महाभारतातील (पात्रांचे परस्पर) संवाद

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2017 - 12:46 pm
गाभा: 

आधीच दोन धागे काढल्यानंतर अजून एक धागा काढण्याबद्दल क्षमस्व. (विषय विस्मरणातून गेला तर पुन्हा केव्हा आठवेल ते सांगता येत नाही असो)

महाभारतातील गीतेत येणारा कृष्णार्जून संवाद सुपरिचीतच आहे. पण त्याशिवाय द्रौपदी-सत्यभामा-संवाद, पंडू कुंती संवाद, आणि इतरही संवाद असावेत.

मराठी विकिपीडियावर कुणी द्रौपदी-सत्यभामा-संवाद नावाच्या लेखात चार ओळी लिहिल्या पण पुरेशा मजकुर आणि संदर्भां अभावी तो लेख उल्लेखनीयता स्वतंत्रपणे मराठी विकिपीडियावर ठेवण्यास सध्यातरी पुरेशी नसल्यामुळे तो लेख महाभारतातील संवाद या लेखात स्थानांतरीत केला आहे.

* महाभारतात कोणकोणत्या पात्रांमध्ये परस्पर संवाद झालेले आहेत ?
* त्या पैकी ज्या संवादांची तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल दोन दोन ओळी तरी लिहून मिळाल्यास किमान संवादाचा मुख्य विषय आणि वैशिष्ट्य हवे आहे.
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार, विकिसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

प्रतिक्रिया

खूपच संवाद आहेत हो. कुठले आणि कसे लिहू

माहितगार's picture

14 Jan 2017 - 2:15 pm | माहितगार

खरय मला वाटते महाभारताची सुरवातही संवादातून होते. पण जेजे माहित आहेत त्यांचा उल्लेख करावयास हरकत नाही म्हणजे इतर मंडळीही जसे आठवेल तसे लिहितील.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2017 - 3:19 pm | टवाळ कार्टा

मय समय हूं

Ujjwal's picture

15 Jan 2017 - 10:50 am | Ujjwal

:)

फेदरवेट साहेब's picture

29 Jan 2017 - 11:47 am | फेदरवेट साहेब

आमच्या एका मित्राने एक अफाट वाक्य जोडले होते

'मै समय हुं, मै तुम्हारी बजाता रहूगा"

तेव्हा त्याची अवस्था वाईट होती टेस्टिंग टीम दे माय धरणीठाय करत होती अन प्रोजेक्ट लाईव्ह व्हायला उशीर होत होता. तरीही आम्ही कॅफेटेरिया मध्ये फुर्रर्रर्र करून पाण्याचे कारंजे उडवून बसलो होतो त्या वाक्यावर.

शरद's picture

15 Jan 2017 - 11:28 am | शरद

ह्या धाग्याची व्याप्ती माझ्या लक्षात येत नाही. उदा. सर्व युद्धवर्णन हा संजय-धृतराष्ट्र यांच्यातील संवाद आहे.तो ही दोन-तीन वाक्यात हवा आहे कां ? ते सोडा. महाभारतातील सर्व कथांमध्ये संवाद आहेत. असे शे-दोनशे संवाद सहज देता येतील. किती पाहिजेत ? श्री. माहीतगार जर नक्की काय अपेक्षित आहे हे सांगतील तर सुरवात करता येईल.
शरद .

व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न करतो,

१) उदाहरणार्थ रामायणात सीता आणि अत्रीपत्नी अनसुयेचा केवळ संवाद झालायाची माहिती महाकाव्यात आहे पण पूर्ण संवाद दिलेला नाही असे संवाद तुर्तास या परिघात घेत नाही. (उदाहरण रामायणातल घेतल तरी हा धागा महाभारतातील संवादांची ज्ञानकोशीय दखल घेण्यासाठीच आहे)
२) प्रत्यक्ष संवाद नको आहेत त्या संवादात कोणकोणत्या घटकांवर / विषयावर चर्चा आहे किंवा त्या संवादाचे स्वरुप काय ? त्या संवादाचा महाभारत महाकाव्यातील अंतरंग आणि बहीरंग /महाभारत प्रभाव शिवाय गीतेचा जसा सामाजिक /सांस्कृतिक प्रभाव पडला तसा असेल तर किंवा 'यक्षप्रश्न' हा शब्द वाक्प्रचार म्हणून रुजला. आसे ज्ञानकोशीय नोंड घेतायेऊ शकतील असे उल्लेख. एकुण ज्ञानकोशीय दखल घेता येईल नोंद घेण्या जोग्या संवादांचा उहापोह करणारे परिच्छेद लेखन, एक दोन वाक्ये हे किमान म्हणून दिले आहे कमाल अशी कोणती अट नाही.
३) एकुण संवादांची संख्या किती याची जमेल तेवढी यादी या निमीत्ताने सहजगत्या होत असेल तर त्याचीही हरकत नाही धागा लेखाचा उद्देश तेवढ्यापुरता मर्यादीत नाही.

गामा पैलवान's picture

15 Jan 2017 - 2:01 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमचं काम खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्यासारखेच लोकं मराठीला ज्ञानभाषा बनवू शकतात.

संवादांविषयी एक विचारू इच्छितो. पांडव वनवासात कुण्या एका ऋषींच्या आश्रमात गेले होते. तिथे युधिष्ठिर व ऋषी यांच्यात किरकोळ संवाद झाडला. त्यातून पुढे ऋषींनी नल आणि दमयंतीची कथा सांगितली. म्हणायला हा संवाद आहे, मात्र प्रत्यक्षात जवळजवळ एकतर्फी कथन आहे. असे संवाद कशा प्रकारे नोंद करावे? माझ्या मते यांची संख्या बरीच आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

16 Jan 2017 - 8:58 am | माहितगार

असे संवाद कशा प्रकारे नोंद करावे? माझ्या मते यांची संख्या बरीच आहे.

अशा संवादांची संख्या बरीच असावी याच्याशी सहमत. यांचीही दखल कोशसाहित्याने घ्यावयास हवीच, जमेल तेथे संवाद एकतर्फी आहे हे नोंदवावे म्हणजे विकिवर त्यांचे स्वतंत्र वर्गीकरण शक्य होऊ शकेल. अर्थात एखादा संवाद एकतर्फी आहे हे मोजणे अवघड असणार त्यामुळे अगदी पक्के वर्गीकरण जमणार नाही. पण संदर्भ आणि दखल घेणे अधिक सुलभ होऊ शकेल.

