पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
20 Jun 2016 - 8:02 pm

पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .
वडगावचा बैलाचा बाजार हा महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे .साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या सुरवातीला तो वडगावात भरतो . असाच दोन तीन दिवस तो आता भरणार होता . शामराव या बाजाराची फारच आतुरतेने वाट बघत होते . आज शामरावनी बैल आणण्या साठी बाजारात जाण्याचे ठरवले होते .त्यांचे अनेक वर्षा पासून मनांत ठरवलेले इप्सित आज पूर्ण होणार होते. ग़ेली चार वर्षे त्यांनी लोकांचा बैल मागून आणून आपल्या शेतीचे काम चालवले होते. अतोनात दिवस रात्र कष्ट करून ,एक एक पैसा गाठीला बांधला ,तेव्हां कुठे चार वर्षांनी तीस हजार रुपये साठले . आहो ! बळीराजाच धन म्हटलं कि ,त्याला वेळ लागणारच कि. दुसर्या कडे बैल उधार कितीदा मागणार ,परत बैलाच्या मालकाकडे उपकाराची फेड म्हणून फुकट कामाला जावा ,त्या पेक्षा आपणच पै पै साठवू ,भरपूर कष्ट करू आणि नवीनच बैल खरेदी करून आणू, असे त्यांनी चार वर्षा पूर्वीच ठरवले होते .

एवढा पैसा बरोबर घेऊन परगावी अनोळखी ठिकाणी जायचं म्हंटल तर चोरांची लई भीती वाटणारच कि ?त्यात मी असा अडाणी खेड्यातला गडी. वडगाव जस बैलाच्या बाजारा साठी प्रसिद्ध तसे ते गावातील नेते मंडळी आणि बाजारातील चोर या साठीही प्रसिद्ध . अहो ! हौशा गौशाची ही दुनिया म्हंटल, कि अस सगळ चालणारच . ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी आपला पुतण्या म्हादु याला सोबत घ्यायचे ठरवले . त्याचे कारण पण तसेच होते . म्हादु म्हणजे चांगला ताड माड, तीस वर्षाचा तालमीत खेळणारा पैलवान गडी. अंगाने चांगला जाड जुड. गुडघ्या पर्यंत खाकी चड्डी घालणारा, वरती तीन बटणाचा हाफ शर्ट, डोक्याला पांढरी टोपी ,ती पण आडवी घातलेली अन हातात कायम पाच फुटाची काठी . म्हादु बरोबर असताना, कुण्या चोराची, चोरी करण्याची काय बिशाद लागून गेली . नुसत म्हादुन चोराच मनगट जरी धरल तर चोराला चांगला घामच फ़ुट्ला पाहिजे. त्याचा एकच विक पाइंट म्हणाल तर गडी एकदा का झोपला कि मग तो कुणाचा नाही अगदी कुभंकर्णाची निद्रा आणि मग त्यात ते न संपणारे त्याचे संगीतमय घोरणे व दिवस भरात काय काय घडले हे झोपेत सांगण्याची त्याची सवय. थोडक्यात दिवस भरातील ठळक बातम्या.

शामराव आणि म्हादू, दोघे मिळून सकाळी एसटीने बैल खरेदी साठी वडगावच्या बाजारात दाखल झाले . बाजारात बरेच फिरून देखील त्यांचे खरेदीचे काम कांही जमेना. आवं ! ही एजंट लोक (हेडे) लई बेकार . कामिशान बिगर ही कुणाचा येवार जमून देत्यात व्हय . शेवट फिरून फिरून कधी तिनीसांज झाली हे कळल बी नाही . शामरावाचा बैलाचा व्यवहार आज कांही जमला नाही . आता परत गावाकडे जावा ,परत सकाळी बाजारात या ,या पेक्षा वडगावात कुठतरी मुक्काम करावा व सकाळी बाजारात यावे असे शामरावानी ठरवले . मुक्कामा साठी ते सुरक्षित जागा हुडकू लागले . या हुडकण्यातच आता रात्रीचे साडे नऊ वाजून गेले . आता वडगावात मुक्काम कुठे करायचा ?एवढ्यात शामरावाना त्यांचे एक जुने ओळखीचे व्यापारी "आण्णा " यांची आठवण झाली. कधी काळी शामराव अण्णाच्या दुकानातील माल वाहतुकीचे काम करीत होते."आण्णा लई दिलदार माणूस,ते आपल्याला मदत करणारच म्हणत" ,दोघांनी सरळ आण्णाचे घर गाठले.

