एक अस्वस्थ रात्र

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
16 Dec 2009 - 2:43 pm

रात्री एकचा सुमार असेल. काळी कभिन्न रात्र! थंडीचा कडाका अर्धवट झोपेत जाणवत होता. बेडरूममधला छोटा दिवा मिणमिणत होता. त्याचा पांढुरका मंद प्रकाश खवळलेल्या अंधाराला भगदाड पाडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. अंधाराने जणू त्या मंद आणि रडवेल्या प्रकाशाचे धड आपल्या मुठीत गच्च पकडून ठेवल्याचा भास होत होता. मी एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत पुन्हा गाढ झोपी जाण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. अर्धवट झोप आणि विचारांची अविरत चालणारी चक्की! शांत झोप लागत नव्हती.

झोपण्याच्या काही क्षण आधीच मित्राचा एसएमेस वाचला होता. कँन्सरशी एकहाती झुंज देत त्याच्या वडिलांनी शेवटी अटळ असलेली माघार घेतल्याचे वृत्त सांगणारा तो एसएमेस होता. मी सुन्न झालो होतो. वय जेमतेम ५०-५२ होते. एक पिता, एक पती शेवटी सगळ्यांना या अफाट जगात सोडून दूरच्या प्रवासाला निघून गेला होता. नेहमीचा भेटणारा, सतत झटणारा, प्रेमाने बोलणारा, कुटुंबाची काळजी वाहणारा एक शूर शिपाई धारातीर्थी पडला होता. कितीतरी वादळं सोसून, उन्हाचे चटके सहन करून दमायला आलेल्या त्या शरीराने कँन्सरच्या त्या क्रूर विषाणूपुढे आपल्या आयुष्यावरचा सूर्य पलिकडे लोटून दिला होता. मी मित्राला फोन केला. त्याच्या आवाजात तशी बर्‍यापैकी निश्चलता होती. मानसिक तयारी आधीच झाली होती असं सांगून त्याने फोन बंद केला. त्याने पुढची वाट स्पष्ट आखून ठेवल्याचे जाणवले. मला त्याचं कौतुक वाटलं. पाणी जसं उतारावरून वाहत जातं तसचं आयुष्य देखील काळाच्या उतारावरून वाहत जात असतं. ते कुणासाठीच थांबून राहत नाही. किंबहुना काळ कुणालाच प्रवाहात स्थिर थांबून रहायला परवानगी देत नाही. जे हा साक्षात काळाचा मनाई हुकूम झिडकारतात, त्यांना काळ क्षमा करत नाही.

मी उठलो आणि पाण्याचे दोन घोट पिऊन आलो. पुन्हा झोपेची आळवणी सुरु केली. एकदम आठवलं, दोन दिवसांपासून आईला थोडं बरं नव्हतं आणि मी कामाच्या गडबडीत फोन करायचा पण विसरून गेलो होतो. बाबांना देखील बर्‍याच दिवसांपासून थोडफार बरं नव्हतं. मागे भेटलो होतो तेव्हा अशक्तपणा त्यांच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होता. एरवी झेप घेतल्यागत चालणार्‍या बाबांची चाल मंदावल्या सारखी वाटत होती. काळाच्या प्रवाहात अडीअडचणींच्या आणि संकटांच्या खडकांवर आदळून पुढे जात असतांना शरीराची झीज तर व्हायचीच! शिवाय काळाने दिलेल्या जखमा ही मिरवाव्या लागतात... अगदी शेवटपर्यंत. माझ्या आधीच्या भयावह विचारांच्या पार्श्वभूमीवर मला माझी चूक बोचली. अगदी मळमळून आलं. आता करावा काय फोन? रात्र अंधाराची दारू ढोसून तर्र झाली होती. कसंबसं मनाला समजावलं आणि पडून राहिलो. बायको शांत झोपलेली दिसली. पण ती ही शांत झोपली असेल कशावरून? माझ्यासारखेच तिच्याही मनात काही थैमान चालू असेल का? उठवून विचारावे का? पुन्हा मी चूळबूळ करत पडून राहिलो.

