गाजर हलवा ... फ्री फ्री फ्री ... !!!
अर्रर्रर.. फारच पांचट पीजे होता सॉरी सॉरी..
गाजर हलवा तिकडे नाही इकडे आहे.
सीझनमधील पहिलाच गाजराचा हलवा, थंडीचा लांबवर पत्ता नाही त्यामुळे छान लालबुंद गाजरंही दिसत नाहीत,
खूप फिरल्यावर मंडईत जरा चांगली मिळाली, मग काय लग जाओ मिशन हलवा..
गाजर हलवा
साहित्यः
गाजराचा कीस: ५ वाटया
साखर: १ वाटी
दूधः आवडीप्रमाणे (साधारण ३-४ वाटया)
तूपः १०-१२ चमचे
वेलची: ४
वेलचीपूड, जायफळपूड, केशर: आवडीप्रमाणे
बदाम, पिस्ते, काजू, बेदाणे, चारोळी: आवडीप्रमाणे
पेढे: २
कृती:
गाजर थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावेत, मग सालं काढून स्वच्छ धुऊन किसून घ्यावे.
काहीवेळा कीस पिळून त्यातील पाणी काढतात पण त्याने गाजराची चव तसेच जीवनसत्वंही निघून जातात,
त्यामुळे शक्यतो रसासकट कीस वापरावा.
पाव वाटी दूधात केशर भिजत ठेवावं. सुक्या मेव्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.
गाजराचा कीस कुकरच्या डब्यात घालावा, त्यात दोन वेलची सोलून + ५ चमचे तूप घालावे.
कुकरमध्ये एखादीच शिट्टी करून शिजवून घ्यावे.
पॅनमध्ये ५ मोठे चमचे तूप टाकून कीस परतून घ्यावा, त्यात दूध, दोन वेलची सोलून सालासकट घालून
निवांत शिजू द्यावे. दूध आटत आले की साखर घालावी. साखर पूर्ण विरघळून मिश्रण शिजत आले की
थोडी वेलचीपूड, जायफळ्पूड, केशर घातलेले दूध, सुका मेवा घालावा, सर्वात शेवटी पेढे कुस्करून घालावे.
मिश्रण हलवून एकजीव करावे, कडेने थोडे तूप सोडून शिजू द्यावे, घट्ट होऊ लागले की गॅस बंद करावा.
गोग्गोड गाजर हलवा तयार !!
सूचना:
१. गाजराचा कीस कुकरमध्ये न शिजवता पॅनमध्येच तुपावर १५-२० मिनीटे शिजवून घेऊन, मग त्यात दूध
घालूनही पुढील कृती करता येईल.
२. दूध, तूप, साखरेचं प्रमाण आपल्या आवडी/तब्येती/पोटा नुसार कमी-जास्त करता येईल.
**
महत्वाचा प्रश्न हलवा चवीला कसा झाला, तर एकच घास खाल्ला आणि..
आहा.. आनंद ! परमानंद !! ब्रह्मानंद !!!
सर्व ज्ञान अर्थ मोक्ष प्राप्ती त्या एका क्षणी झाली, खाओ और खो जाओ बस..
मात्र मी त्या हलव्यातील जेमतेम थोडाच खाल्ला असेल, बाकी अनेक जवळच्या लोकांना खाऊ घातला,
आणि त्यातून जो आनंद मिळाला तो स्वतः सगळा हलवा खाऊनही मिळाला नसता हेच खरं.
कुठलीही गोष्ट माणूस स्वतःसाठी करतो तेव्हा त्यात आनंद असतोच, मात्र तेच जेव्हा तो इतरांसाठी करतो
त्यात मिळणारे समाधान अतुलनीय, अवर्णनीय असते.
काही वर्षांपूर्वी मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स केला होता, त्यातील सर्वोच्च भाग होता "सुदर्शन क्रिया".
पहिल्यांदा जेव्हा सुदर्शन क्रिया केली, त्यानंतर शवासन केले तेव्हा त्या वर्गात, सगळ्या लोकांत, अगदी 10-15 मिनिटांसाठी असेल पण शांत गाढ झोप लागली होती मला (इतरही बरेच लोक असेच झोपले होते)
सीडीवरील श्री श्री रविशंकर यांच्या स्वरातील सूचनांनुसार ती क्रिया करायची असते,
सोSS बरोबर श्वास घ्यायचा आणि हम्SS वर सोडायचा, तो नादही अत्यंत उत्कट आणि ऊर्जादायी.
श्वासांची लय, गती बदलती राहणार, त्याची आवर्तने करायची.
एक अतिशय विलक्षण, अद्भूत अनुभव होता तो, अवर्णनीय..
सुदर्शन क्रिया हे तालबध्द श्वासोच्छ्वासाचे एक प्रभावी तंत्र आहे.
श्वास हा मन आणि शरीर यांना सांधणारा दुवा आहे.
जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा लहान, जलद श्वास घेतो, दु:खी असू तर दीर्घ श्वास घेतो,
अशा तर्हेने श्वासोच्छ्वास असंतुलित असणे हेच बर्याच समस्यांचे मूळ असते.
या क्रियेद्वारे श्वासोच्छ्वासाचा कुशलतेने वापर करुन ताण-तणाव, चिंता, थकवा, क्रोध, उद्वेग, नैराश्य इ.
नकारात्मक भावना दूर करून आपण चित्त प्रसन्न, उत्साही, शांत ठेवू शकतो, एकाग्रता वाढवू शकतो.
यामुळे आपले शारिरीक, मानसिक, भावनिक तसेच सामाजिक स्वास्थ्य जपले जाते.
त्यानंतर घरी अनेकदा सुदर्शन क्रिया केली, मात्र परत कधी झोप लागली नाही वा तशी शांतताही लाभली नाही.
तिथल्या सेवेकरींनी (शिक्षक-सेवा देणारे) सांगितले होते की सुदर्शन क्रिया शिकवणारे स्वतःसाठी त्याचा वापर
करत नाहीत तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवतात, त्यांना मनःशांति मिळवून देण्यात मदत करतात.
यामागील अंतस्थ हेतू फक्त स्वार्थ न पाहता परमार्थ साधावा हाच असावा.
मनःशांतिसाठी सुदर्शन क्रिया सर्वांनी नियमीत करावीच मात्र त्याद्वारे मिळणारे समाधान इतरांपर्यंतही पोहोचवावे.
मी सुदर्शन क्रिया शिकले आहे हेच विसरून गेले होते, या निमित्ताने ती उजळणी झाली, आता परत नियमीत
ती साधना सुरू करणे हाच रोजचे केऑटीक आयुष्य सुरळीतपणे निभावून नेण्याचा मार्ग.
हलवा आणि सुदर्शन क्रियेचा परस्परसंबंध काहीच नाही, सुदर्शन क्रिया लेखामध्ये कधी, कशासाठी आली तेही
सांगता येणार नाही. अंतर्मनातून कुठूनतरी ती लिंक लागली आणि ते असं व्यक्त झालं एवढंच खरं :)
प्रतिक्रिया
16 Dec 2015 - 12:23 pm | तुषार काळभोर
लईच्च जुना आहे.
मिपाचे ज्येष्ठ, वरीष्ठ, श्रेष्ठ, आद्य बल्लवाचार्यजी श्रीश्रीश्री(श्री) गणपा यांनी पाच वर्षांपुर्वी असा पीजे मारला होता.
16 Dec 2015 - 12:25 pm | तुषार काळभोर
खर्रोखर भारी आहे.
गाजराचा किंवा दुधीचा हलवा खायला मी नेहमी (हावरटासारखा!!) तयार असतो.
17 Dec 2015 - 11:20 am | नीलमोहर
हलवा हलवा मा भी फर्क रहिन के नाहि,
उ मोटा दुधी था, ई स्लीम ट्रीम गाजरवा हय.
हमौ हलवा लिखेल तो हलवा दियेल हय, चिटींगवा नही कियेल.
(अर्ररर.. काय ही भाषा) ;)
16 Dec 2015 - 12:28 pm | अभ्या..
गाजरहलवा छान.
तुमच्याकडून त्या कीप काम च्या घिश्यापिट्या टेम्पलेट चित्राची अपेक्षा नव्हती.
धन्यवाद.
17 Dec 2015 - 11:36 am | नीलमोहर
घरच्या अपेक्षा, दारच्या अपेक्षा, साहेबाच्या अपेक्षा, रस्त्यावरील लोकांच्या अपेक्षा..
या सर्वांतून दोन घडी सुटका म्हणून मिपावर यावं तर लोक इथे ही अपेक्षा ठेऊ लागले ;)
" ये न्याय नहीं अन्याय है " - हे खास राखी स्टाईल, काकुळतीच्या टोनमध्ये इमॅजिन करावे.
अशा अपेक्षा ठेवायला मी काय तुमच्यासारखी उच्च कलाकार वगैरे वाटले का तुम्हाला :)
पण मला ते कीप काम वाले पोस्टर्स आवडतात, त्यात थोडक्यात आणि प्रभावीपणे आशय मांडता येतो.
इथे लेखासाठी ते सुटेबल वाटले.
16 Dec 2015 - 12:43 pm | जागु
आवडीचा व ह्या दिवसात पंधरा दिवसातून एकदा तरी होणारा पदार्थ.
16 Dec 2015 - 12:48 pm | नाखु
आता गाजर पारखी शोधणे आले..
गजर वाला नाखु.
16 Dec 2015 - 1:23 pm | प्रचेतस
जबरी सादरीकरण झालेय गाजरहलव्याचे.
16 Dec 2015 - 2:59 pm | पद्मावति
मस्तं, टेस्टी गाजर हलवा.
16 Dec 2015 - 3:07 pm | यशोधरा
खवा घातला तर आणखी चव येते! परवाच केला होता.
16 Dec 2015 - 3:07 pm | यशोधरा
खवा घातला तर आणखी चव येते! परवाच केला होता.
16 Dec 2015 - 7:52 pm | तुषार काळभोर
खवा पाहिजेच! चार चांद लागतात दुधी/गाजराच्या हलव्याला!
17 Dec 2015 - 11:44 am | नीलमोहर
खवा आहे की हो, पेढ्याच्या स्वरूपात आहे एवढंच,
आमच्याकडे हलवा दूध, खवा दोन्ही टाकून होतो. फक्त खव्यामुळे हलव्याला जे रवाळ टेक्स्चर येतं,
खव्याचे बारीक बारीक तुकडे राहतात ते आवडत नाही, सॉफ्ट हलवा जास्त आवडतो म्हणून दूध घालायचं,
पेढे पण घालायचे.
सेम इफेक्ट. करून पहा असाही, मस्तच होतो :)
16 Dec 2015 - 3:08 pm | यशोधरा
आणि हो, गाजरहलवा खाल्ला की वेगळ्या सुदर्शन क्रियेची आवश्यकता कशाला पडते म्हणते मी! =))
16 Dec 2015 - 5:07 pm | मीता
पाकृ छान . कालच गाजर हलवा केला असल्याने जळजळ कमी झाली.
16 Dec 2015 - 5:13 pm | अनन्न्या
बाकी रंग अप्रतिम आलाय!
16 Dec 2015 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा
मत्त...मत्त.. :)
16 Dec 2015 - 6:53 pm | रेवती
एवढ्यात गाजर हलवा केला नाहीये पण पाहून छान वाटले. ;)
17 Dec 2015 - 3:02 pm | इशा१२३
मस्त!मी पेढेच वापरते शक्यतो.पण नसले तर?
मग त्यासाठी मिल्कपावडर वापरते.मिल्कपावडरने छान चव आणि टेक्स्चर येते.पटकन मिळुन येतो.हलवा होत आला कि मिल्कपावडर घालायची.दुधी हलवा,खोबर्याची बर्फी,लाडु यातहि मिल्कपावडर वापरून मस्त चव येते.खव्याची गरज नाहि.
17 Dec 2015 - 5:45 pm | तुषार काळभोर
दुधी हलवा,खोबर्याची बर्फी,लाडु यातहि मिल्कपावडर वापरून मस्त चव येते.
ओक्के!! नोटेड.
धन्स :)
(खादाड) पैलवान