आमच्या आयुष्यातले कलाम

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
29 Jul 2015 - 12:36 pm

अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी काल व्हॉटस्‌ऍपवर समजली. आणि सगळ्या ग्रुप्सवर हीच चर्चा सुरु झाली. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झाले.

महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन, प्रकल्प व्यवस्थापक, नेते, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, अशा त्यांच्या अनेक ओळखी आहेत. अनेकांनी त्यांचा आजच्या वृत्तपत्रांमध्ये भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती असा उल्लेख केला आहे, आणि तो अगदी सार्थच आहे.

i1

त्यांच्या या सर्वव्यापी लोकप्रियतेचे एक कारण हे असु शकेल कि त्यांची कुठल्या हि राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. त्यांची राष्ट्रपती बनण्याआधीची पार्श्वभूमी हि वैज्ञानिक होती. त्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी महान होती. आणि मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने, वक्तृत्वाने, लिखाणाने आणि प्रचंड उत्साहाने अवघ्या देशाला भारून टाकले होते.

ते राष्ट्रपती बनले तेव्हा आम्ही शाळेत होतो. मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो कि कलाम मला ते राष्ट्रपती होण्याआधी माहित नव्हते.सुरुवातीला ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, एवढीच त्रोटक माहिती कळाली. पण त्यांनी कसला शोध लावला हे समजलं नाही.

त्यामुळे हे कोणाला बनवलं राष्ट्रपती असं हि वाटलं होतं. तसेही नागरिक शास्त्रात राष्ट्रपती पद हे मुख्यतः नामधारी आहे, आणि त्याला मर्यादित अधिकार असतात. त्यामुळे हे पद विशेष महत्वाचे नाही म्हणुन काय फरक पडतो असेही वाटले.

पण ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची सविस्तर माहिती छापून यायला लागली, त्यांच्या पुस्तकांची नावे कळायला लागली.

कलाम यांनी राष्ट्रपती पदावर राहून काय काय करता येते हे दाखवायला सुरुवात केली. त्यांनी भारताला उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवले. आणि फक्त राजकारण्यांसारखे स्वप्न रंगवत बसले नाहीत. तर हे स्वप्न साकारण्यासाठी भारताच्या तरुणाईला साद दिली. त्यांना प्रेरित केले. मार्गदर्शन दिले.

त्यांचे देशव्यापी दौरे व्हायला लागले. त्यांनी कित्येक शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या. मला आठवतंय त्याप्रमाणे त्यांचे काही लाख शाळा/विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष होते. एक राष्ट्रपती स्वतः इतक्या उत्साहाने लहान थोर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, हे अगदी विलक्षण होते.

देशातले नकारात्मक वातावरण बदलून सकारात्मक करण्यात त्यांनी प्रचंड हातभार लावला . तेव्हा बातम्या, चर्चा, मोठ्यांच्या गप्पा, शिक्षक जी विषयेतर मते मांडत ती, या सर्वातुन भारत हा अत्यंत मागास देश आहे, सरकार अत्यंत फालतू आहे, इथे चांगले काम करता येणार नाही, अशी भावना अगदी आमच्यासारख्या शाळेतल्या मुलांचीसुद्धा होती.

अशाच विचारांमधून, आणि अनुभवांमधून अनेक हुशार भारतीय परदेशी जातात, तिकडे उत्कृष्ट काम करतात. ब्रेन ड्रेन हि मोठी समस्या होती.

कलाम आणि तसेच यांच्या भाषणांमुळे हि मानसिकता थोडी बदलली.

i2

स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने बघावी लागतात. काहीजण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात. बाकीजागच्या जागच्या जागी या पायावरून त्या पायावर भार देत राहतात. कारण त्यांना आपल्याला काय हवे तेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळवावे हे हि ठाऊक नसते.
- डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

त्यांचे अग्निपंख हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या एका पुस्तकाने माझ्यावर आणि अनेकांवर खूप प्रभाव पाडला. मी ते वाचनालयातून, मित्राकडून आणि नंतर स्वतः घेऊन असे कित्येकदा वाचले. झपाट्याने वाचले.

त्यातुन त्याचं कार्य किती मोठे आहे हे समजलं. एक माणूस प्रतिकूल परिस्थितून शिकून किती मोठा होतो, केवढी मोठी कामगिरी करून दाखवतो, ह्याचं जिवंत उदाहरण पाहता आलं.

भारतात सुद्धा DRDO, इस्रो अशा संस्थांमध्ये किती अभिमानास्पद प्रकल्प केले गेले आहेत हे समजले. परदेशी मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही हा गैरसमज दूर झाला.

आधी शास्त्रज्ञ म्हणजे त्यांनी काही तरी नवीन आणि महत्वाचा शोध लावायला हवा, हा समज बदलला. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आहे तेच तंत्रज्ञान प्रभावीपणे राबवणे, कमी खर्चात आणि कमी सुविधा वापरून बनवणे ह्यालासुद्धा कल्पकता लागते.