त्यांच्या घरा समोर येउन ."आण्णा ! आहो ! आण्णा," म्हणत शामरावानी जोर जोरात आण्णांना हाका मारल्या, तसे नुकतेच दुकान बंद करुन आलेले आण्णा त्या घरातील मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशातून बाहेर आले. आण्णा म्हणजे काय विचारावे ? अंगाने जाडजूड ,उंचीने ठेगणे, रंगाने काळे, डोक्याला पुर्ण टक्कल पडलेले .दुकानात काम करून करून अंगातील बंडी व धोतर पूर्ण पणे मळून काळे ,कळकट झालेले. आण्णांची हेल काढून बोलण्याची विशेष अशी एक पध्दत होती .त्यात त्यांचा स्त्रीलिंगी व पुल्लिंगी शब्द उच्चारताना फार मोठा घोटाळा होत असे, मात्र त्यांचे बोलणे अगदी मार्मिक व स्पष्ट पणाने ठासून भरलेले असायचे. वडगावातच त्यांच्या घरा शेजारीच त्यांचे दुकान होते. शामराव पुढे झाले आणि म्हणाले " काय आण्णा ओळख लागली काय ? मी शामराव जी ! " आण्णांनी पिचके डोळे मिचकावीत गंभीर पणे त्यांचा चेहरा पाहिला आणि ओळख पटल्यावर "आरे कोण शामराव काय ? आरे ये ये ! बर्‍याच दिवसांनी गाठ पडली किरे, गाडी गिडी बंद केलास कि काय ! आण्णाचे हे स्वागत पाहून शामराव देखील जाम खुश झाला.
"आण्णा मेलाय कि जिंवंत हाय ,ते बघायला आलायसकी काय रे !" आण्णा
" ह्या ह्या ! रात्रीच आस वंगाळ कांही बोलू नकासा आण्णा ! इतके दिवस माझ्या कडे बैल नव्हता. म्हटंल बैल खरेदीला वडगावात याव.तुमची आठवण आली आणि आपोआप पाय तुमच्या घराकडे वळल बघा . ह्यो माझा पुतण्या म्हादु ,माझ्या संगटच आलाय.लगेचच म्हादुने पुढे येउन आण्णांना आदबीने नमस्कार केला .
बरं ! बरं ! तुमाला काय चापाणी ,जेवण गिवण पाहिजे काय ?
"यातलं काय बी नको आण्णा ,कारभारणींन मायंदाळ भाकर्‍या आणि खरडा दिला संगट ,एवढं आमचं एकच काम करा ! ,फकस्त तुमच्या बाहेरच्या ओरीत आमाला झोपायला परमानगी द्धा म्हंजी झालं ."शामराव
"झोप्पा क्किरे ! हे काय बोलण झाल .घरी आलेल माणूस म्हंजी आमच पावना की रे ! तुझं आनी आमच किती दिवसच संबध सांग ! , नाहीतर बिन ओळखीच्या मानसाला,आमी रात्री दारात, उभा देखील करून घेत नाही बघ . कधी कोण घरात शिरल ! आनी आमच हात पाय मोडल , चोरी करल, काय बी सांगता येनार नाही . घरात बोलवून, फुकटच दुखन करून घ्यायच नाही बघ. या वडगावात, आता लई चोर झाल्यात . हां !! आत्ता तुमच्या पैशाची जबाबदारी मात्र ह्या अण्णांवर टाकू नाकासा म्हंजी झाल. नाहीतर उद्ध्या म्हणाल " आण्णाच्यात झोपलो,आनी पैशाला मुकलो ." परवा आमच बायको ,सडा घालायला गेलं ,तर मारल की रे चोरांनी !!! ,तिच्या गळ्यातलं डोरलं. आता पहिल्या सारख दिवस राहील नाही बघ . कुनाला काय बी बोलायची सोय राहिली नाही . आर ! साध गांडूळ देखील ,फणा काढतय की रे . अस म्हणत आण्णा मिस्कील पणाने हसू लागले .
" आण्णा त्याची तुम्ही काय बी काळजी करू नकासा. त्या पाई तर मी म्हादूला संगट आणलाय नव्ह ." शामराव .
आसू दे ! आसू दे ! उगाच दारात कीर्तन नको . काय चा पानी लागल तर मागून घे, पन ते चोरच तेवढ लक्षात ठेव म्हंजी झाल, चल तुझी झोपायची जागा दाखवतो ," असे म्हणत अण्णांनी त्या दोघांना आपल्या चार सोपी घरात नेले .