उद्या सकाळी नक्की फोन करायचा ठरवून मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. पुन्हा आठवलं, पुढच्या आठवड्यात फ्लॅटचा ताबा घ्यायचाय. साडे चार लाख रुपये द्यायचेत; अजून एक-दोन मोठे खर्च आ वासून बघत आहेत. शेअर्स सगळे विकून टाकावेत का? पण सगळे मानेपर्यंत तोट्यात अडकले आहेत. आणि असे कितीसे पैसे मिळतील शेअर्स विकून? मग सोन्याचं किडूक-मिडूक पण विकून टाकलं तर? पण त्याने पण काय होणार म्हणा! फ्लॅटचे पैसे तर बँक देईल पण बिल्डर ताबा देतांना सगळी कामे पूर्ण करून देईल काय? लिफ्ट बसवून झालेली असेल काय? नसेल तर आई कशी चढू शकेल इतक्या पायर्‍या? रात्र अजूनच चेकाळली होती. रस्त्याने झिंगत जाणार्‍या दारुड्यासारखी रात्र अधिकाधिक बेताल वाटत होती.

चेहर्‍यावर थोडं पाणी मारण्यासाठी मी बाथरूममध्ये आलो. अरे, हे राहूनच गेलं. बाथरूमचं लिकेज कधीपासून एखाद्या भरजरी शालूवर ठिगळ लावल्यासारखं माझ्या डोळ्यांमध्ये ठसठसत होतं. च्यायला...काय चाललयं हे? या विचारांना काही अंत? की माणसाच्या अंतापर्यंत विचार माणसाचा अंत पाहतात? केवढा मोठा डाग आहे तो भिंतीवर! आणि बाहेरून पण केवढा मोठा डाग आहे; शिवाय शेजारच्या देशमुखांच्या बाथरूमचं पाणी चोवीस तास बाहेरच्या भिंतीवरून गळत असतं. तरी एकदा त्यांना समजावून सांगीतलं होतं. उद्या बघतोच आता. मी अंधारात धडपडत पुन्हा अंथरुणावर येऊन पडलो. झोप अंधारातच मला वाकुल्या दाखवत होती. घड्याळ पाहिलं. रात्रीचे तीन वाजत आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे साडे सहाला उठून, तयार होऊन ऑफीसला पळायचं होतं. रात्री इतकं जागल्यावर इतक्या सकाळी कशी जाग येईल या विचाराने माझी झोप आणखीनच जास्त उत्साहाने माझ्याकडे बघून खिदळायला लागली. ऑफीसमध्ये सकाळी अकरा वाजता एक महत्वाची मिटींग होती. आमच्या विभागाच्या प्रमुखासोबत आमच्यासारख्या कित्येक शूर शिपायांची मिटींग होती. विभागाचे रेव्हेन्यू टार्गेट आवाक्यात येत नसल्याने त्याबद्दल ऊहापोह करण्यासाठी म्हणून मिटींग ठेवली होती. मिटींग म्हणजे काय तर विभाग प्रमुखांनी केलेल्या काही जालीम उपायांची जाहिर घोषणा होणार होती. नवीन भरती बंद, काही कर्मचार्‍यांची अंतर्गत बदली, काहींच्या कामाच्या स्वरूपात बदल वगैरे विषय चर्चेला होते. काही महत्वाच्या प्रश्नांना हात घालायचा होता. माझं विचारचक्र आता त्या दिशेने भिरभिरत उडायला लागलं.

तितक्यात आठवलं, मिटींगच्या वेळेतच ऑफीसमध्ये जनरल हेल्थ चेकप कँप आयोजित करण्यात आला होता. जाऊन यावे का? काही होतयं का आपल्याला? पोट हल्ली जड-जड असतं, कधी-कधी खूप थकल्यासारखं वाटतं. छे...काहीतरीच काय, आपण तर अगदी म्हातारे झाल्यासारखा विचार करत आहोत; म्हणून मी कँपला न जाण्याचा निर्णय घेतला. आपण अजून तरूण आहोत असं जाणवून थोडा सुखावलो. पण आपल्या दाढीचे बरेच केस पांढरे उगवतात हल्ली आणि गालावरच्या कल्ल्यांमध्येही पांढर्‍या केसांचे प्रमाण वाढतेय ही जाणीव मनाला बोचली. पण आजकाल अगदी लहान वयात डोक्यावर पांढरे केस असणार्‍यांची संख्या काही कमी नाही. प्रदूषण, शहरी वातावरण, अन्नातली आणि पाण्यातली भेसळ, ताणतणाव ही सगळी कारणे आहेत केस पांढरे होण्याची; आपलं वय नव्हे! वा, कसं बरं वाटतयं. पण काय भरोसा? मागच्या दोन आठवड्यात आपल्याला घसा दुखणे, किंचित कोमट अंग असणे असले प्रकार बर्‍याचदा झाल्यासारखे वाटले. स्वाईन फ्लू तर नसेल? हो, परवा दादा सांगत होता. त्याच्या ऑफीसातल्या एका सहकारी बाईला स्वाईन फ्लू झाला होता आणि शेवटी ती गेली. बाप रे! एकदम असा ताप वगैरे येऊन माणूस मरतो? आपल्याला आला आणि आपणही मेलो तर? आपल्या बायकोचे काय होईल? आपल्या डोक्यावरच्या कर्जाचा बोजा तिला कसा पेलवेल? गळणार्‍या बाथरूमचे काम तिला एकटीला करवून घेता येईल का? आपल्या इन्शुरन्सचे पैसे तिला बिनबोभाट मिळतील का? अरे देवा....काय हे विचार? ही रात्र संपत का नाही?

मी पुन्हा घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडे चार वाजत आले होते. मी पांघरूण अगदी घट्ट ओढून घेऊन पडून राहिलो. विचारांच्या वादळात घुसळून निघतांना मला केव्हातरी डोळा लागला. कसल्यातरी आवाजाने पुन्हा झोप चाळवली. पांघरूण किलकिले करून बाहेर पाहिले. चांगलेच उजाडले होते आणि कोवळ्या उन्हाची एक तिरीप माझ्या अंथरुणावर पडलेल्या घड्याळावर पडली होती. वेळ लख्ख दिसत होती. सकाळचे पावणे आठ वाजत आले होते. मी हळूच उठलो. बायको चहा करत होती. मी फ्रेश झालो आणि लगेच आई-बाबांना फोन केला. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित होती आणि दोघांच्याही आवाजात उत्साह होता. मी फोन बंद केला आणि समोर वाफाळणार्‍या चहाचा हवाहवासा कप आला. बायकोने एक स्मित माझ्याकडे फेकून चहाचा कप माझ्या हातात दिला. तिच्याकडे बघून मला हायसे वाटले. चहाचे घुटके घेता-घेता मी पेपर चाळू लागलो. जवळच्या दत्त मंदिरात आश्वासक घंटानाद सुरू होता. मनाला एकदम तरतरी आली. मी तयार झालो आणि मनगटावर घड्याळ बांधून ऑफीसला जायला निघालो. सूर्याने आपली संजीवनी मुक्त हस्ताने उधळून देण्याचे काम चोख बजावले होते!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

16 Dec 2009 - 5:16 pm | स्वाती२

अस्वस्थता छान मांडलेय.

satish kulkarni's picture

16 Dec 2009 - 5:45 pm | satish kulkarni

कोलेजला असताना एक धडा होता.... "माणुस जगतो कशासाठी"... वि. स. खान्डेकरान्चा ... त्याची आठवण झाली एकदम....

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 4:33 am | पाषाणभेद

लेख छान झालाय.

अवांतर: अवांतर काळजी अवांतर वेळी करू नका.
(कामे लक्षात राहत नसतील तर डायरी करा.) :-)
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

प्राजु's picture

17 Dec 2009 - 5:52 am | प्राजु

छान मांडली आहे अस्वस्थता.
आवडला लेख.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

भानस's picture

17 Dec 2009 - 6:47 am | भानस

लेख आवडला.
(सध्या आम्ही त्या संजीवनीला मुकलोय...:( )

सोत्रि's picture

17 Dec 2009 - 10:00 am | सोत्रि

फार छान, शेवट जसा व्हावा असे वाटत होते अगदी तस्सा झालाय!

विष्णुसूत's picture

17 Dec 2009 - 7:23 pm | विष्णुसूत

थोडक्यात खुप सारे सांगुन गेला लेख..
उत्तम मांडणी.
आवडला.

समीरसूर's picture

18 Dec 2009 - 10:43 am | समीरसूर

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! खूप दिवसांनी काहीतरी लिहायला वेळ मिळाला. लिहून आणि प्रतिसाद वाचून बरे वाटले.

--समीर

भडकमकर मास्तर's picture

18 Dec 2009 - 4:08 pm | भडकमकर मास्तर

आवडले लेखन..
विचार एकामागून एक असेच छळतात... मस्त लिहिलंय...

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Dec 2009 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते

काही जखमा परत ओल्या झाल्या... वाचनखुण साठवली आहे. खूप सुंदर लिहिलंय.

बिपिन कार्यकर्ते

भोचक's picture

19 Dec 2009 - 6:27 pm | भोचक

या अवस्थेतून जाणं होतंच. त्यामुळे लेखन भावलं.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव