गावची वारी

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
18 Jan 2008 - 2:05 am

करकचून ब्रेक दाबत एस.टी थांबली. दरवाजा उघडला. एका हाताने गॉगल नीट करीत आणि दुसर्‍या हाताने खांद्यावरील बॅग सावरीत रमकांत उतरला. त्यापाठोपाठ रश्मी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अमेय हेही उतरले. सभोवती एक दृष्टीक्षेप टाकून त्याने गावात जाणारा रस्ता पकडला.

ते तिघे गावात जाऊ लागले तसे पारावर बसलेल्यांत प्रथम एक क्षणभर शांतता पसरली आणि नंतर दबल्या आवाजात कुजबूज!

"धाकला खोत ना रे तो ?", विडीचा झुरका घेत एकाने विचारले.

"होयसा वाटतो", कोणतरी उत्तरले.

अप्पा खोतांचा गावीच राहिलेला थोरला आबा आणि मुंबईला प्रथम शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी राहून पक्का मुंबईकर झालेला घाकटा रमाकांत यांतील् भाऊबंदकी सार्‍या पंचक्रोशीत सगळ्यांना ठाऊक होती. दोन वर्षांपूर्वी अप्पा खोतांचे निधन झाल्यावर त्यांच्या तेराव्याला सकाळी येऊन संध्याकाळी परत गेलेला रमाकांत सर्वांनी पाहिला होता. म्हणूनच आता सहकुटुंब सहपरिवार आलेला रमाकांत बघून सर्वांच्याच नजरा आश्चर्याने विस्फारल्या!

"एवढी मोठी ब्याग घेऊन आलाय म्हणजे वस्तीलाच आलाय हो!", एका काडीपैलवानाने आपल्या चष्म्याची काडी सावरीत निष्कर्ष जाहीर केला.

"वस्तीला? चांगला मुक्कामालाच आलेला दिसतोय. पोराबाळांसकट!", दुसरा.

रमाकांत नजरेआड झाला तसे ते पुन्हा सगळे सोनाराची कमळा आणि मारवाड्याचा पुखराज यांचे सूत कसे जमले याच्या गोष्टीत गुरफटून गेले!

*******

कर्रऽऽ आवाज करीत लोखंडी दरवाजा उघडला तसे ओटीवर खुर्चीत बसून पेपर वाचणार्‍या आबाने नजर अंगणाकडे वळवली. तोही डोळे फाडफाडून बघू लागला. रमाकांत आणि तेही बायकापोरांसह?

"अगऽ ए, पाह्यलस का?", स्पयंपाकघराकडे तोंड करून त्याने हाक मारली.

"ये. असा अचानक? कुठे जवळपास आला होतास काय?", रमाकांत घरात येताच आबाने विचारले.

"नाही. थेट इथेच आलो", रमाकांत म्हणाला.

उत्तर ऐकून आबा जरासा चरकला.

"हातपाय धुवून घ्या. मी चहा टाकते", वहिनी म्हणाली.

ते तिघे हातपाय धुवायला म्हणून न्हाणीघराकडे जाऊ लागले तसे आबा आणि वहिनीने एकमेकांकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला!

*******

कपडे बदलून रमाकांत ओटीवर आला आणि एक खुर्ची ओढून बसला. रश्मी स्वयंपाकघरात वहिनीला मदत करायला गेली आणि अमेय अंगणात नुसताच हुंदडायला!

"काय मग, किती खंडी भात आलं यंदा?", रमाकांतने विचारले.

"हां आलं आपलं नेहेमीसारखचं", आबाने निश्चित उत्तर देण्याचे टाळले.

"आंणि आमराई यावर्षी पण अहमद चिच्यालाच दिली काय?", रमाकांत

"हं", आबा थोडक्यात उत्तरला.

"आणि तुझं काय?", आबाने विचारले, "बोनस-बिनस भरपूर मिळालाय असं ऐकल".

"भरपूर कसला? नेहेमीसारखाच!", रमाकांत म्हणाला.

तासभर गप्पा झाल्या पण कोणी ताकास तूर लागू दिला नाही!

*******

इकडे स्वयंपाकघरात वहिनी आणि रश्मीच्या गप्पा चालू होत्या.

"आता वय झालं. बैठ्या ओट्याने पाय दुखून येतात. ह्यांना कितिदा सांगितले की उभा ओटा करून घेऊ, पण ऐकतच नाहीत", वहिनी तक्रार करीत होती.

"हो ना. आणि गॅससुद्धा घ्यायला हवा खरेतर. किती दिवस चुलीवर काढणार?", धुरामुळे चुरचुरू लागलेले डोळे चोळत रश्मी म्हणाली.

"गॅस रिक्षाकरून आणावा लागतो तालुक्याच्या गावाहून", वहिनीने माहिती पुरवली.

*******

जेवणे उरकली आणि आता झोपण्याची तयारी सुरू झाली. प्रथेप्रमाणे आबा आणि रमाकांतने ओटीवर तर वहिनी, रश्मी आणि अमेयने माजघरात अशी व्यवस्था वहिनीने केली.

"आम्ही तिघे माडीवरच्या खोलीत झोपू", रमाकांतने जाहीर केले.

आबा-वहिनी काही बोलले नाहीत.

ते तिघे वर गेले तसे आबा माजघरात जाऊन वहिनीशी बोलू लागले.

"कशासाठी आलाय? काऽही समजत नाही", आबा.

"वाटणीसंबंधी काही बोलायचं असेल", वहिनी

"वाटणी? आता कसली वाटणी? सगळं केव्हाच ठरलयं. घर फक्त दोघांच्या नावावर. बाकी शेत, आमराई सगळे माझ्या एकट्याच्या", आबा गरजले.

"हो. पण तुमच्या नंतर काय? आपल्याला नाही वारस अन् त्याला आहे कुलदीपक! हे दाखवायलाच तर घेऊन आलाय पोराला!", वहिनी.

"हं ऽऽ", आबा विचारात पडले.

*******

दुसर्‍या दिवशी सकाळीच रमाकांत अमेयला घेऊन घराबाहेर पडला. रश्मी घरातच राहिली. आबा आणि वहिनीने तिला वेगवेगळ्या प्रकारे, आडपडद्याने विचारून पाहिले, की त्यांचा इथे येण्याचा हेतू काय. पण तिने कोणत्याही प्रश्नाचे धड उत्तर दिले नाही!

संध्याकाळी खूप उशीरा रमाकांत आणि अमेय घरी परत आले. रमाकांत थकलेला दिसत होता. अमेयच्या चेहर्‍यावरून मात्र आनंद ओसंडून वाहत होता. काय बोलू नि काय नको असे त्याला झाले होते. वारंवार रश्मीकडे येऊन दिवसभरात काय घडले त्याच्या कथा तो सांगत होता.

"पानं मांडली...", स्वयंपाकघरातून आवाज आला. तसे आबा आणि रमाकांत उठले.

कुळथाचं पिठलं आणि भात. सोबतीला पोह्याचा पापड आणि कैरीचे लोणचं. साधाच पण रुचकर बेत!

आता विषय काढायचाच या निर्धाराने आबा म्हणाले, "रमाकांत, वाटणी संबंधीच बोलायला आला आहेस ना? मग तसे स्पष्टपणे बोल ना?".

रमाकांतने चमकून आबांकडे पहिले.

"हे बघ. मला मूलबाळ नाही. माझ्यानंतर हे शेत आणि आमराई गावकीला जाईल पण तुला मिळ्णार नाही. उगाच पोराला मिरवायला घेऊन यायची गरज नव्हती. समजलस काय?", आबा पुन्हा गरजले.

"खो खो खो खो", रमाकांतला हसू आवरेना.

तिकडे रश्मीही तोंडात पदराचा बोळा ठेऊन खुदखुदू लागली.

"अगदी अपेक्षेप्रमाणेच झालं नाही काय ग?", रमाकांतने रश्मीला विचारले.

आता विस्मयचकित व्ह्यायची पाळी आबा-वहिनींची होती.

"आबा", रमाकांत सांगू लागला, "अमेय जन्मापासून शहरात वाढला. गाव त्याने कधी बघितलेच नाही. सुटीत वर्गातील सगळी मुले गावी जाऊन येत आणि गावच्या गमती-जमती सांगत. हा इवलेसे तोंड करून घरी येई. आम्हाला खूप वाईट वाटे. बिचार्‍याला गाव असून नसल्यासारखे", रमाकांतने जरा थांबून पाणी प्यायले.

"शेवटी आम्ही ठरवले. काय वाट्टेल ते होवो. अमेयला गावची वारी घडवायचीच", रमाकांत म्हणाला.

"अरे पण आधी कळवायचेस तरी", वहिनी म्हणाल्या.

"आणि आबा नाही म्हणाला असता तर पुढचे सगळेच बोंबलले असते", रमाकांतने स्पष्टीकरण दिले.

"म्हणून मी विचार केला", रमाकांत पुढे सांगू लागला, "थेट जाऊन धडकू आणि बघू काय होतय ते".

"आज सकाळीच त्याला घेऊन बाहेर गेलो. शेतावर गेलो, आमराईत गेलो, नदीवर गेलो, डोहात डुंबलो, टेकडीवरच्या दत्त मंदिरात गेलो, अगदी पुला पलिकडच्या कातळावर जिथे कॉलेजमधून सुट्टीवर आल्यावर मी सिगरेटी फुकायला जायचो, तेही दखवलं!", रमाकांत बोलला, "अरे अमेय, सांग काका-काकूंना सगळ्या गमतीजमती".

"तो केव्हाच झोपलाय", रश्मी म्हणाली, "चांगलाच दमला होता".

*******

"चला निघायला पाहिजे. बस चुकता कामा नये", रमाकांतने म्हटले, "अमेय काका-काकूंच्या पाया पडलास?"

"आता उन्हाळ्याच्या सुट्टीत ये हो", आबा रमाकांतला म्हणाले. आणि मग अमेयकडे वळून म्हणाले, "आपण आंबे खाऊ भरपूर. तुमच्या मुंबईला हापूस्-पायरी तेवढे मिळतात, रायवळ नाही. झालच तर काजू आणि फणस. तुमच्या मुंबईला फणसपण मिळतो तो केरळी करकरीत कापा. इथे आपण गोडगोड बरका फणस खाऊ."

"आणि हो, जाळीतून करवंदेदेखील काढू बरे का? पण सांभाळून हो, काटे असतात खूप जाळीला! आणि जांब आणि भोकरं तर खाल्ली नसशीलच तू!", आबा बोलायचे थांबतच नव्हते.

उशीर होऊ लागला तसे रमाकांतने बॅग उचलली आणि म्हणाला, "आबा, येतो मी. येतो वहिनी, उशीर होतोय".

तिघेही निघाले. पहिल्या वळणावर तिघांनीही मागे वळून पाहिले आणि हात उंचावून टाटा केला.

ते दिसेनासे होई पर्यंत आबा आणि वहिनी तिथेच उभे राहिले. त्यांचे डोळे पाणावले होते. रमाकांत आणि रश्मीचेही पाय जडावले होते. एकटा अमेय तेवढा झाल्या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होता. कुतुहलमिश्रित आनंदी नजरेने इकडे-तिकडे पाहत, गावची मोकळी, स्वच्छ हवा छातीत भरून घेत होता !!

******* ******* *******

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jan 2008 - 3:11 am | ब्रिटिश टिंग्या

सुंदर कथा लिहिली आहेस.....पुलेशु

आपला,
(कथा आवडलेला) छोटी टिंगी

इनोबा म्हणे's picture

18 Jan 2008 - 3:17 am | इनोबा म्हणे

सुन्या...च्यामारी असलं रडकं काही तरी लिहीतोस आणी डोळ्यातून पाणी काढतोस.मनाला भिडलं रे....

(गाववाला) -इनोबा

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jan 2008 - 3:22 am | ब्रिटिश टिंग्या

इनायकभौ, तुमी मर्द मराठा ना, मंग रडताय कशापायी?
तुमी फकस्त इश्टोरी येंजॉय करा.....

- छोटी टिंगी

इनोबा म्हणे's picture

18 Jan 2008 - 12:13 pm | इनोबा म्हणे

टिंग्या तू लहान आहेस अजून,तूला नाही कळायचे...

(आमची माणसं,आणि त्यांची झालेली माती) -इनोबा

अवलिया's picture

18 Jan 2008 - 3:43 pm | अवलिया

दूखः नाही दु:ख

(मातीतला माणुस) नाना

चतुरंग's picture

18 Jan 2008 - 3:33 am | चतुरंग

गोष्टींची आठवण झाली. शेवटी एकदम धक्का!
झकास जमली आहे गोष्ट सुनील.

