खाद्यपुराण

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in जनातलं, मनातलं
28 May 2016 - 3:43 am

स्थळ :- इंग्लंड मधील एक भारतीय रेस्टॉरंट
वेळ :- दुपारची पोटात कावळे ओरडायची
दिवस :- फेब्रुवारीतल्या थंडीतला एक रविवार

(इथे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती वैगेरे बरोबरच्या जेवणाचा उल्लेख किंवा कोणाच्या अचानक झालेल्या भेटीमुळे किंवा ओढावलेल्या प्रसंगामुळे उडालेली धांदल वैगेरे प्रकार लेखात पुढे येणार नसल्याचे आधीच सांगितलेले बरे, लेखाची सुरवात मारे अशी केल्याने उगाच गैसमज नको. )

तर आज खूप दिवसांनी आम्ही तिघी मैत्रिणी, नवरा आणि मुलं ही मनाला चोवीस तास चिकटलेली कवच कुंडलं घरीच काढून ठेवून आयतं हादडायला (जेवायला) इथे एकत्र जमलो होतो. दिवस ठरवण्यात एक महिन्याहून जास्त काळ गेलेला…कधी मुलीच्या मैत्रिणीची बर्थडे पार्टी, कधी एक जणीच्या ऑफिस ची टीम outing, तर कधी दुसरीच्या पाच वर्षाच्या मुलाची football match, अशी बरीच आडवळणे रहदारीचे सगळे नियम (सगळ्यांच्या वेळा) काटेकोरपणे पाळत पार करता करता सहा रविवार उलटून गेले होते आणि मग त्यानंतर कसाबसा आजचा फ्री रविवार उजाडला होता. तर आम्ही बरोब्बर ठरवलेल्या वेळेवर म्हणजे सर्वश्रुत 'indian time" प्रमाणे नाही हं…इथे राहून कितीही प्रयत्न केला तरी तेवढा वेळ पाळण्याचा वाईट गुण नाही म्हणायला लागलाच शेवटी…असो… तर पोहोचलो होतो.

एखाद्या सिनेमाचा अगदी climax चालू असताना लाईट जावी, किंवा बाहेरच्या थंडीतून घरात आल्यावर मस्त आल्याच्या चहाची ऊब घेण्यासाठी चहा टाकावा, आणि फ्रीज उघडल्यावर शेवटचा आल्याचा तुकडा कालच संपलाय हे लक्षात यावं, दरवेळी इतकी मी भाग्यवान असल्यामुळं या वेळी ती रिस्क घेतलीच नाही. फोनवरून आधीच टेबल बुक केले होते. त्यामुळे, आत एन्ट्री करताना "sorry, we are fully booked today..." अशा कडू कारल्याची चव जिभेवर नाचवत केलेल्या 'स्मितवाक्याचा' सामना करावा नाही लागला. तशी सुट्टीमुळे आणि सूर्याच्या कृपेमुळे (sunny weather) आज आमच्या सारख्यांची गर्दी बऱ्यापैकी होती. तर आम्हाला आमच्या जिभेच्या रसना तृप्त करण्यासाठी एका कोपऱ्यातले मस्त प्रशस्त टेबल मिळाले. या आधी बऱ्याचदा मेक्सिकन, इटालियन, जापनीज, फ्रेंच असे बहुराष्ट्रीय मेनु उगाच थोडा चवीत बदल म्हणून चाखले असल्याने आणि त्यावरून एकूण आपल्या वरण-भाताला या विश्वात तोड नाही असे शिक्कामोर्तब झाल्याने रेस्टॉरंट ठरवण्यात आम्हा तिघींचे सुदैवाने एकमत झाले होते.

या बहुराष्ट्रीय पदार्थांबाबतीत, मूळ गोष्टीची चव जास्तीत जास्त आहे तशी टिकवत, वरुन लिंबू, मीठ, मिरपूड, बटर किंवा चीज यांपैकी जमेल त्याचा फवारा मारून नंतर त्याची उकड घेवून अथवा ते भाजून किंवा तळून, वाटल्यास एखाद्या सॉसमध्ये थबथबवून, कच्च्या झाडपाल्याबरोबर आकर्षित प्लेट मध्ये पुढ्यात मेन डिश म्हणून आल्यावर, मेनुकार्डात उजवीकडे पाहिलेला आकडा मनात आठवत आपण फक्त या रेस्टॉरंटच्या ambiance ची किंमत मोजतोय की काय, असा typical मध्यमवर्गीय विचार कितीही ठरवलं तरी डोकावतोच. याउलट, भारतात जन्माला आलेले जवळपास ३५० प्रकारचे मसाले त्यांची वेगवेगळी permutations combinations करून अद्वितीय, विलक्षण तीक्ष्ण चवींनी, (इथे तोंडाला पाणी सुटणारी सगळी विशेषणं अपेक्षित आहेत…पण सध्या तहाण दोनावरच भागवते) ओतप्रोत भरलेल्या 'क्हरीज' भात किंवा नान बरोबर पानात आल्यावर डोळे आणि नाकाच्या बरोबरीने जिभेच्या रसनाही तृप्त करतात.थोडक्यात, परदेशी भूमीवर उगाच conservative विचारांना (खाण्याला) पुष्टी देणाऱ्यांच्या प्रजातीत मोडणारी मी…मग हे असलंच आवडायचं…!

तर असो, या अशा रुचकर, आयत्या जेवणाचा बुफे पद्धतीने (set menu) म्हणजे आपल्याकडच्या वाट्या वाट्या वाल्या थाळी प्रकारात मोडणाऱ्या पद्धतीने आस्वाद घेण्यास आम्ही सुरवात केली. सामोसा, पकोरा, आलू टिक्की, पापडी चाट, मंचुरियन या भारतीय (पंजाबी) स्टार्टरने धक्का देत भुकेची गाडी मेन कोर्स कडे वळवताना हातातल्या प्लेटचा आकारही नकळत वाढला. आता त्या नंतर वाढणाऱ्या पोटाच्या किंवा एकूणच शरीराच्या आकारमान वाढीचा विचार अशावेळी तरी मी वर उल्लेखलेल्या कवच-कुंडलांबरोबरच घरी ठेवून येते. त्यासाठी दुसऱ्या दिवशी जिममध्ये ट्रेडमिल किंवा क्रॉसट्रेनरवर तासभर जास्तीची मेहनत करावी लागली तरी चालेल, पण एकदा का रेस्टॉरंटची पायरी चढली की, जिभेचे मुबलक हट्ट पुरवत, पैसे पुरते वसूल करणे हाच काय तो एकमेव उद्देश. तेवढ्या वेळेपुरते डाएटिंग वैगेरे शब्द माझ्या शब्दकोशातून गायब असतात. या अशा खाण्याबरोबरोर साथीला खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींबरोबरच्या गप्पा म्हणजे तर अगदी धम्माल….!

तर बर्यापैकी सर्व पदार्थांच्या चवी जिभेवर रेंगाळत असताना, गप्पांचा ओघ थोडा ओसरल्यावर लक्ष जरा आजूबाजूला गेलं. आमच्या एका बाजूच्या टेबलवर साधारण पास्तीशितले आई-वडील आणि त्यांची दोन गोजिरी मुलं मोठा ४-५ आणि धाकटा जवळपास वर्षाचा असं एक भारतीय कुटुंब घरची चूल बंद ठेवून आज दुपारी इथं विसाव्याला आलं होतं बहुदा. किमान अर्धा तरी संसार बाबा गाडीला बांधून त्यातले सामान त्या वर्षाच्या बाळाच्या दिमतीला लागेल तसे दर पाच एक मिनिटांनी पुरवण्याचा कमालीचा संयम त्या आई वडिलांकडे होता. शिवाय मधल्या वेळात मोठ्याचे प्रश्न कम आदेश कम तक्रारी चा सूर सचोटीने सांभाळण्याची कसरतही चालू होती. या सगळ्यातून ज्याच्या साठी ते इथे आले होते तो जेवणाचा द्राविडी प्राणायामही आधी वडील आणि नंतर आई असे आळीपाळीने करत होते. एका क्षणाला धाकट्याचा असा काही मूड गेला कि, आई हातातला घास परत प्लेटमध्ये ठेवत त्याच्या तार सप्तकाला कोमल करण्याची धडपड बिचारी करू लागली. या सगळ्यात 'आस्वाद' मग तो जेवणाबरोबर गप्पांचाही पार दूर दूर पर्यंत डोक्यातही आला नसेल दोघांच्या.

उजव्या बाजूच्या टेबलावर जवळपास सत्तरीतले ब्रिटीश आजी-आजोबा मात्र त्या भारतीय जेवणाचा कमालीचा आस्वाद घेत होते. दोघांच्याही प्लेट्स मध्ये एकूण सगळ्या पदार्थांचे मिश्रण होवून एक डोंगर वजा ढीग लागला होता. आपल्या जेवण्याच्या एकूणच पद्धतीची माहिती नसल्याने कदाचित त्यांच्या पानात बरीच भेळ मिसळ झाली होती. पण तरीही प्रत्येक घासागणिक तृप्तता त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होती. तसही जगभरात 'भारतीय क्हरीज' त्यांच्या अप्रतिम चवीमुळे उगाच का प्रसिद्ध आहेत.

डाव्या कोपऱ्यातल्या टेबलावर आमच्या नंतर थोड्या वेळाने एक दक्षिणात्य कुटुंब त्यांच्या साधारण आठ वर्षांच्या मुलाबरोबर बसलं होतं. रविवारचा केस धुण्याचा कार्यक्रम तिघांनीही नुकताच पार पाडून ते इथे पोहोचले असावेत असा एकूण अंदाज त्या एका typical वासावरून आणि एकूणच त्यांच्या अवतारावरून सहज येत होता. या सगळ्यामुळे आपण परदेशात आहोत याचा मलाही पाच मिनिटं विसर पडला. त्यांच्या बाबतीत मात्र तोंड हे केवळ जेवणासाठीच उघडले जात होते. जेवताना बोलण्यास सक्त मनाई असल्याची अदृश्य पाटी तिघांनीही हातात धरलीये असं वाटलं. आणि त्यामुळं आमच्या नंतर येवूनही पोटं तुडुंब भरून दुपारच्या वामकुक्षीला आम्ही मात्र इथेच असताना ते पोहोचलेही असतील, इतके पटापट त्यांचे सगळे आटोपले होते.

आमच्या सारखे जेवणाचा आधार घेत निवांतपणे गप्पा मारायला भेटलेल्या मित्र-मैत्रिणींचेही चार दोन कळप बसले होतेच. त्यांच्या सोशल इमेज सांभाळत चाललेल्या गप्पा, हास्यविनोद याचा साधारण अंदाज येत होता. तसं हे रेस्टॉरंट उत्तम चवीसाठी चांगलं नामांकित होतं, त्यामुळे भारतीय आणि ब्रिटीश दोन्हीही लोकांची इथे चांगलीच गर्दी होती. पलीकडच्या मोठ्या हॉल मध्ये अनेक वर्षांपासून इथेच स्थायिक असलेल्या गुजराती कुटुंबातील कोणाची तरी बर्थडे पार्टी चालू होती. एकूणच त्यांच्या इंग्रजाळलेल्या भाषा, पेहराव अशा बाह्य गोष्टींवरून तसं जाणवत होतं. ती सारी मंडळी त्या उत्साहात अगदी धुंद होती.

स्वतःच्या पानातल्या वेगवेगळ्या चवींचा पुरेपूर आस्वाद घेत आज तिथे आलेल्या लोकांचा साधारण अंदाज घ्यायचा उद्योग आमच्या गप्पांच्या बरोबरीने आपोआप कधी सुरु झाला कळलंच नाही. खूप दिवसांनी मिळालेल्या निवांतपणामुळे असेल किंवा अंगच्या वाईट सवईमुळे असेल कदाचित. पण त्यामुळे अनोळखी लोकांच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे जाताजाता उगाच पडताळले जात होते. जसा हळदीचा कडवटपणा, मिरचीचा जहाल तिखटपणा, लवंग-दालचिनी-तमालपत्राचा उग्रपणा, वेलदोड्याचा सुवास, केशराचा सुरेख रंग, आमचुराचा आंबटपणा किंवा जेष्ठ्मधाचा गोडपणा या साऱ्याच्या मूळ चवी पदार्थांमध्ये चाखत त्याचा माणसांच्या स्वभावाशी असलेला संबंध आज बसल्या बसल्या उगाच परत एकदा जोडला गेला. आणि शेवटी आम्ही 'अन्नदाता सुखी भव' म्हणत घरचा परतीचा रस्ता धरला.

अश्विनी वैद्य

वावरविचार

प्रतिक्रिया

लेखन आवडले. सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.

अश्विनी वैद्य's picture

28 May 2016 - 3:07 pm | अश्विनी वैद्य

धन्यवाद रेवती...!

उगा काहितरीच's picture

28 May 2016 - 6:49 am | उगा काहितरीच

छान!

--एकूण आपल्या वरण-भाताला या विश्वात तोड नाही --

+१०० . छान लेखन .

