दत्तकविधान-१

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Mar 2010 - 1:18 am

child
``अमक्‍या तमक्‍याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...''
कुणीतरी मला कळवळून सांगत होतं."
"अरे, एवढी गंभीर परिस्थिती होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?''
माझी त्यावरची सहजस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती. सर्वसामान्य शिष्टाचारांना धाब्यावर बसविणारी, मध्यमवर्गीय मानसिकतेला न झेपणारी.पण तीच माझी मनापासूनची, प्रामाणिक आणि ठाम भूमिका होती.लोक स्वतःचं मूल असण्यासाठी एवढा अट्टहास का करतात, हा प्रश्‍न मला तेव्हाही पडला होता आणि आताही भेडसावतोच.
स्वतःचं मूल म्हणजे आनंद, उल्हासाचं प्रतीक. कुटुंबाच्या परिपूर्णतेची निशाणी वगैरे कबूल. पण स्वतःचा जीव धोक्‍यात घालून हा विकतचा आनंद घेण्याचा हट्ट कशासाठी?
मूल असणं-नसणं, किती असावीत, कधी व्हावीत, या सर्वस्वी प्रत्येक जोडप्याचा वैयक्तिक प्रश्‍न. त्यांच्या त्यांच्या विचारांनुसार, आर्थिक व अन्य स्थितीनुसार, जबाबदाऱ्यांनुसार घ्यायचा निर्णय. पण त्याबाबत आधीपासून ठाम भूमिकाही हवी. लग्न झाल्यानंतर मूल कधी, केव्हा, कसं हवं, याचा विचार सुरू करणं म्हणजे भांडणाला, वादाला कारणच. "साथ-साथ'मध्ये जाण्याच्या आधीपासूनच वैवाहिक जीवनातलं अनेकांचं हे अज्ञान आणि अविचारी जगणं खटकायचं. मूल होऊ देणं- न होऊ देण्यावरून लोक घटस्फोटापर्यंत जातात, हे ऐकून तर वैवाहिक अपरिपक्वतेच्या गंभीर स्थितीबद्दल कीव यायची.
मूल होण्याचा आणि लैंगिक जीवनाचा संबंध जोडून फिदीफिदी हसण्यासारखे प्रसंग अनुभवायला लागायचे, तेव्हा सर्वाधिक अस्वस्थ व्हायला व्हायचं. घरातला कुणीतरी वडीलधारा किंवा नवरा पत्नीला "आता घरात छोटा पाहुणा आणायचाय हं' असं म्हणायचा आणि ती हिरॉईन पायानं जमीन उकरायला नाहीतर पडद्यांची सुतं काढायला सुरवात करायची. नाहीतर मुरका मारून आत पळून जायची. मूल होण्याचा संबंध लज्जेशी आणि स्त्री-पुरुष लैंगिक संबंधांशी जोडण्याची काय गरज? स्त्री-पुरुष लैंगिक संबंध हेच मूल होण्याचं मूळ कारण असतं, हे कबूल. पण लैंगिक संबंध हे फक्त मूल होण्यासाठीच असावेत, असं नाही ना? हिरोनं हिरॉइनला "काय मग, आज झोप नाही ना आलेय?' असं काहितरी सूचक म्हणण्यावरून लाजणं समजून घेता येतं. मूल होऊ देणं किंवा न देणं, हा अतिशय गंभीर, पती-पत्नी आणि कुटुंबीयांनी एकत्र बसून सोडवायचा, चर्चा करण्याचा विषय. त्यात मुरके-झटके मारण्याचा काय संबंध?
स्वतःच्याच पोटचा गोळा जन्माला घालण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी, कुठल्याकुठल्या बाबा-बाबीचे गंडे बांधणारी, देशोदेशीच्या देवळा-रावळांचे अंगारेधुपारे घेणारी सुसंस्कृत जोडपी आसपास बघताना मला गलबलून यायचं. अजूनही येतं. हा अट्टाहास घर प्रसन्न करणाऱ्या, अवघं आयुष्य उजळून टाकणाऱ्या लहानग्या मुलाबद्दलचा नाही, तर स्वतःच्या रक्तामांसाच्या मुलाबद्दलचा आहे, ही जाणीवच अस्वस्थ करायची. लग्नानंतर मूल होऊ न देण्याचे जेवढे उपाय आहेत, त्याहून दसपट उपाय मूल होण्यासाठीचे आहेत. कुठल्या कुठल्या उपचार पद्धती अंगावर झेलत, गावोगावच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करत, बुवा-देवदेवस्कीच्या नादी लागत हे लोक आयुष्यातला अमूल्य वेळ, पैसा असा वाया का घालवतात, असा प्रश्‍न मला पडायचा.
...आपलं वैवाहिक आयुष्य नक्कीच एवढं धूसर, संदिग्ध नसेल, हे मनाशी तेव्हाच कुठेतरी पक्कं केलं होतं.
(क्रमशः)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 Mar 2010 - 1:53 am | शुचि

वेड्यासारखी वाचत गेले सगळे भाग. अ-प्र-ति-म!!!! किती सुजाण लोक आहेत जगात वाचून बरं वाटलं.

लग्नानंतर मलादेखील एक मूल दत्तक घ्यायचं होतं. पण माझं स्वप्न , स्वप्नच राहीलं काही कारणांमुळे. पण मी कांजुरमार्ग च्या "वात्सल्य" आश्रमाला नेहेमी भेट देत असे.

आपल्याला शुभेच्छा.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

ही अप्रतिम सिरीज वर आणते आहे.

बाळ सप्रे's picture

18 Feb 2013 - 6:09 pm | बाळ सप्रे

पुढचे भागही असेच वर आणा..

उत्खनन करतांना ही अप्रतिम अनुभव-लेखमाला पुन्हा एकदा सापडली, सर्वच भाग एकत्रित वाचायला मिळावेत म्हणून इथेच दुवे संकलित करून देतो आहे, अत्यंत वाचनीय!

भाग २: http://www.misalpav.com/node/11388
भाग ३: http://www.misalpav.com/node/11389
भाग ४: http://www.misalpav.com/node/11390
भाग ५: http://www.misalpav.com/node/11400
भाग ६: http://www.misalpav.com/node/11401
भाग ७: http://www.misalpav.com/node/11402
भाग ८: http://www.misalpav.com/node/11407
भाग ९: http://www.misalpav.com/node/11409
भाग १०: http://www.misalpav.com/node/11410

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2014 - 10:48 pm | टवाळ कार्टा

वाखू केलीय :)

स्नेहल महेश's picture

29 Oct 2014 - 11:56 am | स्नेहल महेश

सगळे भाग आता वाचले
आम्हांला हा विचार का आला नाही याचं खूप वाईट वाटलं

प्रमोद देर्देकर's picture

29 Oct 2014 - 1:11 pm | प्रमोद देर्देकर

आता निमिष ४ वर्षाचा झाला असेल नै . पण अभ्या लेका तु कुठे गायबलायस. आता ते दोघं काय करतायत यावर पुन्हा एक लेख लिही की. आणि ते फटु काही आज दिसत नाहीयेत.