मिरच्यांची भाजी

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
3 Oct 2015 - 8:27 pm

नाव वाचुन काय वाटतंय? कुठल्या मिरच्या? आपल्या तिखट मिरच्या की सिमला मिरच्या/ढोबळ्या मिरच्या की त्या कमी तिखट मोठ्या मिरच्या असतात त्या? नाही म्हणजे ज्या बारक्या हिरव्या मिरच्या ज्या भाजीत किंवा कुठल्याही पदार्थात तिखटपणासाठी घालतात, तर त्याचीच भाजी करायची...हो...त्याचीच, त्याच्यासोबत इतर पदार्थ काय काय ते बघु पुढे...
बुलढाणा जिल्ह्यात ही भाजी म्हणजे लेवा पाटील लोकांची खासीयत. नाकातोंडातुन पाणी येईलच अशी तिखट्ट भाजी आणि सोबत भाकरी, ती कुस्करायची, त्यावर कच्चं तेल घ्यायचं आणि कांदा, लिंबु, टोमॅटो चिरुन घ्यायचे. खास करुन पावसाळ्याच्या दिवसात बर्‍याच ठिकाणी या भाजीच्या पार्ट्या होतात शेतात.
बहुधा खान्देशात यालाच डाळगंडोरी म्हणतात. ही आईने लेवा पाटील लोकांकडुन शिकलेली कृती, फक्त यात मिरच्यांचे प्रमाण मुळ पाकृपेक्षा बरेच कमी केले आहे. ज्यांना आवडतात आणि सहन होतात, त्यांनी ते वाढवल्यास हरकत नाही.

साहित्यः
हिरव्या मिरच्या - ५०-६० ग्रॅम. यातही थोड्या नेहमीच्या तिखट मिरच्या आणि थोड्या एकदम तिखट मिरच्या अशा एकत्र घेऊ शकता.
तूरडाळ - १०० ग्रॅम
आंबट चुका - १ जुडी / १ पाव
२-३ मोठे कांदे - बारीक चिरुन
जाडसर दाण्याचा कुट - पाव वाटी
किसलेले सुके खोबरे - पाव वाटी
८-१० लसूण पाकळ्यांची पेस्ट
थोडंसं आलं किसुन
गरम मसाला - १ चमचा
मीठ चवीनुसार

कृती:
तुरीच्या डाळीला थोडे तेल लावुन + मिरच्यांचे तुकडे करुन हे कुकरमध्ये एकत्र शिजवुन घ्यायचे.
आंबट चुका कुकरमध्ये वेगळा शिजवुन घ्यायचा.

तेल तापवुन उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भरपुर परतुन घ्यायचा. आता शिजलेल्या डाळीत चुका घालायचा, त्यातच खोबर्‍याचा कीस, जाडसर दाण्याचा कुट, परतलेला कांदा आणि मीठ हे सगळे साहित्य घालुन व्यवस्थित मिसळुन घ्यावे. हे सगळे मिसळताना मुख्य काळजी ही घ्यायची की या भांड्यावर सतत झाकण ठेवायचे, म्हणजे त्या मिरच्यांचा स्वाद तसाच राहतो.

तेल गरम करुन फोडणीत हळद, लसूण पेस्ट घालुन परतायचे. मग किसलेलं आलं आणि हे वरचे मिश्रण घालावे. थोडी उकळी आली की गरम मसाला घालावा आणि झाकण ठेवुन परत उकळी आणावी. मिरच्यांची भाजी तयार आहे.

.

एकीकडे भाकर्‍या करायच्या, कांदा, लिंबु, टोमॅटो चिरायचे. पसरट थाळीत ही भाजी घ्या, त्यावर भाकरी कुस्करा, हवं असल्यास कच्चं तेल घ्या, लिंबु पिळा आणि करा सुरुवात.

.

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Oct 2015 - 8:34 pm | चांदणे संदीप

नाव ऐकलय पण खाल्ली नव्हती कधी!

नव्या सांगवीत पोलीस स्टेशनजवळ "ग्राहक" नावाचे मस्त हॉटेल आहे तिथल्या मेनूत 'मिरची भाजी' असे समोरच्या मोठ्या बोर्डावर लिहिले आहे, ती हीच काय?? कुणाला माहिती आहे का इथे?? हीच असल्यास एकदा नक्की ट्रायली जाईल!! ;)

उगा काहितरीच's picture

4 Oct 2015 - 1:34 am | उगा काहितरीच

आम्ही ग्राहकचे अनियमीत ग्राहक ! तुम्ही याच भागात आहात काय ?

चांदणे संदीप's picture

4 Oct 2015 - 7:20 am | चांदणे संदीप

मी पण "ग्राहक"चा अनियमित ग्राहक आहे!

नुकताच चिखलीकराचा मोशीकर झालोय! :)

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2015 - 3:16 am | मधुरा देशपांडे

ग्राहक बद्दल माहिती नाही. ट्राय करुन बघा आणि या वर्णनाशी जुळते का ते बघा. :)

यशोधरा's picture

3 Oct 2015 - 8:55 pm | यशोधरा

खल्लास फोटो!

मांत्रिक's picture

3 Oct 2015 - 9:07 pm | मांत्रिक

मस्तच अनवट पाकृ!!!

त्रिवेणी's picture

3 Oct 2015 - 9:26 pm | त्रिवेणी

मस्त ग.
माझी पद्धत थोड़ी वेगळी आहे लिहिन सावकाश.आता हिवाळा सुरु झाला की मी करेन.

पियुशा's picture

3 Oct 2015 - 10:02 pm | पियुशा

मस्त दिस्तेय भाजी झणझणीत

अजया's picture

3 Oct 2015 - 10:44 pm | अजया

झणझणीत पाकृ!

श्रीरंग_जोशी's picture

3 Oct 2015 - 10:59 pm | श्रीरंग_जोशी

माझे एक काका नोकरीनिमित्त मलकापूरमध्ये काही वर्षे होते त्यांच्याकडून या भाजीबद्दल ऐकले होते.

पाककृती मात्र प्रथमच वाचायला मिळाली.

प्रयोग म्हणून एकदा बनवून पाहीन ;-) .

भुमी's picture

3 Oct 2015 - 11:04 pm | भुमी

वेगळीच भाजी!

पैसा's picture

3 Oct 2015 - 11:20 pm | पैसा

खासच दिसतेय! करायची हिंमत करू काय?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा

मल्कापुरलाच आमच्या मित्राकडे भर थंडीत ही भाजि सलग दोन दीवस खाली होती .पण नंतर त्रास जाला होता! ;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:24 am | टवाळ कार्टा

दोन दिवसांच्या मध्ये त्रास नै झाला? =))

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 12:28 am | प्यारे१

जनरली पाकृ सोमवारी टाकल्या जातात टीआरपी साठी.
ही पाकृ वीकेंड ला का टाकली गेली असेल बरे????

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:31 am | टवाळ कार्टा

खिक्क...तब्येतीत खावी लागत असेल म्हूण

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2015 - 3:24 am | मधुरा देशपांडे

सलग दोन दिवस.....??? तिही मलकापुरात म्हणजे सॉलिड तिखट असणार...मग त्रास होणारच. ;)
ही वरची फोटोतली खूपच माइल्ड व्हर्जन आहे. आणि लोकांना यापेक्षा तिखट भाजी नुसती पिताना पाहिले आहे..पण तिथे नेहमीचे खाणारेच हवेत..
बादवे गुर्जी तुमच्या खास कवितांच्या प्रेरणेत हेही एक कारण का हो?? ;) :))) कृ.ह.घ्या.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:42 am | टवाळ कार्टा

"कारण" नै..."प्रेरणा" म्हणतात त्याला =))

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2015 - 12:14 pm | मधुरा देशपांडे

तेच रे ते...;) अनेक प्रेरणांपैकी ही एक असे म्हणायचे होते. :)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:20 pm | टवाळ कार्टा

बाकी प्रेरणा वेग्ळ्या...ही आदीम प्रेरणा झाली =))

सानिकास्वप्निल's picture

3 Oct 2015 - 11:42 pm | सानिकास्वप्निल

मस्तं, एकदम झणझणीत पाककृती :)
फोटो छान आहेत.

