नाकतोडा......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Aug 2015 - 12:28 pm

नाकतोडा......

मी लहान होतो, म्हणजे असेन सात आठ वर्षांचा. त्यावेळेस माझ्या आजोबांकडून पंचतंत्रातील गोष्टी ऐकताना मी अगदी त्यात रंगून जात असे. माझे आजोबा मला नुसतेच गोष्टी सांगून थांबत नसत तर त्या गोष्टींचे तात्पर्य अगदी तपशीलात जाऊन सांगत असत. अर्थात मला त्यात काही विशेष रस नसे.

यातील एक गोष्ट मला चांगलीच लक्षात राहिली होती ती म्हणजे ‘नाकतोडा व मुंगी’ ही गोष्ट. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे आजोबा या गोष्टीचे तात्पर्य सांगताना त्यांच्याच आयुष्यातील घटना सांगत. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ कसे रसाळ असते, त्याला पर्याय का नाही, जे कष्ट करत नाहीत त्यांची अवस्था पुढे काय होते हे अगदी आमच्या घरातील उदाहरणे देऊन ते पटवून देत. तुम्हाला सगळ्यांना अर्थातच ही कथा माहिती असेलच. पण परत एकदा ती सांगायला मला संकोच वाटत नाही...

एक नाकतोडा असतो. स्वच्छंदी, आनंडी, उडाणटप्पू. त्याचा दिवस समेवर यायचा तोच मुळी गाण्याने व मावळायचा मोदगाण्यांनी. दु:ख, त्रास, विचार, चिंता असल्या फालतू गोष्टीं त्याच्या मनास स्पर्षही करीत नसत. सूर्याची किरणे फाकली की एखाद्या गवताच्या पात्यावर हात जोडून सूर्याची कवने गात आनंदाने दिवस व्यतीत करायचा, हेच त्याने त्याचे कर्तव्य मानले होते व ते तो इमानेइतबारे पार पाडत असे. त्याच गवताच्या मुळाशी, जमिनीवर मात्र वेगळेच चित्र दिसत असायचे. तेथे एक मुंगी कष्टाने थंडीसाठी अन्नाच्या कणांची जुळवाजुळव करत अन्नाची बेगमी करुन ठेवे. मग हिवाळा आला आणि जग गारठले. अन्न आणि सूर्याची उब दोन्ही गोष्टी दुर्मिळ झाल्या. फारच पंचाईत झाल्यावर नाकतोडा मुंगीच्या दारासमोर आला व अन्नाची भीक मागू लागला. मुंगी चिडून म्हणाली,

‘‘तू उन्हाळ्यात काय करीत होतास ? आता भीक मागतोस ते ?’’

‘‘मी दिवस रात्र आनंदाने स्वच्छंदपणे गात होतो’’

‘‘ अच्छा ! गाणी गात होतास काय !....मग आता येथून चालता हो आणि नाच !’’

गोष्टीतील त्या मुंगीप्रमाणे माझे आजोबाही खूप कष्टाळू, प्रामाणिक. आयुष्यभर कष्ट करीत, एकेक पै जोडत त्यांनी स्वत:चे छोटेसे साम्राज्य उभे केले. जमलेल्या पैशातून हवेली बांधली जी आता पंचक्रोशीत बामणाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर शेतीवाडी, त्यातील बरिचशी बागायती, त्यामुळे पुढची पिढी शिक्षणासाठी बाहेर पडली त्यात नवल ते काय... आजोबा आता तीच गोष्ट त्यांच्या नातवंडांना सांगतात... पण मला मात्र या गोष्टीचे तात्पर्य किती धुसर आहे हे काही दिवसांपूर्वीच कळले....

