मुलाखत: पंडित संदीप अवचट

पारुबाई's picture
पारुबाई in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 7:26 am

आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची ही एक झलक:

पंडित संदीप अवचट

प्रश्न: आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल का ?
माझा जन्म पुण्यात १९६९ मध्ये झाला. माझे आजोबा प्रकांड पंडित ज्योतिषी काकासाहेब उर्फ श्रीवल्लभ दत्तात्रेय अवचट.
माझे वडील शरश्चंद्र श्रीवल्लभ अवचट. वडिलांना ते ३ वर्षांचे असताना पोलिओ झाला आणि त्या काळी पोलिओवर काही उपाय योजना नसल्यामुळे वडिलांना पायाचे कायमचे अपंगत्व आले. माझे वडील गवर्नमेंट डिव्हिजनल लायब्ररी मधे ग्रंथालय अधीक्षक होते.माझी आई सौ.सविता श. अवचट ही पुण्यातील हुजूरपागा प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका होती.
आज मी माझे आई वडील, अध्यात्म साधना करणारी माझी आत्या सुगंधा, माझी पत्नी संगीता आणि माझ्या २ मुली सानिका आणि समिता यांच्यासमवेत पुण्यात राहतो.

प्रश्न: आपण ज्योतिष या विषयाकडे कसे वळलात?
उत्तर : माझे आजोबा मूळचे ओतूरचे, १९५० साली पुण्यात येवून स्थायिक झाले. त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयावर ४० पुस्तके लिहिली आणि त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्यात जुने ज्योतिष केंद्र’ भालचंद्र ज्योतिष विद्यालय’ स्थापन केले. त्यांनी ग्रहांकित हे मासिकदेखील सुरु केले. आजोबांबरोबर वयाच्या सातव्या वर्षापासून राहत असल्याने ज्योतिषशास्त्राचे संस्कार लहानपणापासूनच घडत गेले. तसा मी सुरवातीला कंटाळा करत असे. आजोबा म्हणत “अरे, निदान राशी तरी पाठ कर, नक्षत्रे पाठ कर”. काही काळानंतर बालसुलभ उत्सुकतेने मला गोडी निर्माण झाली. कधी कधी भाव खायला मिळतो म्हणून देखील मी शिकत गेलो. आजोबा खूप लहान सहान गोष्टी समजावून सांगत. अश्या पद्धतीने आजोबा नावाच्या चालत्या बोलत्या पुस्तकातून माझे ज्योतिषशास्त्राचे शिक्षण सुरु झाले.

एक गोष्ट मला नेहमी आठवते. माझ्या लहानपणी आजोबांचे ठिकठिकाणी सत्कार होत असत. त्यांना हार तुरे देवून सन्मानिले जात असे. घरी आल्यावर ते हार मी स्वताच्या गळ्यात घालत असे आणि म्हणत असे कि आज माझा पण सत्कार झाला. अश्या वेळेस आजोबा म्हणत, ”ही फुले तुझ्या गळ्यात येण्यासाठी तुला ज्ञानाची बैठक असणे गरजेचे आहे. तू ज्योतिष शिकून घे म्हणजे आपोआप तुझ्या आयुष्यात सत्कार येतील.”

मला पाचवी सातवी नंतर ज्योतिषशास्त्र शिकण्याचे महत्व पटू लागले आणि मग मी शिकत गेलो. माझे आणि शालेय गणिताचे पहिल्यापासूनच वाकडे पण माझ्या आजोबांमुळे मला ग्रह गणिताची गोडी लागली ती आजपर्यंत. आज मी ग्रहगणित हा ज्योतिष शास्त्रातला अत्यंत कठीण भाग सहजपणे करू शकतो.