अनुषंगिक अवांतर

संवादांचा उपयोग पौराणिक साहित्यात प्रबोधन हेतूने केला असल्याचे वाचताना जाणवते, प्रबोधनावर भर देण्यामुळे संवाद एकतर्फी होत असतील का ?

शरद's picture

16 Jan 2017 - 9:32 am | शरद

१) उदाहरणार्थ रामायणात सीता आणि अत्रीपत्नी अनसुयेचा केवळ संवाद झालायाची माहिती महाकाव्यात आहे पण पूर्ण संवाद दिलेला नाही

रामायणात अयोध्याकाण्डात सर्ग ११८ (१-२९); सर्ग ११९(१-५४) इथे विस्तीर्णपणे सीता-अनसुया यांचा संवाद दिला आहे. अनसुयेचा सीतेला उपदेश, सीत्रेच उत्तर, अनसुयेने सीतेला तिच्या विवाहाबद्दल केलेली विचारणा, सीतेचे उत्तर असे प्रामुख्याने त्या संवादाचे स्वरूप आहे.
( साधारणत: अशी माहिती प्रतिसादात देणे मला प्रशस्त वाटत नाही.मी लेखकाला व्य.नि.वर कळवतो. परंतु श्री माहितगार यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याने इथे देत आहे.).
शरद

माहितगार's picture

16 Jan 2017 - 10:12 am | माहितगार

अच्छा, मला कल्पना नव्हती (आता वाचतो) आणि अशी माहिती होणे हाच धाग्याचा उद्देश आहे म्हणून येथे चर्चा करण्यात गैर काहीच नाही. अशीच पण थोडी अधिक भर घालून महाभारतातील संवादांबद्दल माहिती संकलीत होईल हि अपेक्षा.

जेपी's picture

15 Jan 2017 - 2:05 pm | जेपी

धागा फुलस्कोप आहे.
पण मागा चां असल्यामुळे अवांतर टाळतो.

शरद's picture

18 Jan 2017 - 8:20 am | शरद

महाभारतातील संवाद
(१) व्यास - ब्रह्मदेव
व्यासांनी ब्रह्मदेवाकडे चिंता व्यक्त केली की मी महाभारताची रचना केली आहे पण ह्या सर्व समावेषक काव्याला योग्य असा लेखक मला पृथ्वीवर आढळत नाही. ब्रह्मदेवाने गणपतीचे नाव सुचविले.
महाभारतात सर्व, सर्व, विषयांचा समावेश आहे याचा इथे उल्लेख आहे. "व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वं" या उक्तीचा उगम येथे आहे.

(२) व्यास - गणपती
व्यासांची विनंती गणपतीने मान्य केली. पण एक अट घातली."माझी लेखणी क्षणभरही थांबणार नाही, याची तू कालजी घेतली पाहिजेस." व्यास णाले, " मान्य. पण तू लिहताना श्लोकाचा अर्थ मनात आणून मग लिहले पाहिजेस."
महाभारतात काही कूट श्लोक आहेत. त्यांचा अर्थ लावणे अवघड जाते. व्यासांना जेव्हा थोडा अवधी पाहिजे असेल त्यावेळी गणपती अर्थ लावण्यात वेळ काढेल अशा अर्थाने हा संवाद झाला

(३) धृतराष्ट्र - संजय
आदिपर्वात धृतराष्ट्र व संजय यांचा संवाद दिला आहे. त्यात युद्धोत्तर सर्व कौरव मेल्यानंतर धृतराष्ट्र शोक करतो व संजय त्याची समजुत घालतो अशी मांडणी आहे

(४) ऋषि - सौति
आदिपर्वात नैमिषारण्यात जमलेल्या ऋषींनी तेथे आलेल्या सौतीला कथा सांगण्यास सांगितले व त्याने महाभारत कथेचा उपोद्धात केला आदिपर्व, अध्याय पहिला

(५) ऋषि - सौति
सौति ऋषींच्या विचारण्यावरून त्यांना समंतपंचक वर्नन, अक्षौहिणीचे परिमाण, भारताचा विस्तार, मुख्य पर्वे, व महाभारता॒चे फल सांगतो. आदिपर्व, अध्याय दुसरा.

(६). उत्तंक - पौष्य राजा (१)
अद्याय तीनमध्ये गुरू-शिष्य यांच्या गोष्टी आहेत व तेथे त्यांचे संवाद आहेत. इथे उत्तंकाच्या कथेतील दोन संवाद बघू. गुरूपत्नीच्या इच्छेप्रमाणे उत्तंक पौष्य राजाकडे राणीच्या कुंडलांची मागणी करतो. राजा त्याला " अंत:पुरात जाऊन माझ्ह्या पत्नीपाशी ती माग " असे सांगतो.
संवाद लहान असल तरी एक महत्वाची गोष्ट कळते की स्त्रीधनावर पतीचा हक्क नव्हता. देणे न देणे राणीच्या इच्छेवर अवलंबून होते.

(७) उत्तंक - पौष्य राजा (२)
नंतर एका गैरसमजावरून राजा व उत्तंक एकमेकांना शाप देतात. गैरसमज दूर झाल्यावर उत्तंक शाप मागे घेतो पण राजा तसे करू शकत नाही.
या संवादात राजा म्हणतो की ब्राह्मणाचे अंत:करण मृदु असते पण क्षत्रीयाचे तीक्ष्ण असते अध्याय तीसरा

(८) पुलोम राक्षस - -अग्नी
पुलोमाला भृगु ऋषीच्या पत्नीला पळवून न्यावयाचे होते. त्याकरिता त्याला अग्नीची साक्ष काढावयाची होती. ह्या संवादात अग्नीला खरे बोलावयास सांगतो अग्नी ’नरो वा कुंजरो वा" अशी साक्ष देतो.
देवांना देखील शब्दात पकडू शकता असे इथे दिसते. अध्याय पांचवा