आजोबा जेव्हा मला ही गोष्ट सांगायचे तेव्हा ते काही उदाहरणे द्यायचे. त्यातील एक हमखास आमच्या वडिलांच्या धाकट्या काकांचे (आजोबांच्या या भावाला आमच्या घरात सगळे काकाच म्हणायचे) असायचे. हे माझ्या आजोबांपेक्षा १ मिनिटाने लहान होते. दोघेही दिसायला एकदम सारखे. एकाला लपवायचे आणि दुसऱ्याला काढायचे इतके दोघात साम्य ! त्यांचे नाव शिवरामपंत. माझ्या आजोबांचे नाव केशवराव. गावातील केशवरायाचे देऊळ यांनीच बांधले आहे. जेवढे केशवराव साधे सरळ, कष्टाळू तेवढेच शिवरामपंत उद्योगी. याची टोपी त्याला घाल, याच्याकडून पैसे उसने घेऊन पहिले कर्ज फेड हा त्यांचा आवडता धंदा. आमच्या वाड्याच्या बाहेरच आमच्या आजोबांनी त्यांना एक खोली बांधून दिली होती. तेथे ते व त्यांचे मित्र गाणेबाजावणे करीत. त्यांचा आवाज मात्र चांगला होता, व संगिताची त्यांना चांगलीच जाण होती असे आजोबा म्हणत. पण दोन वेळा गिळायला घरी यायचे व उरलेला वेळ गावभर उडाणटप्पूपणा करत फिरायचे हा आवडता छंद. संध्याकाळी खोलीत परतले की मैफिल जमवायची. शिवरामपंत दिसायला रुबाबदार, त्यांच्या बोलण्यात व व्यक्तिमत्वात काय जादू होती कोणास ठाऊक. पहिल्यांदा नकार देणारे शेवटी त्यांना पैसे उसने द्यायचेच. कित्येक लोकांनी त्यांच्या बोलण्याला भुलून पैसे सोडूनही दिले होते. शिवरामपंतांकडे स्त्रियांची सहानुभूती खेचण्याची अविश्र्वसनीय ताकद होती. त्याचाही वापर ते पैसे उसने मागताना करायचेच. अशा माणसाचे उदाहरण आमचे आजोबा आम्हा मुलांस नेहमी देत. शेवटी शिवरामपंतास अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मरण आले. त्याचेही उदाहरण आमचे आजोबा नेहमी देत. आमच्या अजोबांना कष्टाचे व्यसन होते तर शिवरामपंतांना पैसे उसने मागायचे.

‘‘शिवरामपंतांसारखे मरायचे आहे काय तुम्हाला ?’’ हा प्रश्न आम्ही किती वेळा ऐकला असेल त्याची गणतीच नाही.
मुंगी का नाकतोडा ? केशवराव का शिवरामपंत ? थोडक्यात हाच प्रश्न असे. अर्थात ज्या सुबत्तेत आम्ही लोळत होतो ते बघता कोण शिवरामपंतांची बाजू घेईल ?

आजोबा गेले त्यावेळी आम्ही पुण्यात होतो. कधीकधी गावाकडेही जायचो. नंतर हळुहळु गावी जाणे कामापुरतेच राहिले. आजोबांनी गावतील शाळेसाठी त्याकाळात डिपॉझिट मोडून देणगी दिली होती त्यामुळे आमच्या घराण्यातील कोणी ना कोणीतरी शाळेच्या संचालक मंडळावर असतेच. वर्षातून एकदा वार्षिक सभारंभाला कोणाला तरी जावे लागते. या वर्षी वडील दिल्लीला गेले असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मीही थोडीशी अनिच्छेनेच ती स्वीकारली. गावात ब्राह्मणाने जावे असे वातावरण आता उरले नव्हते हे एक महत्वाचे कारण होतेच. पण माझे काही मित्र अजूनही तेथे असल्यामुळे शेवटी जायचे ठरले. दुर्दैवाने काही कारणामुळे हा समारंभ रद्द झाला. आता दिवसभर काय करायचे या विवंचनेत असताना एक गृहस्थ म्हणाले,

‘‘चला मी तुम्हाला तुमच्या आजोबांच्या मित्राकडे सोडतो. वय झालेय त्यांचे पण म्हातारा अजून खणखणीत आहे. शेतावर अजूनही चक्कर मारल्याशिवाय दिवस जात नाही त्याचा.... संध्याकाळी जेवण आमच्याकडे आहे हे विसरु नका....’’
तात्यांच्या शेतावर पोहोचलो तेव्हा सकाळचे ११ वाजले होते. उन मी म्हणत होते. शेतावर असलेल्या घरासमोर लोखंड्यांनी त्यांची बुलेट लावली. गाडीचा आवाज ऐकून एक मुलगा बाहेर आला.