अश्विनी वैद्य's picture

28 May 2016 - 3:11 pm | अश्विनी वैद्य

मनापासून धन्यवाद

छान चित्रदर्शी वर्णन केलंं आहे. खूप आवडलंं.

अश्विनी वैद्य's picture

28 May 2016 - 3:11 pm | अश्विनी वैद्य

मनापासून धन्यवाद पलाश

पद्मावति's picture

28 May 2016 - 3:05 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय.

Maharani's picture

28 May 2016 - 3:30 pm | Maharani

Va va...mastach lihile aahe...agadi dolyasamor ubhe rahile.

अश्विनी वैद्य's picture

30 May 2016 - 12:45 am | अश्विनी वैद्य

Thank u

अश्विनी वैद्य's picture

28 May 2016 - 3:37 pm | अश्विनी वैद्य

खूप मनापासून धन्यवाद

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 3:46 pm | मुक्त विहारि

बाहेर गेल्यावरच समजते.

यशोधरा's picture

28 May 2016 - 4:28 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय!

सविता००१'s picture

28 May 2016 - 5:52 pm | सविता००१

आवडलं लिखाण. मस्तच

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:32 pm | बोका-ए-आझम

जगात सर्वात श्रीमंत आहे. छान लेखन.

अश्विनी वैद्य's picture

30 May 2016 - 12:43 am | अश्विनी वैद्य

खरयं..!

हृषिकेश पांडकर's picture

29 May 2016 - 7:57 am | हृषिकेश पांडकर

छान लिहिले आहे.

अश्विनी वैद्य's picture

30 May 2016 - 12:43 am | अश्विनी वैद्य

Thank u so much...!

सुबक ठेंगणी's picture

30 May 2016 - 11:03 am | सुबक ठेंगणी

नवरा आणि मुलं ही मनाला चोवीस तास चिकटलेली कवच कुंडलं घरीच काढून

हे विशेष आवडलं.

अश्विनी वैद्य's picture

30 May 2016 - 1:06 pm | अश्विनी वैद्य

Thank u...!

mandarbsnl's picture

30 May 2016 - 12:34 pm | mandarbsnl

माझ्यातल्या सर्व काही डोळ्यासमोर उभे करून त्यात हरवून जाण्याच्या (वाईट) सवईमुळे मी तुम्ही वर्णन केलेली प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर उभी केली...वेटर चे स्मितहास्य पासून धुतलेले केस त्यांचा वास मुलाचे रडणे ब्रिटिश लोकांच्या थाळीतील डोंगर गुजराती लोकांचा दंगा सर्वकाही.... उत्तम लिहिलंय...माझी वाचनाची जी हाव आहे (व्यसनच ते), ती मिपा वरचे लेखक पूर्ण करतात त्या बद्दल त्यांचे आणि या लेखबद्दल तुमचे मनापासून आभार...एक प्रश्न, तुम्ही काय ऑर्डर केलंत?? चव कशी असते तिथे भारतातल्यासारखीच?? आणि एक मध्यमवर्गीय प्रश्न... भाव काय असतात तिथे???.. म्हणजे आधी मेनू कार्ड ची उजवी बाजू पाहून मग पदार्थाकडे पहायचे का??

अश्विनी वैद्य's picture

30 May 2016 - 1:24 pm | अश्विनी वैद्य

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप मनापासून धन्यवाद… चव अगदी भारतातल्या सारखी नाही पण गोऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल इतकी चांगली नक्कीच असते, शिवाय किमतीचे म्हणाल तर पौंडाच्या जगभरात असलेल्या 'status ' ला साजेश्या. तसेही माझ्यासारखे मध्यमवर्गीय नेहमी मेनुकार्डाची आधी उजवी बाजूच बघतात… ;)

विवेकपटाईत's picture

30 May 2016 - 7:31 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. विशेषकरून जेवणाचा द्राविडी प्राणायामही आधी वडील आणि नंतर आई असे आळीपाळीने करत होते.

फार पूर्वीची आठवण आली. भुक्तभोगी.

अश्विनी वैद्य's picture

31 May 2016 - 3:27 am | अश्विनी वैद्य

धन्यवाद... आमचा असा प्राणायाम अजूनही चालू आहे ;)

इशा१२३'s picture

30 May 2016 - 7:40 pm | इशा१२३

छान!

इशा१२३'s picture

30 May 2016 - 7:41 pm | इशा१२३

छान!

सूड's picture

30 May 2016 - 7:42 pm | सूड

सुंदर लिहीताय.