लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
9 Jan 2017 - 4:10 pm

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी भाग -१

छायाचित्राखाली तिरप्या अक्षरात दिलेली माहिती ही त्या छायाचित्राचा भाग आहे असे समजावे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
चालुक्यकालीन खांबाच्या अचूक टर्निंगबद्दल मला नेहमी अचंबा वाटतो. त्या काळात लेथसदृस्य काहीतरी असावे जेणे करुन एवढ्या कॉनसेंट्रीसिटीमधे हे खांब तयार करता येत असावेत. मधे कुठेतरी इजिप्तच्या मोठ्या शिळा, ज्या पिरॅमिडमधे वापरतात त्या अचूक सपाट कशा करतात यावर व्हिडिओ पाहिला होता. त्यात एक शिळा दुसर्‍या शिळेवर घासून दोन्ही शिळा अचूक सपाट करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले होते. तसेच काहीतरी येथे असेल. किंवा असावे अशी माझी फार इच्छा आहे. यावरील नक्षिकाम तर अप्रतीम आहेच पण खालच्या बाजूला जी वर्तुळे आहेत ती कशी केली असावीत ?

मित्राने नवीन सिआझ घेतली आणि कुठेतरी लांब जायचे ठरले, गंडीकोटा व बेलमच्या गुहा प्रथम ठरल्या होत्या नंतर त्यात जवळ बघण्यासारखे म्हणून ताडपत्रीची दोन देवळे घेतली. एका मित्राने लाकुंडी पाहिले नव्हते म्हणून जाताना लाकुंडी बघण्याचे ठरविले पण नंतर त्यात हंपीचे दोन दिवस व बदामीचा परिसरही बघून झाला. यातील मी लकुंडी, हंपी व बदामी अगोदरच पाहिले होते व त्यावर लेख लिहून येथे प्रकाशीत केला होता. पण भारतातील कुठलीही विशेषत: दक्षिणेकडील देवळे मी कितीही वेळा बघू शकतो आणि दरवेळी मला ती पाहताना नवीन काहीतरी गवसते. मी अचंबीत होतो. शिवाय आमच्या मित्रांनी ती देवळे पाहिली नव्हती हेही एक महत्वाचे कारण होतेच.

दिवस १
तारखांचा त्रास निवृत्त माणसांना विशेष होत नसल्यामुळे तारखांना फाटा दिला आहे. शिवाय आमची ही सहल फक्त निघायचे या बोलीवर ठरली होती. पूर्वी पैसे संपले की सहल संपवायची असे लोक करीत पण आता क्रेडीट कार्डांच्या जमान्यात पैसे संपायची भितीही उरली नाही. म्हणून एकमेकांचा चेहरा बघण्याचा कंटाळा आला की परत फिरायचे अशी अट आम्ही स्वत:ला घालून घेतली. आता आम्ही तिघे गेली ५० वर्षे मित्र आहोत त्यामुळे आपापसातील अनेक भांडणे आम्ही यशस्वीरित्या रिचविली असल्यामुळे त्याची विशेष काळजी नव्हती. शिवाय ही पेल्यातील वादळे...एका पेल्यात उसळतात आणि दुसऱ्या पेल्यात शांत होतात. अर्थात याचे श्रेय माझ्यापेक्षा माझ्या मित्रांनाच जाते हे प्रामाणिकपणे मान्य केलेच पाहिजे. असो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हीच ती गदग शिल्पकला. पहिले शिल्प हे तेथील संग्रहालयाच्या दरवाजात आहे. संग्रहालय नीट ठेवले आहे पण फोटो काढण्यास परवानगी नाही. दुसर्‍या छायाचित्रातील बारीक कलाकुसर बघण्यासारखी आहे. जरा लांबून तर खूपच कोरीव नक्षिकाम वाटते. तिसर्‍या फोटोत खांबाची चकाकी बघण्यासारखी आहे. गुळगुळीतपणा तर हात लावल्यावरच कळेल. पण हे काम मात्र हातानेच केले असावे. त्यासाठी राळ व रेशमाचे कापड वापरले जात असे काही जणांचे म्हणणे आहे.

सकाळी बरोबर सहा वाजता नवा कोऱ्या सिआझला चावी लावली. पहिला मुक्काम गदगला करायचा असं ठरले होते. गदगला साधारणत: दुपारी जर पोहोचलो तर संध्याकाळच्या उन्हात देवळे पहाण्याचा व छायाचित्रणाचा कार्यक्रम करायचा व रात्री परत गदगला येऊन मुक्काम करायचा असे ठरले. गदगपासून हॉस्पेटकडे जाताना १२ किमीवर लाकुंडी/लकुंडी नावाचे गाव लागते. (15°23′23″N 75°43′06″E) मुख्य रस्त्यावर दोनतीन छोटी उपहारगृह आहेत. अगदी वेळ पडल्यास येथे खायलाही मिळू शकते. पण गदगवरुन काहीतरी खाऊन किंवा घेऊन येणे सगळ्यात उत्तम.

या ठिकाणी डावीकडे वळले की लाकुंडीच्या पन्नासएक देवळांकडे व १०० एक कुंडांकडे जाता येते. गाडी पार आतपर्यंत जाते. हे वळण सापडणे अवघड असले तरी कर्नाटक पर्यटन खात्याने एक अत्युत्तम सोय केली आहे ती म्हणजे सर्व मुख्य रस्त्यांवर पिवळ्या रंगाची पाटी दिसली की थांबायचे. त्या पाटीवर त्या पाटी जवळपासची सर्व देवळांची यादी, दिशा व अंतरे दिलेली असतात. जसे जसे आपण दाखविलेल्या रस्त्यावरुन जातो तशा तशा या पाट्या आपली सोबत करतात.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire
या पाट्यांची अत्यंत मदत होते. खरे तर कर्नाटकमधे इतकी सुंदर देवळे आहेत की कोठेही रस्त्यात ही पाटी दिसली की थांबावे आणि वेळ असल्यास या पाटीवर लिहिलेली देवळे बिनधास्त पहावीत. कारण बरीच देवळे विशेष प्रसिद्ध नसतात त्यामुळे माहितही नसतात.

नशीबाने या पाट्या परदेशी पर्यटकांना उपयोगी पडाव्यात म्हणून इंग्रजीमधेही लिहिलेल्या आहे. इतर पाट्या मात्र कटाक्षाने कानडीमधेच लिहिल्या आहेत. मला कर्नाटक कितीही आवडत असले तरी त्यांचा हा अतिरेकी भाषावाद मुळीच आवडत नाही. भाषा हे एक संवादाचे साधन असल्यावर त्याला नसती इतर दुराग्रहाची ठिगळं कशाला लावावीत या मताचा मी आहे. तामिळनाडूतही तेच पहायला मिळते. भाषा आणि त्याची अस्मिता यासारखा ढोंगीपणा जगात नसेल. अर्थात राजकारणी पुढार्‍यांनी याचा फायदा अचूक उचलला आहेच. संवाद साधणे हेच भाषेचे काम आहे हे मान्य केल्यावर खरेतर प्रश्र्नच उरत नाही. येताना बेळगावातील अनेक दुकानांवर मराठीत पाट्या वाचल्यावर हे अजूनच पटते. (अर्थात बेळगावच्या मराठी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात येण्याचा आपला हट्ट सोडून द्यावा. येथे आलात तर येथील राजकारणी अगोदर तुम्हाला विकतील मग तुमच्या जमिनी ... पूर्वीचा महाराष्ट आता राहिला नाही.)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जैन बासडी येथील देऊळ. याच्या खालीच वस्तूसंग्रहालय आहे. त्यातील काही शिल्पांची छायाचित्र खाली देत आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोणा तिर्थंकराची ही मूर्ती. इस्लामी धर्मीयांनी, इतर धर्म व त्यांचे विचार मान्य नाहीत म्हणून त्यांच्या मूर्तीं/प्रतिके तोडली कारण त्यांच्याकडे या सगळ्याचा विचाराने प्रतिवाद करण्यास ना वेळ होता ना धाडस. अर्थात या मूर्ती भंजकांना नावे ठेवण्यात तसा अर्थ नाही. त्यांनाही इतर धर्मियांचा / विरुद्ध विचारांचा फार राग येत असे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बासडीजवळच असलेले देऊळ व त्याच्यावरील सगळ्यात खालच्या थरावरील नक्षिकाम. जसा आपल्या कडे गजथर किंवा कमळाचा थर असतो व त्यावर देऊळ उभे आहे आभास उत्पन्न केला जातो तसे मला वाटते हे देऊळ नागाच्या फण्यावर उभे आहे असे शिल्पकाराला दाखवायचे असावे. हा माझा विचार आहे. मला स्वतःला याची खात्री नाही.

लाकुंडी/लकुंडीच्या देवळांचा काळ म्हणजे चालूक्य, कल्याणीचे कलाचूरी, सेऊण व होयसळांचा काळ. चालुक्यांनी नवव्या शतकात राष्ट्रकुटांकडून सत्ता हस्तगत केली व कल्याणीला त्यांची राजधानी स्थापन केली. अर्थात त्याचा आता काही मागमुस उरला नाही. पण त्याची माहिती काही शिलालेखातून मिळते. आज जी देवळे बघण्यास मिळतात ती चालुक्यांचच्या काळातील आहेत असे मानले जाते. (मला ते विशेष मान्य नाही कारण नंतरही काही बांधली गेली असणार) मुख्य म्हणजे लाकुंडीमधे जैन देवळेही आहेत. त्या काळातील प्रथेप्रमाणे सर्व भारतीय धर्मांना राजांचा उदार आश्रय असायचा आणि मुख्य म्हणजे लढाया झाल्या तरी या देवळांना कोणी हात लावत नसे. त्यामुळे या सर्व राजांच्या शिल्पकारांनी आपापली शिल्पकला जतन केली त्याचे प्रतिबींब आपल्याला या देवळांमधे पहाण्यास मिळते. भारतातील इतर देवळांपेक्षा वेगळी अशी येथील शिल्पकलेला ‘‘गदग शिल्पकला’’ असे नाव देण्यास हरकत नाही.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गदग शिल्पकलेचे काही नमुने. डोळ्याचे पारणे फेडणारी ही शिल्पकला मरण्याआधी पहायलाच हवी.

स्वातंत्र्य काळात ज्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी संशोधन केले त्यात जे. बर्गेस यांचे नाव आदराने घेतले पाहिजे. देशातील अनेक शिलालेखांचा अभ्यास या माणसाने केला, त्याचे वाचन केल व त्यांचा अर्थ लावला. लाकुंडीमधे अनेक कोरलेले लेख आहेत. सगळ्यात जुना आहे १००७ सालचा. तर सगळ्यात अलिकडचा आहे तेराव्या शतकातील. पहिला आहे तो जैन बासडीतील एका लादीवर, ज्यात राजाच्या गुर्जर प्रदेश जिंकून घेतला त्याबद्दल देवळाला देणगी (जमीन) दिल्याचा उल्लेख आहे. त्यात वाजी घराण्याच्या एका ढल्ला नावाच्या प्रमुखाच्या मुलाच्या म्हणजे नागदेवाची पत्नी अत्तियब्बीने व तिच्या मुलाने पडवेल्ला म्हणजे सेनापती तालिआने ही देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. मी थोड्याफार लेखांचे फोटो काढले पण तसा प्रकार कंटाळवाणा असल्यामुळे येथे टाकलेले नाहीत. अभ्यासकांनी इंटरनेटवर शोधावेत त्यांना तेथे सापडतीलच. काशीविश्र्वेश्र्वराच्या देवळावर असलेल्या एका लेखात कलाचुरी राजा सिंघणाचा उल्लेख आढळतो व १२२३ ( सध्याच्या कालगणणेत रुपांतर केले आहे) हे सालही आढळते.

यातील बऱ्याच लेखात लकुंडीचे नाव लोक्की-गुंडी असे लिहिलेले आढळते. तेच त्याचे खरे नाव असावे.मी पूर्वी लाकुंडीची छायाचित्रे टाकली होती पण परत टाकण्याचा मोह आवरत नाही. पण यावेळी घेतलेलीच आत्ता टाकली आहेत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जी देवळे महत्वाची आहेत व पाहिलीच पाहिजेत अशा देवळांची छायाचित्र टाकली आहेत. लाकुंडी खरे बघायचे असेल तर कमीतकमी चार दिवस पाहिजेत.
संध्याकाळी देवळे पाहून झाल्यावर गदगला परतलो. एवढे ड्रायविंग केल्यावर दमछाक झाली होती व आता श्रमपरिहाराची निकड तिघांनाही वाटू लागली होती. गदगला पोहोचल्यावर ताजेतवाने होत हॉटेलमधील (नाव आठवत नाही) रेस्तराँमधे प्रवेश केला.... उद्या ताडपत्रीला जायचे होते पण मधेच हंपीत घुसलो...ते पुढच्या भागात. त्या आधी काशीविश्र्वेश्र्वराच्या देवळावरील रामायणाच्या कथा सांगणार्‍या काही शिल्पांची छायाचित्रे आपण पाहणार आहोत.

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

अजया's picture

9 Jan 2017 - 5:12 pm | अजया

अप्रतिम!
पुभाप्र

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2017 - 2:09 pm | अत्रुप्त आत्मा

+१

एस's picture

9 Jan 2017 - 5:29 pm | एस

पुभाप्र!

सुंदर.

ही मालिका पूर्ण कराच.

पद्मावति's picture

9 Jan 2017 - 10:11 pm | पद्मावति

सुरेख. पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2017 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! बरेचसे कोरीवकाम खरोखर अप्रतिम आहे !

इतके सुंदर कोरीवकाम करणारे कलाकार जेव्हा शिलालेख लिहितात तेव्हा त्यांचे अक्षर बहुदा दुसरीतल्या मुलांसारखे असते. असे का होत असावे ?

त्याविरुद्ध सर्व चिनी शिलालेख कटाक्षाने सुंदर वळणदार अक्षरांत/चिनी फराट्यांत असतात, अर्थ कळत नसला तरी ते पहायलाही छान वाटते !

जयंत कुलकर्णी's picture

10 Jan 2017 - 7:27 am | जयंत कुलकर्णी

चिनी कॅलिग्राफीचा इतिहास फार जूना आहे. अंदाजे ११०० बीसी असे म्हणतात. सगळ्यात जूना कॅलिग्राफीचा नमुना ते म्हणतात शँग घराण्याची सत्ता असताना एका हाडावर सापडला. यावर समजा विश्र्वास ठेवला नाही तरी टँग घराण्याची सत्ता असताना (अंदाजे २०० बीसी) तर कॅलिग्राफी करुन लिहलेले अनेक शिलालेख सापडतातच. भारतातही ब्राह्मी लिपी अलंकृत पद्धतीने लिहिली जायची. त्याला शंख लिपी म्हणत. यात लिहिलेलेही फार सुंदर दिसत असे. याची काही उदाहरणे राजगीर (ओरिसा) मधे आहेत असे म्हणतात. मी पाहिलेले नाही. पण यात कोरणे अत्यंत वेळखाऊ असल्यामुळे कदाचित यात क्वचितच लेख कोरले जात असावेत. शंखलिपी त्या काळात मला वाटते राजांची नावे लिहिण्यास वापरली जात. शंखलिपी वाचता येणारे काही तज्ञ ५०/६० वर्षापूर्वी होते. आता एखादा असेल. अगदी लहानपणी माझ्या आजोबांना याबद्दल बोलताना मी ऐकलेले आहे....
पण कानडीमधे लिहिलेले काही शिलालेखही फार सुंदर दिसतात हे आपले जाताजाता नमूद करतो.

ग्रेट! किती सुंदर शिल्पकला आहे.

महासंग्राम's picture

10 Jan 2017 - 4:53 pm | महासंग्राम

काका फोटो सुंदर आहेतच पण, सोबत exif पण टाकले तर अजून उत्तम हि विनंती.

प्रान्जल केलकर's picture

11 Jan 2017 - 3:29 pm | प्रान्जल केलकर

सर लकुंडी म्हणजे क्या बात है. फोटो नाही तर खरंच तिथे जाऊन हा परिसर देवळं बघावीत. आमच्या सौ चा माहेर आहे गदग ला त्यामुळे दर वर्षी लकुंडी, बदामी ऐहोळे ची वारी फिक्स असतेच. सासरचे लोक मला येडे म्हणतात. हे येडं काय त्या दगडात बघतंय असा सूर असतो. पण खरंच गदग मधले खांब बघितल्यावर मला त्याची मॅनुफॅक्चरिंग प्रोसेस कशी असेल यावर प्रश्न पडतो.
सगळ्यात आवडलेलं ठिकाण म्हणजे ऐहोळे, प्रत्येक प्रकारचं मंदिर आहे तिथे. मला तिथे अस सांगितलं कि भारतात असलेल्या सगळ्या प्रकारच्या देवळांच्या प्रतिकृती आहेत.
गदग पासून लकुंडी जवळ आहे. पण माहित नाही तिथे जाऊन दोन वेळा फोटो काढले पण एकदा कॅमेरा खराब झाला आणि एकदा मोबाईल खराब झाला तेव्हापासून लकुंडीचे फोटो घेतले नाहीत :)
लकुंडीला सरकारी संग्रहालयात एक चाचा होते त्यांनी जवळच्या दोन मंदिरांचा इतिहास आणि त्यावरच्या स्थापत्य शैली विषयी जी माहिती दिली ती एक्दम मस्त होती. चाचानी मी पुण्याचा आहे म्हणल्यावर पहिलाच प्रश्न विचारला केळकर संग्रहालय बघितलं का? नाही म्हणल्यावर हसले आणि बोलले "तो पुणे मी रेहेके क्या फायदा रे???? " पुण्यात आल्या आल्या पहिल्यांदा केळकर संग्रहालय बघून आलो.
पण गदग पट्ट्यातील मंदिरं मस्तच आहेत.

शलभ's picture

11 Jan 2017 - 4:12 pm | शलभ

अप्रतिम..

पैसा's picture

16 Jan 2017 - 3:28 pm | पैसा

अशक्य सुंदर आहे हे! कर्नाटकातल्या कानडी पाट्यांबद्दल अतिशय सहमत आहे. प्रचंड वैताग आणणारे प्रकरण आहे. भाषेच्या बाबत बेळगाव परिसरातल्या लोकांची 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी अवस्था आहे. कुठे जातील बिचारे?