घुंघट...........आदरांजली -३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Mar 2015 - 11:01 am

घुंघट

लेखिका : इस्मताआपा चुगताई
खालील अनुवाद : जयंत कुलकर्णी.

त्या दिवाणावार पांढरीशुभ्र चादर टाकली होती. त्यावर माझी दादी बसलीए. दादीचे केस पाहिले की मला पिसे विस्कटलेल्या बगळ्याची आठवण येते आणि तिच्याकडे पाहिल्यावर एखाद्या अर्धवट घडवलेल्या संगमरवरी पुतळ्याची. ती इतकी गोरी होती की तिच्या अंगात रक्त आहे की नाही अशी शंका कोणालाही यावी. तिच्या पापण्याआड लपलेले तिचे पिंगट रंगाचे डोळे बघताना जाड पडद्याआड लपलेल्या खिडक्यांच्या तावदानांची हमखास आठवण येतेच. ती त्या दिवाणावर एखाद्या पिंजलेल्या चांदीच्या ढिगाप्रमाणे भासत असे. एखाद्या पर्वत शिखरावरील चमकणाऱ्या बर्फावरुन परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाने जशी डोळ्यासमोर अंधारी येते तशी अवस्था तिच्या व्यक्तिमत्वाने समोरच्याची होत असे. तिच्या चेहऱ्यावर एखाद्या ऋषीच्या चेहऱ्यावर तपश्र्चर्येचे तेज असते तसे तेज चमकत होते. ही तपश्चर्या तशी सोपी नव्हती. गेल्या ८१ वर्षात तिला पुरुषाचा स्पर्ष झाला नव्हता.

जेव्हा ती १३ वर्षाची होती तेव्हा तिला पाहिल्यावर म्हणे फुलांच्या गुच्छाची आठवण येई. त्यावेळी तिचे केस गुडघ्याखाली लोंबणारे लांलचक, जाड कुरळे होते तर कांती रेशमासारखी तलम होती. पण आता काळाने तिच्या सौंदर्याची परवड केली होती. आता उरली होती ती फक्त मऊ मुलायम सुरकुत्या पडलेली काया. असे म्हणतात की एके काळी ती इतकी सुंदर दिसायची की तिला यक्ष तिला पळवून नेतील की काय या भितीने तिच्या आई वडिलांना रात्र रात्र झोप येत नसे. नाही, खोटे नाही, खरोखरच, तेव्हाही ती या जगातील वाटतच नव्हती म्हणे.

चौदाव्या वर्षी तिचा निकाह माझ्या आईच्या मामाशी झाला. ही जितकी गोरी होती तितका तो काळा होता.. तेवढे एक सोडले तर तो उंचापूरा दिसण्यास मर्दानी होता. त्याचे नाक एखाद्या तरवारीच्या पात्यासारखे धारधार होते तर डोळे करारी. त्याच्या त्या काळ्या रंगावर त्याचे मोत्यासारखे दात अधिकच उठून दिसत. पण त्यांना एकच खंत होती ती म्हणजे त्यांचा वर्ण. त्या बाबतीत ते जरा जास्तच हळवे होते असे म्हणतात.

साखरपुड्यादिवशी मित्रमंडळींनी त्याची टिंगलटवाळी केली....

‘किती गोरी आहे रे याची बायको. याच्या सावलीनेही डाग पडेल तिच्यावर’

‘चंद्रग्रहणच की यारो !’

कालेमियाँचे वय त्यावेळी सोळा, सतरा वर्षाचे होते. तारुण्यातील अडमुठेपणा, हट्टीपणा रक्तात वाहत होता. मित्रमंडळी, बुजुर्गांच्या चेष्टेने बिथरुन कालेमियाँ जोधपूरला आपल्या आजोळी निघून गेले. तेथे आपल्या होणाऱ्या बायकोच्या सौंदर्याने अपमानित होत त्यांनी मित्रांजवळ कबुली दिली की त्यांना हे लग्न मान्य नाही. त्या काळी अर्थातच घरात बुजुर्गांच्या विरोधात काही वागणे सोडा, बोलणेही पाप समजले जाई. एवढेच काय अशा अपराधासाठी दोन तीन फटकेही मिळण्याची शक्यता नाकारता येत नसे.

