धागा सुरू करायला जरा उशीर झाला. गॅरी ट्रुमन लेख लिहितील असे वाटत होते. असो.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर थोडक्यात माझे मत लिहीत आहे.
_______________________________________________________________
(१) पंजाब
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ११७
काँग्रेस ४६ जागा (४०.०९ % मते),
अकाली दल ५६ जागा (३४.७३ % मते) + भाजप १२ जागा (७.१८ % मते) = एकूण ६८ जागा (४१.९१% मते)
बसप शून्य जागा (४.७३ % मते)
पीपल्स पार्टी इन पंजाब (५.०४ % मते)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा १३
काँग्रेस ३ जागा (३३.१० % मते),
अकाली दल ४ जागा (२६.३० % मते) + भाजप २ जागा (८.७० % मते) = एकूण ६ जागा (३५.०० % मते)
आआप ४ जागा (२४.४० % मते)
या दोन्ही निवडणुकीवरून असे दिसते की काँग्रेस व अकाली दल-भाजप यांच्यात जेमतेम १.९० % मतांचा फरक आहे. २०१२ व २०१४ मधील मुख्य फरक म्हणजे पंजाबच्या राजकारणात आआपचा प्रवेश. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आआपने तब्बल २४.४० % मते मिळवून १३ पैकी ४ खासदार निवडून आणले होते.
पंजाबच्या राजकारणात १९६६ पासून सातत्याने अकाली दल व काँग्रेस एकाआड एक निवडणुकात सत्ता मिळवित होते. ही परंपरा २००७ पर्यंत सुरू राहिली. २०१२ मध्ये ही परंपरा खंडीत झाली व अकाली दल-भाजप युती २००७ पाठोपाठ २०१२ मध्ये सुद्धा निवडून आली. परंतु आता खूप बदल झाला आहे. सलग १० वर्षे सत्तेत असल्याने या सरकारविरूद्ध प्रस्थापितविरोधी लाट मोठ्या प्रमाणात आहे. आआपच्या स्वरूपात एक अजून पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे निवडणुक अतिशय रंगतदार झाली आहे. आपल्याला किमान ९०-१०० जागा मिळतील अशी हवा आआपने गेले वर्षभर निर्माण केली होती. परंतु त्यात तथ्य नाही. आआप म्हणजे निव्वळ नाटकीपणा हे सर्वत्र दिसून येत आहे. दिल्ली निवडणुकीप्रमाणे आआपने पंजाब्यांना देखील भरमसाठ आश्वासने दिली आहेत. शालेय विद्यार्थ्याना लॅपटॉप, मालमत्ता कर रद्द करणे, दलित उपमुख्यमंत्री, ५ रूपयात पोटभर जेवण, वीजदरात ५०% घट, सर्व नागरिकांना खाजगी इस्पितळात ५ लाखापर्यंत कॅशलेस आरोग्यविमा, वाळू व दारू विक्रीचे परवाने युवकांना देणार, शेतकर्यांना कर्जमाफी, उद्योगांना प्रति युनिट ५ रूपये दराने वीज, सर्वत्र मोफत वायफाय . . . अशी भरमसाठ अव्यवहारी आश्वासने आआपने दिली आहेत.
या निवडणुकीत अकाली दल-भाजप युतीचा पराभव नक्की मानला जातो. परंतु राजकारणात काहीही घडू शकते. भाजपने १ महिन्यांपूर्वीच चंदिगड महापालिकेत २६ पैकी २० जागा जिंकल्या आहेत. केजरीवाल व आआपच्या नेत्यांच्या ढोंगीपणामुळे आआपची २०१४ ची हवा राहिलेली नाही. आआपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आपापसात खूप भांडणे आहेत. त्या तुलनेत काँग्रेस चांगल्या परिस्थितीत आहे. या सर्व प्रकारात सर्वात जास्त फजिती झाली असेल तर ती सिद्धूची. आआपच्या भरवशावर राहून सिद्धूने नियुक्त खासदारपद सोडून दिले. आआपने आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे व आपल्या पत्नीलासुद्धा तिकीट द्यावे ही त्याची मागणी होती. केजरीवालांनी त्याला झुलवत ठेवून शेवटी हातात ठेंगा दिला. त्यामुळे सिद्धूने आआपमध्ये न जाता स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर काँग्रेसशी बोलणी करून स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ज्या राहुलला सिद्धूने शाळेत जायचा सल्ला दिला होता व काँग्रेसवर अनेकवेळा कठोर शब्दात टीका केली होती, त्याच सिद्धूने राहुलची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे अशी त्याची मागणी होती. परंतु सर्व स्थिरस्थावर झाल्यावर राहुलने अमरिंदर सिंग हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केल्याने सिद्धूची जाहीर फजिती झाली आहे.
माझ्या अंदाजानुसार, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल व अकाली दल-भाजप युती दुसर्या क्रमांकावर असेल. आआप तिसर्या क्रमांकावर असेल व आआपच्या पाठिंब्याने काँग्रेस सरकार स्थापन करेल. अकाली दलाबरोबरील युतीत भाजप ११७ पैकी फक्त २३ जागा लढवितो. त्यामुळे भाजपची वाढ खुंटली आहे. अकाली दलाच्या सर्व दोषांचे खापर भाजपला सहन करावे लागते. राज्यात वर्तमान सरकारविरोधी भावना असली तरी लोकभावना फक्त अकाली दलाविरूद्ध आहे, भाजपविरूद्ध नाही. या निवडणुकीनंतर भाजपने अकाली दलाशी फारकत घेऊन स्वतंत्रपणे उभे राहिले पाहिजे.
__________________________________________
(२) मणीपूर
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ६०
काँग्रेस ४२ जागा (४२.४२ % मते),
भाजप शून्य जागा (२.१२ % मते)
राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा (७.२३ % मते)
भाकप शून्य जागा (५.७८ % मते)
तॄणमूल काँग्रेस ७ जागा (१७.०० % मते)
मणिपूर स्टेट काँग्रेस पक्ष ५ जागा (८.३९% मते)
नागा पीपल्स फ्रंट ४ जागा (४.५० % मते)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा २
काँग्रेस २ जागा (४१.७० % मते),
भाजप शून्य जागा (११.९० % मते)
भाकप शून्य जागा (१४.०० % मते)
नागा पीपल्स फ्रंट शून्य जागा (१९.९० % मते)
एकंदरीत मणीपूरमध्ये राष्ट्रीय पक्षांबरोबरच अनेक प्रभावी स्थानिक पक्ष आहेत. १५ वर्षे उपोषण केल्यामुळे प्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडून राज्याच्या राजकारणात पडण्याचा निर्णय घेतल्याचे वाचले होते. मणीपूरच्या राजकारणाची मला फारशी माहिती नाही. ऑक्टोबर २०१६ मधील इंडिया टुडे-अॅक्सिस च्या सर्वेक्षणानुसार भाजप ४०% मते मिळवून ३१-३५ जागा मिळवेल व कॉंग्रेस ३७% मते मिळवून १९-२४ जागा मिळवेल असे भाकीत केले होते. हे भाकीत खूपच अविश्वसनीय आहे कारण इतर २-३ संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला दोन आकडी जागा मिळताना सुद्धा दाखविलेल्या नाहीत.
_____________________________________________________________________
(३) उत्तराखंड
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ७०
काँग्रेस ३२ जागा (३३.७९ % मते),
भाजप ३१ जागा (३३.१३ % मते)
बसप ३ जागा (१२.१९ % मते)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ५
काँग्रेस शून्य जागा (३३.०९ % मते),
भाजप ५ जागा (५५.३२ % मते)
बसप शून्य जागा (४.७३ % मते)
२०१२ मध्ये भाजप व काँग्रेस यांना जवळपास सारखीच मते पडली होती व काँग्रेसला फक्त १ जागा जास्त मिळाली होती. बहुमतासाठी काँंग्रेसला ४ जागा कमी होत्या. बसपच्या ३ आमदारांनी व ३ अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला सरकार स्थापन करता आले होते. हरीश रावत अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदासाठी धडपड करीत होते. परंतु त्यांना डावलून काँग्रेसने विजय बहुगुणा यांना निवडण्याची चूक केली. २०१३ मध्ये झालेल्या केदारनाथ येथे आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले. एकूण किती जण वाहून गेले याचा अचूक आकडा अजूनही माहिती नाही. पुनर्वसनात विजय बहुगुणा पूर्ण अपयशी ठरले. त्यानंतर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने तब्बल ५५ % हून अधिक मते मिळवून सर्व ५ जागा जिंकल्या. काँग्रेसला जवळपास विधानसभएवढीच ३३% मते मिळाली. त्यामुळे बहुगुणांना हटवून काँग्रेसने हरीश रावतना मुख्यमंत्रीपदी नेमले. नाराज बहुगुणांनी बंड केल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट आली. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्याची चूक करून बहुगुणांना जवळ केले. नंतर न्यायालयाने हरीश रावतांची पुनर्स्थापना केल्याने भाजप तोंडघशी पडला.
उत्तराखंडमध्ये दर ५ वर्षांनी राजवट बदलते असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यानुसार यावेळी भाजपला संधी आहे. यावेळी उत्तराखंडमध्ये भाजप साधे बहुमत मिळवून सत्ता मिळवेल असा माझा अंदाज आहे.
____________________________________________
(४) गोवा
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ४०
काँग्रेस ९ जागा (३०.७८ % मते),
भाजप २१ जागा (३४.६८ % मते) + मगोप ३ जागा (६.७२ % मते) = एकूण २४ जागा (एकूण ४१.४० % मते)
राष्ट्रवादी काँग्रेस शून्य जागा (४.०८ % मते)
गोवा विकास पक्ष २ जागा (३.५० % मते)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा २
काँग्रेस शून्य जागा (३६.६० % मते),
भाजप २ जागा (५३.४० % मते)
विधानसभेसाठी भाजपने मगोपबरोबर युती करून बहुमत मिळविले होते. लोकसभेत भाजपने तब्बल ५३ % मते मिळवून दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आता परिस्थिती बदलली आहे. २०१२ मध्ये मनोहर पर्रीकरांचा चेहरा समोर होता. आता लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत. त्यांची लोकप्रियता पर्रीकरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मगोपने साथ सोडली आहे. संघाच्या गोवा प्रांताचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी राजभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून बंड करून भाजपविरूद्ध उमेदवार उभे केले आहेत. त्यासाठी त्यांनी मगोप व शिवसेनेबरोबर युती केली आहे. एकंदरीत भाजपला निवडणुक अवघड आहे. परंतु याचा काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. मतदारांना लुभावण्यासाठी मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्यात परतू शकतात असे संदिग्ध विधान करून भाजपने संभ्रम निर्माण केला आहे. जरी भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळाले तरी पर्रीकर केंद्रीय संरक्षण मंत्री हे महत्त्वाचे पद सोडून गोव्यासारख्या अत्यंत लहान राज्यात परतण्याची शक्यता अत्यल्प आहे. एकंदरीत भाजपने मतदारांना हूल देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्या अंदाजानुसार यावेळी गोव्यात कोणालाही बहुमत मिळणार नाही व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल.
_________________________________________________________________________________________________
उत्तराखंड वगळता इतर राज्यात हंग विधानसभा असेल असा माझा अंदाज आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीवर जमल्यास वेगळा लेख लिहीन.
प्रतिक्रिया
30 Jan 2017 - 10:11 am | गॅरी ट्रुमन
हो उत्तराखंडमध्ये विजय बहुगुणांना बरोबर घेणे ही भाजपची चूक आहेच. कारण २०१३ मधील पुराच्या व्यवस्थापनात विजय बहुगुणा पूर्णच अपयशी ठरले होते. आणि असेच बहुगुणा आता भाजपमध्ये आहेत. २०१३ मध्ये भाजपने या प्रकरणावरून त्यांच्यावर टिकाही केली होती. खरे तर २०१२ मध्येच काँग्रेसने हरीश रावत यांना मुख्यमंत्री करायला हवे होते. पण सोनियांना (किंवा परंपरेप्रमाणे काँग्रेस अध्यक्षांना) स्वतंत्र बाण्याचे आणि स्वतःचा जनाधार असलेले लोक राज्यात सत्तास्थानी नको असतात. त्यामुळे सुरवातीला हरीश रावत यांना मुख्यमंत्री न बनवता विजय बहुगुणा या फार जनाधार नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्री बनविले गेले. २०१४ पर्यंत बराच उशीर झाला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा ते टाळू शकले नाहीत.पण हरीश रावत हे चांगले प्रशासक आहेत. जुलै २०१४ मध्ये मोदीलाट येऊन दोन-अडीच महिने झाले असतानाच दोईवाला आणि सोमेश्वर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी भाजपचा पराभव करून विजय मिळवला होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीच. विशेष म्हणजे दोईवालाची विधानसभा जागा २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांनी जिंकली होती. २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्यावर त्यांनी त्या जागेचा राजीनामा दिला होता. माजी मुख्यमंत्र्यांची जागा पोटनिवडणुकांमध्ये गमावावी लागणे ही फार उत्साहवर्धक घटना नक्कीच नाही. तेव्हा उत्तराखंडमध्ये काँग्रेसला पूर्ण राईट-ऑफ करून चालायचे नाही. देशभरात काँग्रेसची स्थिती अजून थोडी बरी असती तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला विजय मिळवायचीही चांगली संधी असती.
30 Jan 2017 - 11:34 am | वरुण मोहिते
उत्तराखंड मध्ये भाजप येणार काँग्रेस ची संधी निसटली आहे पण मुख्यमंत्री कोणाला करणार हा प्रश्न आहे . कारण तस पहिला तर हरीश रावत यांची इमेज चांगली आहे अजूनही त्यामुळे त्या तुलनेत प्रचार झाला तर थोडी काटेकी टक्कर होईल
पंजाब सर्वात जास्त रंगतदार होणारे .आप आणि काँग्रेस पैकी कोण हा मुद्दा आहेच पण प्रकाश सिंह बदलांची हि जवळजवळ शेवटची निवडणूक आहे त्यामुळे ते संपूर्ण जोर लावत आहेत प्रचारात .पण मजिठिया त्यांना अवघड जागेच दुखणं होऊन बसलय. त्यांच्या मतदारसंघातही त्यांना मोदींचे फोटो लावायला लागत आहेत जिथे भाजप चा प्रभाव नाही जास्त तरी यावरून त्यांना कठीण जाणारे पण भावनेच्या भरात थोडी हवा पलटू हि शकते अजून . शेवटची निवडणूक अधिक थोडा मोदी फॅक्टर
अवांतर -जितके पंजाबी मित्र आहेत ते आप येणार असाच म्हणत आहेत किंवा फारतर काँग्रेस .
अतिअवांतर -आपचे जोकर खासदार भगवंत मान फुल्ल फॉर्म मध्ये आहेत .
30 Jan 2017 - 6:28 pm | श्रीगुरुजी
उत्तराखंडमध्ये भाजपचे विजय बहुगुणांना पक्षात घेऊन स्वतःची पंचाईत करून घेतली. समजा काँग्रेस परत निवडणुक जिंकली तर भाजपचे नाक कापले जाईल व काँग्रेस पुनरागमनाच्या मार्गावर आहे असा प्रचार सुरू होईल. समजा भाजपने सरकार बनविले तर मलाच मुख्यमंत्री करा म्हणून बहुगुणा मागे लागतील. भाजपकडे आधीच नित्यानंद स्वामी, भगतसिंग कोशियारी, बी सी खंडुरी आणि रमेश पोखरियाल हे ४ माजी मुख्यमंत्री आहेत. हे चारही जण उत्सुक असणारच. आता त्यांच्यात पाचव्याची भर पडलीये. अशा परिस्थितीत बहुतेक बहुगुणांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्यांची सोय लावली जाईल. पण एकंदरीत असल्या उपद्रवी व निष्क्रीय माणसाला भाजपने पक्षात घ्यायला नको होते.
30 Jan 2017 - 12:24 pm | गॅरी ट्रुमन
गोव्यात यावेळी आम आदमी पार्टी जोरात उतरली आहे. माजी सरकारी अधिकारी एल्विन गोम्स यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणाही करून झाली आहे. दक्षिण गोव्यात ख्रिश्चन लोकवस्ती लक्षणीय आहे. मागच्या वेळी ख्रिश्चन मतदारांनीही काही प्रमाणात भाजपला मते दिली होती. पण यावेळी मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोघेही हजर असलेल्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती समाजाच्या कुणा नेत्याने "सरकारने गेल्या ५ वर्षात विश्वासघात केला" असे वक्तव्य करून पर्रीकर आणि पार्सेकर या दोघांनाही तोंडघशी पाडले असे मागच्या आठवड्यात वाचले. तेव्हा यावेळी दक्षिण गोव्यातील ख्रिश्चन मते भाजपला जायची शक्यता कमी. आआप जर निवडणुकांमध्ये उतरला नसता तर कदाचित ही मते काँग्रेसला गेली असती. पण यावेळी या मतांमध्ये फूट पाडायला आआप आहे. त्यामुळे अन्यथा ही निवडणुक जितकी भाजपला जड गेली असती तितकी जाणार नाही असे दिसते.
म.गो.पक्षाची फारशी ताकद राहिली नसली तरी पक्षाची ७% च्या आसपास मते राज्यात आहेत. यापैकी बरीच मते प्रियोळ आणि मडकई या सुदीन आणि दिपक ढवळीकर निवडून येत असलेल्या मतदारसंघांमध्ये आहेत. तरीही इतर मतदारसंघात अगदी २-५% मते पक्षाची असली तरी अटीतटीच्या लढतीत ही मते निर्णायक ठरू शकतात. म.गो.पक्षाने यावेळी भाजपची साथ सोडली आहे. सुभाष वेलिंगकर यांच्या आघाडीची कितपत ताकद आहे याची कल्पना नाही. याच आघाडीत शिवसेनाही आहे. शिवसेनेला गोव्यात फार स्थान आहे असे वाटत नाही. १९९४ मध्ये म.गो.पक्ष-भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेने दोन जागांवर निवडणुक लढवली होती आणि शिवसेनेच्या दिलीप कळंगुटकरांनी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा यांना चांगलीच टक्कर दिली होती. पण त्यानंतर शिवसेनेचे स्थान राज्यात कितपत आहे याची कल्पना नाही. २००२ मध्ये नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांनी म.गो.पक्षातर्फे निवडणुक लढविणार्या रमाकांत खलप यांच्यासाठी मांद्रेमध्ये प्रचार केला होता असे वाचल्याचे आठवते. त्यामुळे कोकणला लागून असलेल्या उत्तर गोव्याच्या भागात शिवसेनेला काही प्रमाणावर जनाधार असावा.
म.गो.पक्षाने भाजपची सोडलेली साथ आणि सुभाष वेलिंगकर आघाडीमुळे थोडी तरी पडणारी फूट यामुळे यावेळच्या निवडणुका भाजपसाठी हरायच्याच निवडणुका ठरल्या असत्या.पण आपने प्रस्थापितविरोधी मते बर्यापैकी खाल्ली तर मात्र चित्र पालटू शकेल.
30 Jan 2017 - 9:53 pm | प्रीत-मोहर
बरोबर. भाजप ची मते खाणार शिवसेना आणि गोसुमं. बर्याच मतदारसंघांत पारंपारिक खांग्रेस मतदार मगोकडे झुकताना जवळुन पाहतेय.
आमच्या मतदारसंघात विद्यमान आमदार पर्रिकरांनी उमेदवारी न दिल्याने अपक्ष लढताहेत. तिथेच भाजपची मत विभागली गेली आहेत. त्यात ते अनुसूचीत जाती/ जमातींची मते ही घेणार. आप ला कोणी भाव देत नाहीये. इथेही मगो गोसुमं शिवसेना युतीचा उमेदवार आहे ,जो परत भाजपची मतं खाईल. याचा फायदा कॊंग्रेस ला होण्याची शक्यता.त्याशिवाय स्थानिक इश्यू ना कॊंग्रेस सोडून अजुन कोणत्याच पक्षाने त्यावेळेस सपोर्ट केला नव्हता आणि मतदानापूर्वी प्रत्येक पोलिटिकल पार्टी ला तो इश्यू जवळचा वाटू लागला. असे अनेक factors आहेत
30 Jan 2017 - 3:28 pm | गॅरी ट्रुमन
आआपने नेहमीप्रमाणे ट्विटरवर जोरदार आघाडी घेतली आहे.
नरेंद्र मोदींची शनीवारी पणजीमध्ये सभा झाली त्याविषयी आआप गोवा ने खालील फोटो ट्विटरवर पोस्ट केला--
त्याच फोटोवरील प्रतिसादांमध्ये अनेकांनी हा फोटो मोदींची सभा सुरू होण्यापूर्वी बराच वेळ घेतला होता असे म्हटले. एकाने तर मोदींच्याच सभेचा खालील फोटो पोस्ट केला---
खरी परिस्थिती काय आहे समजायला मार्ग नाही. अर्थातच केजरीवाल हा ढोंगी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. नोटबंदीच्या काळात मध्य प्रदेशात एक चोर बँकेत दरोडा घालायच्या उद्देशाने रात्री घुसला आणि बाहेर पोलिस आले आहेत हे समजताच त्याने आत्महत्या केली. केजरीवालांनी हा फोटो "नोटबंदीमुळे पाहिजे तितक्या नोटा न मिळाल्यामुळे व्यथित झालेल्या नागरीकाने आत्महत्या केली" असे बिनदिक्कतपणे खोटे ट्विटवर पोस्ट करून टाकले . असा माणूस आणि असा पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो याविषयी अजिबात शंका नाही.
30 Jan 2017 - 8:44 pm | श्रीगुरुजी
केजरीवाल जरी दिल्लीचे अधिकृत मुख्यमंत्री असले तरी त्यांनी ऑगस्टपासून दिल्लीत फारच कमी वेळ घालविला आहे असं दिसतंय. ऑगस्टमध्ये घशाच्या शस्त्रक्रियेसाठी ते १०-१२ दिवस बंगळुरात होते. नंतर सप्टेंबरमध्ये १०-१२ दिवस ते हिमाचल प्रदेशात विपश्यनेसाठी गेले होते. नंतर मदर टेरेसांना व्हॅटीकनने संतपदाची पदवी दिल्याच्या समारंभात त ५-६ दिवस व्हॅटिकनला जाऊन आले. हे सुरू असताना ते सातत्याने पंजाब, गुजरात व गोव्याला भेटी देत आहेत. हे सुरू असताना नवीन चित्रपट बघून त्याचा रिव्ह्यू ट्विटरवर टाकणे, गुगलवर "मोदी" नावावर शोध घेऊन मोदींचे एकूण फोटो व त्यांनी परीधान केलेले कपडे मोजून, "मोदींनी गेल्या २ वर्षात कपड्यांवर ७५ कोटी रूपये खर्च केले" असा निष्कर्ष काढणे, "मोदींनी आपल्या आईला व पत्नीला घरी बोलवावे" असे न मागता शहाजोगपणे सल्ले देणे हे सुरूच आहे. एकंदरीत आपल्यावर जी जबाबदारी आहे ती नीट न पाळता आता ते नवनवीन भक्ष्याच्या शोधात असतात.
30 Jan 2017 - 9:03 pm | वरुण मोहिते
फक्त मोदी . विथ ड्यू रिस्पेक्ट मला १९९५ च्या वेळची गोपीनाथ मुंड्यांची आठवण आली ओन्ली टार्गेट शरद पवार . ज्यातला एकही आरोप पुढे सिद्ध झाला नाही पण राळ उठवण्यात यशस्वी झाले . (धागा पवारसाहेबांवर जाऊ नये :))) ) तसेच कित्येक बिनबुडाचे आरोप केजरीवालांनी मोदींवर केले आहेत. सगळेच चूक आहेत असं नाही पण काही वेळा कारण नसून भाजप भांबावल्यासारखी होते त्यामुळे .
31 Jan 2017 - 3:40 pm | श्रीगुरुजी
केजरीवाल मारे पंजाबला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या गप्पा मारताहेत. परंतु त्यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भगवंत मान १-२ दिवसांपूर्वी दारू पिऊन तर्र अवस्थेत एका सभेला लडखडत आल्याच्या बातम्या वाचल्या.
13 Feb 2017 - 10:25 am | गॅरी ट्रुमन
हो आताही परत केजरीवाल ट्रिटमेन्टसाठी बंगलोरला गेले आहेत.
अन्यथा जगभरात यांच्या मोहल्ला क्लिनिकचे डंके पिटले जात असतात.जगात कोणीकोणी या मोहल्ला क्लिनिकविषयी काय काय बोलले हे केजरीवाल लगेच टिवटिवाट करून सांगत असतात.पण स्वतः उपचार घ्यायला मात्र मोहल्ला क्लिनिक सोडून दुसरीकडे जातात. बहुदा मोहल्ला क्लिनिकमध्ये हृदय, यकृत, किडनी इत्यादी ट्रान्सप्लॅन्टपेक्षा कमी गुंतागुंतीचे उपचार केले जात नसावेत म्हणून केजरीवाल स्वत:चा उपचार करायला मात्र दुसरीकडे जातात.
30 Jan 2017 - 4:51 pm | वरुण मोहिते
एका पक्षाने तर निवडणुकीसाठी "जुमलेबाजी " होती त्यामुळे असं बोलावं लागलं असं जाहीर सभेत सांगितलं . त्यामुळे खोटा बोलण्यात दोन्ही पक्ष पटाईत आहेत .
त्याच पक्षाच्या अजून एका नागपूरच्या स्पष्ट बोलण्यात प्रसिद्ध असलेल्या हेवी वेट आणि काम करणाऱ्या नेत्यांनी अच्छे दिन ये अब गेले मी हड्डी बन चुकी है असं सांगितलं मागच्या वर्षी .
आणि कालच परत नागपुरात बोलताना म्हणाले कि विरोधी पक्षात असताना आम्हाला कळत नव्हतं कशालाही विरोध करायचो पण आता सत्तेत आल्यावर कळलं आश्वासन देणं काय असतं .
त्यामुळे फेस बुक आणि ट्विटर साठी भाजप चा सेल पण तितकाच काय किंबहुना भारतात सर्वात जास्त जाहिरात बाजी करणारा आहे . भाजप कडूनही अनेक बातम्या फोटो आधार नसताना प्रसिद्ध झाले आहेत . बाकी भाजप कडे मुख्यमंत्री ,पर्रीकर हे असून सुद्धा आप ने हवा केली आहे हे खरंय .
30 Jan 2017 - 9:02 pm | श्रीगुरुजी
उत्तरप्रदेश साठी वेगळा धागा काढण्याऐवजी इथेच माहिती लिहीत आहे.
(५) उत्तर प्रदेश
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ४०३
काँग्रेस २८ जागा (११.६३ % मते),
भाजप ४७ जागा (१५.०० % मते)
बसप ८० जागा (२५.९१ % मते)
सप २२४ जागा (२९.१५ % मते)
रालोद ९ जागा (२.३३ % मते)
पीस पार्टी ४ जागा (२.८३ % मते)
राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा (०.३३ % मते)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती -
एकूण जागा ८०
काँग्रेस २ जागा (७.५० % मते),
भाजप ७१ जागा (४२.३० % मते) + अपना दल २ जागा (१.०० % मते) = एकूण ७३ जागा (४३.३० % मते)
बसप शून्य जागा (१९.६० % मते)
सप ५ जागा (२२.२० % मते)
२०१७ मध्ये परिस्थिती बदलली आहे. सपमधील पितापुत्रांची नौटंकी व त्यानंतर झालेली काँग्रेस व सपची युती यामुळे चित्र बदलले आहे. जर पुन्हा एकदा चारही पक्ष स्वतंत्र लढले असते तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असत्या व सप दुसर्या क्रमांकावर असता. परंतु काँग्रेसबरोबर युती झाल्यामुळे या युतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप दुसर्या क्रमांकावर असेल.
या युतीचा भाजपला फटका बसणार आहे. पण त्याहून जास्त फटका बसपला बसणार आहे. दोन तथाकथित निधर्मी पक्ष एकत्र आल्याने बसपकडे वळणारी मुस्लिम मते या नवीन युतीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसपला फक्त दलित मतांवरच समाधान मानावे लागेल. काँग्रेसची पारंपारिक ७-८ टक्के मते आहेत. काँग्रेसला आपल्या ताकदीच्या तुलनेत १०५ म्हणजे खूपच जास्त जागा मिळाल्या आहेत.
या सर्व प्रकारात काँग्रेसची जोरदार फजिती झाली. सुरवातीला एकट्याने लढायचे हे ठरवून काँग्रेसने योजना आखून शीला दिक्षितांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जाहीर केले. राज बब्बरकडे राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सोनिया गांधी व शीला दिक्षितांनी बस यात्रा काढली. राहुलने खाट पे चर्चा अभियान सुरू केले. २७ साल, युपी बेहाल अशी घोषणा सप, बसप व भाजपवर सडकून टीका केली. कर्जा माफ, बिजली बिल हाफ अशी आश्वासने दिली. रोड शो केले. नंतर अचानक घूमजाव करून सपबरोबर युती करून दुय्यम भूमिका स्वीकारली. एखाद्याने आयआयटी-जेईई च्या परीक्षेची तयारी करावी, त्यासाठी महागड्या शिकवण्या लावाव्या, मी रँकिंग मिळविणार अशा फुशारक्या माराव्या, पवई आयआयटीत प्रवेश घेऊ का कानपूर आयआयटीत घेऊ अशी चर्चा करावी . . . आणि यातले काहीच न करता शेवटी MSCIT चा certificate कोर्स करावा असेच काँग्रेसचे झाले आहे.
यावेळी सप-कॉंग्रेस युती प्रथम क्रमांकावर असेल असा माझा अंदाज आहे. भाजप दुसर्या व बसप तिसर्या क्रमांकावर असेल. जर सप-काँग्रेस युतीला बहुमत मिळाले नाही तर पुन्हा एकदा भाजप-बसप ही युती निवडणुक पश्चात होईल. अजितसिंगाच्या रालोदला बर्यापैकी जागा मिळाल्या तर त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळविला जाईल.
30 Jan 2017 - 9:29 pm | गॅरी ट्रुमन
यापैकी काहीही झाले तर भाजपचे कठिण आहे एकंदरीत. बसपाला तीन वेळा पाठिंबा देऊन भाजपनेच बसपाला इतके मोठे होण्यात मदत केली. हा प्रकार चौथ्यांदा होणार असेल तर "गॉड सेव्ह बीजेपी". तसेच पूर्वीच्या तीन वेळी भाजपने पाठिंबा दिला आणि मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या. यावेळी भाजप बसपाला पाठिंबा देणार नाही तर बसपाचा पाठिंबा घेईल कारण आकडे तसे असतील. आणि मायावती किती बेभरवशाच्या आहेत आणि त्या कधीही पाठिंबा काढतील हे नक्की. मग एकतर सत्ता गमावावी लागेल नाहीतर १९९७-९८ मध्ये कल्याणसिंगांनी केला तसा सत्तेचा अश्लाघ्य खेळ खेळावा लागेल. कल्याणसिंगांनी केलेल्या त्या प्रकारामुळे पक्षाचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मोदींमुळेच भाजप उत्तर प्रदेशात एवढ्या जागा जिंकू शकला. अन्यथा १० जागा जरी मिळवता आल्या असत्या की नाही कोणास ठाऊक. आणि मायावतींना बरोबर घेतले तर बिहारमध्ये रामविलास पासवानांचा पक्ष दूर जाईल. म्हणजे शेवटी धुपाटणेही हाती लागायचे नाही भाजपच्या.
ज्या पध्दतीने पहिल्यांदा काँग्रेसला आणि मग भाजपला सत्तेपासून रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने केवळ आपल्यालाच दिली आहे या गैरसमजातून समाजवादी विचारांच्या पक्षांनी सुरवातीला जनसंघ/भाजप आणि नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला त्याप्रमाणेच उत्तर प्रदेशात स्थिर सरकार मिळावे ही जबाबदारी प्रभू रामचंद्राने केवळ आपल्यालाच दिली आहे या गैरसमजातून भाजपने बसपाशी हातमिळवणी केली आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला.
अजितसिंगांचा पाठिंबा घेणे हा दुसरा मूर्खपणा ठरेल. हा मनुष्य वि.प्र.सिंगांपासून मनमोहनसिंगांपर्यंत चंद्रशेखर यांचा अल्प कालावधी वगळला तर प्रत्येक सरकारमध्ये कधीनाकधी मंत्री होता. दिल्लीत सत्तेत कोणीही असू दे. अजितसिंग मंत्री असणे पक्केच असायचे.लोकांनी २०१४ मध्ये असल्या घाणेरड्या प्रकाराविरूध्द मते दिली होती. भाजप परत तेच करणार असेल तर कदाचित तात्कालिक फायद्यासाठी दीर्घकालीन हिताला धक्का पोहोचवेल.
असे काही होणार नाही हीच इच्छा आणि अपेक्षा. जर भाजपला सत्ता मिळणार नसेल तर सरळ सपा-काँग्रेसला बहुमत मिळावे. असली टांगलेली अवस्था नको.
31 Jan 2017 - 3:38 pm | श्रीगुरुजी
मायावती यावेळी अटी लादून माज करण्याच्या परिस्थितीत नाही. २०१२ मध्ये विधानसभेत सत्ता गमाविली, नंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भोपळा मिळाला आणि आता २०१७ मध्ये सप-काँग्रेस युतीमुळे बसप पूर्णपणे इररिलिव्हंट होऊ शकतो. बसपमध्ये मायावती वगळली तर बाकी सर्व शून्य आहे. हातात फारसे काही नसल्यानेच मायावतीचा आवाज गेली १-२ वर्षे कमी झाला आहे. जर कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही व बसप + भाजप बहुमताच्या जवळ असेल तर मायावतीला भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल. निदान यावेळी तरी भाजप मायावतीला मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म द्यायची मागणी मान्य करणार नाही अशी आशा आहे.
30 Jan 2017 - 9:47 pm | वरुण मोहिते
कारण आधी दलित मते आपल्याकडे वळवायची ह्यासाठी मायावतीवर केसेस टाकल्या काँग्रेस काही फार प्रभाव टाकणार नाही असा साधा सरळ हिशोब होता पण समाजवादी पक्षाच्या बेबंदी मुळे सगळीच गणिते बदलली . आता आडून भाजप ला बसपा ला हि मदत करावी लागणार किंवा काहीतरी मुद्दा बसपा ला मिळवून द्यावा लागणार . कारण सत्ता हवी तर भाजप ला एकट्याला ते शक्य नाही . दुसरीकडे काँग्रेस चे काही उमेदवार पाडून हि युतीच कशी चूक आहे हे नेताजींच्या मनात आहे . कितीही झालं तरी नेताजी आता समाजवादी पक्षाची पक्षाची पडझड होईल असे काही करणार नाहीत पण काँग्रेस युती चूक आहे हे दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करणार. काँग्रेस ला जास्त जागा दिल्यात कारण काही जागांवर दगाबाजी होणारे हे अखिलेश ओळखून आहेत त्यामुळे त्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेस च्या . सपा प्रथम क्रमांकावर असणार हे नक्की पण .अजितसिँग वारा असेल तसे जाणार आणि कोणीही त्यांच्या पाठिंब्याला नाकारणार नाही गरज पडली तर .
31 Jan 2017 - 5:11 pm | कर्ण
मी चंदीगड मध्ये गेल्या तीन वर्षांपासून आहे, ह्या वाक्याशी मी बिलकुल सहमत नाही... जे २०१४ मध्ये भांडत होते ते आता आप मध्ये नाही ...
माझ्या ऑफिस मध्ये जे कट्टर अंधभक्त (तुमच्यासारखे) आहेत ते सुद्धा मानतात कि पंजाब मध्ये आप १००% आहे.
ट्विटर वर अरविंद केजरीवाल आणि भगवन्त मान ला फालो करा खरी परिस्थिती कळेल.
पेड मेडिया ह्यातला काहीही दाखवत नाही. याउलट bjp आणि काँग्रेस च्या सभेत लोक पैसे देऊनही येत नाहीत.
31 Jan 2017 - 5:41 pm | arunjoshi123
मिडिया आआपला दाखवत नाही?
हे चांगलं आहे. चांगले पक्ष असावेत हे दोन्ही.
31 Jan 2017 - 5:53 pm | श्रीगुरुजी
तसं असेल तर नुकत्याच संपलेल्या चंदिगड महापालिका निवडणुकीत भाजपला २६ पैकी २० जागा मिळाल्याचे आश्चर्य वाटत आहे.
3 Feb 2017 - 3:46 pm | हतोळकरांचा प्रसाद
ट्विटर वर फॉलोकरून दिसणारी परिस्थिती खरी मानणाऱ्या लोकांचं कौतुक करावा तेवढं थोडं वाटतं! ट्विटर हे उपलब्ध असलेल्या सर्व सोशल मेडियांपैकी सर्वात निगेटिव्ह मीडिया आहे असे माझे मत बनले आहे. कुठल्याही क्षणी ट्रेंडिंग काय आहे पहिले कि एकतर "आपटार्ड" लोकांनी मोदींना शिव्या घातल्या असतात नाहीतर "भक्त" लोकांनी केजरीवालांना शिव्या घातल्या असतात. कमीत कमी शब्दात कमल अपमान करण्याचे माध्यम बनले आहे.
बाकी चंदिगढमध्ये आआपची हवा आहे तर मग चंदिगढमध्ये भाजपने २६ पैकी २० जागा कशा काय जिंकल्या काय माहित?
3 Feb 2017 - 5:34 pm | गॅरी ट्रुमन
हो ना. मी पण ट्विटरवर केजरीवालांना फॉलो करतो. मग त्या न्यायाने मी पण केजरीवाल समर्थक झालो की काय? :) :)
10 Feb 2017 - 5:44 pm | कर्ण
मला हि येथे येण्यापूर्वी चंदिगढ म्हणजेच पंजाब वाटत होतं, पण येथे तुम्हाला "हरियाणवी" लोकच जास्त दिसतील ....
जस आपल्याकडे पाणपट्ट्या जागोजागी दिसतात तसे येथे दारूचे दुकाने दिसतील ....
माझ्या ऑफिस मध्ये ४-५ लोकांनि सांगितलं कि त्यांनी आप लाच मतदान केलं आहे ....
ट्विटर वर जर खरी परिस्थिती कळत नसेल, तर पेड मेडिया वर सुद्धा घरी परिस्थिती कळत नाही म्हंटल (सन्दर्भ : दिल्ली ६७ :) )
11 Feb 2017 - 10:57 pm | अमितदादा
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे परस्थिती असू शकते, शेवटी वर्तमानपत्र वाचून मिळालेली माहिती वरून बांधलेला अंदाज खरा ठरेल असे नाही. मतदानपुर्वी लिहिलेल्या बहुतांश लेखात कॉंग्रेस ला वरचा हात मिळेल असे म्हंटले होते, मात्र मतदानाच्या दुसर्या दिवशी वाचलेल्या काही लेखात आप ला चांगल मतदान झालाय अस वाचल आहे (त्यात लेखक पंजाब मधून फिरून आले होते), त्यामुळे कॉंग्रेस आणि आप मध्ये मोठीच चुरस तयार झालीय. समजा आप ला बहुमत किंवा जास्त जागा मिळाल्या तर त्यांनी खलिस्तानी वाद्यांना soft कॉर्नर देवू नये एवदीच इच्छा आहे.
11 Feb 2017 - 11:21 pm | श्रीगुरुजी
तुमच्या अंदाजानुसार जर पंजाबात आआपला भरपूर मते मिळणार असतील तर एकंदरीत अवघड परिस्थिती आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या या महत्त्वाच्या सीमावर्ती राज्यात आआपसारखा अत्यंत उथळ व बेजबाबदार पक्ष सत्तेवर येणे धोकादायक आहे.
31 Jan 2017 - 5:36 pm | arunjoshi123
१. मणिपूरमधे प्रजासत्ताक दिन वैगेरे साजरा होत नाही. (लोकांचा सहभाग नसतो.)
२. मणिपूरमधे गेली १५ वर्षे काँग्रेसचे राज्य आहे. तिथे पेट्रोल ३०० रु लिटर आणि गॅस सिलिंडर २००० रु ला आहे.
३. निवडणूकीपूर्वी जर राज्याची आर्थिक नाकेबंदी झाली तर काँग्रेस निवडून येते. https://www.thesangaiexpress.com/inadvertently-strengthening-cong-electi...
४. या हिंदूबहुल राज्यात भाजप हिंदूविरोधी आणि ख्रिश्चनप्रेमी आहे अशी प्रतिमा आहे. म्हणून भाजप हारते. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे याचा मणिपूरकरांना अद्याप तरी गंध नाही.
५. भाजप या वेळेस दोन नंबर वर तर नक्की असेल. मोदी नावाची चलती आहे.
६. भाजपने काँग्रेसचे खूप उमेदवार खेचले, पण आर्थिक नाकेबंदी चक्क १५० दिवस इतकी चालली तेव्हा त्यातले बरेच काँग्रेसमधे परत आले. ओरिजनल पक्ष नव्हताच तेव्हा उमेदवार कूठून तर आणायचे म्हणून आणले आणि पक्षाचे हसे झाले.
७. नागा लोकांसोबत केंद्र सरकारने नक्की काय करार केला आहे याची मैतेई लोकांना शंका आहे.
3 Feb 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी
खालील बातमी खरी असेल तर चिंताजनक आहे.
http://www.loksatta.com/punjab-assembly-elections-2017-news/arvind-kejri...
‘दहशतवादाच्या काळ्या दिवसांना पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्या कट्टरतावादी घटकांना अरिवद केजरीवाल बळ देत आहेत. कट्टरतावादाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ नका. शांतता गमाविणे पंजाबला परवडणारे नाही..’
पंजाब जिंकण्याच्या आशेने प्रचाराचा धडाका उडवून देणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे हे वक्तव्य संगरूरमधील मौर मंडी येथील. याच गावात मंगळवारी रात्री काँग्रेसच्या सभेनंतर वाहनात स्फोट झाला होता आणि त्यात सहा जणांना जीव गमवावा लागला. अनेकांच्या मते, कित्येक वर्षांनंतर निवडणुकीमध्ये प्रथमच अशा तीव्रतेचा हिंसाचार झाला आहे. तोच धागा पकडून खलिस्तानवादी म्हणजे फुटीरतावाद्यांशी केजरीवालांनी संधान साधल्याचे राहुल सुचवू पाहत आहेत. राहुल भले प्रथमच उघडपणे बोलले असतील, पण पंजाबातील अनेक राजकीय निरीक्षकांच्या, सुरक्षा यंत्रणेतील काही जणांच्या मनात तसाच संशय आहे. खलिस्तानी घटकांचे तुष्टीकरण करून केजरीवाल विस्तवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया पंजाब पोलिसांतील एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
संशयाच्या सुया..
खलिस्तानी लिबरेशन फ्रंट (केएलएफ) या फुटीरतावादी संघटनेचा माजी प्रमुख गुरिवदर सिंग याच्या घरी अरिवद केजरीवालांचा मुक्काम. दहशतवाद शिखरावर पोचलेला असतानाच्या काळामध्ये शीख व िहदूंमध्ये दंगे घडविण्याचे आरोप गुरिवदरसिंगवर होते. सध्या ते ब्रिटनमधून खलिस्तानी चळवळीच्या कारवाया करीत असल्याचे सांगितले जाते.
संगरूर जिल्ह्य़ातील मौर मंडीमध्ये मंगळवारी रात्री काँग्रेसच्या सभेनंतर कार बॉम्बस्फोट झाला. त्यात सहा जणांचा बळी गेला. कित्येक वर्षांनंतर निवडणुकीत अशा पद्धतीने बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
‘आप’च्या प्रचारासाठी कॅनडा व युरोपामधील पंजाबी ‘एनआरआय’ची फौजच आली आहे. त्यातील काही जणांचा खलिस्तानी घटकांशी निकटचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या श्रीमंत मंडळींकडून पशांचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू असल्याचाही दावा केला जात आहे.
4 Feb 2017 - 10:44 pm | श्रीगुरुजी
गोव्यात तब्बल ८३% तर पंजाबमध्ये तब्बल ७०% इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय. साधारणपणे असं मानलं जातं की जेव्हा मतदान मोठ्या प्रमाणावर होते तेव्हा तो सत्ताधार्यांविरूद्ध कौल असतो. या समजूतीनुसार हे मतदान अकाली-भाजप व भाजप सरकारविरूद्ध झाले असावे.
4 Feb 2017 - 11:22 pm | अनुप ढेरे
गोव्यात ८१ चं ८३ झालय. हा फार फरक नाही.
5 Feb 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी
फारसा फरक नसला तरी गोव्यातील मतदारसंघ लहान असल्याने २ टक्के फरक म्हणजे प्रत्येक मतदारसंघात अंदाजे हजार मतांचा फरक. एवढा फरकही विजयाचे गणित चुकवू शकतो.
4 Feb 2017 - 11:22 pm | गॅरी ट्रुमन
पंजाबमध्ये मागच्या वेळी ७८.६% इतके मतदान झाले होते. म्हणजे मागच्या वेळच्या तुलनेत मतदान कमी झालेले दिसते. अर्थातच पंजाबात अकाली निवडून येतील असे काही मला म्हणायचे नाही पण तो मुद्दा मांडायला आजच्या मतदानाची आकडेवारी पुरेशी नाही.
5 Feb 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी
मतदानाची टक्केवारी वेगवेगळ्या माध्यमातून वेगळी सांगत आहेत. काही माध्यमातून ७० टक्के, काही वृत्तपत्रे ७५ टक्के तर काही जण ७८ % असे आकडे दाखवित आहेत.
10 Feb 2017 - 2:22 pm | श्रीगुरुजी
या विधानसभेच्या निवडणुका तसेच महाराष्ट्रात होणार्या महापालिका व जिल्हापरीषदांच्या निवडणुका यात एक समान मुद्दा लक्षात आला. निवडणुक राज्याची किंवा महापालिकेची असली तरी राहुल, उद्धव, अखिलेश, मायावती इ. सर्व विरोधक राज्य किंवा महापालिका प्रश्नांवर फारसे बोलत नसून ते फक्त सातत्याने मोदींवर टीका करीत आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईक, रेनकोट, नोटाबंदी इ. विषय कशासाठी यावेत? उत्तर प्रदेशात किंवा उत्तराखंडातही भाषणाचा बराचसा भाग मोदींवर टीका करण्यातच केंद्रीत झालेला असतो.
10 Feb 2017 - 2:39 pm | वरुण मोहिते
लाट अजून ओसरलेली नाही त्यामुळे मोदी टार्गेट . आपली लाट कायम टिकवायची आहे ह्यासाठी मुद्दा असो वा नसो मोदी काँग्रेस चा संबंध आणतात आणि टीका करून घेतात .इतिहासात काय झालं असं विचारतात कायम तसंच आहे ते .
11 Feb 2017 - 10:29 pm | श्रीगुरुजी
उ. प्र. च्या ७३ विधानसभा मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यात मतदान झाले. सरासरी ६४% मतदान झाले आहे. २०१२ मध्ये याच ७३ मतदारसंघात सरासरी ६१% मतदान झाले होते. म्हणजे मतदानात अंदाजे सरासरी ३% वाढ झाली. सर्वसाधारणपणे असे मानण्यात येते की मागील निवडणुकीच्या तुलनेत साधारणपणे ८-१०% जास्त मतदान झाले तर निकाल सत्ताधारी पक्षाच्या विरूद्ध असतो. मतदान मागील सरासरीपेक्षा ८-१०% कमी झाले तर ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असते. जर मतदान थोड्याफार फरकाने मागील सरासरीइतकेच झाले तर निकाल नक्की कोणाच्या बाजूने जाईल हे छातीठोकपणे सांगता येत नाही.
आजचे मतदान मागील निवडणुकीपेक्षा जास्त असले तरी फरक फक्त ३% एवढाच आहे. त्यामुळे बसप, भाजप व सप-खांग्रेस या तिघांपैकी नक्की कोणाच्या बाजूने कल आहे ते सांगता येणे अवघड आहे.
२०१२ च्या निवडणुकीत या ७३ जागांपैकी प्रत्येकी २४ जागा सप व बसपला, ११ जागा भाजपला, ९ रालोदला व ५ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.
11 Feb 2017 - 10:50 pm | संदीप डांगे
खांग्रेस >>> हा कोणता नवा पक्ष? कधी ऐकले नाही याबद्दल?
12 Feb 2017 - 10:48 am | गॅरी ट्रुमन
डॉ. प्रवीण पाटील म्हणून एका मराठी माणसाच्या http://www.5forty3.in/ या संकेतस्थळावर उत्तर प्रदेशात भाजपला जोरदार यश मिळणार आहे असे भाकित केले आहे. इतर काही राज्यांमध्ये त्यांची भाकिते बरोबर आली आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते उत्तर प्रदेशात भाजपला २४० जागा मिळू शकतील. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतरही ते त्या त्या ठिकाणी काय चालू आहे याचे रिपोर्ट घेऊन माहिती अपडेट करत असतात. खरे तर बिहारमध्ये सुरवातीला भाजपचे पारडे जड आहे असे ते म्हणत होते पण मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आलेल्या माहितीवरून भाजपची स्थिती फार चांगली नाही असे त्यांनी म्हटले. तसेच सर्व टप्प्यातील मतदान संपेपर्यंत भाजपचा मोठा पराभव होणार आहे असे भाकित त्यांनी केले होते आणि ते बरोबरही आले. कालच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर काल मतदान झालेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील ७३ जागांवर भाजपचा मोठा विजय होणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या जमान्यात ग्राऊंडवर काय चालू आहे याच्या बातम्या लगेच सगळीकडे प्रसारीत होतातच. त्यातून काल ट्विटरवर #BJPSweepsWestUP हा हॅशटॅग जोरात चालला होता. सुरवातीला वाटले की हा हॅशटॅग भाजप समर्थकांनी चालवला आहे. तसे असेलच. पण जागरण सारख्या उत्तर प्रदेशातील हिंदी पेपरच्या वेबसाईटवरही पहिल्या टप्प्यात भाजप पुढे असेल असे म्हटले जात आहे. अर्थातच जागरण आणि समाजवादी पक्ष यांचे वैर बरेच जुने आहे त्यामुळे नुसत्या त्या बातमीवर विसंबून चालणार नाही.
प्रत्यक्षात काय होते ते ११ मार्चला समजेलच.
12 Feb 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी
डॉ. प्रवीण पाटील यांनी खूपच सखोल व सविस्तर विश्लेषण केले आहे. परंतु त्यांचे अंदाज कितपत खरे ठरतील याविषयी मी साशंक आहे. मागील वर्षी बिहारमध्ये राजद, संजद व खांग्रेस यांच्या मतपेढीची सरळ बेरीज होऊन भाजपचा पराभव झाला होता. यावेळी उ. प्र. मध्ये सप व खांग्रेस यांच्या मतपेढीची तशीच सरळ बेरीज होईल असे मला वाटते. त्यामुळे सप-खांग्रेस युती प्रथम क्रमांकावर असून भाजप द्वितीय क्रमांकावर असेल असा माझा अंदाज आहे.
खूप पूर्वी १९९० च्या दशकाच्या पूर्वार्धात "लोकसत्ता"मध्ये एक डॉक्टर (त्यांचे नाव विसरलो) स्वतः एकटेच निवडणुकांचे सविस्तर विश्लेषण करून स्वतःचे अंदाज व्यक्त करणारे मोठे लेख लिहीत असत. त्यांचे अंदाज कधी बरोबर असायचे तर कधी चुकायचे. ते मतदार सर्वेक्षण वगैरे न करता मागील काही निवडणुकातील आकडेवारी, सध्या घडत असलेल्या घटना व त्यानुसार मतदारांवर होऊ शकणारा संभाव्य परीणाम व त्याचा निकालावर होऊ शकणारा परीणाम याविषयी लिहीत असत. डॉ. प्रवीण पाटील यांचा अंदाज वाचून मला त्या जुन्या लेखांची आठवण झाली.
12 Feb 2017 - 3:19 pm | संदीप डांगे
तरी पण, हा खांग्रेस कोणता पक्ष आहे? कधी ऐकले नाही ह्याबद्दल?
12 Feb 2017 - 8:04 pm | गॅरी ट्रुमन
हो १९९० च्या दशकात कोणी लोकसत्तामध्ये लेख लिहित असत हे लक्षात आहे. त्यांनीच १९९५ मध्ये जानेवारीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळेल (१५० जागा) असे भाकित केले होते. त्यावेळी ते मला अगदीच अशक्य वाटले होते. नंतर युतीला १३८ जागा मिळाल्या पण त्यातही काँग्रेसच्या बंडखोरांनी केलेल्या मतविभागणीचा वाटा मोठा होता. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसला ७५ जागा मिळतील असा पहिला लेख त्यांनी लिहिला होता. त्यानंतर काही कारणाने काँग्रेसला अजून एक जागा मिळेल म्हणून ७५ वरून ७६ जागा असा बदल केला होता. अर्थातच काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांचे लेख कधी वाचल्याचे लक्षात नाहीत.
प्रवीण पाटील त्यांच्या वेबसाईटवर देणगी पाहिजे आहे असे लिहित आहेत. त्याचवेळी जवळपास सर्व मेनस्ट्रीम मिडियाच्या विरूध्द जाणारी भाकिते ते करत आहेत. एका अर्थी स्वत:ची विश्वासार्हता ते पणाला लावत आहेत. जर का या भाकितांचा फज्जा उडाला तर देणगी मिळायची शक्यता जवळपास शून्य. ट्विटरवरही अनेकांनी त्यांची भाकिते बरोबर आल्यास देणगी देऊ असे म्हटले आहे.
मला वाटते उत्तर प्रदेशात भाजपचे पारडे जड असेल. एकतर बिहारपेक्षा उत्तर प्रदेशमधील परिस्थिती वेगळी आहे.
१. बिहारमध्ये २०१४ मध्ये जदयु आणि राजद वेगवेगळे लढले त्यामुळे भाजपला विजय मिळाला पण जदयु, राजद आणि काँग्रेस यांना भाजपपेक्षा ६% मते जास्त मिळाली होती. त्यामुळे ही युती झाल्यावरच भाजप बॅकफूटला गेला होता (असे काही होईल असे त्यावेळी वाटले नव्हते पण आता लक्षात येते). तर उत्तर प्रदेशात मात्र २०१४ मध्ये सप+काँग्रेस ही मते एकत्र केली तरीही त्यापेक्षा ६% जास्त मते भाजपला होती.
२. बिहारमध्ये राजद+जदयु युती विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधी झाली होती. कार्यकर्त्यांच्या पातळीवर ही युती मूर्त स्वरूपात यायला पुरेसा वेळ होता. पण सप+काँग्रेस युती निवडणुकांच्या अगदीच तोंडावर झाली आहे.
३. बिहारमध्ये राजदच्या मतदारांना १० वर्षे सत्तेबाहेर झाल्यानंतर काहीही करून सत्तेत परत यायचे हा उद्देश होता आणि जदयुच्या मतदारांना अर्थातच नितीशकुमार या 'सुशासनबाबू' ला परत मुख्यमंत्री करायचे होते. त्यामुळे ही मते एकत्र आली. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मतदारांना युतीसाठी मतदान करायचा तितका इन्सेन्टिव्ह नाही. सपाच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मते दिली तरी काँग्रेसच्या निदान उच्चवर्णीय मतदारांना भाजप हा अधिक सक्षम पर्याय उपलब्ध असताना ती मते सपाला जातीलच का याविषयी मात्र साशंकता आहे. तसेच २०१४ पासून काँग्रेसची अजून पडझड झाली आहे त्यामुळे काँग्रेसची हक्काची किती टक्के मते आहेत हे पण बघायलाच हवे.
४. बिहारमध्ये नसलेला एक घटक उत्तर प्रदेशात आहे आणि तो म्हणजे बसपा या तिसर्या पक्षाचे अस्तित्व. या पक्षाचीही बरीच पडझड झाली आहे पण तरीही २०% पर्यंत मते हा पक्ष नक्कीच घेऊ शकेल आणि हा आकडा मॉठा आहे. २००७ आणि २०१२ मध्ये उच्चवर्णीयांनी बसपाला मोठ्या प्रमाणावर मते दिली होती. पण २०१४ मध्ये यातील बरीचशी मते भाजपकडे गेली होती आणि आता बसपा अशक्त झाली असताना ही मते त्या पक्षाकडे परत जातील ही शक्यता थोडी कमी असेल असे वाटते. बसपाला अजूनही मते देणार्या मतांपैकी मते फिरली तर २०१४ मधील कल लक्षात घेता ती सपापेक्षा भाजपाकडे जायची शक्यता जास्त.
५. बिहारमध्ये अमित शहांनी भाजपचा पराभव झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील अशा प्रकारची वक्तव्ये केली होती. तसेच पेपरात गायीचे फोटो देऊन गोहत्याबंदी हा मोठाच मुद्दा बनविला होता. यावेळी अजून तरी तसे झालेले नाही. यावेळी भाजप नेत्यांची बॉडी लॅग्न्वेजही बिहारच्या वेळी होती त्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाची आहे असे वाटते.
प्रत्यक्षात काय होते हे ११ मार्चला कळेलच. भाजपचा विजय व्हावा म्हणून मला तसे वाटत आहे आणि बिहारमध्ये माझे आडाखे पूर्ण चुकले तसे आताही परत चुकणार का ते पण ११ मार्चलाच समजेल.
13 Feb 2017 - 5:18 pm | श्रीगुरुजी
'जागरण' अडचणीत सापडले आहे. मतदान सर्व मतदारसंघात पूर्ण होण्याआधीच पहिल्या फेरीच्या मतदानावर आधारीत "मतदानोत्तर चाचणी"चे आकडे घोषित केल्यामुळे निवडणुक आयोगाने त्यांच्याविरूद्द प्राथमिक चौकशीचा अहवाल दाखल केला आहे.
16 Feb 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी
डॉ. प्रवीण पाटील यांनी दुसर्या टप्प्याचा अंदाज वर्तविला आहे का? कदाचित "जागरण"वरील कारवाईमुळे निवडणुक संपेपर्यंत ते थांबणार असतील.
16 Feb 2017 - 3:49 pm | गॅरी ट्रुमन
प्रवीण पाटील यांनी जागांचे अंदाज व्यक्त न करता काही जनरल विधाने केली आहेत. त्यांच्या मते पहिल्या दोन टप्प्यात बसपाची कामगिरी वाटली होती तितकी निराशाजनक नाही. दुसर्या टप्प्यात मुरादाबाद, बिजनोर सारख्या भागात मुस्लिम मतांपैकी ६०% मते समाजवादी-काँग्रेसला तर २५% मते बसपाला जायची शक्यता आहे. त्यातून दुसर्या टप्प्यात सपाची कामगिरी अपेक्षेपेक्षा वाईट तर भाजपची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली होताना दिसत आहे.
चिंतामणी (ट्विटरवरील @IamIconoclast) म्हणून कोणी साधारण असेच अंदाज वर्तवले आहेत. त्याने तर आझम खानच्या चिरंजीवाचा स्वारमधून पराभव होणार तसेच बदाऊन जिल्ह्यातील गन्नौरमधून भाजप जिंकणार असे भाकित केले आहे. गन्नौरमधून २००४ मध्ये मुलायमसिंग यादव पोटनिवडणुकीत तब्बल १ लाख ८८ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते आणि हा मतदारसंघ सपाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे तिथे सपाचा पराभव झाल्यास नक्कीच ती महत्वाची बातमी ठरेल. तिल्हारमधून काँग्रेसच्या जतिन प्रसाद यांचाही पराभव होणार आहे असे या चिंतामणरावांचे मत आहे. या चिंतामणीविषयी मला विशेष माहिती नाही. सध्या विविध ठिकाणचे अंदाज काय आहेत यावर लक्ष ठेऊन आहे. ११ मार्चनंतर कोणाची विश्वासार्हता किती हे पडताळून बघता येईल.
12 Feb 2017 - 8:38 pm | श्रीगुरुजी
अगदी बरोबर. किंबहुना नोव्हेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पराभूत व्हायचे एकमेव कारण होते ते म्हणजे राजद, संजद व खांग्रेस यांच्या मतांची झालेली बेरीज. २०१४ च्या लोकसभेत संजद वेगळा लढल्याने संजद (१८%), राजद + खांग्रेस (२८%) व भाजप+ (३८%) असे विभाजन होऊन भाजप+ ने ४० पैकी ३२ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत संजद+राजद्+खांग्रेस यांची एकत्रित मते ४६% होती तर भाजप ८% मतांनी मागे होता. प्रत्यक्षात इतर स्थानिक पक्ष व अपक्षांमुळे दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी ४% मते गमाविली. त्यामुळे भाजप+ ३४% व राजद+संजद+खांग्रेस ४२% असे विभाजन होऊन भाजपचा दारूण पराभव झाला. अर्थात दोघांमधील ८% मतांचा फरक कायम राहिला. मोहन भागवतांचे राखीव जागांवरील वक्तव्य, असहिष्णुता व पुरस्कार-परती इ. मुळे भाजपचा पराभव झाला या दाव्यात अजिबात तथ्य नाही. भाजपविरोधातील मते एकवटल्यामुळेच भाजपचा पराभव झाला होता.
12 Feb 2017 - 9:08 pm | अमितदादा
उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्यास मला खरच आश्चर्य वाटेल, मला असे वाटते कि त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येयील. शेवटी सत्ते साठी भाजप सप किंवा बसप यांना जवळ करू शकते. वरून गांधी माझे आवडते नेते होते युपी साठी परंतु भाजप चा गांधी घराण्यावरचा रोष पाहता ते वरून गांधी ना भाजप कधी हि वर येवू देणार नाहीत. वरून गांधी नि त्यांच्या तसेच काही इतर मतदारसंघात गरीब लोकांच्या साठी घरे आणि विवाह सोहळ्यात खूप मोठी मदत केली आहे त्यामुळ त्यांचाविषयी युपी मध्ये एक सुप्त आकर्षण नक्कीच आहे.
बाकी बिहार मधील भाजपा चा पराभवास भागवतांचे विधान सुधा काही अंशी जबाबदार आहे, त्यांचा विधानानंतर विरोधी पक्षांनी केलेला हल्लबोल आणि मोदी आणि भाजप ने केलेली भयंकर सारवासारव सगळ काही सांगून जाते. जर निवडणुकीत अश्या सिम्बोलिक गोष्टीना महत्व नसते तर बिहार निवडणुकी आधी बाबासाहेब आबेंडकर यांचे स्मारक भूमिपूजन आणि महारष्ट्रातील निवडणुकी आदी शिव स्मारक पूजन यांच काय प्रयोजन. उगाच काँग्रेसी परंपरा अंतर्गत यश मिळाल कि गांधी ना आणि अपयश मिळाल कि स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक कारणांना, हे भाजप आणि संघात हि सुरु झालाय हे दिसतंय.
तसेच महारष्ट्रातील भाजप हा गुंडा पुंडांचा/ भ्रष्ट लोकांचा पक्ष झालेला पाहून अत्यंत वैताग आलाय, ज्या आशेनी लोकांनी भाजप ला मते दिली ज्या स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यावर लोकांना विश्वास होता त्यांनीच काही डागी लोकांना फक्त निवडणुकी साठी पक्षात घ्यावे हे नक्कीच निराशाजनक आहे. आज च बातम्यात अस ऐकल कि देवेंद्र जी नि ज्या एका सोलापुरातील भ्रष्ट नेत्याच्या प्रकरणावर विधानसभेत मोहर उठवली होती त्यालाच स्वत हार घालून पक्षात समाविष्ट करून घेतले.
भाजप ने स्वतसाठी नवीन tag line ठेवावी...पप्पू कलानीचा आशीर्वाद..राष्ट्रवादीची साथ..जनतेला घालू लाथ
14 Feb 2017 - 10:46 am | गॅरी ट्रुमन
गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रियांका वद्रा-गांधी अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रचार करत होत्या. यावेळी मात्र प्रियांका तिथे प्रचाराला जाणार नाहीत अशी शक्यता आहे.
एकतर राहुल आणि सोनिया निवडून आलेल्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघांमधील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१२ मध्ये काँग्रेसने २ मतदारसंघांमध्येच विजय मिळवला होता तर ७ जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसशी युती झाल्यावर या जागा समाजवादी पक्षाने काँग्रेससाठी सोडल्या.त्यातून ७ विद्यमान आमदारांची तिकिटे समाजवादी पक्षाने कापली. अर्थातच या ७ आमदारांनी आता अपक्ष म्हणून किंवा राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत . यापैकी दोन आमदार-- गायत्री प्रजापती आणि मनोज पांडे आपल्या प्रचारासाठी मुलायमसिंगांची सभा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे प्रियांकांना आपण प्रचार करूनही काँग्रेसचे उमेदवार जिंकतीलच अशी खात्री राहिलेली दिसत नाही. या भागात मतदान मार्च महिन्यात शेवटच्या टप्प्यांमध्ये होणार आहे आणि अजूनही अर्ज परत घ्यायची तारीख गेलेली नाही. त्यामुळे हे 'बंडखोर' उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील अशी आशा अजूनही आहे.
२००७ मध्ये या १० पैकी ७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. तेव्हा तो प्रियांकांचा प्रभाव समजला गेला होता. पण २०१२ मध्ये १० पैकी दोनच जागा मिळाल्या तरीही (आणि राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात चार चार महिने तळ ठोकून २००+ प्रचारसभा घेऊनही काँग्रेसला २८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत तरीही) काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे तो राहुल-प्रियांकांचा पराभव समजला न जाता तो उत्तर प्रदेशातील स्थानिक नेतृत्वाचा पराभव समजला गेला होता. आता यावेळी प्रियांका प्रचारालाच जाणार नसतील तर विषयच संपला :)
15 Feb 2017 - 11:03 pm | गॅरी ट्रुमन
आज उत्तराखंडमधील सर्व जागांसाठी उत्तर प्रदेशात दुसर्या टप्प्यासाठी मतदान झाले. उत्तराखंडमध्ये ६८% तर उत्तर प्रदेशात ६५.५% मतदान झाले आहे. हे मतदान २०१२ पेक्षा थोडेसेच जास्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रस्थापितविरोधी लाट आहे असे म्हणण्याइतके जास्त मतदान झाले असे वाटत नाही.
उत्तर प्रदेशात रामपूर, मुरादाबाद, बदाऊन, बरेली, साहरणपूर, अमरोहा, संभाल, शाहजहानपूर, लखीमपूर खेरी आणि पिलीभीत या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. या भागात समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान रामपूर विधानसभा मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान रामपूर जिल्ह्यातील स्वर (या मतदारसंघाचे इंग्रजी स्पेलिंग Suar असे आहे. कित्येक वर्षे मी या मतदारसंघाला "सुअर" म्हणून ओळखत होतो :( ) विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. रामपूर, मुरादाबाद, संभाल, अमरोहा हा मुस्लिमबहुल भाग आहे आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाला इथे चांगले यश मिळाले होते. १९९८ मध्ये स्वतः मुलायमसिंग यादव संभाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. समाजवादी पक्षाला या भागातून आणि कानपूर, उन्नाव, लखनौ इत्यादी राज्याच्या मध्य भागातील जिल्ह्यांमधून विजय मिळवणे गरजेचे आहे.
16 Feb 2017 - 3:19 pm | श्रीगुरुजी
२०१२ व २०१७ मधील मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. बहुतेक जैसे थे परिस्थिती राहणार असावी.
20 Feb 2017 - 2:34 pm | श्रीगुरुजी
उ. प्र. च्या कार पार पडलेल्या तिसर्या टप्प्यातील ६९ मतदारसंघातील मतदानात एकूण ६१.१६% मतदान झाले आहे. याच मतदारसंघात २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत ५९.९६% आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ५८.४३% मतदान झाले होते. म्हणजे यावेळी मतदानात जेमतेम १-२% इतकी अल्प वाढ आहे. तिसर्या टप्प्यातील मतदारसंघ हा सपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१२ मध्ये या ६९ मतदारसंघांपैकी तब्बल ५५ मतदारसंघात सपचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी सप व काँग्रेस एकत्र असल्याने खरं तर मतदानात बर्यापैकी वाढ व्हायला हवी होती. मतदानात अल्प वाढ असल्याने २०१२ चा कल कायम राहील असे म्हणता येईल. किंवा सप-काँग्रेस युती जनतेला फारशी न आवडल्याने, विशेषतः काँग्रेसविरोधात जनता असल्याने, काही जणांनी मतदान केलेच नसावे किंवा या युतीविरूद्ध मतदान केले असावे. एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून काही निष्कर्ष काढणे अवघड आहे.
20 Feb 2017 - 4:55 pm | वरुण मोहिते
केजरीवाल यांनी इरोम शर्मिला यांच्या पक्षाला देणगी दिली . पाठोपाठ आप चे खासदार भगवंत मान यांनीही एक महिन्याचा पगार देणगी म्हणून देऊ केला .शर्मिला यांनी भाजप ची ऑफर नाकारली . लढणारेत काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरुद्ध . काय होतंय ते पाहणं रोचक आहे . भाजप च्या जागाही काही वाढणारेत हे नक्की .
आप ने अजून ४ पक्षांशी तिथे आघाडी केलीये त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा हि समावेश आहे . एका जागेवरून दोन जागा झाल्या तर बरे असा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय .
21 Feb 2017 - 10:04 am | गॅरी ट्रुमन
काल समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून ज्या पध्दतीची वक्तव्ये आली आहेत ते पाहता त्यांच्या पायाखालील वाळू हळूहळू सरकू लागली आहे अशी त्यांना भिती वाटू लागली आहे असे दिसते.
समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातील राजेन्द्र चौधरी यांनी मोदी दहशतवादी आहेत असे वक्तव्य केले तर स्वतः अखिलेश यांनी प्रत्यक्ष मोदींविषयी काही वक्तव्य केले नसले तरी त्यांचा "गुजरातके गधोंका विज्ञापन" या वाक्यावरून नक्की त्यांचा म्हणण्याचा रोख नक्की कुठे आहे याचा अंदाज नक्कीच बांधता येतो. नरेंद्र मोदींनी गाझीपूरमध्ये प्रचंड मोठी रेकॉर्डब्रेक सभा घेतली. हरदोई आणि इतर ठिकाणीही मोदींच्या सभांमध्ये चांगली गर्दी जमली होती. कदाचित ग्राऊंड रिपोर्टमध्ये (ज्या पध्दतीने प्रवीण पाटील आणि इतर काही लोक रिपोर्ट करत आहेत) समाजवादी पक्षाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही असे रिपोर्ट अखिलेश आणि इतरांकडे पोचले आणि म्हणून ते निराश झाले आहेत ही शक्यता आहे का?
समजा हे निराश झाले असतील तरी अशा पध्दतीची वक्तव्ये करून मोदींना फायदा होतो एवढे त्यांच्या लक्षात कसे येत नाही हे समजत नाही. मौत का सौदागर, काँग्रेस अधिवेशनात चहा वाटायला मोदींना बोलवू, अफजलखान, सायकोपाथ, दहशतवादी आणि आता गुजरातका गधा!! यापैकी कशालाही मोदींनी आतापर्यंत एका शब्दानेही उत्तर दिलेले नाही आणि त्या टिकेचा राजकीय उपयोग मात्र अगदी प्रभावीपणे करून घेतला आहे. आणि तरीही हे विरोधक नवीननवीन मुद्दे मोदींना न मागताच देत आहेत!!
4 Mar 2017 - 3:22 pm | श्रीगुरुजी
मणीपूर व उत्तर प्रदेश विधानसभेच्या ६ व्या फेरीचे मतदान सुरू आहे. दुपारी १ वाजेपर्यंत उ. प्र. मध्ये सुमारे ३८% मतदान झाले आहे. याच वेगाने दिवसाखेर अंदाजे ६३-६४% च्या आसपास मतदान होईल.
उ. प्र. च्या मतदानाने पंडितांना बुचकळ्यात टाकले आहे. साधारणपणे असे मानले जाते की मागील निवडणुकीपेक्षा खूप जास्त मतदान झाले तर ते सत्ताधारी पक्षाविरूद्ध असते कारण सरकार बदलण्यासाठी जनता स्वतःहून मतदानाला येते. जर मागील निवडणुकीपेक्षा खूप कमी मतदान झाले तर ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असते कारण जनतेला सरकार बदलण्यात रस नसतो. परंतु जर मागील निवडणुकीएवढेच मतदान झाले तर ते नक्की कोणाच्या बाजूने झाले आहे ते सांगता येणे अवघड असते.
उ. प्र. च्या पहिल्या ५ टप्प्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत जेमतेम १% जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे निकालाविषयी भाष्य करणे अवघड आहे.
4 Mar 2017 - 3:30 pm | वरुण मोहिते
मोदींनी रोड शो केला जबरदस्त प्रतिसाद .लाट येत असते पण मेहनत कॊतुकास्पद आहे मोदींची .
4 Mar 2017 - 5:44 pm | प्रसाद_१९८२
वाराणसीत होणार्या भाजपाच्या रोड शोसाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरने ते वाराणसीत आले.
भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरचा उपयोग, स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी करणे हे कितपत योग्य आहे.
4 Mar 2017 - 5:48 pm | गॅरी ट्रुमन
माझ्या माहितीप्रमाणे सुरक्षेच्या कारणांसाठी पंतप्रधानांना वायुसेनेच्या विमान/हेलिकॉप्टरचा वापर करायला निवडणुक आयोगाची परवानगी आहे. पण त्यासाठी होणारा खर्च पक्षाने देणे अपेक्षित असते.प्रत्यक्षात हा नियम कितपत पाळला जातो याची कल्पना नाही.