काही नाटकं अशी असतात की जी आपल्या मनात घर करून जातात. आणि नंतरही आपण त्यावर विचार करत रहातो.
असंच एक नाटक पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला, त्याबद्दल हे काही थोडं लिहिलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१९९० सालानंतर समाजात जो एक चंगळवाद फोफावला आहे, त्यावर आडून आडून टिप्पणी करणारं आणि उपहासाने त्याकडे बघणारं हे नाटक म्हणजे "काकासाहेबांची चड्डी".
नाटकाची पार्श्वभूमी - संदेश देऊलकर ह्या नवोदित नाटककाराने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी हे नाटक लिहिलं. संदेशच्या आधीच्या कथा आणि कवितांमधे जी एक विखारी पण फालतू चमक जाणवते, ती ह्याही नाटकात आहे. मेकॅनिक्समधे सतत ३ वेळा के.टी. लागल्याने आपल्याला जे एक वैफल्य आलं, त्या वैफल्याचा खराखोटा सारांश इथे ओतला गेलाय, असं संदेशचं ह्या नाटकाच्या पहिल्या अंकाबद्दलचं मत आहे.
मेवाड कुल्फी खात खात, झिम्बाब्वे विरूद्ध नामिबिया हा सामना बघताना (३२व्या ओव्हरला) ह्या नाटकाची मूळ कल्पना संदेशला सुचली. आणि रात्रभर जागून त्याने ती मायक्रोसॉफ्ट वर्डमधे उतरवली. पायरेटेड कॉपी असलयाने त्याला चिकार त्रास झाला असंही तो म्हणतो.
असं अनोखं नाटक लिहिताना त्याला आलेले अनुभवही नाटकात उतरले आहेत.
हे नाटक समजावून घेणं कलाकारांसाठी अवघड असू शकतं ह्याची संदेशला पूर्ण जाणीव आहे. काकासाहेब ह्या पात्राला ज्या ब्रँडेड चड्ड्यांची आवड आहे, त्या ब्रँडच्या चड्ड्यांची जी काही वैशिष्ठ्यं आहेत, ती माहीती असली तरच त्या ब्रँडमागे धावताना काकासाहेबांची होणारी अगतिक अवस्था समजून येईल. संदेशने नाटकासाठी स्वत: Kalvin Clein, Hockey, ZHanes, Fruit of boom अशा अत्याधुनिक आणि cutting edge वाल्या चड्ड्या सहा महिने वापरून मग काकासाहेबांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. काकासाहेबांचं त्यांच्या चड्ड्यांशी असलेलं एक अतिशय तरल आणि तरीही धुवट नातं मग त्याला आपोआप उलगडत गेला. ह्या अभ्यासाचा कळससाध्य म्हणजे नाटकातलं चड्डीचं स्वगत, पण ते नंतर ओघाने येईलच.
नाटकाची थोडक्यात गोष्ट अशी काहीशी मांडता येईल-
काकासाहेब हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. १९८० सालापासून काकासाहेब वेगवेगळ्या देशांत सरकारी पदांवर काम करीत आहेत. अर्थात त्यांचा पोशाखही तिथलाच असणार- म्हणून मग ते वेगवेगळ्या चड्ड्या "ट्राय" करतात. आणि प्रत्येक चड्डी त्यांना एक अत्यंत मूल्यवान पण खाजगी असा अनुभव देऊन जाते. ह्या अनुभवांतून काकासाहेब जीवनाबद्दल आपली मांडणी पक्की करतात आणि शेवटी- पण नाही, ते तुम्हाला पहावंच लागेल. नाटक संपतं, आणि एक प्रेक्षक म्हणून आपणही चड्डीकडे वेगळ्याच दृष्टीने पाहू लागतो.
कलाकारांचं म्हणाल, तर उत्तम टंगाळे ह्याने काकासाहेबांचं पात्र अक्षरशः जगलेलं आहे. मग ते सुरूवातीचं लाजरंबुजरं वागणं असो, मॉलमधे चड्डी विकत घेताना विक्रेत्याबरोबर झालेला वाद असो किंवा चड्डीच्या रूपाने आपल्याला एक गुरू गवसला आहे हे जाणवल्यानंतरचा साक्षात्कार असो- अशा विविध प्रसंगी उत्तमने सखोल अभिनय करून प्रेक्षकांना गुंगी आणली आहे हे नाकारता येणार नाही. उत्तमनेही संदेशप्रमाणेच ब्रँडेड चड्ड्यांचा कसून अभ्यास केलाय हे सांगायला काऊंटरच्या मागे असायची काहीच गरज नाही.
देशोदेशीच्या चड्ड्यांची माहिती उत्तम अक्षरशः कोळून प्यालाय. काकासाहेब ९४ साली रोमेनियात राजदूत होते तेव्हाची त्यांची पसंद, ९७ सालची मादागास्करची निवड किंवा मग २००४ मधली मलेशियातल्या पोस्टिंगच्यावेळी झालेली गडबड - ह्या सगळ्या काळानुरूप उत्तमने आपला अभिनय बेमालूम वठवला आहे.
पण रूपेश देखणे ह्या नटाने चड्डीच्या रूपात जी काही बहार उडवून दिली आहे त्याला निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी तोड नाही. रूपेशने अभिनय उत्तम केला आहेच, पण संपूर्ण नाटकात एकशे तेवीसवेळा पोशाख बदलण्याचा लिमका रेकॉर्ड त्याच्या नावे दर्ज झाला आहे. ह्या गुणी कलाकाराने सुरूवातीला चड्डीचं काम करावं लागणार म्हणून थयथयाट केला होता, पण संदेशने त्याला भूमिकेची खोली आणि रूंदी समजावून दिल्यावर त्यालाही भूमिका आव्हानात्मक वाटली. रूपेशनेही उत्तम आणि संदेशप्रमाणेच ब्रँडेड चड्ड्यांचा प्रचंड अभ्यास केला.
अर्थात चड्डीचं शेवटलं स्वगत आणि त्यानंतर काकासाहेबांची प्रेक्षकांना उद्देशून केलेली आर्त विनवणी - ह्याबद्दल लिहावंच लागेल.
अलिकडलया नाटकांत गोडगोड गाणी, नाच आणि चुटकुल्यांची फैर झाडलेली दिसते, तसं काहीच इथे दिसणार नाही. वरकरणी अर्थपूर्ण पण संपूर्णतः निरर्थक असलेलं दीर्घ स्वगत ऐकून संगीत नाटकांचे चाहते नक्कीच सुखावतील. काकासाहेबांच्या विनवणीला प्रेक्षक किती धूप घालतात हे प्रेक्षकांच्या वार्डरोबावर अवलंबून असेल.
जागतिकीकरण, ९०नंतर समाजात आलेली भ्रामक गतिशीलता, बाजारीकरण आणि मूल्यांचा ढासळता परीघ अशा अनेक अंगांना स्पर्श करून जाणार्या ह्या नाटकाबद्दल फारसं कुठे छापून आलं नाही, ह्यात नवल ते काय? ह्या कलाकारांची माणूस म्हणूनही ओळख करून द्यायला हवी कारण त्यांनी प्रयोगाआधी अभ्यासासाठी वापरलेल्या चड्ड्या ह्या दान करून टाकल्या आहेत. समाजाला आपण काही देणं लागतो, हे त्यांना पटलंय. नाटकाचे जितके प्रयोग व्हायला हवेत तितके झाले नाहीत, ह्याबद्दल संदेशला खंत जरूर वाटते.
"आज लोकांना सगळं इन्स्टंट हवंय. पण विचार करणारं साहित्य मात्र आम्ही इन्स्टंट देतोय ते नकोय". संदेशला त्याच्या पुढल्या नाटकासाठी शुभेच्छा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नाटक - "काकासाहेबांची चड्डी"
लेखक आणि दिग्दर्शक - संदेश देऊलकर
कलाकार - उत्तम टंगाळेआणि रूपेश देखणे
पार्श्वसंगीत - उत्तम टंगाळे आणि रूपेश देखणे
नेपथ्य आणि प्रकाश - संदेश देऊलकर
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 6:06 am | खेडूत
:)
आवडेश...!
संदेश ला पुढील कलाक्रुतीसाठी सुभेच्चा!
9 Dec 2015 - 6:34 am | चंबा मुतनाळ
अतीशय अभ्यास्पूर्ण परिक्षण. नाटकाचे खेळ मुंबईत लागल्यावर जरूर बघण्यात येइल.
9 Dec 2015 - 6:45 am | मितान
रोचक प्रकरण दिसतंय :)
9 Dec 2015 - 7:45 am | मारवा
सुंदर परीचय आवडला.
जे सर्वात जास्त उपेक्षीत असतं दुर्लक्षलेलं झाकलेलं असतं
त्या ठीकाणीच सर्वात जास्त पोटेन्शीयल असतं याचा पुन्हा प्रत्यय आला.
नाटकाचा सुक्ष्म वेध आवडला.
धन्यवाद
9 Dec 2015 - 8:34 am | दमामि
आवर्जून पहाण्यात येईल, नाटक =))
9 Dec 2015 - 8:59 am | सिरुसेरि
प्रेक्षक - उत्तम टंगाळेआणि रूपेश देखणे
-- इथे असे नाटक प्रत्यक्षात नसावे असे समजून हा प्रतिसाद दिला आहे . खरेच असे नाटक असल्यास सर्वांना शुभेच्छा .
9 Dec 2015 - 11:30 am | मारवा
नाटक समजा वास्तविक सांगितलं तस संदेश यांच आहे तर नाटकं
ते भृशुंडी यांची कल्पनानिर्मीती आहे तर नाट्यमयता अजुन वाढेल
आणि त्यांच्यावर आता अभिरुप न्यायालयात खटला दाखल केला तर
नाट्यमयता अजुन गडदच होणार नाही का ?
सुखात्मे हवेत बस.
बाकी एक मर्डर मिस्टरी वाचण्याची मजा शेवटच्या पानावरुन सुरुवातीच्या पानाकडे अशीही असते..
एक एक दुवा जोडत....
9 Dec 2015 - 11:49 am | बॅटमॅन
ये प्रकार तो भोत रोचक लगरा मियां.