'आयटी'तल्या मोरूची कवने

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
7 May 2017 - 5:06 pm

गगनचुंबी चकचकीत इमारतीतल्या
आरस्पानी स्वागतिकेच्या डोक्यामागे
तेजोवलयासारख्या लकाकणार्‍या
भल्यामोठ्या टी व्ही संचावर
हसर्‍या गण्याचा फोटू पाहून
मोरू क्षणभर थबकला ...

जाड भिंगाच्या चष्म्यामागचे बोलके डोळे
चेहर्‍यावर स्पष्ट दिसणारे बुद्धीचे तेज
नखशिखांत उंची वस्त्रप्रावरणे ल्यालेल्या
जेमेतेम चाळीशीत कैलासवासी झालेल्या
गण्याच्या फोटूमागचा शोकसंदेश वाचला
अन मोरूच्या पायातले त्राणच गेले ...

अमुकचा मुलगा सोळा तास अभ्यास करतो
आपला सगळा आनंदच आहे
कामचोर कारकुंड्या तीर्थरूपांच्या आवाजातला उपहास
कितीही काम केले तरी त्याने कोणी मरतो का?
काय धाड भरली आहे तुला?
मॅनेजरच्या आवाजातली चीड
सरकारी नोकरीवाला शेजारणीचा नवरा
रोज रोमँटिक मूडमधे परततो
मुलाचा तास दोन तास अभ्यास घेतो
किमान व्हॉट्सअ‍ॅप केलेल्या यादीप्रमाणे
दूध, भाजी तरी आणत जा येताना
बायकोच्या बोलण्यातले वैफल्य
वॅगनरच्या सिंफनीतल्या स्वरमेळासारखे
सगळे आवाज मोरूच्या कानात घुमायला लागले
मोरू मटकन समोरच्या गुबगुबीत सोफ्यावर विसावला ...

आत्ताच्या आत्ता तडक परत फिरावे
लिफ्टने तिसर्‍या मजल्यावर जावे
ऑफिसातच घर थाटलेल्या
माजुरड्या घटस्फोटित मॅनेजरच्या
कानाखाळी जाळ काढत बोलावे
होय कामच्या अतिताणाने माणूस मरतो
आमचा गण्या हकनाक गेला
त्याचा खून झाला, तूच हा खून केला!
प्रद्युमन, दया, फ्रेडी. अभिजीत
कुणालाही सिद्ध नाही करता येणार कदाचित
तेव्हा उगाच बसची वेळ चुकायला नको
अशा हिशेबानी मोरू मेट्रोलिंकच्या थांब्याकडे निघाला...

रोजच्याप्रमाणेच ट्रॅफिक जाममधे अडकून पडलेल्या बसमधे
मोरूच्या इवल्याश्या मेंदूतला विचारांचा प्रवाहदेखील जाम झाला होता
कुंपणीने जॉइन होताना फुकट दिलेल्या टुकार सॅकमधून
मोरूने पाण्याची बाटली काढली आणि भसकन तोंडाला लावली
थोडे ताजेतवाने वाटल्यावर मोरू विचार करायला लागला
आतल्या आत काहीतरी तुटले आहे, निखळले आहे
काहीतरी सलते आहे अशी पुसटशी जाणीव झाली
आणि मोरूने अस्वथ होउन कपाळावरचा घाम पुसला ...

खोलवर कुठेतरी एक हंबरडा फुटतो आहे
काहीशा साहित्यिक भाषेत सांगायचे
तर या हुंदक्याला अभिव्यक्त केलेच पाहिजे
हे मोरूला अगदी तीव्रतेने जाणवले
मन मोकळे करावे तरी कोठे
मग मोरूला अविमामा आठवले
सतत यश मिळाल्याने मुर्दाड झालेले
एकाच कंपनीत टाचा घासत
उच्चपदस्थ होउन निवृत्त झालेले मामा
यांना काही सांगायला जावे
तर पानीपत ते कारगिलचे दाखले देतील
मिळाली संधी की उपदेशामृत पाजतील
देशासाठी काही करणे वेगळे
लार्जर दॅन लाईफ मिशनसाठी झिजणे वेगळे
आणि बिनलायकीच्या उच्चपदस्थांच्या
नाकर्तेपणा आणि हेकटपणामुळे
दिवसरात्र एक करून कष्ट करत
चडफडत हेलपाटणे वेगळे
इतका साधा फरक
या गलेलठ्ठ बुडाच्या आणि थुलथुलीत देहाच्या
विश्ववंदनीय निवृत्त व्हाईस प्रेसिडेंटला कळू नये?
मोरूने अविमामांच्या नावावर फुली मारली ...

नवी कामवाली बाई मिळेपर्यंत बायको समोर अभिव्यक्त वगैरे होंणे
या नुसत्या विचारानेच मोरूचा थरकाप उडाला
विचारांच्या वांझोट्या तंद्रीतच मोरू बसमधून उतरला
खाली मान घालून लांब लांब ढांगा टाकत घराकडे जाताना
मोरूची खात्री झाली कि अभिव्यक्त होण्याजोगे कुणी माणूस
आपल्या परिचितांमधे तरी अगदी नक्की नाही
एकाकीपणाच्या त्या उदास जाणिवेने
मोरू आतल्या आत कळवळला ...

कपाळावर आठ्या घालतच बायकोने सदनिकेचे दार उघडले
मोरू हातात रिमोट घेत कोपर्‍यातल्या नेहमीच्या खुर्चीत विसावला
इतक्यात आपले भुंडे शेपूट हलवत दुडक्या चालीने पळत
छोट्या 'मायलो'ने आनंदाने मोरूच्या दिशेने झेप घेतली
मोरूच्या मांडीवर बस्तान बसवत तो मोरूचे गाल चाटायला लागला
मोरूने त्याला अलगद कडेवर घेतले
रिमोटचे बटन कचकन दाबत टीव्ही बंद केला
आणि दहा मिनीटात येतो ग अशी साद देत
मोरू सोसायटीमधल्या बगिचाकडे निघाला ...

जन्मोजन्मी जिची आस असते
अशी सहवेदना की सहभावना
एकटक मोरूच्या क्लांत चेहर्‍याकडे बघणार्‍या
मायलोच्या डोळ्यात मोरूला दिसली
आपल्यासारखा बिनकण्याचा टुकार चिडचिडा मालक
त्याची कजाग आणि तुसडी बायको
कुत्र्याला खेळणे समजणारा त्याचा छळवादी मुलगा
रोज मिळणार्‍या काही मिलीग्रॅम पेडिग्रीसाठी
या सगळ्यांसमोर शेपूट हलवणारा मायलो
कुठेतरी त्याचे आणि आपले प्राक्तन सारखेच आहे
तेव्हा आपल्याबद्दल खरी कणव असेल तर यालाच
असे असणे अगदी साहजिक आहे असा विचार करत
मोरू कडेवर बसलेल्या मायलोसमोर अभिव्यक्त व्हायला लागला ...

'पग'चे आयुष्य दहा वर्षे असते की पंधरा
मोरूला नेमके आठवेना
पण बॉर्डरलाईनच्या बरेच वरती गेलेली कोलेस्टेरॉल
अधून मधून वाढणारा रक्तदाब
दिवसरात्र एक करून छळणारा मॅनेजर
अजाईलच्या नावाखाली लादलेले
रोज नव्याने थकवणारे 'जुगाड' काम
हे सगळे झेलताना
आपल्या गण्या होणे चुकणार नाही
तो दिवस येईपर्यंत
रोज 'अभिव्यक्त' होण्यासाठी
देवा, 'मायलो' ला दीर्घायुष्य दे
गण्याच्या आत्म्याला सद्वति दे
अशी मनातल्या मनात प्रार्थना करत
डोक्यावरचे ओझे बरेच हलका झालेला मोरू
खांदे पाडून घराकडे परत निघाला ...

काहीच्या काही कवितामुक्तक

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

7 May 2017 - 6:13 pm | यशोधरा

:)

पैसा's picture

7 May 2017 - 6:21 pm | पैसा

:( _/\_

:-) त्याने कामाचा उत्सव करायला पाहिजे. मग असे विचार मनात येणार नाहीत. बाकी भापो.

सतिश गावडे's picture

7 May 2017 - 8:39 pm | सतिश गावडे

कामाचा उत्सव करण्यासाठी तुम्ही नोकरदार नको. नोकरी करणारा माणूस काय "घंटा" कामाचा उत्सव करणार? =))

कवितेत व्यक्त झालेल्या भावनांमध्ये तथ्य असले तरी अशी वेळ येण्यास मोरुच काही प्रमाणात जबाबदार असतो. आयटीवाल्या मोरुला राहायला टू किंवा थ्री बिएचकेच हवा असतो, वन बिएचकेत त्याचा श्वास गुदमरतो, त्याच्या आई वडीलांना किंवा घरी येणार्‍या पाहुण्यांना त्याला स्वतंत्र बेडरुम द्यायची असते. आयटीवाल्या मोरुला आपल्या बाळाला किंवा बाळीला पहिल्या पेक्षाही खालच्या वर्गांना वर्षाला एक लाख रुपये घेणार्‍या "बेस्ट" शाळेत टाकायचे असते. अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नविन लॉन्च होणार्‍या मोबाईल फोनवर तो "टॅब" ठेऊन असतो. एव्हढं सगळं जमवायचं म्हटल्यावर आयटीवाल्या मोरुला त्याची किंमत मोजावीच लागणार.

आयटीमध्ये एक विनोद कायम सांगितला जातो, If you don't love your job .. Take a home loan ". U will start loving it. हा विनोद खुप काही सांगून जातो.

अभिजीत अवलिया's picture

8 May 2017 - 7:22 am | अभिजीत अवलिया

ऐपत नसताना २ बीएचके घेऊन कंपनी कधी तरी आॅनसाईट पाठवेल आणी कर्ज कमी करता येईल ह्या आशेवर रोजचा दिवस कुंठत ठकलणारे, प्ले ग्रुपला फक्त १४०००० फी भरुन रोज वाढत्या शैक्षणिक खर्चाची चिंता करणारे आणि १० वर्षे नोकरी झाल्यावर देखील पीएफ (तो पगारातूनच कट होत असल्याने काय करणार म्हणा)सोडून ५ पैशाची गुंतवणूक नसणारे बरेच मोरु माझ्या आजूबाजूला आहेत. मला आता अशा स्वत: आपल्या हाताने पायावर धोंडा पाडणार्या मोरुंच्या गोष्टी ऐकायची सवय झाली आहे वाईट वाटणे केव्हाचेच बंद झालेय.

मितान's picture

7 May 2017 - 6:53 pm | मितान

भारीच !!!! आवडले !

पद्मावति's picture

7 May 2017 - 7:56 pm | पद्मावति

:(

संजय क्षीरसागर's picture

7 May 2017 - 8:31 pm | संजय क्षीरसागर

मोरूला स्वतःचा गण्या होऊ द्यायचा नसेल तर कुणी आकाशातला बाप्पा मदत करेल ही आशा व्यर्थ आहे.

साहीरनं प्रेयसीला उद्देशून लिहीलेला हा शेर अशा वेळी मला नेमका आठवतो !

अगर तुझमे हिंमत है तो दुनियासे बग़ावत करले,
वर्ना, माँ- बाप जहाँ कहेते है, शादी करले |

पण त्याचवेळी त्यांच्याकडे लग्न करण्याची हिम्मत नव्हती हे हि तितकंच सत्य . सगळं असून माणसाने स्वतःचा राग करावा याच उत्तम उदाहरण साहिर .

कवितानागेश's picture

8 May 2017 - 12:18 am | कवितानागेश

ह्म्म्म..

आदूबाळ's picture

8 May 2017 - 10:39 am | आदूबाळ

वा! काय लिहिलंय! एक नंबर!

रातराणी's picture

8 May 2017 - 11:16 am | रातराणी

+१
एक नंबर!

इडली डोसा's picture

8 May 2017 - 11:55 am | इडली डोसा

जाता जाता - मोरूला मिपावर खाते उघडुन व्यक्त होता येईल =)

अभ्या..'s picture

8 May 2017 - 11:59 am | अभ्या..

ओहोहोहोहो,
काय लिहिलेय,........... केवल उच्च.
.
शेवटच्या ओळीत उगाच तो खांदे पाडुन निघाल्याएवजी पडलेले शेपुट दिसले.

बबन ताम्बे's picture

8 May 2017 - 12:27 pm | बबन ताम्बे

आवडली कवीता.

तेजस आठवले's picture

8 May 2017 - 5:14 pm | तेजस आठवले

मस्तच

पाटीलभाऊ's picture

8 May 2017 - 6:33 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय

जव्हेरगंज's picture

8 May 2017 - 11:17 pm | जव्हेरगंज

लैच भारी!!!!

Dhananjay Borgaonkar's picture

9 May 2017 - 6:47 pm | Dhananjay Borgaonkar

मस्तच लिहिलय. मला पटकन कंनेक्ट झालं कारण आपल्या ऑफिसमधल्याच या बॅक टु बॅक घटाना घडल्या.
जेमतेम 40-45 चे होते. हार्ट अ‍ॅटॅक. एक तर झोपेतच गेले. माझ्या चांगल्या परिचयाचेन होते. ही वॉज अ गो गेटर.
खरच धक्का बसला ऐकुन. असो. कदाचित अतिकाम, तणाव, कामाचं स्वरूप असेल. नकाकी काय माहित नाही.
महत्वाचं म्हणजे पूर्ण निर्व्यसनी माणुस.

मूकवाचक's picture

12 May 2017 - 8:26 pm | मूकवाचक

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद!

अर्धवटराव's picture

19 May 2017 - 11:34 am | अर्धवटराव

खतरनाक मांडलय रे भावा.

थेरॉटीकली कितीही म्हटलं कि कुठे थांबायचं हे ज्याचं त्याने ठरवायला हवं, आपण आपल्या मर्जीने वागावं, वगैरे वगैरे.. तरि शेवटी नशीब नावाची गोष्ट असतेच. नियतीला चॅलेंज करु शकत नाहि कोणि.