ओढ वादळी ...(लवंगलता छंद)

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
24 Nov 2008 - 6:07 pm

नको मज हे विसावे
शुभ्र चांदण्याचे
साद देती मार्ग मला
तप्त या धुळीचे |

पाउलांना ओढ माझ्या
निळ्या आभाळाची
नजरेत सामावली
रेघ क्षितिजाची |

घोंघावती दरीतूनी
अनावर वारे
तेजाळती त्या गगनी
लक्ष लक्ष तारे |

नभास या गवसणी
गिरीशिखरांची
सौदामिनी उजळती
कडा काजळीची |

उधाणल्या या वार्‍याची
गाज मनी राही
वादळी ही ओढ अशी
उमलते देही |

गुंजन हे गोड नको
भोगी भ्रमरांचे
साद द्यावी त्याने, ज्याचे
पंख गरुडाचे |

कविता

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

24 Nov 2008 - 6:11 pm | लिखाळ

अरे वा !
कविता आवडली.

>>गुंजन हे गोड नको
भोगी भ्रमरांचे<<
भ्रमरांची ओळ छानच..
-- लिखाळ.

घाटावरचे भट's picture

24 Nov 2008 - 9:59 pm | घाटावरचे भट

सहमत.

राघव's picture

25 Nov 2008 - 12:43 pm | राघव

गुंजन हे गोड नको
भोगी भ्रमरांचे
साद द्यावी त्याने, ज्याचे
पंख गरुडाचे |

हे विशेष आवडले :)
मुमुक्षु