही धावतोच आहोत इतरांसारखे,माणुसकी विसरत चाललेला एक माणूस होत चाललोय की काय आपणही? काहीतरी अपराध केल्यासारखा वाटत राहिलं दिवसभर.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

12 Apr 2010 - 3:29 pm | जयंत कुलकर्णी

स्वामी विवेकानंदांनी एका भाषणात म्हटले होते "ज्या दिवशी भारतातल्या माणसांना त्यांच्यापेक्षा गरीब माणसांविषयी कणव वाटणार नाही तो दिवस भारताच्या दृष्टीने सगळ्यात वाईट असेल". तुमच्या भावना बघून अजून आशा आहेत असे वाटले खरे. एक करा पुढच्या वेळी मनात आल्यावर असली गोष्ट ताबडतोब करुन टाकायची. कारण नंतर दिवस फार खराब जातो. आणि मुख्य म्हणजे, तुम्ही मदत केलीत तर त्यावर जास्त विचार करायचा नाही. कारण समजा त्यात आपली फसवणूक झाली तर अजूनच ताप.

मी असाच एकदा एका लहान मुलाला तो अनवाणी उन्हात चालत असताना पाहिले होते, ३० वर्षापूर्वी, आणि त्याला मी चप्पल घेऊन दिली नाही, त्या बद्दल माझे मन मला अजून क्षमा करत नाही.

जयंत कुलकर्णी

त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अन्या दातार's picture

12 Apr 2010 - 10:42 pm | अन्या दातार

परवा असाच एक माणूस हातात त्याचे गाठोडे घेऊन अनवाणी चालला होता. दुपारी २.३०-३.०० ची वेळ होती. बाबा जेवून ऑफिसला चालले होते. आम्हाला दोघांनाही त्याच्याकडे बघून वाईट वाटले. आमच्याकडे असलेल्या सपातांचा जोड त्याला द्यावा अशी इच्छा झाली. बाबांनी त्याला बोलावून घेतले आणि उशीर होत असल्याने ते काम माझ्याकडे सोपवून ऑफिसला गेले.
तो माणूस येईपर्यंत मी जोड काढून ठेवला होता. त्याने जोड उलटा-पालटा करुन बघितला आणि वाकडं तोंड करुन विचारले "नवीन नाहीए का?" :O :O

हे असे अनुभव आले की त्यांच्या दयनीय स्थितीचे खरे कारण कळते.
त्या इसमाला मदत व्हावी हाच शुद्ध हेतू असूनही त्याच्या माजुरीपणाचा मला राग आला. ~X( ~X(

चतुरंग's picture

12 Apr 2010 - 10:53 pm | चतुरंग

असला माजुरडेपणा असे लोक मरायला टेकले तरी जात नाही ही विषादाची गोष्ट आहे!

चतुरंग

इन्द्र्राज पवार's picture

13 Apr 2010 - 3:37 pm | इन्द्र्राज पवार

होय, अगदी कटु पण सत्य आहे ही बाब ! कोल्हापुरातील एक वृद्धाश्रमात तीन मुलानी टाकून (नव्हे फेकून...) दिलेल्या म्हाता-याने आश्रमात ज्या दिवशी एक मुस्लीम स्वयपाकीण आली त्या दिवशी भोजन करण्यास नकार दिला होता. काय हा मुजोरपणा !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शुचि's picture

13 Apr 2010 - 2:19 am | शुचि

इथे अमेरीकेत काही भिकारी "सॉरी" म्हटलं आणि पुढे तसच गेलं तर शिवीगळ करतात. : (
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

चिरोटा's picture

12 Apr 2010 - 3:45 pm | चिरोटा

कारण समजा त्यात आपली फसवणूक झाली तर अजूनच ताप

म्हणूनच मीही रस्त्यावर आर्थिक मदत करायची सहसा टाळतो.त्यापेक्षा NGOs ना महिन्याला ३०० रुपये दिलेले परवडतात.
भेंडी
P = NP

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 4:06 pm | अरुंधती

आपल्याला वेळेची चणचण भासते आणि त्यांना पैशाची...
दरवेळी आपण चार पैसे देऊन मनातली अस्वस्थता टाळत तात्पुरता उपाय करु जातो... अनेकदा त्यांच्या प्रॉब्लेमवर आपलं हे पैशाचं तात्पुरतं ठिगळ फार तोकडं असतं.....
पण आपापल्या परीने मदत तर नक्कीच करावी...
कधी थंडगार पाणी देऊन...
कधी लिफ्ट देऊन...
कधी चार आपुलकीचे शब्द पुसून...
कधी त्यांना चार घास खाऊ घालून...