या भाजीबद्दल आधी कधी ऐकले नव्हते. नवीन प्रकार वाटतोय. प्रकाशचित्र छान आलेय.

विवेकपटाईत's picture

4 Oct 2015 - 10:41 am | विवेकपटाईत

मस्स्त करून बघेन (?) सौ. कडून करवून घेईन

स्वाती दिनेश's picture

4 Oct 2015 - 11:49 am | स्वाती दिनेश

एकदम झणझणीत!
छान दिसतेय, भाकरी पण केलेल्यास?
(बादवे= आता फ्राफुत स्पाइसलँड मध्ये ज्वारी व बाजरीचे पीठ मिळायला लागले आहे.)
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2015 - 12:12 pm | मधुरा देशपांडे

अगं नाही इथे नाही केली भाजी. भारतात असताना आईने केलेली तेव्हाचे फोटो आहेत. इथे आंबट चुका नाही ना मिळत. :(

देशपांडे मॅडम. भाजी एक नंबर जमेश. भारीच.
कडक भाकरी पाह्यजे ह्याच्यासंगत. अहाहाहाहाहा.

पद्मावति's picture

4 Oct 2015 - 2:29 pm | पद्मावति

आहा...मस्तं चटपटीत पाककृती.
आवडली.

चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू's picture

4 Oct 2015 - 2:43 pm | चिमणराव वरवंटे ...

आमच्या बुलढाणा जिल्हात बहुधा गावातल्या छोट्या छोट्या पार्ट्यामध्ये वा अतिथी आल्यावर कार्यक्रमांमध्ये भाकर अन मिरच्यांची भाजी हाच प्रसिध्द मेनू आहे.....जबरदस्त तिखट ....

नूतन सावंत's picture

6 Oct 2015 - 1:46 pm | नूतन सावंत

मधुरा,झकास पाककृती.नक्कीच करून पाहीन.

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:32 pm | दिपक.कुवेत

पण फोटो तेवढा टेम्टींग नाहि.

माहितगार's picture

7 Oct 2015 - 3:55 pm | माहितगार

भाजी प्रत्यक्षात फोटूतल्या प्रमाणेच दिसते, पण आंबुस आणि झणझणीत तिखट चालत असेल तर फोटोवर जाऊ नका, बाकी प्रकार करुन खा/पिऊन पहावी असा चविष्ट आहे !

अनन्न्या's picture

7 Oct 2015 - 7:18 pm | अनन्न्या

पण एवढा तिखट नाही खाऊ शकणार, मिरच्या थोड्या कमी घेऊन करीन.

आरोही's picture

10 Oct 2015 - 10:28 pm | आरोही

ho yalach day gandori mhantat....sahich disatey...ata karavi lagel khup diwasat keli nahiye

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Oct 2015 - 8:29 am | कैलासवासी सोन्याबापु

मिरच्यांची भाजी, ताकातली घोळ, आंबटचुका किंवा अंबाड़ी ची बेसन पेरून केलेली भाजी ह्या काही सिग्नेचर डिशेज़ आहेत अकोला अमरावती वाशीम बुलडाणा यवतमाळ कडल्या वर्हाड़ स्पेसिफिकली

विवेकपटाईत's picture

11 Oct 2015 - 10:01 am | विवेकपटाईत

भाजी आवडली. आमची सौ. तिथलीच आहे, त्या मुळे भरपूर तिखट भाज्या घरात खायला मिळतात.

सस्नेह's picture

11 Oct 2015 - 7:16 pm | सस्नेह

आमच्याकडे याला डाळमिरची म्हणतात. मिरच्या कोवळ्या हव्यात मात्र.

सप्तरंगी's picture

4 Jan 2016 - 7:00 pm | सप्तरंगी

मस्त, करून बघायला आवडेल पण आंबट चुका नाही मिळत, पालक+आमचुर वापरून करून बघते.