सुरुवातीला आजोबा पत्रिकेतले बारकावे समजावून सांगायचे. पुढे पुढे आजोबाना डोळ्याला त्रास सुरु झाला तेव्हा मी पत्रिका वाचून दाखवायाचो आणि आजोबा त्यांचे शेवटचे मत द्यायचे. ग्रहांकित मधून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आजोबा उत्तर लिहून पाठवायचे. मी पत्रिका वर्णन करून सांगायचो, चर्चा करायचो आणि आजोबा अंतिम मत द्यायचे.अश्या पद्धतीने हजारो पत्रिका मी आजोबांच्या हाताखाली अभ्यासल्या आहेत.

प्रश्न: आजोबांव्यातीरक्त आपण आणखी कोणाकडून ज्योतिषशास्त्राबाबत मार्गदर्शन घेतले?
उत्तर : डॉ.सुषमा करंदीकर पाबारी, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह सरस्वती, आणि श्री. अशोक उर्फ काकामहाराज जोशी या सर्व गुरूंचे पाठबळ मला लाभले. डॉ.सुषमा करंदीकर यांच्याकडून मी नाम घेतले, दीक्षा घेतल्या. मी कोल्हापूरला जगदगुरू शंकराचार्य यांच्या सहवासात हिंदुधर्म आणि त्यातल्या रूढी यांच्या विषयीचे ज्ञान मिळवले.

प्रश्न: आपण लोकांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन करता?
उत्तर :मी कुंडली /फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, वास्तुशास्त्र, numerology, dowsing, pranik healing, टॅरो, योगसाधना या सगळ्यांचा अभ्यास केला आहे. तसेच मौल्यवान खड्यांचा माझा अभ्यास आहे. या सर्व ज्ञानाचा मी वापर करतो, परंतु प्रामुख्याने कुंडली आणि हात पाहून ज्योतिषविषयक मार्गदर्शन करतो.
मी दिलेल्या वेळेचे मानधन घेतो. समोरच्या माणसाची अडवणूक करणे , त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून त्याला खर्चात पाडणे असे प्रकार मी केले नाहीत. माझे ब्रीद वाक्य आहे,’ मी लोकांच्या जीवनातला आनंद परत देतो. माझा आनंदाचा BPO आहे.’

प्रश्न: आपल्या इतर आवडी निवडी काय आहेत ?
मला वाचनाची खूप आवड आहे.वाचनामुळे मला विचारांची समृद्धता अली असे मी समजतो.तसेच मी ललितलेखन करतो ,कविता करतो,कार्यक्रमांचे निवेदन देखील करतो. त्यायोगे मला व.पु.काळे, ना .धों.महानोर,वसंत बापट,शांता शेळके अश्या थोरा -मोठ्यांच्या सहवासात वावरायला मिळाले आहे.

प्रश्न: ज्योतिषशास्त्राचा वापर करून आयुष्य सुखकर करता येते असं आपण म्हणता म्हणजे नेमकं काय?
उत्तर :माझे सगळ्यांना असे सांगणे आहे की तुम्ही तुमचे विधिलिखित ठरवूनच आलेले असता.ते बदलण्याची क्षमता ज्योतिषशास्त्रात नाही. ज्योतिष फक्त इतकेच सांगते कि आयुष्यातले निर्णय केव्हा घ्यायचे. कोणती गोष्ट कधी घडणार हे पत्रिका पाहून सांगता येते. एखादी गोष्ट करण्याकरता अनुकूल आणि प्रतिकूल काळ ज्योतिष्याच्या आधारे सांगता येतो. त्यामुळे चांगल्या गोष्टींची परिणामकारकता वाढवता येते आणि वाईट गोष्टींची तीव्रता कमी करता येते.

समजा, १० पावलांवर खड्डा असेल तर ग्रहयोग पाहून ते सांगता येते. तुम्ही सरळ जायच्या ऐवजी डावीकडून जा, सावकाश जा, वेगळ्या दिवशी, वेगळ्या वेळी जा इ. मार्गदर्शन करता येत. अश्या प्रकारे ज्योतिष तुम्हाल सजग करते, त्यानुसार तुम्हाला मनाची तयारी करता येते. मझ्या मते ज्योतिषाच्या मदतीने आयुष्यातील संभाव्य धोक्याची तीव्रता जवळ जवळ ८० % पर्यंत कमी करता येतो.

बर्याचदा तुमचे कष्ट, तुमचा पैसा, तुमची बुद्धी तुम्हाला अपेक्षित फळ देत असतात. पण जर ते फळ मिळायला उशीर झाला तर लोकं निराश होतात. माझ्याकडे जेव्हा असे लोकं येतात तेव्हा पत्रिकेवरून स्पष्ट दिसत असेत की काम कधी होणार आहे. मी फक्त तेवढे सांगतो. गरज नसताना मी कोणत्याही अनावश्यक पूजा अथवा विधी करायला सांगत नाही. मी कोणालाही अनिष्ट रूढी/परंपरा पाळायला, मी अंधश्रद्धेला थारा देत नाही. समाजातील प्रसिद्ध व्यक्ती ,उद्योजक,राजकारणी अश्या अनेक लोकांची मी भविष्ये सांगितलेली आहेत. अश्या लोकांना त्यांचे भविष्यातले योजना आखायला, नवीन कार्य सुरु करण्याकरता मुहूर्त काढून द्यायला मी मार्गदर्शन करतो.

प्रवासाला निघताना आपण जसा नकाशाचा आधार घेतो तसे आयुष्याचा प्रवास करताना ज्योतिष एक मागदर्शन करणारा नकाशा आहे असा समजा आणि तुमचे आयुष्य सोपे करून घ्या असे माझे सगळ्यांना सांगणे आहे.
ज्योतिष हे ४,५०० वर्षापूर्वीचे अत्यंत पुरातन असे शास्त्र आहे. बृहत संहिता, रावण संहिता, मयमतम, नारदीय संहिता, अग्निपुराण, सूर्य संहिता यासारख्या ग्रंथांमध्ये खूप माहिती साठवलेली आहे. मी तर असे म्हणेन कि या शास्त्रात आधी उपाय सांगितले आहेत आणि नंतर समस्या उद्भवल्या आहेत किंवा आधी इलाज सांगितले गेले आहेत आणि मग रोग उदयाला आले आहेत. गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे.

या शास्त्रात आपण नवीन काहीही निर्माण करू शकत नाही, त्या मध्ये कोणत्याही प्रकारची भर घालू शकत नाही. इतके सारे आधीच या शास्त्रात सगळे लिहिले गेले आहे. या सर्व माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या सुखी आणि यशस्वी जीवनाकरता करून घ्या इतकेच मला सांगायचे आहे.

प्रश्न: पूर्ण वेळ ज्योतिष या विषयाला वाहून घेण्याच्या निर्णय आपण कधी घेतलात ? त्याला तुमच्या कुटुंबीयांकडून काय प्रतिसाद मिळाला?
उत्तर: मी वयाच्या २९ व्या वर्षी नोकरी सोडून ज्योतिष मार्गदर्शनाच्या कामी स्वतःला वाहून घ्यायचे ठरवले. तेव्हा माझी पत्नी संगीता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि तिने मला या माझ्या आवडीच्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायला मानसिक बळ दिले. पुढे २००१ मध्ये माझ्या कामाचा व्याप वाढल्याने तिने तिची नोकरी सोडली. आता देशातील व परदेशातील ऑफिसेस तीच माझ्या आई वडिलांच्या जोडीने सांभाळते.

प्रश्न: ज्योतिषशास्त्राला अंधश्रध्दा म्हणलं जातं, यावर आपलं काय मत आहे?
उत्तर : या गैरसमजामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या शास्त्राला धर्माचा आणि दैववादाचा बुरखा चढवला गेला.त्यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागली.शिवाय या शास्त्राच्या अभ्यासाबाबत एकवाक्यता नाही. किमान पात्रतेचे कोणतेही निकष नाहीत. प्रत्येक गुरूने स्वतःचा स्वतंत्र अभ्यासक्रम राबवला आहे आणि आपापले शिष्य तयार केले आहेत. त्यामुळे समस्येचे निदान आणि त्यावरील उपाययोजना यात एकवाक्यता राहिली नाही.

मी धर्माचा,दैववादाचा बुरखा दूर करण्याचे काम करतो. आधुनिक जगात विज्ञानाची कास धरणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो कि माझ्याकडे मी पुराव्याने सिद्ध केलेली अनेक भाकिते आहेत. जी गोष्ट मी शास्त्राने सिद्ध करून दाखवू शकतो तीच आणि तितकीच गोष्ट मी तुम्हाला सांगेन. जर मी तसे करू शकणार नसेन तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही.

उदा. १९९४ सालापासूनचे माझ्याकडे पावसाचे रेकॉर्ड आहे. मध्यंतरी जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर इ. शास्त्रज्ज्ञ एकत्र येवून त्यांनी एक आधुनिक पद्धती वापरून पावसाचे भाकीत वर्तवले होते, जे ६७% खरे ठरले. मी ज्योतिषशास्त्राच्या आधारे सलग ३ वर्षे जे पावसाचे भाकीत सांगितले ते ९७% खरे ठरले. मी ‘ किर्लोस्कर’ मासिका मधून या सर्वाना असा प्रश्न विचारला होता कि तुम्ही देशाची दिशाभूल केली आहे. आता तुम्ही माफी मागाल का?

प्रश्न: ज्योतिषासारख्या प्राचीन विषयात प्राविण्य मिळवूनदेखील आपला दृष्टीकोन आधुनिक कसा राहिला?
उत्तर: याचे कारण आहे माझी कौटुंबिक पाश्वर्भूमी. माझे आजोबा पुण्यात समाज शिक्षण अधिकारी होते. त्यांना नाटकाची, कलेची आवड होती. समाजातल्या रूढी परंपराच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्याच्या हेतूने सरकारने त्या काळी हरिजन सेवक संघाची स्थापना केली होती.तेव्हा आजोबांनी त्यांच्या अंगच्या सर्व कला वापरून लोकप्रबोधनाचे काम केले. आमच्या घरात सुधारणावादी वातावरण होते. ज्या काळात स्त्रिया उपजीविकेसाठी घराबाहेर पडत नसत, त्या काळी माझ्या आजोबांनी माझ्या आजीला चित्रकला शिकायला आणि पुढे मुलींच्या शाळेत आर्ट टीचर म्हणून नोकरी करायला प्रोत्साहन दिले . घरात ज्योतिषाचे वातावरण असूनदेखील माझ्या आजोबानी माझ्या आई वडिलांच्या प्रेमविवाहाला पत्रिका न बघता त्या काळात मान्यता दिली होती. माझे वडील शरश्चंद्र अवचट आणि आई सौ.सुनंदा अवचट यांनीदेखील असेच संस्कार माझ्यावर केले.

अजून एक. शास्त्र म्हणजे अचूकता,शास्त्र म्हणजे पुराव्याने सिद्ध करता येणाऱ्या गोष्टी. शास्त्राच्या नियमाप्रमाणे मी देखील ज्या गोष्टी पुराव्याने सिद्ध करता येतात अश्याच गोष्टी लोकांना सांगतो.आणि अचूकता हेच प्रमाण मानतो.मी केलेली कित्येक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत. ही विज्ञानाची कसोटी माझ्या शास्त्राला लावली आहे आणि हे ज्योतिषशास्त्र एका नव्या पातळीवर नेवून ठेवण्याचा माझा प्रयत्न मी चालू ठेवला आहे.

मी आजही सगळ्यांना सांगतो कि ज्योतिषाला डोळसपणे प्रश्न विचारा.ज्योतिष हे माणसाचे कल्याण करणारे शास्त्र आहे.माझ्या या विचारांनी तुम्हा सर्वांचा या शास्त्राकडे पाहण्याचा,या शास्त्रावर विश्वास ठेवण्याचा एक टक्का जरी दृष्टीकोन बदलला तरी ती मला मिळालेली पावती आहे असे मी समजेन.

पंडित संदीप अवचट यांचा अधिक परीचय

आत्ता पर्यंत मिळालेली अवार्ड्स
• श्री शंकराचार्य अवार्ड
• श्री शाहू मोडक अवार्ड
• वयाच्या १५ व्या वर्षी मिळालेले Youngest Astrologer in National Astrologers Convention
• 1999 S साली मिळालेले ज्योतिष बृहस्पती अवार्ड
• अंकशास्त्रामधील सुप्तांक शोधन पध्दती करता अवार्ड
योगदान
• १९४७ लोकांना व्यसनमुक्त केले आहे.
• वैवाहिक समुपदेशन क्षेत्रात केलेल्या कामामुळे विविध पुरस्कार
• टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये ‘ कॅन्सर’ या विषयावर लेखन आणि संशोधन करण्याकरता नॉन मेडिको रिसर्चर म्हणून नियुक्ती.
• AAF American Astrologers Federation चे २००८ आणि २००९ चे संशोधक सदस्यत्व
• अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून प्रशंसा.
• महाराष्ट्रा मध्ये झालेल्या अवर्षणाची सलग ३ वर्षे केलेली अचूक भाकिते.
• ‘भारतावर २००८ साली दहशतवादी हल्ला होणार’ ह्याचे २००७ च्या दिवाळी अंकात केलेले भाकीत
• कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान

ज्योतिष मार्गदर्शनपर पुस्तके
• मुझसे लिखवाये कबीर, तुमची रास कोणती, संजीवन सहजीवन ( खास वैवाहिक समस्यांवर उपाय)
• १५ वर्ष दिव्यचक्षु या दिवाळी अंकाचे संपादन

फलज्योतिषसामुद्रिकराशीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

17 Apr 2015 - 2:05 pm | कपिलमुनी

मिपावर मुलाखती वाचायला मिळत नाही .
त्यामुळे वेगळा आणि चांगला प्रयत्न .
आता काही छिद्रान्वेषी मिपाकरांना यात झैरातीचा वास येइलच :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 2:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयुर्हित साहेबांनी ह्यावर आपले मत प्रदर्शन करावे.

आदूबाळ's picture

17 Apr 2015 - 3:47 pm | आदूबाळ

ही पंडित पदवी कोण देतं?

आणि

माझा आनंदाचा BPO आहे

म्हंजे नक्की काय आहे?

(प्रश्न खवचट नाहीत. शिरेस आहेत.)

अन्या दातार's picture

17 Apr 2015 - 4:54 pm | अन्या दातार

बहुदा लोकांची दु:खे त्यांच्याकडे घेऊन त्याचे आनंदात रुपांतर करत असावेत म्हणून BPO

विवेकपटाईत's picture

19 Apr 2015 - 10:09 am | विवेकपटाईत

लेख आवडला, तूर्त तरी जोतीषावर माझा विश्वास नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2015 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पारुबै, मुलाखत मिपावर टाकल्याबद्दल आभारी आहे. मुलाखत आवडली.
माझा ज्योतिषावर दोन टक्के विश्वास आहे तेही उगाच रिस्क नको म्हणुन.

-दिलीप बिरुटे

पारुबाई's picture

20 Apr 2015 - 4:28 am | पारुबाई

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे मनापासून आभार.

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2015 - 5:53 am | श्रीरंग_जोशी

मुलाखत आवडली. लेखनशैली नेटकी आहे.

अवांतर - शहाण्या माणसाने ज्योतिषशास्त्रापासून चार हात लांबच रहावे हे माझे या विषयासंबंधीचे मत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Apr 2015 - 10:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर

माहितीपूर्ण ग पारूबाई.

कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान

हे भाकित कोठे सापडेल जालावर?

आतिवास's picture

20 Apr 2015 - 11:53 am | आतिवास

विषयाबद्दल पास.
मुलाखत सादरीकरण आवडले.

लेख आवडला .ज्योतीष फक्त इंडीकेशन देत.
बाकी साठी जिवनाच संचीत घेऊन उभ रहाव लागत.