चतुरंग

सहज's picture

18 Jan 2008 - 7:14 am | सहज

लघुकथा आवडली. नेहमीपेक्षा वेगळं वाचायला मिळाले, आवडले.

विसोबा खेचर's picture

18 Jan 2008 - 8:47 am | विसोबा खेचर

छोटीशीच, परंतु छान कथा!

कथेतली कोकणची पार्श्वभूमी आवडली. लहानगा अमेय असा दरवर्षीच जर खेळाबागडायला, आंबेफणस खायला कोकणात जाऊ लागला तर कदाचित आबा आणि वहिनींनाही त्याचा लळा लागेल आणि आंब्याची वाडी गावकीला न मिळता अमेयला मिळेल असे वाटते! :)

आपला,
(कोकणी भाऊबंदकीतला!) तात्या.

सुनीलराव, अजूनही अश्या छान छान कथा येऊ द्यात...

आपला,
(कथावाचक) तात्या.

ध्रुव's picture

18 Jan 2008 - 12:07 pm | ध्रुव

लघुकथा वाचताना उत्सुकता हळुहळु वाढत होती. चान जमली आहे.

--
ध्रुव

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jan 2008 - 4:16 pm | प्रकाश घाटपांडे

मपल्याला आमची अन चुलत्यांची झालेली वाटन्या आठवल्या. आमचे आजोबा रामभाउ पाटील गेले आन वायल व्हायची प्रक्रियेला गती आली. त्याची बीज आदुगरच रवली व्हती. गुरांच्या वाटन्याने गुरं गोंधळून गेली. आतापर्यंत एकच गोठा होता.कुत्र्यांच बी वाटप टिप्या , पिल्या आमच्या कं पांड्या , चंपी त्यांच्याकं .त्यांनला बी सुधरना! गड्यांचे वाटप त्यांच्यावरच सोपावल, चंदु , शंकर, मारत्या आमच्याक. रामा, गोईंदा , सहादु त्यांच्या क. वावराचे वाटप- सोंड्या आन बेलशेत आमच्याक आन तेजेगावडी अन अंबरखाना त्यांच्याक. पुन्यातल्या एका चुलत्यांच बी वावार पघायला आमच्याक. वाडा , राममंदिर आमच्याक आन स्ट्यांडवरल नव घर त्यांच्याक. कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक
प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

19 Jan 2008 - 12:39 am | सुनील

कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक

अहो, वकिलांच्या पिढ्या पोसल्यात कोकणातल्या बंधूंनी !!!

कोणीसे (बहुघा पुलंनी) म्हटलेच होते, कोकणातील मूल शाळेच्या पायरी अगोदर कोर्टाची पायरी ओळखायला शिकते! शेताची वाटणी झाली तर, बांधावरच्या झाडावरून पुन्हा कोर्टात जातील!

पण कोकणी माणूस सनदशीर खरा! वर्षानुवर्षे वकिलाला पैसे देईल पण चुकूनही छोट्या-मोठ्या (किंवा मधल्या) डॉनला सुपारी म्हणून देणार नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे मात्र ख्ररय

(भावकीला वैतागलेला) नाना

भडकमकर मास्तर's picture

18 Jan 2008 - 5:20 pm | भडकमकर मास्तर

खूप छान जमली आहे गोष्ट ..... आवडलीच्...अजून लिहा... :)

नीलकांत's picture

18 Jan 2008 - 11:02 pm | नीलकांत

सुनील कथा आवडली हो...

नीलकांत

दिपक's picture

31 Jan 2012 - 2:51 pm | दिपक

एक आवडती कथा वर आणतोय! :-)

सुनील's picture

31 Jan 2012 - 10:17 pm | सुनील

धन्यवाद!

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2012 - 10:39 pm | स्वाती दिनेश

ही गोष्ट निसटून गेली होती वाचण्यातून.
दिपक,तुम्ही खणून वर काढल्याबद्दल धन्यवाद.
सुनीलभाऊ,कथा आवडली.
स्वाती

जाई.'s picture

31 Jan 2012 - 11:43 pm | जाई.

छान

कथा आवडली

पैसा's picture

31 Jan 2012 - 11:49 pm | पैसा

साधी गोष्ट! पण फार छान!