घराचे भले मोठे दगडी चौकटीचे प्रवेशद्वार. त्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला ऐस पैस अशा उंचावर असणार्‍या ओवर्‍या .त्यात मोठे जुन्या काळातील नक्षीकाम केलेले ते सागवानी चौकोनी खांब , मध्य भागी आभाळाची साक्ष सांगणारे ते प्रशस्त आंगण .त्यात तो तुळशी कट्टा .त्यात नाविन्य म्हणाल तर ,अण्णांनी आपल्या हौसेखातर बांधलेले, बाजूला असणारे चकचकीत फरशांचे स्वच्छतागृह .एवढेच काय ते त्यात नवीन होते . मागील बाजूला आण्णाच्या परिवाराच्या मुक्कामाच्या खोल्या होत्या . कधी काळी या गावातील कुण्या वतनदाराचा हा वाडा, ह्या अण्णांनी विकत घेतला होता .आता आण्णांनी मोठ्या कौतुकाने शामरावाला घरातून जाजम व दोन चादरी आणुन दिल्या व पुन्हा "एकदा चोरा पासून सावधान" असे म्हणत आण्णा घरात निघून गेले.एकुणच घरातील वातावरण धीर गंभीर वाटत होते.

आता ह्या काका पुतण्यांनी ,आपल्या भाकरीची शिदोरी सोडली व त्यावर यथेच्छ ताव मारला .दिवसभर बाजारातून फिरून फिरून दोघे पण थकून गेले होते .आण्णांनी दिलेला जाजम त्यांनी जमिनीवर अंथरला व त्यावर स्वछंद पणाने ते दोघेही पहुडले .आता रात्र खूपच झाली होती त्यात महावितरण मंडळाने तो मिणमिणता विजेचा दिवा देखील बंद करून टाकला, तसा सगळी कडे काळाकुट्ट अंधार पसरला. या अंधारामुळे शामरावांची काळजी आणखीनच वाढली .शामरावांनी आपल्या पैशाचे पाकीट बंडीतच ठेवलेले होते व त्याला वारंवार हात लावून त्याची ते चाचपणी करीत होते . घराच्या बाहेरून जाणार्‍या एखाद्या दुचाकीच्या किंवा टॅक्टरच्या आवाजाने ती रात्रीची शांतता कांही क्षणा साठी भंग होत होती .शामराव आपले डोळे उघडे ठेवून ,सावध पणे,ती रात्र सरण्याची ते वाट बघत होते . अंथरुणावर पडताच इकडे महादेवरावांनी आपले रात्रीचे कार्यक्रम सुरू केले .त्याच्या त्या घोरण्याने शामराव आणखीनच अस्वस्थ झाले .सुरवातीला हळूहळू आवाजात सुरू झालेले म्हादूचे ते घोरणे क्रमाक्रमाने मोठे होत होते व शेवटी फूस sss करून तो आवाज काढून परत नव्या दमाने तो घोरण्यास सुरवात करीत होता. म्हणजे एखादा घाट चडून झाल्यावर महामंडळाची बस कशी फूस sss करून हवा सोडते तसे त्याच्या घोरण्याचा शेवट फ़ुसsss करुन होत होता. मधून मधून " ये एसटी आली बघा ,चला बिगी बिगी ," अशा सारखे दिवसभरतील ठ्ळक वृत्तनिवेदन त्याच्या कडून झोपेतच केले जात होते .

शामरावांना मात्र कांही केल्या झोप लागेना .त्यात त्या काळ्याकुट्ट अंधारात त्यांना समोरचे देखील दिसेना झाले, त्या मुळे अंथरुणावर निपचित पडल्या शिवाय त्यांना कांही गत्यंतर नव्हते . त्यात अण्णांचे ते शब्द " ते चोराचे तेवढ लक्षात ठेव बघ ! " हे कांही केल्या त्यांच्या डोक्यातून जाईना . आता मध्य रात्र देखील उलटून गेली होती .शामरावांच्या डोळ्यात थोडी झोपेची झापड आली होती. इतक्यात कड कड असा कांहीतरी आवाज झाला ,शामरावाच्या मनात भितीची पाल चुकचुकली . ते उठून डोळे विस्फारून इकडे तिकडे पाहू लागले . एक भली मोठी व्यक्ती आपल्याकडे येत असल्याची त्यांना जाणीव झाली .ते मनात चांगलेच घाबरून गेले .त्यांनी म्हादूला हलवण्यास सुरवात केली ."आर !! म्हादू !! उठ उठ !! कोनतरी चोर आलाया वाटत ".हे ऐकल्यावर म्हादू पण कधी नव्हे तो झोपेतून उठला व ओवर्‍या वरून उडी मारून त्याने चोरावर झडप घातली . त्याच्या पैहीलवानी धक्याने चोर अगदी जमीनदोस्त झाला व काकुळतीला येउन ओरडू लागला " अरे मारू नका ,मारू नका ! मी चोर नाही ,मी आण्णा , मी आण्णा ! रात्री नगमीला बाहेर आलोय रे ! " मात्र झोपेचा अमल न उतरलेल्या म्हादूने, त्याला ज्या कामासाठी आणले होते, ते काम त्याने प्रामाणिक पणे पूर्ण केले .शामरावाना हा आवाज ओळखीचा वाटल्याने ते सावध झाले . अरे ! हे तर आण्णा ,असे म्हणत त्यांनी म्हादूला कसे बसे आवरले .तो पर्यंत आण्णा अगदी जमिनीवर चीतपट बेशुध्द झाले होते . "अरे बापरे ! आपण अण्णांनाच मारले की काय ? ह्या कल्पनेने शामराव अगदी गर्भगळीत झाले होते .त्यांना काय करावे हेच सुचेना . आर ,म्हादू हे काय केलास ? आण्णाला मारलस व्हय ? ." हे ऐकल्यावर म्हादू देखील संतापला " तुम्हीच वराडला नव्ह ,चोर चोर म्हनुनशान. मग मी तर काय करणार ?

इतक्यात अण्णांची बायको हातात ब्याटरी घेऊन बाहेर आली ,.काय झाले म्हणत तिने जमिनीवर पडलेल्या अण्णांना पाहिले ." आण्णा पडलेकी काय हो ? ही झोपत चालण्याची व धडकून पडण्याची , त्यांची ही खोड कायमची आहे बघा .माझं त्यांच्यावर रात्री सारखं लक्ष असतय,पण कधी नव्ह ते आज डोळा लागला आणि हे अस घडल. " उठवा ! उठवा हेनास्नी " असे म्हणत त्या पुढे सरसावल्या .आहो काकी !! तुम्ही कायबी काळजी करू नकासा,आम्ही दोघ गडी आहे नव्ह, तुमच्या मदतीला .आम्ही त्यांना व्यवस्थित खाटेवर झोपवतो असे म्हणत ह्या दोघांनी अण्णांना अलगद उचलले व खाटेवर नेऊन ठेवले .त्यांना आराम वाटावा म्हणून त्यांच्या बायकोने अण्णांच्या डोक्याखाली तक्या व पायाखाली लोड ठेवला दिला .आण्णा बोलण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हते ,ते मधून मधून सारखे विव्हळत होते . आता चांगलीच पहाट झाली होती .पक्षांनी किलबिलाट चालू केला होता . शामराव व म्हादू घराच्या बाहेर आले .त्यांनी अण्णांनी दिलेल्या जाजम आणि चादरीच्या घड्या घातल्या व मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी बस स्थानकाचा रस्ता धरला .

कथालेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Jun 2016 - 6:34 am | कंजूस

???

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2016 - 1:45 pm | टवाळ कार्टा

=))

जव्हेरगंज's picture

21 Jun 2016 - 9:20 pm | जव्हेरगंज

???

ग्रामीण भाषेतील ज्या कथा किंव्हा किस्से आहेत ,ते आवडणारा असा एक विशिष्ट वर्ग आहे की ज्याची नाळ ही ग्रामीण भाषेशी जोडली गेली आहे. प्रत्येक भागातील ग्रामीण भाषा ही वेगवेगळी आहे . एरवीच्या जीवनात ज्या ज्या वेळी दोन ग्रामीण व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात त्या, वेळी त्यांचे संभाषण मी अगदी कान देऊन ऐकतो .त्यातील नवीन वाटणारे शब्द मी कानात साठवून ठेवतो .त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो .वास्तविक ही कथा किव्हा किस्सा मी लोकांना ज्या ज्या वेळी ऐकवला त्या त्या वेळी त्यांनी मला हासून खूपच दाद दिली .यातील लोकांचे वर्णन ,त्यांची बोलण्याची ढब हे सांगण्या साठी विशिष्ट अशी एक शैली किव्हा आवाजाच्या माध्यमाची गरज भासते ,मात्र ह्या गोष्टीचा परिणाम लेखना व्दारे व्यक्त होत नसावेत . कदाचित हे संवाद एकाच पट्टीत वाचल्यास त्यातील विनोद परिणाम कारक वाटत नसावेत असे माझे वैयक्तिक मत आहे .

चांदणे संदीप's picture

22 Jun 2016 - 2:43 am | चांदणे संदीप

आवडली गोश्ट! अजून येऊद्या!

Sandy

मग बैल घेतला की नाही....