केलेली मदत वाया तर कधीच जात नाही.... फसवतो त्याच्या मनाचा प्रश्न... आपण मदत करतच राहावी!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

12 Apr 2010 - 7:29 pm | शुचि

आपल्याला मदतीची संधी देऊन हे लोक उलटपक्षी आपल्यालाच मदत करत असतात. ....... स्वतःला मदत करायची संधी कधीच दवडू नका.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

इन्द्र्राज पवार's picture

13 Apr 2010 - 3:23 pm | इन्द्र्राज पवार

".......कधी लिफ्ट देऊन..."
अरुंधती ताई ~~ आयुष्यात कुणालाही लिफ्ट देऊ नये या मतावर मी इतका पक्का आहे की उद्या प्रत्यक्षात `विद्या बालन` जरी रस्त्यात हात करीत असेल तर तिच्याकडे न पाहता तसाच पुढे जाईन. लिफ्टमुळे पोलीस स्टेशनच्या वा-या कराव्या लागल्या आहेत मला. एकदा संध्याकाळी उपनगरात माझ्या होंडा बाईकने चाललो होतो, तर एका कोप-यावर साधारणत: साठीच्या एका senior citizen ने हात दाखवून लिफ्ट मागितली. मलाही विशेष घाई नसल्याने चटकन त्यांना मागे घेतलेही. त्यांनी सांगितलेला पत्ताही मी जाणार असलेल्या रस्त्यापलीकडील असल्याने बरेही वाटले. गाडीवरून जाताना ज्या पद्धतीचे दोघां प्रवाशात जे काही बोलणे चालू होते ते झाले, आणि सात आठ मिनिटांच्या प्रवासानंतर अचानक त्या इसमाचा मागून तोल गेला किंवा त्यांना चक्कर आली असावी व ते गाडीवरून (माझ्या सुदैवाने) डाव्या बाजूला पडले व जोरात आपटल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. अशावेळी स्वार गडबडून जातो तसा मीही गेलो, पण आजूबाजूच्या तीन चार लोकांनी तोल गेल्यामुळे तो इसम पडल्याचे पाहिल्याने हायसे वाटले. खिसे तपासले तर छोटीशी वही सापडली व तीवरून एका बघ्याने इसमाच्या घरी सेल केला. दहा पंधरा मिनिटात त्यांचाकडील मंडळी आलीही, पण त्याचबरोबर so-called सोसायटीतील कार्यकर्तेही आले व त्यांनी मला गाडी घेऊन जाण्यास अटकाव केला. मी वारंवार त्यांना विनंती करून सांगत होतो की मी लिफ्ट दिली होती व संबधित व्यक्ती श्रमाने असेल त्यांना कदाचित चक्कर आली असेल. पण नाही, `तुम्हाला जाता येणार नाही, कोणी सांगावे तुम्हीच त्यांच्या अंगावर गाडी घातली असेल." इ. इ. मी हतबल झालो, बाकीचे तर काय बघेच होते, ते तर जे कुणी प्रत्यक्ष घटना पाहिलेले होते, त्यांचेही ऐकायला तयार नव्हते. माझी वरात त्यांच्या समवेत प्रथम इस्पितळात व नंतर पोलीस ठाण्यावर गेली. दरम्यान त्या थोर इसमावर ठीकपणे उपचार चालू होते पण तो शुद्धीवर येऊन माझ्याबद्धल जो पर्यंत सांगणार नव्हता तो वर माझी सुटका त्या सेनेकडून होणे केवळ दुरापास्त होते. मी तर त्यांच्या घरातील करणार नाहीत इतक्या तीव्रतेने `उपरवाल्याचा` धावा करीत होतो. ती पूर्ण रात्र गेली व जरी मी माझ्या घरातील लोकांना निरोप देऊन बोलावून घेतले होते तरी ठाणे अंमलदाराने असहायता दर्शविली होती व मला इस्पितळातच थांबावे लागले होते. जेवू देखील शकलो नाही तणावामुळे. पहाटे पाचच्या सुमारास (एकदाचा) तो महान इसम शुद्धीवर आला व माझा जीव आपल्या शरीरात `ह्रदय` नावाचे जे चिमुकले भांडे असते ना, तिथे एकदाचा पडला. तरीही आणखीन एक तास गेला कारण ड्युटीवरील शिपायीमामा अजून जागे झाले नव्हते जबाब घेण्यासाटी. तो एकदाचा झाला व त्या जखमी आत्म्याने सांगून टाकले कि ते स्वत:च मागील सीट वरून तोल जाऊन पडले होते व ज्याने त्यांना लिफ्ट दिली त्यांचा काही संबध नाही. हुश्श !!!

