लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
10 Jan 2017 - 5:17 pm

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पहिले लाकुंडीचे आहे. छतावर कोरीवकाम कसे करीत असत ? भारतातील देवळांची छते हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. उदा. हे दुसरे मराठवाड्यातील चारठाण्यातील एका देवळाचे छत बघा. मधे एकदा मराठवाड्यात देवळे पाहण्यासाठी आठ दिवस फिरलो होतो तेव्हा हे छायाचित्र काढले आहे. यातील आकार हा हत्तीच्या गंडस्थळासारखा दिसतो. अप्रतीम कोरीवकाम तर अनेक देवळांच्या छतांवर सापडते. छत करण्याआधीच या दगडांवर कोरीव काम केले जात असणार. ते वर चढविण्याआधी त्याचा त्रिमितीतील अभ्यास व अचूकपणा वाखाणण्यासारखाच आहे.

मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे आता काही काशीविश्र्वश्र्वराच्या मंदीरावरील बाहेरील भिंतींवरची शिल्पे आपण बघणारच आहोत पण त्याआधी लाकुंडी गावाबद्दल. मला तर वाटते या गावातील प्रत्येक घराखाली एक देऊळ लपलेले असावे. आता त्याचे उत्खनन करणे अशक्य असावे कदाचित. मी तर एक घर असे पाहिले की ज्याच्या अर्ध्याभागात देऊळ आहे व अर्ध्या भागात जनावरांचा गोठा होता. मी त्याचा फोटो काढणार होतो पण स्थानिकांनी नाराजी दर्शविल्यावर मीही जास्त उत्साह दाखविला नाही. तरीही अशा गावात ए.एस्.आय्.ने खूपच चांगले काम केले आहे. पण आपण आपल्या येथे गोंदेश्र्वरच्या मंदीराची जी कुचंबणा झाली आहे त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कांद्याचे पीक जेव्हा निघते तेव्हा देवळाच्या सभोवताली कांद्यांचे ढीग पसरलेले असतात त्यातच ट्रॅक्टर धूर ओकत असतात...या सगळ्याचा या शिल्पांवर निश्चितच दुष्परिणाम होत असणार. लांकुंडीला बदामीसारखे पर्यटनस्थळ बनविण्याचे काम बहुधा चालू असावे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पहिले बहुधा इंद्राचे शिल्प असावे. दुसरे सुरसुंदरी नसून कुठलीतरी देवता आहे व तिसरे अर्थातच गणपतीचे आहे. प्रचेतस बरोबर सांगू शकेल.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे शिल्प गजासूरवधाचे आहे. या वीतभर उंचीच्या शिल्पामधे शिल्पकारानी काय काय दाखविले आहे बघा. वेरुळ व बेलोर येथील गजासूरवधाची शिल्पे तर प्रसिद्धच आहे पण ती मोठ्ठी आहेत. तेथे जागाही भरपूर आहे.. त्यात गणपती दाखविलेला नाही असे मला आठवतं आहे. येथे गणपतीही दाखवला आहे. गजासुराच्या वधाची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. पण शिल्प पाहताना दुसरीकडे वाचायला नको म्हणून थोडक्यात येथे सांगतो. गजासूर नावाचा एक राक्षस उन्मत्त होऊन ऋषीमुनींना छळत असताना शंकराला कळल्यावर तो त्याच वध करतो व त्याला उभा सोलतो. त्याचे कातडे अंगावर घेऊन तांडव करतो. त्यात त्याची सोंड एका बाजूला व शेपटी दुसर्‍या बाजूला दिसते. याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून परत राक्षस तयार होणार असतात म्हणून सप्तमातृका त्याचे रक्त गोळा करतात. (ते इथे दाखविलेले नाही. आणि ही गोष्ट अशी आहे का, हेही मला निश्चित माहीत नाही.) पण एवढ्या छोट्या जागेत ही गोष्ट मांडणे हे फार अवघड काम शिल्पकाराने करुन दाखवले आहे हे निर्विवाद.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे शिल्प आहे रावण इंद्राशी लढतानाचे. मला पटत नाही पण बर्‍याचजणांचा हाच समज आहे..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे शिल्प आहे रावण कैलास हलवितो त्याचे. याचा उत्कृष्ट नमुना वेरुळमधे आहे. याच्यातसुद्धा अगदी वर शंकर पार्वती सारीपाट खेळताना कोरलेले आपल्याला दिसतात. हेही शिल्प जेमतेम एक वीत उंचीचे असेल.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सेतू बांधा रे सागरी....वानरे समुद्र बुजविण्यासाठी शिळा टाकत आहेत. लाटा नागमोडी रेषांनी दाखविल्या आहेत तर त्याच्या खाली जलचर दाखविले आहेत. कासव, मासे...एक सुसरही दाखविली आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्याच देवळाचा असलेला हा नक्षिकाम केलेल्या चौकटीतील दरवाजा.

यातील फक्त दरवाजा क्रॉप करुन मी एक छायाचित्र तयार केले होते. "Blues of the Door permanently closed" ते खाली देत आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
"Blues of the Door permanently closed"

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यातील पहिले शिल्प आहे दुर्गेच्या एका रुपाचे. श्रीतत्वनिधी नावाच्या १८२३ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा श्री खरे यांनी संदर्भ दिला आहे त्यात हिचे नाव चंडखंड असे दिले आहे ही सापावर, सरड्यावर, अशा प्राण्यांवर बसते असा उल्लेख आढळतो.
दुसरे जे छायाचित्र आहे ते भारतातील बहुतेक देवळांवर आढळणार्‍या शिल्पाचे आहे.... बरोबर ! हे शिल्प आहे भारवाहकाचे. तुळयांचा,छतांचा, देवळाचा भार ते उचलतात अशी कल्पना आहे..... त्याबद्दल पुढच्या भागात पाहू... तोपर्यंत रामराम !
क्रमश
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

मोदक's picture

10 Jan 2017 - 7:00 pm | मोदक

झक्कास चित्रे. त्या ट्रॅक्टरच्या धुरावरून आठवले..

मागच्या महिन्यात सुपा भागात जुने वाडे शोधताना; एका पडक्या वाड्यात अशीच अप्रतीम कलाकुसर सापडली होती (चुन्यातली). तेथील रहिवाश्यांना काहीच किंमत नसते राव. :(

प्रचेतस's picture

11 Jan 2017 - 8:58 am | प्रचेतस

हाही भाग खूप सुंदर.

तुम्ही म्हणता ते इंद्राचे शिल्प मला अंधकासुरवधासारखे वाटते आहे. त्रिशुळावर अंधकासुराच्या छाताडात खूपसल्यासारखा दिसतोय आणि शेजारी बहुधा पार्वती उभी आहे. मधले शिल्प बहुधा वैष्णवी. एका हातात शंख दिसतोय.

याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून परत राक्षस तयार होणार असतात म्हणून सप्तमातृका त्याचे रक्त गोळा करतात.
ही अंधकासुराची कथा.
गजासुरवधानंतर गजचर्म धारण करुन शिव अंधकाचा वध करतो, अंधकाला ब्रह्मदेवाकडून तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून असुर निर्माण होतील असा वर मिळालेला असतो. त्यामुळे शिव ते रक्त टिपायला मातृकांची उत्पत्ती करतो. तसेच एका हातात कपाल धारण करुन अंधकाचे रक्त त्यात पडेल अशी व्यवस्था करतो.

चंडखंड दुर्गेचे शिल्प रोचक आहे. ही योगीनी आहे का?

जयंत कुलकर्णी's picture

11 Jan 2017 - 9:10 am | जयंत कुलकर्णी

बरोबर प्रचेतस ! हल्ली मुर्तिशास्त्रावर विशेष काही वाचले जात नाही, त्यामुळे असे होते आहे. माझ्या वेरुळवरील लेखात मी बरोबर लिहिले आहे. आता जरा रिव्हिजन केली पाहिजे. पण कशासाठी हा प्रश्र्न उभा रहातो मनात मग रहातेच ते.... असो आपल्यासारखे मित्र आहेत दुरुस्त करायला तोपर्यंत काळजी नाही.... :-)
https://www.facebook.com/photo.php?fbid=10210142764942210&set=a.19308367... यावर श्री. पाडिगारांनी थोडा वेगळा प्रकाश टाकलाय...

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2017 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

मजा आ रहा है..
पु भा प्र.

सप्तमातृकांच्या मुर्त्या सुद्धा लकुंडीच्या त्या संग्रहालयात आहेत. संग्रहालय खूपच सुरेख आहे. गदग ला सुद्धा एक संग्रहालय आहे अश्याच मुर्त्यांचं. परत गदग ला गेलो कि नक्की तिथे जाऊन फोटो घेऊन ते टाकेन.
निळा दरवाजा निळ्या दरवाज्याच्या आसपासची नक्षी बघून मी स्तबद्ध झालो होतो. खतरनाक एवढाच म्हणू शकतो आपण.

दीपक११७७'s picture

11 Jan 2017 - 5:07 pm | दीपक११७७

छान लेख मालीका,
धन्यवाद.

समर्पक's picture

12 Jan 2017 - 8:24 am | समर्पक

यागंटीपासून जवळच कर्नुल शेजारी आलमपूर नावाचे चालुक्यकालीन नवब्रह्म मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे, तिथे जोगुलांबा (योगांबा - योगिनी) देवीचे शक्तीपीठ आहे. त्या देवतेशी ह्या देवतेचे वर्णन फार जुळते. अतिशय भयावह असे स्वरूप, तिच्या मंत्रातच 'लंबस्तनी विकृताक्षी घोररुपा महाबला...' असे वर्णन आहे. जटाधारी वृद्धेचे स्वरूप असून विंचू, कोळी, सरडा, घुबड, वटवाघूळ व कवटी असे असे सर्व अलंकार असल्याप्रमाणे सान्निध्यास आहेत
(येथेच कृष्णा तुंगभद्रा संगमस्थान असून आंध्रातील महत्वाच्या तीर्थांपैकी एक)

जयंत कुलकर्णी's picture

12 Jan 2017 - 9:20 am | जयंत कुलकर्णी

अर्रर्र.... यागंटीला गेलो होतो... चला आता परत जावे लागेल... :-)

समर्पक's picture

12 Jan 2017 - 10:47 am | समर्पक

अगदी नक्की जा... परिसरातील महत्वाच्या मंदिरांची (तुम्हाला मंदिरांची आवड आहे असे वाचले म्हणून) एक झलक

अलमपूरची मंदिरे : डावीकडील गोपुर व पाठचे मंदिर हे शक्तीस्थान, मधले व उजवीकडील मंदिर नवब्रह्म (शिव) मंदिरांपैकी.

जवळच नंद्याळचे महानंदी मंदिर, यागंटी प्रमाणेच पण अधिक मोठे व अतिशय शुद्ध वाहते झरे असणारे कुंड.

अहोबळाचे सुरेख मंदिर (गुरुचरित्रात या स्थानाचा उल्लेख आढळतो)

अहोबल परिसरात असलेल्या अनेक गूढ गुंफामंदिरांपैकी एक

पैसा's picture

17 Jan 2017 - 10:32 pm | पैसा

काय अप्रतिम सुंदर कलाकृती आहेत! समर्पक यांनी दिलेली चित्रेही अतीव सुंदर! या आलमपूरबद्दल रा.चिं.ढेरे यानी विस्तारपूर्वक लिहिले आहे.