(९) रुरू - देवदूत
रुरूची पत्नी मरण पावल्यवर तो शोक करत फिरत असतांना त्याला एक देवदूत भेटतो व रुरूला सांगतो की ’तू तुझे अर्धे आयुष्य तिला दे, ती जिवंत होइल". त्या प्रमाणे होते.
त्या काळी असे शक्य आहे यावर विश्वास होता. अध्याय नववा

(१०) रुरू - डुंडुभ
रुरूची पत्नी जिवंत झाली परंतु तो तेव्हापासून दिसणार्‍या प्रत्येक सापाला मारत सुटला. त्याला एक डुंडुभ (निर्विष, दुतोंड्या साप) दिसला. रुरू त्याला मारण्यास निघाला, तेव्हा डुंडुभाने त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली.
समाजातील एकाच्या चुकीबद्दल सर्वांना शिक्षा करणे योग्य नव्हे असा संदेश. अध्याय दहावा

आदिपर्वातील दहा अध्यायातील दहा निवडक संवाद दिले आहेत. येथे त्या काळच्या काही समजुतींवर प्रकाश पडतो. इतर किरकोळ संवाद ३०-४० सापडतील. जरा विचार करा, सगळ्या महाभारतातील संवाद लिहणे किती वेळकाढू होईल. श्री. माहितगार यांना शुभेच्छा.
(श्री. गामा पैलवान, कृपया जरा मार्गदर्शन करा; वरील संकलनामुळे मराठी ज्ञानभाषा कशी होणार ?)
शरद

गामा पैलवान's picture

18 Jan 2017 - 12:50 pm | गामा पैलवान

शरद,

असं बघा की मला जातिबहिष्कृतांविषयी राजकर्तव्ये काय आहेत ते शोधायचं आहे. यासाठी नारद - युधिष्ठीर संवाद शोधावा लागेल. त्यात नारदाने युधिष्ठिरास राजधर्म पाळतोस ना असं विचारलं आहे. त्यात अनेक उपप्रश्न आहेत. त्यापैकी एक जातिबहिष्कृतांची काळजी घेण्याविषयी आहे. यावरून तत्कालीन राजाची जबाबदारी स्पष्ट दिसून येते. ही साखळी मराठी भाषेतल्या विकीवरून चटकन जुळवता येईल. माहितगार यांनी आचरलेल्या उपक्रमांमुळे मराठी भाषा संदर्भसमृद्ध आणि म्हणूनंच ज्ञानाभिमुख होईल.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

18 Jan 2017 - 1:28 pm | माहितगार

वरील संकलनामुळे मराठी ज्ञानभाषा

कोणत्याही एका संकलनाने मराठी भाषा ज्ञानभाषा होईल असे नव्हेच. तळ्यातला एक थेंब वेगळा काढून याने तहान भागते का असे विचारण्यासारखे होणार नाही का ?

४ जानेवारीला पुणे विद्यापीठात माधवराव गाडगीळांनी मराठी विकिपीडिया विषयावर व्याख्यान दिले त्यात त्यांनी सर्जन >> संकलन>> सुरचना सुरचनेने नविन समज निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन केले.

यातील सुरचनेची जबाबदारी मुख्यत्वे ज्ञानकोशांची आणि आधुनिक ज्ञानकोशात विकिपीडिया सुद्धा हि जबाबदारी अंशतः निभावतो असे म्हणता येऊ शकते का.

गामा पैलवान's picture

18 Jan 2017 - 8:00 pm | गामा पैलवान

माहितगार,

कोणत्याही एका संकलनाने मराठी भाषा ज्ञानभाषा होईल असे नव्हेच.

मान्य. पण निदान ते योग्य दिशेने टाकलेलं पाऊल आहे.

आ.न.,
-गा.पै.

मार्कस ऑरेलियस's picture

18 Jan 2017 - 11:07 pm | मार्कस ऑरेलियस

आमचा आवडता संवाद म्हणजे

सनत्सुजात पर्व !
युध्दाच्या आधी पांडवांचा पक्ष सत्याचा आहे हे मनात कोठेतरी खोलवर माहीत असल्याने धृतराष्ट्राची तंतरलेली असते. विदुर त्याला प्रचंड प्रदीर्घ प्रवचन देतो नीतीवर ! पण त्याने काही त्याच्या मनाला शांती लाभत नाही . कारण कोठेतरी मनात खोलवर राज्य आपल्या पोरांनाच मिळावे हा स्वार्थ दडलेला असतो पण भीमाच्या हातुन पोरं मरणार हेही कळत असते ! मग तो विदुराला अध्यात्म ज्ञानाविषयी मार्गदर्शन करावयास सांगतो . विदुर स्वतः आत्मज्ञानी जीवनमुक्त असले तरीही तत्कालीन समाजव्यवस्थेचा मान राखुन म्हणतात की मी जन्माने शुद्र आहे , मला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही , ह्या विषयावर आपणाला सनस्तुजात मुनी मार्गदर्शन करुशकतील ! (विदुर जन्माने शुद्र कसे ह्याचा काहीकेल्या उलगडा होत नाही )

आणि मग तेथुन पुढे सनत्सुजात आणि धृतराष्ट्र ह्यांच्या अत्यंत अध्यात्मिक अद्वैततत्वज्ञावर आधारित प्रदीर्घ संवाद आहे ! त्यातील सर्वात अफाट तर्क म्हणजे " आत्मज्ञानी मनुश्याकरिता मृत्यु असे काही नसतेच , मृत्यु हा प्रमाद आहे ( प्रमाद म्हणजे बहुतेक जे नाही त्यावर आहे असा आरोप करणे. ) ज्याला ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हे उमगले आहे त्याला मृत्यु असुच शकत नाही ! "

एकुणच अद्वैत तत्वज्ञानाचा अजुन एक भारी ग्रंथ / प्रकरण आहे हे ! श्रीमदाद्यशंकराचार्यांनी महाभारतातील गीते सोबत ह्याही पर्वावर सविस्तर भाश्य केले आहे ( असे ऐकुन आहे , अजुन वाचनात आलेले नाही !)

अर्थात धृतराष्ट्रासारख्या पालथ्या घड्यावर हा सगळा उपदेश करणे ह्या प्रसंगावरुनच " गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता " ही म्हण पडली असावी असे प्रकर्षाने वाटते .
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

माहितगार's picture

20 Jan 2017 - 11:21 am | माहितगार

मी शरदरावांच्या आणि आपल्याही संवाद उल्लेखांची मराठी विकिपीडियावर दखल घेतली.