मला संताप आला तो दुस-याच बाबीचा ! तो असा कि, जाऊ दे ते कार्यकर्ते व त्या इसमाचे नातेवाईक; पण त्या नालायक (होय होय... पक्का नालायक व हरामखोर) म्हाता-याने दवाखान्यातून तर नाहीच नाही पण दोन दिवसांनी घरी गेल्यानंतरही मला अकारण झालेल्या त्रासाबाबत एक साधा फोन करून दिलगिरी व्यक्त केली नाही. (मी त्याचा मुलाकडे माझे कार्ड देउन आलो होतो.) असा डोकेदुखीचा प्रसंग कुणावरही येऊ शकतो, तेव्हा मरू दे ते social responsibility and hell kind social awareness ~~~ Don`t ever think offering lift to anybody, irrespective of his/her age and circumstances.) (संतापजनक भाषेबद्दल क्षमस्व !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

13 Apr 2010 - 5:49 pm | अरुंधती

हम्म्म्म..... मी आतापर्यंत लोकांना रिक्षातच लिफ्ट दिली आहे.... रिक्षा तसे त्रयस्थ वाहन असल्यामुळे कधी तुमच्यासारखी परिस्थिती ओढवली नाही.... पण तुमचा मुद्दाही बरोबर आहे!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इंटरनेटस्नेही's picture

13 Apr 2010 - 4:03 pm | इंटरनेटस्नेही

वरील अन्या दातार व श्री पवार यांच्या प्रतिसदानान्शी सहमत. मदत वैगरे ठीक आहे; पण अशा मदती मुळे आपणच अडचणीत आल्यास आपल्याला कोणीच मदत करत नाही. त्यापेक्षा आपण आपला कर वेळेत आणि नियमित पणे भरावा, सरकार काय ते बघून घेईल.

आणि सामाजिक जबाबदारी पद पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आदी सुनियोजित मार्ग आहेतच.

इन्द्र्राज पवार's picture

13 Apr 2010 - 9:49 pm | इन्द्र्राज पवार

Thanks Internet Premi.... खरोखर तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. रा. से. योजनातून जे काही समाजासाठी करता आले होते (महाविद्यालयीन काळात) तेवढ्यावरच आपले तर पोट भरले आहे. काय सांगू त्या पोलीस चौकीतील घाणेरडे अनुभव !! जणू काय मी म्हणजे गावातील सर्वात मोठा गुंड आहे अशाच पद्धतीने तेथील हवालदार व बाकीचे गणेगम्पे माझ्याशी वागत होते. एकाने तर मी दारू पिलो होतो काय हेही विचारले/पाहिले ! आता बोला. त्यातही माझी तक्रार पोलिसांच्या वर्तणुकीबद्धल नसून तेथे त्या म्हाता-याची जी दोन मुले (चांगले मोठे होते दोघेही) होती, ते साले माझी केविलवाणी हालत निर्लज्जपणे पाहत होते; त्याचीच जास्त चीड येत होती, आजही येते.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

इंटरनेटस्नेही's picture

15 Apr 2010 - 4:02 pm | इंटरनेटस्नेही

श्री पवार, सहमती बद्दल आभारी आहे.
(अवांतर: अशा कृतघ्न मंडळीना देव धडा देतोच कधी ना कधी!)

पक्या's picture

13 Apr 2010 - 11:35 pm | पक्या

लिफ्ट संदर्भात अजून एक आठवले.
एक प्रसंग ...सकाळ पेपर मध्येच बातमी वाचली होती. जवळपास ५-६ वर्षापूर्वीची असेल पण चांगली लक्षात राहिली आहे.
एक सोफ्टवेअर मधील मुंबईचा नोकरदार तरूण मराठी मुलगा पुण्यात हिंजवडी परिसरात एका चांगल्या कंपनीत नोकरीस होता. दर शुक्रवारी बसने तो मुंबईला घरी जायचा. त्या दिवशी होळी असल्याने त्याला लवकर घरी जायचे होते. रस्त्यात एका कार वाल्याने मुंबईला जात आहोत. लिफ्ट हवी का विचारले. हा तयार झाला. गाडीत अजून एक (कि २ ?) त्याचा साथिदार होता. काही वेळाने छान गप्पा मारल्यावर त्यांनी त्याला बिस्कीट कि असेच काहीतरी खायला दिले. त्यानंतर तो बेशुध्द झाला आणि नंतर गेलाच. (गुंगिच्या औषधाचा डोस जास्त झाला असावा). त्याच्याकडील सामान , पैसे वगैरे लुटण्याच्या हेतूनेच त्या लोकांनी त्याला खायला दिले होते.
वर जसे पवारांनी लिहिले आहे लिफ्ट देऊ नये तसेच अनोळखी च काय पण लांबची ओळख असली तरी लिफ्ट घेऊ पण नये.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

13 Apr 2010 - 11:37 pm | शुचि

>> लांबची ओळख असली तरी लिफ्ट घेऊ पण नये >>
चांगला सल्ला दिलात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मी-सौरभ's picture

14 Apr 2010 - 1:08 am | मी-सौरभ

जरा विचार करुन मदत योग्य ठिकाणी पोचेल ही खात्री पट्वून मगच करा...

:?

-----
सौरभ