मलकापूरचा म्हातारा

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
7 Dec 2009 - 11:53 pm

बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो.
मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा. त्यामुळं लाल डब्याला पर्याय नव्हता. साधी गाडी कोल्हापूरमार्गे जायची. कोल्हापूरला थांबल्यानंतर सगळ्यात मोठं आकर्षण असायचं ते तिथला स्टॅंडबाहेर मिळणारा वडापाव खाणं. स्टॅंडच्या गेटबाहेर वडापावच्या भरपूर गाड्या रांगेने उभ्या असत. त्यांच्याकडे गरमागरम तळलेला गलेलठ्ठ वडा मिळे. मी कुठेही पाहिलेल्या वड्याच्या साधारण दीड ते पावणेदोन पट त्याचा आकार असे. त्याच्यासोबत पाव म्हणजे एक घसघशीत मोठा तुकडा असे. ग्रामीण भागात बेकरीत असे जाडजूड पाव तयार केले जातात. साधारण आपल्या शहरी ब्रेडच्या आकाराच्या अडीचपट त्याचा आकार असतो. वडा-पाव म्हणजे पावात घातलेला वडा नव्हे, तर वेगळा वडा आणि पाव, अशी ही कोल्हापुरी तऱ्हा. तरीही झणझणीत चटणी आणि त्यासोबत गरम वडा व पाव, असा बेत म्हणजे तोंडाला पाणीच सुटे. कोल्हापूरला थांबल्यानंतर धावतपळत जाऊन तो वडा घेऊन येणं आणि ओरपणं, हेच प्रवासाचं मुख्य आकर्षण होतं.
कालांतराने मात्र या गाड्या बंद झाल्या. बहुधा गुन्हेगारीमुळे पालिकेनं तिथे कारवाई करून रात्रीचे सगळे स्टॉल बंद करून टाकले. रात्रीच्या प्रवासाची सगळी गंमतच निघून गेली. मी पुण्याला कायमचा राहायला आल्यावर रत्नागिरी-पुणे वाऱ्या बऱ्याचदा सुरू झाल्या, पण आता हे आकर्षणही नव्हतं आणि माझाही प्रवास सेमीलक्‍झरीने सुरू झाला होता. सेमीलक्‍झरीचा प्रवासाचा मार्ग वेगळा होता. गाडी कोल्हापूरला न जाता परस्पर कोकरूडमार्गे मलकापूरला पोचते. त्यातून अंतर आणि तिकीटही कमी! पास मिळण्याचाही मुद्दा संपला होता...
कोकरूडच्या मार्गावर जाणारी बस मलकापूर स्टॅंडला काही सेकंदच थांबायची, तीही प्रवाशांच्या लघुशंकांसाठी. नंतर तातडीने वळून पुन्हा ती दोनच मिनिटांत थांबायची. सुरुवातीला झोपेच्या अमलाखाली मला काही कळायचं नाही. पण अधूनमधून जाग असायची, तेव्हा लक्षात आलं, गाडी चहाला थांबते. तेही मलकापूरच्या मुख्य बाजारातील एका अरुंद रस्त्यावर. एक म्हातारबाबानं तिथे आपली छोटीशी गाडी थाटली होती. आगेमागे बऱ्याच एसटी आणि इतरही ट्रक वगैरे गाड्या थांबलेल्या असायच्या. एकतर कऱ्हाड सोडल्यानंतर रत्नागिरीपर्यंत या मार्गावर कोणतंही मोठं शहर, ठिकाण नाही. महामार्गापासूनचा वेगळा रस्ता. त्यामुळं रहदारीही मोजकी. त्यामुळं कुठलं हॉटेल किंवा चहाचं दुकान वगैरे उघडं असण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे रात्रीच्या यात्रेकरूंना बहुधा चहाचा एवढा एकमेव पर्याय उपलब्ध असावा. तेव्हापासून आजतागायत मी ही गाडी याच ठिकाणी पाहत आलो आहे.