‘‘मियाँ हे लग्न कुठल्याही परिस्थितीत मोडता येणे शक्य नाही ! घराण्याच्या अब्रूचा सवाल आहे’’ बुजुर्गांनी निर्णय दिला. आणि वाईट काय होते तिच्यात ? ती सुंदर होती हा दोष होता का तिचा ? ‘

‘‘मियाँ जगभर सौंदर्याची पूजा केली जाते आणि तू हे काय करतो आहेस ?’’

‘ती उद्धट आहे’ कालेमियाँ म्हणाले.

‘‘तुला कसे माहीत ?’’

मियाँकडे अर्थातच यावर उत्तर नव्हते. पण सौंदर्याबरोबर थोडासा उर्मटपणा तिच्यात असणारच आणि अशा उर्मटपणाला शरण जायचे म्हणजे काय ? कालेमियाँना आजपर्यंत दुसऱ्या कोणाचा विचार करण्याची गरजच भासली नव्हती.
घरच्यांनी बऱ्याच नाकदुऱ्या काढल्या. गोरीबी एकदा लग्न झाले की त्याची मालमत्ता होणार, ती तो जे सांगेल ते ऐकणारच. तो जर दिवसा ‘रात्र आहे’ असे म्हणाला तरीही ती तेच म्हणणार, त्याने बस म्हटले की ती बसेल आणि उठ म्हटले की ती उठेल, असे सांगून त्याची समजूत काढण्यात आली. शेवटी माफक मार खाऊन कालेमियाँ घरी परतले आणि एकदाचे ते लग्न लागले.

शादीत गाणे बजावणे तर होतच असते. पण यावेळी सगळ्या मुली गोरी दुल्हन आणि काळ्या दुल्ह्यावर रचलेली गाणी ढोलकिच्या तालावर म्हणत नाचत होत्या. हे कमी होते की काय म्हणून त्याच्या आजोळमधील कोणीतरी त्याच्या काळेपणाची चेष्टा आणि गोरीबीच्या गोरेपणाचे कौतूक असलेली कविता सादर केली. यानंतर मात्र कालेमियाँच्या सहनशक्तीचा अंत झाला. कालेमियाँ गप्प बसले होते याचा अर्थ वऱ्हाडीमंडळींनी वेगळाच काढला व मोठ्या अक्क्लहुशारीने त्यांनी त्याची मनसोक्त टिंगल केली. कालेमिमियाँ आतून नुसते फणफणत होते.

रात्री मान्यातून तलवार बाहेर पडते तसे फणफणत कालेमियाँ शयनगृहात शिरले. त्यांच्या नजरेस लाल फुलांनी माखलेली गोरीबी पडली. त्या लाल फुलांच्या रंगात तिचे रुप अजूनच उजळून निघाले होते. कालेमियाँच्या रागाचा पारा तिला पाहताच अस्मानाला भिडला. त्यांना वाटले हिचा गोरेपण स्वत:चा काळेपणा एकत्र कुटावा म्हणजे त्या दोघांमधील हा फरक कायमचा नष्ट होईल.

इकडे लहानशी गोरीबी घाबरुन बसली होती. तिला सांगण्यात आले होते की दुल्ह्याला शक्यतो घुंघट उचलताना त्रास द्यायचा असतो. त्याने मिनतवाऱ्या केल्या की मग त्याला घुंघटला हात लावण्यास परवानगी द्यायची असते....इ.इ.इ.

‘ठीक आहे... घुंघट बाजूला कर’’ कालेमियाँनी फर्मावले. ते ऐकताच दुल्हनने अजुनच अंग चोरुन घेतले.

‘‘तुझा घुंघट बाजूला कर बऱ्याबोलाने !’ कालेमियाँनी हुकुम सोडला. ते ऐकताच दुल्हनने आपले अंग अजुनच आक्रसून घेतले.

‘काय हा उर्मटपणा !’ कालेमियाँ ओरडले. तुला तुझ्या गोर्‍या वर्णाचा माज चढलाय !’’

दुल्ह्याने आपले नक्षीदार जुते खाकेत मारले, खिडकीतून बागेत उडी मारली, व स्टेशनवरुन जोधपूर गाठले.

आता घरातील बायकांना कळून चुकले की नववधूला वराचा स्पर्षही झालेला नाही. ही बातमी पुरुषांपर्यंत पोहोचायला कितिसा उशीर? कालेमियाँची लगेचच उलटतपासणी झाली.

‘‘ती अडमुठी आहे’’ कालेमियां

‘‘कशावरुन ?’’

‘‘मी तिला तिचा घुंघट बाजूला करायला सांगितला पण तिने ऐकले नाही.’’

‘‘मूर्खा, तुला माहीत नाही का ? नववधू स्वत:चा घुंघट बाजूला करत नाही. तुला तो बाजूला करायला काय झाले होते ?’’ हे ऐकताच तेथे खसखस पिकली.

‘‘तो घुंघट तिलाच बाजूला करावा लागेल ! नाहीतर जाउदेत तिला जहन्नूममधे’’

‘‘हद्द झाली ! आता तू तिला पुढच्या गोष्टीतही पुढाकार घ्यायला सांगणार की काय ? नादान !’’

त्या काळात घटस्फोट वैगेरेची भानगड नसायची. एकदा लग्न झाले की आयुष्यभरासाठी झाले. कालेमियाँ जे गडप झाले ते सात वर्षे आलेच नाहीत. अर्थात ते आईकडे नियमीतपणे पैसे पाठवीत असत. गोरीबीची तोपर्यंत सासर आणि माहेरामधे फरफट चालली होती. तिच्या आईवडिलांना या सगळ्या प्रकाराचा प्रचंड मानसिक धक्का बसला. आपल्या मुलीमधे असे काय कमी आहे की जावयाने अजून तिला हातही लावला नव्हता ? ते स्वत:ला सारखा हाच प्रश्न विचारत.

असला अन्याय ऐकलाय का कोणी ?

कालेमियाँचा पुरुषार्थ त्यांना गप्प बसू देईना. त्यांनी जोधपूरात आणि आग्र्यात वेश्यांच्या गल्ल्या पालथ्या घातल्या. गांजा ओढत त्यांनी कबुतरांचे रंगढंग खूप उधळले. त्यांचे हे रंगढंग चालू असताना गरीबबिचारी गोरीबी मात्र तिच्या घुंघटात घुसमटत आपले आयुष्य कंठत होती.

एकदा आई फारच आजारी पडल्यावर कालेमियाँ घरी आले होते. घरातील बुजुर्ग मंडळींनी या नवराबायकोंना एकत्र आणायची ही चांगली संधी आहे असे समजून प्रयत्न करण्याचे ठरविले. गोरीबीला परत नववधूचा पोषाख चढविण्यात आला, सजविण्यात आले.

‘‘हे बघा, मी अम्मीची शपथ घेऊन सांगतो, मी तिचा घुंघट उचलणार नाही. मग काय व्हायचे आहे ते होऊ देत.’’
कालेमियांची समजून न काढता आल्यामुळे मोर्चा गोरीबीकडे वळाला.

‘‘गोरीबी तुच तुझा घुंघट हटव ना ! त्यात काही चूक नाही. असे कुठेही लिहिलेले नाही की नवऱ्यानेच पहिल्या रात्री घुंघट बाजूला करावा. लाजलज्जा, रितीभाती जरा बाजूला ठेव आणि घुंघट बाजूला कर ! यात गैर काही नाही. तो तुझा नवरा आहे. पृथ्वीतलावरील तुझा मालकच. त्याचे ऐकणे तुझे कामच आहे. तेच तुझे खरे स्वातंत्र्य आहे’’
अशा अनेक भल्याबुऱ्या सल्ल्यांचा गोरीबीवर मारा करण्यात आला.

परत एकदा नववधूला सजविण्यात आले. मधुचंद्रासाठी शयनगृह विशेष काळजी घेऊन सजविण्यात आले. संध्याकाळी बिर्याणी व खिरीचा कार्यक्रम झाल्यावर कालेमियांला शयनगृहात हास्य विनोदात ढकलण्यात आले. गोरीबी आता लहान राहिली नव्हती चांगली २१ वर्षाची तरुणी झाली होती ती. तिच्या पापण्या झुकल्या होत्या आणि तिच्या तारुण्याच्या झळा कालेमियाँला स्पर्षत होत्या. गेली सात वर्षे गोरीबी याच क्षणाची वाट बघत होती. लग्न झालेल्या मैत्रिणींच्या पहिल्या रात्रीच्या कहाण्या ऐकून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. तसेच काहीतरी होणार हे समजून तिच्या घशाला कोरड पडली व शरीराला बारीकसा कंप सुटू लागला. सतार झिनी झिनी वाजू लागली. कालेमियाँची नजर मेंदी लावलेल्या तिच्या नाजूक पाउलांवर व हातावर पडताच कालेमियाँला स्वत:चा तोल सुटत चालला आहे हे जाणवू लागले. त्याची बायको त्याच्या समोर बसली होती. एक न उमललेली कोवळा कळी नव्हती ती आता. एक सुंदर उमललेल्या बहरास आलेल्या फुलांचा सुगंधित गुच्छच जणू. त्यांची सहनशक्ती आता पुढच्या सुखाच्या कल्पनेत वितळू लागली. असल्या रात्रीच्या अनेक अनुभवानंतर ते एखाद्या वाघासारखे लक्ष्यावर झडप घालण्याच्या तयारीत होते. त्यांनी तिचे सौंदर्य अजून एकदाही प्रत्यक्ष पाहिले नव्हते पण तिचे वर्णन कालेमियाँनी कित्येकजणांकडून ऐकले होते.

‘‘घुंघट बाजूला कर ना !’’ यावेळी कालेमियाँचा आवाज जरा मृदू होता.
पुढून काहीही प्रतिसाद आला नाही.

‘‘घुंघट बाजूला कर !’’ ते तिच्या कानात पुटपुटले.
एक नाही दोन नाही !

‘‘घुंघट बाजूला कर’’ कालेमियाँचा आवाज आता रडवेला झाला होता.

‘‘तू जर तो बाजूला केला नाहीस तर गोरीबी मी तुला परत कधीही तोंड दाखविणार नाही’’

एक नाही दोन नाही !

कालेमियाँनी शयनगृहाच्या खिडकीचा दरवाजा उघडला व आपले जुते खाकेत मारुन बाहेर उडी मारली. त्यानंतर कालेमियां आपल्या बायकोकडे कधीच परत आले नाहीत.

अस्पर्षीत दुल्हन गोरीबीने कालेमियाँची तीस वर्षे वाट पाहिली. एकएक करत तिच्या घरातील सगळे वयस्कर अल्लाला प्यारे झाले. तिच्याच एका म्हाताऱ्या मावशीकडे रहात असताना तिला कळले की भणंगासारखी इतकी वर्षे काढल्यावर दुल्हा कालेमियाँ परत आले आहेत. पण ते एकटेच आले नव्हते. बरोबर अनेक असाध्य रोग घेऊन आले होते. मृत्युशय्येवरच्या कालेमियाँचा एकदा "शेवटचे भेटून जा'' हा निरोप आल्यावर भोवळ आलेल्या गोरीबीने एका खांबाचा आधार घेतला. बराच वेळ ती तशीच उभी होती. नजरेसमोर काळोख पसरला होता पण डोळे सताड उघडे होते. विचार करुन तिच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडण्याची वेळ आली. शेवटी तिने आपली जूनी संदूक उघडली व आपला लग्नाचा जीर्ण पोषाख काढला. त्यातील नववधूचा घुंघट अंगावर चढवितांना तिच्या मनात मोठी खळबळ माजली होती. तिने आपल्या पांढूरक्या केसांवरुन सुगंधित तेलाचा हात फिरवला, पायघोळ घुंघटाचे एक टोक डाव्या हातात घेऊन गोरीबी कालेमियाँच्या मृत्युशय्येजवळ उभी राहिली.

‘‘घुंघट बाजूला कर’ कालेमियाँ कुजबुजले. मरायची वेळ आली होती पण मुघल रक्त अजून धमन्यामधे वाहत होतेच ना !

त्या मरणोन्मुख माणसाकडे पाहताना गोरीबीचे मन अपार करुणेने भरुन गेले. तिचा हात घुंघटाकडे जात असतानाचा खाली पडला.

कालेमियाँनी अखेरचा श्वास घेतला होता व त्यांचे डोळे सताड उघडे, गोरीबीकडे व्याकुळतेने बघत होते.

त्याच क्षणी गोरीबी शांतपणे जमिनीवर बसली. मनगटातला चुडा तिने तेथेच त्या चारपाईच्या काठावर फोडला, जरीकाम केलेला घुघंट बाजूला फेकून तिने पांढरा घुंघट तिच्या विधवा मस्तकावर ओढला.......

अनुवाद : जयंत कुलकर्णी.

इस्मत चुगताईंच्या तीन कथांचा अनुवाद केल्यावर त्यांच्या लेखनाचा प्रभाव माझ्या मालती-माधव या कथेवर स्पष्ट जाणवतो....

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2015 - 11:37 am | पिलीयन रायडर

ही कथा सुद्धा फार आवडली!!

काका, का थांबवताय? अजुन अनुवाद करा ना.. खुप छान लिहीत आहात..

अनुप ढेरे's picture

31 Mar 2015 - 11:39 am | अनुप ढेरे

भारी! आवडली गोष्ट!

अत्रन्गि पाउस's picture

31 Mar 2015 - 11:48 am | अत्रन्गि पाउस

काय भयंकर अनुभव / कथा आहे ...
किती अश्राप जीव ह्या अशा घुसमटीत नष्ट झाले कुणास ठौक ...
.
.
.
आग लागो सगळ्या भम्पक परंपरा\समजुतींना

सविता००१'s picture

31 Mar 2015 - 12:02 pm | सविता००१

गोष्ट सुरेख पण काटा आला अंगावर....
शापित सौन्दर्य..
बिचारी गोरीबी

जयंत कुलकर्णी's picture

31 Mar 2015 - 6:55 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

विवेकपटाईत's picture

31 Mar 2015 - 7:57 pm | विवेकपटाईत

वाचताना काटा आला. सुंदरच.

कविता१९७८'s picture

31 Mar 2015 - 8:14 pm | कविता१९७८

मस्तच

कविता१९७८'s picture

31 Mar 2015 - 8:14 pm | कविता१९७८

मस्तच

कविता१९७८'s picture

31 Mar 2015 - 8:14 pm | कविता१९७८

मस्तच

पॉइंट ब्लँक's picture

31 Mar 2015 - 9:51 pm | पॉइंट ब्लँक

छान लिहिलं आहे. :)

हाडक्या's picture

31 Mar 2015 - 9:53 pm | हाडक्या

मस्तच हो काका... :)

.इस्मताआपा चुगताईच्या कथांची ओळख करुन दिल्याबद्दल व तितक्याच ताकदीने उत्तम अनुवाद केल्याबद्दल.

पलाश's picture

31 Mar 2015 - 11:40 pm | पलाश

अनुवाद आवडला.
तुमच्या या अनुवादामुळे हे वेगळं तरीही ओळखीचं भेटत आहे. फार थोर आहे हे लिखाण. तुमच्याकडून अशी आणखी काही झाकली रत्ने आम्हां मराठी वाचकांच्या नजरेत येवोत हीच इच्छा.

खटपट्या's picture

1 Apr 2015 - 6:11 am | खटपट्या

खूप आवडली कथा !!

अगम्य's picture

1 Apr 2015 - 7:29 am | अगम्य

जर आपला पती पहिल्या वेळी सात वर्षांसाठी सोडून गेला होता असे माहित असताना तिने दुसर्या वेळी स्वतः घुंगट का बाजूला केला नाही? इतर सर्वांनीही तेच सांगितले होते. म्हणजे समाज काय म्हणेल ह्याचीही चिंता नव्हती. ह्यात नवर्याला justify करण्याचा प्रश्न नाही. तो तर चक्रमच होता हे निर्विवाद. त्याच्या चक्रमपणची दोघांनाही शिक्षा झाली. आता आहे आपला नवरा चक्रम, तर त्याचे थोडे ऐकले असते तर दोघेही सुखी झाले असते. गोष्ट वाचून वाईट वाटलं.

अत्रन्गि पाउस's picture

1 Apr 2015 - 7:51 am | अत्रन्गि पाउस

रजई - कविता महाजन ह्यांनी केलेल्या अनुवादात नवऱ्याला 'काळेबुवा' करून थोडी मजा घालवली आहे ...
हा अनुवाद उजवा ठरतोय

अनुवाद नेहेमीप्रमाणेच उत्तम.आवडली कथा.

एका कारूण्यमय कथेचा अतिशय सरस अनुवाद.

सिरुसेरि's picture

1 Apr 2015 - 10:53 am | सिरुसेरि

नवरा बायको यांच्या हट्टी व चक्रम स्वभावामुळे एका भावी सुखी संसाराची कशी वाट लागते याचे हे उदाहरण वाटते.

जयंत कुलकर्णी's picture

1 Apr 2015 - 3:10 pm | जयंत कुलकर्णी

इस्मताअपाची ही कथा वरवर दिसते तेवढी साधी नाही. ही कथा वाचल्यावर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींना हात घातलाय हे कळते. प्रथम मुघल खानदानी घरात असलेल्या प्रथा, मग त्या प्रथेनुसार ठरणारी लग्ने, लहानपणीच होणारी लग्न व त्याचे दुष्परिणाम, पुरुषांचा रंगेलपणा, त्यांनी काहीही केले तरी चालते ही समाजातील भावना. चारित्र्य, शील हे सगळे गूण/जबाबदारी देवाने स्त्रियांच्याच पदरात देवाने टाकलेत त्यामुळे त्यांचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्यच... या बाबतीत एक गोष्ट वाचली होती....अर्जूनाला एकदा त्याच्या सगळ्या विद्या सोडून जाताना दिसतात. त्याला काही आठवेना . तो हतबल झाला. परमेश्वराचा धावा करताच आकाशवाणी झाली "प्रथम जे तुला सोडून गेले त्याला तू थांबविले नाहीस, किंबहुना ते तुला सोडून गेले आहे हेच तुला माहीत नाही. ते गेल्यामुळे तुझी विद्या आता तुला सोडून चालली आहे. अर्जुनाने विचारले, "असे काय होते ते ?'' उत्तर आले, "शील, चारित्र्य'' असा विचार फक्त स्त्रियांनीच करायचा अशी त्या काळी असलेली पद्धत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कातड्याच्या रंगाने पडणार फरक. गोरा ते सुंदर काळे ते वाईट अशी जी समाजाची धारणा असते त्यावर ही कथा चांगलाच दाहक प्रकाश टाकते. मध्यंतरी गोरे ते चांगले, आकर्षक या अशा वेडगळ कल्पनांवर अल जझिरावर दोन काळ्या मुलींनी एक कार्यक्रम सादर केला होता त्यात या वेडगळ कल्पनांमुळे विदेशी कंपन्या किती पैसे कमवतात यावर चांगलाच प्रकाश टाकला होता. त्यांचे म्हणणे आफ्रिकेत काही आदीम जमातीत गोर्‍या रंगाला रोग समजतात....इ.इ..इ. या कथेनंतर त्यांना त्यांच्याच समाजातील लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले त्याव नवल ते काय.....

सूड's picture

1 Apr 2015 - 5:40 pm | सूड

अर्र!! :(

नगरीनिरंजन's picture

1 Apr 2015 - 6:55 pm | नगरीनिरंजन

कथा आणि अनुवाद दोन्ही आवडले.

जाने कौन घडी थी-- घर से साजन निकले
मैं घुंघट में जल गई
कितने सावन बरसे

असं एक गीत आहे ...

कथा आणि अनुवाद सुरेखच.