इंग्रजी विकिपीडियावर सनत्सुजात संवादवर पूर्ण लेख दिसतो आहे. मला वाटते इंग्रजी विकिपीडियावरील त्या लेखातही अधिक सुधारणा हवी असावी कारण वाचून समाधान झाल्यासारखे वाटले नाही.

तुम्ही खरंच जी काही माहिती गोळा करत असता ते कौतुकास्पद आहे. सगळ्याच धाग्यांना प्रतिसाद नाही देता येत. इथे देतोय.

प्रमोद देर्देकर's picture

19 Jan 2017 - 6:04 am | प्रमोद देर्देकर

माहितगार यांचा नेहमी प्रमाणे उत्कृष्ठ माहीती असलेला धागा गामा आणि मार्क यांच्या प्रतिसादही माहिती पूर्ण.

उगा काहितरीच's picture

19 Jan 2017 - 7:50 pm | उगा काहितरीच

धागा आणि प्रतिक्रिया पण चांंगल्या आहेत . अजून संवाद वाचायला आवडेल .

शरद's picture

21 Jan 2017 - 6:26 am | शरद

जरा मदत पाहिजे आहे. ज्रर आणखी काही संवाद द्यावयाचे म्हटले तर ते इथे मिपावर द्यावेत काय ? मला नाही वाटत की येथील सभासदांना त्यात काही स्वारस्य असेल. की ते तुमच्या खवीवर द्यावेत ?
शरद

माहितगार's picture

21 Jan 2017 - 8:58 am | माहितगार

दीर्घ उत्तरासाठी क्षमाप्रार्थी आहे.

होय मदत तर हवी आहे. अर्थात खरेतर आपण स्वतः विकिपीडिया महाभारतातील संवाद लेखात टाकणे हा सर्वोत्तम मार्ग आणि विकिपीडियात गेल्या वर्षाभरापासून संपादन अजूनच सोपे झाले आहे.

खरडी अथवा व्यनीही हरकत नाही पण तुम्ही लिहिलेल्या व्यनि/खरडीचा कॉपीराईट तुमच्या कडे रहातो, कॉपीराईट मुक्ततेची घोषणा जाहीरपणे व्हावी लागते जे विकिपीडियावर सरळ लिहिले तर किंवा कॉपिराईट मुक्ततेची उद्घोषणा केलेल्या धाग्यावर सहज शक्य होते.

मिपा धाग्यांतून अजून एक साध्य होणारा उद्देश म्हणजे तुम्ही माझ्या दाव्यात जशा त्रुटी दाखवल्या त्या दाखवल्या जाणे अथवा विरोधी मताला, आक्षेपांना, समिक्षेला संधी देणे. मिपासारख्या माध्यमातील चर्चा प्रतिसाद बर्‍याचदा उथळपणाही असतो नाही असे नाही पण कुठेतरी केव्हातरी तुमच्यासारखी आपापल्या विषयातील जाणकार मंडळी चक्करही मारत असतात, अगदीच बंदीस्त साधनांपेक्षा मिपा धाग्याचा मंच बरा वाटतो.

पण शेवटी आपल्या इच्छेबाहेर नाही हेही खरेच

शरद's picture

21 Jan 2017 - 10:09 am | शरद

माझे सर्व लिखाण कॉपीराइटमुक्त आहे असे मी येथे जाहीर करतो. आणखी कुठे जाहीर करणे जरुरीचे असेल तर तसे कळवावे. विकीवर लिहण्यास हरकत नाही पण उशीरा संगणकाशी ओळख झाल्याने (व वयोमानाने, खोटे कशास बोला) ते अजून शिकलो नाही. कुणी शिकवावयाचा प्रयत्न केला तर आनंदच होईल. (गुरूजींना, ते पुण्यातील असतील तर, डोसा-डोसे खाल तेव्हडे व कॉफी गुरूदक्षिणा म्हणून मिळेल.)
शरद

माहितगार's picture

21 Jan 2017 - 12:40 pm | माहितगार

शरदरावजी "माझे सर्व लिखाण कॉपीराइटमुक्त" हे व्यापक विधान आहे आपल्या ह्या विधानाने आपले मागचे इतरत्रचे आणि काही प्रकाशित ग्रंथ असतील तर त्यातील लेखनही प्रताधिकार मुक्त होऊ शकते त्यामुळे काही लेखनावर कॉपीराईट राखावयाचा असल्यास तशी अटही नमुद करणे श्रेयस्कर असावे.

(गुरूजींना, ते पुण्यातील असतील तर, डोसा-डोसे खाल तेव्हडे व कॉफी गुरूदक्षिणा म्हणून मिळेल.)
जरुर येईन की :) , आणि दोसे घाऊक प्रमाणात बनवत असाल तर तसे सांगा आम्ही दोसा बनवणारे अ‍ॅटोमॅटीक मशिन विकतो (अप्रत्यक्ष जाहिरातीसाठी मिपा मालकांचा क्षमाप्रार्थी)

शरद's picture

21 Jan 2017 - 4:27 pm | शरद

माझे कुठलेही लिखाण, भूत-भविष्य काळातले, कॉपीराईट फ़्री असे जाहीर करावयास माझी हरकत नाही. कुण्या महाभागाला (त्याचा उपयोग करावा असे) त्याचे मोल वाटत असेल तर मला आनंदच आहे..तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी पुढील संवाद येथे टाकतो. तुम्ही बघावयाची तसदी घ्या म्हणजे झाले.
डोसे खावयास केव्हाही या. फक्त आदल्या दिवशी कळवा. (२५६७१३८४) Satisfaction gauarateed.
शरद

शरद's picture

23 Jan 2017 - 10:48 am | शरद

(११) जरत्कारू - पितर
जरत्कारू हा एक ब्रह्मचारी, महान तपस्वी होता. तो हिंडत फिरत असतांना एका मोठ्या गर्तेसमीप आला. तेथे त्याने काही पुरुष खाली डोके-वर पाय अश्या स्थितीत एका गवताच्या पुंजक्याला धरून लोंबकळतांना पाहिले . त्याने विचारल्यावर त्यांनी सांगितले की " आम्ही तुझे पितर आहोत. तू विवाह न केल्याने संतानक्षय होऊन आम्हाला सद्गती मिळणार नाही."
त्या काळी मनुष्यसंख्या वाढण्याची गरज असल्याने लग्न करून, वंश वाढवून "पितृऋण" फेडले पाहिजे अशी समजूत होती.
अध्याय तेरावा आदिपर्व

(१२) गरुड - विनिता
विनिता ही गरूडाची आई. गरुडाचा जन्म झाल्यावर त्याला भूक लागली. विनिताने त्यालाअ समुद्रकिनार्‍यावरील निषाद(कोळी) खावयास सांगितले.मत्र त्यावेळीच "ब्राह्मण खाऊ नकोस " अशी सुचनाही दिली. त्या प्रमाणे गरुडाने निषाद भक्षण करत असतांना तोंडात सापडलेल्या एका ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सोडून दिले.
महाभारतात बर्‍याच ठिकाणी ब्राह्मणाच्या श्रेष्टत्वाची महती सांगितली आहे. काही ठिकाणी तर येथल्यासारखी ओढून ताणून.. अध्याय अठ्ठाविसावा आदिपर्व

(१३)शेष - ब्रह्मदेव
शेष हा सर्व सर्पांमधील मोठा भाऊ. त्याला आपल्या भावांचा स्वभाव पसंत नसल्याने त्याने सर्वांना सोडून दूर तपस्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले व लोककल्याणाचे काम म्हणून त्याला डळमळणारी पृथ्वी डोक्यावर धारण क्ररावयास सांगितले
पाताळातील शेष पृथ्वी डोक्यावर धारण करतो या समजुतीची सुरवात येथून झाली.
अध्याय छत्तिसावा. आदिपर्व

(१४) शमीक - शृंगी
शृंगी हा शमीक ऋषीचा मुलगा.शमीक मौनव्रत धरून बसला असताना परिक्षित राजाने त्याच्या खांद्यावर एक मृत साप टाकला. शमीक काही बोलला नाही परंतु शृंगीला हे कळल्यावर त्याने " सात दिवसात तक्षक तुला चावेल व तू मरशील " असा परिक्षित राजाला शाप दिला.
शमीकाला हे कळल्यावर त्याने शृंगीला उपदेश केला की राजाने अपराध केला असला तरी प्रजाजन ब्राह्मणाने क्रोधाचा अवलंबन करून शाप देऊ नये. शांती धार॒ण करणे व क्षमा करणे हा तपस्व्यांचा धर्म आहे. अध्याय एकेचाळिसावा-बेचाळिसावा आदिपर्व

(१५) काश्यप - तक्षक
परिक्षित राजाला मिळालेल्या शापाचे व्रुत्त कळल्यावर काश्यप नावाचा एक मंत्रविशारद ब्राह्मण राजाला वाचवून द्रव्य मिळवावे म्हणून राजा॒कडे निघाला असताना वाटेत त्याला तक्षक भेटतो. काश्यपाचे मंत्रसामर्थ्य पाहिल्यावर तक्षक त्याला वाटेतच भरपूर द्रव्य देऊन परत पाठवतो.
त्या काळी मंत्रसामर्थ्यावर सर्वांचा विश्वास होता. अध्याय पन्नासावा. आदिपर्व

(१६) उपरिचर- इंद्र
उपरिचर नावाचा राजा तपाचरण करून इंद्रपदाला योग्य झाला. इंद्राने व इतर देवांनी त्याला दर्शन देऊन त्याला तपाचरणापासून परावृत्त केले व इंद्राने पृथ्वीचे राज्य करावयास सांगितले व त्याला प्रेमाची खूण म्हणून एक वेळूची काठी साधूप्रतिपालनार्थ दिली. इंद्राचे उपकर स्मरून त्याने ससंवस्तराचे शेवटी ते जमिनीत पुरून ठेवली.
गुढी पाडव्याची प्रथा येथून सुरू झाली. अध्याय त्रेसष्टावा आदिपर्व

(१७) दुष्यंत - शकुंतला
कण्व ऋषी आश्रमात नसतांना दुष्यंत राजा तेथे येतो व शकुंतलेला पाहून मोहित होऊन तिला मागणी घालतो.शकुंतला ती मान्य करते.पण एक अट घालते, " मला होणारा मुलगा युवराज झाला पाहिजे"
.इथे दोन महत्वाच्या गोष्टी समोर येतात. (१) वडील नसतांनासुद्धा मुलीला वर निवडण्याची परवांगी होती. (२) वधू काही अटी घालू शकत होती. अध्याय त्राहात्तरावा आदिपर्व

(१८) शकुंतला - दुष्यंत
भरत जन्मानंतर शकुंतला त्याला घेऊन दुष्यंताकडे येते. दुष्यंत तिला नाकारतो पण नंतर आकाशवाणी झाल्यावर तिचा स्विकार करतो. तो अमात्यादींना म्हणतो "मला हे सर्व विदित होते पण
हिच्या सौंदर्‍याकडे पाहून मी हिचा स्विकार केला असे आपणास वाटू नये म्हणून मी प्रथम नाकारले"
महाभारतात शाप, माशाने अंगठी गिळणे, वगैरे काही नाही. अध्याय चौर्‍याहत्तरावा आदिपर्व

(१९) कच- देवयानी
देवयानीचे कचावर प्रेम असल्याने तिने वडिलांना गळ घालून कचाला जिवंत केले. पण नंतर कचाने आपण शुक्राचार्यांच्या पोती जन्मलो, म्हणून आपण दोघे भाऊ-बहीण आहोत असे सांगून तिला नाकारले व तिचा शापही स्विकारला. अध्याय सत्याहत्तरावा आदिपर्व

(२०) शुक्र - देवयानी
दैत्याचा राजा वृषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा व देवयानी यांचे भांडण झाले व शर्मिष्ठाने देवयानीला
विहीरीत ढकलून दिले. रागावलेल्या देवयानीची समजुत घालतांना शुक्राचार्य शांतीचे महत्व सांगतात तर देवयानी भाग्यहीन मनुष्याला मृत्यु आलेला उत्तम असे सांगते.
अध्याय एकुणऐशींवा आदिपर्व

शरद

माहितगार's picture

23 Jan 2017 - 1:30 pm | माहितगार

शरदरावजी कष्टपुर्वक करत असलेल्या संकलनाबद्दल आपला आभारी आहे.

यातील शंकुतला आणि देवयानी कथांचा नंतरच्याही साहित्यात दखल घेतली आहे यादृष्टीने महत्वाचे आहे.

उपरिचर- इंद्र संवाद काठी पूजेची (शक्रोत्सव) परंपरा अधोरेखीत करतो असे वाटते. शक्रोत्सवाबाबत मिपावर मागे इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न हा धागा काढला होता त्या चर्चेत आपलाही सहभाग मिळाल्यास त्या धागालेखासही मदत होईल असे वाटते.

काश्यप - तक्षक संवादातील त्या काश्यपांचे नाव कधी लक्षात नाही राहीले पण हा कथा भाग मि पहिल्यांदा वाचला तेव्हा तरी माझ्या डोक्यात आलेली संद्या 'भ्रष्टाचार' अशीच होती, माझ हे वाटण किती बरोबर अथवा चूक हे इतर मंडळीच सांगू शकतील.

गरुड - विनिता संवादाची प्रथमच माहिती झाली, वाचता क्षणी आधी एलओएल झाले. या अशा कथा का लिहिल्या गेल्या असतील असा प्रश्नच पडतो. बरेचसे पौराणिक लेखनही चातुर्य कथा स्वरुपाचे वाटते राजे लोकांना स्ट्रॅटेजी मेकींग आणि पुढील पिढीच्या शिक्षणासाठी चातुर्यकथा सांगणारे लागत असणार याचा ब्राह्मणांनी राजाश्रय मिळवण्यासाठी फायदा उठवला असणार. कटू असले तरी सत्यवचनाला राजाश्रय रहावा म्हणुन असे संरक्षण अंशतः उपयूक्त असू शकते पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगावर येणारा असावा असो.

क्रोध होणे आणि क्रोध टाळण्याच्या उपदेश कथा पौराणिक साहित्यात आहेत इथे शुक्रचार्य आणि शमीकाचा उपदेश दिसतो आहे. "क्रोध होणे आणि क्रोध टाळण्याच्या अथवा शांतीचा उपदेश" पौराणिक कथांचेही कुणी वेगळे संकलन केले गेले तर त्यावर वेगळा लेख होऊ शकेल असे वाटते.

इंद्राचे आसन डळमळण्याच्या कथांचीसुद्धा पौराणिक साहित्यात अगदी रेलचेल असते.

जरत्कारू - पितर संवादाची कल्पना नव्हती; कृषी संस्था वेगाने विकसीत होतानाच्या काळात नागरी सांसारीक जिवनातील ताणतणावापासून दुख्खापासून मुक्तीची आसही एकीकडे लागलेली त्यामुळे सांसारीक जिवन त्यागण्याचे अध्यात्मिक उपदेशही होताना दिसतात. ऐतिहासिक काळात बालमृत्यूदर मोठा असणे एकुण वयोमान कमी असणे अशा समस्या होत्या, म्हातारपणी माता पित्यांना आधार लागत त्या शिवाय मनुष्यबळ आधारीत कृषी संस्था वेगाने विकसीत होतानाच्या काळात आपण म्हणता तशी मनुष्यबळाची मोठी गरज असणार. त्यावेळी बालब्रह्मचारी अथवा बालभिख्खूंचे प्रमाण वाढणे सामाजिक ताण वाढवणारे ठरले असू शकते. ऐतिहासिक काळात चीन मध्ये बौद्धधर्माच्या विकासावर घरासरशी एक मुलगा भिख्खू करणे यावर त्याकाळात आक्षेप घेतला गेल्याचे आंतरजालावर कुठेसे वाचल्याचे आठवते. विसाव्या शतकाच्या सुरवातीस जैन धर्मातही बाल वयात मुनी जिवन देण्या विरुद्ध समाज सुधारणा चळवळ झाल्याचे वाचल्याचे आठवते. पितृत्वप्राप्ती आणि गृहस्थाश्रमातून जाण्याचा हिंदू जीवन पद्धतीतील आग्रह सोबतीला माता पित्यांची सेवाकरण्याचे सातत्याचे भावनिक आवाहन घरासरशी एक बालभिख्खू मागणार्‍या जैन आणि बौद्ध धर्मीयांपेक्षा कृषक विकास होणार्‍या समाजाला भावले असेल का असे कधी कधी वाटते.

मयुरेश फडके's picture

22 Feb 2017 - 8:44 pm | मयुरेश फडके

वाह. बर्याच गोष्टी पुन्हा आठवल्या.

शरद's picture

29 Jan 2017 - 7:14 am | शरद

(२१) ययाति - पुरू
शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीला वृद्धत्व प्राप्त झाले. ते त्याच्या सांगण्यावरून त्याचा मुलगा पुरू याने घेतले. एक हजार वर्षांनी ययातीने ते पुरूकडून परत घेतले. त्या वेळी पुरू त्याला म्हणाला ’महाराज, आपणास पाहिजे असेल तर मी अजून जरा घेतो." त्यावेळी ययाति त्याला पुढील सुप्रसिद्ध सिद्धांत सांगतो " न तु काम कामानां उपभोग्येन शाम्यति." आदिपर्व अध्याय पंचायशी.

(२२) यायाति - इंद्र
ययाति नंतर घोर तप करून स्वर्गात जातो. काही वर्षांनंतर इंद्र त्याला विचारतो " तपश्चर्येमध्ये तू कोणाबरोबर आहेस ? " ययाति म्हणतो " त्रिभुवनात माझ्या बरोबरीचा कोणी नाही " या प्रौढीमुळे रागावून इंद्र त्याला सांगतो की तुझ्या पुण्याचा क्षय झाला आहे " ययातीचे स्वर्गातून पतन होते. इतरांना क्षुद्र लेखल्याने तुमच्या अनेक वर्षे केलेल्या तपाचा नाश होतो आदि पर्व, अध्याय अठ्यायशी

(२३) ययाति - -त्याचे नातू
ययाति स्वर्गातून पतन झाल्यावर पृथीवार एक यज्ञ चालू असतो तेथे पोचतो. तो यज्ञ ययातीचे चार नातू करत असतात. पण ययाति व नातू एकमेकांना ओळखत नाहित. ययातीने आपली कथा सांगितल्यावर ते सर्व आपले पुण्य त्याला देऊन त्याला परत स्वर्गाला पाठवण्याचे ठरवतात. पण ययाति म्हणतो की " क्षत्रियाला दान घेण्याचा अधिकार नाही. तो फक्त ब्राह्मणाला आहे." विद्या मिळविणे व ती शिष्याला देणे यात वेळ जाणार्‍य़ा ब्राह्मणाला धनार्जन करणे शक्य नसाल्याने हा अधिकार फक्त त्यालाच दिला होता. आदिपर्व, अध्याय त्र्याण्यवावा

(२४) गंगा - वसु
गंगा व अष्टवसु यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचे शाप मिळाले होते. वसु गंगेला विनंती करतात की "आम्हाला पृथ्वीवरील स्त्रीच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा नाही. आम्ही तुझ्या उदरी जन्म घेऊ व जन्मल्याबरोबर तू आम्हाल पाण्यात टाकून दे म्हणजे आम्हाला या पृथ्वीवर पापाची निश्कृति करीत बसावे लगणार नाही." गंगेने ते मान्य केले पण ती म्हणाली " एक मुलगा तरी राहिलाच पाहिजे कारण पुत्रेच्छेने माझ्याशी झालेला संबंध व्यर्थ होऊं नये ".वसु ते मान्य करतात पण पुढे म्हणतात "त्याची संतति मनुष्यलोकात रहाणार नाही." हा मुलगा, भीष्म निपुत्रिक राहिला.
देव चलाखच दिसतात. शाप तर भोगला पाहिजेच पण त्यातून पळवाट काढावयाचीच. (हल्लीचे वकील) आदिपर्व, अध्याय शहाण्णवावा

(२५) गंगा - शंतनु
भीष्माच्या जन्मानंतर गंगा शंतनूला सोडून, भीष्माला घेऊन स्वर्गाला गेली होती. छत्तीस वर्षांनतर शंतनु गंगाकाठी हिंडत असतांना गंगा त्याला परत भेटली. तिने भीष्माला शंतनूच्या हवाली केले व म्हणाली " हा तुझा मुलगा. स्वर्गात ह्याचे शिक्षण झाले आहे. वेद आनि वेदांगे हा वशिष्ठांकडून शिकला आहे; धनुर्विद्या परशुरामाकडून, बृहस्पतीकडून राजधर्म व शुक्राचार्यांपासून अर्थशास्त्र. गंगेने आपल्या मुलाकरिता सर्वश्रेष्ठ गुरू निवडले. शरपंजरी भीष्म पडले असतांना श्रीकृष्ण युधिष्टराला म्हणतात " तुला जे काही प्रश्न विचारवयाचे असतील ते आता भीष्मांना विचारून घे. भीष्मांनतर ज्ञान लोप पावणार आहे." ..( मागे एकदा एका मिपाकराने "परशुराम भीष्मांचे गुरू कसे ?" असा प्रश्न विचारला होता, त्याचा हा संदर्भ)
आदिपर्व . अध्याय शंभरावा. ..

(२६) यमधर्म - मांडव्यऋषि
मांडव्य ऋषींना सूळाचे टोक पोटात अडकल्याने त्रास भोगावा लागला होत. त्यांनी यमाकडे जाउन त्याचे कारण विचारले. यमधर्म म्हणाला "तू लहानपणी एका पतंगाला काडी टोचली होतिस, त्याचे हे फळ." मांडव्य म्हणाले "बालपणी अजाणतेपणाने केलेल्या दुश्कृत्याबद्दल जीवाला शिक्षा होऊं नये. या पुढे चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये." आजही असाच न्याय जगभर आहे. आदिपर्व, अध्याय एकशें आठवा

(२७) धृतराष्ट्र - ब्राह्मण आणि विदुर
दुर्योधनाच्या जन्मकाळी क्रूर व हिंस्र पशु व कोल्ही ओरडू लागली. हा अपशकुन पाहून ब्राह्मणांनी धृतराष्त्राला सांगितले की हा मुलगा कुलक्षय करणारा निघेल .तू याचा त्याग कर."
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् !
ग्रामं जानपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत् !! हा श्लोक येथे आहे.
आदिपर्व, अध्याय एकशें पंधरावा
(२८) पांडु - ऋषी, पांडु - कुंती
पांडूला ऋषीशापामुळे संत्तति होण्याची शक्यता मावळल्यामुळे काळजी वाटू लागली की पितृऋण कसे फेडावयाचे. त्याने वनवासात बरोबर असलेल्या ऋषींना या बाबत प्रश्न विचारला, त्यांनी नियोग पद्धती हा धर्माचार आहे असे सांगितले. त्या प्रमाणे पांडु कुंतीस पुत्रप्राप्ती करून घेंण्यास सांगतो. कुंती साफ नकार देते. पण नंतर पांडूस दुर्वास ऋषींच्या वराबद्दल सांगते. पांडूच्या आज्ञेने तिला तीन मुले होतात. पांडूला आणखी मुले पाहिजे असतात पण कुंती नकार देते व म्हणते की "आणखी मुले ही वेश्यावृत्ती होईल." मग माद्री तिला म्हणते की "मला मंत्र दे, मी निपुत्रिक मरू इच्छित नाही." त्याप्रमाणे माद्रीला दोन मुले होतात
आदिपर्व, अध्याय १२०-१२४

(२९) कुंती - माद्री
पांडूच्या मृत्यूनंतर कुंती म्हणाली " मी महाराजांबरोबर सती जाते." त्यावर माद्री म्हणाली " मुलांचे संगोपन समभावाने, वंचना न करिता, माझ्याने होणार नाही. माझ्या दोन मुलांचा संभाळ तुम्ही स्वत:चे मुलांप्रमाणेच कराल असा माझा विश्वास आहे. तेव्हा मीच सती जाते." कुंतीने आपल्या सवतीमध्ये हा विश्वास निर्माण केला हा तिचा थोरपणा. आदिपर्व अध्याय एकशें पंचविसावा

(३०) कुंती - विदुर
दुर्योधनाने भीमाला विष पाजून गंगा नदीत सोडून दिले. भीम परत आला नाही म्हणून काळजीत पडलेल्या कुंतीने विदुराला भेटून आपली काळजी व्यक्त केली. विदुराने तिचे समाधान करून सांगितले की "तुझी मुले दीर्घायुषी आहेत. भीम परत येईल पण तू आता आरडाओरडा केलास तर तुझ्या इतर मुलांनाही धोका पोचेल." आदिपर्व, , अध्याय एकशें एकुणतिसावा

शरद

यशोधरा's picture

29 Jan 2017 - 7:22 am | यशोधरा

सुरेख धागा, वाचते आहे. इथे अजूनही अशी माहिती टाकावी, ही विनंती.

शरद's picture

16 Feb 2017 - 6:37 pm | शरद

(३१) द्रुपद - द्रोण
द्रुपद व द्रोण हे एकाच गुरूकडे आश्रमात शिकले, खेळले व जिवलग मित्र्र झाले. त्यावेळी द्रुपदाने " मी राजा झाल्यावर मी, माझी मुले माझी संपत्ती तुझ्या स्वाधीन राहतील " असे सांगितले होते., पुढे द्रोण द्रुपदाकडे गेला व " मी तुझा मित्र आलो आहे " असे म्हणाला
द्रुपदाने द्रोणाचा अपमान करून त्याला अनेक उदाहरणे देऊन एक सत्य सांगितले की "मैत्री बरोबरींच्यातच होऊ शकते. आदिपर्व अध्याय एकशें एकतिसावा

(३२) दुर्योधन - भीम
कौरव-पांडव यांच्या परिक्षेच्या वेळी कर्णाला जरी राज्याभिषेक झाला होता तरी त्याचा पिता अधिरथ सूत आहे हे कळल्यावर भीमाने त्यावा पाणउतारा करून "चाबूक घेऊन रथ हाक" असे त्याला सांगितले .त्या वेळी दुर्योधन भीमाला क्षत्रिय कुणाला म्हणावे, वंशशुद्धता कशी अस्तित्वात नाही हे उदाहरणे देऊन सांगतो. तो म्हणतो "शूराचे कुळ व नदीचे मूळ कधी मिळणार नाही " हल्ली शूराचे ऐवजी ऋषीचे कूळ असे आपण म्हणतो. आदिपर्व अध्याय एकशें सदतिसावा

(३३) धृतराष्ट्र - कणिक
पांडवांचा उत्कर्ष पाहून धृतराष्ट्र चिंताक्रांत झाला व कणिक नावाच्या एका राजनीतितज्ञ ब्राह्मणाला बोलावून त्याला सल्ला विचारला. या संवादाला "कणिकनीति" म्हणतात. आजच्या राजकर्त्यांनाही मोलाचा वाटेल असा हा उपदेश. आदिपर्व अध्याय एकशें चाळिसावा

(३४) विदुर - युधिष्ठिर
वारणावतातील लाक्षागृहात पांडवांना जाळून मारावयाची कौरवांची कुटील नीति ओळखून विदुर युधिष्ठिराला त्याची कल्पना देतो व त्यातून कसे सुटावयाचे हेही सांगतो. हे तो म्लेंच्छ भाषेत सांगतो जी फक्त तो व युधिष्ठिर जाणत असतात आदिपर्व अध्याय एकशें शेचाळिसावा.

(३५) ब्राह्मण - -त्याचे कुटुंबीय
एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी पांडव रहात होते. त्या नगरातील प्रथेप्रमाणे प्रत्येक घरातील एका व्यक्तीला बकासुराकरिता बळी जावे लागे त्या घरावर पाळी आल्यावर वडील, आई, मुलगा व मुलगी प्रत्येक जण "मी जाणार " असे म्हणतात. अतिशय वाचनीय संवाद. एक उल्लेखनीय नोंद म्हणजे ब्राह्मण म्हणतो " मुलीवर माझा हक्क नाही. ब्रह्मदेवाने तिच्या पतीची ठेव म्हणून ती मजपाशी ठेविली आहे " आदिपर्व अध्याय १५७,१५८,१५९

(३६) कुंती - ब्राह्मण
कुंती ब्राह्मणाला "माझा मुलगा बकासुराकडे जाईल" असे सांगते. ब्राह्मणाला ते पटत नाही. आपल्या घरात आलेल्या पाहुण्याने आपला जीव द्यावा याला तो नाकारतो. तेव्हा कुंती त्याला सांगते की " माझा मुलगा मलाही प्रिय आहे. तो बकासुराला मारेल याची मला खात्री आहे. त्याला मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे " मग ब्राह्मण कबुल होतो. इथे "मंत्रसिद्धी"वरील लोकांचा विश्वास उल्लेखनीय आहे. आदिपर्व अध्याय एकशें एकसष्टावा

(३७) कुंती - युधिष्ठिर
भीमाने बकासुराकडे जाणे युधिष्ठिराला अजिबात पसंत नव्हते. तो कुंतीला दोष देतो. त्या
वेळी कुंती त्याला सांगते की "ब्राह्मणाने आपल्याला आश्रय दिला त्याच्या उपकाराची परतफेड आपण दसपटीने केली पाहिजे. आदिपर्व अध्याय एकशें बासष्टावा

(३८) व्यास - पांडव
एका स्वरूपसुंदर ऋषीकन्येने पति मिळावा म्हणून तप केले. प्रसन्न झालेल्या शंकराने तिला पांच पति मिळतील असा वर दिला. द्रौपदीला पाच पति कसे मिळाले त्याची कथा.
आदिपर्व अध्याय एकशें एकुणसत्तरावा

(३९) धृतराष्ट्र - दुर्योधन,कर्ण भीष्म, द्रोण, विदुर
द्रौपदी विवाहानंतर दुर्योधन वगैरे परत आले व त्यानंतर पुढे काय करावयाचे या विषयी त्यांनी व भीष्मादीनी धृतराष्ट्राबरोबर बोलणी केली. कर्ण-दुर्योधन यांच्या विरोधात तिघांनी पांडवांना अर्धे राज्य द्यावे असे मत मांडले. ,
आदिपर्व अध्याय २०१, २०२, २०३, २०४, २०५,

(४०) युधिष्टिर - - नारद
यात नारद पांडवांना एकोप्याने रहाण्याची सुचना देतात व सुंदोपसुंदांची कथा सांगतात.
आदिपर्व अध्याय २०९,२१०, २११, २१२

शरद