पांढरा कावळा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

झोळी पाठीवर घेतली. एक हात जमिनीवर टेकवून सावकाश उठलो. सूर्य टाळ्यावर आला होता. खडकाळ डोंगर. मृगजळांचं राज्य असलेली ती टेकाडं. हे बाभळीचं झाड किती वाळून गेलंय. कुठे एखादी पालवी दिसतेय का बघितलं. पण व्यर्थ.
खालच्या तुटक्या फांदीवर कावळा बसलेला आढळला. तो 'काव काव' असं दोनदा ओरडला. आणि इथेच आक्रीत घडलं.

देऊळ फारसं लांब नव्हतं. त्यावरची भगवी पताका अजूनही उंच फडकत होती. तिथूनच हात जोडले. सगळी त्याची कृपा. जगात कोट्यवधी कावळे आहेत. झाडून सगळे काळे. मग हाच कसा पांढरा?

"बगळा बिगळा आसंल, न्हाय तर काय" फटफटीवरचा इजारवाला म्हणाला.
"न्हाय न्हाय, वरडला त्यो. काव काव करून. आयच्यान" मी तुटकं चप्पल अंगठ्यात गच्च धरून म्हणलो.
"त्या तिथं टपरीवर च्यापाणी करा. येवढ्या उनाचं डोकं धरलंय तुमचं" इजारवाला काही ऐकायलाच तयार नव्हता.
"चला, दाखवतो तुमाला. आजून बसला आसंल"
"ये, सरक बाजूला. हात लावायचा नाय गाडीला. म्हनं पांड्रा कावळा. डोकंबिकं फिरलं काय?"
माणसाला इश्वास नाय. आमालाबी नसता. पण या डोळ्यांनी बघितलं हाय. त्यो पांढराच हुता.

फटफटीवाला गेला, तसं टपरीवर गेलो. टपरी कसली, लाकडी खांबांवर उभारलेलं नुसतंच एक छप्पर. तिथल्या म्हाताऱ्या बाईनं स्टोला पंप मारून चहा बनवला.
"या भागात पाण्याची लय आबाळ" मी घोट घेत विषय काढला.
"आवो, आठ येकार जिमीन हाय. समदी पडीक. दुनी ल्याक गेल्यात शेरात. मला म्हातारीला येकलं सुडून. आता ह्ये हाटेल टाकून कसंबसं जगायचं बघा." म्हातारी झोपेतनं उठल्यासारखी नुसती बडबडत सुटली.
"तसं नव्हं. ह्या भागात लैच वणवण" मी आणखी एक घुटका घेतला.
"काय सांगू तुमाला, ह्या सरकारचा मुडदा बशिवला. धरान बांदलंय तिकडं मंबैलान पुण्याला. हिकडं आमी आमच्या मौतीनं मरणार.."
मी तिला मध्येच थांबत म्हणलं."कावळं लय हिकडं. है ना?"
"आं?" वय झालंय म्हातारीचं.
"कावळा दिसला मगाशी, पांढराच. त्या तिथं बाभळीवर" मी बाहेर येऊन ती बाभळ दिसतीय का बघितलं.
"आसं व्हय" लहान लेकराला बोलावं तशी ती म्हातारी बोलली.
"पण पांढराच हुता."
"कायकी. काय लागलं तर सांगा. बिडीकाडी बी ठिवलीय. मी जरा लवांडती." म्हातारीनं पोतं हातरलं होतंच. तशीच लवांडली.

मग झोळी घेऊन पुन्हा उठलो. फुफाट्याच्या वाटेनं मैलभर चाललो. मातीची बरीचशी घरं लागली. एकाच्या पडवीत लाल डब्बा दिसला. कुतूहलाने तिकडं गेलो. लगेचंच एक पोरगं पळत आलं. "यीतू का लावायला फोन? का दीव लावून?"
म्हटलं, काय हे? "काइनबॉक्स हाय" तो पोऱ्या म्हणाला.
मी चिठोरं बाहेर काढलं.

"गांजा पिलाय का तू? का हातभट्टी?"
"आरं, खरंच तर"
"काय खरंच? आसं कुठं आसंतंय व्हय"
"तू यिवून बघ"
"फूटू काढलाय का?"
"कशाचा?"
"कावळ्याचा!"
"बॅटरी संपलीय"
"मजी तू पेलाय"
"आसल्या ठिकाणी यिवून कोण कशाला पील?"
"मग फेसबुकवर अपडेट टाक. फुटू काडून. चल ठेवतो."
मी फोन ठेवला, तेव्हा ते पोरगंही भेदरून गेलं होतं.

सूर्य मावळायला अजून अवकाश होता. देऊळ आता टप्प्यात आलं होतं. दिवसाउजेडी गाठणं चांगलंच. राती चोराचिलटांची भीती. झोळी उचलली आणि पुन्हा चालू लागलो. मैलभर चाललो असेल नसेल, मागून एक टेम्पो ट्रॅक्स भरधाव आली. आतून एक अवखळ स्त्री हातात माईक घेऊन खाली उतरली. तिचा पुरुषी पेहराव बघून माझी पाचावर धारण बसली.
रोल! कॅमेरा! अ‍ॅक्शन!
"क्या आपने वाकई हरे कौवेको देखा है?"
"आज की ताजा खबर!! इस गांव मे रहेते है हरे कौवे"
"MAN BEHIND THE WHITE CROW!!"

"हे, आर यू दॅट पर्सन, हू सीन ए व्हाइट क्रो?" ताज हॉटेलमध्ये मला एकाने विचारलं.
"Yes, of-course. Actually I am going to temple named Datta. and I saw the crow. I am the lucky."
"वहाव..!" शँम्पेनची बॉटल फोडून आख्खी माझ्या हातात देत तो म्हणाला.
मी एक घोट घेतला, तेव्हा पोर्चमधल्या चिअर्सलीडर्सनी जल्लोश सुरू केला. "एंजॉय" म्हणून तो एक जण निघून गेला. नंतर मला कळलं की तो शेन वॉटसन का कुणी होता.

"ही कावळ्यांची अतिशय दुर्मीळ जमात आहे. अश्मयुगात जेव्हा नियँडरथल शिकारीला बाहेर पडला, तेव्हा त्याने हत्यारे वाहून नेण्यासाठी या कावळ्यांचा उपयोग केला. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात यांचे वास्तव्य होते. ते अणकुचिदार चोचीने सील माशांची शिकार करीत. मानवाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे हे कावळे ख्रिस्तपूर्व ४००० साली नामशेष झाल्याचे उल्लेख आहेत. आजच्या युगात त्याचे दिसणे ही ऐतिहासिक घटना आहे. हा पुरुष नाही, महापुरुष आहे." बोट दाखवून प्रोफेसरांनी माझे अभिनंदन केले. ऐंशी किलोचा हार माझ्या गळ्यात पडला. त्याचे चिक्कार फोटो देशोदेशींच्या वृत्तपत्रांत छापून आले.

आठमजली माझ्या घरात मी टॉप फ्लोअरला राहतो. वरती कावळ्याची भव्य प्रतिकृती टांगलेली आहे. त्याच्या दर्शनाला पंतप्रधान जेव्हा आले होते, तेव्हाच मी खालच्या मजल्यावर आलो होतो. एरव्ही कधी येत नाही. प्रधानमंत्री स्वतः म्हणाले होते, "आप जैसे लोगोंकी इस देस को जरूरत है|" मी भावविवश होऊन त्यांना कडकडून मिठीच मारली. पंतप्रधानांनी कावळ्यावर संशोधन करण्यासाठी मला अडीच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तो चेक मी पाठीमागच्या खिशात ठेवला. हॉलच्या एका कोपऱ्यात डोनाल्ड आणि मेलेनिया उभे होते. मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा "लव्हली, लव्हली.." म्हणून ते टाळ्या पिटायला लागले.
"Just tell me bro. What exactly you have seen. I wanna hear it again & again" मेलेनियाला चुप करत डोनाल्ड म्हणाला आणि सारा आसमंत दुमदुमला.
"पांढरा कावळा! मी पांढरा कावळा बघितला!!" मराठी बाणा जपत मी आरोळी ठोकली.

"क्काय?? पेलाय का तू? का गांजा फुकून आलाय?" दत्ताच्या मंदिरातला पुजारी घामाघूम होऊन म्हणाला.
"खरंच दिसला वो. दोन कोसावर बाभळीचं झाड हाय. तिथंच बसला हुता." झोळी खाली ठेवत मी म्हणालो.
"आसंल. मग?"
"मग काय? पांढरा हुता त्यो."
"आरं, पांढरा आसला म्हूणून काय त्याचं लोणचं घालू?"
जरा डोकं खाजवलं. पुजारी राग देऊन निघून गेला. बाजूची म्हातारीकोतारी सावरून बसलेली. मी गोधडी काढून फरशीवर हातरली. उशीला झोळी घेतली. दिवसभर चालून चालून खूपच दमून गेलो होतो. पडल्या पडल्या डोळा लागला. तेवढ्यात मला गदागदा हलवून उठवत रविना टंडन म्हणाली, "सोने से पहेले एक गुडनाईट किस तो बनता है बॉस"
आणि मी "अभी नही, जाओ" करत पायथ्याशी बसलेल्या कुत्र्याला लाथ घातली.

Footer

प्रतिक्रिया

कसलं भारी लिहिता हो तुम्ही! नियँडरथल ते रवीना व्हाया ट्रंप _/\_

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2017 - 5:41 am | अभिजीत अवलिया

मस्त लिहीलयंं.

एमी's picture

18 Oct 2017 - 9:49 am | एमी

हा हा \(◎o◎)/

नाखु's picture

18 Oct 2017 - 10:26 am | नाखु

जांगड गुंत्ता

वढापच्या तिकटीव थांबलेल्या नाखु

मोदक's picture

18 Oct 2017 - 10:37 am | मोदक

हा हा हा... भारी लिहिता तुम्ही..!!

बाबा योगिराज's picture

18 Oct 2017 - 3:44 pm | बाबा योगिराज

जव्हेर बाप्पू..........लैच झ्याक लिवलया. त्ये रविना बै ला आमचा बी राम राम सांगा...

बाजीप्रभू's picture

18 Oct 2017 - 3:44 pm | बाजीप्रभू

पराचा कावळा आणि कावळ्याचा लेख!!.... आवडेश
मजा आली.

वरुण मोहिते's picture

18 Oct 2017 - 3:56 pm | वरुण मोहिते

लिहता हो ...

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 4:13 pm | सविता००१

कुठून कुठे... पण मजा आली वाचायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2017 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी. हहपुवा झाली. लिहिते राहा.
लेखनीत दम हाय तुमच्या, हे मागच बोल्लो होतो.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

19 Oct 2017 - 9:58 am | चांदणे संदीप

JD नंतर हे वाचलं आणि उरलेल्या डोस्क्याचं मुस्काट मारून घेतलं! :P

Sandy

भीमराव's picture

19 Oct 2017 - 10:43 am | भीमराव

भारी आहे,
दिवास्वप्न तर जबरी खतरा आहेत १दम.
तरी पन खरच आसतोय पांढरा कावळा.
मी बघीतलाय स्वतःच्या डोळ्यांनी. नव्वीत हुतो मी तवा.
रानात गेल्तो गवात आनाय, झाडाव बघीतलं तर थोडा तांबुस थोडा पांढरा, डाय गेल्याल्या सारखा दिसत हॉता. मंग गवात घ्युन आलो घरी, आयला सांगीतलं तर आय म्हनली बगळा न्हायतर कांड्याकरकुचा आसल पण मी म्हण्ल नाय कावळाच हुता. क्रॉव क्राव करुन वरडत हुता. मंग आय म्हन्ली पालक्या तुला कामं नकोत कायतर नविन टुम काडुन खेळत बसतु. मंग मी आज्जी ला सांगीतलं मला पांढरा कावळा दिसला, आज्जी म्हणली १ हात लाकुड आन चार हात ढपली आसलं बंद कर, माझ्या आक्कया जिनगीत मी न्हाय बघीतला न तुला दिसतुय व्हय. कावळाय त्यो. काळाच आसतुय.
मंग मी वडाखाली ख्यळत बसलो. घराफुडं रस्त्याकडंला म्होट्ट वडाचं झाडय. मंग लय कावळं वरडाय लागलं, मी मंग निट बघीतलं तवा माझा मघाच्चाच पांढरा कावळा हुता आन त्याला बाकीची टोच्या मारत हुती, मी पळत गेलो, म्हातारी बसल्याली वकाळ शिवत, म्हनलं आज्जे माझा पांढरा कावळा वडाव युन बसलाय आज्जी न दोघींन्ला बी दाखावलं तर म्हनत्यात कशा, ह्यो पांढरा कुटय ह्यो तर तांबुसा दिसतुय.

जव्हेरगंज's picture

19 Oct 2017 - 8:35 pm | जव्हेरगंज

हा हा!
हा तांबूस कावळा पण मस्त!!!

रंगीला रतन's picture

25 Oct 2017 - 9:19 pm | रंगीला रतन

हा हा हा!
"गांजा पिलाय का तू? का हातभट्टी?"

संग्राम's picture

19 Oct 2017 - 2:34 pm | संग्राम

क्लिक करुन ठेवाचा ना :-)

हेहेहेहेहे, रविना टंडन असतीय व्हय तुमच्यात? भारीच की.

पद्मावति's picture

19 Oct 2017 - 9:52 pm | पद्मावति

मस्तच!

कविता१९७८'s picture

20 Oct 2017 - 11:51 am | कविता१९७८

नेहमीप्रमाणे छान लेखन

शिव कन्या's picture

21 Oct 2017 - 9:13 am | शिव कन्या

मस्त जमून आलेय . शुभेच्छा.

पुंबा's picture

23 Oct 2017 - 3:36 pm | पुंबा

क्वालिटी लिखाण!!

मित्रहो's picture

25 Oct 2017 - 5:44 pm | मित्रहो

लय भारी

मारवा's picture

25 Oct 2017 - 8:04 pm | मारवा

अगदी मोजक्या शब्दात गरागर फिरवुन आणलतं दोन चार निरनिराळ्या जगातुन
रोलर कोस्टर एकदम फास्ट जणू
मजा आली वाचतांना

रंगीला रतन's picture

25 Oct 2017 - 9:23 pm | रंगीला रतन

जव्हेर भौ, नेमी परमाने ...झकास.

Mahesh Bhalerao's picture

28 Oct 2017 - 4:46 pm | Mahesh Bhalerao

कथा आवडली !

सुबोध खरे's picture

30 Oct 2017 - 11:32 am | सुबोध खरे

आमची आई म्हणते माहेरचा कावळा सुद्धा गोरा असतो. येथे खरच गोरा कावळा होता. म्हणजे त्याची काव काव सुद्धा तशीच होती त्यामुळे हा पक्ष बदललेला बगळा नाहीं अशी खात्री पटली
प्रत्यक्ष पांढरा कावळा असतो आणि राणीचा बाग येथे मिपा कट्टा झाला होता त्याचा फोटो खालील दुव्यात पाहून घ्या.
http://www.misalpav.com/comment/549641#comment-549641

तुम्ही मिपावरच्या सर्वश्रेष्ठ लेखकांपैकी एक आहात.

वपाडाव's picture

8 Jan 2019 - 11:29 am | वपाडाव

असेच म्हणतो...