‘‘कुठे आहेत रे तात्या ?’’

‘‘शेतावरच्या चिंचेखाली बसलेत’’

‘‘बरं आम्ही जातो तिकडे. आईला सांग तिकडे चहा पाठवायला’’

‘‘हां ! सागतू की ! काका म्या घेऊन येऊ का ? अभ्यासाचा लय कटाळा आलाय !

‘‘बरं सांग आयेला मी सांगितलय म्हणूनशान !’’

हे ऐकताच ते पोरग घरात धूम पळालं. आम्ही हसत हसत बांधाची चिंच गाठली. चिंचेखाली गार सावलीत एका बाजेवर तात्या पहुडले होते. त्यांचे पाय चांगले फुटभर बाजेबाहेर आले होते... यांची उंची होती तरी किती ? सहा तर निश्चितच असावी, मी मनाशी म्हटले.

‘‘तात्या ओ तात्या ! उठा की ! बघा तरी कोण आलंय !’’

तात्या उठले. मुंडासे डोईवर ठेवले. त्यांचे किलकिले डोळे अधिकच किलकिले होत सुरकुत्यात लपले. उंची असेल सहाफुट तीनचार इंच. काटक शरीरयष्टी, पांढऱ्या झुबकेदार मिशा, कपाळावर उभे गंध. ते उठून उभे राहिले व त्यांनी शेजारची काठी हातात घेतली. पांधरे शूभ्र कपडे. उभे राहिल्या राहिल्या त्यांच्या पायातील वहाणा कुरकुरल्या. चिंचेचे आणि त्यांचे वय एकच असावे बहुदा....
मी त्यांच्या पायाला हात लावला पण त्यांच्या नजरेत ओळख दिसेना.

‘‘कोण म्हणायचा तू ?’’

‘‘तात्या तुमच्या दोस्ताचा, बामणाचा नातू हाय हा !’’ लोखंडे

‘’केशवाचा नातू का ?’’

‘‘हो तात्या !’’
असे म्हणून मी बाजेवर बूड टेकवले.

‘‘तात्या तुम्ही मारा गप्पा याच्याशी. मी चा पाठवतो.’’

‘‘ म्या आता संध्याकाळीच येतो. दुपारी तू तात्यांकडेच जेव. काय ? ते काय तुला आता जेवल्याबिगर सोडणार नाहीतच.’’ ते ऐकताच तात्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली.

‘‘आता राहील तो दोनचार दिवस. काय रं ? काय नाव तुझं?’’
लोखंडेचा निरोप घेऊन मी म्हटले , ‘‘केशव ! तात्या’’

‘‘आजोबांचच नाव ठेवलं जणू !’’ असे म्हणून त्यांनी एक सुस्कारा सोडला.

‘‘तात्या, तुमची आणि आमच्या दोन्ही आजोबांची फार दोस्ती होती असे ऐकून आहे. खरे आहे का ?

‘‘अरं बाबा दोस्ती म्हंजे काय सांगू तुला ? आम्ही माळी ते बामण पण आम्ही सतत साथ साथ फिरत असू. ते दोघेही माझ्यासारखच उंच...समदे घाबारायचे आम्हाला.’’

‘‘तात्या अजून काय काय आठवतंय तुम्हाला ? सांगा की जरा आठवणी.’’

‘‘काय काय सांगू बाबा ? जरा चाचं बघ अगुदर, मग बसू गप्पा हाणत’’

मी घाईघाईने घराकडे निघालो तेवढ्यात ते मगाचं पोरग चहा घेऊन येताना दिसलं. त्याच्या हातातून चहा घेत मी त्याला घराकडे पिटाळले व तात्यांपाशी आलो. चहाचा पेला त्यांच्या हातात देऊन आम्ही दोघेही चहाचा आस्वाद घेऊ लागलो. तात्या शब्दांची जुळवाजुळव करत आहेत असे मला उगीचच वाटून गेले.

‘‘केशवाला गप्पा हाणण्याचे भयंकर वेड. गप्पांचा फड जमवावा तर त्यानेच. त्याच्याउलट शिवरामाला गाणे बजावण्याचे वेड... माझे मात्र एकच काम असायचे ते म्हणजे त्यांची भांडणे सोडवणे.... शिवरामाला पैसे उसने मागण्याचा भयंकर नाद होता. कित्येकदा प्रकरण हातघाईवर यायचे मग केशव चिडचीड करायचा व पैसे फेडायचा. फारच मारामारी झाली तर मग म्या ते सांभाळायचो...’’

‘‘आमच्या आजोबांना गोष्टी सांगायचाही फार नाद होता ना तात्या ?’’

‘‘अरे बाबा त्यांच्या गोष्टी ऐकून या गावातील पिढ्या लान्हाच्या मोठ्या झाल्यात नव्हं !.’’

‘‘पण मग शिवरामपंतांचे काय ?’’

‘‘हंऽऽऽ जाउदेत...’’

‘‘प्रत्येक घरात असा एखादा निपजतोच. आता आमचा पोरगा नाही का वाया गेला ? चालायचच ! शिवरामपंताची देणी भागवता भागवता केशवाच्या तोंडाला फेस आला. एकदा मी केशवाला पारावर गाठले तेव्हा तो उदास होऊन बसला होता. मी ओळखले शिवरामपंताची काहीतरी नवीन भानगड दिसतेय. म्या विचारले, ‘काय रं आता काय झालं ? काय केलं त्यानं ? मी सांगतो केशवा आता बास झालं. त्याला आता समज दे किंवा बाहिरचा रस्ता दाखव. दोन फटके खाल्ली की येईल वठणीवर. नाहीतर लगीन लाऊन दे.’’

‘‘नको रे बाबा, तिचीही फरफट होणार...नकोच ते...’’

‘‘तात्या मी येथे मरमर मरतोय, याची देणी फेडतोय याचे त्याला कसेच काही वाटत नाही ? त्याचे कसे मस्त चालले आहे बघ. मी तर परवा ऐकले की तो दारूही पितो.... ते जाऊ देत. गणप्या सांगत होता की त्याने मुंबईला एक बाई ठेवली हाय म्हणून. आता तिलाही टोपी घालणार हा....मग मात्र माझी आब्रू वेशीला टांगली जाणार....नाही तात्या मरतोच मी आता....’’

‘‘आरं नको आसं वंगाळ बोलू...मी बोलतो त्याच्याशी.....’’

हे आमचे बोलणे झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवराम माझ्याकडे पैसे मागायला आला....त्याला मुंबईला जायचे होते म्हणं. खोदून खोदून विचारल्यावर म्हणाला की त्याची बाई मरायला टेकली हाय....तिच्याशी लगीन करायचे हाय... लई श्रीमंत हाय... ती मेल्यावर सगळ्यांचे पैसे फेडणार मी...पण आत्ता पैसे दे....वकीलाचा खर्च करावा लागेल की नाय ?’’

केशवाला विचारुन द्यावे असा विचार करुन म्या केशवाला समदं सांगितलं. केशवाने मात्र त्यावेळेस जबाबदारी झटकली... म्हणाला की तो काही जबाबदार राहणार नाही....या बारा पारावरच्या मुंजाला कोण पैसे देणार ?’
दुसऱ्या दिवशी केशव नाहीसा झाला. कोणी म्हणे शिवरामाच्या देण्याला कंटाळून त्याने गाव सोडले. कोणी म्हटले लोक मारायला उठल्यावर काय करणार बिचारा.... शिवरामही पश्चत्ताप झाल्यासारखा वागू लागला. त्याचे जगण्यातले लक्षच उडाले. खंगत त्यानेही सहा महिन्यात प्राण सोडला. कोणी म्हणे त्याला क्षय झाला होता तर कोणी म्हणे दुसराच कुठलातरी रोग....