या म्हातारबाबांकडे मिळतो फक्त चहा आणि वडा. चहा द्यायची पद्धतही खास आहे. गाळण्याच्या ऐवजी असलेला कळकट, मळकट फडका. एका स्टोव्हवर रटरटत असलेलं एक ऍल्युमिनिअमचं पातेलं. त्याला वरून बंद ताटलीचं झाकण. या झाकणाला मध्यभागी एक मोठं छिद्र. त्या छिद्राच्या वर ठेवलेली चहाची किटली. त्या छिद्रातून आलेल्या वाफेनं किटलीतला चहा गरम होणार.
चहाची चव यथातथाच. बहुधा साखर जास्त आणि दूध कमी. तरीही, रात्री तीनच्या दरम्यान प्रवासातला टाइमपास म्हणून आणि थंडी उडवण्यासाठी गरम काहितरी प्यायला मिळण्याचं समाधानच जास्त. ड्रायव्हर-कंडक्‍टरही तिथे चहाचा आस्वाद घेतात. त्यामुळं प्रवाशांनाही गाडी सुटण्याचं टेन्शन राहत नाही. या टपरीवर थांबल्याशिवाय एसटी पुढे गेल्याचं मी तरी आजपर्यंत पाहिलेलं नाही.
म्हातारबाबांकडे मिळणारा वडा बहुतेक वेळा गारच. त्यातून तो मस्त तेलात माखलेला. व्हाइट कॉलर मध्यमवर्गीयानं चार हात लांबच राहावं, असा. तरीही, वड्यांचं ताट कधी भरलेलं मी पाहिलेलं नाही. बहुतेक वेळा तीन ते चारच वडे त्या ताटात दिसतात. एकतर त्यांना भरपूर खप असावा, किंवा म्हातारबाबा तेवढेच वडे बनवत असावा. मीही एकदोनदा तो वडा चाखल्याचं आठवतंय. (हल्ली हेल्थ-कॉन्शस झाल्यापासून घरचेही वडे-भजी खात नाही, ही गोष्ट अलाहिदा!)
गाडी तिथे सात ते आठ मिनिटंच उभी राहत असल्यानं या म्हाताऱ्याचं नाव, गाव, कूळ विचारण्याची संधी आजपर्यंत मिळालेली नाही. धंद्यावरची त्याची निष्ठा मात्र वाखाणण्यासारखी! जुलै-ऑगस्टच्या मुसळधार पावसातही त्याची गाडी कधी बंद असलेली मला आढळलेली नाही. त्याच्यासोबत मदतीला कुणी मुलगा, घरचं कुणीही कधी पाहिलेलं नाही. गाडी थांबल्यावर प्रवासी गाडीभोवती गोळा झाल्यावर अतिशय अदबीनं चहाचा ग्लास पुढे करण्याची त्याची अदाही विलक्षण.
अगदी गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून आलो, तेव्हाही म्हाताऱ्याकडचा चहा चाखला. मनस्वी गाडीत एकटीच झोपलेली असताना! ती पडेल की काय ही भीती होती, तशीच जागी झाली तर उठून बाहेर येईल की काय, हीदेखील! तर ते असो. या वेळी म्हातारबाबाच्या एका डोळ्यात फूल पडल्याचंही प्रकर्षानं जाणवलं. लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!

वाचा : मी आणि मनू-सॉल्लिड टीम!

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

7 Dec 2009 - 11:58 pm | शेखर

साधेच पण ओघवते लेखन.....

मदनबाण's picture

8 Dec 2009 - 12:21 am | मदनबाण

अभिजितराव लेखन आवडले...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

संदीप चित्रे's picture

8 Dec 2009 - 1:32 am | संदीप चित्रे

म्हातारबुवांचा आणि त्यांच्या टपरीचा फोटोही टाक रे इथे
बाकी लेख आवडला.
प्रत्येक प्रवासाशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात.
(पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या कर्जतच्या दिवाडकरांच्या बटाटेवड्यांचा फॅन) संदीप

शाहरुख's picture

8 Dec 2009 - 1:59 am | शाहरुख

एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!

व्वा ..

(जगण्यावरची निष्ठा वाढवायच्या प्रयत्नातील) शाहरुख

बाकी, कोल्हापूरच्या वड्यांचे कौतूक केल्याबद्दल आपले आभार..पिटुकले वडे खाणार्‍या पुण्यातील वडेशौकिनांची आम्हाला नेहमीच कीव वाटत आलेली आहे :-D

पाषाणभेद's picture

8 Dec 2009 - 2:28 am | पाषाणभेद

या वडापाव ने आमच्या अनेक भुका भागवल्यात बघा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Dec 2009 - 9:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिजित, लेखन आवडलं.

विद्यापीठाच्या खडकी/आयुका गेटच्यासमोर एक मावशी चहा आणि भजी विकतात. भजी, वडे मी कधी खाल्ली नाहीत, पण चहा प्यायला आमचं टोळकं बर्‍याचदा तिकडे जातं. चहासुद्धा काही महान असतो अशातला भाग नाही. पण त्या मावशींच्या चेहेर्‍यावर जी माया आहे ना, त्यासमोर जगातला कुठलाही चहा फिकाच पडेल.

अदिती

निमीत्त मात्र's picture

8 Dec 2009 - 9:05 am | निमीत्त मात्र

पण त्या मावशींच्या चेहेर्‍यावर जी माया आहे ना, त्यासमोर जगातला कुठलाही चहा फिकाच पडेल.

डोळे पाणावले!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Dec 2009 - 9:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरची प्रतिक्रीया अवांतर आहे, चांदणी मिळेल का? ;-)

आत्ता समजलं चहा का फिका पडेल ... डोळ्यातल्या पाण्याने चहाचा सत्यानाशच होणार ना!!

अदिती

अमोल केळकर's picture

8 Dec 2009 - 9:33 am | अमोल केळकर

लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
- वा क्या बात है !!
आज मलकापूरचा म्हातारा ग्लोबल झाला
मस्त लेख

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे's picture

8 Dec 2009 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

अभिजित चे लेखन नेहमीच आवड्णारे. कधी रिपोर्ताज कधी बोध कथा कधी प्रासंगिक. आपल्यातल वाटणारं
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2009 - 12:06 pm | बिपिन कार्यकर्ते

पकाकाकांशी सहमत.

बिपिन कार्यकर्ते

बाकरवडी's picture

8 Dec 2009 - 7:40 pm | बाकरवडी

अगदी जसच्या तस्स वर्णन,सेमी गाडी मलकापूरला स्टँडला थांबत नाही पण तिथे चहासाठी नक्की थांबते.
आम्ही पण रत्नागिरीला जाताना म्हातारबाबांकडचा चहा पिल्याशिवाय पुढे जात नाही. प्रवास अगदी डोळ्यासमोर उभा राहीला.
अवांतरः-हल्ली स्वारगेट- रत्नागिरी-गणपतीपुळे गाडी सुरू झालीये,ती पण कोकरूड्मार्गे जाते आणि चहाला तिथे थांबते..पण पुण्याला येताना चिपळूणमार्गे येते.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

मेघवेडा's picture

8 Dec 2009 - 7:46 pm | मेघवेडा

छान .. प्रवासाच्या आठवणी म्हणजे तशा खासच असतात नाही का?

--

मेघवेडा.

भानस's picture

8 Dec 2009 - 8:33 pm | भानस

म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही. तो त्याचे काम नेमाने व निष्ठेने करतोय.:) त्याच्यापर्यंत या सगळ्या सदिच्छा पुढच्या वेळी जाल तेव्हां पोचवा. ही पोच त्याला अतिशय भावेल.

"म्हातारबाबाचं असणं सगळ्या येणा~याजाणा~यांसाठी किती महत्वाचे ( वेगवेगळ्या भावनेतून ) आहे याची त्याला जाणीवही असणार नाही."

मला तरी ते म्हातारबाबा कृष्णामाई सारखे वाट्तात.........
संथ वाहते कृष्णामाई, तीरा वरल्या........