मिरच्यांची भाजी
नाव वाचुन काय वाटतंय? कुठल्या मिरच्या? आपल्या तिखट मिरच्या की सिमला मिरच्या/ढोबळ्या मिरच्या की त्या कमी तिखट मोठ्या मिरच्या असतात त्या? नाही म्हणजे ज्या बारक्या हिरव्या मिरच्या ज्या भाजीत किंवा कुठल्याही पदार्थात तिखटपणासाठी घालतात, तर त्याचीच भाजी करायची...हो...त्याचीच, त्याच्यासोबत इतर पदार्थ काय काय ते बघु पुढे...
बुलढाणा जिल्ह्यात ही भाजी म्हणजे लेवा पाटील लोकांची खासीयत. नाकातोंडातुन पाणी येईलच अशी तिखट्ट भाजी आणि सोबत भाकरी, ती कुस्करायची, त्यावर कच्चं तेल घ्यायचं आणि कांदा, लिंबु, टोमॅटो चिरुन घ्यायचे. खास करुन पावसाळ्याच्या दिवसात बर्याच ठिकाणी या भाजीच्या पार्ट्या होतात शेतात.
बहुधा खान्देशात यालाच डाळगंडोरी म्हणतात. ही आईने लेवा पाटील लोकांकडुन शिकलेली कृती, फक्त यात मिरच्यांचे प्रमाण मुळ पाकृपेक्षा बरेच कमी केले आहे. ज्यांना आवडतात आणि सहन होतात, त्यांनी ते वाढवल्यास हरकत नाही.
साहित्यः
हिरव्या मिरच्या - ५०-६० ग्रॅम. यातही थोड्या नेहमीच्या तिखट मिरच्या आणि थोड्या एकदम तिखट मिरच्या अशा एकत्र घेऊ शकता.
तूरडाळ - १०० ग्रॅम
आंबट चुका - १ जुडी / १ पाव
२-३ मोठे कांदे - बारीक चिरुन
जाडसर दाण्याचा कुट - पाव वाटी
किसलेले सुके खोबरे - पाव वाटी
८-१० लसूण पाकळ्यांची पेस्ट
थोडंसं आलं किसुन
गरम मसाला - १ चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
तुरीच्या डाळीला थोडे तेल लावुन + मिरच्यांचे तुकडे करुन हे कुकरमध्ये एकत्र शिजवुन घ्यायचे.
आंबट चुका कुकरमध्ये वेगळा शिजवुन घ्यायचा.
तेल तापवुन उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भरपुर परतुन घ्यायचा. आता शिजलेल्या डाळीत चुका घालायचा, त्यातच खोबर्याचा कीस, जाडसर दाण्याचा कुट, परतलेला कांदा आणि मीठ हे सगळे साहित्य घालुन व्यवस्थित मिसळुन घ्यावे. हे सगळे मिसळताना मुख्य काळजी ही घ्यायची की या भांड्यावर सतत झाकण ठेवायचे, म्हणजे त्या मिरच्यांचा स्वाद तसाच राहतो.
तेल गरम करुन फोडणीत हळद, लसूण पेस्ट घालुन परतायचे. मग किसलेलं आलं आणि हे वरचे मिश्रण घालावे. थोडी उकळी आली की गरम मसाला घालावा आणि झाकण ठेवुन परत उकळी आणावी. मिरच्यांची भाजी तयार आहे.
एकीकडे भाकर्या करायच्या, कांदा, लिंबु, टोमॅटो चिरायचे. पसरट थाळीत ही भाजी घ्या, त्यावर भाकरी कुस्करा, हवं असल्यास कच्चं तेल घ्या, लिंबु पिळा आणि करा सुरुवात.
एकीकडे भाकर्या करायच्या, कांदा, लिंबु, टोमॅटो चिरायचे. पसरट थाळीत ही भाजी घ्या, त्यावर भाकरी कुस्करा, हवं असल्यास कच्चं तेल घ्या, लिंबु पिळा आणि करा सुरुवात.
वाचन
18706
प्रतिक्रिया
37