सहा महिन्याने केशव गावात उगवला तो एका जुन्या फोर्ड गाडीतून. सगळे अचंबित होऊन पहात राहिले. संध्याकाळी पारावर जमल्यावर त्याने सांगितले की एका बाईने मरण्याआधी तिची सारी संपत्ती त्याच्या नावावर केली होती.... सगळे केशवाच्या नशिबाचा हेवा करत घरी परतले... मी त्याच्या डोळ्यात रोखून पाहिले...पण त्यानं काही माझ्या नजरंस नजर भिडवली नाही.’’

हे मला कोणालातरी तरी सांगायचे होतेच. बरे झाले तू आलास...पण ऐकले तसे सोडून दे ! मीही आता मोकळा झालो.....’’

तात्या मोकळे झाले, पण मी अडकलो. आमच्या संपत्तीचे, ऐश्वर्याचे मूळ कशात आहे हे कळल्यावर माझ्या मनात नेहमी एक प्रश्न उभा राहतो... मुंगी का नाकतोडा.....?

मला तरी या प्रश्नाचे उत्तर अजून सापडत नाही.......कोणाला माहीत असेल तर सांगा..

जयंत कुलकर्णी.
स्वैर अनुवाद : सॉमरसेट मॉमच्या The Ant and the Grasshopper या कथेचे.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

25 Aug 2015 - 12:52 pm | वेल्लाभट

क्या बात है ! अतिशय खिळवून ठेवलं या गोष्टीने...
खूपच छान !

संदीप डांगे's picture

25 Aug 2015 - 12:54 pm | संदीप डांगे

खूप सुंदर. अगदी वेगळी कथा. तुमचे लेखन इतके छान की मुळीच अनुवाद वाटला नाही.

एक कोटसदृश्य आठवले यानिमित्ताने ते काहीसे असे आहे की: "त्यांच्या वडीलांनी त्याला सांगितले की लवकर निजे लवकर उठे त्याला धनधान्य संपत्ती लाभे. आमच्या वडीलांनी सांगितले, मस्त सूर्य डोक्यावर आला की आळोखे पिळोखे दे उठावे, मग शांतपणे दुपारनंतर बाजारात जाऊन ज्यांनी सकाळपासून मरमर करून पैसा कमावलाय तो घेऊन यावा."

उगा काहितरीच's picture

25 Aug 2015 - 1:07 pm | उगा काहितरीच

वेगळ्या धाटणीची कथा, आवडली !

मोहनराव's picture

25 Aug 2015 - 1:08 pm | मोहनराव

गोष्ट आवडली.

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 1:09 pm | पगला गजोधर

दोघेही दिसायला एकदम सारखे. एकाला लपवायचे आणि दुसऱ्याला काढायचे इतके दोघात साम्य !

हे वाचले, त्यावेळी मनाच्या कोपर्यात, घंटी किणकिणली …
असो छान स्वैरअनुवादित कथा, मजा आली वाचताना.

खटपट्या's picture

25 Aug 2015 - 1:10 pm | खटपट्या

खूप छान कथा आणि अनुवाद..

पद्मावति's picture

25 Aug 2015 - 1:31 pm | पद्मावति

फारच मस्तं कथा. आवडली.

खूप आवडली कथा.अनुवाद वाटलाच नाही.नेहेमीप्रमाणे सुरेख लिहिलेत.

खेडूत's picture

25 Aug 2015 - 4:14 pm | खेडूत

नेहेमीप्रमाणेच...

द-बाहुबली's picture

25 Aug 2015 - 4:11 pm | द-बाहुबली

:) प्रेस्टीज.

gogglya's picture

25 Aug 2015 - 4:31 pm | gogglya

Behind every success there is crime! हे असेच आठवले कथा वाचल्यावर.

चलत मुसाफिर's picture

25 Aug 2015 - 4:54 pm | चलत मुसाफिर

Behind every fortune there is a great crime असं म्हणतात.

कपिलमुनी's picture

27 Aug 2015 - 5:26 pm | कपिलमुनी

"Behind every great fortune there is a crime."

मृत्युन्जय's picture

25 Aug 2015 - 4:36 pm | मृत्युन्जय

कथा मस्तच. अगदी याच नावाची आणि अश्याच सुरुवातीची (आणि बहुधा सॉमरसेट मॉमचीच) दुसरी कथा वाचली आहे. मात्र त्यात शेवट मजेशीर आणि वेगळा होता. ती कथा खाली दिलेल्या लिंकवर वाचता येइलः

https://sites.google.com/site/edfabra/home/excerptreviewsstoriespoems/wi...

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2015 - 4:54 pm | जयंत कुलकर्णी

अहो त्याचेच रुपांतर आहे हे....तसे लिहिले आहे ना शेवटी...

मृत्युन्जय's picture

27 Aug 2015 - 5:09 pm | मृत्युन्जय

माफ करा पण स्वैर अनुवादात कथाबीज बदलण्याचे स्वातंत्र्य नसते. मूळ कथेत धाकट्या भावाचे त्या म्हातारीबरोबर लग्न होते आणि त्याच्या हाती ती मेल्यावर घबाड लागते आणि मोठ्या भावाला याचेच जास्त दु:ख होते की आयुष्यभर सदाचारणी राहुनही अखेर त्याच्या हाती तुटपुंजी संपत्ती आली आणि गुलछबु धाकट्या भावाला घरबसल्या घबाड मिळाले. त्या कथेचा शेवट विनोदी होता. या कथेचा करुण आहे,

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 5:38 pm | जयंत कुलकर्णी

पण या कथेचे बीज नाकतोडा का मुंगी हे आहे असे मला वाटते म्हणून म्हटले. नाकतोड्यासारखे वागून जो तसे वागला त्याचा फायदा झाला आणि जे मुंगीसारखे वागला त्याच्या पदरात काहीच पडले नाही हे कथेचे बीज आहे असे मला वाटले... :-)

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 5:43 pm | जयंत कुलकर्णी

मी काय केले माहिती आहे का ? जरा मूळ मुद्द्याला हात घातला म्हणून नाट्य त्यात घातले.... म्हणजे बघा मुंगीसारखे वागून भावाएवढा फायदा होणार नाही हे उमगताच त्याने आपला पवित्रा बदलला... पण आपण हे वाचलेत व एवढा विचार केलात त्याबद्दल धन्यवाद !

चलत मुसाफिर's picture

25 Aug 2015 - 4:52 pm | चलत मुसाफिर

पण 'काका आजोबांपेक्षा एका मिनिटाने लहान होते' हे कसे काय?

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2015 - 4:55 pm | जयंत कुलकर्णी

ते जुळे होते असा अर्थ आहे त्याचा...

चलत मुसाफिर's picture

25 Aug 2015 - 4:57 pm | चलत मुसाफिर

काका हे आजोबांचे जुळे भावंड कसे असतील?

खेडूत's picture

25 Aug 2015 - 6:32 pm | खेडूत

चुलत अजोबा हो!

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2015 - 5:03 pm | जयंत कुलकर्णी

गोंधळ लक्षात आला....आता बघा बरे, ठीक वाटते आहे का ते ?

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 5:44 pm | जयंत कुलकर्णी

खेडूत दुरुस्त केलेले वाचलेत का ?

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 5:13 pm | स्वामी संकेतानंद

झकास कथा! अनुवाद आहे असे अजिबात वाटले नाही. आधी वाटले की खराखुरा किस्साच सांगत आहात.

तिमा's picture

25 Aug 2015 - 5:26 pm | तिमा

कथा आवडली. पण हल्लीच्या जगांत, मुंगीच मूर्ख ठरते. ती कशी, हे सांगणारे मूळ कथेचे विडंबनही चांगलेच प्रसिद्ध आहे.

अभ्या..'s picture

25 Aug 2015 - 5:29 pm | अभ्या..

एकच नंबर जयंतराव.
मस्त वाटते असे काही लेखन वाचून.

नाखु's picture

26 Aug 2015 - 5:25 pm | नाखु

+१

जेपी's picture

25 Aug 2015 - 6:22 pm | जेपी

आवडली कथा.

Sanjay Uwach's picture

25 Aug 2015 - 8:06 pm | Sanjay Uwach

खुपच छान लिखाण, कथेचा अनुवाद मनापासुन आवडला

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2015 - 8:07 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

एक एकटा एकटाच's picture

25 Aug 2015 - 8:14 pm | एक एकटा एकटाच

फार छान अनुवाद

मस्त

छान झालीय (अनुवादीत म्हणताय म्हणून तशी) कथा.

नेहमीप्रमाणेच निराशा झाली नाही....

मस्त कथा...

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2015 - 9:46 pm | जयंत कुलकर्णी

:-)

रामपुरी's picture

25 Aug 2015 - 11:02 pm | रामपुरी

नाव वाचूनच धागा उघडला. आणखी एक सुंदर कथा वाचायला मिळाली

पिलीयन रायडर's picture

25 Aug 2015 - 11:41 pm | पिलीयन रायडर

नेहमीप्रमाणेच.. मस्त!!!

योगी९००'s picture

26 Aug 2015 - 8:53 am | योगी९००

मस्त!!!

अनुवाद छान जमलाय..!!

सुधांशुनूलकर's picture

26 Aug 2015 - 11:38 am | सुधांशुनूलकर

खूप छान कथेचा खूप सुंदर अनुवाद.

स्वैर अनुवाद : सॉमरसेट मॉमच्या The Ant and the Grasshopper या कथेचे.
ही शेवटची ओळ वाचेपर्यंत ही खर्‍या जयंत कुलकर्णींच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी कथा आहे असं वाटत होतं.

कवितानागेश's picture

26 Aug 2015 - 11:41 am | कवितानागेश

मस्त

जे.पी.मॉर्गन's picture

26 Aug 2015 - 6:17 pm | जे.पी.मॉर्गन

एकदम आवडली. सुरुवातीला खरंच स्वानुभव वाटला!

जे.पी.

पैसा's picture

26 Aug 2015 - 9:51 pm | पैसा

मस्त कथा! रूपांतर असे वाटतच नाही!

अविनाश पांढरकर's picture

26 Aug 2015 - 11:25 pm | अविनाश पांढरकर

शेवटची ओळ वाचेपर्यंत ही खर्‍या जयंत कुलकर्णींच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी कथा आहे असं वाटत होतं.

मनीषा's picture

27 Aug 2015 - 4:53 pm | मनीषा

सुरेख कथा.

सत्यकथा वाटते आहे.

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 5:45 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद परत एकदा !

तीरूपुत्र's picture

27 Aug 2015 - 10:25 pm | तीरूपुत्र

जबराट.....भारीच..

दा विन्ची's picture

27 Aug 2015 - 10:54 pm | दा विन्ची

शेवटची ओळ वाचेपर्यंत ही खर्‍या जयंत कुलकर्णींच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी कथा आहे असं वाटत होतं.

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 10:55 am | मदनबाण

वाह.. सुरेख अनुवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

हेमंत लाटकर's picture

29 Aug 2015 - 6:49 pm | हेमंत लाटकर

कथा आवडली. लहान भावाने केलेली कर्ज देणी मोठ्याने भागवली. त्याच्या जागी मोठ्या भावाने म्हातारीची संपत्ती मिळवली यात काही गैर नाही. जर लहान भावाला संपत्ती मिळाली असती तर त्याने उघळूनच टाकली असती.

स्पंदना's picture

31 Aug 2015 - 5:53 am | स्पंदना

वा!
अनुवाद असावा तर असा!!
अगदी भारतिय मातीचा वाटला एकूण कथेचा बाज!!

जुइ's picture

31 Aug 2015 - 7:17 pm | जुइ

वेगळ्या धाटणीची कथा आवडली.