कलाम ह्यांची फक्त वैज्ञानिक म्हणूनच नव्हे, तर अशा प्रकल्पात एक व्यवस्थापक, समन्वयक आणि नेता म्हणून देखील कामगिरी खुप मोठी आहे.

अनेक बुद्धिमान लोकांचे नेतृत्व करणे, वरिष्ठ मंडळी, आणि विद्यमान सरकार यांच्यापर्यंत आपल्या कल्पना पोहोचवून मंजुऱ्या मिळवणे, सरकारी अडचणींचा सामना करणे, त्यातून स्वतः नाउमेद न होता आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणे यासाठी कलाम यांच्यासारखाच असामान्य नेता लागतो.

आपल्या समोर असलेल्या प्रतिकुलतेला घाबरून पळ काढण्यापेक्षा तिचा सामना करून चांगली कामगिरी करण्याची त्यांनी जिद्द्द एकदा नव्हे तर अनेकदा दाखवली . त्यामुळेच बाकीच्या देशांनी मदत नाकारून सुद्धा, भारतीय लोकांनी त्यांच्या तोडीस तोड प्रकल्प केले आणि तेही कमी खर्च आणि वेळेत . हीच प्रेरणा दायी परंपरा आताच्या मंगळ यानापर्यंत चालू आहे.

त्यांच्या गाथेमुळे भारतीय असण्याबद्दलचा गंड दूर होऊन त्या जागी उदंड आशावाद आला. अभिमान आणि आत्मविश्वास आला .

त्यांनी दाखवलेले स्वप्न (व्हिजन २०२०) सर्वांनी पाहिले आणि मी यात सहभागी होऊ शकतो, आणि भारत बदलू शकतो, पुढे जाऊ शकतो हा विश्वास सगळ्यांना आला.

मला आकडेवारी माहित नाही, पण कलाम सर राष्ट्रपती झाल्यानंतर ब्रेन ड्रेन नक्की कमी झाला असेल असं मनापासुन वाटतं.

भारताच्या इतिहासात अनेक महान लोक होऊन गेले. पण आताच्या काळात ज्यांना समोर बघुन आयुष्य घडवावं, ज्यांच्यामुळे भारतीय असण्याचा अभिमान वाटावा असे खूप मोजके लोक आहेत. त्यांच्यापैकी एक कलाम सर होते.

त्यांना भेटण्याची इच्छा इतकी प्रबळ होती कि फक्त त्यांना भेटण्याची संधी आहे असे समजल्यामुळे आम्ही शाळा बुडवून एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. पण दुर्दैवाने त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

ह्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली, त्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली, अशी वाक्ये वापरत पोकळी ह्या शब्दाची अतिपरीचायाद अवज्ञा झाली आहे. असे नव्हे कि ती लोक, तेवढी मोठी नसतात, निश्चित असतात. पण त्यांची कामगिरी करून झालेली असते, ते बरीच वर्षे सक्रिय नसतात.

कलाम सरांचे तसे नव्हते. ते शेवटच्या दिवसापर्यंत सक्रिय होते. कार्यरत होते. २०२० अजून यायचे आहे, आणि त्यांचे स्वप्न पूर्णतः प्रत्यक्षात यायला अजून वेळ आहे. ते पूर्ण झालेले आपल्याला त्यांच्या सोबत पाहण्याचे सौभाग्य लाभायला हवे होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हि "पोकळी" शब्दशः जाणवते आहे.

आपण त्यांच्या पासून प्रेरणा घेऊयात. आपापल्या क्षेत्रात झोकुन देऊयात. भारतीयाने केलेले प्रत्येक चांगले काम भारताला पुढे नेईल. आपण स्वतःला सक्षम केले कि देश सक्षम होईल. आपण जबाबदारी उचलली कि देश जबाबदार होईल.

आपण झटून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

29 Jul 2015 - 2:38 pm | दिपक.कुवेत

लेख आवडला.

आकाश कंदील's picture

29 Jul 2015 - 4:12 pm | आकाश कंदील

खरेच चांगला लेख आणि अतिशय मनस्वी ऋषितुल्य व्यक्ती बद्दल. खराखुरा अजातशत्रु माणूस, आणि देशाचा नाही तर सर्वसांमान्याचा राष्ट्रपती. भारतातील सर्वात आदरणीय व्यक्ती. अजून काय लिहू शब्द नाहीत

मोहनराव's picture

29 Jul 2015 - 6:22 pm | मोहनराव

लेखन आवडले.

उगा काहितरीच's picture

29 Jul 2015 - 6:32 pm | उगा काहितरीच

अतिशय सुंदर लेख , ऋषीतुल्य व्यक्तीमत्व एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली .